लतिफ, सय्यिद मुहम्मद : ( ११८४७?-?). पंजाबमधील एक सनदी अधिकारी आणि इतिहासकार. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही. त्याच्या जन्म मुस्लिम धर्माची पंरपरा असणाऱ्या सय्यिद उपज्ञातीतील कुटुंबात झाला. त्याला पारंपरिक धार्मिक शिक्षणाव्यतिरिक्त उदार शिक्षणही मिळाले. तो सनदी नोकरीत रूजू झाला. त्याची उप-आयुक्त म्हणून पंजाबमध्ये नियुक्ती झाली. ब्रिटिश अमदानीतील कार्यक्षम सेवेबद्दल त्याला खान बहादुर (१८८२) आणि शम्स-उल्-उलमा (१८९७) हे दोन किताब बहाल करण्यात आले. काही वर्षे त्याने विभागीय न्यायाधीश म्हणून लाहोर आणि होशियारपूर येथे काम केले. पुढे पंजाबातील लाहोर, जलंदर, गुजराणवाला, मुलतान, होशियारपूर आणि गुर्दासपूर या ठिकाणी त्याने विभागीय न्यायाधिश म्हणून काम केले. या काळात त्याची नूर मुहम्मद चिस्ती आणि रायबहादूर कन्हयालाल यांच्याशी घनिष्ट मैत्री जडली. नूर मुहाम्मद चिसितीनी तबकिकत-इ-चिस्ती हे लाहोरविषयी माहिती देणारे पुस्तक फार्सी भाषेत लिहिले. या सर्वांच्या आवडीचा इतिहास हा विषय होता आणि ते इतिहासविषयक ग्रंथांचे वाचनही करीत. ते सर्वजण उर्दू व फार्सी भाषांत अधूनमधून लेखन करीत. तिघेही अंजुमान-इ-पंजाब या पंजाबी संस्थेचे सदस्य होत. त्यामुळे लतिफने सुरूवातीस काही स्फुटलेखन उर्दू भाषेत केले व नंतर हिस्टरी ऑफ द पंजाब :फ्रॉम द रिमोटेस्ट अँटिक्‍विटी टू द प्रेझेंट टाइम हा पंजाबविषयीचा पहिला बृहद्‌ग्रंथ कलकत्त्यात प्रसिद्ध केला ( १८८१). कालक्रमानुसार हा ग्रंथ पाच विभागांत विभागला आहे. त्याची एक प्रत इंग्‍लंडच्या महाराणीकडे पाठविण्यात आली. (१८९१). भारतीय इतिहासकाराने शास्त्रीय पद्धतीने मांडलेला समग्र इतिहास म्हणून त्याचे महत्व इंग्रजी वाचक वर्गात विशेष ठरले. या ग्रंथासाठी त्याने मूळ साधने वापरली नाहीत परंतु तक्तालीन ब्रिटिश शासकीय दप्तराचा तसेच तत्कालीन जेम्समिल, डब्‍लु. डब्‍लु. हंटर, कनिंगहॅम इ. अधिकृत ब्रिटिश इतिहासकारंच्या उपयोग केला. याशिवाय त्याने हिस्टरी ऑफ मुलतान (१८९१) आणि लाहोर :इट्स हिस्टरी, आर्किटेक्चर, रिमेन्स अँड अँटिक्‍विटिज (१८९२) या दोन ग्रंथातून पंजाबमधील शहरांची मार्गदर्शनपर, वास्तव आणि सर्वागीण माहिती दिली.

संदर्भ : Sen, S. P. Ed .Historians and Historiography in Modern India. Calcutta, 1973.

देशपांडे, सु. र.