चौथाई – सरदेशमुखी :मराठी राज्याच्या सतराव्या-अठराव्या शतकांतील उत्पन्नांच्या बाबींपैकी दोन महत्वाच्या बाबी. या दोन्ही मुख्यतः मराठी राज्याबाहेर –छत्रपतींच्या स्वराज्याबाहेर –पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल करीत. चौथाई दौलतीकडे, म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होई तर सरदेशमुखीचा वसूल छत्रपतींच्या खाजगी उत्पन्नाची बाब होती. याचा वतन असाही उल्लेख तत्कालीन कागदपत्रांतून आढळतो. चाकण आणि सुपे यांच्या सरदेशमुखीचा उल्लेख शिवाजींच्या पत्रव्यवहारांत आढळतो. यामुळे या दोन्ही गोष्टी एकदम वसूल करीत असले, तरी त्यांची जमा भिन्न ठिकाणी होई. चौथाई एकंदर एकचतुर्थांश व सरदेशमुखी ही पूर्ण उत्पन्नाच्या एकदशांश भाग एवढी होती व ती इतर वसुलाप्रमाणे असे. हे वतन पुढे शिवाजी महाराजांनंतर अनेक वर्षे चालू होते.

चौथाईची सुरुवात शिवाजी महाराजांपूर्वी अनेक वर्षे सुरू झाली होती. अर्थात ती निश्चितपणे केव्हा सुरू झाली, यांबाबत मतभेद आहेत. तथापि धरमपूरच्या राजवंशातील एक राजपूत सत्ताधीश (चोथिया ?) दमण येथील पोर्तुगीजांकडून चौथाई वसूल करीत असे. पुढे १५७९—१७१६ च्या दरम्यान दमणचे लोक रामनगरच्या राजाला चौथाई देत. याबद्दल राजा गुरांचे व प्रजेचे चोरांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेई. रामनगरचा राजा चौथाई घेत असे, ती एकूण उत्पन्नाच्या १७, १४ किंवा १२/ टक्के एवढी असे. शिवाजींनी दमणवसई हा भाग जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली होती. जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता शिवाजी महाराज त्यांच्याकडून उत्पन्नाच्या / किंवा कमी अधिक हिस्सा वसूल करीत. त्यांनी गोवळकोंडा व विजापूर येथील शाहीसत्ता आणि खानदेश व कोकणातील पोर्तुगीज यांच्याकडून चौथाई वसूल केली होती. एवढेच नव्हे, तर गोवळकोंडा व विजापूर यांना मोगलांविरुद्ध मदतही केली. पुढे पुढे शिवाजी चौथाई देणाऱ्या प्रदेशांतून स्वारी करणार नाही, या अटीवर चौथाई वसूल करू लागले. संभाजी व राजाराम हेही या पद्धतीप्रमाणे चौथाई वसूल करीत असत. औरंगजेबाच्या दक्षिणेतील स्वारीत कैदी असलेल्या शाहूला अहमदनगर प्रदेशातून चौथाई मिळे. मराठ्यांप्रमाणे बुंदेलखंडातील चंपतरायने त्याच्या शेजारील प्रदेशातून चौथाई घेतल्याचे कागदपत्रांतून आढळते. १७१९ मध्ये दिल्लीच्या बादशाहने आपल्या दक्षिणेतील सहा सुभ्यांवरील चौथाई-सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार छत्रपती शाहूस दिले होते. बादशाहने दक्षिणेच्या सहा सुभ्यांवर नेमलेला निजामुल्मुल्क हा सुभेदार होता. तो वरकरणी म्हणे, हे सर्व हक्क मी वसूल करून देतो मात्र माझ्या सुभ्यात मराठ्यांनी ढवळाढवळ करू नये. प्रत्यक्षात मात्र त्याने वसूल देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यामुळे मराठ्यांना हे तत्त्व मान्य झाले नाही. साहजिकच मराठे सहा सुभ्यांतून पुढे संचार करु लागले आणि चौथाई व सरदेशमुखी वसूल करू लागले. यांतूनच पुढे निजाम-मराठे संघर्ष निर्माण होऊन अनेक युद्धे झाली आणि मराठी राज्याचा त्याबरोबर विस्तारही झाला. तथापि हे प्रकरण पूर्णतः कधीच निकालात निघाले नाही. इंग्रजांच्या आगमनानंतर व मराठेशाहीच्या अवनतीच्या काळात इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावकडून चौथाई-सरदेशमुखीचे सर्व हक्क १८०२ मध्ये काढून घेतले.

संदर्भ : Sen, S. N. The Military System of the Marathas, New Delhi, 1958.

 

गोखले, कमल