पंतप्रतिनिधी, भवानराव ऊर्फ बाळासाहेब श्रीनिवासराव : (२४ ऑक्टोबर १८६८–१३ एप्रील १९५१). औंध संस्थानचे अधिपती. शिक्षण औंध, सातारा आणि पुणे येथे बी. ए. पर्यंत. पुढे मुंबईस एक वर्षभर कायद्याचा अभ्यास केल्यावर वडील श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी ह्यांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहू लागले. १९०९ मध्ये ते संस्थानच्या गादीवर आले.

भवानराव पंतप्रतिनिधीसंस्थानिक म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. महात्मा गांधीच्या तत्त्वज्ञानापासून प्रेरणा घेऊन १९३९ मध्ये आपल्या संस्थानात विकेंद्रित ग्रामराज्यावर आधारित अशी लोकशाही त्यांनी आणली आणि ती दहा वर्षे, म्हणजे १९४८ साली औंध संस्थान भारतीय संघराज्यात विलीन हो ई प र्यं त, यशस्वीरीत्या राबविली. राज्यातील प्रत्येक गाव अन्नवस्त्रादी मूलभूत गरजांबाबत स्वयंपूर्ण करणे, त्या त्या गावातून येणारा महसूल त्या त्या गावच्या विकासकार्यासाठी देणे इ. प्रागतिक कल्पना त्यांना केवळ जोपासल्याच नाहीत, तर त्या अमलात आणण्याचे मनःपूर्वक  प्रयत्न केले. अस्पृश्यतेच्या प्रभावकाळात त्यांनी तथाकथित अस्पृश्यांना आपल्या राज्यात सर्वत्र मुक्त प्रवेश दिला पंक्तिभेदादी निर्बंध नाहीसे केले. औद्योगिक प्रगतीच्या ध्यासातून त्यांनी किर्लोस्कर, ओगले इं. उद्योगपतींना साहाय्य केले होसूर (गुणडाळ)

येथील साखर कारखाना आणि ओगलेवाडी येथे हातकागद कारखाना उभारण्यास मदत केली. स्वदेशी आणि साक्षरता ह्यांचा पुरस्कार त्यांनी आपल्या संस्थानात केला सक्तीचे मोफत शिक्षण १९२७ पासून सुरू केले होते.

विद्या, कला व शरीरसंवर्धन ह्यांविषयी त्यांना फार आस्था होती. त्यांनी उभविलेल्या कलावस्तुसंग्रहालयात चित्रादी विविध कलावस्तूंचा वेचक संचय आढळतो. विशेषतः प्राचीन काळापासूनच्या चित्रकारांची उत्तमोत्तम दुर्मिळ चित्रे त्यांनी मिळविली तसेच चित्रकलेवरील जागतिक कीर्तीच्या विविध ग्रंथांचा संग्रह केला. ते स्वतःही एक चित्रकार होते. ऐतिहासिक–पौराणिक विषयांवरील अनेक दर्जेदार चित्रकृती त्यांनी निर्माण केल्या. त्यांतून त्यांच्या स्वतंत्र चित्रशैलीचा प्रत्यय येतो. १९१५ साली त्यांनी एक सचित्र रामायण छापले. त्यातील ६० चित्रे त्यांनी स्वतः काढलेली आहेत. ह्याच धर्तीवर महाभारतावर आणि शिवचरित्रावर पुस्तके काढून त्यांतील चित्रे त्यांनी स्वतः रेखाटली. वेरूळ (१९२८) आणि अजंठा (१९३०) ह्या त्यांच्या ग्रंथांत ह्या दोन ठिकाणच्या चित्र-शिल्पांविषयी त्यांनी केलेले लेखन एक मार्मिक कला समीक्षा म्हणून वाचनीय आहे.

व्यायाम आणि मुख्यतः सूर्यनमस्कार ह्यांच्या प्रचार – पुरस्काराबद्दल तर त्यांचे नाव महाराष्ट्रात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. आहार आणि व्यायामशास्त्र ह्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले. एक विद्याप्रेमी ह्या नात्याने पुणे येथील भंडारकर प्राच्यविद्या संशोधनमंदिरास, तसेच बनारस हिंदू विद्यापीठास त्यांनी भरीव आर्थिक साहाय्य केले. माहाराष्ट्रातील कीर्तन ह्या संस्थेबद्दल त्यांना आदर होता आणि ते स्वतः उत्तम कीर्तनेही  करीत. त्यांचे आत्मचरित्र त्यातील प्रांजळ निवेदनामुळे लक्षणीय ठरले. १९३५ मध्ये इंदूर येथे झालेल्या विसाव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुंबई येथे ते निधन पावले. त्यांचे पुत्र आप्पासाहेब पंत ह्यांनी निरनिराळ्या देशांत, भारताचे राजदूत ह्या नात्याने महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे.

कुलकर्णी, अ. र.