विल्यम पिट, धाकटापिट, विल्यम धाकटा : (२८ मे १७५९-२३ जानेवारी १८०६). इंग्‍लंडचा अठराव्या शतकातील एक थोर राजकारणपटू आणि १७८३-१८०१ व १८०४-०६ दरम्यानचा पंतप्रधान. त्याचा जन्म अर्ल ऑफ चॅटमच्या उमराव घराण्यात हेझ (केंट) येथे झाला. अर्ल ऑफ चॅटम विल्यम पिटचा हा दुसरा मुलगा. त्याच्या आईचे नाव लेडी हेस्टर ग्रेनव्हिल. जॉर्ज ग्रेनव्हिल (१७६३-६५) या माजी पंतप्रधानाची ती बहीण. यामुळे विद्यार्थिदशेतच त्याच्यावर घरच्या राजकीय विचारांचे संस्कार झाले. त्याच्या जन्माच्या वेळई अर्ल ऑफ चॅटम हे युद्धमंत्री होते आणि सप्तवार्षिक युद्धात त्यांनी इंग्‍लंडला जय मिळवून दिला होता. त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु विल्यमची प्रकृती प्रथमपासूनच अत्यंत नाजूक होती. म्हणून त्याचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी तो पेमब्रुक हॉल (केंब्रिज विद्यापीठ) मध्ये गेला. लहानपणापासून त्याच्यात प्रौढ विचार व विलक्षण बुद्धी असल्याचे आढळून आले. त्या वेळी सरदाराच्या मुलांना परीक्षेशिवाय पदवी प्राप्त होत असे. त्याप्रमाणे विल्यम पिट पदवीधर झाला आणि कायद्याचा अभ्यास करू लागला. १७८१ मध्ये तो अपल्‍बी या मतदारसंघातून संसदेत निवडून आला. त्याच्या भाषणानेच चार्ल्स फॉक्स, लॉर्ड नॉर्थ, एडमंड बर्क यांसारखे मुत्सद्दी आणि संसद सदस्य स्तिमित झाले. त्याने काही पदांची अभिलाषा सोडून वकिकीबरोबर वादविवादपद्धतीचा आणि वक्तृत्वाचा अभ्यास केला. १७८२ मध्ये शेलबर्नचो मंत्रिमंडळ अधिकारावर आल्यानंतर त्याला चॅन्सेलर ऑफ द एक्सचेकर करण्यात आले. यावेळी तिसरा जॉर्ज गादीवर आला होता. तो सर्व बाबींत प्रत्यक्ष लक्ष घाली. शिवाय त्याला इंग्रजी भाषेचे ज्ञान होते. तत्कालीन पंतप्रधान चार्ल्स फॉक्स हा अत्यंत हुशार होता, पण त्याने राजाला दुखविले. शिवाय आपल्या सहकार्‍यानांही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे त्याचे संयुक्त मंत्रिमंडळ गडगडले. अशा वेळी शेलबर्नकडे सर्व राज्याची सूत्रे राजाने सुपूर्त केली पण अमेरिका, फ्रान्स, स्पेन व हॉलंड या देशांशी त्याने शांतता तह केले. त्यामुळे शेलबर्नला राजीनामा द्यावा लागला. त्याबरोबर विल्यम पिटनेही राजीनामा दिला (१७८३). नॉर्थ व फॉक्स यांच्या पक्षांचे शासन काही दिवस आले पण ते इंडिया बिल चर्चेला आले असता पराभूत झाले आणि तिसर्‍या जॉर्जने चोवीस वर्षांच्या विल्यम पिटच्या हाती सर्व सत्ता सुपूर्त केली (१९ डिसेंबर१७८३). पिट पंतप्रधान झाला पण सुरूवातीला त्याला संसदेत बहुमत नव्हते. त्याने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने अनेक सभासदांची मने जिंकली आणि साहाय्य मिळविले. इंग्‍लंडचे आर्थिक धोरण सुधारून त्याने प्रशासन कार्यक्षम केले. त्याच्या सु १८ वर्षांच्या कारकीर्दींचे दोन भाग पडतात : सुरूवातीची १७८३ ते १७९२ शांततेची कारकीर्द आणि १७९२ ते १८०१ व १८०४ ते १८०६ फ्रान्सबरोबरच्या युद्धाचा काळ.

प्रारंभीच्या कारकीर्दीत त्याने अडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने सुचविलेले सिद्धांत प्रथमच प्रत्यक्ष कृतीत उतरविले आणि इंग्‍लंडचा जमाखर्च सुधारून राष्ट्रीय कर्ज कमी केले प्रशासनातील दिवाळखोरी व लाचलुचपत कमी केली उद्योगधंद्यास उत्तेजन दिले आणि परराष्ट्राशी व्यापार वाढविला. हिंदूस्थान, कॅनडा आदी वसाहतींत त्याने अनेक प्रशासकीय सुधारणा घडवून आणल्या. यामुळे त्याचे पार्लमेंटमध्ये वजन वाढले आणि तो अत्यंत लोकप्रिय झाला. एवढेच नव्हे, तर तिसर्‍या जॉर्जवर त्याची छाप पडली. कॉमन्स सभेची सुधारणा, निग्रो गुलाम पद्धती, मुद्रणस्वातंत्र्य इ. प्रश्नांवर त्याने केलेली संसदेतील भाषणे प्रसिद्ध असून त्यांमुळे त्याच्या पक्षाचे वर्चस्व इंग्‍लंडमध्ये वाढले. त्याने आयर्लंडबरोबर संसदीय समझोता घडवून आणला (१८००) गुलामांचा व्यापार नष्ट करणे, आयर्लंसंबंधी धोरण, आयरिश कॅथलिकांना देऊ केलेले हक्क इ. त्याच्या सुधारणांना राजाने विरोध केला म्हणून पिटने अखेरीस कंटाळून राजीनामा दिला (१८०१).

सुरूवातीस फ्रान्सबरोबर इंग्‍लंडचे व्यापारी संबंध मैत्रीचे होते पण क्रांतीनंतर नेपोलियन सर्वसत्ताधारी झाला आणि इंग्‍लंडशी त्याने युद्ध आरंभिले. यावेळी इंग्‍लंडच्या आरमारात बंड झाले आणि एका लढाईत इंग्‍लंडचा पराभव झाला. तथापि पिटने युक्त्याप्रयुक्त्यांनी तसेच आपल्या वक्तृत्वाने पार्लमेंटमध्ये आपले बहुमत टिकविले आणि दुसर्‍या खेपेस पंतप्रधान झाल्यानंतर (१८०४-०६) फ्रान्सविरुद्ध लढण्याकरिता यूरोपीय राष्ट्रांचा संघ बनविला आम्येनचा तह केला आणि ट्रफॅल्गरच्या लढाईत नेपोलियनच्या आरमाराचा पूर्ण धुव्वा उडवून इंग्‍लंडचे नाविक सामर्थ्य पुन्हा एकदा सिद्ध केले (१८०५). तथापि उल्म व ऑस्टरलिट्‌झ (१८०५) येथील दोन मोठ्या पराभवानंतर तो खचला. त्यानंतर तो आजारी पडला व काही दिवसांतच लंडनमध्ये मरण पावला.

पिटच्या खासगी जीवनाविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. त्याचा लॉर्ड ऑक्लंडच्या एल्नर ईडन या तरूणीशी विवाह ठरला होता पण ऐनवेळी हे लग्‍न मोडले आणि विल्यम पिट अखेरपर्यंत अविवाहित राहिला. आपला वेळ संसारात जाईल आणि त्यामुळे आपल्या देशसेवेत खंड पडेल, अशी त्याला भीती वाटत असे. त्याला फार थोडे मित्र होते. लहानपणापासून एकाकी जीवन व ‘पोर्ट’ नावाची दारू यांची त्याला विशेष आवड होती. तो समाजात फारसा मिसळत नसे. सामाजिक व सांस्कृतिक समस्यांकडे त्याने कधीच आत्मीयतेने लक्ष दिले नाही. प्रत्येक गोष्ट तो आत्मविश्वासाने करी. त्याचे राजकारण व्यवहार्य दृष्टिकोनावर आधारलेले असे. राजकारण ही कला आहे असे तो मानी. त्याने अनेक सुधारणा करून कार्यक्षम प्रशासनव्यवस्था अंमलात आणली लाचलुचपतीबरोबर अकार्यक्षम व्यक्तींना काढून टाकले. देशाची सेवा करण्याची संधी कुणीही गमावू नये, तसेच तिचा गैरवापर होऊ नये, म्हणून तो दक्ष असे. देशाची आर्थिक स्थिती सुधारूनसुद्धा त्याला स्वत:ची आर्थिक घडी बसवता आली नाही. त्यामुळे मृत्युसमयी त्याला अतोनात कर्ज झाले. अठराव्या शतकात प्रचारात असणार्‍या इंग्रजी संविधानाचे सर्व संकेत तो तंतोतंत पाळीत असे. राजाचा मंत्रिमंडळ निवडण्याचा आणि राजकारणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्याला मान्य होता पण त्याचबरोबर त्याने संसदेचा कायदे करण्याचा हक्क आणि देशाच्या राजकारणातील तिचे महत्व हे राजा आणि लॉर्ड्‌स सभा यांपेक्षा श्रेष्ठ आहे, हे मत प्रतिपादन केले व दोन्हींचा समतोल साधून राजकारणात सुसूत्रता ठेवली. त्यामुळे इंग्‍लंडची लोकशाही अधिक दृढमूल झाली.

संदर्भ : 1. Aspinall, Arthur, Ed. The Correspondence of George, Prince of Wales, 1770-1812, London, 1963.

    2. Ehrman, John, The Younger Pitt, New York, 1970.

   3. Jarret, Derek, Pitt, The Younger, New York, 1974.

   4. Roscberry, Lord, Life of Pitt, New York, 1969.

देशपांडे, सु.र.