शेरशाह : (? १४८६-२२ मे १५४५). मोगलकाळात दिल्लीच्या तख्तावर अल्पकाळ बसलेला सूर घराण्यातील बादशाह (कार. १५३८-४५). त्याचे मूळ नाव फरीदखान व घराणे अफगाण. त्याचे आजोबा इब्राहीम सूर व वडील हसन अफगाणिस्तानातील रोह येथून नोकरीच्या शोधार्थ हिंदुस्थानात आले. हसनने स्वकर्तृत्वावर बिहारमधील ससराम व खवास्सपूर तांडा हे परगणे मिळविले. हसनच्या ज्येष्ठ पत्नीचा फरीद हा मुलगा. घरातील सावत्र आईच्या वर्चस्वामुळे फरीदचे बालपण खडतर ठरले. अखेर कंटाळून तो जौनपूरच्या मद्रसात दाखल झाला (१५०१). त्याने अरबी, फार्सी या भाषा गणित आणि गुलिस्तान, बुस्तान, सिकंदरनामा हे गंथ, यांचा अभ्यास केला. पुढे हसनच्या काही मित्रांच्या आग्रहास्तव ससराम व खवास्सपूर तांडा यांचे व्यवस्थापन फरीदकडे आले. सुमारे चार वर्षे त्याने उत्तमप्रकारे कारभार केला (१५१८-२२) परंतु पुन्हा सावत्र आईच्या हस्तक्षेपामुळे त्यास ती जहागीर सोडून आग्ऱ्याच्या लोदी सुलतानाकडे आश्रय घ्यावा लागला. तिथे त्याने दौलतखान या अमीराची मर्जी संपादन केली. दरम्यान हसनचे निधन झाले. दौलतखानाने लोदी सुलतानाचे मन वळवून फरीदला वडिलांच्या जागी जहागीर देण्याविषयी फर्मान काढले पण सावत्र भाऊ सुलेमान याने चौंडचा जहागीरदार मुहम्मदखान याची मदत घेऊन त्यास विरोध केला, तेव्हा फरीदने बिहारखान लोहानी (बिहारचा सुलतान मुहम्मद) याची चाकरी पतकरली. एकदा शिकारीच्या वेळी फरीदने एकट्याने वाघ मारला, म्हणून त्यास सुलतानाने शेरखान ही उपाधी दिली आणि त्याचा पराक्रम पाहून त्याची नियुक्ती दक्षिण बिहारचा उप-राज्यपाल (वकील) म्हणून केली. पुढे १५२७ मध्ये शेरखान (शेरशाह) मोगल बादशाह बाबराकडे गेला. बाबराला त्याने अनेक स्वाऱ्यांत मदत केली, तेव्हा बाबराने त्याची मूळ जहागीर मिळवून दिली (१५२८). त्यापुढील वर्षी मुहम्मद लोदीच्या नेतृत्वाखाली अफगाणांनी बाबराविरूद्ध चढाई केली, तेव्हा मात्र तो अफगाणांच्या बाजूस गेला.

बिहारचा सुलतान मुहम्मद मरण पावल्यानंतर (१५२८) त्याची पत्नी दुदूबीबी आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावे राज्यकारभार पाही. मुहम्मद लोदीने तिच्या राज्याला वेढा दिला असता बाबराने तिला मदत केली. तिने बाबराचे मांडलिकत्व पतकरले आणि शेरशाहची राज्य पतिनिधी (नायब) म्हणून नेमणूक केली. दुदूबीबीच्या मृत्यूनंतर (१५३०) शेरशाहच्या हाती सर्व सत्ता आली. प्रथम गंगेकाठचा चुनार किल्ला त्याने घेतला. किल्लेदार ताजखान या युद्धात ठार झाला. शेरशाहने त्याच्या विधवेशी विवाह केला, त्यामुळे चुनार परगणाही त्याच्या अखत्यारीत आला. नंतर त्याने गाझीपूरचा नासीरखान लोहानी याच्या निपुत्रिक पत्नीबरोबर विवाह केला, तिचीही सर्व मिळकत त्यास मिळाली. मोगलांविरूद्ध लढण्यासाठी मुहम्मद लोदीने शेरशाहची मदत मागितली होती तथापि त्यावेळी हुमायूनने लोदीला राज्य देण्याचे फर्मान पाठवून नंतर हुमायूनने त्याचा गोमतीकाठच्या दाद्रहाच्या लढाईत (सप्टेंबर १५३१) दारूण पराभव केला. नंतर शेरशाहकडे चुनार किल्ल्याची मागणी केली. शेरशाह हा मोक्याचा किल्ला सोडत नाही असे दिसताच त्यास वेढा दिला पण याचवेळी गुजरातच्या बहादूरशाहने मोगलांविरूद्ध उठाव केल्यामुळे हुमायून वेढा उठवून गुजरातेत गेला. शेरशाहचे बिहारमध्ये वर्चस्व पस्थापित झाले. यामुळे लोहानी सरदारांत मत्सर निर्माण झाला. त्यांनी बंगालच्या महम्मूदशाहच्या मदतीने बिहारवर स्वारी केली. तीत त्यांचा पराभव झाला आणि शेरशाहने सूरजगडपर्यंत बंगालचा प्रदेश पादाकांत केला (१५३३). बंगाल जिंकण्यासाठी शेरशाहने दोनदा स्वाऱ्या केल्या (१५३४, १५३५). मोंघीर जिंकून तो महम्मूदशाहवर चालून गेला (१५३६). तह होऊन शेरशाहला कियुल ते सिकीगलीपर्यंतचा विस्तृत प्रदेश मिळाला. बंगालवर पूर्ण वर्चस्व मिळविण्यासाठी त्याने गौडला वेढा दिला (१५३७), तेव्हा हुमायूनने चाल करून अस्करी (१५३७) आणि चुनार (१५३७-३८) जिंकले. शेरशाहने रोहतास किल्ला आणि बंगाल -बिहारचा बहुतेक सर्व भाग घेतला आणि गौड येथे राज्याभिषेक करून (३० मे १५३८) फरीद उद्-दुनिया व दीन अबुल मुझफ्फर शेरशाह हा किताब धारण केला. आग्र्याकडे परतताना शेरशाहने मोगलांचा चडसा (१५३९) व कनौज (१५४०) या लढायांत पराभव केला. हुमायून दिल्ली, लाहोर, सिंधकडे भटकत अखेर इराणच्या शाह तहमास्पच्या आश्रयास गेला व दिल्लीचे तख्त शेरशाहकडे आले. शेरशाहने कामरानकडून पंजाब राजपुतांकडून माळवा (१५४२) पुराणमल्लकडून रायसिन, अबू , अजमेर, चितोड असे प्रदेश जिंकले. पुढे कालिंजर किल्ला घेताना दारूचा स्फोट होऊन तो जबर भाजला गेला व त्यातच मरण पावला. ससराम येथे त्याची कबर आहे.

शेरशाह धडाडीचा योद्धा व कुशल राज्यकर्ता होता. त्याने राज्यची विभागणी सरकारे व परगण्यांत केली. त्याचे दिवाण-इ-विझारत, दिवाण-इ-अर्झ, दिवाण-इ-इन्शा वगैरे मंत्री कर्तबगार व कार्यक्षम होते. त्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक सरकारात एक शिकदार, एक मुन्सफ आणि एक काझी असे तसेच परगण्यात एक शिकदार, एक अमीन, एक पोतदार आणि दोन कारकून असत. त्याने जमिनीची मोजणी करून उत्पन्नाच्या सरासरीवर शेतसारा बसविला आणि तो धान्याच्या स्वरूपात वा नगद देण्याची शेतकऱ्यांस मुभा दिली. तसेच शेतकऱ्यांकडून कबुलायतनामे घेऊन त्यांच्या नावे पट्टे करून दिले. त्याने जकात कमी करून सरहद्दीवरच व्यापाऱ्यांकडून कर घेण्याची पद्धत सुरू केली. सोने, चांदीव तांब्याचे “दाम’ नाणे पाडले आणि व्यापार व लष्कराच्या हालचालींसाठी काही रस्ते खोदले. त्यांच्या दुतर्फा झाडे लावून सराया बांधल्या. सर्वांना योग्य न्याय मिळावा म्हणून दिल्लीतील काझीमुराद नंतर न्यायदानाचे अधिकार स्वतःकडे घेतले. त्याच्या सैन्यात सुसज्ज घोडदळ, पायदळ व गजदल होते. दिल्ली येथील पुराणा किल्ला व त्यातील मशीद या वास्तू त्याच्या कलाभिज्ञतेची साक्ष देतात.त्याच्या सुधारणांमुळे राज्याची आर्थिक स्थिती भक्कम झाली. पुढील राज्यकर्त्यांनी त्याचे शेतसाऱ्याचे धोरण अनुसरले. मध्ययुगातील एक कार्यकुशल व प्रतापी राजा म्हणून त्याची इतिहासात नोंद झाली आहे.

पहा : सूर घराणे.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Mughal Empire, Bombay, 1984.

2. Qanungo, K. R. Sher Shah and His Times, Bombay, 1965.

देशपांडे, सु. र.