हेरन, अर्नल्ड हेर्मान लूटव्हिख : (२५ ऑक्टोबर १७६०–६ मार्च १८४२). एक बुद्धिनिष्ठ जर्मन आर्थिक इतिहासकार.इतिहासाचा आर्थिक दृष्टिकोनातून, विशेषतः प्राचीन जागतिक इतिहासाचा अन्वयार्थ सांगणाऱ्या चळवळीचा प्रणेता, पहिला संशोधक. त्याचा जन्म सुशिक्षित कुटुंबात ब्रेमनजवळील आर्बरजन या उपनगरात झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन त्याने तत्त्वज्ञान विषयात गटिंगेन विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि त्याच विद्यापीठात अध्यापनास प्रारंभ केला (१७८७). त्या ठिकाणी पुढे त्याची इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८०१). गटिंगेन विद्यापीठातील अत्यंत हुशार व अभ्यासू प्राध्यापकांत त्याची गणना होत असे. या विद्यापीठात त्याने अनेक वर्षे अध्यापन केले. 

 

अर्नल्ड हेर्मान लूटव्हिख हेरन
 

हेरनने मोजकेच ग्रंथलेखन केले असून त्याच्या ग्रंथांपैकी Ideen über Politik, den Verkehr und den Handel der vornehmsten Völker der alten Welt(१७९३–१७९६) हा त्रिखंडात्मक जर्मन भाषेतील बृहद्ग्रंथ इतिहासलेखनपद्धतीचा मानबिंदू ठरला आहे. एकूण हेरनच्या ऐतिहासिक अर्थशास्त्रीय संकल्पनांवर व तात्त्विक विचारसरणीवर अनुक्रमे जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ आणि फ्रेंच तत्त्ववेत्ता शार्ल माँतेस्क्यू यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. एवढेच नव्हे, तर शार्ल माँतेस्क्यूच्या अगदी निवडक शिष्यांत हेरनला अग्रक्रम दिला गेला होता. हेरनच्या Ideenüber… … … या ग्रंथातील तत्त्वमीमांसा शार्ल माँतेस्क्यूची असून तिला ॲडम स्मिथच्या पुस्तकातील शास्त्रशुद्ध आर्थिक जीवनमूल्यांच्या विश्लेषणाची जोड दिली गेली आहे. त्याच्या विचारांचा चपखल उपयोग अत्यंत कौशल्याने हेरनने प्रस्तुत ग्रंथात केला आहे. तसेच प्राचीन काळातील वाणिज्यीय जीवन पुनर्रचित करण्याचा प्रयत्नही त्याने या ग्रंथात केला आहे. आतापर्यंतच्या (अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतच्या) इतिहासाच्या नित्यक्रमावर, ऐतिहासिक घडामोडींवर संशयातीत प्रभाव दाखविण्यासाठी प्राचीन राष्ट्रांचा उदाहरणादाखल उल्लेख त्याने केला आहे. एकूण या ग्रंथाची रचना त्याने प्राचीन देशांच्या आर्थिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यात केली आहे. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर ‘रिफ्लेक्शन्स कन्सर्निंग द पॉलिटिक्स, इंटरकोर्स अँड कॉमर्स ऑफ द लीडिंग नेशन्स ऑफ अँटिक्विटी’ या शीर्षकार्थाने झाले (१८३३). त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून इंग्रजीबरोबरच अन्य पाश्चात्त्य भाषांतही अनुवाद झाला आहे. या बृहद्ग्रंथाव्यतिरिक्त त्याने जर्मन भाषेत Handbuch der Geschichte der Staaten des Altertums (१७९९), Handbuch der Geschicthte des europäischen Staatensystems und seiner Kolonien (१८००) आणि Versuch einer Entwicklung der Folgen der Kreuzzüge (१८०८) हे तीन ग्रंथ लिहिले.एफ्. उकेर्ट या मित्राच्या साहाय्याने त्याने Geschichte der europaischen Staaten या ऐतिहासिक मालेची निर्मिती केली (१८२९). त्याने आपला मौलिक मानदंड ठरलेला ग्रंथ सर्व वदंता--दंतकथा आणि मिथ्यकथा यांना फाटा देऊन विश्वसनीय कागदपत्रांचा धांडोळा घेऊन अत्यंत विचारपूर्वक, सुसंगत व सुबोध शैलीत सिद्ध केला आहे. ऐतिहासिक घडामोडींकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बुद्धिवादी आणि तत्कालीन विद्याव्यासंगी प्रणालीला धरून पद्धतशीर व विवेचनात्मक होता. तत्कालीन अर्थकारणावर साक्षेपी इतिहासलेखन करणारा हेरन हा कदाचित एकमेव इतिहासकार असावा. 

 

वृद्धापकाळाने गटिंगेन येथे त्याचे निधन झाले. 

 

संदर्भ : 1. Barnes, Harry Elmer, A History of Historical Writings, London, 1962.

           2. Seligman, Edwin R. A. The Economic Interpretation of History, Columbia, 1907. 

 

देशपांडे, सु. र.