महदी, अल् : (१२ ऑगस्ट १८४४−२२ जून १८८५). आधुनिक सूदानचा शिल्पकार व महदी क्रांतीचा सूत्रधार. त्याचे पूर्ण नाव मुहम्मद अहमद इब्न अस्-अल्लाह. त्याचा जन्म विद्यमान उत्तर सूदानमधील नाईल नदी जवळच्या न्यूबिया प्रदेशातील डाँगोला जिल्ह्यातील सधन घराण्यात झाला. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याच्या वडिलांचा जहाजबांधणी उद्योग होता आणि त्यांनी आपले वास्तव्य दक्षिण करारी या खार्टूम जवळच्या एका खेड्यात हलविले. त्याने इस्लामी परंपरेनुसार प्राथमिक शिक्षण न घेता इस्लाम धर्माचाच अभ्यास सुरू केला. तरुणपणीच तो इस्लाम धर्मातील गूढवादाकडे आकृष्ट झाला. अध्ययन व अध्यापन यांकरिता त्याने श्वेत नाईलच्या काठी अबा बेटावर आश्रयस्थान उभे केले (१८७०). इस्लाम धर्मातील गूढविद्या, कर्मठ यतिचर्या आणि सूफी तत्त्वज्ञानाचे अध्ययन व प्रचार यांमुळे त्याच्याकडे अनेक अनुयायी व विद्यार्थी आकर्षित होऊ लागले. चमत्कार आणि अद्‌भूत कर्मकांड यांमुळे सभोवतालच्या अशिक्षित जमातींमध्ये त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली. तो लोकांना सांगू लागला, ‘की अल्लाने आपली निवड अनाचार आणि अत्याचार यांविरुद्ध युद्ध करून इस्लाम धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी धार्मिक मार्गदर्शन-महदी-म्हणून केली आहे आणि मी महमद पैगंबरांचा वारस−इनाम−आहे’.

एकोणिसाव्या शतकात सूदानच्या राजकीय अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन महमद अली या ईजिप्तच्या राज्यपालाने सूदानचा प्रदेश पादाक्रांत केला आणि ईजिप्तच्या सैनिकांनी विजयमदाने सूदानी जनतेवर अनन्वित अत्याचार केले. पुढे ईजिप्ताचा शासकीय प्रतिनिधी सय्यद याने १८५७ मध्ये गुलामगिरी बंद केली आणि या धोरणाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर ईजिप्तने १८७५ मध्ये सुएझपासून केप ग्वारडाफुइपर्यंतचा समुद्र किनारा काबीज केला आणि ठिकठिकाणी आपली लष्करी ठाणी स्थापन केली. मुहम्मद अहमदला या सुमारास अशी जाणीव झाली की सूदानमधून इस्लामी धर्माचे जवळजवळ उच्चाटन झाले आहे आणि खेडिव्ह हा राज्यपाल धर्मद्वेष्ट्यांच्या हातातील बाहुले बनला आहे. शिवाय ईजिप्तवर ब्रिटिशांचे आधिपत्य वाढत होते. तेव्हा त्यांनी जनरल चार्ल्स गॉर्डन (कार.१८७७−७९) याला सूदानचा गव्हर्नर जनरल नेमले. त्याने डारफूरमधील बंडाचा बीमोड करून गुलामगिरीच्या व्यापारास आळा घालण्याचा प्रयत्न केला आणि सूदानच्या संघटनेचे काम केले. गॉर्डननंतर आलेल्या फ्रँक लॅप्टन या गव्हर्नरने सूदानच्या पुनर्घटनेची योजना मांडली आणि ईजिप्त शासनाची पक्कड आधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला.

या संधीचा फायदा घेऊन मुहम्मद अहमदने अल्-महदी ही उपाधी धारण करून असंतुष्ट लोकांना जमा केले आणि ईजिप्तची सत्ता उलथून पाडण्याच कट रचला. अधिकाऱ्यांनी केलेले अत्याचार आणि गुलामांचा क्रयाविक्रय करण्यापासून व्यापाऱ्यांस परावृत्त करण्याकरिता योजलेले कडक समविभागणी उ. तत्त्वांचा पुरस्कार करून इस्लाम धर्मातील सदगुणांचा प्रसार आणि प्रचार केला आणि सरकारविषयी द्वेषभावना उत्पन्न केली. हळूहळू त्याचे लष्करी सामर्थ्य वाढले. १८८१ मध्ये ईजिप्तचे सैन्य व त्याच्या नेतृत्वाखाली सैन्य यांत पहिली चकमक झाली. १८८३ मध्ये त्याने हजारो ईजिप्शियन सैनिकांना ठार मारले. त्यामुळे त्याचे लष्करी सामर्थ्य वाढले आणि सेन्नारचे स्वामीत्व त्यास मिळाले. या लढायांतून त्यास संपत्ती, दारुगोळा, शस्त्रास्त्रे व नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले. गव्हर्नर लॅप्टनला कैद केले (१८८४), या खार्टूम जिंकले आणि चार्ल्स गॉर्डनला ठार मारले १८८५. या सुमारास महदी क्रांतिकारकांच्या ताब्यात सूदानमधील फार मोठा भूभाग होता परंतु या दगदगीने अल्-महदी आजारी पडला आणि ऑन्डरमन येथे आकस्मित मरण पावला. त्याच्या अनुयायांनी खलीफ पद निर्माण करून ही चळवळ सु. तेरा वर्षे पुढे नेली पण अखेर १८९९ मध्ये ब्रिटन व ईजिप्त यांच्या सैन्याचे क्रांतिकारकांचा पराभव केला आणि पुन्हा सूदान ईजिप्तच्या आधिपत्याखाली आला.

मुहम्मद अहमदने सूदानमध्ये इस्लामी राज्य जाहीर करून त्याची प्रशासकीय व्यवस्था मुहमद पैगंबरांच्या धर्तीवर प्राचीन इस्लामी पद्धतीने चार खलीफांमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण करून केली आणि राजधानी ऑन्डरमन या ठिकाणी नेली. या सुमारास राज्याचा विस्तार तांबड्या समुद्रापासून मध्य अफ्रिकेपर्यंत पसरला होता.

मुहम्मद अहमदच्या पाच वर्षाच्या कारकीर्दीत सूदानमध्ये क्रांतिकारकांची अनियंत्रित सत्ता बहुतेक भागावर होती आणि इस्लामी राज्याची पुनर्स्थापना झाली तथापि सूदकाचे शेतकी व व्यापार दृष्ट्या फार नुकसान झाले. त्यामुळे महदी क्रांतिविषयी आधुनिक इतिहासकारांत भिन्न मत-मतांतरे आढळतात. काही आधुनिक सूदानी विद्वान त्याला ‘स्वातंत्र्याचा जनक’ (अबु ’ल्-अस्तिकलाल) वा राष्ट्रीय नेता मानतात. त्याने प्रथमच इस्लाम धर्माच्या विचारसरणीखाली सर्व जमतींना एकत्र आणले तसेच परकीयांना हाकलून लावले आणि राष्ट्रराज्याचा पाया घातला तर काही इतिहासकार त्यला इस्लाम धर्माचा जीर्णोद्धारक (मुजद्दिद) मानतात आणि त्याची तुलना वहाबी चळवळीचा मुहम्मद इब्न अब्द-अल्-वहाबबरोबर करतात परंतु त्याचे कार्य वहाबपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे होते ते सर्वसामान्य आले असून त्याने घेतलेल्या इमाम, पैगंबरांचा वारस आणि महदी या तीन उपाधींवरून तसेच अनाचार आणि अत्याचार यांविरुद्ध मोहिमांवरून त्याच्या कार्याची कल्पना येते. आधुनिक सूदानच्या राजकीय जीवनात त्याच्या विचारसरणीचा प्रभाव आजिमितीस जाणवतो. महतीने अरबीमध्ये लिहिलेले विचार मुहम्मद इब्राहीम अबू सलीम याने अंतर समग्ररीत्या प्रसिद्ध केले.

संदर्भ : 1. Bermann, R. A. The Mahdi of Allah. London, 1931.

            2. Henderson, K. D. D. Sudan, Republic, London, 1965.

            3. Holt, P. M. A. Modern History of the Sudan, London, 1966.

            4. Holt, P. M. The    Mahdist State in the Sudan: 1881-1898, New York, 1970.

            5. Theobald, A. B. The Mahdiya: a History of the Anglo-Egyptian Sudan, 1881-1889, London, 1951.

 

देशपांडे, सु. र.