चंगीझखान : (? – ११६७ –२५ ऑगस्ट १२२७). प्रसिद्ध मंगोल जगज्जेता. त्याचे मूळचे नाव तेम्यूजिन. सध्याच्या मंगोलियाच्या सरहद्दीवरील ओनान नदीकाठच्या एका गावी जन्म. तो नऊ वर्षाचा असतानाच तार्तर (तातार) लोकांनी त्याच्या वडिलांना मारले. त्यामुळे तो पोरका झाला. या अवस्थेतच त्याची तोघ्रील व जामुका या दोन मंगोल पुढाऱ्यांशी ओळख झाली. त्यांच्या मदतीने त्याने हळूहळू आपली प्रगती साधून अखेर काही लहानमोठ्या राजपुत्रांच्या मदतीने ११९८ मध्ये मंगोल जमातीचे नेतृत्व मिळविले. १२०६ ते १२१२ या सहा-सात वर्षांच्या काळात त्याने, आपण सर्व मंगोल जमातीचे खान झाल्याचे जाहीर करून, आपली सत्ता मंगोलियात प्रस्थापित केली व काराकोरम हे राजधानीचे स्थान निवडले. त्याची सुरुवातीची काही वर्षे तार्तर चंगीझखान

लोकांबरोबर लढण्यात गेली. नंतर त्याने चीनवर चढाई (१२१३) करून थेट येनकेन (पीकिंग) वर धडक मारली पुढे तुर्कस्तान आणि कोरिया मिळवून तो पश्चिमेकडे वळला (१२१८– २२). ख्वारिज्मच्या (आधुनिक खिवा) शाहचा पराभव करून त्याने उत्तर हिंदुस्थानच्या काही भागात लुटालूट व जाळपोळ केली आणि त्यानंतर इराण, इराक व रशियाचा काही भाग येथे लुटालूट व जाळपोळ केली. सारे जग जिंकण्याकरिता आपल्याला परमेश्वराने धाडले आहे, असे तो सर्वत्र सांगे. तुर्कस्तानवरील स्वारीत त्याचे सैन्य सु. ७०,००० होते. बुखारा व समरकंद ही शहरे त्याने लुटली व जाळली. १२१८ नंतरची सु. सात वर्षे त्याचे देश जिंकणे, लुटालूट करणे व जाळपोळ करणे हे उद्योग सतत चालू होते. त्याने नीपर नदीपर्यंतचा सर्व प्रदेश उद्‌ध्वस्त केला. पुन्हा त्याने वायव्य चीनवर स्वारी केली. कान्सूमधील लीयूपान डोंगरात लढाई चालू असतानाच घोड्यावरून पडून तो मरण पावला.

एक कल्पक, क्रूर व धाडसी योद्धा म्हणून त्याचे नाव अजरामर झाले असले, तरी त्याने टिकाऊ अशी कोणतीच सुधारणा वा राजकीय संस्था स्थापन केली नाही. त्याला जुजी, जागताई, ऑगदाई व तुली असे चार मुलगे होते, त्यांपैकी जुजी त्याच्या हयातीतच मरण पावला.

संदर्भ : Rene Grousset: Trans. The Conqueror of the World, New York, 1967.           

    देशपांडे, सु. र.