शोगुन : जपानमध्ये मध्ययुगीन सरंजामशाहीच्या काळात उदयास आलेल्या प्रबळ सेनाप्रमुखास उद्देशून ही संज्ञा वापरली जाते. जपानी भाषेत शोगुनचा अर्थ सेनापती असा होतो. इ. स. आठव्या शतकात तत्कालीन जपानी समाटाने उत्तर जपानमधील ऐनू जमातीचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या सेनापतीला पुष्कळ अधिकार प्रदान केले. तेव्हापासून रानटी टोळ्यांचा बंदोबस्त करणाऱ्या सेनापतीस शोगुन हे बिरूद पाप्त झाले. बाराव्या शतकातील सामुराई नेता मिनामोटो योरितोमो याने शोगुन हे बिरूद धारण केले (११९२). त्याच्या शासनपद्धतीस ‘ डेरा शासन ’(बाकुफू) म्हणत आणि त्याचे मुख्यालय कामकुरा येथे होते. शोगुनला लष्कराव्यतिरिक्त प्रशासकीय व न्यायविषयक कर्तव्ये पार पाडावी लागत. ते आपल्या अधिकारात प्रांतांवर लष्करी राज्यपाल (शूगो) नेमत. या काळात (११९२-१३३३)सम्राटाची सत्ता कमकुवत होऊन शोगुनची सत्ता प्रबळ झाली. शोगुनचे विधिवत् अधिकार कमी असले, तरी प्रत्यक्षात मात्र सर्व सत्ता त्याच्या हाती एकवटलेली होती तथापि शोगुनांचा इतिहास पाहता फार थोडे शोगुन हुकूमशाह होते आणि अनेक शोगुन केवळ नामधारी होते. ओडो नोबुनागा आणि टोयोटोमी या सोळाव्या शतकातील पराकमी सेनापतींनी शोगुन बिरूद धारण केले नाही. शोगुनांच्या मिनामोटो, आशिकागा आणि टोकुगावा या तीन घराण्यांपैकी टोकुगावा घराण्याच्या काळात (१६०३१८६७) शोगुनांची सत्ता शिगेला पोहोचली होती आणि त्यांचे मुख्यालय इडो (विद्यमान टोकिओ) येथे होते. या घराण्यातील शेवटचा शोगुन योशिनोबू ह्यास तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या रेट्यामुळे आपली सत्ता जपानच्या समाटाकडे सुपूर्त करावी लागली आणि आपल्या पदाचा राजीनामा दयावा लागला (१८६७). परिणामत: जपानमधील सरंजामशाहीचा व तिच्याबरोबरच शोगुनसत्तेचाही शेवट झाला.

देशपांडे, सु. र.