शीख सत्ता, भारतातील : हिंदुस्थानातील पंजाब प्रदेशात केंद्रस्थान असलेल्या शिखांच्या धार्मिक-राजकीय सत्तेची बीजे शीख धर्माच्या इतिहासात आढळतात. अकबरानंतरच्या मोगल बादशहांनी शीख धर्म व समाज यांवर अनन्वित अत्याचार केले. जहांगीराने शीख पंथ मोडून काढण्याचा निर्धार करून पाचवा गुरू ⇨अर्जुनदेव (कार. १५८१–१६०६) यास हालहाल करून ठार मारले. त्याच्या निर्घृण हत्येनंतर शीख इतिहासाला कलाटणी मिळाली आणि शिखांची सत्ताकांक्षा जागृत होऊन हा भक्तिमार्गी धर्म पुढील काळात क्षात्रधर्मी झाला. अर्जुनदेवानंतर गुरुपदी आलेल्या हरगोविंद (कार. १६०६–४४) यांनी घोडदळ व तोफखाना उभारून लष्करी सज्जता केली. शाहजहानने जहांगीराचे धोरण अंमलात आणून शिखांविरुद्ध, विशेषतः हरगोविंदांवर अनेकवार हल्ले केले. ते हल्ले गुरूंनी परतवून लावले पण असे युद्धप्रसंग वारंवार उद्भवल्यास आपला निभाव लागणार नाही, हे ओळखून त्यांनी अमृतसर येथील मुख्यालय दूरच्या पहाडात किरतपूर येथे नेले आणि लष्करी तयारी करण्यास वेळ मिळावा म्हणून काही वर्षे सबुरीने काढली. पुढे नववे गुरू ⇨तेगबहादुर (कार. १६६४–७५) गुरुपदी आले. त्यावेळी शीख समाजात फूट पडली. काही शीख मोगलांना मिळाले. संघटनेच्या कार्यासाठी तसेच गुरुदक्षिणेच्या रूपाने निधी गोळा करण्यासाठी गुरू तेगबहादुर यांनी नेमलेले प्रतिनिधी (मसंद) स्वार्थी, भ्रष्ट व छळवादी ठरून तेच तेगबहादुरचे शत्रू बनले. तेव्हा त्यांनी तीर्थयात्रेद्वारा धर्मप्रसाराचे कार्य हाती घेतले. त्यांच्या समन्वयी भूमिकेमुळे पुष्कळ मुसलमानही शीख झाले, साहजिकच औरंगजेबाने त्यांना पकडून त्यांचा शिरच्छेद केला. त्यांचे पुत्र व दहावे गुरू ⇨गोविंदसिंग (कार. १६७५–१७०८) यांनी पितृवधाचा बदला घेण्याचे ठरवून शीख समाजाला खालसा पंथाची दीक्षा दिली. खालसा म्हणजे, पवित्र, स्वतंत्र व सत्त्वनिष्ठ ! खालसामुळे शीख धर्मश्रद्धेला राष्ट्रीयतेचे स्वरूप प्राप्त झाले आणि शीख धर्मीयांत नवचैतन्य निर्माण झाले. गुरू गोविंदसिंग आनंदपूर येथे राहत. त्यांनी सभोवतालच्या परिसरात लोहगड, फत्तेगढ़, फूलगढ़, आनंदगढ इ. भरभक्कम किल्ले बांधून राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. ⇨ बंदा बैरागी  या तडफदार तरुणाच्या नेतृत्वाखालील सैन्याने मोगलांना पंजाबातून हुसकावून यमुना ते सतलजपर्यंतचा मुलूख अंमलाखाली आणला व तेथे चोख प्रशासनव्यवस्था ठेवली. तसेच पहाडी राजांना आपल्याकडे वळवून घेतले. औरंगजेबास खंडणी देण्याचेही बंद केले. औरंगजेब या सुमारास दक्षिण हिंदुस्थानात मराठ्यांशी लढण्यात गुंतला होता. त्याने उत्तरेतील सरदारांना गुरू गोविंदसिंगास पकडण्याचा हुकूम दिला; पण त्या सर्वांचा शिखांनी पराभव केला. त्यानंतर शहाजादा मुअज्जम यानेही मोठे सैन्य घेऊन शिखांवर अयशस्वी स्वारी केली. अखेर औरंगजेबाने पंजाबातील सुभेदार यांना आज्ञा केली. त्यांना राजपूत सरदार मिळाले, तेव्हा शीख सत्तेची वाताहत झाली. गुरू गोविंदसिंग अज्ञात स्थळी गेले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बहादुरशाहाला गुरू गोविंदसिंगची मुअज्जमशी लढण्यासाठी मदत झाली. त्याने गोविंदसिंगला आपल्याबरोबर दक्षिणेत आणले. त्याच्यासोबत बंदा बैरागी होता. नांदेड येथे गुरू गोविंदसिंगांचा खून झाला, तेव्हा बंदा बैरागी उत्तरेस गेला व त्याने शिखांची मोठी फौज उभारली. सरहिंदचा सुभेदार वजीरखान याला ठार करून सरहिंद शहरावर ताबा मिळविला. जवळजवळ तीनचतुर्थांश पंजाब त्याच्या अखत्यारीत आला, तेव्हा बहादूरखानाने त्याच्याविरुद्ध गुरुदासपूरवर मोठी फौज धाडली. या युद्धात बंदा पकडला जाऊन त्याला ठार मारण्यात आले (१७१६). त्यानंतर फरुखसियर याने शिखांचा उच्छेद करण्याचे धोरण अंगीकारले. त्यामुळे पुढील काही वर्षे शिखांना मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत लढा चालू ठेवावा लागला.

अठराव्या शतकातील नादिरशाहची हिंदुस्थानवरील स्वारी (१७३७), अब्दालींच्या स्वाऱ्या आणि पानिपतची तिसरी लढाई (१७६१) यांचा ‘ फायदा घेऊन शिखांनी दालीवाल येथे किल्ला बांधून लाहोरपर्यंत धडक मारली; तसेच पंजाबात सत्ता स्थिर करण्याचा प्रयत्न केला. यांमुळे मोगल सत्तेचे तेथून उच्चाटन झाले. पंजाबात १७६८ मध्ये शिखांची सत्ता स्थिरावली. त्यांनी १७७३ मध्ये पूर्वेस सहारनपूर, पश्चिमेस अटक, दक्षिणेस मुलतान व उत्तरेस हिमालयाच्या टेकड्यापर्यंतच्या भूप्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित केली. यातून त्यांचे स्वायत्त राज्य अस्तित्वात आले; परंतु सर्वांना मान्य होईल असा एकमेव नेता नसल्यामुळे त्यांच्यात अंतर्गत संघर्ष होते. त्यांची सत्ता अहलुवालिया, भांगी, दल्लेवालिया, फ्यजुल्लापुरिया, कन्हय्या, करोरासिंगिया, नकाई, शहीद, निशानवालिया, फुलकिया, रामगरिया व सुकरचक्क‍िया अशा बारा मिसलींमध्ये (विभागांत) विभागली गेली. त्यांचे मुख्य शत्रू अब्दाली व मोगल यांच्या नाशानंतर त्यांना कोणी परकीय शत्रू उरला नाही. अशावेळी अंतर्गत कलहात नाश होण्याच्या वेळी रणजितसिंगासारखा (कार. १८०१–३९) लढाऊ, धोरणी आणि कर्तबगार नेता त्यांना लाभला. त्याने शीख सत्ता सुस्थिर करून तिचा दरारा निर्माण केला.

रणजितसिंगाने अफगाणिस्तानचा शाह झमानकडून लाहोरची सुभेदारी मिळविली. त्यामुळे सतलजच्या पलीकडील मुलूख त्याच्या अंमलाखाली आला. सतलज ते पेशावर आणि काश्मीर ते मुलतान एवढा प्रदेश त्याच्या आधिपत्याखाली होता. त्याचे कवायती सैन्य, घोडदळ व तोफखाना उत्तम असल्याने त्याने इंग्रजांना दूर ठेवले. शिखांना त्याने प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. पंजाबचे एकीकरण आणि अफगाण स्वाऱ्यांना पायबंद या दोन महत्त्वाच्या कामगिऱ्यांचे श्रेय त्याला द्यावे लागते. इंग्रजांबरोबर त्याने तीन मैत्रीचे तह (१८०६, १८०९, १८११) करून त्यांना आपल्या राज्यकारभारात हस्तक्षेप करू दिला नाही. त्याच्या निधनानंतर त्याच्या मुलांत गादीसाठी तंटे माजले. अखेर त्याचा धाकटा मुलगा दलीपसिंग गादीवर बसला. तो अज्ञान असल्यामुळे राजमाता जिंदान सर्व कारभार पाहात असे; मात्र खरी सत्ता सैनिकांच्या हातात होती. इंग्रजांना शिखांच्या वाढत्या सत्तेला आळा घालावयाचा होता. म्हणून त्यांनी अमृतसरचा तह मोडला, या सबबीवर १८४५ मध्ये शिखांवर पहिली स्वारी केली. त्यावेळी दलीपसिंगास पंजाबातील बराच प्रदेश इंग्रजांना द्यावा लागला. त्यात मुलतानचा दिवाण मुळराज याने दलीपसिंगाची सत्ता स्थापण्यासाठी १८४८ मध्ये इंग्रजांविरुद्ध बंड केले. पंजाबभर बंडाचा उठाव झाला. या निमित्ताने लॉर्ड डलहौसीने शिखांविरुद्ध दुसरे युद्ध पुकारले. मुळराजास पकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अखेर शिखांचा दारुण पराभव झाला. डलहौसीने शीख राज्य खालसा केले. भारतातील शीख सत्तेचा अस्त झाला.

पहा : इंग्रज- शीख युद्धे; पंजाब राज्य (इतिहास); रणजितसिंग.

संदर्भ : 1. Conningham, J. D. A History of the Sikhs From the Origin of the Nation to The Battles of the Sutlej, New Delhi, 1981.

2. Malik, I. A. The History of the Punjab: 1799-1947, Delhi, 1983.

3. Singh, Khushwant, A History of the Sikhs, Vols. 2: 1839–1974, Oxford, 1981.

४. गाडगीळ, न. वि. शिखांचा इतिहास, पुणे, १९६३.

 

कुलकर्णी, गो. त्र्यं.