लॉर्ड विलिंग्डन

विलिंग्डन, लॉर्ड फ्रीमन फ्रीमन-टॉमस : (१२ सप्टेंबर १८६६-१२ ऑगस्ट १९४१). ब्रिटिशांकित हिंदूस्थानचा १९३१-३६ दरम्यानचा व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल आणि एक कार्यक्षम प्रशासक व मुत्सद्दी. त्याचा जन्म इंग्लंडमधील सुखवस्तू सरंजामदार घराण्यात रॅटन (ससेक्स) येथे झाला. ईटन व ट्रिनिटी महाविद्यालयांत (केंब्रिज विद्यापीठ) उच्च शिक्षण घेऊन त्याने पदवी मिळविली. तो क्रिकेटपटू होता व विद्यार्थीदशेत विद्यापीठ व ससेक्स क्रिकेट संघांतून खेळला. तत्कालीन व्हिक्टोरियाचा (ऑस्ट्रेलिया) गव्हर्नर लॉर्ड टॉमस ब्रॅसी याच्या मेरी ॲडलेड या मुलीशी त्याचा विवाह झाला (१८९२). त्याच्या निगो या मुलास पुढे सरदारकी वारसाहक्काने मिळाली. लॉर्ड ब्रॅसी याचा स्वीय साहाय्यक म्हणून विलिग्डनने काही काळ काम केले. लेडी विलिंग्डन सामाजिक व राजकीय कार्यात हिरिरीने भाग घेत असे.

विलिंग्डनची ऑस्ट्रेलियात व्हिक्टोरिया येथे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली (१८९५-९८). त्यानंतर तो हेस्टिंग्ज परगण्यातून लिबरल पक्षातर्फे संसदेवर निवडून आला आणि सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाला. अर्थखात्यात ज्यूनिअर लॉर्ड म्हणून त्याने काम केले (१९०५). याच सुमारास त्यास रॅटनचे सरदारपद देण्यात आले. हिंदुस्थानात मुंबई (१९१३-१८) आणि मद्रास (१९१९-२४) या इलाख्यांचे गव्हर्नरपद त्याने भूषविले. १९१९ च्या द्विदल राज्यपद्धतीचा स्वीकार करून ती राबविण्याचा त्याने यशस्वी प्रयत्नर केला. त्यानंतर त्याची कॅनडाचा गव्हर्नर जनरल (१९२६-३१) म्हणून नियुक्ती करण्यात आली. कॅनडातील त्याची कार्यक्षम कारकीर्द लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने त्याची भारतात व्हाइसरॉयपदी नियुक्ती केली (१९३१-३४). तत्पूर्वी त्यास इंग्लंडच्या राजाने उच्च सरदारपद (अर्ल) बहाल केले होते. प्रिव्ही कौन्सिलचाही तो सदस्य होता (१९३१).

भारतीय स्वातंत्र्य चळवळीने १९३१-३६ या काळात हिंसक वळण घेतले होते. काँग्रसने सविनय कायदेभंगाची चळवळ आणि सत्याग्रह यांद्वारे सरकारला वेठीस धरले होते. या प्रक्षोभक वातावरणात काँग्रेसचे खच्चीकरण करून विलिंग्डनने काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली. ⇨गांधीआयर्विन कराराने दिलेल्या अभिवचनांना त्याने बाजूला ठेवले आणि म. गांधीना दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी हजर राहण्यास उद्युक्त केले. परिणामतः हिंदूस्थानच्या संविधानाविषयी भरलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेस (सप्टेंबर-डिसेंबर १९३१) काँग्रेसचा एकमेव प्रतिनिधी म्हणून गांधीजी हजर राहिले. त्यांनी संपूर्ण स्वराज्याची कल्पना मांडली आणि अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघांस तीव्र विरोध दर्शविला तथापि या स्वतंत्र मतदारसंघांची ब्रिटिश शासनातर्फे घोषणा होताच गांधीजींनी आमरण उपोषण सुरू केले. त्यातून पुढे ⇨पुणे करार उद्‌भवला (२४ सप्टेंबर १९३२). ही सर्व परिस्थिती विलिंग्डनने अत्यंत सावधगिरीने व मुत्सद्दीपणाने हाताळली. लंडन येथे तिसरी गोलमेज परिषद झाली (नोव्हेंबर-डिसेंबर १९३२). त्यानंतर ब्रिटिश शासनाने मार्च १९३३ मध्ये श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून हिंदूस्थानला लागू करावयाच्या नवीन संविधानात काही फेरफार सुचविले. परिणामतः ब्रिटिश शासनाने १९३५ चा अधिनियम लागू करून गव्हर्नर जनरलला अध्यादेश काढण्याचे व्यापक अधिकार दिले. यानुसार ब्रिटिश हिंदुस्थान व हिंदी संस्थाने यांची संघीय व्यवस्था अपेक्षित होती. या सुधारणा काँग्रेसने अमान्य केल्या. विलिंग्डनच्या प्रशासकीय कामगिरीचा गौरव ब्रिटिश शासनाने त्यास ‘माक्विस’ ही पदवी देऊन केला (१९३६). पुढे त्यास डोव्हर कॅसल (इंग्लंड) येथे उच्चाधिकारी नेमले. या पदावर असतानाच त्याचे लंडन येथे निधन झाले. त्याच्या स्मरणार्थ भारतात काही ठिकाणी पुतळे व शैक्षणिक संस्था स्थापण्यात आल्या.

संदर्भ : 1. Kulkarni, V. B. British Statesmen in India, Poona, 1961.

            2. Mahajan, V. D. History of Modern India, Vol. I. New Delhi, 1983.

            3. Templewood, Viscouut (Samuel Hoare), Nine Troubled Years, London, 1954.

घाडगे, विमल