शकसत्ता : ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकापासून ख्रिस्तोत्तर चौथ्या शतकापर्यंत गुजरात, काठेवाड, माळवा, राजपुताना, महाराष्ट्र इ. भूप्रदेशांवर राज्य करणारा परकीय वंश. मध्य आशियात चीनच्या उत्तरेस आणि सायबीरियाच्या दक्षिणेस उत्तुंग पर्वतांनी वेष्टिलेला मंगोलियाचा प्रदेश आहे, तो शक, यूए-ची, हूण इ. रानटी भटक्या वंशांचा मूळ प्रदेश होय. तेथून त्यांनी दक्षिणेकडे स्वाऱ्या करून इराण, अफगाणिस्तान आणि भारत या देशांवर आक्रमण केले आणि तेथे आपली राज्ये स्थापिली. या लोकांपैकी शक हे अत्यंत प्राचीन होत. अँकिमेनिडी सम्राट ⇨ डरायस (इ.स.पू. ५५८– इ.स.पू. ४८६) याच्या कोरीव लेखांत शकांचा सर्वप्रथम उल्लेख आढळतो. त्याच्या मांडलिकांमध्ये (१) होमवर्ग, (२) टोकाचे शिरस्त्राण घालणारे-तिग्रखौदा आणि (३) समुद्रपारीण-तरदरया-अशा तीन शक लोकांचा अंतर्भाव होता पण त्यानंतर कित्येक शतके इराणी साम्राज्य व नंतर ग्रीक सत्ता प्रबळ असल्यामुळे त्यांच्या कारवायांना पायबंद बसला होता पण बॅक्ट्रिया (विद्यमान बाल्ख) प्रदेशातील ग्रीक सत्ता दुर्बल झाल्याबरोबर शकांनी तेथे आक्रमण केले आणि नंतर भारत, ड्रांगियाना (शकस्थान) व त्यालगतच्या प्रदेशात आपला शिरकाव करून तेथे राज्ये स्थापिली. ऑक्सस नदीच्या उत्तरेच्या सॉग्डिआना (बूखारा) प्रदेशातून दक्षिणेकडे आक्रमण करण्याचे कारण त्या प्रदेशावर मंगोलियातून आलेली यूए-ची लोकांची टोळधाड हे असावे.

भारतीय वाङ्मयात शकांचा उल्लेख यवन (ग्रीक) आणि पल्लव (पार्थियन) यांच्यासह येतो. रामायणात भारताच्या वायव्य प्रदेशात कांबोज आणि यवन यांच्यासारखी शकांची पतने होती, असे वर्णन आले आहे. पतंजलीच्या महाभाष्यात शूद्राणामनिखसितानाम या पाणिनिसूत्राच्या (२·४·१०) व्याख्यानात शक अबहिष्कृत असल्याचा निर्देश आहे. कालकाचार्य कथानकात त्यांनी सिंध व माळवा या प्रदेशांत इ.स.पू. पहिल्या शतकात राज्ये स्थापल्याचा उल्लेख आहे पण त्या ग्रंथाचा काल अनिश्चित आहे. हरिवंशात शकांच्या अर्धमुंडन करण्याच्या पद्धतीचा उल्लेख आहे.

यूए-ची टोळ्यांनी बॅक्ट्रियावर आक्रमण केल्यावर शकांनी दक्षिणेस आणि नैर्ऋत्य दिशेस प्रयाण केले पण त्यांना पार्थियन आणि ग्रीक लोकांनी अटकाव केल्यामुळे इतर आक्रमकांप्रमाणे खैबर खिंडीतून त्यांना भारतात प्रवेश करता आला नाही. त्यांनी ड्रांगियाना प्रदेश प्रथम व्यापला. त्यामुळे त्या प्रदेशाला ‘शकस्थान’ असे नाव प्राप्त झाले. नंतर त्यांनी बोलन खिंडीतून सिंध प्रांतात प्रवेश केला व पुढे पंजाबातील अशा दोन ग्रीक राज्यांमध्ये पाचर ठोकली. शकनृपती मौएस (मोग) याच्या काळचा संवत ७८ मध्ये दिलेला ताम्रपट तक्षशिला येथे सापडला आहे.

मौएसच्या काळाविषयी विद्वानांत फार मतभेद आहेत, रॅप्सनच्या मते तक्षशिला ताम्रपटातील ७८ हे वर्ष इ.स.पू. १५० या वर्षी सुरू होणाऱ्या संवताचे असावे. इतर काही विद्वान ते विक्रम संवताचे मानतात. पहिल्या मताप्रमाणे मौएस हा इ.स.पू. ७२ या वर्षी आणि दुसऱ्या मताप्रमाणे तो इ.स. २१ या वर्षी राज्य करीत होता. इ.स.पू. १५० या वर्षी सुरू होणाऱ्या संवताचे आणखी लेख त्या प्रदेशात सापडले नाहीत तथापि मौएसच्या नाण्यांवरून तो. इ.स. पू. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेला असावा असे वाटते.

एकाच काळात शक आणि पल्लव राजे राज्य करीत असल्यामुळे त्यांच्या वंशांविषयी अनेकदा संदेह उत्पन्न होतो. नाण्यांवरून असे दिसते की, मौएसच्या काळी इराणची पूर्व सीमा आणि अँराकोझिया (कंदाहार) या प्रदेशावर व्होनोनेस याचे राज्य होते. त्याने सम्राट पदवी धारण केली होती. काही विद्वानांच्या मते हा विक्रम संवताचा संस्थापक असावा. व्हानोनेस हे नाव पार्थियन दिसते पण त्याने अफगाणिस्तान आणि आपल्या राज्याचा पूर्व भाग यांवर नेमलेला भाऊ स्पलहोरेस व त्याचा पुत्र स्पलगदामेस यांची नावे शकपद्धतीची आहेत.

यानंतर स्पॅलिरिसेस नामक व्होनोनेसच्या दुसऱ्या भावाने स्पलगदामेसचा पराभव करून सत्ता बळकावली असे दिसते. त्याने आपले राज्य अँराकोझियापासून हिंदूकुश पर्वतापर्यंत पसरविले. त्याच्यानंतर पहिला अझेस हा गादीवर आला. काही विद्वानांच्या मते तो स्पॅलिरिसेसचा पुत्र असावा. त्याच्या नाण्यांवर खरोष्ठी लिपीत त्याचे नाव अय असे येते. तक्षशिलेच्या परिसरात सापडलेल्या नंतरच्या काही ताम्रपटांत कालनिर्देश करताना अजस श्रावणस मसस आणि अयस अषडस मसस असे उल्लेख आढळले आहेत. त्यांत या राजाचा नामनिर्देश असावा असे मानून काही विद्वानांनी अझेस हा विक्रम संवताचा संस्थापक होता, असे प्रतिपादिले होते पण अजस आणि अयस याचा अर्थ् आद्यस्य असा असून वरील विधानांत अनुक्रमे अधिक श्रावण आणि अधिक आषाढ विवक्षित आहेत, असे स्पष्ट दिसते. त्यामुळे अझेसला विक्रम संवताच्या संस्थापकत्वाचा मान देता येत नाही.

नाण्यांवरून अझेस हा मौएसनंतर राज्य करू लागला असे दिसते पण त्यांचा संबंध स्पष्ट नाही. काहींच्या मते तो मौएसचा जावई असावा. नाण्यांच्या पुराव्यावरून अझेसनंतर अझिलिझेस व त्याच्यानंतर दुसरा अझेस यांनी राज्य केले असे दिसते.

दुसऱ्या अझेसचा प्रांताधिपती अश्पवर्मा याने काही कालानंतर पार्थियन नृपती गोंडोफेरिस याचे स्वामित्व कबूल केले असे दिसते. तेव्हा दुसरा अझेस हा शेवटचा शक नृपती होय. त्यानंतर त्याचे राज्य गोंडोफेरिस या पार्थियन (पल्लव) राजाने जिंकून घेतले. गोंडोफेरिस हा पहिल्या शतकाच्या आरंभी होऊन गेला.

शकांच्या नाण्यांच्या पुढील बाजूवर तत्कालीन राजाचे किंवा महाक्षत्रपाचे नाव ग्रीक लिपीत व भाषेत आणि मागील बाजूवर त्याच्या प्रांताधिपतीचे किंवा त्याच्या हाताखालच्या क्षत्रपाचे नाव खरोष्ठी लिपीत नेमले होते, त्यांना क्षत्रप म्हणत. क्षत्रप हा संस्कृत शब्द पारशी क्षत्रपावन या शब्दापासून आलेला असून त्याचा अर्थ प्रांताधिपती असा आहे. तक्षशिलेच्या ताम्रपटात मौएसचा क्षत्रप लिअक कुसुलुक आणि त्याचा मुलगा पतिक यांचा निर्देश आहे. ते तक्षशिलेच्या वायव्येस चुक्ष प्रदेशावर राज्य करीत होते. या क्षत्रपांचे नातलग मथुरेस अधिकारी होते. यांची नावे तेथे सापडलेल्या सिंहमूर्ती स्तंभशीर्षकावरील खरोष्ठी लिपीतील लेखात आली आहे. त्या लेखावरून असे दिसते की, त्या प्रदेशावर प्रथम रंजुवुल हा क्षत्रप राज्य करीत होता. पुढे त्याने महाक्षत्रप पदवी धारण केली आणि आपला पुत्र शोंडास यास क्षत्रप केले. पित्याच्या निधनानंतर शोंडास हा महाक्षत्रप पदवीस चढला. या क्षत्रपांच्या लेखांत त्यांच्यावर स्वामित्व असणाऱ्या कोणाही राजाचा उल्लेख नाही. रंजुवुलाच्या नाण्यावर ग्रीक लिपीत राजाधिराज त्राता या अर्थाची ग्रीक पदवी आणि खरोष्ठी लिपीत अप्रतिहतचक्र अशी पदवी आढळते. तेव्हा हे प्रांताधिपती स्वत:स क्षत्रप म्हणवत असले, तरी वस्तुत: स्वतंत्रच होते.


याशिवाय इतरही अनेक शक क्षत्रपांची नावे त्यांच्या व नाण्यांवरून व क्वचित लेखांवरून ज्ञात झाली आहेत. उदा., क्षत्रप मंगुलाचा पुत्र क्षत्रप झिऑणिसस, क्षत्रप खरओस्त इत्यादी. काही क्षत्रपांनी हिंदू नावे धारण केली होती. उदा., शिवसेन, तरणदास, शिवघोष, शिवदत्त इत्यादी. पुढे कुशाणांनी शक-पल्लव नृपतींचा उच्छेद केल्यावरही अनेक शकांनी आपल्या राज्यात क्षत्रप नेमले. महाराष्ट्र-गुजरातमध्ये भूमक आणि नहपान यांनी आणि विदर्भात रुपिअम्प याने सातवाहन राजांचा पराभव करून काही काळ राज्य केले. यापैकी भूमक हा पहिला ज्ञात क्षत्रप होय. गुजरात, काठेवाड, राजपुताना, माळवा इ. प्रदेशांत सापडलेल्या नाण्यावर खरोष्ठी व ब्राह्यी लिपींतील मजकुरात क्षहरात वंश, क्षत्रप पदवी, भूमकानंतर नहपान हा राज्य करू लागला. हा क्षहरात वंशाचा होता. हे कुशाणांचे क्षत्रप असल्यामुळे त्यांच्या लेखात कनिष्काने स्थापिलेल्या शक संवताचा निर्देश आढळतो. नहपानाचे शक संवत ४१ ते ४६ (इ.स. ११९ ते १२४) चे लेख ज्ञात झाले. सुरूवातीच्या लेखांत त्याची क्षत्रप आणि अखेरच्या लेखांत महाक्षत्रप पदवी उल्लेखिली आहे. त्याची तांब्याची व चांदीची नाणी उत्तरेस अजमीरपासून दक्षिणेस नासिकपर्यंत मिळतात. त्यांवर क्षहरातील विशिष्ट चिन्हे-बाण व वज्र-आढळतात. महाक्षत्रप रुपिअम्म याचा विदर्भात अंमल होता. पौनी येथे त्याचा छायास्तंभ (आकृतियुक्त) सापडला आहे. काठेवाडी-माळवा या प्रांतात चाष्टनाने स्थापिलेली क्षत्रपशाखा गुप्तकालापर्यंत टिकून होती. गौतमीपुत्राने नहपानाकडून जिंकून घेतलेले प्रांत कार्दमक वंशी चाष्टन क्षत्रपाने परत मिळविले. ह्याच्या वंशाचे राज्य दीर्घकाळ माळवा व सौराष्ट्र या प्रदेशावर होते. इ.स. १४० च्या सुमारास लिहिलेल्या टॉलेमीच्या ग्रंथात चाष्टनाचा उल्लेख उज्जयिनीचा राजा म्हणून आला आहे. चाष्टनाचा नातू पहिला रुद्रदामन हा सुसंस्कृत, कलाभिज्ञ, कर्तबगार आणि न्यायी राजा होता. त्याने स्वत: गद्यपद्य काव्ये रचली होती. त्याने कच्छ, अनूप, श्वभ्र, मरू (मारवाड), सिंधू, सौवीर, निषाद इ. प्राचीन प्रदेश जिंकून महाक्षत्रपद ही पदवी धारण केली होती. त्याच्या सुविशाख नामक पल्लव प्रांताधिपतीने गिरनारजवळच्या सुदर्शन तलावाचा बांध दुरूस्त करून प्रजेचा दुवा घेतला. जुनागढच्या इ.स. १५०-५१ च्या प्रशस्त कोरीव लेखात रुद्रदामनविषयी मुख्यत्त्वे माहिती मिळते. रुद्रदामनचे वंशज माळवा- सौराष्ट्रावर इ.स. ३९५ पर्यंत राज्य करीत होते. गुप्तवंशीय दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्यांचा उच्छेद करून हे प्रांत आपल्या राज्यास जोडले.

शकांच्या काळी बौद्ध धर्म भरभराटीत होता. महाराष्ट्रात नहपानाचा जावई-ऋषभदत्त हा त्याच्या वतीने राज्यकारभार पाहत होता. त्याने नासिकजवळच्या त्रिरश्मी टेकडीत काही लेणी कोरवून ती बौद्ध भिक्षूंना दिली. त्यांतील लेखांत त्याने केलेल्या गोसहस्रदानांचा, सहस्र ब्राह्यणभोजनांचा, नद्यांचे घाट, धर्मशाला इ. लोकोपयोगी कृत्यांचा व ग्रामदानांचा निर्देश आहे. त्यावरून या क्षत्रपांचा बौद्ध धर्मासही आश्रय होता असे दिसते. गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाने इ.स. १२४ नंतर क्षहरात वंशाचा उच्छेद केला. तेव्हा नहपानाचे काही वंशज पळून दक्षिण भारतात गेले. त्यांपैकी मान राजाचे नाव पुराणात येते. त्याची क्षहरातांची विशिष्ट चिन्हे असलेली नाणी माहिषक प्रदेशात (आंध्र प्रदेश) सापडली आहेत. पुढे कर्नाटकात शकसत्तेचा विस्तार होऊन त्यायोगे शक संवताचा दक्षिणेत प्रसार झाला, असे दिसते.

आरंभीच्या इतर आक्रमकांप्रमाणे शक लोकही भारतीयांत मिसळून गेले. त्यांनी भारतीय नावे धारण केली. उदा., नासिकच्या आभीरनृपती ईश्वरसेनाच्या काळाच्या लेखात शक अग्निवर्मन आणि विश्ववर्मन, तसेच विश्ववर्म्याची माता शकनिका (शक स्त्री), विष्णुदत्ता इत्यादीकांची नावे आहेत. शकांना बहिष्कृत मानले जात नसे. शक, पल्लवादी परकीय वंश हे मूळचे क्षत्रिय असून त्यांचे संस्कार न झाल्यामुळे त्यांना वृषलत्व आले असे मनुस्मृतीत म्हटले आहे. अर्थातच त्यांचे संस्कार करून त्यांना हिंदू धर्मात घेतले गेले असावे. बौद्ध धर्म तर सर्वसंग्राहक होता. अनेक शकांनी त्याचा स्वीकार करून बौद्ध लेणी कोरण्याकरिता उदार दाने दिल्याचे उल्लेख कोरीव लेखांत आढळतात.

पाहा : कुशाण वंश यूए-ची टोळ्या हूण.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The  Age of Imperial Unity, Bombay, 1981.

           2. Sastri, K. A. Nilakanta, Comprehensive History of India, Vol. 2, Bombay,  1957.

मिराशी, वा. वि.