अलेक्झांडर हॅमिल्टनहॅमिल्टन, अलेक्झांडर : (११ जानेवारी १७५५/५७ – १२ जुलै १८०४). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक मुत्सद्दी,अर्थसचिव आणि स्वातंत्र्य चळवळीतील एक नेता. त्याचा जन्म जेम्स हॅमिल्टन आणि राशेल लेव्हिन (घटस्फोटित महिला) यादांपत्यापोटी वेस्ट इंडिजमधील नेव्हिस बेटावर झाला. वडीलजेम्स हे व्यापारी असून स्कॉटलंड-मधील आयरशर परगण्यात त्यांचा जमीनजुमला होता तर आई ही ह्यूगेनॉट या एका फ्रेंच वैद्याचीकन्या असून तिचा पहिला विवाह जॉन लेव्हिन या व्यापाऱ्याशी झाला होता. जेम्सने पत्नी व दोन मुलांना टाकून १७६५ मध्ये स्कॉटलंड गाठले, तेव्हा राशेलने चरितार्थासाठी दुकान काढले.

 

अलेक्झांडर बालवयातच सेंट क्रोइक्स बेटावरील व्यापारी वखारीत कारकून म्हणून काम करू लागला. वखारीच्या मालकाने त्याच्यातील बुद्धिमत्ता आणि उपजत गुण हेरले आणि त्याला उत्तर अमेरिकेतील एलिझाबेथ टाउनमधील शाळेत (न्यू जर्सी) घातले (१७७२). त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण करून किंग्ज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हा अमेरिकन क्रांतिलढ्याचा काळ होता. हॅमिल्टन राष्ट्रीय सैन्यात सामील झाला (१७७६). त्याला न्यूयॉर्क येथील तोफखान्यावर कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आले. पुढे तो जनरल जॉर्ज वॉशिंग्टनच्या कर्मचाऱ्यां कर्नल पदावर होता (१७७७–८१). तसेच जॉर्ज वॉशिंग्टनचा स्वीय साहाय्यक व मदतनीस म्हणूनही तो काम करीत असे. याच काळात त्याने एलिझाबेथ शूलर या न्यूयॉर्कमधील धनाढ्य व्यक्तीच्या मुलीशी विवाह केला (१७८०). त्यांना आठ मुले झाली.

 

हॅमिल्टनने न्यूयॉर्क शहरात वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली (१७८२). त्याच सुमारास न्यूयॉर्कमधून त्याची फेडरेशनच्या काँटिनेन्टल काँग्रेसवर एक प्रतिनिधी म्हणून निवड झाली. स्वातंत्र्ययुद्धाची समाप्ती १७८३ मध्ये झाली. त्या वेळी मध्यवर्ती शासनाचे नियम मर्यादित असल्याची जाणीव घटक राज्यांना झाली. मध्यवर्ती काँटिनेन्टल काँग्रेस ही राष्ट्राची सर्वशक्तिमान संस्था असण्याऐवजी केवळ प्रतिनिधींची परिषदअसे तिचे स्वरूप होते. अशा परिस्थितीत मॅसॅचूसेट्स राज्यात १७८६ मध्ये डॅन्येल शेझच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी बंड केले. त्याचा बीमोड करण्यात आला तथापि देशाच्या ऐक्याला धोका असल्याची जाणीव जॉर्ज वॉशिंग्टन व अलेक्झांडर हॅमिल्टन यांना झाली. हॅमिल्टनने संघराज्याच्या सशक्तीकरणासाठी अधिवेशन बोलवावे म्हणून शासनास लिहिले. फिलाडेल्फिया येथे १७८७ मध्ये घटक राज्यांच्या प्रतिनिधींचे अधिवेशन भरले. ४२ पैकी ३९ राज्यांनी संविधानास अनुमती दिली. त्यांतील फेडरॅलिस्टांना ‘फाउंडिंग फादर्स’ अशी संज्ञा प्राप्त झाली (हॅमिल्टन त्यांपैकी एक होता), त्यातून फेडरल या राजकीय पक्षाची निर्मिती झाली. त्याची अर्थसचिवपदी नियुक्ती करण्यात आली (१७८९). त्याने शासनाचे आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय बँक स्थापन करावी, अशी सूचना मांडली परंतु गृहसचिव असलेल्या टॉमस जेफर्सनने त्यास विरोध केला. तेव्हा हॅमिल्टनने ग्रथित (अंतर्भूत) अधिकाराच्या तत्त्वाचा पाठपुरावा केला. हे तत्त्व असे सांगते की, संविधानात निर्दिष्ट केलेले अधिकार शासनाला गर्भित (इम्प्लाइड) अधिकार म्हणून वापरता येतात. पुढे सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार ग्राह्य ठरविला. देशाची आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी शासनाने निर्मिती उद्योगांना चालना द्यावी असे सूचित केले आणि काही मार्गही निर्दिष्ट केले परंतु जेफर्सन व मॅडिसन यांनीत्याला विरोध केला. त्यांच्या मते, औद्योगिकतेमुळे शेती उद्योग बसेल. साहजिकच काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले. १७९० च्या दशकात हॅमिल्टन आणि जेफर्सन व मॅडिसन यांच्यातील मतभेद विकोपास गेले आणित्यातून दोन राजकीय पक्षांची निर्मिती झाली. हॅमिल्टन हा फेडरल पक्षाचा सर्वेसर्वा होता. त्याला बळकट संघराज्य ही संकल्पना कृतीत आणावयाची होती, तर जेफर्सन-मॅडिसनच्या डेमॉक्रटिक रिपब्लिकन पक्षाला कमकुवत केंद्र शासन हवे होते. हॅमिल्टनने त्याच्या विरुद्ध काँग्रेसमध्ये घडणाऱ्या घटना, व्यक्तिगत आर्थिक समस्या आणि राजकीय मतभेद यांमुळे अर्थ-सचिवपदाचा राजीनामा दिला (१७९५) परंतु सक्रिय सार्वजनिक राजकारणात तो कृतिशील होता. जॉर्ज वॉशिंग्टनला १७९६ मध्ये त्याचे निरोप समारंभाचे भाषण तयार करण्यास हॅमिल्टनने मदत केली.

 

जॉर्ज वॉशिंग्टननंतर जॉन ॲडम्स हा फेडरल पक्षाचा उमेदवार राष्ट्राध्यक्ष झाला (१७९७). ॲडम्स आणि हॅमिल्टन यांच्यात वैयक्तिक स्तरावर मतभेद होते. शिवाय परराष्ट्रीय धोरण व अन्य घटना यांबद्दल मतैक्यनव्हते. १८०० सालच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीपूर्वी हॅमिल्टनने एक पुस्तिका प्रकाशित करून ॲडम्सवर घणाघाती टीका केली. या पुस्तिके-मुळे फेडरल पक्षात अंतर्गत दुही माजली. परिणामतः ॲडम्सचा पराभव होऊन टॉमस जेफर्सन व ॲरन बर यांना सारखी मते पडली. त्यामुळेदोघेही अध्यक्षपदास पात्र ठरले. तेव्हा प्रतिनिधिगृहाने हा निर्णयघ्यावा असे ठरले. हॅमिल्टनचा बरवर विश्वास नव्हता म्हणून त्याने जेफर्सनला पाठिंबा दिला. त्यानंतर जेफर्सन व बर अनुक्रमे राष्ट्राध्यक्षआणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून डेमॉक्रटिक रिपब्लिकन पक्षातर्फे निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. पुढे बरने न्यूयॉर्कच्या गर्व्हनरपदा-साठीच्या निवडणुकीत भाग घेतला (१८०४). हॅमिल्टनने त्याच्यावर टीकेचा भडिमार केला आणि त्याच्या पराभवासाठी अथक प्रयत्न केले. बरचा निवडणुकीत दारुण पराभव झाला. तेव्हा त्याने हॅमिल्टनला पिस्तुलासह द्वंद्वाचे आव्हान दिले. दोघांचे वीहॉकन (न्यू जर्सी) येथेद्वंद्वयुद्ध होऊन हॅमिल्टनला गोळी लागली. दुसऱ्या दिवशी त्याचेनिधन झाले.

 

संदर्भ : 1. Chevnow, Ron, Alexander Hamilton, Penguin, 2004.

            2. Whitelaw, Nancy, More Perfect Union : The Story of Alexander Hamilton, Morgon Reynolds, 2003.

देशपांडे, सु. र.