इराणी संस्कृति : पश्चिम आशियात इ. स. पू. १५०० ते इ. स. ७०० च्या दरम्यान अस्तित्वात असलेली एक समृद्ध संस्कृती. ह्या संस्कृतीच्या प्रादेशिक सीमांत वेळोवेळी महत्वाचे बदल होत गेले. ‘फरस’  किंवा ‘परसुमश’या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका छोट्याशा भूभागावरून संबंध प्रदेशाला फार्स (पर्शियर) हे नाव प्राप्त झाले. इराणी संस्कृतीच्या भौगोलिक मर्यादा सर्वसाधारणतः पुढील प्रमाणे सांगता येतील : पूर्वेस काराकोरम व हिंदुकुश पर्वतांच्या रांगा (अफगाणिस्तान व पाकिस्तान), दक्षिणेस अरबी समुद्र, पश्चिमेस टायग्रिस व युफ्रेटीसचे खोरे व ईलम झॅग्रॉस पर्वतांची रांग (तुर्कस्तान व इराक) आणि उत्तरेस कॅस्पियन समुद्र व अमुदर्या नदीचे जुने पात्र (सोव्हिएट रशिया). या प्रदेशाचा बहुतेक मध्यभाग वाळवंटी पठारांनी व्यापलेला आहे. इराणच्या आखातास लागूनच असलेला ईलमचा प्रदेश व झॅग्रॉस पर्वताचा उतार येथे प्रथमतः मीडियन व नंतर इराणी सत्तांचा उदय झाला.

ऐतिहासिक काळातील इराणी साम्राज्याची स्थापना करणारे लोक आरंभापासून या प्रदेशातील रहिवासी नव्हते. त्यांचे पूर्वज इ. स. पू. अठराशेच्या आसपास ईशान्येकडून झॅग्रॉस पर्वताच्या भागात आले. वांशिक व भाषिक साधर्म्यामुळे ते कॅसाइट, हुरी, मितानी इ. लोकांत मिसळून गेले. इ. स. पू. दहाव्या-नवव्या शतकांत अशाच प्रकारचे स्थलांतर फार मोठ्या प्रमाणावर झाले आणि एकमेकांना निकट असणार्‍या मीड व इराणी या जमाती या भागात आल्या. त्यांपैकी मीडियन लोक ॲसिरिया-लिडिया या भागाचे सत्ताधीश झाले, तर इराणी लोक दक्षिणेकडे सरकले व इराणी आखातापर्यंत पसरले. आरंभीचे इराणी राजे मीडचे मांडलिक होते, परंतु एकदोन पिढ्यांतच ते स्वायत्त झाले. मीड व इराणी या दोन जमातींत वंश, धर्मकल्पना, भाषा या बाबतींत साधर्म्य होते.

तौलनिक दृष्ट्या संस्कृतीचा काळ अलीकडचा समजतात. अगदी पहिल्या इराणी सम्राटापासून कोरीव लेख, मुद्रा, नाणी वास्तू अशी हरतऱ्हेची साधने उपलब्ध आहेत. या सर्वांत बेहिस्तून येथील डरायसचा शिलालेख प्रसिद्ध आहे. ग्रीस व रोम यांचा इराणशी सतत संबंध येत गेल्याने ग्रीक व रोमन साहित्यांतून व बखरींतून इराणविषयी हरतऱ्हेची माहिती मिळते. आणखी एक साधन उपयोगी पडते, पण त्याचा उपयोग मुख्यत्वे उत्तर कालखंडासाठी होतो. हे साधन म्हणजे चिनी बखरी होत. यांत इराणी सत्तेचा अरबी आक्रमकांशी जो झगडा चालला होता, त्याचे पडसाद उमटलेले दिसतात. हे लेख क्यूनिफॉर्म लिपीत आणि पेहलवी व झेंद या प्राचीन इराणी भाषांत मिळतात. पर्सेपलिस, अलवंद, व्हॅन, बेहिस्तून या ठिकाणी सापडलेल्या लेखांतून इराणी सम्राटांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार व संघटना यांविषयी माहिती कोरविली आहे. प्राचीन पाश्चात्य लेखकांत हीरॉडोस, टॅसिटस, झेनोफन, स्ट्रेबो, डायोडोरस इत्यादींचे ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.

राजकीय इतिहास : इराणच्या इतिहासाचे सोयीकरिता पुढीलप्रमाणे कालखंड पाडले आहेत : (१) ॲकिनेनिडी वंश : (इ.स.पू. ५४६ ते इ.स.पू. ३३०). (२) सिल्युसिडी वंश : (इ.स.पू. ३२४ ते इ.स.पू. २२६). (३) आरसॅसिडी वंश : (इ.स.पू. २५० ते इ.स. २२५). (४) सॅसॅनिडी वंश : (इ.स. २२६ ते ६४१). यांपैकी पहिला व तिसरा वंश खास इराणी होता, तर दुसर्‍यावर ग्रीकांश संस्कृतीची दाट छाया पडलेली आढळते.

ॲकिमेनिडी वंश : इ. स. पू. नवव्या शतकापासून पुढील ॲसिरियन व बॅविलोनियन लेखांत ‘परसु’ या जमातीला जिंकल्याचे उल्लेख येतात. इराणी-परसु-राज्य मीडच्या आधिपत्याखाली पन्नास वर्षे असावे. त्यानंतर शेवटचा मीडियन सम्राट ॲस्टायानीज याचा नाश करून सायरस याने स्वतंत्र राज्य स्थापिले. त्याच्या घराण्याचे नाव ॲकिमीनीझ (हखामनेश). सायरसच्या आधीच्या काही राजांची नावे ज्ञात आहेत. सायरस याने मीजियन सत्ता मोडून पश्चिम आशियातील इतर राज्ये खालसा करण्यास प्रारंभ केला. लिडिया, मीडिया, मकरान, समरकंद आणि शेवटी बॅबिलन खालसा करण्यात आले. मध्य आशियाचा प्रमुख भाग ताब्यात आल्यावर प्रगतीच्या दिशा मुख्यत्वे दोन होत्या– नैर्ऋत्य व वायव्य. नैर्ऋत्येला प्राचीन व संपन्न असा ईजिप्त आणि वायव्येला संपन्न असा आयोनिया होता. सायरसनंतर दुसरा कॅम्बायसीझ गादीवर आला. त्याने ईजिप्त पादाक्रांत केला. तेथून आणखी पुढे म्हणजे पश्चिमेकडे लिबियातून कार्थेजकडे आणि दक्षिणेकडून न्यूबियाकडे जाण्याचे त्याचे प्रयत्न फसले. साम्राज्याची ईशान्य बाजू नेहमीच अस्थिर राहिली. कारण मध्य आशियातून येणार्‍या विविध जमातींचा घाला प्रथम याच भागावर पडत असे. प्रत्येक सम्राटाला या भागाकडे सारखे लक्ष पुरवावे लागले. पहिल्या डरायसच्या कारकीर्दीची पहली सात वर्षे कॅम्बायसीझच्या राज्यावर अंमल बसविण्यातच गेली. त्यानंतर त्याने वायव्येकडे मोहरा फिरवून केवळ आयोनियाच नव्हे, तर यूरोपच्या भूमीवरील सिथियावरही स्वारी केली. या मोहिमेचा उद्देश ग्रीसवर स्वारी हा नसून बाल्कन्स भागातून छापे घालणार्‍या सिथियन टोळ्यांचा बंदोबस्त हाच असावा. परंतु सिथियन टोळ्यांच्या गनिमी काव्याने हैराण होऊन तो परतला. त्याच्या सेनापतींनी मॅसिडोनियावर वर्चस्व स्थापिले व त्याच्या क्षत्रपांनी आयोनियन ग्रीकांतूल भांडणांत प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने भाग घ्यावयास आरंभ केला. इ.स.पू. ४९३ मध्ये ग्रीसवर आक्रमणाच्या हेतूनेच डरायसने बॉस्पोरस सामुद्रधुनी ओलांडली. या युद्धाचा शेवट सॅलामिस व प्लाशिया येथील इराणच्या पराभवाने झाला. दुसर्‍या डरायसने पेलोपनीशियन युद्धात हस्तक्षेप करून ग्रीक सामर्थ्याचे काहीसे खच्चीकरण केले. मात्र इराणच्या लष्करी वर्चस्वाला आता उतरती कळा लागली. वारसाहक्काच्या कलहात टायग्रिसवरील युद्धात इराणच्या सरकारी सैन्याचा ग्रीकांच्या भाडोत्री फौजेने पराभव केला. तरीही आयोनिया ते ईजिप्त या प्रचंड साम्राज्यावर स्वामित्व टिकविण्यात इराण यशस्वी झाला. अलेक्झांडरने डरायसचा इसस व गॉगामीला या दोन युद्धांत पराभव केला व शेवटी इ.स.पू. ३३० मध्ये डरायसचा खून होऊन ॲकिमेनिडी सत्ता संपुष्टात आली. यानंतर सिल्युसिडी वंशाची कारकीर्द सुरू झाली.

सिल्युसिडी वंश : अलेक्झांडरने डरायसचा पराभव केल्यानंतर शासनव्यवस्था आपल्या अधिकार्‍यांच्या ताब्यात देऊन तो हिंदुस्थानकडे वळला. हिंदुस्थानच्या वायव्येकडील बराचसा मुलूख पादाक्रांत केल्यावर त्याने भारतातून काढता पाय घेतला आणि अरबस्तानच्या स्वारीची तयारी करण्याकरिता बॅबिलनमध्ये ठाण मांडले. तेथेच तो इ.स.पू. ३२३ मध्ये मरण पावला. साहजिकच त्याच्या मृत्यूबरोबर त्याने नेमलेल्या क्षत्रपांमध्ये बंडाळी माजली आणि ते स्वतंत्र होऊ लागले. या क्षत्रपांपैकी सेल्युकस हा एक होता. मॅसिडोनियाच्या दुसर्‍या फिलिप राजाच्या अँटायओकस या सेनापतीचा तो मुलगा. तो अलेक्झांडरचा अत्यंत लाडका सेनापती होता आणि अलेक्झांडरने त्याचे लग्‍न इराणी युवती अपमा हिच्याशी लावून दिले होते. इराणच्या स्वारीत त्याचे अलेक्झांडरला फार साहाय्य झाले. या ग्रीक व इराणी वंशसंकरामधूनच पुढे सिल्युसिडी वंशाची निर्मिती झाली. या वंशाची राजवट प्राचीन इराणच्या इतिहासात महत्त्वाची मानली जाते.

अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर अँटिपाटरने सेल्युकसची नियुक्ती बॅबिलनच्या प्रदेशावर केली (इ.स.पू. ३१२). थोड्याच अवधीत त्याने हा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन राज्यविस्तारास सुरुवात केली. अलेक्झांडरच्या या सेनापतीने ईजिप्त व सिरिया वगळून अलेक्झांडरच्या बहुतेक सर्व साम्राज्यावर आपली सत्ता प्रस्थापिली. पुढे त्याने इ.स.पू. ३०१ च्या सुमारास सिरिया जिंकून अँटिऑक नावाचे नवीन शहर वसविले व तेथे राजधानी नेली. टायग्रिस नदीच्या काठच्या सेल्यूशिया भागातही त्याची दुसरी राजधानी होती. तिथे इ.स.पू. २९७ मध्ये त्याने अँटायओकस या आपल्या मुलाची राज्यपाल म्हणून नेमणूक केली. पुढे त्याने मॅसिडोनिया व थ्रेस यांवर स्वारी करण्याचे ठरविले परंतु दरम्यान टॉलेमी सेरॅअनस याने त्याचा खून केला (इ.स.पू. २८०) आणि त्यामुळे त्याचा स्वारीचा बेत अधुराच राहिला.

सेल्युकस निकेटरनंतर सु. पाच वंशज सिल्युसिडी वंशाच्या गादीवर आले, परंतु त्यांत सेल्युकसचा पराक्रम आणि विधायक धोरणीपणा नव्हता. शिवाय पुढील राजांनी बहुपत्‍नीकत्वाचा स्वीकार केला. सावत्र व सख्ख्या भावंडात होणारे विवाह व कलह यांमुळे या घराण्याचा अध:पात झाला. इ.स.पू. २५० च्या सुमारास बॅक्ट्रियातील (सध्याचा अफगाणिस्तानचा उत्तर भाग) ग्रीकांनी या घराण्याची सत्ता झुगारून दिली व ते स्वतंत्र झाले. तसेच या सुमारास इराणच्या उत्तरेकजील आर्‌सॅसिडी या पार्थियन जमातीने यावेळी बंड करून स्वतंत्र राज्याची स्थापना केली. तेव्हापासून आर्‌सॅसिडी वंशाची कारकीर्द सुरू झाली.

आर्‌सॅसिडी वंश : अलेक्झांडरच्या मृत्यूने पश्चिम आशियात जी गोंधळाची परिस्थिती उत्पन्न झाली, तीत कर्तबगार पुरुष व जमाती यांना पुढे येण्यास वाव मिळाला. अशा जमातींतच आर्‌सॅसिडी या पार्थियन जमातीची गणना करता येईल. आर्सासीझ आणि टिरिडेटीझ या दोघा भावांनी हे राज्य स्थापिले. हे दोघेही भाऊ ॲकेमेनियनांचे वंशज असल्याचा पुकारा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना राज्यस्थापनेचे काम सुलभ झाले. इ. स. पू. २५० मध्ये हे नव-इराणी राज्य स्थिर पायावर उभे राहिले होते. कालांतराने यालाच पोक्त स्वरूप प्राप्त होऊन पार्थियन साम्राज्य निर्माण झाले. पहिला वेंगकर्ट, पहिला व तिसरा मिथ्रीडॅथ, व्हॉलोजीसस यांसारखे अनेक कर्तबगार राजे या वंशात होऊन गेले.  पण त्यांचे मुख्य व्यवधान म्हणजे पार्थियन राज्य टिकवून धरणे हेच दिसते. त्यासाठी बचावाच्या धोरणाऐवजी त्यांनी आक्रमक धोरण स्वीकारले. या राजांचे इतिहास वाचताना तेच तेच प्रदेश पुन:पुन्हा जिंकल्याची वर्णने पहावयास सापडतात. प्रथम ग्रीक आणि नंतर रोमन ह्या बाह्य शत्रूंच्या आणि नंतर बंडांमुळे अस्थिर अशा अंतर्गत परिस्थितीच्या कात्रीत या साम्राज्याचे राजकीय जीवन व्यतीत झालेले दिसते. जयापजयाच्या चक्रात या वंशाची बहुतेक कारकीर्द भिरभिरत राहिली.

आर्‌सॅसिडी कालखंडात त्या त्या ठिकाणच्या धर्मकल्पना वा पंथ टिकून राहणे स्वाभाविकच होते. अहुर मज्द व अग्‍नी यांचा पूजक असा मागी धर्म जोमात होता. सर्वच पश्चिम आशिया व पूर्व भूमध्य भागात यावेळी लोकप्रिय झालेली मिथ्र पूजा येथेही जारी होती. कांगाव्हार, हात्रा, फरवरश, बार्का इ. ठिकाणी पार्थियन काळातील वास्तूंचे व कलाकृतींचे भग्न अवशेष काही प्रमाणात पहावयास सापडतात. सामान्यपणे असे सांगता येते, की पार्थियन समाजजीवन व कलापरंपरा यांजवर ग्रीकांश आचारविचारांचा जबरदस्त प्रभाव दिसतो. ॲकिमेनियन परंपरेऐवजी आता अथेन्स व कॉरिंथ यांनी उत्पन्न केलेल्या आणि जोपासलेल्या परंपरा इतक्या महत्वाच्या झाल्या, की राजकीयदृष्ट्या आर्‌सॅसिडी साम्राज्य हे ॲकिमेनिडीचे वारसदार असले, तरी सांस्कृतिक दृष्ट्या ते तसे नव्हते. त्याची ग्रीकांश किंवा ग्रीकांशप्रभावित या वर्गात गणना करता येईल कारण त्यांच्या सर्व सांस्कृतिक अंगोपांगांत ग्रीकांश संस्कृती मुरलेली होती.

सॅसॅनिडी वंश :  ‘सॅसन हे पर्सेपलिसच्या ‘अनहित देवतेच्या मंदिरातील पुजार्‍याचे नाव. त्याच्या पुत्राचे नाव बबेक. या बबेकने एक छोटीशी जहागीर मिळविली. पहिला आर्दशिर याने या जहागिरीला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त करून दिला. आर्दशिर हा प्रत्यक्षपणे पार्थियन राजसत्तेचा वारस असला, तरी त्याच्या डोळ्यासमोर आदर्श होता तो त्रिखंडात सत्ता गाजविणार्‍या ॲकिमेनियन पूर्वजांचा. इ. स. २४४ मध्ये आर्टाबेझसचा पाडाव करून सत्ता हातात घेतल्याबरोबर त्याने किरमान, स्यूझिॲना, मेसीनी यांसारखे प्रदेश एकामागोमाग खालसा केले. त्याच्या दिग्विजयाचे वर्णन नक्श-इ-रुस्तुम (पर्सेपलिस) येथील एका शिलालेखात कोरविलेले आहे. पश्चिम आशियात साम्राज्य स्थापन करू इच्छिणार्‍या राजसत्तेस पार्थियन काळाप्रमाणे आताही या राज्यांशिवाय रोमशीही शत्रुत्व पतकरावे लागणार होते. सॅसॅनिडी सत्तेच्या स्थापनेनंतर थोड्याच काळात बायझंटिन किंवा पूर्व रोमन साम्राज्य बलशाली होऊ लागले. शत्रुत्वाचा मोहरा रोमकडून बायझंटियमकडे वळला. आर्दशिर व त्याचे वंशज यांना पश्चिमेकडच्या या शत्रूंची जशी तीव्र जाणीव होती, तशीच ती इराणी समाजात एकात्मता निर्माण करण्याच्या गरजेचीही होती. जरथुश्त्र धर्म आणि मागी पुरोहितांची संघटना हा सॅसॅनिडी काळातील एकात्मतेचा मुख्य बंध होय. या कालखंडात शापूर (पहिला व दुसरा), बाराम (पहिला, दुसरा, तिसरा व चौथा), यॅझदेगेर्द असे अनेक कर्तबगार राजे होऊन गेले. पूर्वीच्या इराणी साम्राज्याप्रमाणे आताही ईशान्येकडून (मध्य आशियातून) होणारी अर्धरानटी जमातींची आक्रमणे हा फार मोठा धोका सॅसॅनिडी सम्राटांना अस्वस्थ करीत राहिला. बाराम, यॅझदेगेर्द, हॉर्मिझ्द यांसारख्या सम्राटांना आपली सर्व शक्ती या धोक्याला तोंड देण्यात खर्च करावी लागली. ईशान्येकडून वारंवार श्वेत हूणांच्या टोळ्या साम्राज्यात घुसत. त्यांना अडवून सरहद्दीपलीकडे पिटाळणे आवश्यक असे. अनेक इतिहासकारांच्या मते पहिला कास्त्रौ (खुसरौ) अनुशीर्वान (५३१–५७९) हा सॅसॅनिडी वंशातील सर्वांत श्रेष्ठ सम्राट होय. अंतर्गत शासनव्यवस्थेत तो अत्यंत न्यायी होता आणि संरक्षण क्षेत्रात त्याचे कार्य वाखाणण्यासारखेच झाले. त्याने राज्याच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात किल्लेकोट उभारले. पश्चिमेकडे बायझंटियम व ईशान्येकडे हूण या शत्रूंच्या बंदोबस्तासाठी ॲंटिऑकवर ताबा मिळवून त्याच्या थोड्या पूर्वेस किल्लेकोटांची त्याने साखळी निर्माण केली. श्वेत हूणांना ऑक्सस (अमुदर्या) नदीच्या जुन्या पात्रापर्यंत हटवत नेऊन तेथे याच तर्‍हेची साखळी उत्पन्न केली. त्याने कार्यक्षम प्रशासनाबरोबर चोख न्यायपद्धती अंमलात आणली. करांमध्ये सुधारणा करून आर्थिक स्थिती सुधारली आणि जरथुश्त्र धर्माचा संपूर्णपणे पुरस्कार केला. त्याचा अंमल पेहलवी साहित्याचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल. दुसरा खुसरौ (पर्वेझ) याची कारकीर्द (५९०–६२८) म्हणजे इराणी सम्राटांच्या महत्त्वाकांक्षा, सामर्थ्य व समस्या यांचा प्रातिनिधिक समन्वय मानता येईल. अगदी ॲकिमेनियन काळापासून ते सॅसॅनिडीच्या अस्तापर्यंतचा सगळा इतिहास या एकच कारकीर्दीत एकवटलेला दिसतो. राज्याभिषेकानंतर पश्चिम आशियातील सर्व प्रांतांवर त्याला नव्याने स्वामित्व प्रस्थापित करावे लागले. यानंतर ईजिप्तवर हल्ला करून तो पुन्हा ताब्यात आणावा लागला. त्यातून डोके वर निघते न निघते तोच श्वेत हूणांचे आक्रमण परतविण्यासाठी धावून जावे लागले. पश्चिमेकडील स्वारीत त्याने थेट कॉन्स्टँटिनोपलपर्यंत मजल मारली. पण इराणी सैन्यापाशी दुर्गभेद करणारी यंत्रे व आयुधे नसल्याने त्याला पराभव पतकरावा लागला. पर्वेझच्या या पराभवामुळे अंतर्गत यादवीचा मार्ग खुला झाला. त्याच्यानंतर त्याच्या वारसांत गादीसंबंधी वितुष्ट निर्माण झाले व यादवी माजली आणि यातून देश वर येतो न येतो, तोच अरबी आक्रमणाची प्रचंड लाट आली. जुलूला आणि नहावंद येथे दोन मोठ्या लढाया होऊन त्यांत तिसरा यॅझदेगेर्द याचा मोड झाला व पुढे नऊ वर्षांनी त्याचा खून झाला व सॅसॅनिडी साम्राज्य संपुष्टात आले. यानंतर आणखी पन्नास-पाऊणशे वर्षे ईशान्य इराणात आणि नंतर तोखारिस्तानमधील काही प्रदेशांवर इराणी राजपुरुषांनी राज्य केले. झरंज येथे त्यांची राजधानी होती. तिसरा फीरूझ, नासीझ आणि खुसरौ अशा तीन राजांची नोंद मुख्यत्वे चिनी दप्तरांतून आढळते. हे अवशिष्ट साम्राज्यही सातशेच्या सुमारास अस्तंगत झाले.

शासनयंत्रणा : इराणी साम्राज्याइतका प्रदेश ह्यापूर्वी कोणत्याही काळी एका छत्राखाली आलेला नव्हता. लष्करी मोहिमा काढून शत्रूचा पराभव करणे, त्याला गुलाम करणे, त्याच्या नगरांची लुटालूट व विनाश करणे या गोष्टी शतकानुशतके चालत आलेल्या होत्या. परंतु विध्वंस न करता वेगवेगळे समाज एकाच राजछत्राखाली एकत्र नांदविण्याचा प्रयोग इराणने केला. अशा स्वरूपाचा हा पहिलाच प्रयत्‍न असल्याने इराणी शासनयंत्रणेचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. या प्रदेशाचे सात मुख्य विभाग आणि त्यांच्याबाहेर काही उपविभाग अशी वाटणी केली होती. एका वेळी विभाग-उपविभाग यांची मिळून संख्या अठ्ठावीसपर्यंत गेली होती. सर्व शासनाच्या अग्रभागी अर्थातच राजा असे. सध्या स्वतंत्र मानण्यात येणारी कायदा, अंमलबजावणी व न्यायदान ही सर्व खाती सम्राटाच्याच हातात होती. राजसत्ता अनिर्बंध, स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध होती. राजपुरुष व राजघराणे यांवरील निष्ठा हा सर्व प्रांतांना एकत्र ठेवणारा सर्वांत महत्वाचा बंध असे. सेनापती तसेच अनुभवी प्रशासक व मुत्सद्दी यांचा सल्ला राज्यकर्ते वेळोवेळी घेत असले, तरी या सल्लागारांना वा सल्लागारमंडळाला राज्यघटनेत स्थान नव्हते. सम्राटाच्या हाताखाली क्षत्रप म्हणजे विभागांचे अधिकारी येत. प्रत्येक प्रांतावर तीन अधिकारी नेमत. तीनही अधिकार्‍यांना सम्राटानेच नेमलेले असून त्यांची कार्यक्षेत्रे काहीशी भिन्न असली, तरी तिघेही समान दर्जाचे असत. तिघेही स्वतंत्रपणे आपापल्या कारभाराबद्दल सम्राटाला जबाबदार असत. पहिला अधिकारी म्हणजे क्षत्रप (प्रांताधिपती). तो नागरी शासनाचा प्रमुख असे. महसूल आणि शासकीय अर्थव्यवहार हे प्रांताधिपतीच्या अधिकारात येत. क्षत्रपाला साहाय्य करण्यासाठी एक मंत्री नेमण्यात येई. वरकरणी तरी नागरी प्रशासनात क्षत्रपाला साहाय्य करणे हेच त्याचे कार्य होते, तरी प्रत्यक्षात मात्र क्षत्रपांच्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवून त्याचा वृत्तांत राजाला कळवीत राहणे, हे याचे काम असे. तिसरा अधिकारी म्हणजे प्रांतिक सेनाधिकारी. नागरी सुरक्षादले क्षत्रपांच्या अधिकारात असली, तरी प्रांतांत ठेवण्यात आलेल्या लष्करावर सेनापतीची हुकूमत चाले. याशिवाय फार मोठाली नगरे, किल्ले व कोट यांवर सत्ता मध्यवर्ती शासनाने नेमलेल्या अधिकार्‍यांची असे, क्षत्रपांची नव्हे. या सगळ्या अधिकार्‍यांच्या कारभारावर व वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी सम्राटांचे पर्यवेक्षक किंवा महामात्र दरवर्षी साम्राज्याचा दौरा करीत. त्यांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या हुकुमांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्याबरोबर लष्करी पथके देण्यात येत असत. महामात्रांच्या अभिप्रायाला राजसभेत मोठेच वजन असे. त्याने जर विरुद्ध अभिप्राय पाठविला, तर क्षत्रपासारख्या श्रेष्ठ अधिकार्‍याविरुद्धही कारवाई करण्यात येई प्रसंगी त्यांना देहान्त शासन देत व तेसुद्धा बचावाची संधी न मिळता. निरनिराळे अधिकारी परस्परांच्या कामकाजांविषयी, वर्तणुकीविषयी वा निष्ठेबद्दलही खरेखोटे अहवाल राजदरबारी पोहोचवीत. सम्राटही या प्रथेला प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उत्तेजनच देत असत कारण अशी माहिती वेळप्रसंगी उपयोगी पडे. शासनाचा कोणताही भाग अथवा अधिकारी शिरजोर होऊ नये, या हेतूनेच अशी रचना केलेली होती. एकाच प्रकारचे अधिकार आणि कार्यक्षेत्र यांची अनेक व्यक्तींतील विभागणी हा या योजनेतील अत्यंत महत्त्वाचा भाग. कोणाकडेही कोणतेही एक काम व तदानुषंगिक अधिकार सोपविण्यात येत नसत.

पर्सेपलिस, एकबॅटना, स्यूसा या केंद्रीय राजधान्यांना सर्व प्रांतिक राजधान्यांशी मोठ्या रस्त्यांनी जोडण्यात आलेले होते. सार्डीझ ते स्यूसा हा सर्वांत प्रसिद्ध राजमार्ग. या रस्त्यावर ठराविक अंतरावर ठाणी उभारलेली होती. तेथे शासकीय टपालाची ने-आण करण्यासाठी घोडेस्वारांची पथके तयार असत. शासन व समाजव्यवस्था यांची गती वाढविणारा दुसरा घटक जो चलन, ते पहिल्या डरायसच्या वेळेपासूनच वापरात होता. शासनसंघटना यशस्वी होण्यास या दोन्हींची फार मोठी मदत होत असे.

इराणी सम्राटांचे लष्करी बळ काहीसे अस्थिरच होते. राजधानीत राजांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या ‘अमर दलाची संख्या नेहमी कायम ठेवण्यात येई. क्षत्रप व दुर्गनायक यांजपाशी असणारी फौज हेच काय ते खडे लष्कर होते. ते केव्हाही हाताशी असणारे होते, म्हणून त्याची राजा अधिक काळजी घेत असे. युद्धाच्या काळी तात्पुरती भरती करण्यात येई. सरंजामदारांचे दल हा एक विभाग होता. याशिवाय प्रत्येक प्रांतातून पथके उभारण्यात येत. ती पथके एखाद्या विशिष्ट शस्त्राने वा पद्धतीने लढण्यात वाकबगार असत. इराणी साम्राज्याच्या शेवटी शेवटी इराणी सैनिकांची संख्या अल्प होती. अलेक्झांडरशी ग्रॅनिकस येथे डरायसने केलेल्या युद्धात त्याच्या लष्कारतील एकपंचमांश इराणी होते, तर चारपंचमांश ग्रीक व तत्सम भाडोत्री सैनिक होते. ॲकिमेनिडी आणि सॅसॅनिडी कालखंडातील शासनयंत्रणेत काही किरकोळ भेद दिसून येतात. त्यावेळी प्रांताधिपांच्या जागेवर सामान्यपणे राजवंशातील पुरुषांची नेमणूक करण्यात येई. इतर अधिकारीवर्ग मुख्यत्वे समाजाच्या वरच्या थरातून– सरंजामदारांच्या वर्गातूनच– नेमण्यात येई. महामात्र नसले, तरी परस्परांविषयी हेरगिरी चाले. या शासनव्यवस्थेतील एक नवा घटक म्हणजे नागरी व लष्करी संघटनांच्या जोडीला आता मागी पुरोहितांची संघटना राजाचा पाठपुरावा करू लागली. अहुर मज्दचा धर्म हा आता पूर्वीप्रमाणे केवळ नामधारी असा राजधर्म राहिलेला नव्हता. सम्राट हा स्वाभाविकच प्रमुख पुरोहित होता आणि म्हणून सर्व राष्ट्रीय किंवा सामाजिक धर्मकृत्यांत त्याचा विशेष भाग असे. राजाच्या हुकुमाने सर्व राज्य चालत असले, तरी राजपद एका वारसापद्धतीने मिळत गेलेले दिसत नाही. सॅसॅनिडी काळाच्या शेवटच्या दोन शतकांत वारस कोण, हे ठरविण्याचे काम एक मंडळ करू लागले होते. महामंत्री, अमात्य आणि सेनानी या तिघांच्या समितीने हे काम करावे असे ठरविण्यात आले. मात्र त्यांनी निवडलेला पुरुष सॅसॅनिडी घराण्यातीलच असला पाहिजे, अशी अट होती. ही व्यवस्थाही सातव्या शतकाच्या मध्यास कोलमडली.

धर्म : इराणचा धर्म आरंभी तरी एकेश्वरवादी होता. तथापि जरथुश्त्राचा धर्म हाच इराणमध्ये प्रभावी ठरला. ‘अवेस्ता’ मध्ये त्याची शिकवणूक ग्रथित केली आहे.‘अहुर मज्द’ हा मुख्य देव असला तरी, सूर्य, चंद्र, जल, भू, वायू यांसारख्या निसर्गदेवतांचीही पूजा प्रचलित होती. देवतांच्या मूर्ती नव्हत्या, मंदिरे नव्हती. यज्ञयाग व बलिदान यांस महत्त्वाचे स्थान असे. मीड जमातींपैकी मागी या वर्गाकडे या सर्व कर्मकांडाचे पौरोहित्य सोपविलेले होते. ईश्वराची पूजा वा उपासना अग्नीच्या द्वारे होत असल्याने अग्निकुंडे सर्वत्र असावीत. सॅसॅनिडी काळात अग्निमंदिरे अस्तित्वात आलेली होती. काही ठिकाणची बांधीव कुंडे अद्यापि आढळतात. मृताला पुरण्याची पद्धत होती. ॲकिमेनियन राजपुरुषांच्या समाध्या नक्श-इ-रुस्तुम येथे डोंगरात आढळतात. इराणी सम्राटांना स्वतःचा धर्म असताना, बॅबिलनमध्ये बेल मार्डुकच्या पुजार्‍यांकडून अभिषेक, मेंफिसच्या पुरोहितांच्या हस्ते उत्तर व दक्षिण ईजिप्तच्या मुकुटाचे ग्रहण, ज्यू मंदिराच्या पुनर्रचनेस साहाय्य अशा गोष्टी त्यांनी का केल्या त्यासाठी आवश्यक ती क्रियाकर्मे का केली त्यांची आपल्या धर्मावर अव्यभिचारी निष्ठा नव्हती काय अशा प्रश्नांचे उत्तर थोडक्यात असे देता येईल, की ही त्यांच्या डोळस श्रद्धेची व सहिष्णुतेचीच लक्षणे होत. बहुभाषिक, बहुधर्मी प्रजेला साम्राज्याच्या जीवनप्रवाहात सामावून घेण्याचा तो एक प्रयत्‍न होता.

तत्कालीन परदेशी बखरकार असे सांगतात, की कोणत्याही गोष्टीला वा निर्णयाला मागींची संमती मिळाल्याखेरीज तो अधिकृत व अंतिम समजला जात नसे. ‘मागी ही मीड लोकांपैकी एक जमात. तिने पौरोहित्यकर्मात प्रावीण्य मिळवून पिढ्यान्‌पिढ्या हा एकच व्यवसाय केला होता. आझरबैजान प्रांतात यांच्या मोठ्या जमिनीही होत्या. मागी पुरोहितांचे दोन वर्ग होते. एक वर्ग गृहकृत्ये करणारा आणि दुसरा सार्वजनिक पूजा, यज्ञयाग आदी करणारा. इतर प्राचीन समाजांप्रमाणे खगोल, पंचांग व तत्सम प्रकारची कामे आणि काही प्रमाणात लेखनवाचन हे फक्त याच वर्गात चाले. पुरोहित वर्गाला धार्मिक कर्मकांडाखेरीज जे महत्त्वाचे कार्य करावे लागे, ते म्हणजे न्यायदानाचे कारण न्यायदानात धर्मनिर्णय मुख्य असे.

कला : स्यूसा, पर्सेपलिस, नक्श-इ-रुस्तुम, बेहिस्तून इ. ठिकाणी इराणी कलेचे अवशेष पहावयास सापडतात. या कलेत वास्तुशिल्पाला प्राधान्य असून चित्रकाम आणि मूर्तिकला ही केवळ तदानुषंगिक होती. ॲकिमेनियन कला ही ॲसिरिया, बॅबिलोनिया व ईजिप्त येथील कलाप्रवाहांच्या संगमातूनच जन्मली. या कलासंगमात इराणचा वाटा किती असा प्रश्न निर्माण होतो. दोन बाबतींत खास इराणी वैशिष्ट्य दिसते. कलाप्रकारांच्या आविष्कारातील लालित्य आणि भव्यता. अरब आक्रमकांनी बर्‍याच इमारतींचा विध्वंस केला. त्यांच्या तावडीतून सुटलेल्या वास्तूंचा व नगरांचा भूकंपाने विध्वंस केला. शिल्पक्षेत्रात आपल्या पराक्रमाची वर्णने दाखविणार्‍या राजांचे पुतळे मुख्य ठरतात. बाकी खुद्द इराणमधील वास्तू व शिल्प यांवर आरंभी ग्रीकांश आणि त्यानंतर बायझंटिन कलाप्रवाहाची छाप दिसते. चित्रकामात काही चिनी वैशिष्ट्येही दिसतात. विविध कलाप्रवाहांचा उत्कृष्ट संगम हाच या इराणी कलेचा विशेष सांगता येईल. (चित्रपत्र ४६).

पहा : अवेस्ता; इराण; इराणी कला; डरायस; सायरस.

संदर्भ : 1. Arberry, A. J. Legacy of Persia, Oxford, 1953.

2. Frye, R. N. The Heritage of Persia, London, 1962.

3. Ghirshman, R. Iran from the Earliest. Times to the Islamic Conquest, Baltimore, 1954.

4. Huart, Clement, Ancient Persia and Iranian Civilization, London, 1927.

5. Sykes, Sir Percy, A History Of Persia, 2 Vols., London, 1958.

माटे, म. श्री.

पर्सेपलिस येथील शतस्तंभी सभागृहाची शिल्पांकित द्वारशाखा
कोरीव लेख व शिकारचित्र असलेली डरायसची दंडगोलाकृती मुद्रा, इ.स.पू. ५ वे शतक.
चांदीचे मद्यपात्र, इ.स.पू. ५ थे-४ वे शतक.
सिंहाकृती सुवर्णचषक, इ.स.पू. ५ वे शतक.
पर्सेपलिस येथील श्रोतृगृहाचा शिल्पांकित जिना, इ.स.पू. ६ वे-५ वे शतक.