अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध: उत्तर अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्घ १७७५ पासून १७८३ पर्यंत केलेले यशस्वी बंड. त्याला ‘स्वातंत्र्ययुद्ध’ किंवा ‘अमेरिकन क्रांती’ म्हणतात.

 

सतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्यांत इंग्‍लंडच्या तेरा वसाहती होत्या. या तेरा वसाहतींत स्थानिक वन्य जमाती, निग्रो गुलाम, इंग्रज, आयरिश, जर्मन, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज आदी यूरोपीय असा संकीर्ण समाज नांदू लागला. यांत बहुसंख्य इंग्रज होते आणि त्यांच्या भाषेला सर्वमान्यता लाभली होती. बहुतेक वसाहतींचा कारभार ब्रिटिश शासनाने नियुक्त केलेला गव्हर्नर स्थानिक प्रातिनिधिक संस्थांच्या सल्ल्याने चालवीत असे.

 

तथापि फ्रेंच वसाहतींचा घेरा सभोवताली असल्याने ब्रिटिश वसाहतवाल्यांत सतत असुरक्षितपणाची भावना असे. स्वसंरक्षणासाठी मायदेशाच्या सैन्याची आवश्यकता असल्याने, मायदेशाने घातलेली अनेक राजकीय व आर्थिक बंधने त्यांना निमूटपणे मान्य करावी लागत. वसाहती म्हणजे स्वस्त व मुबलक कच्चा माल पुरविणारे, तसेच हव्या त्या चढ्या दराने पक्का माल घेणारे देश, असे इंग्‍लंडचे सर्वसाधारण धोरण असे. वसाहतींचा वाहतूक-व्यापार इंग्‍लंडच्याच बोटींतून (वसाहतींना स्वतंत्र बोटी नसल्याने) चालला पाहिजे, वसाहतींनी कच्चा माल इंग्‍लंडलाच विकला पाहिजे, इंग्‍लंडचाच पक्का माल विकत घेतला पाहिजे, स्वतः पक्का माल तयार करता कामा नये, कोणत्याही देशांतून माल आयात केल्यास तो प्रथम इंग्‍लंडमध्ये उतरवून मग वसाहतींत जावा इ. नौकानयन-कायद्यांतील निर्बंधांमुळे इंग्रज व्यापाऱ्‍यांचा अमाप फायदा, तर वसाहतवाल्यांची कुचंबणा होई. ह्यामुळे वसाहतींचा औद्योगिक विकास अर्थातच अशक्य झाला होता.

 

वसाहतींतील इंग्रज इंग्‍लंडमधील इंग्रजांपेक्षा कनिष्ठ आहेत, असा सार्वत्रिक समज होता. याचे वसाहतवाल्यांना साहजिकच वैषम्य वाटे पण मायदेशाकडून मिळणाऱ्‍या संरक्षणाच्या मोबदल्यात सर्व निर्बंध व विषमता मान्य करणेच त्यांना भाग होते. तरीसुद्धा कागदोपत्री असलेल्या निर्बंधांची वसाहतवाले फारशी फिकीर करीत नसत. पण चोरट्या प्रकारांना पायबंद घालून, उत्पन्नातील गळती थांबविण्यासाठी ⇨प्तवार्षिक युद्धाच्या (१७५६–६३) अखेरीस मायदेशींच्या शास्त्यांनी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली. चोरट्या व्यापारातील नफा घटताच वसाहतवाल्यांनी मायदेशाच्या शोषक नियमांविरुद्ध आंदोलन सुरू केले. साहजिकच सप्तवार्षिक युद्धाच्या भरतवाक्यानंतर लवकरच स्वातंत्र्ययुद्धाची नांदी म्हटली गेली.

 

पॅरिस-तहाने (१७८३) वसाहतीच्या पश्चिमेकडील विस्तीर्ण मुलूख इंग्‍लंडला मिळाला. याचा पद्धतशीर विकास व्हावा म्हणून यात वसाहती करण्याबद्दल अनेक नियम करण्यात आले. तेव्हा ‘अमेरिकेत स्थायिक झालेल्या वसाहतवाल्यांना मज्‍जाव करून आपल्या मर्जीतल्या लोकांना ह्या जमिनी दिल्या जातील व पुढे हे उपरे त्या भरघोस किंमतीला विकतील’, या संशयाने वसाहतवाल्यांतील मायदेशाविषयीचा अविश्वास बळावला. वसाहतींच्या रक्षणाचा बंदोबस्त करण्यासाठी व सप्तवार्षिक युद्धाचा खर्च भरून काढण्यासाठी ग्रेनव्हिल मंत्रिमंडळाने १७६५ मध्ये स्टँप ॲक्ट संमत करून कायदेशीर व्यवहारातले दस्तऐवज, वृत्तपत्रे वगैरेंना तिकिटे लावलीच पाहिजेत, असा नियम केला. प्रतिनिधींनी हा कायदा संमत केला नसल्यामुळे वसाहतवाल्यांनी त्याला संघटितपणे विरोध केला. या कायद्याने जारी झालेल्या तिकिटांचा नाश करणे, तिकिटविक्रेत्यांना त्यागपत्र द्यावयास लावणे इ. प्रकार सुरू होऊन खुद्द गव्हर्नरांना स्वतःच्या सुरक्षितपणाबद्दल धास्ती वाटण्याइतके उग्र आंदोलन वसाहतींत सुरू झाले. परिणामतः स्टँप ॲक्ट रद्द करण्यात आला, पण वसाहतींत कर लागू करण्याचा पार्लमेंटचा अधिकार वादातीत असल्याचे तत्व कायद्याच्या रूपाने जाहीर करण्यात आले त्यामुळे वादाचे कारण काही नष्ट झाले नाही. पुढे १७६७ मध्ये चहा, काच, कागद, रंग इत्यादींवर कर बसविण्यात आले. तेव्हा या वस्तूंवरील बहिष्काराची चळवळ बॉस्टनहून चौफेर पसरली. चहाव्यतिरिक्त इतर वस्तूंवरील कर रद्द झाले, तरी चळवळ मंदावली नाही. उलट वसाहतवाले जास्तच चिडले व १७७३ च्या डिसेंबरात बॉस्टन बंदरात नांगरून पडलेल्या जहाजांतील चहाची खोकी समुद्रात फेकण्याचा प्रसिद्ध प्रकार झाला. बॉस्टनमधील बंडाळी मोडून काढण्यासाठी ब्रिटिश संसदेने १७७४ च्या मेमध्ये कायदा करून बॉस्टन उजाड करण्याचे ठरविले. याच्या निषेधार्थ वसाहतींतील कित्येक शहरांनी एक दिवस उपोषण करून सामुदायिक प्रार्थना केल्या.

 

वसाहतींतल्या गव्हर्नरांचे पगार तेथल्या बिथरलेल्या लोकप्रतिनिधींच्या लहरीवर अवलंबून राहू नयेत, म्हणून हे पगार परभारे ब्रिटिश तिजोरीतून देण्याचा पायंडा संसदेने पाडला. जनरल गेज या लष्करी अधिकाऱ्‍याची मॅसॅचूसेट्‌सचा गव्हर्नर म्हणून नेमणूक केली व ब्रिटनमधून येणाऱ्‍या लष्करी जवानांची सोय वसाहतींतील कुटुंबवत्सल लोकांनी केली पाहिजे, अशी सक्ती करण्यात आली. या प्रकारांनी वसाहतींतला क्षोभ आणखी भडकला. १७७४ च्या सप्‍टेंबरात बारा वसाहतींतले पुढारी एकत्र जमले व त्यांनी ‘काँटिनेंटल काँग्रेस’ची स्थापना केली. सगळ्या वसाहतींचे संघराज्य बनवावे, मायदेशाशी नाममात्र निष्ठेने गुंतलेले हे संघराज्य व्यवहारात स्वतंत्र असावे, असा विचार गॅलोवे या पुढाऱ्‍याने काँग्रेससमोर मांडला. पण हा नेमस्त विचार बहुसंख्य सभासदांना पटला नाही. ब्रिटनबरोबरचे सारे व्यवहार बंद पाडण्याचे ठरवून, तसेच घरभेद्यांच्या बंदोबस्तासाठी जालीम उपाय मुक्रर करून, पुढील मे महिन्यात काँग्रेसची बैठक घेण्याचा निर्धार करून हे अधिवेशन समाप्त झाले. यापुढे युद्ध अटळ आहे, या जाणिवेने दोन्ही पक्ष वागू लागले.

 

मॅसॅचूसेट्सची गुर्मी जिरविण्याच्या निर्धाराने ब्रिटिश सरकारची पावले पडू लागली. वसाहतवाल्यांनी शस्त्रास्त्रांचे साठे करण्याला व सैन्यभरतीला सुरुवात केली. कंकॉर्ड गावी वसाहतवाल्यांनी जमविलेला शस्त्रसाठा हस्तगत करण्यासाठी जनरल टॉमस गेजने बॉस्टनहून सातशे सैनिकांची पलटण रवाना केली, पण वसाहतवाल्यांनी या पलटणीला पिटाळून लावले. जूनच्या मध्यास बंकरहिलच्या लढ्यातही ब्रिटिश सैनिकांची कत्तल करण्यात आली. टिंकडरोगा हे मोक्याचे ठिकाणही बंडखोरांनी सर केले. याच सुमारास काँटिनेंटल काँग्रेसने ⇨जॉर्ज वॉशिंग्टनची सरसेनापती म्हणून नियुक्ती केली व अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले.

 

अनेक शतकांचा इंग्‍लंडला अनुभव असूनही हे युद्ध जड गेले. आपल्याच बांधवांविरुद्ध लढण्याची जिद्द सैन्यात विशेष नव्हती. वसाहतवाल्यांच्या अडचणी तर पर्वतप्राय होत्या. पैसा उभारणे, सैनिक गोळा करणे, साहित्य जमविणे इ. गोष्टींसाठी काँटिनेंटल काँग्रेसला स्वतःला पूर्ण स्वतंत्र समजणाऱ्या वसाहतींवर अवलंबून राहावे लागे. वसाहतींच्या स्वातंत्र्याविरुद्ध लढणारेही पुष्कळच नागरिक होते. काही ध्येयनिष्ठ पुढाऱ्‍यांचे नेतृत्व, आपला लढा न्यायाचा असल्याची सामान्यांची समजूत, जॉर्ज वॉशिंग्टनसारखा चारित्र्यवान, समतोल बुद्धीचा, चिकाटीचा सरसेनापती व परदेशांची मदत हे वसाहतवाल्यांचे प्रमुख भांडवल होते.

 

टिंकडरोगानंतर अमेरिकन सैन्याने माँट्रिऑल काबीज करून क्वेबेकला वेढा घातला. परंतु क्वेबेक सर झाले नाही. त्यानंतर अमेरिकन सेनेने डॉर्चेस्टर हाइट्स, प्रिन्स्टन, ट्रेंटन इ. ठिकाणी विजय मिळविले, तर बँडीवाइन, जर्मनटाउन, फिलाडेल्फिया वगैरे महत्वाचे भाग सोडले. सर्व बाजूंनी निराशेची परिस्थिती निर्माण झाली असता वॉशिंग्टनला दैवाने हात दिला. इंग्रज सेनानी बर्‌गाॅइन न्यूयॉर्क संस्थानाच्या उत्तर भागात धुमाकूळ घालून अमेरिकनांच्या युद्धक्षेत्रात मधोमध पाचर ठोकून त्यांना धुळीस मिळविण्याचे मनसुबे रचत होता. पण गेट्स या अमेरिकन सेनापतीने त्याच्यावरच डाव उलटविल्याने सॅराटोगा येथे बर्‌गॉइनला ऑक्टोबर १७७७ मध्ये संपूर्ण शरणागती पतकरावी लागली. गेट्सच्या या विजयाने युद्धाचे स्वरूप पालटले. फ्रान्स-स्पेनसारखी राष्ट्रे अमेरिकेच्या बाजूने युद्धात सामील झाली व स्वातंत्र्ययुद्धाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा लाभून अमेरिकेच्या स्वातंत्र्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. तेव्हा अमेरिकेची संस्थाने स्वतंत्र व स्वायत्त आहेत, असा रिचर्ड हेन्‍री लीचा ठराव काँग्रेसने संमत केला व ४ जुलै १७७६ रोजी ⇨अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा  सर्वत्र फडकला.

सॅराटोगाच्या विजयानंतर फ्रान्सने अमेरिकेशी तह करून ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले. फेब्रुवारी १७७८ मध्ये स्पेननेही फ्रान्सचे अनुकरण केले. सैन्याची रसद रणक्षेत्रापर्यंत निर्वेधपणे पोहोचणे त्यांच्या आरमारामुळे ब्रिटिशांना मुष्किल झाले. सु. सहा हजार फ्रेंच सैनिक व लाफायेतसारखे अधिकारी वॉशिंग्टनच्या मदतीस आल्याने अमेरिकेची बाजू बळकट झाली. दक्षिणेकडील वसाहतींतून विजय सुलभतेने मिळेल असे वाटून सॅराटोगानंतर क्लिंटन-कॉर्नवॉलिससारखे ब्रिटिश सेनानी दक्षिणेकडे वळले. पण स्वातंत्र्यवादी लोकांच्या कडव्या प्रतिकारामुळे त्यांचे काम बिकट होऊन बसले. शेवटी दक्षिण सोडून कॉर्नवॉलिस न्यूयॉर्ककडे वळला, पण वॉशिंग्टनने त्याला यॉर्कटाउनमध्ये कोंडून धरले व द ग्रासच्या हाताखाली फ्रेंच नाविक दलाने कॉर्नवॉलिसचा जलमार्ग अडविला व तो पुरता कैचीत सापडला. अखेर १९ ऑक्टोबर १७८१ रोजी कॉर्नवॉलिसने शरणागती पतकरली. तथापि दोन वर्षे युद्ध रेंगाळले. पुढे १७८३ मध्ये पॅरिसच्या तहाने स्वातंत्र्ययुद्धाची समाप्ती झाली. तहाच्या वाटाघाटीत  ⇨बेंजामिन फ्रँक्लिन  व जॉन ॲडम्स यांनी अमेरिकन राष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

 

सबंध कॅनडा अमेरिकेला मिळावा ही अमेरिकनांची मागणी मान्य झाली नाही. पण १७७४ मध्ये कॅनडात सामील केलेल्या मुलुखावरील सत्ता इंग्‍लंडने सोडली. पश्चिमेकडे मिसिसिपी नदी, उत्तरेकडील सुपीरिअर वगैरे सरोवरांच्या परिसरातील प्रांत अशा सरहद्दी ठरून ओहायओच्या खोऱ्‍यासकट सगळा मुलूख अमेरिकेकडे गेला. फ्लॉरिडा स्पेनला मिळाला. अमेरिकन नागरिकांच्या इंग्‍लंडमधल्या सावकारांचे युद्धपूर्व-काळातले कर्ज फेडण्याची व युद्धकाळात राजनिष्ठ अमेरिकनांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी अमेरिकेने घेतली. निर्भेळ लोकशाही, समानता वगैरे तत्त्वांची चर्चा यूरोपातले राज्यशास्त्रधुरंधर वारंवार करीत या तत्त्वांचा आधार घेऊन व इंग्‍लंडचा युद्धात पाडाव करून अमेरिका राष्ट्र अस्तित्वात आल्याबरोबर या तत्त्वांना एक वेगळीच प्रतिष्ठा लाभली. अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी व लोकशाहीसाठी लढणाऱ्‍या फ्रेंच सैनिकांना आपल्या देशातील सरंजामी व अनिर्बंध राजेशाही मान्य होणे शक्य नव्हते. साहजिकच अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाने फ्रेंच राज्यक्रांती अपरिहार्य होऊन तेथील पुराणी राजसत्ता व सरंजामी समाजरचना संपुष्टात आली. एकोणिसाव्या शतकात यूरोपातील अनेक देशांत राजसत्तेचे उच्चाटन झाले ते काही अंशी अमेरिकेतील लोकशाहीच्या यशामुळेच, असे म्हणता येईल. अमेरिकेच्या यशामुळे इंग्‍लंडला आपल्या वसाहतविषयक धोरणात आमूलाग्र बदल करावा लागून, ब्रिटिश राष्ट्रकुलाचा पाया घातला गेला व जागतिक राजकारणात नवे विचारप्रवाह सुरू झाले.

करंदीकर, शि. ल.