भोसले, रघूजी : (? १६९८-१४ फेब्रुवारी १७५५). नागपूरकर भोसले घराण्यातील एक शूर व मुत्सद्दीP व्यक्ती. इतिहासात हा पहिला रघूजी या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे घराणे मूळचे पुणे प्रांतातील हिंगणीचे. त्याचा जन्म पांडववाडी (वाई-सातारा जिल्हा) येथे झाला असावा. त्याचे वडील बिंबाजी त्याच्या लहानपणीच वारले. त्याचे संगोपन आई काशीबाई व आजी बयाबायी यांनी केले असे दिसते. वयाच्या बाराव्या वर्षी कान्होजी भोसले (चुलता) याने त्यास सांभाळण्यासाठी वऱ्हाडात नेले. तेथून तो शाहू छत्रपतींच्या चाकरीत साताऱ्यास आला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर इ. स. १७०७ मध्ये शाहू मोगली कैदेतून सुटून दक्षिणेच्या मार्गावर असता खानदेशात आजा परसोजी हा सैन्यासह शाहूला येऊन मिळाला. शाहूला छत्रपतिपद मिळवून देण्यात त्याची मोठी मदत झाली. त्याने ताराबाईऐवजी छत्रपती शाहूचा पक्ष धरला. परसोजी १७०९ साली मृत्यू पावला. त्याच्या पश्चात त्याचा मुलगा कान्होजी याजकडे वारसाहक्क व सेनासाहेबसुभा हे पद गेले पण शाहू व पहिले बाजीराव पेशवे यांच्याशी कान्होजी फटकून वागू लागला त्यामुळे शाहूने रघूजी या पुतण्यास कान्होजीवर पाठविले. त्याने कान्होजीचा वणी येथे पराभव बकरून त्यास पकडून साताऱ्यास आणले (१७३०) आणि शाहूने त्यास सातारच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. शाहूने त्याच्या जागी रघूजीची नेमणूक केली आणि त्यास कोरेगाव तालुक्यातील देऊर हे गाव मोकासा म्हणून दिले. त्यामुळे पुढे त्यांना देऊरकर म्हणूनही संबोधण्यात येऊ लागले. याशिवाय कान्होजीचा सेनासाहेबसुभा हा किताब व वऱ्हाड प्रांताचा मोकासा रघूजीस दिला. त्याची नेमणूक वऱ्हाडाच्या सुभ्यावर केली. वऱ्हाडात भाम येथे आपले स्थान स्थिर झाल्यावर त्याने देवगढ, गढा-मंडले, चांदा व छत्तीसगड या प्रदेशांतील गोंड राज्यांकडे लक्ष दिले. या सुमारास देवगढचा चांद सुलतान मरण पावला (१७३८). त्याचा मुलगा मीर बहादूर यास त्याचा सावत्र भाऊ वलीशाह याने ठार मारले. तेव्हा राणी रतनकुंवर या विघवेने रघूजीची मदत मागितली आणि अकबर व बुऱ्हान या दोन लहान मुलांना वारसाहक्क मिळावा, म्हणन खटपट सुरू केली. रघूजीने तिला सर्वतोपरी मदत केली आणि वलीशाहचा पराभव केला. रतनकुंवरने रघूजीस तिसरा मुलगा मानून आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा त्यास दिला. त्याने सबंध गोंडवन जिंकून नागपूर येथे आपली राजधानी स्थापन केली. याच सुमारास शाहूने त्यास तंजावरच्या भोसल्यास मदत करण्यासाठी दक्षिणकडे अक्कलकोटचा मूळ पुरुष फत्तेसिंह याच्यासह स्वारीवर पाठविले. रघूजीने तिरुचिरापल्लीपर्यंतचा प्रदेश जिंकून तसेच अर्काटचा सत्ताधीश नवाब चंद्रासाहेब याची त्रिचनापल्ली घेऊन त्यास कैद करून साताऱ्यास पाठवून दिले व शाहूचा मानलेला मुलगा फत्तेसिंह भोसले याजकडे तिकडील कारभार सोपवून तो साताऱ्यास आला. नंतर रघूजीने भास्करराम कोल्हटकर या आपल्या सेनापतीस अनेकदा बंगालवर स्वाऱ्या करण्यासाठी धाडले. इ. स. १७४० ते १७५१ या बारा वर्पांत पराक्रमाच्या जोरावर त्याने अपूर्व कर्तृत्व दाखविले बंगालवर मुर्शिदाबादेपर्यंत अनेक स्वाऱ्या करून बंगालचा पश्चिम भाग व ओरिसा हे प्रदेश जिंकले. तेथील मोगली सुभेदार अलीवर्दीखान नवाबाकडून खंडणी गोळी केली आणि त्याच्याशी तह केला (१७५१). त्याचा अंमल वऱ्हाडपासून ओरिसापर्यंत आणि गढा-मंडलेपासून चांद्यापर्यंत पसरला होता. छ. शाहूचा पेशवा पहिला बाजीराव आणि रघूजी यांचे संबंध फारसे सलोख्याचे नव्हते. पुढे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशव्यांचा तर पेशवेपदाच्या वेळी तो प्रतिस्पर्धीच बनल्याचा समज पसरला होता. छत्रपतींनी नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात उभयपक्षी होणारा हस्तक्षेप, हे पेशवा-रघूजी यांच्यातील तणावाचे प्रमुख कारण होते.

नानासाहेब पेशव्याने रघूजीच्या वाढत्या सत्तेस पायबंद घालण्यासाठी पातशाहा आणि नवाब यांच्याशी संधान बांधून उत्तरेकडे स्वारी केली. पेशवे व भोसले यांचे मुळातच सख्य नव्हते. छ. शाहूच्या हायतीत त्यांच्यातील अंतर्वैर दबून राहिले. या दोन प्रबळ सेनानींमधील संघर्ष त्याने काही काळ मिटविला तथापि रघूजीचा चढता पराक्रम पाहून नवाबही शरण आला व त्याने तह करून बंगाल-बिहार-ओरिसामधील मराठ्यांचे चौथ-सरदेशमुखीचे हक्क मान्य केले. यामुळे साहाजिकच रघूजीचे मध्य-पूर्व भारतात प्रभुत्व प्रस्थापित झाले. मराठे लुटारू आहेत, ही भावना उत्तर भारतात प्रसृत होण्यास शिंदे-होळकरांप्रमाणे रघूजीच्या बंगाल-ओरिसातील स्वाऱ्या काही प्रमाणात कारणीभूत झाल्या.

रघूजी धाडसी, महत्त्वाकांक्षी आणि शूर होता. शाहूची त्याच्यावर विशेष मर्जी होती. शाहूने आपली चुलत मेहुणी सुकाबाई त्यास देऊन संबंध अधिक दृढतर केले होते. त्यामुळे शाहूच्या मृत्यूपूर्वी आपला मुलगा छत्रपतींच्या गादीवर दत्तक द्यावा, असे त्यास वाटत होते पण शाहूने सारासार विचार करून हा प्रश्न अत्यंत कौशल्याने हाताळला आणि रघूजी व नानासाहेब या दोन बलवत्तर व्यक्तींना धूर्तपणे अलग ठेवले. बंगालमधील स्वाऱ्यानंतर रघूजीच्या हातून विशेष कामगिरी झाली नाही. पोटाच्या विकाराने तो मृत्यू पावला. रघूजीस दोन पत्न्या होत्या. त्यांपासून जानोजी, साबाजी, मुधोजी आणि बिंबाजी असे चार मुलगे झाले. त्याच्या इच्छेनुरूप जानोजीकडे सेनासाहेबसुभा हे पद गेले पण नंतर रघूजीच्या मुलांमध्ये भाऊबंदकी माजून नागपुरकरांची सत्ता खिळखिळी होत गेली.

पहा : भोसले घराणे.

संदर्भ : १. काळे, यादव नागपूरकर भोसल्यांचा इतिहास, नागपूर. १९७९.

२. दळवी, गोपाळ दाजीबा, रघूजी राजे भोसले यांचे चरित्र, नागपूर, १९३१.

दीक्षित, म. श्री.