वुड्रो विल्सन

विल्सन, वुड्रो: (२८डिसेंबर १८५६–३ फेब्रुवारी १९२४). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा अठ्ठाविसावा राष्ट्राध्यक्ष (कार. १९१३–१९२१) व जागतिक शांततेचा पुरस्कर्ता. पूर्ण नाव टॉमस वुड्रो विल्सन. त्याचा जन्म स्टॉन्टन (व्हर्जिनिया) येथे प्रेसबिटेरियन चर्च पंथाची धार्मिक परंपरा असलेल्या कुटुंबात जेनेट व जोसेफ रगल्झ या दांपत्यापोटी झाला. त्याचे वडील आयर्लंडमधील, तर आई जेनेट इंग्लंडमधील होती. वडिलांच्या व्यवसायानिमित्त स्थलांतरामुळे त्याचा दक्षिणेकडील वसाहतींशी संबंध आला. अशक्त प्रकृतीमुळे त्याचा अध्ययनकाल लांबला. प्रिन्स्टन विद्यापीठातून(कॅरोलायना) त्याने पदवी घेतली (१८७९) आणि व्हर्जिनिया विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला व नंतर थोडे दिवस वकिली केली पण तीत त्याचा फारसा जम बसला नाही. अखेर त्याने प्राध्यापक म्हणून नोकरी पतकरली. प्रिन्स्टन विद्यापीठाशी त्याचा वीस वर्षे संबंध होता. या काळात त्याने इंटरनॅशनल रिव्ह्यूमधून राज्यशास्त्रावर लेखन केले. त्याचे काँग्रेशनल गव्हर्न्मेंट (१८८५) हे संघीय शासनाची चिकित्सा करणारे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि पुढील वर्षी त्याला जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी दिली (१८८६). त्यामुळे राज्यशास्त्राचा अभ्यासक आणि ग्रंथकार म्हणून त्याला मान्यता मिळाली. त्याने १८८९ मध्ये द स्टेट : एलिमेंट्स ऑफ हिस्टॉरिकल अँड प्रॅक्टिकल पॉलिटिक्स हे पुस्तक लिहिले. १८८५ मध्ये एलन लूसी अक्सॉन या युवतीबरोबर त्याचा विवाह झाला.

प्राध्यापकीय कारकीर्दीत त्याने ब्रिन मार कॉलेजात इतिहास व राजकीय अर्थव्यवस्था या विषयांचे अध्यापन केले (१८८५) तीन वर्षांनंतर मिडलटाउन (कनेक्टिकट) येथील वेस्लेयन यूनिव्हर्सिटीमध्ये काही काळ शिकवले आणि १८९० मध्ये प्रिस्टन विद्यापीठात न्यायसास्त्र व राजकीय अर्थव्यवस्था या विषयांचा प्राध्यापक म्हणून पुढे बारा वर्षे त्याने अध्यापन केले. प्रिन्स्टन विद्यापीठाचा तो अध्यक्षही झाला. (१९०२). या काळात त्याने विद्यार्थी व अध्यापक यांच्यात जवळीक निर्माण करण्याच्या दृष्टीने एक विशिष्ट अध्यापकीय पद्धती (प्रिसेप्टोरिअल सिस्टिम) प्रचारात आणली. शिक्षणक्षेत्रात लोकशाही असावी, म्हणून तो प्रयत्नशील होता. प्रिन्स्टन येथील वास्तव्य़ात प्राध्यापक असताना त्याने जॉर्ज वॉशिंग्टन (१८९७) व अ हिस्टरी ऑफ द अमेरिकन पीपल (१९०२) ही पुस्तके लिहिली. त्यामुळे विद्यापीठीय क्षेत्रात त्याचा नावलोकिक पसरला. पुढे त्याने कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्न्मेंट इन द युनायटेड स्टेट्स (१९०८). द न्यू फ्रीडम (१९१३) यांसारखी महत्त्वाची पुस्तके लिहिली.

डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे त्याचे नाव अध्यक्षपदासाठी १९०६ नध्ये सुचविण्यात आले परंतु ती निवडणूक त्याने लढविली नाही. मात्र तो न्यू जर्सीचा गव्हर्नर म्हणून निवडला गेला (१९१०). त्याने केलेल्या सुधारणांमुळे डेमॉक्रॅटिक पक्षाने राष्ट्रध्यक्षपदासाठी त्याचा उमेदवार म्हणून पुन्हा पुरस्कार केला व तो निवडून आला (१९१२). त्याच्या यशामुळे रिपब्लिकन पक्षाची सत्ताक्षेत्रातील मक्तेदारी संपुष्टात आली. डेमॉक्रॅटिक पक्ष फार काळ सत्तेपासून दूर राहिल्यामुळे, कार्यक्षम सहकारी निवडून कारभार चालविणे विल्सनला आरंभी अवघड झाले. जीवनावश्यक वस्तूंवरील कर रद्द करून विल्सनने त्या उपलब्ध केल्या. उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी त्याने प्राप्तिकराची आकारणी पद्धत सुधारली. शासकीय बँकेचा नफा ग्रामीण भागांतील लोकांनाही मिळावा व बँकेचा पैसा सट्टेबाजीत जाऊ नये, म्हणून विल्सनने कायदा केला. कामगारांचे जीवन सुखी होऊन त्यांची प्रतिष्ठा वाढावी, यासाठी विल्सनने काही योजना आखल्या.

यूरोपमध्ये १९१४ मध्ये पहिले महायुद्ध पेटले. सुरुवातीस त्याने तटस्थतेचे धोरण स्वीकारले. युद्धातून अमेरिकेला तारणारा अशी त्याची ख्याती झाली. तो पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आला (१९१६). तत्पूर्वी त्याची पत्नी निधन पावली आणि त्याने एडिथ बोलिंग गॅल्ट या महिलेबरोबर दुसरे लग्न केले (१९१५). महायुद्धाच्या आरंभी अमेरिकेची लष्करी तयारी फारशी नव्हती. यूरोपमधील युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी विल्सनला युद्धाची तयारी करावी लागली. या विषयावरील आपले विचार त्याने जानेवारी १९१७ मध्ये जाहीर केले. मेक्सिकोत जर्मनी अमेरिकेविरुद्ध कारस्थाने करीत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यूरोपमध्ये रशियातील झारशाही संपुष्टात येऊन तिथे राज्यक्रांती झाली. परिणामतः विल्सनने महायुद्धात अमेरिका सामील झाल्याची घोषणा केली (एप्रिल १९१७).

विल्सनने जागतिक शांततेसाठी प्रयत्न केले. त्याने अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात १९१८ मध्ये चौदा कलमी शांतता कार्यक्रम सादर केला. त्यांतील अखेरच्या कलमात राष्ट्रसंघाच्या निर्मितीची कल्पना त्याने मांडली. ८ जानेवारी १९१८ रोजी विल्सनने अमेरिकेचे धोरण जाहीर केले. ‘विल्सनचे चौदा मुद्दे’ (फोर्टीन पॉइंट्‌स) या नावाने हे धोरण प्रसिद्ध झाले. त्यामधील स्वयंनिर्णयाच्या तत्वाला पुढे महत्व प्राप्त झाले. राष्ट्रसंघाच्या स्थापनेत विल्सनने पुढाकार घेतला असला, तरी खुद्द अमेरिका मात्र सिनेटच्या नकारात्मक धोरणामुळे राष्ट्रसंघाची सभासद होऊ शकली नाही. विल्सनच्या वेळकाढू धोरणामुळे त्याची नंतर लोकप्रियता कमी झाली. व्हर्सायच्या तहात जर्मनीची मानहानी झाल्याने ती दुखवली गेली. परिणामतः जर्मनी असंतुष्ट राहिली. धूर्त यूरोपीय मुत्सद्यांनी  विल्सनच्या चौदा कलमी ध्येयधोरणांचा अल्पावधीतच अनादर केला. विल्सनने आपल्या धोरणाचा प्रसार-प्रचार करण्यासाठी सदिच्छा दौरा आखला. या दौऱ्यातच त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि तो विकलांग झाला. अध्यक्षीय कारकीर्दीतले उर्वरित वर्ष-दीड वर्ष त्याने रुग्णशय्येवरच काढले. तो वॉशिंग्टन येथे मरण पावला.

विल्सनच्या जीवनात अनेक चढ-उतार झाले. त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात जरी अपयश आले, तरी त्याने देशांतर्गत स्थितीत अनेक मौलिक सुधारणा केल्या. विद्यापीठाचा अध्यक्ष, एक विचारवंत आणि राजकीय विधिज्ञ म्हणून त्याने पूर्वायुष्यात नावलौकिक मिळविला. डेमॉक्रॅटिक पक्षाची लोकमानसातून पुसून गेलेली प्रतिष्ठा त्याने आपल्या अध्यक्षीय निवडणुकीत पुन्हा प्रस्थापित केली. त्याच्या कारकीर्दीत देशात मध्यवर्ती बँकिंग पद्धतीस प्रारंभ झाला (१९१३) आणि पहिला दूरध्वनिसंपर्क न्यूयॉर्क व सॅन फ्रॅन्सिको यांदरम्यान १९१५ मध्ये सुरू झाला. तसेच अंतर्गत विमानसेवा सुरू होऊन प्रथमच व्यापारी तत्वावर आकाशवाणी केंद्रे अस्तित्वात आली. अमेरिकन शासनाने डेन्मार्ककडून व्हर्जिनिया बेटांची खरेदी केली (१९१७) आणि अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना जोडणाऱ्या पनामा कालव्याचे उद्‌घाटन १२ जुलै १९२० रोजी करण्यात आले. विल्सनच्या कारकीर्दीत स्त्रियांना मताधिकार, सिनेटरची प्रत्यक्ष निवडणूक तसेच मद्यविक्री निर्बंध या तीन महत्वाच्या विषयांवर घटना दुरुस्ती करण्यात आल्या. राष्ट्रसंघाच्या स्थापनेतील त्याच्या कार्याचा उचित गौरव त्याला १९१९ चे शांतता नोबेल पारितोषिक देऊन करण्यात आला.

पहा : राष्ट्रसंघ. 

संदर्भ : 1. Link, Arthur S. Ed. The Papers of Woodraw Wilson, 5 Vols., 1885–1888, Princeton,1968.

           2. Mulder, John M. Woodrow Willson : The Years of Preparation, Princeton, 1978.

           3. Winstein, Edwin A. Woodrow Wilson : A Medical and Psychological Bilgraphy,Princeton, 1981.

देशपांडे, सु. र.