रोमन संस्कृति : यूरोप खंडात वृद्धिंगत पावलेली एक विकसित व वैभवशाली संस्कृती. आधुनिक यूरोपीय संस्कृतींचा मूळ स्त्रोत असण्याचा ज्या विविध संस्कृतींना मान मिळतो, त्यांत ग्रीक व रोमन संस्कृती प्रधान आहेत. यात रोमची खास अशी देणगी म्हणजे सर्वगामी शासनसंघटना, तिला आधारभूत अशी विस्तृत विधिसंहिता आणि अर्थव्यवस्था होय. रोमन संस्कृतीचे स्थूलमानाने तीन कालखंड कल्पिण्यात येतात : एक, राजेशाहीचा काळ (इ. स. पू. ७५३-५०९), दोन, प्रजासत्ताकाचा काळ (इ. स. पू. ५०९ – इ. स. पू. ३१) आणि तीन, सम्राटांचा काळ (इ. स. पू. ३१ ते इ. स. ४७६).

रोमन या नावाने ओळ्खल्या जाणाऱ्या या सत्तेचे आणि संस्कृतीचे नेतृत्व रोम नगराकडेच होते परंतु हा विस्तार रोमला सबंध इटली देशाच्या बळावरच करता आला. हा देश (द्वीपकल्प) बुटाच्या आकाराचा असून त्याचे क्षेत्रफळ ३,०१,१९५ चौ.किमी. आहे. उत्तरेकडे आल्प्स, त्याच्या दक्षिणेस पो नदीचे खोरे आणि त्याच्याही दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पाठीच्या कण्यासारखी पसरलेली ॲपेनाइन ही पर्वतश्रेणी आणि त्याच्या दोन्ही बाजूंस किनारपट्ट्या असे भौगोलिक दृष्ट्या इटलीचे तीन स्वाभाविक विभाग पडतात. ॲपेनाइन पर्वतामुळे उत्तर इटली आणि दक्षिण इटली असे विभाजन झाले आहे. इटलीचा पश्चिम किनारा वसाहतींना व नाविक व्यापाराला अनुकूल ठरला. पश्चिम किनाऱ्याला लागून ॲपेनाइनच्या पश्चिमेला असलेल्या सलग प्रदेशाचे प्राचीन काळापासून तीन भाग पडले आहेत. पहिला सगळ्यात उत्तरेचा इट्रुरिया, मध्य भागी लेशियम (यातच रोम वसले आहे) आणि सर्वांत दक्षिणेला कँपेन्या. टायबर नदीच्या मुखापासून सु. ३० किमी. वर रोम हे शहर वसले आहे. जलमार्गाने अथवा भूमार्गाने व्यापार करण्यास सुलभ आणि सागरी व सैनिकी आक्रमणापासून त्यातल्यात्यात सुरक्षित असे रोमचे भौगोलिक स्थान आहे.

पुरातात्विक संशोधनामुळे रोमच्या प्राचीन समाजाच्या राहणीमानाची माहिती अभ्यासकांना उपलब्ध झालेली आहे. भूमध्य सागरीवंश या नावाने ज्ञात असलेल्या वंशाचे लोक उत्तर आफ्रिकेच्या बाजूने इ. स. पू. १०,००० च्या सुमारास इटलीत येऊन स्थायिक झाले. त्यांच्या येथील वसाहतींना इ. स. पू. तीन ते दोन हजारपर्यंत कसलाही धक्का लागला नाही. या सुमारास व येथून पुढे जवळजवळ हजार वर्षांपर्यंत मध्य यूरोपातून येणाऱ्या निरनिराळ्या जमाती येथे स्थिरावल्या. त्याचवेळी पूर्वेकडून येथे वेगवेगळ्या जमाती येऊ लागल्या. सांस्कृतिक दृष्ट्या या सर्व जमाती तद्देशीय लोकांपेक्षा पुढारलेल्या होत्या आणि त्यामुळे इटलीचे मोठमोठे भाग त्यांच्या आधिपत्याखाली गेले.

इ. स. पू. अकराव्या किंवा दहाव्या शतकात इट्रुस्कन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या इटलीत आल्या. टायबर नदीच्या खोऱ्यात ॲपेनाइन पर्वताच्या पायथ्यापर्यंतच्या प्रदेशात त्या स्थानिक झाल्या. त्यावरूनच या मुलखाला इट्रुरिया किंवा तस्कनी ही नावे मिळाली. यांच्याच आगेमागे फिनिशियन व्यापारी आणि वसाहतवाले यांची भूमध्य समुद्रात मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू झाली. इटली व रोम यांच्या इतिहासाला अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या त्यांच्या वस्त्या याच काळात झाल्या. त्यांनी सार्डिनिया, कॉर्सिका आणि सिसिली ही बेटे व्यापली. फिनिशियन लोकांच्या नंतर ग्रीकांच्या वसाहती दक्षिण इटलीत, विशेषतः पश्चिम किनाऱ्यावर व सिसिलीत झाल्या. सिसिलीतील पश्चिम भागावर कार्थेजमधल्या फिनिशियन लोकांची आणि पूर्व भागावर ग्रीकांची सत्ता प्रस्थापित झाली. यातील इट्रुस्कन हे स्थानिक आणि फिनिशियन व ग्रीक हे परस्थ ठरले. या तिनही जमातींवर रोमने मात केली पण इट्रुस्कन हे इटलीचेच रहिवासी मानून फिनिशियन व ग्रीक यांना रोमनांनी उपरे मानले. या दोघांचीही स्फूर्तिस्थाने कार्थेज व ग्रीस होती. ती पादाक्रांत केल्यानंतर रोमला स्वतःचे स्थिर राज्य उभे करता आले. पुढे त्याचेच साम्राज्यात रूपांतर झाले. [⟶ इट्रुस्कन संस्कृति].


रोम शहराची स्थापना केव्हा झाली, याविषयी तज्ञांत मतैक्य नाही आणि तत्संबंधी ऐतिहासिक माहितीही उपलब्ध नाही. इ.स.पू. ३९० मध्ये फ्रान्समधून आलेल्या गॉल टोळ्यांनी रोममध्ये प्रथम जाळपोळ केली. त्यावेळी रोमविषयी माहिती असलेल्या सर्व बखरी नष्ट झाल्या, अशी वदंता प्रसृत झाली आहे किंवा नंतरच्या इतिहासकारांनी तशी सोयीस्कर समजूत करून घेतलेली असावी.

रोमच्या स्थापनेविषयी काही दंतकथा प्रचलित आहेत. त्यांतील एक कथा अत्यंत लोकप्रिय व सर्वमान्य झाली आहे. इ. स. पू. २२ एप्रिल ७५३ या दिवशी रोम नगरीची स्थापना झाली. ती रोम्यूलस व रेमुस नावाच्या जुळ्या भावंडांनी केली. ॲल्ब लाँग्ग या लेशियममधील प्राचीन नगरीत अँकायसीझपासून ॲफ्रोडाइटी देवीस झालेला पुत्र अनिअस याच्या आठ वंशजांनी राज्य केले. यानंतर इमिलिअस याने अनिअसचा नववा वंशज न्यूमिटार याला ठार मारुन त्याच्या पुत्रांचेही निर्दालन केले. या शिरकाणातून न्यूमिटारची मुलगी रिआ सिल्व्हिया ही बचावली. तिला मार्स देवतेपासून रोम्यूलस व रेमुस हे दोन मुलगे झाले. त्यांनी इमिलिअसचा निःपात केला व रोमची स्थापना केली. तेथूनच अनिअसच्या वंशजांचे राज्य पुन्हा सुरू झाले.

रोमन प्रजासत्ताक


पुरातात्त्विक संशोधनातून काही निष्कर्ष काढले गेले. त्यानुसार इ. स. पू. १००० च्या आसपास उत्तरेकडून टायबर नदी ओलांडून व्हिल्लॅनोव्ह लोक लेशियममध्ये आले. येथे राहणाऱ्या नवाश्मयुगीन लोकांशी त्यांचा संकर झाला. पुढे शेतकीची वाढ झाली आणि लोकसंख्याही वाढतच राहिली. परिणामतः वाढलेल्या लोकसंख्येला शेतजमिनी व कुरणे यांच्या शोधासाठी बाहेर पडावे लागले. ॲल्ब लाँग्ग येथील काही लोकांनी, बहुधा तेथील सत्ताधारी लोकांच्याच सहाय्याने, टायबर नदीच्या दोन्ही काठांवर डोंगरकपारीच्या आश्रयानेच सात खेडी वसविली. पॅलटाइन, कॅपिटोलाइन व ॲव्हन्टाइन ही खेडी प्रत्यक्ष टेकड्यांवरच होती. उरलेली चार लेशियमच्या पठारावरील उंचवट्यांवर वसली. या सात खेड्यांचे एकीकरण होऊन रोम शहर निर्माण झाले. हे एकीकरण बहुधा उत्तरेला जवळच राहणाऱ्या इट्रुस्कन लोकांनी घडवून आणले असावे. याच वेळी म्हणजे सुमारे सातव्या शतकात या शहराला रोम हे नाव प्राप्त झाले. नगर रक्षणासाठी सभोवताली दगडी तटबंदी उभारण्यात आली. पॅलटाइन टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशातील दलदल नाहीशी करून तेथे बाजारपेठ वसविण्यात आली. यालाच पुढे फोरम हे नाव मिळाले. पुढे रोम हे स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण नगर झाले. [⟶ रोम].

राजसत्ताक पद्धती : इ.स. पू. सातव्या शतकात रोमन परंपरा व बखरींप्रमाणे इट्रुस्कन अंमल प्रस्थापित झाला. टायटस लिव्ही या इतिहासकाराच्या मते कॉरिंथमधील सत्ता सिप्सलस (इ. स. पू. ६५७-६२७) या जुलमी हुकूमशाहने घेतल्यानंतर डेमरेटस हा सरदार घराण्यातील तरुण तार्क्विन्या (इट्रुरिया-मध्य इटली) येथे आला आणि स्थायिक झाला. त्याने इट्रुस्कन सरदार घराण्यातील स्त्रीशी विवाह केला. त्यांना दोन मुले झाली. त्यांपैकी लूक्यमो या मुलाने उच्चकुलीन घराण्यातील टॅनक्विल या प्रेषित स्त्रीबरोबर विवाह केला व तिच्या इच्छेनुसार तो रोमला गेला. त्याने रोमचे नागरिकत्व घेऊन ल्यूशस टार्क्विनीअस प्रिस्कस हे नाव धारण केले. आपल्या कर्तृत्वाने त्याने उच्च पद मिळविले. रोमचा राजा अँकस मारशसच्या मृत्यूनंतर त्याने गादी बळकावली. काहींच्या मते रोममध्ये अनेक धनवान इट्रुस्कन कुटुंबे रहात होती. त्यांनी ल्यूशस याला राजा निवडले (इ. स. पू. ६५५). त्याने सेबाइन लोकांचा पराभव करुन, सबंध लेशियम प्रांत रोमच्या आधिपत्याखाली आणला. इट्रुस्कन व ग्रीक कलाकारांना आणवून रोममध्ये मोठाले प्रासाद व देवालये उभारली. अडतीस वर्षांच्या कारकीर्दीनंतर श्रेष्ठ घराण्यांनी कट करून त्याचा खून केला. जमीनदारांऐवजी तो व्यापाऱ्यांच्या कच्छपी जाऊ लागला. म्हणून त्याला बाजूला करावे लागले. त्यानंतर ल्यूशन टॅनक्विलचाच जावई सर्व्हिअस टलिअस हा गादीवर आला व चव्वेचाळीस वर्षांच्या कारकीर्दीत (कार. इ.स.पू. ५७८-५३४) त्याने रोमभोवती तटबंदी उभारली, खंदक खणले आणि व्यापाऱ्यांच्या हिताकडे लक्ष पुरविले. याला स्वाभाविकच जमीनदारांचा विरोध व्हावयास लागला व त्याचाही खून झाला. त्याच्याच संबंधातील ल्यूसिअस टार्क्विनस स्युपर्बस इ. स. पू. ५३४ मध्ये गादीवर आला. आरंभापासून स्वतःच्या संरक्षणासाठी सैनिकांचे कडेच त्याने स्वतःभोवती ठेवून, राजा हा श्रेष्ठसभेने (सीनेट) नेमलेला कारभारी असतो, या प्राचीन सत्याची पुनःपुन्हा आठवण करुन देणाऱ्या श्रेष्ठींना त्याने फाशी दिले. स्वतंत्र वृत्तीचे कारागीर व मोठे शेतकरी यांना वेठबिगारीला लावले आणि आपले घरचे आसन बळकट झाले आहे असे वाटू लागताच रूटूली आणि व्हालशन टोळ्यांवर हल्ला करण्यासाठी सुसज्ज सैन्यासह तो रोमच्या बाहेर पडला. या संधीचा फायदा घेऊन श्रेष्ठसभेने खास सभा घेऊन त्याला पदच्युत केले (इ.स. पू. ५१०). रोमन वदंतेनुसार स्युपर्बसचा मुलगा सेक्सटस याने लुक्रीशिआ नावाच्या एका सद्‌गुणी विवाहित स्त्रीवर बलात्कार केल्यामुळे तिने आत्महत्या केली. परिणामतः लोकांनी उठाव करून त्यास पदच्युत केले.


प्रजासत्ताकाचा काळ : या काळाचे पुन्हा राजकीय घटनांनुसार दोन स्वतंत्र विभाग पडतात. पहिला रोमनांच्या एकजुटीचा व रोमन साम्राज्याच्या विस्ताराचा काळ (इ. स. पू. ५०९-१३१) आणि दुसरा रोमन प्रजासत्ताकातील बलवत्तर सेनापती व नेत्यांच्या आपसांतील संघर्षाचा काळ (इ.स. पू. १३१ ते २९) होय. यांपैकी पहिल्या विभागात रोमन लोकांनी अंतर्गत राज्यकारभार स्थिरस्थावर झाल्यावर हळूहळू राज्यविस्ताराचा पवित्रा घेतला आणि साम्राज्य विस्तार केला. सुरुवातीस टार्क्विनस स्युपर्बस याला पदच्युत करून रोमन श्रेष्ठसभेने राजसत्ता नष्ट करण्यासाठी पावले उचलली कारण रोमन श्रेष्ठसभेचा संघर्ष एकाचवेळी इट्रुस्कन सत्ता व एकतंत्री शासन या दोहोंविरुद्ध होता. म्हणून श्रेष्ठसभेने राजपद नष्ट करून सर्व कारभार ल्यूसिअस जूनिअस ब्रूटस आणि कोलॅटिनस या दोन प्रशासकांकडे (कॉन्सल) सोपविला. एकतंत्री अंमल स्थापन करण्याची कोणासच संधी मिळू नये, यासाठी हा घटनात्मक बदल होता. स्युपर्बस याने आपले गमावलेले राज्य परत मिळविण्यासाठी निरनिराळ्या इट्रुस्कन शहरांकडे मदतीची याचना केली. याच वेळी क्यूमी येथे इट्रुस्कन सैन्याचा पराभव होऊन सबंध मध्य इटलीतूनच इट्रुस्कनांची हकालपट्टी होईल, असा रंग दिसू लागला होता. या दुहेरी धोक्याला तोंड देण्यासाठी त्यांनी मोठे सैन्य गोळा केले आणि क्लूझीअमचा प्रशासक लार्स पॉर्सन याच्या नेतृत्वाखाली ते रोमवर रवाना केले. दोघेही प्रशासक (कॉन्सल) आणि श्रेष्ठसभा यांनी या आक्रमणाला मोठ्या शर्थीने तोंड दिले परंतु पॉर्सनचा विजय झाला. उत्तर लेशियममधील काही भाग आणि बरीच मोठी खंडणी त्याला द्यावी लागली परंतु पॉर्सन याने स्युपर्बसला गादीवर पुन्हा आणून बसविण्याचा हट्ट धरला नाही. द्वि-प्रशासक पद्धत कायम राहिली. या व्यवस्थेला विरोध करणारे इट्रुस्कन रोमचे शत्रू ठरले, त्यांना येथून परागंदा व्हावे लागले. उरलेली इट्रुरियातून आलेली, पण नव्या राज्यघटनेशी एकनिष्ठ असलेली घराणी रोमनच झाली. अशा रितीने एकतंत्री सत्ता व परदास्य या दोघांचाही उच्छेद झाला (इ. स. पू. ५०९).

रोमन समाज आणि अर्थव्यवस्था, कुटुंब या संस्थेभोवती गुंफलेल्या होत्या. कुटुंबसंस्थेचे नियमन प्राचीन रूढी आणि परंपरा यांद्वारे होत असे. कुटुंबातील प्रत्येक माणसाच्या जीवनावर प्रमुखाचे पूर्ण नियंत्रण होते. धार्मिक बाबतीतही अर्थातच कुटुंब प्रमुखाला मुख्य स्थान होते. या परंपराबद्ध समाजचे दोन भाग प्रजासत्ताकीय काळाच्या आरंभी दिसून येतात. हे भाग जन्मावर आधारलेले असल्याने त्यांना काहीसे शाश्वत स्वरुप प्राप्त झाले आणि रोमन राष्ट्राच्या प्रगतीतील हे विभाजन हा एक प्रमुख घटक ठरला. पहिला वर्ग श्रेष्ठींचा (पट्रिशन) आणि कनिष्ठांचा दुसरा (प्लिबीअन). ५०९ क्रांतीच्या आधी किंवा त्यावेळी खुद्द रोममध्ये किंवा भोवतालच्या लेशियम प्रदेशात ज्यांचा मोठा जमीनजुमला होता, अशा काही सरदार कुटुंबाचा मिळून हा श्रेष्ठवर्ग उत्पन्न झालेला होता आणि राजसत्ताक काळातसुद्धा रोम येथे राजांचा अंमल असला, तरीसुद्धा राजांच्या हाती त्यावेळी अनियंत्रित सत्ता नव्हती. सीनेटच्या सल्ल्यानेच राजाला कारभार करावा लागत असे. ५०९ नंतर, त्यावेळी जी घराणी या वर्गात होती, त्याखेरीज इतरांना श्रेष्ठवर्गात प्रवेश मिळेनासा झाला. कित्येक वर्षे श्रेष्ठ आणि कनिष्ठ यांच्यात रोटी-बेटी व्यवहारही नव्हता. संपत्तीच्या निर्मितीचे मुख्य साधन जे शेती ते सर्वस्वी श्रेष्ठांच्याच ताब्यात होते. रोमच्या राजकारणावर त्यांचे पूर्ण वर्चस्व होते. या जमीनदारांची कुळे, लहान व्यापारी-कारागीर इत्यादींचा कनिष्ठात समावेश होई. गुलाम वा दास या संज्ञेला कनिष्ठ पात्र नसले, तरी रोजच्या व्यवहारात ते पूर्णपणे श्रेष्ठांवर अवलंबून असत. कालांतराने, कनिष्ठांपैकी व्यापारी-व्यवसायी आणि परक्या शहरातील मोठे जमीनदार यांचा मिळून जो एक संपन्न व स्वतंत्र गट उत्पन्न झाला, तो इक्वेट्स या नावाने ओळखण्यात येऊ लागला. प्रजासत्ताक रोमच्या अंतर्गत राजकीय जीवनातील श्रेष्ठ-कनिष्ठ सत्तासंघर्ष हा प्रमुख प्रवाह होय.


रोमन साम्राज्य


उपजीविकेचे मुख्य साधन शेती. यांपैकी काही थोडेच स्वतंत्र तुकडे शेतकऱ्यांच्या ताब्यात होते. बाकी जमीन श्रेष्ठांकडे होती आणि त्या जमिनी कसण्याचे काम कनिष्ठांकडे होते. प्रत्येक कुळाकडे साधारणतः अर्धा हेक्टर जमीन असे, याशिवाय कुळांना सामुदायिक (जमीनदारांच्या खाजगी) शेतांवर काम करावेच लागे. शेतीतून निघणारे उत्पन्न अपुरे असल्यामुळे कर्जबाजारीपणा येई. त्यामुळे कनिष्ठांना श्रेष्ठांवर अवलंबून रहावे लागे. न्यायदान, प्रशासन या सर्व बाबतींत ते श्रेष्ठांच्या छत्राखाली असत. रोममधील कारागीर उत्पादन करीतच असत. ग्रीक, इट्रुस्कन अशा सत्तांशी संघर्ष उद्‌भवल्यावर नौकानयनाची आणि त्यातून सागरी व्यापाराची वाढ झाली. त्यामुळे तयार मालाचे उत्पादन वाढले आणि कारागीर-उत्पादन-व्यापारी यांची संपत्ती आणि नंतर सत्ता वाढत गेली. ह्याच संपन्न वर्गाने कनिष्ठांचे नेतृत्व स्वीकारून श्रेष्ठांकडून सत्तेत वाटा उचलण्यास आरंभ केला. त्यातून रोममध्ये पट्रिशन, इक्वेट्स आणि प्लिबीअन असे तीन प्रमुख वर्ग अस्तित्वात आले.

ही झाली खुद्द रोममधील स्थिती, यांखेरीज तेथे भोवतालच्या गावांतून-नगरांतून बरेच लोक जमा झाले. यांतील बरेच जमीनदार असून आपापल्या नगरांत श्रेष्ठ असत पण रोममध्ये आल्यावर मात्र त्यांना कनिष्ठ हा दर्जा स्वीकारावा लागे. यांनी व्यापार-उद्योगधंदे यांत पुढाकार घेऊन श्रेष्ठ सत्तेला धक्का दिला.

प्रजासत्ताकाच्या पूर्वी निसर्गातील वायू, आप, तेज आणि स्थलदेवता, गृहदेवता, भू देवता इत्यादींची पूजा प्रचारात होती. या सर्वांत ज्यूपिटर नावाच्या देवतेला श्रेष्ठत्व असे. पेरणी, कापणी हे हंगाम वाजत गाजत करण्यात येत. घरातील पूजा कुटुंबप्रमुखाकडे असे तर सामुदायिक पूजा पुरोहिताकडे असे. राजा हा सर्वोच्च पुरोहितही असे. याखेरीज वेगवेगळ्या देवदेवतांच्या पुजाऱ्यांची गर्दी असे. प्रार्थना आणि पूजा यांतील कर्मकांड हे केवळ त्यांनाच ज्ञात असल्याने त्यांची सतत गरज पडे. शकुन सांगणे, मुहूर्त पाहणे, पंचांग सांगणे ही कामे पुरोहितांच्याच एका वर्गाकडे असत. इतिहास-पुराणे अर्थात फक्त त्यांनाच माहीत असत.

पुरोहित वर्गाची सत्ता धार्मिक गोष्टींच्याही फार पुढे गेलेली होती. नागरी आणि दंडनीय सर्व विधिनिमय पुरोहितांपैकी बारा लोकांच्या एका मर्यादित गटांला ठाऊक असत. हे ज्ञान जतन करणे हेच त्यांचे मुख्य काम होते. याशिवाय एखाद्या कामाला, विशेषतः निवडणुकीला वा श्रेष्ठसभेच्या अधिवेशनाला, मुहूर्त ठरविण्याचे काम ते करीत. या बारांपैकी एखादा निवृत्त झाला वा मरण पावला, तर त्याजागी दुसरा माणूस नेमण्याचा अधिकार उर्वरित अकरा जणांकडे असे. थोडक्यात सामाजिक नियंत्रण नसलेल्या एका छोट्या गटाकडे स्मृतींचे रक्षण आणि न्यायदान यांविषयीची महत्त्वाची जबाबदारी होती. श्रेष्ठ-कनिष्ठ झगड्यांत कनिष्ठांनी हे विधिविषयक ज्ञान सर्वांना प्राप्त व्हावे, हा हट्ट धरला आणि तो मान्य करून घेतला. काही प्रमाणात तरी या पुरोहित गटाची मक्तेदारी संपविली.

शासनव्यवस्था : दोन सल्लागार समित्यांना-श्रेष्ठसभा आणि सैनिकी प्रतिनिधींची समिती-यांना शासनव्यवस्थेत महत्त्वपूर्ण स्थान होते. पहिली श्रेष्ठसभा-सीनेट ही रोमन राज्यकारभाराची सर्व सूत्रे सांभाळणारी अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था असून तिचे साधारणतः तिनशे सभासद असत. सीनेटचा सभासद होण्यास वरिष्ठ शासकीय नोकरी, ठराविक उत्पन्न आणि उमेदवाराचे वय कमीत कमी तीस वर्षे पूर्ण या अटी असत. यात श्रेष्ठ घराण्यातील कुटुंब प्रमुख आणि माजी सर्वोच्च प्रशासक यांचा समावेश असे. त्यांचे सभासदत्व आजीव असून ते वंशपरंपरागत मात्र चालत नसे. संपत्ती, ज्ञान आणि अनुभव यांमुळे सर्वजण ज्येष्ठ असल्याने या समितीचा सल्ला प्रशासकावर बहुधा बंधनकारक असे. कायदे करण्याचा अखेरचा अधिकार सीनेटकडे असे. दुसऱ्या समितीत सनिकांचे शंभर-शंभरांचे गट असत. या गटांच्या म्हणजे शतकांच्या प्रतिनिधींची ही सभा असे. हिला शतक-सभा म्हणत. प्रत्येक सुदृढ नागरिक हा सैनिक असे. साहजिक त्याला या समितीत कायद्याने स्थान होते. सैन्याचे घोडदळ, पायदळ, चिलखती दल, शिलेदार व बारगीर असे प्रमुख पाच भाग होते आणि या सर्वांत शिलेदारांचे वर्चस्व असे. सेनेची शतकात विभागणी आणि या शतकांना शतक-सभेत प्रतिनिधित्व यासंबंधी सर्व्हिअन घटनेने नियम केलेले होते. स्वयंपूर्ण सैनिक आणि पदरी फौजफाटा बाळगणारे सरदार यांना प्राधान्य असल्यामुळे श्रेष्ठसभेत उघड रीतीने मिरविण्यात येणारे श्रेष्ठांचे-संपन्नांचे वर्चस्व येथे अप्रत्यक्षरीत्या अस्तित्वात होते. तिसरी एक सभा याचवेळी अस्तित्वात आली होती. तिचे नाव जमात-सभा, ही भौगोलिक तत्त्वावर आधारलेल्या मतदार संघावर उभारलेली होती. वेगवेगळ्या भूप्रदेशातील जमाती अथवा टोळ्या यांवरून त्यास जमातसभा हे नाव पडले. यात संपत्ती अथवा सैन्यातील दर्जा आणि प्रतिनिधित्व यांची सांगड घालण्यात आलेली नव्हती. कालांतराने या सभेचे महत्व वाढले.


मतदारसंघाची विभागणी, सभेच्या बैठकी बोलावणे इ. कामे गणक या अधिकाऱ्याकडे असत. त्याला प्रत्यक्ष प्रशासनात अधिकार नव्हते. कारभाराचे काम श्रेष्ठसभेने नेमलेले व तिलाच जबाबदार असलेले दोन सर्वोच्च प्रशासक पहात. हे प्रशासम एकाच वर्षासाठी नेमत आणि पुढे दहा वर्षे त्यांना हे काम पतकरता येत नसे. त्यांच्या जोडीला अनेक लहान लहान नियुक्त अधिकारी असत. प्रशासकासकट प्रत्येक अधिकारी हा युद्धप्रसंगी सेनानीही होता. कोणत्याच अधिकारपदाला वेतन नसल्याने संपन्न माणसांखेरीज इतरांना शासनात भाग घेणे जवळपास अशक्यच होते.

परराष्ट्र संबंध व साम्राज्यविस्तार : लेशियममधील छोट्या भूप्रदेशावर राज्य करणाऱ्या रोमचे आधिपत्य इटलीवर स्थापन झाले आणि पुढे त्याचे साम्राज्यात रूपांतर होऊन यूरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातील अनेक देशांवर वर्चस्व प्रस्थापित झाले. या प्रक्रियेला साधारणतः तीन ते चार शतकांचा काळ लागला. वसाहतिक साम्राज्याची स्थापना आणि वृद्धी प्रजासत्ताकाच्या नेतृत्वाखालीच झाली. प्रजासत्ताक स्थिरस्थावर झाल्यावर रोमने आपली सत्ता हळूहळू वाढविण्यास सुरुवात केली.

इटली व रोम : रोममध्ये स्वतंत्र प्रजासत्ताक स्थापन झाले, त्यावेळी या राज्याचा आकार केवळ ७७६ चौ.किमी. एवढाच होता. टायबर नदीच्या मुखाजवळचा थोडासाच मुलूख यात सामील होता. नजीकच असलेल्या लेशियममधील नगरांनीही रोमबरोबरच इट्रुस्कन अंमल झुगारून दिलेला होता. अशा बारा गावांनी मिळून लॅटिन राज्यसंघ स्थापन केला. इतक्या शेजारी शेजारी असणाऱ्या या नवोदित राज्यांचा आपसांत संघर्ष व्हावा हे स्वाभाविकच होते. इ. स. पू. ४९६ मध्ये रोमने त्यांचा पराभव केला. इ. स. पू. ४९३ मध्ये सगळ्यांनाच इट्रुस्कन आक्रमणाची भीती उत्पन्न झाल्याने या संघाने रोमलाच सैनिकी नेतृत्व दिले. जरूरी संपताच हे नेतृत्व फेकून देण्याचे लॅटिन राष्ट्रांनी पुनःपुन्हा यत्न केले. शेवटी इ. स. पू. ३३८ मध्ये या भागावर आपला प्रत्यक्ष अंमल बसवून रोमने या प्रश्नाचा निकाल लावला.

रोमच्या साधारण आग्नेयीस असलेल्या सॅम्नियमच्या डोंगराळ भागातील सॅमनाइट लोकांनी रोमला कँपेन्याच्या राजकारणात खेचले. या लोकांपैकी काहींनी कँप्यूआ, क्यूमी यांसारखी नगरे ताब्यात घेऊन (इ. स. पू. ४२४-४२०) तेथे ग्रीकांऐवजी आपली सत्ता स्थापली. याच वेळी गॉल टोळ्यांच्या आक्रमणाला तोंड देण्यात सहाय्य मिळविण्यासाठी रोमने डोंगरी सॅमनाइटांशी सख्य जोडले होते. कँपेन्याच्या संपत्तीवर या डोंगरी टोळ्यांचे लक्ष गेल्यावर त्यांना प्रतिशह म्हणून कँपेन्यातील सॅमनाइट लोकानी लॅटिन राज्यसंघाला रोमविरुद्ध उठविले. परिणामतः खुद्द रोमन लोकांनीच सर्व कँपेन्याचा ताबा घेतला (इ. स. पू. ३३६). थोड्याच काळात त्यांनाही डोंगरी सॅमनाइट लोकांपासून उपद्रव व्हावयास लागला. सॅमनाइट या कृषिप्रधान टोळ्यांनी महासंघ स्थापून प्रदेश विस्तारास इ. स. पू. चौथ्या शतकात प्रारंभ केला. तेव्हा त्यांचा रोमनांशी संघर्ष झाला आणि त्यातून तीन सँमनाइट-युद्धे उदभवून (इ. स. पू. ३४३-३४१ ३२६-३०४ व २९८-२९०) जवळपास पस्तीस वर्षांच्या झगड्यानंतर रोमन सैन्याचा सॅम्नियमवरही अंमल बसला.

उत्तरेकडून सतत होणाऱ्या गॉल लोकांच्या स्वाऱ्यांमुळे इट्रुस्कन लोकांना हतबल करून सोडले होते. सॅमनाइट युद्धे संपल्यावर रोमन सैन्याचा मोर्चा इट्रुरियाकडे वळला आणि एका मागोमाग एक अशी इट्रुस्कन शहरे त्यांनी जिंकली (इ. स. पू. २८०). इटलीच्या द्वीपकल्पाचा सबंध मध्यभाग अशा रीतीने रोमच्या ताब्यात आला.


दक्षिण इटलीत ग्रीकांच्या वसाहती प्राचीन काळपासून अस्तित्वात होत्या. हा सर्व प्रदेश ग्रीक वसाहतवाल्यांच्याच हातात होता. कँपेन्यात रोमन सत्ता स्थापन झाल्यावर रोमचा आणि ग्रीक-इटलीचा प्रत्यक्ष संबंध यावयास लागला. आयोनियन सागरावरील टरेन्टम् व थुरी या ग्रीक वसाहतींच्या आपसांतील वैमनस्याचा परिणाम रोमन हस्तक्षेपात झाला. प्रारंभी रोमन सैन्ये विजयी झाली, तरी टरेन्टमच्या सहाय्याला धावून आलेला ईपायरसचा राजा पिऱ्हस याने दोन युद्धांत रोमन सैन्याचा पराभव केला. इ. स. पू. २७५ मध्ये बेनव्हेंटम नजीक झालेल्या युद्धात मात्र त्याचा पराभव झाला व तो ग्रीसला परत गेला. यानंतर केवळ तीनच वर्षांत इ. स. पू. २७२ मध्ये टरेन्टमसह सर्व ग्रीक-इटली म्हणजेच सर्व दक्षिण इटली-रोमन साम्राज्यात अंतर्भूत झाला.

ॲपेनाइन पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशात म्हणजे पो नदीच्या खोऱ्यात, गॉल किंवा सिसाल्पाइन गॉल यांची वस्ती होती. हे लोक फ्रान्समधील गॉल लोकांचेच नातेवाईक. दक्षिणेकडे सरकण्याचा हे लोक पुनःपुन्हा यत्न करीत. वसाहती शक्य झाल्या नाहीत, तर लूटमार करीत. लागूनच असलेल्या इट्रुरियातील नगरांना यांची सारखी धास्ती असे पण वेळप्रसंगी आणखीही दक्षिणेकडे घुसण्याचे बळ त्यांजपाशी होते. इ. स. पू. ३९० मध्ये खुद्द रोम शहरात घुसून त्यांनी मोठीच जाळपोळ व लुटालूट केली होती. यानंतर, विशेषतः इट्रुरियाचा ताबा रोमकडे आल्यावर रोमन सैन्याशी त्यांच्या चकमकी उडत परंतु दोघेही एकमेकांना आपल्या सीमांवर अडविण्यातच संतुष्ट होते. इ. स. पू. ३३५ नंतर सु. पाउणशे वर्षे या भागात शांतता होती. दुसऱ्या शतकाच्या प्रारंभी रोमन सत्ताधाऱ्यांनी लिग्यूरिया आणि गॅलीआ या प्रदेशांत, विशेषतः पो नदीच्या खोऱ्यात, रोमन सैनिकशेतकऱ्यांच्या वसाहती निर्माण करण्यास सुरुवात केली. इ. स. पू. १९० ते १७५ या सु. पंधरा वर्षांत अशा नऊ वसाहती स्थापन झाल्या. आपल्या प्रदेशावरील हे अतिक्रमण गॉल लोकांच्या फार उशिरा ध्यानात आले आणि त्यांनी इ. स. पू. १७५ मध्ये ह्त्यार उचलले. या युद्धात रोमन सैन्याचा विजय झाला, तरी या मुलखाचा ताबा रोमकडे आला नाही. इ.स.पू. पहिल्या शतकात रोमन सेनापतींना सिम्ब्री, ट्यूटन अशा टोळीवाल्यांशी पो नदीच्या खोऱ्यातच लढावे लागत होते. हे स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी रोमला पदोपदी लष्करी सामर्थ्य वापरावे लागले तरीही रोमन राज्यकर्त्यांनी इटलीच्या वेगवेगळ्या भागांकडे केवळ जित आणि जेते या दृष्टीने पाहिले नाही. आफ्रिका, आशिया आणि यूरोप खडांतील देशांची शासनव्यवस्था रोमने केली होती, तशी इटलीच्या बाबतीत केलेली नव्हती हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे आणि पुढेही इटलीतील नागरिकांना साम्राज्याच्या राजकीय जीवनात बरोबरीने वाटेकरी करुन घ्यावे, अशा चळवळी वेळोवेळी झालेल्या दिसतात. या संबंधात व्यावहारिक हिताहिताची दक्षता घेण्यात आलेली असली, तरी त्या सर्वांच्या बुडाशी एकात्मतेची निदान आत्मीयतेची भावना निश्चितच दिसते.

इटलीची प्रांत आणि तेथील रहिवाशी निरनिराळ्या मार्गांनी रोमशी बांधून घेण्यात आले : (१) व्यापारी व लष्करी वाहतूक या दोघांना सारखेच उपकारक असे रस्ते बांधण्यात आले. रस्त्यांचा या जाळ्यामुळे इटालियन लोकांना रोमशी व्यापारी दळणवळण ठेवणे सुलभ झाले आणि मुख्य म्हणजे आवश्यक तेव्हा रोमन सैन्ये कोणत्याही प्रांतात त्वरेने पोहोचतील ह्याची व्यवस्था झाली. (२) सर्वत्र एकच चलन पद्धती जारी करण्यात आली. व्यापार-उद्योग यास अत्यंत फायद्याची अशी ही सुधारण होती. (३) सर्व शहरांना आणि शहरांतील नागरिकांना रोममध्ये व्यापार-व्यवसाय करण्यास अनुमती देण्यात आली. इट्रुस्कन किंवी ग्रीक यांसारख्या मुख्यतः व्यापारावरच जगणाऱ्या वसाहतीना मोकळिकीचा सर्वांत जास्त उपयोग झाला. (४) ठिकठिकाणी खुद्द रोममधील वा लेशियममधील सैनिक-शेतकऱ्यांच्या वसाहती स्थापन करण्यात आल्या. हे सर्व वसाहतवाले रोमचे प्रत्यक्ष नागरिक असून जित प्रदेशातील रोमन सत्तेचे खरेखुरे राखणदार होते. (५) इटलीतील व्यापारी, उत्पादक आणि बडे जमीनदार यांचे हितसंबंध जपण्याची खबरदारी रोमन राज्यकर्त्यांकडून घेण्यात आलेली होती.


शासकीय दृष्ट्या इटलीतील नागरिकांचे चार स्वतंत्र गट करण्यात आले होते : (अ) रोमन नागरिक : रोममधील सर्व नागरी व शासकीय अधिकार या नागरिकांना असत. मुख्य म्हणजे रोमन शासनाच्या निवडणुकीत भाग घेण्याचा त्यांना हक्क होता. खुद्द रोम, रोमच्या सैनिकी वसाहती आणि लेशियम, इट्रुरिया व कँपेन्या येथील काही भाग यांचा या वर्गात समावेश होता. (आ) रोमन नागरिक-दुसरा वर्ग : नागरी हक्क परंतु शासकीय निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही. त्याऐवजी स्थानिक शासने असत. या वर्गात लेशियम मोडत असे. (इ) लॅटिन सहकारी : लॅटिन भाषीय, वंशीय, क्वचित खुद्द रोमन लोकांशी रक्तसंबंध असणाऱ्या रोमन शेतकी वसाहती होत्या. त्यांना सर्व नागरी अधिकार आणि स्थानिक स्वराज्य देण्यात आले. (ई) इटालियन सहकारी : वरील तिनही वर्गात न बसणारी सर्व नगरे आणि प्रांत या प्रत्येकाला तेथील रुढींप्रमाणे नागरी हक्क आणि स्थानिक शासन दिलेले होते. रोमशी यांचे संबंध तहांच्या अटीन्वये चालत. असे दीडशे स्वतंत्र तह अस्तित्वात होते. यांतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे जित राज्याचे संरक्षण व परराष्ट्रसंबंध पूर्णपणे रोमच्या ताब्यात असत. यात इट्रुस्कन, ग्रीक असे सर्व प्रकारचे अ-रोमन वा अ-लॅटिन लोक येत. अधिकार आणि सुविधा यांत भेद असले, तरी या सर्वांना युद्धप्रसंगी रोमन सैन्यात दाखल होणे आणि युद्ध प्रयत्नांना मदत करणे अनिर्वाय असे.

विभाजन आणि एकीकरण यांचा समतोल राखण्याचा रोमचा हा यत्न नेहमी यशस्वी ठरणे शक्यच नव्हते. रोमन नागरिकांना असणारे विशेष अधिकार व शासनावरील त्यांची मक्तेदारी ह्या मुख्य अडचणी ठरल्या. इटली देश व रोम यांच्यात खरीखुरी एकात्मतेची भावना निर्माण झाली नाही. इ. स. पू १३० नंतर हे संबंध बिघडत चालले व त्याचे पर्यवसान पुढे सामाजिक युद्धात झाले. यावेळी रोमपासून फुटून निघून इटालिया हे निराळे राष्ट्र उभे करण्याचा संकल्प सोडण्यात आला. हे बंड मोडण्यात आले आणि एकतंत्री अंमलाखाली शांतता स्थापन करण्यात आली. मात्र राजकीय अधिकारांविषयीच्या बव्हंशी मागण्या मान्य झाल्या. आपापल्या विशिष्ट गटाच्या फायद्यासाठी अथवा केवळ न्यायबुद्धीने प्रेरित होऊन रोमन राजकारणी पुरुष कित्येकदा हा दुजाभाव भडकपणे रंगवून दाखवीत आणि त्यामुळे त्यांचा काही तात्कालिक लाभ झाला तरी शेवटी ते रोमच्या तोट्याचेच ठरले.

रोम आणि कार्थेज : सुरुवातीपासून कार्थेजने रोमशी मैत्रीचा तह केला होता. यात मित्रत्वाच्या भावनेपेक्षा समान शत्रू इट्रुस्कन याला शह देण्याचा कार्थेजचा हेतू होता. त्यामुळे रोमला अडचणीच्या वेळेला एक प्रबळ मित्र मिळाला. रोमचा व्यापार आणि सत्ता यांच्या विकासाबरोबर परस्पर अनुरूप असे नवीन तहही वेळोवेळी करण्यात आले. ग्रीक-इटालीचा ताबा रोमकडे आल्यावर कार्थेजशी प्रत्यक्ष संबंध यावयास लागला. याही वेळी (इ. स. पू, ३०६) एक तह झाला आणि एकमेकांना परस्परांशी व्यापारी संबंध ठेवण्यास मोकळीक असली, तरी रोमने सिसिलीत जाऊ नये आणि कार्थेजने इटलीत येऊ नये, असे ठरविण्यात आले परंतु रोमन सत्तेच्या उदयापूर्वी कार्थेज-ग्रीक वसाहती व इट्रुरिया यांचे जे संबंध होते ते पूर्णत्वे पुसून टाकणे अशक्यच होते कारण व्यापारासाठी वसाहतींची आवश्यकता भासली व त्यात रोमला उतरावेच लागले. अनेकदा छोटे छोटे संघर्ष उद्‌भवत. इ. स. पू. २६८ मध्ये मेसिना व सिराक्यूस यांच्यातील झटापटीत रोम व कार्थेज विरुद्ध बाजूंना आपोआप खेचले गेले. या कारणावरून निर्माण झालेले युद्ध पुढे तेवीस वर्षे टिकले. या युद्धांना प्यूनिक युद्धे म्हणतात. शेवटी रोमने कार्थेजच्या तोडीचे आरमार बांधले. इ.स.पू. २४२ मध्ये या युद्धाला तोंड फुटले व त्यात कार्थेजच्या आरमाराचा पराभव झाला. पहिले प्यूनिक युद्ध संपले. समझोत्याच्या तहानुसार रोमला सिसिली, कॉर्सिका व सार्डिनिया यांवर प्रभुत्व मिळाले.


या युद्धामुळे कार्थेजची स्थिती बदलली. व्यापारासाठी पर्यायी पेठा शोधणे त्याला अटळ झाले. स्पेनच्या किनाऱ्यावर पूर्वीपासून कार्थेजच्या वसाहती होत्याच. हॅमिलकार या समर्थ नेत्याच्या मार्गदर्शनाखाली केवळ सहासात वर्षांत त्यांनी स्पेनच्या दक्षिण व पूर्व भागावर सत्ता स्थापून उत्तरेच्या दिशेने प्रगती केली. कार्थेजचा स्पेनमधील साम्राज्यविस्तार धोक्याचा आहे, अशी रोमन नेत्यांची समजूत झाली. यातून दुसरे प्यूनिक युद्ध उद्‌भवले (इ. स. पू. २१८). कार्थेजचा नेता हॅमिलकार याने कार्थेज आणि स्पेन यांच्या रक्षणाची व्यवस्था करून खुद्द रोमवरच भूमार्गे आक्रमण केले. पिरेनीज पर्वत ओलांडून दक्षिण फ्रान्समध्ये जावयाचे आणि आल्प्स पर्वत पार करून इटलीत घुसण्याची त्याची योजना नैसर्गिक आपत्तींना न जुमानता पार पडली परंतु त्यात हजारो सैनिक व कित्येक हत्ती-घोडी नाश पावली तरीही रोमन सैन्याला सहज धूळ चारील इतके सैन्यबळ त्याच्यापाशी होते. त्याने सुरुवातीस रोमन सैन्याची धुळधाण केली. या युद्धात चाळीस हजार रोमन सैनिक प्राणास मुकले. (इ. स. पू. २१६). रोमला वेढा देण्याऐवजी त्याने सभोवतालच्या प्रदेशात जाळपोळ व लुटालूट केली आणि अखेर तो इटलीत अडकून पडला. रोमन सैन्याशी त्याची गाठही पडत नव्हती. जवळपासचा सर्व प्रदेश कार्थेजला मिळाला परंतु दुसरीकडे कार्थेजची बाजू घसरत चालली होती. सिपिओ ॲफ्रिकेनसच्या नेतृत्वाने स्पेनमध्ये उतरलेल्या रोमन सैन्याने तेथील कार्थेजच्या प्रशासकावर दबाब आणून ⇨ हॅनिची रसद तोडली. शिवाय समुद्रावर रोमन नौदल बलिष्ठ होतेच. परिणामतः इ. स. पू. २११ च्या सुमारास सर्व बंडखोर प्रांत रोमने ताब्यात घेतले आणि इ.स.पू. २०६ पर्यंत स्पेनमधील कार्थेजची सत्ता जवळजवळ संपुष्टात आली. स्पेनवर ताबा बसवून सिपिओ ॲफ्रिकेनस हा रोमन सेनानी खुद्द आफ्रिकेत कार्थेजनजीक आला. त्याने न्युमिदियाचा राजा मॉसिनिसा याचेही सहाय्य मिळविले. इ. स. पू. २०२ मध्ये झालेल्या झामाच्या लढाईत कार्थेजला परतलेल्या हॅनिबलच्या सैन्याचा मोड झाला. रोम व कार्थेज यांत पुन्हा तह झाला. त्या तहाच्या अटी कार्थेजला नुकसानकारक व अपमानास्पदही ठरल्या. स्पेन आणि आफ्रिकेतील कार्थेजचे साम्राज्य खालसा करण्यात आले. स्पेनचा ताबा रोमकडे गेला आणि आफ्रिकेतील प्रदेशात तीन स्वतंत्र राज्ये निर्माण करण्यात आली. कार्थेज शहर व भोवतालची पंचक्रोशी एवढेच कार्थेजपाशी राहिले. त्याचे परराष्ट्रसंबंध, युद्धसंधी यांवर रोमची बंधने आली.

सुमारे पन्नास वर्षांनी तिसरे प्यूनिक युद्ध सुरू झाले. दुसऱ्या प्यूनिक युद्धातील रोमचा सहायकर्ता मॉसिनिसा शिरजोर बनला व त्याने कार्थेजचा आणखी काही भाग व्यापला. या आक्रमणाचा प्रतिकार कार्थेजला रोमच्या अनुमतीशिवाय करता येईना. अखेर कार्थेजने मोठे सैन्य जमा केले व मॉसिनिसाशी युद्ध आरंभिले (इ. स. पू. १५०). त्यात कार्थेजचा पराभव झाला व मॉसिनिसापुढे शरणागती पतकरणे भाग पडले. कार्थेज शहर ताब्यात घेऊन तेथील पन्नास हजार नागरिक गुलाम म्हणून विकण्यात आले. समृद्ध व वैभवशाली नगरी जाळून बेचिराख करण्यात आली (इ. स. पू. १४६). दोन आठवडे हे शहर जळत होते. [⟶ कार्थेज प्यूनिक युद्धे].

रोम आणि पूर्व सागर : भूमध्य सागरातील पूर्वेकडील देश अंतःकलह व परस्पर संघर्ष यांमुळे निर्बळ बनत चाललेले होते. अलेक्झांडर द ग्रेटच्या झंझावती मोहिमांमुळे निर्माण झालेली अस्थिरता अद्यापि तिथे होती. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याचे भाग पडले आणि त्याचे राज्यपाल-सेनापती तिथल्या प्रदेशाचे सत्ताधारी झाले. यांपैकी मॅसिडॉन, सिरिया व ईजिप्त येथील सत्ताधाऱ्यांनी सत्ताविस्ताराचा यत्न केला. त्याचा फायदा घेऊन रोमन सेनापती आणि शासक यांनी प्रत्येकाला नेस्तनाबूत केले व तेथे रोमन अंमल बसविला. शिवाय ग्रीसवर आपलाच अंमल बसवून रोमन साम्राज्याचा विस्तार केला. रोमचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन स्वतंत्र राजे आपल्या राज्याचे दान रोमला मृत्युपत्रान्वये करीत. ईजिप्तचा टॉलेमी, सिरनेअकाचा आपिऑन, बिथिनियाचा तिसरा निकमीडीझ या सगळ्यांनी अशी मृत्युपत्रे केल्याची नोंद रोमन बखरकार देतात. रोमच्या अंतर्गत राजकारणातूनही या क्षेत्रातील रोमन हस्तक्षेप व त्यांची तीव्रता वाढत गेली. ग्रीस, सिरिया, ईजिप्त इ. ठिकाणी कार्यक्षम व्यक्ती वा सेनापती पाठविण्याची पद्धत रूढ झाली. त्यासोबत सैन्यबळ आणि द्रव्यबळही मोठे देत. परिणामतः परदेशी मोहिमा काढून त्यांवर आपली नेमणूक करवून घेण्यास महत्त्वाकांक्षी पुढारी सदैव उत्सुक असत.


 ग्रीस : दक्षिण इटलीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात इपायरसचा राजा पिऱ्हस याने हेरक्लिआ येथे रोमनांचा पराभव केला (इ. स. पू. २८०) आणि ग्रीसला पाठिंबा दर्शविला. त्याने सिनिअसला शांतता तहासाठी रोमला धाडले. ग्रीक भूमीवरच आक्रमण करण्याचा त्याचा विचार होता. मात्र इ. स. पू. २२९ मध्ये इलिरीकमची राणी ट्यूटा हिच्या नौदलाने चालविलेल्या चाचेगिरीला आळा घालणे रोमला आवश्यक वाटले आणि त्यासाठी प्रथमच रोमन फौज यूगोस्लाव्हियात उतरली. रोमन सैन्याच्या इतक्या निकटच्या शेजाऱ्याचा धोका ओळखून मॅसिडॉनचा राजा पाचवा फिलिप रोमविरुद्ध उभा राहिला व हॅनिबलशी परस्पर त्याने मदतीचा करार केला. फिलिपच्या महत्वाकांक्षेला आळा घालणे रोमला क्रमप्राप्त झाले. ॲकिअन व इटोल्यन राज्यसंघ, स्पार्टा, कॉरिंथ व अथेन्स यांसारखी नगरराज्ये यांतील चढाओढीत मॅसिडॉन आणि रोम या दोघांनीही हस्तक्षेप केला. परिणामी इ. स. पू. १९६ मध्ये फ्लॅमनायनसच्या नेतृत्वाखाली रोमन ग्रीक राज्यांची वाटणी व त्यांच्या घटनांची आखणी केली.

पश्चिम आशिया : ग्रीस, पश्चिम आशिया व ईजिप्त यांचे राजकीय प्रश्न एकमेकांत गुरफटून गेलेले होते. इराणमधील सिल्युसिडी वंशातील तिसरा व चौथा अँटायओकस आणि पर्गाममचा ॲरिस्टॉनिकस व पॉन्टसचा मिथ्रिडेटीझ या चार पराक्रमी आणि महत्वाकांक्षी पुरुषांनी पश्चिम आशियाचा जास्तीतजास्त प्रदेश ताब्यात आणण्याचे वेगवेगळ्या वेळी यत्न केले. कधी ग्रीक स्वातंत्र्याचा व ऐक्याचा पुरस्कार करून, तर कधी ईजिप्तचा कैवार घेऊन, तर कधी दोघांविरुद्ध तिसऱ्याच एखाद्या छोट्या देशाची बाजू घेऊन आपली आकांक्षा सफल करण्याचा उद्योग त्यांनी केला. या प्रत्येक खेपेस या भागातील इतर राष्ट्रांशी शत्रुमित्र संबंध असल्याने रोमने हस्तक्षेप केला. कोणतीच एक सत्ता बलिष्ठ होऊ नये, ही खबरदारी घेतली आणि या सगळ्याचा शेवट तुर्कस्तान, सिरिया व पॅलेस्टाइन रोमन साम्राज्यात समाविष्ट होण्यात झाला.

रोम आणि यूरोप : रोमचे ज्या यूरोपीय देशांशी संबंध आले, ते बहुतेक मागासलेले देश होते. काही प्रमाणात शेतकी, मेंढपाळी यांवर उपजीविका करणारे समाज त्या ठिकठिकाणी पसरलेले असले, तरी उत्तरेकडून अथवा, पूर्वेकडून येणाऱ्या भटक्या जमाती त्यांना स्वास्थ्य लाभू देत नव्हत्या. कार्थेजशी झालेल्या युद्धातून स्पेन, सार्डिनिया, कॉर्सिका व सिसिली हे भूप्रदेश रोमन सत्तेखाली आले. गॉल लोकांशी उत्तर इटलीच्या मैदानात सततच गाठ पडत होती आणि जोपर्यंत आल्प्सच्या पलीकडील (फ्रान्समधील) गॉल लोकांवर नियंत्रण नव्हते, तोपर्यंत या भागावर (सिसाल्पाइन गॉल) स्थिर शासन अशक्य होते. फ्रान्समधील गॉल लोकांवर नियंत्रण ठेवावयाचे, तर उत्तरेकडील व पूर्वेकडील जमातींच्या हालचाली रोखणे भाग होते. म्हणून सिसाल्पाइन गॉलमध्ये आणि नंतर ट्रॅन्साल्पाइन गॉलमध्ये सैनिकी आक्रमण आवश्यक ठरले. दक्षिण जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी या भागांत सत्तेचा प्रसार करावा लागला आणि शेवटी ऱ्हाइन-डॅन्यूब ही नैसर्गिक सीमा स्थिर केल्यावर सर्व भागाला स्वास्थ्य लाभले.

प्रजासत्ताकाच्या या सुरुवातीच्या काळात रोमने इटलीवर वर्चस्व प्रस्थापिले आणि कार्थेज व मॅसिडोनिया हे बलाढ्य प्रतिस्पर्धी नष्ट केले. याशिवाय कॉरिंथ व सिसिली यांच्याशी युद्धे करुन ते प्रदेश रोमन साम्राज्यात अंतर्भूत केले. प्यूनिक युद्धांच्या वेळी रोमन प्रशासनाची राज्यघटना पूर्ण झाली होती आणि प्लिबीअन (सामान्य नागरिक) लोकांना समान राजकीय हक्क प्राप्त झाले होते. त्यामुळे मिश्र-विवाह प्रचारात आले आणि पट्रिशन व प्लिबीअन या दोन वर्गांचे पृथक अस्तित्वच हळूहळू संपुष्टात आले. त्यामुळे कोणत्याही सामान्य नागरिकाला कॉन्सलचा श्रेष्ठ अधिकार वा दर्जा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा धरण्याचा मार्ग मोकळा झाला तथापि सीनेटचे कायदे करण्याचा व त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार अबाधितच होता. रोमच्या वाढत्या राज्यविस्ताराबरोबर निरनिराळ्या भूप्रदेशांतील लोकांशी त्याचा संबंध आला. त्यामुळे रोमनांच्या धार्मिक विधीत अनेक परकीय देवदेवता प्रविष्ट झाल्या तसेच ग्रीक वाड्मय व कला यांचा प्रभाव वाढला. शहरांची व्यवस्था आरोग्यदृष्ट्या नीट मांडणी करून गटारे, नहर वगैरेद्वारे सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली. या काळात अनेक स्वतंत्र साहित्यकृती निर्माण झाल्या. त्यांपैकी लिव्हीअस अँड्रीनायकस, नीअस नीव्हीअस इत्यादींच्या नाट्यकृती रंगभूमीवर आल्या. या काळातील सर्वांगीण विकासामुळे त्यास ‘सुवर्णयुग’ ही संज्ञा देण्यात आली तथापि याच काळात लोकसंख्येच्या वाढीबरोबर गुलामगिरीची अनिष्ट प्रथा रोमन राज्यात प्रविष्ट झाली.


प्रजासत्ताकाचा उत्तरार्ध : (इ. स. पू. १३१-२९). हा प्रामुख्याने अंतर्गत सत्ता संघर्षाचा काळ होय. या काळात रोमन कायदा आणि रोमन राज्यव्यवस्था यांचा बाह्य देखावा कायम होता तथापि श्रीमंत लोक व सत्ताभिलाषी नेते यांमध्ये हळूहळू व्यक्तिद्वेष वाढून रोमन राज्यातील वरिष्ठ जागांकरिता आपसांत यादवी सुरु झाली होती. त्या यादवीत स्वपराक्रमाने आणि कर्तृत्वाने टायबिरीअस व गेअस ग्रॅकस, मेरिअस, लूशस सला, नियस पॉम्पी, ज्यूलिअस सीझर, मार्क अँटनी यांसारखे कॉन्सल-ट्रिब्यून आणि शूर योद्धे पुढे आले आणि त्यांनी रोमन साम्राज्यात विशेष कामगिरी केली व सीनेट या सर्वोच्च संस्थेस वेठीस धरले. या सुमारास पट्रिशन लोकांच्या जाचापासून स्वतःच्या हक्कांचे संरक्षण करण्याकरिता सामान्य (प्लिबीअन) लोकांनी निवडलेल्या ट्रिब्यून या अधिकाऱ्याचे प्रस्थ राज्यात वाढले. प्रत्यक्ष राज्यकारभारात सीनेटने निवडलेल्या कॉन्सलपेक्षा ट्रिब्यून हा अधिकारी सत्ता गाजवू लागला. टायबिरीअस आणि गेअस हे ग्रॅकस बंधू अनुक्रमे या पदावर सुरुवातीस निवडले गेले. त्यांनी गरिबांसाठी काही जमीनविषयक सुधारणा कायदे केले. हे कायदे करत असताना रोमन सीनेटकडून योग्य न्याय मिळत नाही, असा पवित्रा घेऊन स्वतंत्र न्यायालये स्थापावीत, असाही एक कायदा त्यांनी संमत करुन घेतला. पुढे टायबिरीअसने गरिबांची सहानुभूती मिळविण्यासाठी शासकीय खर्चाने धान्य वाटले आणि जिंकलेल्या प्रदेशात वसाहती स्थापण्यात याव्यात, ही कल्पना मांडली. इ. स. पू. १२२ मध्ये त्याने सर्व लॅटिन लोकांना रोमन नागरिकत्वाचे हक्क द्यावेत, असाही ठराव आणला पण तो सीनेट सभेने फेटाळून लावला. परिणामतः ग्रॅकस बंधूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी पुढील १०-१२ वर्षे ग्रॅकस बंधूंच्या सुधारणा युक्तिप्रयुक्तीने रद्दबातल ठरविल्या. त्यानंतर काही दिवस मेरिअस हा ट्रिब्यूनपदी निवडला गेला (इ. स. पू. ११९). पुढे ट्रिब्यून व कॉन्सल या उच्चपदस्थांमध्ये झगडे होऊ लागले. या वेळी न्युमिदिया या रोमन अधिपत्याखालील राज्यात रोमविरोधी कारवायांना ऊत आला तेथे जुगर्था व त्याचे चुलत भाऊ ॲधर्बल आणि हैम्पसल हे संयुक्तपणे राज्य करीत होते. त्या परस्परांत वैमनस्य उत्पन्न होऊन जुगर्थाने एकास मारले व ॲधर्बलला हाकून लावले. तेव्हा ॲधर्बलने रोमन सीनेटकडे मदतीची याचना केली. मेरिअस व सला या दोन रोमन सेनानींनी जुगर्थाचा पराभव केला (इ. स. पू. १११-१०६).

मेरिअसची कॉन्सलपदी निवड झाली (इ. स. पू. १०४). त्याचवेळी सिम्ब्री, ट्यूटन इ. रानटी टोळ्यांनी इटलीवर स्वारी केली. मेरिअसने सुसज्ज रोमन सैन्याच्या मदतीने त्यांना हुसकावून लावले व त्यांच्या म्होरक्यांना कैद केले. त्याच्या या कर्तबागारीमुळे पुढे त्याची सलग सहा वेळा कॉन्सलपदी निवड करण्यात आली. नवीन जिंकलेल्या जमिनी शिपायांत वाटाव्यात, असा कायदा त्याने सीनेटकडून संमत करून घेतला. पुढे सीनेटने तो शिरजोर होत आहे हे ध्यानी येताच त्याच्या प्रतिस्पर्धी सेनापतींची मदत घेऊन त्यास विरोध केला. तेव्हा अंतर्गत युद्धाशिवाय आपल्याला पूर्ण सत्ता मिळणार नाही, असा विचार करून तो आशिया मायनरमध्ये गेला. तेथे त्याने सहावा मिथ्रिडेटीझची कुरापत काढली पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. रोममध्ये सत्तेसाठी संघर्ष चालू असल्याचे पाहून तो स्वदेशी आला आणि सामाजिक युद्धात दुय्यम सेनापतीचे पद त्याने स्वीकारले. या अंतर्गत धुमश्चक्रीत सला आणि ज्यूलिअस सीझर हे दोन पराक्रमी सेनापती उदयास आले. इ. स. पू. ८८ मध्ये आशिया मायनरमधील पॉन्टसचा सहावा मिथ्रिडेटीझ याच्याशी युद्ध होऊन रोमन सीनेटने सलाकडे सैन्याचे नेतृत्व सोपविले परंतु मेरिअसने ट्रिब्यून रूफस सल्पिशसच्या मदतीने सलाकडील नेतृत्व काढून स्वतःकडे घेतले. तेव्हा सला रोमवर चालून आला आणि त्याने मेरिअस व सल्पिशस या दोघांचा पराभव केला. सला व मेरिअस यांतील हा लढा वस्तुतः सीनेट व लोकपक्ष यांमधील संघर्ष होता. ट्रिब्यूनची वाढती सत्ता सीनेटला असह्य झाली होती. सला यास विजय मिळताच त्याने मेरिअसला पकडून दंडाधिकाऱ्याकडून देहान्त शासनाची शिक्षा देवविली, पण लोकांच्या सहानुभूतीमुळे तो आफ्रिकेत पळाला.

रोममधील या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन सहावा मिथ्रिडेटीझ याने आशिया मायनर (विद्यमान तुर्कस्तान) व्यापला आणि क्रिमिया घेऊन ग्रीसमध्ये रोमन सत्तेस आव्हान दिले. त्यांतून अनुक्रमे तीन मिथ्रिडेटिक युद्धे (इ. स. पू. ८८-८४, ८३-८१ व ७४-६३) उद्‌भवली. पहिल्या युद्धानंतर तह होऊन मिथ्रिडेटीझ याला नुकसानभरपाई द्यावी लागली. दुसरे युद्ध सला या सेनापतीने प्रतिष्ठेसाठी पराक्रम या तत्त्वावर केले आणि लूशस लूकलस या दुय्यम सेनापतीच्या द्वारे मिथ्रिडेटीझचा पराभव केला. तिसरे युद्ध मिथ्रिडेटीझने रोममधील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा उठवून बिथिनिया हा रोमन प्रांत काबीज करून ओढवून घेतले. अखेर पॉम्पी या रोमन सेनापतीने मिथ्रिडेटीझचा पूर्ण पराभव केला व मिथ्रिडेटीझने क्रिमियात आश्रय घेतला. तेथे त्याचा गुलामांकडून खून झाला.


सला हा इ. स. पू. ८७ मधील सीनेटच्या निवडणुका आटोपून आशिया मायनरमध्ये निघून गेला. तेव्हा ट्रिब्यून सल्पिशिअसच्या लोकपक्षाचे हक्क विस्तृत करणारे जे काही ठराव मांडले होते, ते पुन्हा संमतीसाठी सीनेटमध्ये मांडले पण दुसरा कॉन्सल सिन्ना मतदानासाठी आला असता त्याने विरुद्ध पक्षातील मंडळीची कत्तल केली. त्यामुळे ते संमत होऊ शकले नाहीत. ही संधी साधून पुन्हा मेरिअस याने आफ्रिकेतून सिन्नाच्या मदतीने खुद्द रोमवरच स्वारी केली आणि शहराचा कब्जा घेऊन उमरावांची कत्तल केली. तेव्हा सीनेटने मेरिअसची सातव्यांदा कॉन्सलपदी निवड केली (इ. स. पू. ८६) पण नंतर तो काही दिवसांतच मरण पावला.

आशिया मायनरमध्ये ल्यूशअस कॉर्निलिअस सला (इ. स. पू. कार. ८२-७९) याने मिथ्रिडेटीझचा पराभव केल्यानंतर तो ससैन्य रोमवर चालून आला. त्याला पॉम्पी हा कर्तबगार व पराक्रमी सेनापती मिळाला. रोममध्ये सत्ता काबीज करण्याकरिता निरनिराळे वरिष्ठ अधिकारी व सेनापती यांत रस्सीखेच चालू होती. इटलीतील हे यादवी युद्ध सु. वर्षभर चालू होते. अखेर सला विजयी होऊन हुकूमशाह झाला. त्याने शत्रुपक्षातील अनेकांची कत्तल केली आणि मालमत्ता जप्त केली. दररोज तो अशा बहिष्कृत वा शिक्षार्ह इसमांची यादी प्रसिद्ध करीत असे. नंतर त्याने सीनेट पुनर्घटित करून त्या सभेचे अधिकार वाढविले आणि ट्रिब्यूनची सत्ता कमी केली. राज्यकारभाराची नीट व्यवस्था झाल्यानंतर सलाने आपणहून अधिकाराचा त्याग केला (इ. स. पू. ७९). त्यानंतर एक वर्षातच तो मरण पावला. सलाची हुकूमशाही क्रौर्य आणि अवैध कृत्ये यांमुळे कुप्रसिद्ध झाली.

प्रजात्ताकांच्या उत्तरार्धात मोठेमोठे जमीनदार व वरिष्ठ अधिकारी आपल्या पदरी गुलाम ठेवीत असत. हे गुलाम विकत घेतलेले किंवा शत्रूचा पराभव झालेल्या सैन्यातील पकडलेले कैदी असत. मालक त्यांना क्रूरपणे मारहाण करीत. त्यात गुलामाचा प्रसंगोपात्त मृत्यू झाला, तरी त्याविषयी फारशी दखल घेण्यात येस नसे. या जाचातून आपली सुटका करून घेण्यासाठी शेतीवर काम करणाऱ्या गुलामांनी या काळात अनुक्रमे तीन वेळा उठाव केले. ‘दास्य मुक्ती युद्धे’ (सर्व्हाइल वॉर्स) या नावांनी ती प्रसिद्ध आहेत. त्यामुळे गुलामांनी संघटित होऊन प्रथम सिसिलीत इ. स. पू. १३४-१३२ मध्ये उठाव केला. तो क्रूरपणे मोडण्यात आला. दुसरा उठाव त्यांनी सिसिलीतच इ. स. पू. १०५-१०२ दरम्यान मोठ्या प्रमाणावर केला. तोही मोडण्यात आला आणि असंख्य गुलामांना छळ करून मारण्यात आले. त्यानंतर ग्लॅडिएटरच्या खेळात तरबेज असलेल्या स्पार्टाकस या गुलामाच्या नेतृत्वाखाली इटलीत पुन्हा इ. स. पू. ७३ मध्ये मोठा उठाव झाला. त्यांनी इटलीतील बराच मुलूख ताब्यात घेतला पण मार्कस क्रॅसस व पॉम्पी या सेनापतींनी हा उठाव अखेर अत्यंत क्रूरपणे मोडून काढला.

पॉम्पी (इ. स. पू. १०६-४८) हा मेरिअसविरुद्ध सहकार्य करणारा सलाचा मित्र स्वपराक्रमाने पुढे कॉन्सलपदी निवडून आला. त्याने सलाबरोबर आफ्रिका, सिसिली व आशिया मायनर येथील बंडाळ्या मोडून रोमन सत्ता स्थिरस्थावर केली. सहावा मिथ्रिडेटीझकडून सिरिया व पॅलेस्टाइन हे प्रदेश पुन्हा जिंकून घेतले. स्पार्टाकसच्या नेतृत्वाखालील गुलामांचे बंड चिरडून टाकण्यातही त्याचा मोठा वाटा होता. या त्याच्या कामगिरीमुळेच सीनेटने त्यास मॅग्नस हा किताब दिला. भूमध्य समुद्रावरील चाचेगिरीस त्याने प्रतिबंध घातला. त्यामुळे क्रॅससबरोबर त्याची कॉन्सलपदी सीनेटने नियुक्ती केली (इ. स. पू. ७०). सीझर आणि पॉम्पी यांत मतभेद होते आणि सीझरची मुलगी व पॉम्पीची पत्नी जुलिया हयात असेतोपर्यंत ते मतभेद विकोपास गेले नाहीत परंतु तिच्या मृत्यूनंतर तो रोमला परत आला. तेव्हा त्याने आपल्या सैनिकांना नवीन घेतलेल्या जमिनी द्याव्यात, अशी सीनेटकडे मागणी केली, अर्थात ती सीनेटने नाकारली. इ. स. पू. ६० ते ४९ दरम्यान पॉम्पी, ⇨ ज्यूलिअस सीझर आणि क्रॅसस यांनी पहिले त्रिकूट (ट्रायमव्हरेट) बनवून संयुक्तरीत्या राज्यकारभार केला. इ. स. पू. ५९ मध्ये सीझर कॉन्सल झाला आणि त्याने पॉम्पीच्या सैनिकांना जमिनी देण्याविषयीचा ठराव संमत करून घेतला. या त्रिकूटाचे सिसरो आणि केटो हे दोन विद्वान विचारवंत बलाढ्य प्रतिस्पर्धी होते. सीझरने यूरोपमधील फ्रान्स, जर्मनी वगैरे भूप्रदेश जिंकून आपल्या पराक्रमाची झलक दाखविली. त्यावेळी पॉम्पी हा कॉन्सलपदी होता. पुढे सीझरचे आणि पॉम्पीचे मतभेद झाले आणि सीनेटने सीझरला परत रोमला बोलविले. सीनेटने सीझरची पुन्हा कॉन्सलपदी निवड केली (इ. स. पू. ४८) आणि त्याची दहा वर्षांकरिता सर्वाधिकारी म्हणून नियुक्ती केली. सीझरने यूरोप खंडात अनेक नेत्रदीपक विजय मिळविले. त्यांत गॉल आणि स्पेन येथील लढाया विशेष प्रसिद्ध आहेत. यांविषयी आपल्या कॉमेंटरीज ऑफ द गॅलिक वॉर या पुस्तकात त्याने वर्णन केले आहे. सीनेटला त्याच्या सर्वंकष सत्तेची इ. स. पू. ४९ मध्ये भीती वाटू लागली. त्यावेळी सीनेटने त्यास सेनापतिपदाचा त्याग करण्यास विनविले. तेव्हा सीझरने नकार दिला आणि तो सीनेटविरुद्ध पॉम्पीबरोबर यादवी युद्धात लढला. पॉम्पी प्रथम ग्रीसमध्ये पळून गेला. तेथे सीझरने त्याचा पराभव केल्यावर तो ईजिप्तमध्ये टॉलेमींच्या आश्रयासाठी गेला. तेथे त्याचा खून झाला. सीनेट विरुद्धचे यादवी युद्ध जिंकून सीझर सर्वंकष सत्ताधारी झाला. यानंतर ईजिप्तमध्ये वारसा हक्काबद्दल संघर्ष उद्‌भवला. सीझरने या संधीचा फायदा घेऊन ईजिप्तवर स्वारी केली आणि ईजिप्तचा पराभव केला व ⇨ क्लीओपात्रा व तिचा धाकटा भाऊ यांना संयुक्तरीत्या वारस ठरविले आणि रोमचे मांडलिक केले. क्लीओपात्राच्या पहिल्याच भेटीत त्याचे तिच्यावर प्रेम जडले. क्लीओपात्राने सीझरकडून अनेक सवलती घेतल्या. सीझर व क्लीओपात्रा यांच्या संबंधावर पुढे अनेक कथा प्रसृत झाल्या. रोमला परतल्यानंतर सीझरने राज्यकारभारात अनेक सुधारणा केल्या. त्याने मतदानाचा हक्क अधिक लोकांना देऊन सीनेटच्या सभासदांची संख्या ६०० पर्यंत वाढविली आणि रोमच्या वसाहतींचे जाळे निर्माण केले. वसाहतींच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी नेमले आणि कायद्याची नवीन विधिसंहिता तयार केली. सार्वजनिक क्षेत्रातही त्याने इमारती-रस्ते बांधून रोमच्या सौंदर्यात भर घातली. या लोककल्याणार्थ सुविधांमुळे सीझरची हुकूमशाही लोकप्रिय झाली आणि त्यालाच राजमुकूट अर्पण करण्याबद्दल सीनेटांतर्गत सूचना पुढे येऊ लागल्या तथापि त्याने राजपद नाकारले.

माटे. म. श्री.


सम्राटांचा काळ (इ. स. पू. २९- इ. स. ४७६): इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात रोमन राज्यात पट्रिशन (श्रेष्ठींचा वर्ग) व प्लिबीअन (कनिष्ठांचा वर्ग) या दोन वर्गांत नागरी हक्कांबाबत स्पर्धा होऊन प्लिबीअन वर्गाला काही हक्क प्राप्त झाले आणि प्रशासनावर त्याचे वर्चस्व ट्रिब्यून (निर्वाचित नेता) या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत प्रस्थापित झाले. यामुळे सीनेट सभेला प्रतिस्पर्धी अशी संस्था निर्माण झाली आणि कॉन्सल व ट्रिब्यून या वरिष्ठ अधिकाऱ्यांत सत्तासंघर्ष उद्‌भवला. त्याचे पर्यवसान व्यक्तिविषयक स्वार्थामध्ये झाले. त्यातून पॉम्पी, सीझर यांसारखे जबरदस्त सेनापती उदयास आले. सीनेटने सीझरला दहा वर्षांकरिता सर्वाधिकारी (डिक्टेटर) नेमले. सीझरने काही लोककल्याणकारी योजना राबवून प्रशासनावर जरब बसविली व लोकप्रियता मिळविली. सीनेटला सीझरच्या हुकूमशाहीला पायबंद घालणे कठीण झाले. तेव्हा प्रजासत्ताकाबद्दलचे प्रेम असणारा एक वर्ग ⇨ मार्कस ब्रूटस, ⇨ अल्बायनस ब्रूटस, गेयस कॅसिअस आदी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सीझरच्या कट्टर विरोधात उभा राहिला. त्यांनी सीझरचा खून करविला (इ. स. पू. ४४). त्यानंतर अँटनीने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली आणि सीनेटच्या संमतीने दुसरे त्रिकूट अस्तित्वात आले. त्यात ऑक्टेव्हियन, मार्क अँटनी आणि लेपिडियस या लष्कर प्रमुखांचा अंतर्भाव करण्यात आला. रोमच्या प्रजासत्ताकात (रिपब्लिक) अंतर्गत क्रांती आणि विस्कळित शासनव्यवस्था यांमुळे अराजकता (अंदाधुंदी) माजली. सत्ताधारी त्रिकुटामध्ये मतभेद निर्माण झाले आणि मार्क अँटनी व ऑक्टेव्हियन यांत यादवी युद्ध होऊन ॲक्टियमच्या आरमारी युद्धात क्लिओपात्रा व अँटनीचा पराभव झाला (इ. स. पू. ३१). ऑक्टेव्हियनच्या नेतृत्वाखाली एका नव्या युगास आरंभ होऊन रोमन राज्य पुन्हा एकसंध बनले. परिणामतः ऑक्टेव्हियन हा ऑगस्टस हे नाव धारण करून रोमचा पहिला सम्राट व सर्वसत्ताधीश झाला. रोमच्या या संक्रमणकाळात लोकशाहीचा संकोच होऊन सम्राटशाहीस म्हणजे एकतंत्री राज्यकारभारास प्रारंभ झाला. ऑगस्टस व त्याचे उत्तराधिकारी यांनी सुरुवातीपासून प्राचीन प्रजासत्ताकाची चौकट आणि पारंपरिक स्वरूप तसेच ठेवून प्रत्यक्षात एकाधिकारशाही राबविली. ऑक्टेव्हियन (कार. इ. स. पू. २७-इ. स. १४) हा ज्यूलिअस सीझरचा नातलग होता. सीनेटने त्याला ऑगस्टस (आदरणीय) हे नामाभिधान आणि सर्व प्रांतांचे राज्यपालपद बहाल केले. कनिष्ठ वर्गाच्या सभेने त्याच्याकडे उच्च न्यायाधीशाचे अधिकार सुपूर्त केले. त्याच्याकडे आपाततः लष्कराचे सरसेनापतिपद आणि प्रांतांचे नेतृत्व (प्रिन्सेप) आले. त्याने प्रांतीय शासनव्यवस्था संघटित करून लष्कर सुसंघटित केले. रोमचे राज्य तत्कालीन जगतात विस्ताराने सर्वांत मोठे होते. राज्यविस्ताराचा त्याने विशेष प्रयत्न केला नाही. सीझरने निश्चित केलेल्या सीमाच त्याने मान्य केल्या.

ऑगस्टसचा पुतळा ऑगस्टसने प्रजासत्ताक काळातील शासनपद्धतीच बाह्यतः कायम ठेवली. तो सीनेटला योग्य तो मान देई. सीनेट सभा धोरणात्मक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य उपभोगीत होती आणि परंपरेनुसार आलेल्या अधिकारांप्रमाणे कायदे करण्याचे कामही चालू होते. एकदा तर त्याने सीनेटला आपली प्रशासकीय जबाबदारीतून मुक्तता करावी आणि सीनेट व जनसभा यांनी पूर्वीप्रमाणे प्रजासत्ताक पद्धती आणावी, अशी विनंती केली परंतु तो वारंवार सीनेट सभेकडून मुदतीचा अधिकार मिळवीत असे व या मुदतीच्या शेवटी बिनबोभाट अनेक वेळा अधिकारन्यास करीत असे. त्यामुळे सीनेटसुद्धा त्यालाच पुन्हा सर्वाधिकारी नेमत असे. थोडक्यात लषकरी हुकूमशाहीचे त्याने संवैधानिक राजेशाहीत रूपांतर केले आणि प्रजासत्ताकातील उपाध्या मात्र तशाच ठेवल्या. निरनिराळ्या अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम जनसभा करीत असे. ऑगस्टसने अननुभवी अधिकाऱ्यांना कमी करून जबाबदार कुशल अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना आपल्या हुकुमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले. याच वेळी पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक बाबतीत त्याने बदल केला नाही धार्मिक उत्सव तसेच चालू ठेवून परंपरावादी जुन्या रोमन घराण्यांना संतुष्ट ठेवले. कुटुंबाचे पावित्र्य वाढविले. व्यभिचार हा राष्ट्रीय गुन्हा ठरविला व प्रजोत्पादनास प्रोत्साहन दिले. सामान्य लोकांच्या तक्रारींची दाद लावण्याचे काम पूर्वी ट्रिब्यून नावाचे अधिकारी करीत. ऑगस्टसने ते स्वतःकडे घेतले आणि एकूण नीतिनियमांची एक विधिसंहिता तयार केली.


 सामान्य लोकांना मतदानाचा हक्क प्राप्त झाल्यापासून शासनकर्ते त्यांना अनुकूल करून घेण्यासाठी प्रसंगानुसार धान्य वाटण्याचे ठराव संमत करून घेत आणि हा प्रघात प्रजासत्ताकातील वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात आणला. इ. स. पू. पहिल्या शतकात यासंबंधी जणू सामान्य नियमच झाले होते. त्यावेळी खुद्द रोममध्ये धान्य स्वीकारणारे सु. तीन लक्ष भिक्षेकरी होते. ऑगस्टसला यातील अनिष्टपणा समजत होता, पण लोकप्रियतेसाठी त्याने धान्य वाटण्याची ही पद्धत तशीच चालू ठेवली. एवढेच नव्हे तर गोरगरिबांना तो पैसेही वाटत असे. याशिवाय लोकांनी राजकारणात फारसे लक्ष घालू नये. म्हणून त्याने सार्वजनिक सामने व खेळ यांना उत्तेजन दिले. या सुमारास रोममध्ये ‘ॲक्टियन गेम्स’ नावाचे सामने दर चार वर्षांनी भरत असत. या खेळांतील द्वंद्वयुद्धात पराभव पावलेल्यांना ठार मारण्याची क्रूर प्रथा मात्र ऑगस्टसने बंद केली. गुलामांची स्थिती सुधारण्यासाठी त्याने काही कायदे केले परंतु प्रत्यक्षात त्यांची पुढे अंमलबजावणी झाली नाही. तत्कालीन साहित्यात एकाही लेखकाने या क्रूर चालीसंबंधी निषेध अथवा सहानुभूती व्यक्त केलेली आढळत नाही एवढी ही प्रथा त्यावेळच्या समाजात हाडीमासी खिळली होती.

त्याने रोमची जनगणना करून समन्याय करपद्धती अंमलात आणली आणि नागरी सुविधांबरोबर नगरपालिकेची प्रशासनव्यवस्था सुधारली. सार्वजनिक बांधकामाच्या बाबतीत रोमने त्याच्या वेळी आघाडी मारली. खुद्द रोममध्ये त्याने अनेक धार्मिक वास्तू, सीनेटगृह, नवीन फोरम (न्यायमंदिर), ग्रंथालये, नाट्यगृह, शांततावेदी इ. वास्तू बांधल्या. स्वतःची कबरसुद्धा त्याने बांधून घेतली होती. त्याच्या काळी वीट हे बांधकामाचे प्रमुख माध्यम ठरले आणि संगमरवरी दगडाचा उपयोग फक्त भिंतींच्या दर्शनी भागावर व जमिनीसाठी करण्यात येई. जुन्या वास्तूंचा त्याने जीर्णोद्धार केला. रस्ते हे लष्कराच्या हालचालींचे महत्त्वाचे अंग आहे, हे लक्षात घेऊन त्याने राज्यातील जुने रस्ते दुरुस्त केले व नवीन तयार करुन त्यांचा विस्तार केला. संरक्षणाच्या दृष्टीने किल्ले बांधून रस्त्यांवरील सुविधा वाढविल्या. त्याने टपालसेवा विकसित करून त्याचे जाळे लष्करी संघटनेच्या आसपास वसविले. कला आणि वाड्मय यांना आश्रय दिला. त्याच्या वेळी औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रांत भरभराट झाली. सागरी व्यापारात रोमने आघाडी मिळविली. त्याने ‘पॅक्स रोमन’ (रोमन शांतता) ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणली. याप्रमाणे ऑगस्टसच्या काळात आपसांतील युद्धे संपून शांततेच्या काळास सुरुवात झाली. त्याची निदर्शक ग्रीक व लॅटिन नाण्यांवरील शांततेच्या देवतेची मूर्ती पहावयास मिळते. याप्रमाणे युद्धे बंद झाल्यामुळे लाभलेली शांतता, गरिबांना वाटले जाणारे धान्य, न्यायव्यवस्था, प्रशासनातील शिस्त, करमणुकीची हरप्रकारची साधने ही नवीन युगाचा आरंभ आहेत असे लोकांस वाटू लागले.

ऑगस्टसने रोमन राज्यकारभाराला जे बादशाही वळण लावले होते, त्यानुसार पुढील सुमारे दोनशे वर्षे रोमन साम्राज्याला सुखशांतीची व भरभराटीची गेली परंतु राज्यकारभाराचे लोकनियंत्रित स्वरूप हळूहळू नष्ट होत जाऊन त्यात अनेक अनिष्ट फेरफार होत गेले. ऑगस्टस आणि त्यानंतरचे सम्राट यांनी सैन्याच्या शिस्तीत अनेक फेरफार केले. सीझरच्या वेळेपासून खड्या सैन्याची योजना अंमलात आली होती. ऑगस्टसने ते अधिक कार्यक्षम केले. याच सैन्याच्या बळावर पुढील सम्राटांनी राज्यपद्धतीला लष्करीसत्ताक पद्धतीचे स्वरूप दिले.

ऑगस्टसला मुलगा नव्हता तरीसुद्धा पुढील यादवी संघर्ष टाळावा म्हणून त्याने आपल्यामागून आपला वारस गादीवर यावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेरच्या दिवसांत त्याने टायबीअरिअस या आपल्याच अनौरस मुलास दत्तक घेतले आणि त्याच्याशी आपल्या जुलिया या विधवा मुलीचा पुनर्विवाह केला. काही वर्षे (सुमारे दहा) ऑगस्टसने टायबीअरिअस याला सहसम्राट म्हणून शासनात सामावून घेतले आणि प्रशासनातील तपशिलांची माहिती दिली. साहजिकच त्याच्या मृत्यूनंतर त्याने केलेल्या मृत्युपत्राप्रमाणे टायबीअरिअस हा रोमचा विधिवत सम्राट झाला आणि सीनेटसभेनेही त्यास मान्यता दिली.


 सुरुवातीस टायबीअरिअस (इ. स. १४-३७) यांने ऑगस्टसचेच एकूण धोरण स्वीकारले पण राजेशाही थाटमाट कमी केला. त्याने सीनेटसभा व जनसभा यांत परस्पर भांडण लावून सीनेटचे काही अधिकार वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कारकीर्दीतील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे ख्रिस्ती धर्मप्रवर्तक येशू ख्रिस्त यांना रोमन आधिपत्याखालील पॅलेस्टाइन या भूप्रदेशात क्रॉसवर ठोकून मारण्यात आले. त्याच्या धरसोड वृत्तीमुळे जेरूसलेम येथे ऱ्हाईन खोऱ्यातील काही लष्करी पथकांनी बंड केले. त्याचा पुतण्या व मुख्य सेनापती जरमॅनिकस यास सैन्याने सम्राट करण्याचे आमिष दाखविले आणि फितुरीचे प्रयत्न केले परंतु टायबीअरिअस याने सावध होऊन त्यास भावी वारस म्हणून दत्तक घेतले आणि हा अंतर्गत संघर्ष टाळला. त्यातून घराणेशाहीने डोके वर काढले. त्याने इटलीचे महत्त्व कमी करून प्रांतांचे महत्त्व वाढविले. तो सिरियात गेला असता तेथेच मरण पावला. त्यानंतर त्याचा नातू कॅलिगुला (३७-४१) सम्राट झाला. त्याने प्रजासत्ताकाची पुनःस्थापना करण्यासाठी सामान्य लोकांना लेखन-भाषण स्वातंत्र्य जाहीर केले काही कर कमी करून करात सूट दिली. त्याच्या या उधळपट्टीमुळे खजिना रिक्त होताच, त्याने रद्द केलेले कर पुन्हा बसविले व सीनेटसभेवर जरब बसविली. स्वतःस तो देव मानी. सर्वांनी आपली पूजा करावी, तसेच ज्यूंनी आपल्या पुतळ्याची त्यांच्या सिनॅगॉगमधून प्रतिष्ठापना करावी, असा त्याने हुकूम काढला आणि आग्रह धरला. या त्याच्या कृत्यास ज्यूंनी विरोध करताच त्यांचा त्याने छळ आरंभिला. त्याच्या उद्दाम वर्तनास कंटाळून सुरक्षा दलातील काही अधिकाऱ्यांनी त्याचा खून केला.

सुरक्षा दलाने क्लॉडिअस (४१-५४) या वृद्ध व्यक्तीस सम्राटपदी बसविले. तो अर्धवट होता. मेसलायना या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने ॲग्रिपायना या महत्त्वाकांक्षी विधवेशी दुसरा विवाह केला. तिला पहिल्या पतीपासून झालेला नीरो नावाचा मुलगा होता. तिने राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन सेनापतींना ब्रिटनच्या स्वारीवर धाडले आणि तो भाग जिंकून रोमन साम्राज्यात समाविष्ट केला. पुढे ॲग्रिपायनाने आपल्या नीरो या मुलास गादी मिळावी म्हणून कट रचला आणि क्लॉडिअसला विष देऊन ठार मारले.

साहजिकच क्लॉअसनंतर नीरो (५४-६८) वयाच्या सोळाव्या वर्षी सम्राट झाला. खरी सत्ता आई ॲग्रिपायनाच्या हाती होती. स्टोइक तत्त्वज्ञ सेनिका आणि प्रमुख संरक्षक-वरिष्ठाधिकारी बरस यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने प्रशासनाचे धडे घेतले. सेनिका हा तर त्याचा गुरू होता. सुरुवातीची पाच वर्षे नीरोने अत्यंत संयमाने व काळजीपूर्वक राज्य केले. त्याच्या कल्याणकारी योजनांमुळे लोकांना ऑगस्टसच्या काळाचे स्मरण झाले. हा अल्पकाळ ‘क्विंक्वेनिअम नीरोनीस’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे परंतु आई-पत्नी यांचे वर्चस्व त्यास असह्य होऊन त्याने सर्व सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी अनुक्रमे पत्नी ऑक्टेव्हिया, मेहुणा ब्रिटॅनिकस आणि आई ॲग्रिपायना यांना ठार मारले. सेनिका आणि बरस यांच्या निवृत्तीनंतर टिजलायनस या दुष्ट व स्वार्थी व्यक्तीच्या कच्छपी तो गेला आणि राजवाड्यात नृत्य गायनादी कार्यक्रमांना ऊत आला. त्याच्या दरबारात कलावंतिणींचा प्रभाव वाढला. याशिवाय तो खेळ व मनोरंजनात अधिक वेळ खर्च करु लागला. साहजिकच अनाचार व अंदाधुंदी वाढून रोममध्ये दहशतीचे वातावरण पसरले. त्याच्या या वागण्यामुळे एकोणीस सीनेटरनी आत्महत्या केली किंवा त्यांना फाशी देण्यात आले, असे तत्कालीन बातमीपत्रात म्हटले आहे. त्यात सेनिकासारखा तत्त्वज्ञही होता. या वर्तनाचा रोमच्या आर्थिक बाबींवर परिणाम झाला. तेव्हा नीरोने हिणकस नाणी पाडून आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला परिणामतः रोमच्या चलनाचे अवमूल्यन झाले. पुढील सम्राटांनी त्याच्या या चलनपद्धतीचे अनुकरण केले.


 इ. स. ६४ मध्ये रोममधील एका भागाला आग लागली. रोम जळत असताना तो फिडल-वादनात मग्न होता, अशी वदंता पुढे प्रसृत झाली. जळून गेलेल्या रोमची त्याने सुबद्व पुनर्रचना केली आणि भव्य प्रासाद, रेखीव रस्ते आणि स्नानगृहे बांधली तथापि त्याच्यावर रोम पेटविल्याचा लोक आरोप करीतच होते. ख्रिस्ती धार्मियांनी रोम पेटविले असे गृहीत धरुन त्याने ख्रिस्ती लोकांचा अनन्वित छळ केला. किंबहुना या निमित्ताने त्यांच्या छळास प्रथमच सुरुवात झाली. या छळात सेंट पीटर, सेंट पॉल यांसारखे थोर संत मृत्युमुखी पडले. काहींना खिळे मारून क्रूसला टांगण्यात आले, तर काहींच्या अंगाला ज्वालाग्राही पदार्थ फासून जाळण्यात आले. याच सुमारास स्पेनमधील सर्व्हीअस गॅल्बा या राज्यपालाने बंड केले. नीरोचा मुख्य सल्लागार व संरक्षक अधिकारी टिजलायनस याने नोकरी सोडली. तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याने ९ जून ६८ रोजी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूने ज्यूलिओ-क्लॉउडियन वंश संपुष्टात आला. या सुमारे पन्नास वर्षांच्या कालावधीत काही अकार्यक्षम व जुलमी सम्राट झाले, तर काही अत्यंत प्रजाहितदक्ष होते तथापि ऑगस्टसने निर्माण केलेल्या शिस्तबद्व शासनव्यवस्थेतील कार्यक्षम व न्यायी प्रशासकांमुळे रोमन राज्याची भरभराट झाली आणि साम्राज्याचा विस्तार होऊनही सर्व व्यवहार सुरळीत चालू राहिले. न्यायपद्धतीवरील लोकांचा विश्वास दृढ तर झाला आणि खड्या सुसज्ज लष्करामुळे शत्रूचे फारसे भय राहिले नाही. सैन्याच्या जलद व सहज टायटसच्या कमानीवरील उत्थित शिल्प हालचालींसाठी जुन्या रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्त्यांचे बांधकाम यांना चालना मिळाली. राज्यांतर्गत शांतता, रहदारीच्या सुविधा आणि तुरंगी मुखत्यारांकडे सम्राटांनी सुपूर्त केलेली आर्थिक बाबींची व्यवस्था, यांमुळे साहजिकच व्यापारात भरभराट होऊन देवाण-घेवाण वाढली. मात्र राज्यकारभारावर सम्राटांचा जसा प्रभाव वाढला, तसे सीनेटसभेचे राजकीय धोरण ठरविण्याचे परंपरागत अधिकार संपुष्टात आले आणि तिचे नाममात्र अस्तित्व राहिले. सीनेटर या व्यक्तीचे राजकीय महत्त्व कमी झाले. पुढे सीनेटर मोठमोठ्या जमिनी खरेदी करून आलिशान प्रासाद बांधू लागले. त्यांच्यात विलासी वृत्ती वाढली. सम्राटांकडून काही सीनेटरांचे खून झाल्याची उदाहरणेही या काळात आढळतात.

रोम व रोमन राज्यातील अन्य शहरे यांतून नागरी सुविधांबरोबर राज्यकर्त्यांनी नहर बांधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. सांडपाण्यासाठी जलनिःसारणाची व्यवस्था, सार्वजनिक मुताऱ्या आणि सार्वजनिक स्नानगृहे ही तत्कालीन नगरव्यवस्थेची काही खास वैशिष्ट्ये असून त्यांचे बांधकाम या काळात झाले. याशिवाय सार्वजनिक करमणुकीसाठी व सामने भरविण्यासाठी खुली नाट्यगृहे आणि क्रीडांगणे बांधण्यात आली. साहित्य कलादींना सम्राटांनी उत्तेजन दिले. नीरोने उद्ध्वस्त रोमची सुबद्ध पुनर्बाधणी केली.

प्रजासत्ताकाच्या वेळी वारंवार उद्‌भवणाऱ्या युद्धप्रसंगांमुळे कृषिव्यवसायाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले होते. शिवाय युद्धात पकडून आणलेल्या कैद्यांमुळे गुलामांचा फार मोठा वर्ग निर्माण झाला होता. तो शांतताकाळात हळूहळू कमी होऊन इटलीतील सामान्य शेतकरी शेतीकडे अधिक लक्ष पुरवू लागला. त्यामुळे फळबागा, मळे फुलले आणि अन्य पिके नियमित येऊ लागली. एकूण या काळात सामान्य माणसाचे जीवनमान सर्व बाबतींत सुधारलेले दिसते.


 नीरोनंतर गॅल्बा (६९), मार्कस ओथो (६९) आणि ऑलस व्हटेलीअस हे तीन सम्राट सैन्य पथकांच्या जोरावर सत्तारुढ झाले. त्यांपैकी गॅल्बा वयस्क होता (७३ वर्षे). त्याने सैनिकांवर कडक बंधने लादली व काटकसरीचे धोरण अवलंबिले. त्यामुळे तो अप्रिय झाला व त्याला जाळून मारण्यात आले. त्यानंतर व्हटेलीअस या सरसेनापतीने सत्ता हस्तगत केली. तो क्रूर व भ्रष्ट होता. त्याच्याकडून सैनिकांचा पगार तटला. तेव्हा सैन्याने त्याचा निर्घृणपणे वध केला आणि ओथो हा सेनापती सम्राट झाला. अस्थिर राजकीय परिस्थितीत ओथोने आत्महत्या केली या सुमारास डॅन्यूबमधील लष्करी पथकांनी २० डिसेंबर ६९ रोजी रोम शहरात प्रवेश केला. त्यांना संरक्षक दलांनी कडाडून विरोध केला. व्हटेलीअसच्या मृत्यूनंतर काही दिवस रोममध्ये अशांत वातावरण होते. अखेर सीनेटने ईजिप्तमध्ये असलेल्या टायटस व्हेस्पेझ्यन या राज्यपालास आणि त्याचा थोरला मुलगा टायटस यांना कॉन्सल निवडले (७०). व्हेस्पेझ्यन (६९-७९) सम्राट झाल्यानंतरही अंतर्गत झगडा चालू होता. ज्यूडीयातील ज्यूंनी बंड केले. तेव्हा ज्येष्ठ मुलगा टायटस याने जेरुसलेमचा पाडाव करून ज्यूंचा छळ केला (७०). त्याने अनेक सार्वजनिक लोकोपयोगी कामे केली आणि सैन्य, प्रशासन व आर्थिक बाबी यांत सुधारणा केल्या आणि रोममध्ये शांतता प्रस्थापित केली. त्याने इमारती बांधल्या. त्यांतील कॉलॉसिअमची वास्तू भव्य होती. त्याच्या कारकीर्दीपासून फ्लेव्हिअन वंश सत्तास्थानी आला. त्याच्यानंतर टायटस (७९-८१) गादीवर आला. तो वडिलांच्या स्वाऱ्यांत नेहमी बरोबर असे. काही काळ सहसत्ताधीश म्हणूनही त्याने वडिलांना मदत केली. त्याने कॉलॉसिअमचे उर्वरित बांधकाम पूर्ण केले आणि एक भव्य स्नानगृह बांधले. त्याच्या कारकीर्दीत रोममध्ये मोठी आग लागली आणि ज्वालामुखीने इटलीत प्राणहानी झाली. त्यात पाँपेई व हर्क्युलेनिअम ही नगरे नष्ट झाली. डमिशन या धाकट्या भावाने त्यास मारण्याची व्यवस्था केली आणि सत्ता हस्तगत केली. डमिशन (८१-९६) याने ख्रिस्ती लोकांना पुन्हा छळण्यास सुरुवात केली. त्याच्या वेळी अग्रिकला या सेनापतीने सर्व ब्रिटन जिंकले पण साम्राज्याच्या बेनिव्हेन्टो येथील ट्रेजनची कमान संपत्तीची उधळपट्टी होईल, म्हणून त्याने अग्रिकलाला परत बोलाविले. डमिशनला डेश (रुमानिया) प्रदेश जिंकता आला नाही. त्याने गॉथ लोकांवर स्वारी केली, पण तीत त्याचा पराभव झाला. याला पुढे उपरती होऊन त्याने ख्रिस्ती धर्मियांचा छळ थांबविला. डमिशननंतर आलेल्या पाच सम्राटांनी (९६-१८०) शासनव्यवस्था अत्यंत चोख ठेवली आणि अनेक लोकोपयोगी सुधारणा करून जनसामान्यांत सुरक्षितता व सौहार्दाचे वातावरण निर्माण केले, म्हणून हे शतक ‘कल्याणकारी सम्राटांचे शतक’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. डमिशननंतर ज्येष्ठ सीनेटर नर्व्हा (९६-९८) या सज्जन व्यक्तीची सम्राट म्हणून सीनेटने निवड केली. त्याने राजद्रोहाचे खटले थांबविले आणि सीनेटची प्रतिष्ठा वाढविली. नर्व्हाने ट्रेजन या सेनापतीस सहसम्राट (राजमुखत्यार) नेमले. साहजिकच नर्व्हाच्या मृत्यूनंतर ट्रेजनची सम्राटपदी निवड झाली. ट्रेजन (९८-११७) हा जन्माने स्पॅनिश असून परोपकारी व कसलेला सेनानी होता. अंतर्गत धोरणात त्याने सीनेटची प्रतिष्ठा वाढवून शेतीव्यवसायास उत्तेजन दिले. फोरमसारख्या वास्तू बांधून त्याने रोमचे सौंदर्य वाढविले. त्याने डेश (रूमानिया) जिंकून त्या प्रदेशात रोमन वसाहती स्थापल्या. सीमेविषयीचे त्याचे धोरण सावधगिरीचे होते. त्याने रोमची पूर्व सीमा आर्मोनिया व मेसोपोटोमियापर्यंत वाढविली. स्वारीवर असता सिलिशिया येथे तो मृत्यू पावला. त्याने हेड्रिअन यास वारस ठरविले होते.

हेड्रिअन (११७-३८) याने ट्रेजनने काबीज केलेले प्रांत सोडून दिले. त्याच्या कारकीर्दीत सार्मेशियन लोकांबरोबर बरीच वर्षे संघर्ष चालू होता. त्याने युफ्रेटीसमधील रोमन सत्ता काढून घेऊन ब्रिटनमध्ये रानटी टोळ्यांपासून संरक्षण व्हावे, म्हणून इंग्लंडच्या उत्तर किनाऱ्यावर कार्लाइल ते न्यूकॅसल दरम्यान भिंत (हेड्रिअन-वॉल) बांधली (१२१). सीनेट आणि सैन्य यांचे त्याने पुनर्संघटन केले. त्याच्या कारकीर्दीत संरक्षक दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले सर्व कायदे संगृहीत करण्यात आले. गुलामांना ठार मारण्याचा अधिकार त्याने रद्द केला. ज्यू लोकांशी इ. स. १३२-३५ दरम्यान दुसरे युद्ध झाले. त्यात त्याने अनेक ज्यूंना कंठस्नान घातले. मृत्यूपूर्वी त्याने अँटोनायनस पायस यास वारस निवडले.


 अँटनायनस पायस (कार. १३८-६१) आणि मार्कस ऑरिलियस (कार. १६१-८०) हे दोन कर्तबगार राजे अनुक्रमे गादीवर आले. लूशस व्हिरस (कार. १६१-६९) याबरोबर मार्कस ऑरिलियसने संयुक्त सम्राट म्हणून राज्य केले. व्हिरस इ. स. १६९ मध्ये मरण पावला. त्यांच्या कारकीर्दीत सर्व क्षेत्रांत विकास होऊन भरभराट झाली व राज्याला शांतता लाभली. त्यामुळे या काळास ‘सुवर्णयुग’ ही संज्ञा देतात. अँटनायनसची अनेक स्मारके आढळतात. सीनेटशी त्यांचे संबंध चांगले होते तसेच कार्यक्षम राज्यपालांमुळे प्रांतांचे प्रशासन सुलभ झाले. आफ्रिका, दासिया (डेश) व ईजिप्त यांतील किरकोळ उठाव शमविल्यानंतर अपुरी बांधकामे पूर्ण करण्यात आली. हा काळ सुरक्षितता आणि समृद्धी यांनी संपन्न झाला. ऑरिलियसने पुढे मेसोपोटेमिया परत जिंकून घेतला आणि रानटी जर्मन टोळ्यांना डॅन्यूब नदीपलीकडे हाकून दिले. त्याच्या कारकीर्दीत दुष्काळ, रोगराई यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आणि रानटी टोळ्यांचे हल्ले यांनी लोक हतबल झाले तथापि गरिबांचा कर कमी करुन आणि त्यांना धान्यादी वस्तू वाटून त्याने मदत केली. ग्लॅडिएटरच्या खेळातील क्रूरपणा त्याने कमी केला. तो वक्ता, कायदेपंडित, तत्त्ववेत्ता होता. त्याच्या स्टोईक तत्त्वज्ञानावरील मेडिटेशन हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आपल्या मार्कस फ्रॉन्टो या गुरूंना लिहिलेल्या त्याच्या पत्रांतून त्याचे गुणविशेष आढळतात. ख्रिस्ती लोकांच्या धर्मच्छळास ट्रेजन सम्राटाच्या वेळी प्रारंभ झाला व तो पुढे हेड्रिअन, अँटनायनस पायस व मार्कस ऑरिलियस यांच्या कारकीर्दीत तसाच चालू राहिला. त्यात पॉलिकॉर्प व जस्टिन या संतांचे बळी पडले. आपला शेवट जवळ आला आहे, असे पाहून त्याने प्रायोपवेशन केले.

त्यांच्यानंतर त्याचा मुलगा कोमोडस (कार. १८०-९२) गादीवर आला. त्याला सीनेटबद्दल तिरस्कार होता. तो स्वतःस निष्णात ग्‍लॅडिएटर (असिक्रीडक) समजत असे. त्याच्या क्रूर व जुलमी वर्तणुकीमुळे लोक व सीनेटर हैराण झाले. त्याने जर्मन टोळ्यांबरोबर नामुष्कीचा शांतता तह केला. त्याच्या स्वैर व अत्याचारी वर्तणुकीमुळे जनता त्रस्त झाली. त्यातच त्याचा खून झाला. त्याच्या कारकीर्दीपासून रोमन सम्राटशाहीच्या अधःपतनास प्रारंभ झाला, असे मानण्यात येते कारण त्याच्या कारकीर्दीपासून संरक्षक दलातील श्रेष्ठ अधिकाऱ्यांचा-सेनापतींचा पुढील सर्व सम्राटांवर कायमचा वचक बसला आणि सीनेटसभा संरक्षक दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने किंवा दडपणाखाली सम्राटाची निवड करू लागली. त्यामुळे राजा निवडीचे सीनेटचे अधिकार जवळजवळ संपुष्टात आले. या पद्धतीने पर्टनॲक्स सत्तारूढ झाला, पण तीन महिन्यांतच त्याचा खून झाला. राजाचा खून करणाऱ्या सैनिकांनी साम्राज्याचा लिलाव मांडला, तेव्हा डिडीअस जूलीएनसने हा लिलाव घेऊन ६६ दिवस राज्य केले (१९३). यावेळी सिरिया, ब्रिटन इ. प्रांतांतील सैन्यांनी वेगवेगळ्या राज्यपालांची स्वतंत्र सम्राट म्हणून निवड केली. आफ्रिकेतील सैन्याने सेप्टिमिअस सिव्हीरस (कार. १९३-२११) याला राजा निवडले. इतरांच्या अगोदर तो रोमला येऊन पोहोचला. त्याच्यापासून सिव्हिरीअन वंशाची रोमच्या गादीवर स्थापना झाली. तो जन्माने आफ्रिकन होता, पण त्याने लॅटिन व ग्रीक भाषा आत्मसात केल्या. कुशल सेनापती म्हणून तो प्रसिद्ध होता. सीनेटने त्याच्यावर देखरेख करण्यासाठी ॲल्बायनस याला सहसम्राट केले. दोघांत युद्ध होऊन ॲल्बायनस मारला गेला (१९७). सिव्हीरसने गॅलियातील बंडाळी मोडून पार्थियावर स्वारी केली आणि मेसोपोटेमिया, बॅबिलोनिया इ. प्रदेश पादाक्रांत केले. त्याने सीनेटचे अधिकार कमी करून स्वतःकडे सर्व अधिकार घेतले. त्याची सर्व भिस्त सैन्यावर होती. स्कॉटलंडच्या स्वारीवर असताना यॉर्क शहरी तो मरण पावला. मरतेसमयी त्याने कॅराकॅला (कार. २११-१७) आणि जीटा या आपल्या दोन मुलांना संयुक्तपणे राज्य करण्यास सांगितले पण कॅराकॅला याने जीटाचा खून करून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली (२१२). त्याने लष्करी सामर्थ्य वाढविले. नागरिकांपासून मिळणारे उत्पन्न वाढावे, म्हणून त्याने साम्राज्यातील गुलामांव्यतिरिक्त सर्वांनाच रोमन नागरिकत्वाचे अधिकार दिले. त्याने बांधलेली स्नानगृहे प्रसिद्ध असून त्याचेच नाव त्यांस पुढे प्राप्त झाले.


 त्याने इराणवर पुन्हा स्वारी केली या स्वारीत मार्कस मक्रायनस या त्याच्या मूर अधिकाऱ्याने आपल्याला राजाकडून धोका आहे, असे समजून त्याचा खून केला (२१७). यानंतर दोन वर्ष सैन्याच्या जोरावर मक्रायनस (कार. २१५-२१७) या बिगर सीनेटरने राज्य केले पुढे त्याच्या सिरियन लष्कर पथकाने बंड करून त्यास मारले. यावेळी हीलीओगॅबलस (कार. २१८-२२२) या कॅराकॅलाच्या चुलत भावाने सिरियातील सैन्याच्या मदतीने गादी मिळविली. त्याने सिरियन सूर्यदेवतेची (इमेश) पूजा अधिकृत केली व आपली तुलना या देवतेशी तो करू लागला. नव्या धर्माच्या नावाखाली तो अनाचार करू लागला. तेव्हा त्याच्या संरक्षक दलाने उठाव करून त्याला ठार मारले आणि सव्हिरस (कार. २२२-२३५) या त्याच्या दत्तक मुलास सम्राट केले. त्याच्या वेळी इराणमध्ये सॅसॅनिडी वंशाची स्थापना होऊन इराणने रोमन अंमल धुडकावून लावला. तेव्हा त्याने इराणबरोबर युद्ध केले व सॅसॅनिडी राजा पहिला आर्दशिर याचा पराभव केला. पुढे ऱ्हाईन नदीकाठी उद्‌भवलेले बंड मोडण्यासाठी सव्हिरस तिकडे गेला असता गॉथ वंशातील मॅक्समिनस (कार. २३५-२३८) याने बंड करून सव्हिरस व त्याच्या आईला ठार मारले व स्वतः तीन वर्षे राज्य केले. मॅक्समिनसने जर्मन टोळ्यांविरुद्ध अनेक विजय मिळविले पण इ. स. २३८ मध्ये आफ्रिकेतील एका बंडात तो मारला गेला. रोमन सीमेवर होणारे सततचे रानटी टोळ्यांचे हल्ले, प्रांतांतील लष्करी तुकड्यांमधील सेनापतींची कारस्थाने आणि संरक्षक दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वर्चस्व व सीनेटसभेचे नाममात्र अस्तित्व यांमुळे रोमच्या सम्राटांना अंतर्गत व बाह्य शत्रूंशी लढा देणे क्रमप्राप्त झाले. बाह्य शत्रूंचा पराभव केला, तरी तह करताना वरिष्ठ सेनापती दुखावला गेल्यास त्याने दुसऱ्या व्यक्तीस सम्राट करावे, असा शिरस्ता पडला आणि त्यातून सैन्याच्या शिरजोरपणामुळे सम्राटांचे खून पडू लागले. पहिला, दुसरा, तिसरा गोर्डिअन, सीनेटर प्यूपिइनस आणि बॅलबायनस इ. चार-पाच सम्राट इ. स. २३५ ते २४४ दरम्यान रोमच्या गादीवर विराजमान झाले आणि खुनाला बळी पडले. पुढे तिसऱ्या गोर्डिअनचा खून करून संरक्षक दलातील एक वरिष्ठ सेनानी फिलिपस (कार. २४४-२४९) सम्राट झाला. त्याने इराणबरोबर नामुष्कीचा तह केला. लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी त्याने रोमच्या स्थापनेचा सहस्त्रसंवत्सर समारंभ साजरा केला. डीशस या मुख्य सेनापतीस त्याने डॅन्यूब खोऱ्यातील उठाव मोडण्यासाठी पाठविले. डीशसने बंड करून व्हेरोना येथील युद्धात फिलिपसला मारले आणि सम्राटपद बळकाविले. डीशस (कार. २४९-२५१) हा ख्रिस्ती लोकांच्या बाबतीत कर्दनकाळच ठरला. त्याने स्थिरस्थावर झालेल्या ख्रिस्ती धार्मियांचा छळ पुन्हा सुरू केला. गॉथ लोकांबरोबर लढताना तो मरण पावला. त्यानंतर त्याचा मुलगा हॉस्टिलीअन आणि नंतर इमिलीएनस यांनी अनुक्रमे कसेबसे एक वर्षभर सम्राटपद भोगले (२५३). दोघांचेही खून झाले. त्यानंतर लष्कराच्या मदतीने व्हलिरीअनला इराणी लोकांनी पकडून साम्राज्यात गोंधळ माजविला (२५३-२६०). त्यानंतर सर्व सत्ता मुलगा गॅलीईनसच्या (कार २६०-२६८) हाती आली. प्रांतांतील अंदाधुंदी आणि सत्ताधाऱ्यांतील संघर्ष, रोगराई इत्यादींमुळे लोकसंख्या घटू लागली. याच काळात (२६०- २७०) रोमन साम्राज्याच्या प्रत्येक प्रांतातील सैन्याने आपापल्या सेनाधिकाऱ्यांना राजे म्हणून निवडावे आणि त्यानी आपसांत झगडावे, असा जणू शिरस्ता पडला. यादवी युद्धाच्या काळात जर्मन आणि गॉथ या रानटी जमातींनी साम्राज्यावर स्वाऱ्या केल्या. रोमचा आर्मेनियावरील प्रभाव कमी झाला. गॅलीईनसकडे इटली आणि काही बाल्कन राष्ट्रे एवढाच भूप्रदेश राहिला. त्यावेळी अंतर्गत उठाव झाला आणि त्यात गॅलीईनसही मारला गेला. पुढे क्लॉडीअस (कार. २६८-२७०) हा लष्काराच्या मदतीने सम्राट झाला. त्याने पूर्वेकडील गॉथ लोकांच्या आक्रमणास पायबंद घातला. तो प्लेगने पुढील वर्षी मरण पावला. त्यानंतर गादीवर आलेल्या ऑरिल्यन (कार. २७०-२७५) याच्या कारकीर्दीत झिनोबीआ ही अत्यंत चतुर व बुद्धिमान महिला रोमन सम्राटाच्या विरोधात उभी राहिली.

झिनोबीआ ही पॅल्मायराचा (सिरिया) राजा सेप्टिमिअस ऑडिनेथस याची स्वरुपसुंदर दुसरी पत्नी. सेप्टिमिअसने रोमच्या सहकार्याने व्यापार-उदीम वाढविला. रोमन साम्राज्यांतर्गत आपले राज्य स्वायत्त रहावे, म्हणून तो प्रयत्नशील होता तथापि झिनोबीआने कट करून त्याचा खून करविला आणि ती आपल्या मुलाच्या नावाने राज्य करू लागली. तिने आशिया मायनर, उर्वरित सिरिया, उत्तर मेसोपोटेमिया व ईजिप्तचाही काही भाग जिंकला आणि आशियातील रोमन सत्ता झुगारून देऊन आपल्या मुलाचा ती सम्राट म्हणून उल्लेख करू लागली. तेव्हा ऑरिल्यन याने पॅल्मायरा पादाक्रांत केला आणि झिनोबीआला कैद करून रोमला आणले. उर्वरित आयुष्य तिने निवृत्तीत तिव्होली (इटली) येथे व्यतीत केले. याच वेळी ऑरिल्यनने गॉथ व व्हँडॉल या रानटी टोळ्यांना डॅन्यूबच्या पलीकडे हाकलून लावले. रोमभोवती त्याने संरक्षणासाठी भिंत बांधली. ऑरिल्यनचा इ. स. २७५ मध्ये खून झाला. यानंतर टॅसिटस (कार. २७५-२७६), फ्लोरिएनस (२७६) आणि प्रोबस (कार. २७६-२८२) हे औटघटकेचे सम्राट सीनेट आणि लष्कर यांच्या सहकार्याने सत्तास्थानी आले. प्रोबसने जर्मनांच्या धाडीपासून गॉल संरक्षिले, व्हँडॉलांना परतविले आणि आशिया मायनर व सिरियातील उठाव मोडून काढले. पुढे त्याने काही कृषिविषयक सुधारणा केल्या. लष्कराच्या उठावात तो मारला गेला. या सु. शंभर वर्षांच्या प्रदीर्घ काळात रोमवर पूर्व व पश्चिमेकडून रानटी टोळ्यांचे सतत हल्ले होत होते. या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सुसज्ज लष्कराची जुळणी सम्राटांनी केली. लष्कराच्या वाढीबरोबर सम्राटांमध्ये परकीय प्रदेश जिंकण्याची चढाओढ लागली आणि रोमन साम्राज्याचा विस्तार पूर्वीपेक्षा जवळजवळ दुप्पट झाला. या अफाट साम्राज्यावर अकर्तबगार सम्राटांना नियंत्रण ठेवणे अशक्यप्राय झाले. परिणामतः लष्करातील सेनापतींचे वर्चस्व वाढले आणि खर्चाबरोबर मनुष्यबळ व संपत्ती विशेषतः साधन-संपत्ती कमी पडू लागली. लष्कराने सम्राट निवडावा आणि आपल्या इच्छेनुसार त्याला पदभ्रष्ट करावे, असा जणू अलिखित संकेतच झाला. मधल्या सदुसष्ट वर्षांत तर २९ सम्राट गादीवर आले, परंतु त्यांपैकी फक्त चारजण नैसर्गिक रीत्या मरण पावले, उर्वरित सम्राटांचे खून झाले. हे सम्राट ‘बरॅक्‌स एम्परर्स’ म्हणून प्रसिद्ध असून ते सदैव युद्धांत गुंतलेले असत आणि नेहमी सीमारेषांजवळ लष्कराच्या तंबूंतून राहत.


 यानंतर कॉरस (कार. २८२-२८३) आणि नंतर त्याचे दोन मुलगे करायनस व न्युमेरिअन (कार. २८३-२८४) यांनी सम्राटपद भोगले. त्यांचा सेनापती डायोक्लीशन (कार. २८४-३०५) न्युमेरिअनच्या मृत्यूनंतर करायनसचा पराभव करुन गादीवर बसला. सामान्य शिपायापासून सेनापतिपदापर्यंत तो स्वकर्तृत्वाने चढला होता. त्याने लष्कराच्या सामार्थ्यावर बरॅक्स एम्परर्स यांनी सुरू केलेले यादवी युद्ध थांबविले. बिथिनियातील निकोमीडीया हे शहर आपली राजधानी केले. तो स्वतःस ज्यूपिटरचा प्रतिनिधी माने. म्हणून त्याने जोव्हिअस हे नाव धारण केले. त्याने एका वेळी दोन सम्राटांनी संयुक्तपणे राज्य करावे, असा कायद्यात बदल केला. गॉलवरील यशस्वी स्वारीनंतर लष्कराच्या सोयीसाठी त्याने सेनापती मॅक्सिमीअन यास सहसम्राट केले. त्याच्याकडे पश्चिम भागाचे सम्राटपद दिले. प्रशासनाच्या व्यवस्थेसाठी साम्राज्याचे पूर्वेकडील दोन व पश्चिमेकडील दोन असे चार स्वतंत्र विभाग केले आणि प्रत्येकावर एक प्रमुख नेमून त्यास उपसम्राट (ज्युनिअर सीझर) ही पदवी दिली. या उपसम्राटांपैकी कन्स्टॅन्‌शिअस याने स्वतंत्र होऊ पहाणारा ब्रिटन हा प्रांत पुन्हा जिंकून घेतला, दुसरा उपसम्राट गलिरिअसने इराणी लोकांचा पराभव करुन मेसोपोटेमिया हा प्रदेश रोमन साम्राज्यात अंतर्भूत केला. तेव्हा डायोक्लीशनने पूर्व साम्राज्यात गलिरिअसला आपला सहसम्राट नेमले (२९३). पुढे त्याने ईजिप्तमधील बंडाळी मोडून काढली (२९६-२९७).

डॉयोक्लीशनची अशी इच्छा होती, की आपल्यामागून कन्स्टॅनशिअस व गलिरिअस यांनी संयुक्त सम्राट व्हावे आणि यादवी युद्ध टाळावे. याकरिता त्याने आपली मुलगी गलिरिअसला दिली व कन्स्टॅन्‌शिअसने सेंट हेलन (कॉन्स्टंटीन द ग्रेटची आई) हिला घटस्फोट देऊन मॅक्सिमीअनची मुलगी केली. त्याचे आर्थिक धोरण अपयशी ठरले. महसूल वाढविण्यासाठी त्याने हिणकस चलनपद्धती प्रचारात आणली. त्यामुळे चलनवाढ झाली, तेव्हा त्याने पुन्हा सोन्या-चांदीची नाणी पाडली, पण वेळ निघून गेली होती.

रोमच्या पारंपरिक पेगन धर्माचे महत्त्व वाढविण्याच्या प्रयत्नात त्याने अनेक कायदे केले आणि ख्रिस्ती धर्मियांवर हल्ले चढविले. त्याने चर्चवास्तूंची मोडतोड केली आणि त्यांची धार्मिक हस्तलिखिते जाळली. याबाबत एकामागून एक अशा चार आज्ञा चौथ्या शतकात काढलेल्या आढळतात. पाद्ऱ्यांना अटक करून त्यांना रोमन देवतांसमोर बळी दिले. त्याच्या कारकीर्दीत ख्रिस्ती लोकांचा जो अनन्वित छळ झाला, तेवढा रोमन काळात यापूर्वी कधीही झाला नव्हता. त्याच्या मृत्यूनंतरही हीच अवस्था काही दिवस होती. १ मे ३०५ मध्ये त्याने स्वेच्छेने राज्यत्याग केला आणि मॅक्सिमीअनला राज्यत्याग करण्यास भाग पाडले. त्यानंतर कन्स्टॅन्‌शिअस आणि गलिरिअस हे संयुक्त सम्राट राज्यावर आले. डायोक्लीशनच्या या वारसांनी दहा वर्षे (३०५-३१३) हा साम्राज्याचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. सेनापतींच्या वर्चस्वामुळे जो तो सहसम्राट म्हणवून घेऊ लागला. एकावेळी असे सात सहसम्राट त्या काळात निर्माण झाले आणि अखेर अंतस्थ कलह होऊन त्यातून पश्चिम साम्राज्यावर कॉन्स्टंटीन व पूर्व साम्राज्यावर लायसिनीअस या दोघांची निवड झाली. यांपैकी कॉन्स्टंटीन हा डायोक्लीशनच्या राज्यत्यागानंतर पश्चिम साम्राज्याचा सहसम्राट झाला होता आणि जेव्हा मॅक्सिमीअन हा त्याचा पिता ब्रिटनमध्ये मरण पावला (३०६), तेव्हा लष्करी पथकांनी त्याच्या सम्राटपदास मान्यता दिली.

लायासिनीअस हा ख्रिस्ती धर्माविरुद्ध होता, तर त्यांचा छळ थांबवावा, असे कॉन्स्टंटीनला वाटे. अखेर इ. स. ३२३ मध्ये दोघांत युद्ध झाले. त्यात लायसिनीअसचा पराभव झाला. पुढे ३२५ मध्ये त्याला फाशी देण्यात आले. त्याच्या हाती सर्वसत्ता आली. कॉन्स्टंटीन (कार. ३०६-३३७) याने चार सम्राटांची पद्धत बंद केली. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला व इतर धर्माबरोबर ख्रिस्ती धर्माला मिलानच्या राजाज्ञेने मान्यता दिली. ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी त्याने प्रयत्न केले. रोममध्ये जुन्या धर्माचे व लोकशाहीचे वर्चस्व होते. अंतर्गत कटकटींतून सुटका करून घेण्यासाठी त्याने राजधानी, पूर्व आणि पश्चिम साम्राज्यांना मध्यवर्ती ठरेल अशा बायझँटियम (बिझँटिअम) येथे नेली आणि त्यास कॉन्स्टंटिनोपल हे नाव दिले. हे शहर त्याने रोमसदृश चार वर्षांत बांधून घेतले. या शहरात एक विद्यालय, दोन नाट्यगृहे, आठ सार्वजनिक स्नानगृहे, पाच कोठारे, आठ जलनिधी, सीनेटगृह व न्यायालय, १४ प्रार्थनामंदिरे, १४ राजप्रासाद व उच्च वर्गांतील लोकांसाठी ४,३८८ प्रासाद इतक्या इमारती बांधविल्या. आशिया मायनर आणि पूर्व भूमध्य भागावर नियंत्रण राहावे, हाही त्यामागे हेतू होता. त्याने अधिकारतंत्रपद्धती अंमलात आणून प्राचीन समाजव्यवस्था बदलून टाकली. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने प्रीफेक्चर, डायसिस आणि प्रांत असे राज्यांतर्गत विभाजन केले. यामुळे नागरी प्रशासनात पुढे बिशपांचा प्रभाव वाढला. त्याने काही महत्त्वाचे कायदे केले. त्यांपैकी निर्धन दरिद्री कुटुंबात मुलांना ठार मारण्याची प्रथा होती. ती त्याने बंद केली. गरीब कुटुंबास मदत देण्याचे नियम केले, तसेच बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल आणि तरुण मुलींना पळविणाऱ्यास देहान्त शासनाची शिक्षा ठरविली. ख्रिस्ती धर्माविषयीच्या उदार धोरणामुळे त्यास पुढे ‘कॉन्स्टंटीन द ग्रेट’ हे नाव प्राप्त झाले. पुढे त्याच्या मुलांत राज्याकरिता आपसांत संघर्ष झाले.


 कॉन्स्टंटीनच्या नंतर सुरुवातीस त्याचे अनुक्रमे तीन मुलगे दुसरा कॉन्स्टंटीन (कार. ३३७-३४०), कॉन्स्टॅन्झ (कार. ३३७-३५०) आणि दुसरा कन्स्टॅन्‌शिअस (कार. ३३७-३६१) हे संयुक्तपणे राज्य करू लागले, पुढे ते भिन्न विभागांत सत्तारूढ झाले तथापि त्या तिघांत कधीच समझोता झाला नाही आणि कन्स्टॅन्‌शिअस याने रानटी टोळ्यांच्या हल्ल्यांना तोंड देऊन जूल्यन या पुतण्याद्वारे स्ट्रॉसबर्गच्या लढाईत विजय मिळविला. जूल्यनचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन लष्कराने त्यास सम्राट करण्याचे ठरविले. दरम्यान कन्स्टॅन्‌शिअस मरण पावला. जूल्यन (कार. ३६१-३६३) आणि नंतर जोव्हीअन (कार. ३६३-३६४) यांनी विशेष कर्तबगारी दाखविली नाही. जोव्हीअनने एका राजाज्ञेने ख्रिस्ती धर्मियांचे हक्क मान्य केले. त्याच्यानंतर पहिला व्हॅलन्टिनीअन (कार. ३६४-३७५) याला सैन्याने पश्चिम रोमन साम्राज्याचा सम्राट केले आणि त्याने आपला भाऊ व्हॅलेन्झ (कार. ३६४-३७८) यास पूर्व रोमन साम्राज्याचा सहसम्राट केले. साम्राज्याच्या सीमारक्षणासाठी ऱ्हाईन व डॅन्यूब नदीकाठाने किल्ले बांधले. कर कमी करुन शिक्षणाला प्रोत्साहन दिले. तो ऑर्थडाक्स ख्रिस्ती धर्माचा अनुयायी होता. मात्र त्याने इतर धर्मांबाबत सहिष्णू धोरण अंगीकारले. पहिल्या व्हॅलन्टिनीअननंतर त्याचा मुलगा दुसरा व्हॅलन्टिनीअन आणि ग्रेशन हे पश्चिम साम्राज्यावर सहसम्राट होते (कार. ३७५-३९४). ग्रेशनने रानटी टोळ्यांची आक्रमणे परतवून लावली. अखेरीस त्यास मृगयेचा नाद जडला. त्यातच त्याचा खून झाला. पहिला थीओडोशियस द ग्रेट (कार. ३७९-३९५) याची ग्रेशनने लष्कराच्या मदतीने पूर्व रोमन साम्राज्यावर व्हॅलेन्झनंतर नियुक्ती केली. त्याने व्हिसिगॉथांबरोबर समझोता केला पुढे तो दोन्ही साम्राज्यांचा राजा झाला आणि अखेरीस त्याच्या आधिपत्याखाली संयुक्त साम्राज्य अस्तित्वात आले. हाच रोमन साम्राज्याचा शेवटचा अभिषिक्त राजा होय. त्याच्या वेळी ख्रिस्ती धर्म हा अधिकृत धर्म मानण्यात येऊ लागला. पेगन धर्मावर त्याने बंदी घातली आणि लॅटिन भाषेचे पुरुज्जीवन केले व कलासाहित्यात राजाश्रय दिला.

पाचव्या शतकात रोमवर रानटी टोळ्यांची आक्रमणे सुरू झाली. थीओडोशियस ग्रेटच्या मृत्यूनंतर (३९५) रोमन साम्राज्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भागांत विभाजन झाले आणि पाचवे शतक संपण्यापूर्वीच पश्चिम साम्राज्याचा अस्त झाला परंतु पूर्व रोमन साम्राज्य पंधराव्या शतकापर्यंत टिकून राहिले आणि बायझंटिन हे नाव त्याने धारण केले. (पहा : बायझंटिन साम्राज्य).

पूर्व रोमन साम्राज्याचा थीओडोशियसनंतर ऑर्केडिअस (कार. ३८३-४०८) हा जेष्ठ मुलगा सम्राट झाला आणि पश्चिमी रोमन साम्राज्यावर होनोरिअस (कार. ३९५-४२३) हा कनिष्ठ मुलगा बसला. होनोरिअस अज्ञान असल्याने (दहा वर्षांचा) व्हँडॉलांचा सेनापती आणि थीओडोशियसचा मित्र फ्लेव्हिअस स्टिलिको हाच प्रत्यक्षात सर्वसत्ताधारी होता. थीओडोशियसच्या मृत्यूनंतर कमकुवत झालेल्या पश्चिमी साम्राज्यातील बाल्कन भूप्रदेशावर व्हिसिगॉथांचा राजा ॲलेरिक याने आक्रमण केले. थ्रेस, मॅसिडोनिया, ग्रीस इ. भाग लुटले. स्टिलिकोने या आक्रमणास थोपविण्याचा प्रयत्न केला परंतु पूर्व रोमन साम्राज्याने त्याला सहकार्य दिले नाही. इ. स. ४०१ मध्ये ॲलेरिकने इटलीत प्रवेश केला आणि मिलानला वेढा दिला. स्टिलिकोने त्याचा पराभव केला परंतु नंतर लवकरच स्टिलिकोचा मत्सर होनोरिअसला वाटू लागला आणि त्यात स्टिलिको मारला गेला. यामुळे ॲलेरिकला संधी चालून आली. त्याने पुन्हा स्वारी केली. तेव्हा होनोरिअसने राव्हेनाच्या किल्ल्याचा आसरा घेतला. ॲलेरिक व त्याच्या व्हिसिगॉथ तुकड्यांनी रोमकडे मोर्चा वळविला. त्याने रोम उद्ध्वस्त करुन तीन दिवस लुटले (४१०). अर्थात या वेळी रोम हे राजधानीचे अधिकृत केंद्र नव्हते परंतु प्राचीन वास्तू आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून त्यास महत्त्व होते. यामुळे या रानटी आक्रमणाचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटले. पेगनांनी ख्रिस्ती धर्मवेत्त्यांना शिव्याशाप दिले कारण त्यांचे परंपरागत देव रुष्ट झाले असावेत, अशी त्यांची धारणा होती. या आरोपांना सेंट ऑगस्टिन याने द सिटी ऑफ गॉड हे पुस्तक लिहून उत्तर दिले.

ॲलेरिकच्या मृत्यूनंतर त्याचा मेहुणा ॲटेअल्फ याच्याकडे व्हिसिगॉथांचे राजपद आले. त्याने इटलीतून काढता पाय घेऊन गॉलमध्ये प्रवेश केला आणि स्पेन घेऊन स्वतंत्र राज्य स्थापले (४१८). ते पुढे सहाव्या शतकाच्या सुरुवातीस क्लोव्हिस या फ्रँक टोळीच्या नेत्याने मोडले.


 व्हिसिगॉथांनी पश्चिमी रोमनांचे वर्चस्व काही काळ मानले आणि त्यांच्या राजांनी सम्राट घराण्यातील व्यक्तींशी वैवाहिक संबंध जोडले. रोमच्या पाडावाच्या वेळी ॲलेरिकच्या हाती होनोरिअसची सावत्र बहीण गॅला प्लसिडिया पडली. तिचा विवाह त्याने ॲटेअल्फ याबरोबर केला (४१४). ॲटेअल्फच्या मृत्यूनंतर तिने रोमन सेनापती कन्स्टॅन्‌शिअस याच्याबरोबर लग्न केले. तिला त्याच्यापासून मुलगा झाला, तोच पुढे तिसरा व्हॅलन्टिनीअन (कार. ४२५-४५५) या नावाने होनोरिअसच्या मृत्यूनंतर (४२३) सम्राट म्हणून पश्चिमी रोमन साम्राज्यावर आला. गॅला प्लसिडिया हीच त्याची त्यावेळी अज्ञान-पालक होती. कन्स्टॅन्‌शिअस ज्याप्रमाणे सहसम्राट म्हणून होता. त्याप्रमाणे ती गॉथ लोकांची राणी आणि रोमची सम्राज्ञी या नात्याने वावरत असे.

पाचव्या शतकात व्हँडॉलांनी गॉलमध्ये प्रवेश केला (४०५-४०६) आणि हळूहळू ते स्पेनमध्ये गेले (४०९). तेथे त्यांनी राज्य स्थापन केले. गायझरिकच्या नेतृत्वाखाली त्यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडून उत्तर आफ्रिकेत प्रवेश केला आणि कार्थेज घेऊन (४२९) तेथे त्यांनी आरमार तयार केले. पश्चिम भूमध्य समुद्रावरील एक बलवत्तर नाविक सत्ता असा त्यांचा त्यावेळी लौकिक होता. व्हॅलन्टिनीअनने त्यांच्या या स्वतंत्र सत्तेस मान्यता दिली होती (४४२). व्हॅलन्टिनीअनच्या खुनानंतर गायझरिकने इटलीवर आक्रमण केले आणि रोम लुटले. त्यांच्या या लूटमारीमुळे व्हँडॉलांची ख्याती क्रूर व लुटारू म्हणून झाली. गायझरिकने रोम ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही तो पुन्हा उत्तर आफ्रिकेत गेला व तेथे त्याने ४७७ पर्यंत राज्य केले.

व्हँडॉलांनी ऱ्हाईन ओलांडून पश्चिम साम्राज्यात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ फ्रँक इ. रानटी लोक आले. या टोळ्यांपैकी बर्गन्डियन लोकांनी ऱ्होन खोऱ्यात स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि फ्रँक लोकांनी ईशान्य गॉलमध्ये वसाहती स्थापन केल्या. ब्रिटनमधून बहुतेक रोमन सैन्य या सुमारास माघारी फिरले होते. त्याचवेळी सॅक्सन, अँगल्स आणि ज्यूट यांनी ब्रिटनमध्ये वसाहती स्थापन केल्या होत्या (४२८). यामुळे रोमच्या लष्कराने ब्रिटनबाबत आशा सोडल्या आणि त्यानंतर पुन्हा ब्रिटनमध्ये सैन्य पाठविले नाही. रानटी टोळ्यांच्या आक्रमणामुळे आणि अंतस्थ दुहीमुळे रोमन साम्राज्य झपाट्याने फुटू लागले होते. त्यातून एकेक प्रदेश स्वतंत्र होत होता तथापि रोमन सम्राटास या रानटी टोळ्यांशी स्वतःच्या अस्तित्वासाठी अधूनमधून मैत्रीचे करार करावे लागत. परिणामतः पाचव्या शतकाच्या मध्यास सम्राट तिसऱ्या व्हॅलन्टिनीअनचा (कार. ४२५-४५५) सरसेनापती एईशस याच्या नेतृत्वाखाली व्हिसिगॉथांच्या रानटी टोळ्या एकत्र आल्या आणि त्यांनी हूणांचा राजा ॲटिला याला संयुक्तपणे प्रतिकार केला. हे प्रसिद्ध युद्ध इ. स. ४५१ मध्ये झाले. ॲटिलाने माघार घेऊन आपला मोर्चा इटलीकडे वळविला. तेव्हा व्हॅलन्टिनीअनने शिरजोर एईशसचा कट करून खून करविला. परिणामतः एईशसच्या अनुयायांनी व्हॅलंटिनीअनचा खून केला. त्यानंतर व्हिसीगॉथांच्या सहकार्याने अव्हायटस (कार ४५५-४५६) याला गॉलमध्ये सम्राट म्हणून जाहीर करण्यात आले त्याला रिसिमरने पदच्यूत केले. त्याची पुढे प्लसेन्शा येथे बिशपपदी निवड झाली. इ. स. ४५६ ते ४७२ दरम्यान पश्चिम रोमन साम्राज्यात प्रत्यक्षात जर्मन सेनापतींची सत्ता होती. त्यांपैकी रिसिमर हा श्रेष्ठ व सामर्थ्यवान सेनानी होता. रिसिमरच्या व्हँडॉलांवरील दोन विजयांमुळे त्याचा प्रभाव फारच वाढला होता. तो एकामागून एक नामधारी सम्राट गादीवर बसवीत असे. यांपैकी मजोरिअन (कार ४५७-४६१) हा अव्हायटसला पदच्युत करून रिसिमरच्या सहकार्याने सम्राट झाला. त्याने अन्याय कर रद्द करून रोममधील प्राचीन पुरातत्त्वीय अवशेष जतन करण्याचा कायदा केला. त्याने गायझरिक या व्हँडॉल राजाविरुद्ध गमावलेले प्रांत हस्तगत करण्यासाठी अयशस्वी मोहीम काढली (४६०). रिसिमरला त्याच्या वाढत्या सामर्थ्याचा हेवा वाटू लागला तेव्हा त्याने त्यास प्रथम पदच्युत केले व नंतर त्याचा खून करविला. या कामात त्यास सीनेट आणि पूर्व रोमन साम्राज्य यांचे पुरेपूर सहकार्य मिळाले. रिसिमरच्या मृत्यूनंतर पश्चिमी साम्राज्यात अनागोंदी माजली (४७२). रोमन सेनापती ऑरेस्टीझ याने ज्यूलिअस नीपॉस (४७४-४७५) या नामधारी सम्राटास रानटी टोळ्यांच्या मदतीने पदच्युत करून त्या जागी आपला मुलगा रोम्युलस ऑगस्टस (४७५-४७६) यास बसविले आणि सुमारे एक वर्षभर राज्यकारभार केला. त्यानंतर रोमच्या भाडोत्री जर्मन सैन्य पथकातील ओडोएसर हा सेनापती प. रोमन साम्राज्यावर प्रत्यक्षात सत्ता गाजवू लागला. त्याच्या हेरूली (ईरुली) या जर्मन पथकाने उठाव करून ऑरेस्टीझचा पो नदीकाठी प्यॉचेन्सा येथे पराभव केला आणि राव्हेना ही राजधानी जिंकून रोग्युलस ऑगस्टस या सम्राटास पदच्युत केले (४७६) आणि इटलीवर सत्ता प्रस्थापित केली. पुढे अंधकार युगाला प्रारंभ झाला असे मानण्यात येते.


 सांस्कृतिक स्थिती

रोमन संस्कृती प्राचीन संस्कृतींच्या कालखंडांतील प्रगतीचा परमोच्च बिंदू मानली जाते. एका लहानशा खेड्यातून तिचे नगरराज्यात व पुढे विस्तृत अशा रोमन साम्राज्यात रूपांतर झाले. राजेशाही, सामंतवर्गाची सत्ता यांतील गुणावगुणांवर आधारित प्रजासत्ताक शासनपद्धतीतून रोमन राज्यसंस्था सर्वाधिकारशाहीत व अखेरीस सम्राटशाहीत उत्क्रांत झाली. यामुळे तिच्या सांस्कृतिक स्थितीत कालमानानुसार अनेक राजकीय बदलांबरोबर सांस्कृतिक स्थित्यंतरे घडली. त्यांचा मागोवा पुढील पृष्ठांत घेतला आहे.

सामाजिक स्थिती : राजेशाहीच्या आद्यकाळात रोमच्या नागरिकांचे तीन स्वतंत्र विभाग होते. त्यांना वर्ग/जमात (ट्राइब) म्हणत. या वर्गाची पुन्हा दहा पोटवर्गांत विभागणी केलेली असून त्यांना ‘क्युरिआ’ म्हणत. अनेक रोमन कुटुंबे मिळून एक क्युरिआ होत असे. याप्रमाणे कुटुंब हा तत्कालीन रोमन समाजाचा आद्य घटक मानला जाई. रोमने सभोवतालचा प्रदेश जिंकल्यावर तेथील लोकांचा रोममध्ये प्रवेश झाला परंतु नागरिकत्वाचे हक्क मात्र या लोकांना नव्हते. सीनेटसभा आर्षकाळापासूनच अस्तित्वात असून तिच्या सल्ल्याने राजा प्रशासकीय व्यवहार पाहात असे. नागरिकांची म्हणजे तीस क्युरिआ यांची एक जनसभा असे. त्यावेळच्या समाजात अमीर-उमराव, सीनेटर व वरिष्ठ अधिकारी यांचा उच्च वर्गात समावेश होई, तर सामान्य वर्गात शेतकरी आणि कारागीर यांचा अंतर्भाव असे. कुटुंबातील प्रमुखाचा पत्नीमुलांवर पूर्ण अधिकार चालत असे. रोमनांमध्ये ‘कन्युबिअम’ नावाचा विवाह-विधी प्रसिद्ध होता. त्या विधीप्रमाणे विवाहसंस्था पवित्र मानली जाई आणि एकपत्नीत्वाची चाल रूढ असून घटस्फोटाची प्रथा फारशी प्रचारात नव्हती. मात्र श्रीमंत लोक उपस्त्रिया ठेवीत असत. समाजात कायदा व शिस्त यांचे पालन आणि राष्ट्राकरिता स्वार्थत्याग करण्याची तयारी हे गुण विशेषत्वाने दिसत. प्रजासत्ताकाच्या काळात कृषिव्यवसायातील अमीर-उमराव यांचे प्राबल्य वाढले. तद्वतच सामान्य लोकांचा (प्लिबीअन) रोमच्या राजकीय घडामोडींशी संबंध येऊ लागला आणि या लोकांची स्वतंत्र जनसभा अस्तित्वात आली व त्यांचा ट्रिब्यून नावाचा अधिकारी कॉन्सलबरोबर अधिकार गाजवू लागला. त्यामुळे रोमन राज्यात पट्रिशन आणि प्लिबीअन असे दोन वर्ग होऊन दोघांना नागरिकत्वाचे हक्क प्राप्त झाले.

प्रजासत्ताक काळात रोमन वसाहती जसजशा वाढत गेल्या, तसतसा इतर प्रांतातील लोकांचा साम्राज्यात अंतर्भाव होऊ लागला व गुलाम पद्धतीचा एक अत्यंत अनिष्ट प्रकार रोमन राज्यात प्रविष्ट झाला. युद्धाच्या वेळी लुटीत पकडलेले वा कैद केलेले लोक गुलाम म्हणून धनिक लोक आपल्या जवळ बाळगत असत. प्रसंगोपात्त त्यांची विक्रीही करण्यात येई. अशा गुलामांना नागरिकत्वाचे हक्क नसत व त्यांना विधिवत विवाहही करता येत नसे. गुलामांवर मालकाचा पूर्ण हक्क असून त्याला मारण्याचा, विकण्याचा किंवा त्याचा जीवही घेण्याचा हक्क होता. ते त्याला कोणत्याही प्रकारची कामे सांगत. शेतावर काम करणाऱ्या गुलामांस गुराप्रमाणे वागविण्यात येई. त्यांनी पळून जाऊ नये, म्हणून त्यांच्या पायात बेड्या घालण्यात येत.

गुलाम लोकांना अन्न-वस्त्राखेरीज काही द्यावे लागत नसल्यामुळे त्यांचा परिश्रमावर श्रीमंत वर्ग शिरजोर झाला. उद्योगधंद्यांच्या बाबतीत तसेच शेती व्यवसायात सामान्य माणसे गुलामांशी चढाओढ करू शकत नव्हती. त्यामुळे समाजातील मध्यम वर्ग जवळजवळ संपुष्टात आला. श्रीमंत लोक ऐश्वर्यमदाने धुंद होऊन गरिबांवर, विशेषतः गुलामांवर, अत्याचार करू लागले आणि आपला वेळ ऐषारामात व मनोरजंनात व्यतीत करू लागले. त्यातून पुढे गुलामांची बंडे उद्‌भवली. मात्र त्यावेळी सामान्य नागरिकाची परिस्थिती अत्यंत शोचनीय होती. सर्वसाधारण माणसावर पुरेसे कर होते, पण नोकरीची वाण होती. ते अत्यंत निकृष्ट घरांतून रहात. त्यांना खायला पुरेसे अन्न नव्हते आणि संरक्षणही नव्हते. गुलामगिरीमुळे मुक्त माणसाची उपासमार होई. एका माळ्याची केविलवाणी स्थिती ॲपिएनस या तत्कालीन लेखकाने वर्णन केली आहे. त्यात सामान्य मालक आणि नोकर यांच्या परिस्थितीत काहीच फरक नाही असे नमूद केले आहे. शासनाने अशा लोकांसाठी काही धर्मादाय योजना आखल्या पण त्यांचा लाभ फारच थोड्यांना झाला आणि त्यातील पुढे चैतन्यही नष्ट झाले. ऑगस्टसच्या वेळी सु. दोन लाख लोकांना या पद्धतीने भाकरी फुकट मिळत असे. मार्कस ऑरिलियसच्या वेळी हा आकडा तीन लाखांवर गेला होता. मध्यम वर्ग बेकारांना मदत करण्याच्या प्रयत्नात चेपला गेला. रोमच्या एकूण ऱ्हासास हेही एक कारण घडले असावे.


रोमनांचा मूळ व्यवसाय शेती होता. रोमचे साम्राज्यात रूपांतर झाल्यावर शेतीची मालकी बदलली, जिंकलेली भूमी ही शासकीय मालकीची होई. मध्यवर्गीय शेतकरी मोठ्या जमीनदारांबरोबर स्पर्धेत मागे पडला. त्यांना आपली जमीन मोठ्या जमीनदारांना द्यावी लागे कारण शासनव्यवस्थेत त्यांना मान होता. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचा संकोच झाला. रोमच्या वसाहतींमधून धान्याची आयात करण्यात येई व ते खुद्द रोममधील धान्यपेक्षा स्वस्त असे. त्याचा इटलीतील शेतीवर विपरीत परिणाम झाला अणि सामान्य शेतकरी शहराकडे धाव घेऊ लागले. सीनेटमधून हाकून दिलेल्या जुन्या अमीरांनी शेतीवरच बंगले बांधून वस्ती करण्यास प्रारंभ केला तरीसुद्धा शेतीच्या व्यवसायात व पद्धतीत रोमनांनी विशेष प्रगती केली नाही. ते साधे नांगर, कुळव वगैरे पारंपरिक अवजारे वापरीत मात्र कृत्रिम खतांचा वापर करीत. सातू, मका, गहू इ. पिके घेत. शिवाय काही ठिकाणी द्राक्ष, अंजीर व ऑलिव्हच्या बागा करण्यात आल्या होत्या. मेंढपाळी रूढ होती, तरी घोडे, गाढवे व बोकड यांचीही निगा घेण्यात येई.

रोमन साम्राज्यात फारसे उद्योगधंदे नव्हते. इटलीतील लोक चकचकीत मृत्पात्रे, दारू, ऑलिव्ह तेल, लाकूड आणि विविध धातू यांची निर्यात करीत आणि साम्राज्यांतर्गत वसाहतींमधून कापूस, मूल्यवान खडे, काचेची भांडी, लिनन, प्रसाधनाचे साहित्य,मसाले इ. वस्तू आयात करीत. टायबरच्या मुखावरील ऑस्टिया हे बंदर सुसज्ज करण्यात आले होते. प्युटीअलाय हे नेपल्समधील बंदर व शहर उत्पादनाचे केंद्र होते. जहाजाची मालकी खाजगी असे. सरकार त्यांना आर्थिक सहाय्य देई. उद्योगधंद्यांत व्यापाऱ्यांना फारसे स्वातंत्र्य नव्हते. शासनाचे नियंत्रण असल्यामुळे अभिजनवर्गाचे वर्चस्व धंद्यात असे. रोमन नाण्यांची चलन पद्धती इ.स. पू. ३६६ मध्ये सुरू झाली.

खेळ, मनोरंजन इत्यादी : रोमन राज्यात साम्राज्याच्या विस्ताराबरोबर झापट्याने लोकसंख्या वाढली आणि त्याबरोबरच गुलामगिरी ही पद्धत रुढ झाली. त्यामुळे गुलाम हे सर्व प्रकारची कामे करू लागले. साहजिकच सुखवस्तू समाज करमणुकीच्या मागे धावू लागला. त्यावेळी पोहणे, पळणे, घोड्यावरून फेरफटका मारणे, भाल्याची फेक करणे, चेंडू फेकणे व झेलणे इ. खेळ रूढ होते. संगीत-नृत्यादी कलांनाही सम्राटांनी उत्तेजन दिले आणि त्यांसाठी भव्य खुली नाट्यगृहे व प्रेक्षागृहे बांधली. त्यांतून विभिन्न मनोरंजन प्रकार सादर केले जात.

असिक्रीडकांचा [⟶ रोमन ग्लॅडिएटर] खेळ रोममध्ये केव्हा प्रचारात आला, याची निश्चित माहिती ज्ञात नाही तथापि इ. स. पू. २६४ मध्ये मार्कस व ॲल्बायनस ब्रूटस या बंधूनी वडिलांच्या अंत्यविधीच्या वेळी प्रथक द्वंद्वयुद्ध करविले, तेव्हापासून हा उपक्रम सुरू झाला असावा. पुढे तो अमीर-उमरावांमध्ये अत्यंत आवडता खेळ म्हणून प्रसिद्धीस आला. या खेळात उन्मत्त प्राण्यांना (सिंह, हत्ती इ.) बंदिस्त क्रीडांगणात कैद्यांवर सोडण्यात येई. लोकांची करमणूक करण्यासाठी एखादा विचित्र प्राणी साम्राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून धुंडाळण्यात येत असे. यात हजारो प्राण्यांची हत्या होई आणि शेकडो कैदी, विशेषतः गुलाम, मरण पावत. ऑगस्टस, ट्रेजन, टायटस वगैरे सम्राटांनी या करमणूक प्रकारात विशेष रस घेतला होता. असे सामने तीन-तीन महिने चालत असत. पुढे थीओडोशियसने आत्मसंरक्षणार्थसुद्धा सिंहाचा वध करण्यास कायद्याने बंदी घातली.

पुढे-पुढे हे असिक्रीडकांचे प्रस्थ द्वंद्वयुद्धात प्रविष्ट झाले आणि खुल्या प्रेक्षागृहांत दोन पुष्ट गुलाम वा कैद्यांत मनोरंजनासाठी युद्ध लावण्याची प्रथा रूढ झाली. रोमन लोकांची रक्ताची तहान पशूंच्या वेदना पाहून शमन होण्यासारखी नव्हती. म्हणून त्यांनी शिक्षण देऊन तयार केलेल्या दोन गुलामांना युद्धाला जुंपले. त्यांच्या निर्दय डोळ्यांसमोर जेव्हा रक्ताच्या चिळकांड्या उडत, तेव्हा हे रोमन प्रेक्षक आनंदाने बेहोष होत. यात अनेक स्त्रियाही असत. एखादा असिक्रीडक लढता लढता मरण पावला, तर तात्काळ त्याचे शरीर फरफटत बाहेर ओढून त्या ठिकाणी दुसरा इसम आपल्या आहुतीने प्रेक्षकांची करमणूक करण्यास सज्ज असे. हे खेळ अत्यंत पद्धतशीरपणे आयोजित करण्यात येत.


धार्मिक महोत्सव, सार्वजनिक समारंभ व अंत्ययात्रा अशा प्रसंगी वाद्ये वाजविण्याची प्रथा होती. रोमन लोकांना नृत्य-नाट्य संगीतादी कलांची आवड असून रोमप्रमाणेच रोमन राज्यातील ॲलेक्झांड्रिया (ईजिप्त), अँटीऑक (सिरिया), एफसस व पर्गामम (आशिया मायनर), कार्थेज, (ट्युनिशिया), लुगडूनम व मासिलीया (फ्रान्स) इ. शहरांतून सार्वजनिक करमणुकीसाठी म्हणून मुद्दाम खुली नाट्यगृहे व प्रेक्षागृहे बांधलेली होती. त्यांतून शासकीय अधिकाऱ्यांद्वारे मोफत खेळ करविले जात. रंगभूमीवर पितळेच्या ओठांचे मुखवटे व उंच टाचांचे बूट घालून पात्रे संवाद म्हणत आणि अभिनय करीत. त्यावेळच्या सुप्रसिद्ध नटांतील बाथिलस व पिलाडीझ हे तत्कालीन प्रसिद्ध नट होते. याशिवाय गारुडी, विदूषक मधल्या वेळेत किंवा कधीकधी स्वतंत्ररीत्या प्रेक्षकांचे मनोरंजन करीत. मुष्टियुद्ध हा करमणूक प्रकारही लोकप्रिय होता. रोममध्ये प्राचीन काळापासूनच घोड्यांच्या व रथांच्या शर्यती होत. या वार्षिक शर्यतींच्या खेळांसाठी सभोवती छोटी भिंत घातलेले एक खास रंगण बनविलेले असे. त्यास ॲरीना म्हणत. दर चार वर्षांनी रोममध्ये ॲक्टियन गेम्स नावाचे सामने आयोजित करण्यात येत. त्यांत प्रामुख्याने रथांच्या शर्यती होत.

धार्मिक स्थिती : रोमन लोकांचे धार्मिक विधी व श्रद्धा, आचार-विचार आणि धर्मसंस्था यांत इ.स. पू. आठव्या शतकापासून इ. स. चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्म हा अधिकृत धर्म होईपर्यंत विभिन्नता आढळते. सुरुवातीस रोमन हे जडप्राणवादी असून त्यांवर कोणत्याही धर्माचा प्रभाव नव्हता. कुटुंब देवता ह्याच प्रमुख होत्या. प्रत्येक कुटुंबाचा एक रक्षक चैतन्य देव असे, त्याला ‘जानस’ म्हणत. मुलांचे संरक्षण करणाऱ्या देवाला ‘व्हेस्टा’ म्हणत. ‘ज्यूनो’ हा देव स्त्रीच्या गर्भाचे संगोपन करतो, अशी श्रद्धा होती. सॅटर्न, पमोना, सिरिझ व पॉलेस ह्या कृषी देवता होत्या. त्या प्रत्येकीचे स्वतंत्र पूजाविधी असत.

रोमनांनी ग्रीकांकडून मूर्तिपूजा घेतली असली, तरी इट्रुस्कनांशी संबंध आल्यानंतर ज्यूपिटर, ज्यूनो आणि मिनर्व्हा या तीन देवतांना महत्त्व प्राप्त होऊन मूर्तिपूजेबरोबरच मंदिरांची बांधणी होऊ लागली. प्रत्येक नगरात या तीन प्रमुख देवतांची मंदिरे आणि तीन देवतांच्या नावांची द्वारे असत. इट्रुस्कनांचे धर्मविधी यथोचित करता यावेत म्हणून, उच्च रोमन घराण्यांतील तरुणांना इट्रुस्कन भाषा शिकविण्यात यावी, असा सीनेटने कायदा केला. ज्यूपिटर, मिनर्व्हा, डायना आणि इतर देव पूजाविधीत प्रविष्ट झाले आणि धर्मगुरूंचे जणू एक विद्यापीठच निर्माण झाले.

प्रारंभीचे काही धार्मिक समारंभ आदिम प्रकारचे होते. ‘लूपर्केल्या’ या सणात पुजारी बोकडाचे रक्त अंगाला फासून त्याच्या कातड्याने स्त्रियांना पिटत रस्त्यातून नृत्य करीत नेत असे. त्यामुळे स्त्रिया फलद्रूप होतात-गरोदर राहतात, अशी तत्कालीन समाजाची समजूत होती. अशाच प्रकारे ‘सॅडनेल्या’ हा सण १७ डिसेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान नृत्य, रोषणाई व देणग्यांनी साजरा केला जाई. सिबिलीचा पंथ ही पूर्वेकडील महत्त्वाची देणगी असून सिबिली ही महामाता समजली जाई. पूर्वेकडील इतर देवतांत ताम्मुझ, ॲटिस, डायोनायनस, ओसायरिस इ. देवतांचा अंतर्भाव होतो.

ग्रीक संस्कृतीचा रोमन संस्कृतीवर प्रभाव असल्यामुळे त्यांच्या रहस्यवादात ग्रीकांच्या काही कल्पना आढळतात. त्यामुळे प्रत्येक देवतेच्या उपासनेचा विधी गुप्त ठेवण्यात येत असे. त्या पंथाची दीक्षा घेतल्याखेरीज हा उपासनांचा विधी त्या त्या व्यक्तींना उघड करून सांगितला जात नसे.

रोमन लोक सुरुवातीस सूर्योपासक होते. त्यांच्यात मिथ्र देवाची पूजा जरथुश्त्राच्या अनुयायांपासून आली. यज्ञयाग व बलिदान यांस महत्त्वाचे स्थान असे. परमेश्वराच्या नावाने एक जनावर मारून त्याचे मांस आणि रक्त भक्ताने सेवन करावयाचे, हा या उपासनेचा एक विधियुक्त भाग असे. या पंथाचे व ख्रिस्ती पंथाचे शत्रुत्व होते. पुढे ज्ञेयवाद अस्तित्वात आला. तो धार्मिक व तात्त्विक संकल्पनांच्या मिश्रणातून उत्क्रांत झाला. इ. स. दुसऱ्या शतकात त्याचे तीस चाळीस उपपंथ होते. ज्याला काही विशिष्ट नाव नाही, अशा एका अज्ञात देवाने स्वतःपासून वीस शक्ति-देवतांची रूपे निर्माण केली. अशाच एका शक्तिदेवतांपैकी येशू ख्रिस्त हे एक असावेत, असे त्यांचे म्हणणे होते. शरीर हा आत्म्याचा तुरंग आहे. एक शरीर सुटले तरी आत्मा निरनिराळ्या योनींतून फिरत असतो, असे वॅसलायडीस या ज्ञेयवादी तत्त्ववेत्त्याचे म्हणणे होते. ज्ञानाने मुक्ती मिळते, ज्ञानार्जनासाठी दुष्ट प्रवृत्तींशी सतत झगडा करावा लागतो, निरनिराळ्या प्रकारच्या उपासनाही कराव्या लागतात व कर्माचे आचरण पाळावे लागते, असे त्याचे म्हणणे होते. याही पंथाचे अनुयायी सामान्य नागरिक असत व त्यांचे ख्रिस्ती धर्माशी वैर होते. त्यातील एक समूह तर येशू ख्रिस्तांना राक्षस मानीत असे. [⟶ ज्ञेयवाद].


ख्रिस्ती धर्माचा उदय रोमन सम्राटशाहीच्या काळात झाला आणि नंतर तो कॉन्स्टंटीनपासून जवळजवळ शासकीय धर्म बनला. येशू ख्रिस्त काही दिवस जेरुसलेमजवळच्या डोंगराळ मुलखात उपदेश करीत हिंडत होते. त्यानी काही चमत्कार करून दाखविले. त्यांच्या केवळ स्पर्शानेसुद्धा रोग बरे होतात, अशा समजुतीने हजारो लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. अशा प्रकारे त्यांच्या शिकवणुकीचा परिणाम होऊ लागला. तेव्हा ज्यू धर्मगुरूंना वैषम्य वाटू लागले. ख्रिस्तांवर त्यांनी खोटे आरोप लादले. त्यांना रोमन अधिकाऱ्यांनी लाकडी क्रॉसवर त्यांच्या शरीरात खिळे ठोकून ठार मारण्याची आज्ञा दिली. शेवटच्या दिवसांत त्यांची काही तरुण माणसांशी गाठ पडली व त्यांनी त्यांचे शिष्यत्व पतकरले. या त्यांच्या दहा शिष्यांनी त्यांच्या धर्माचा दाही दिशांना प्रसार केला. त्यांना अपॉसल- धर्मप्रचारक-म्हणत. यात पॉल व पीटर हे शिष्य विशेष प्रसिद्धीस आले. आजचे स्वरूप याच शिष्यांनी ख्रिस्ती धर्मास दिले आहे, असे ख्रिस्ती धर्मीय मानतात. बायबलमध्ये येशूंच्या शिष्यांनी त्यांच्या जीवनाचे व शिकवणुकीचे चार वृत्तांत (गॉस्पेल्‌स) दिले आहेत. त्यांपैकी दोघांनी-मॅथ्यू व जॉन-या हकिकती समक्ष पाहिल्या आहेत, असे ख्रिस्ती धर्मीय मानतात. प्रारंभी ख्रिस्ती धर्म हा साधारणपणे राजकारणापासून अलिप्त होता पण रोमन कॅथलिक चर्च ही ख्रिस्ती धर्मसंस्था सुसंघटित झाल्यावर त्याचा राजकारणावर प्रभाव पडू लागला. या धर्मसंस्थेची संघटना रोमन शासनव्यवस्थेच्या संघटनेच्या धर्तीवर करण्यात आली. सुरुवातीस ख्रिस्ती लोकांचा निर्घृण छळ करण्यात आला पण विरोधाला न जुमानता चर्चचे संघटन बळकट पायावर झाले. (पहा : ख्रिस्ती धर्म,).

साहित्य : लॅटिन ही रोमनांची सर्वांत मोठी सांस्कृतिक देणगी. रोमन लोकांची ती मूळ भाषा होती. ती एक इंडो-यूरोपियन भाषा कुटुंबातील असून तिच्या अनेक पोटभाषा व बोली आहेत. त्या इटलीतील विविध प्रदेशांत त्याकाळी प्रचारात होत्या.

रोमनांचा व्यवहार्य दृष्टिकोण आणि ग्रीकांचा संकल्पनात्मक आदर्शवाद यांचे मिश्रण लॅटिन भाषेत आढळते. यातून अनेक आधुनिक संभाषणाचे नमुने उत्पन्न झाले. लेशियममधील मूळ रहिवाशांना ग्रीक भाषेचे प्रभुत्व मान्य होते आणि स्वतःची भाषा निर्माण करताना त्यांनी हे ऋण मान्य करून स्वतंत्र शैली धारण केली. रोमच्या पाडावापूर्वी लॅटिन ही सुसंस्कृत जगाची अधिकृत भाषा बनली होती. रोमन कॅथलिक चर्चनेही तिचाच वापर सुरू केला होता आणि ऑगस्टिन, बाड, ॲबेलॉर्ड, इरॅस्मस इ. बिशपांनी वा पाद्र्यांनी लॅटिनमध्येच लेखन केले. रोमच्या ऱ्हासानंतरही पाश्चात्त्य देशांत तिला अधिकृत शासकीय भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. बेकन, हार्व्हे, न्यूटन यांसारखे विद्धान लॅटिन भाषा- माध्यमातूनच आपले विचार प्रकट करीत परंतु लॅटिन तिच्या अभिजात स्वरूपात वापरणे पुढे जिकीरीचे झाले आणि हळूहळू लॅटिनोदभव रोमान्स भाषांनी तिची जागा घेतली तथापि आधुनिक इंग्रजी आणि जर्मन भाषांवर तिचा प्रभाव अद्यापि आढळतो. (पहा-रोमान्स भाषा समूह लॅटिन भाषा लॅटिन भाषा साहित्य).

प्राचीन काळी रोमन राज्यात खासगी व सार्वजनिक ग्रंथालये होती, यांविषयी काही पुरावे मिळतात. ⇨ हर्क्यूलॅनिअम येथील उत्खननात एक उद्यानगृहाची इमारत सापडली. तीत पपायरसवर लिहिलेल्या पुस्तकांचा संग्रह आहे. याशिवाय तिथे काही संगमवरी पुतळे आढळले. यावरून त्याकाळी खाजगी ग्रंथालये होती, असे दिसते. या ग्रंथालयातून हजारो ग्रंथ असल्याचे उल्लेख सापडतात. हे ग्रंथ पपायरस किंवा चर्मपत्रावर लिहिलेले असून त्यांची भेंडोळी नळकांडीसारख्या (सिलिंड्रिकल पॉट) भांड्यात सुरक्षित ठेवलेली असत. खाजगी ग्रंथालयांव्यतिरिक्त सार्वजनिक ग्रंथालयेही होती. ज्यूलियस सीझरचा मित्र गेअस असिनिअस पॉलिओ याने पहिले सार्वजनिक ग्रंथालय स्थापन केले. तत्कालीन लेखक पब्लिलीअस हेक्टर याने रोममधील सु. २९ सार्वजनिक ग्रंथालयांचा उल्लेख केला आहे. या ग्रंथालयांतून होमर, व्हर्जिल, हॉरिस, सिसरो, लिव्ही, थोरला व धाकटा प्लिनी, ऑव्हिड, मार्शल इ. लेखकांची पुस्तके होती. रोममधील पुस्तकांच्या विक्री खरेदीचा धंदा मुख्यत्वे तेथील शिक्षित ग्रीक गुलामांनीच चालविलेला होता. छपाईची व्यवस्था नव्हती, तरीसुद्धा तेथाल गुलाम त्यांच्या हस्तलिखित प्रती तयार करीत. यावरून रोम येथे ग्रंथ-प्रकाशनाचे काम त्याकाळात देखील प्रचारात होते असे दिसते.


 रोमन लोक हे अधिकतर व्यवहारी होते. त्यांच्यात तत्त्वज्ञानाच्या अभ्यासावर विशेष भर नव्हता. जे काही तत्त्वज्ञान त्यांच्यात प्रविष्ट झालेले दिसते, ते मुख्यतः ग्रीकांचेच आहे. राजकीय अनिश्चिततेच्या व पुनर्घटनेच्या या काळात स्टोइक तत्त्ववेत्त्यांनी राजकीय तत्त्वज्ञानाची पुनर्रचना केली. त्यांच्या मते माणूस हा विवेकशील प्राणी असून सर्व मानव समान आहेत आणि त्यांची प्रतिष्ठा समान आहे. न्याय, विश्वबंधुत्व, समता, भूतदया वगैरे तत्त्वांचा त्यांनी प्रसार केला. द्वेष, क्रोध, सूड, शत्रुत्व इ. दुर्गुणांना मानवी हृदयात स्थान मिळू नये, असा त्यांचा उपदेश असे. नैसर्गिक कायद्यांचे बुद्धीला आकलन होते व परस्परांत सामंजस्य निर्माण होते. विवेकशील मानव जागतिक नगराचा नागरिक असतो, समग्र मानवजातीचा घटक म्हणून तो स्वतःकडे पाहतो. ही नगरकल्पना स्टोइक तत्त्ववेत्यांच्या व त्यांच्या रोमन अनुयायांच्या दृष्टीने काही प्रमाणात रोमन साम्राज्यात मूर्त झाली होती. स्टोइक तत्वज्ञानाच्या आधारे रोमन कायदे पंडितांनी प्रस्थापित रोमन कायद्यांत काही सुधारणा घडवून आणल्या. केटो, ⇨ सिसरो, एपिक्टीटस, सेनिका, मार्कस ऑरिलियस, ⇨प्‍लूटार्क हे काही प्रमुख स्टोइक तत्त्वज्ञ होते. (पहा : स्टोइक मत).

‘ द ऑरेटर’शिक्षण : रोमन कुटुंबातील व्यक्तींनी वैयक्तिक स्वार्थ व स्वातंत्र्य बाजूला ठेवून सर्वस्वी रोमसाठी झटावे सर्व प्रजाजनांनी पराक्रमी योद्धे आणि कर्तव्यनिष्ठ नागरिक बनावे, हे ध्येय पुढे ठेवून मुलांना शिक्षण देण्यात येत असे. त्यांच्यामध्ये औपचारिक शिक्षणपद्धती धिम्यागतीने विकसित झाली. ट्‌वेल्व्ह टेबल्स ऑफ लॉच्या पाठांतरावर विद्यालयांतून प्रारंभी भर होता. उच्चभ्रू लोक ग्रीक शिक्षक नेमून मुलांना सुविद्य करीत. केटो हा रोमन अध्यापनशास्त्राचा प्रवर्तक मानला जातो. रोमन अध्यापकानीच कृषिशास्त्र, नागरिकशास्त्र आणि युद्धकला हे विषय मुलांना शिकवावेत, असा त्याचा आग्रह होता. व्हॅरोने केटोचेच कार्य पुढे चालू ठेवून लॅटिन भाषेत रोमन जीवन व धर्म यांची मीमांसा केली. त्यावेळी प्रास्ताविक विद्यालयात व्याकरण, तर्कशास्र व अलंकारशास्त्र यांवर भर दिला जाई. भूमिती, अंकगणित, ज्योतिष, वैद्यक आणि वास्तुशास्त्र या विषयांची नंतर त्यात भर पडली. सिसरोने अध्यापनाचा आदर्श सुचविला. नागरी हक्क, सार्वजनिक सभा-संभाषणे व तत्त्वज्ञान यांच्या अध्ययनाने मनाला प्रगल्भता प्राप्त होते, असे त्याचे मत होते. साम्राज्याच्या पूर्व काळात क्किंटिल्यन हा एक श्रेष्ठ अध्यापक होता. त्याने तत्त्वज्ञान आणि शिक्षणशास्त्र, यांचा नेहमीच्या विषयांत समावेश केला व अलंकारशास्त्र साहित्य, संगीत, गणित आणि शारीरिक कसरती यांबरोबर ते शिकवावेत, असे सुचविले. काही सम्राटांच्या आश्रयाने उच्च शिक्षणाची अभिवृद्धी झाली. हेड्रिअनने कलादिकांच्या उत्तेजनार्थ महाविद्यालय (ॲथिनीअम) स्थापन केले. सव्हिरसने अलंकारशास्त्र, व्याकरण, वैद्यक, गणित, वास्तुकला इ. विषयांच्या प्रगत अभ्यासाची सोय केली. ख्रिस्ती धर्म स्थिरस्थावर झाल्यानंतर शिक्षणाला एक प्रकारचे वळण लागले. शिवाय चर्चच्या वर्चस्वामुळे शास्त्रीय विषयांऐवजी धर्मशास्त्राच्या अध्ययनावर भर दिला जाऊ लागला.

शास्त्र-वैद्यक : रोमन काळात विज्ञानात मर्यादित प्रगती झाली. या क्षेत्रात प्राय: इट्रुस्कन व ग्रीकांचेच त्यांनी अनुकरण केले. थोरला प्लिनी (इ. स. २९-७९) याने नॅचरल हिस्टरी या बृहद्ग्रंथात निसर्गक्रमाची पद्धतशीर मांडणी केली. टॉलेमी (इ.स. ९०-१६९) हा ॲलेक्झांड्रियाचा मूळ रहिवासी. तो गणिती, भूगोलज्ञ आणि नैसर्गिक तत्त्वज्ञानी होता. त्याने वेधशाळा बांधून ज्योतिषशास्त्र दृष्ट्या ग्रहांचा अभ्यास केला. Megale Syntaxis Tes Astronomias (१३ खंड) हे त्याचे सर्वांत महत्त्वाचे पुस्तक असून त्यात त्याच्या कार्याचा गोषवारा आढळतो. हपॉर्कस याने उत्तर खगोलातील १०२२ ताऱ्यांची यादी केली. या Hormonics या ग्रंथात त्याने ग्रीक गणित व त्रिकोणमितीचा विस्तार केला आहे. Geographike Hyhegesis या दुसऱ्या एका ग्रंथात भूसृष्टीचे वर्णन, देश, खंड आणि पृथ्वीच्या आकारमानाविषयी संक्षिप्त वर्णन दिले आहे. रोमनांचे कॅलेंडर चंद्राच्या कलांवर अवलंबून होते. त्यात बारा महिने कल्पिलेले असून प्रत्येक महिन्याचे २८, २९ वा ३१ दिवस गृहीत धरता सबंध वर्षाचे सामन्यतः ३५५ दिवस होत. सौर वर्षापेक्षा ते सव्वादहा दिवसांनी कमी होते. ऋतुमानानुसार त्यात वाढ करण्यात येई व पुढे इ. स. पू. पहिल्या शतकात राजकीय हस्तक्षेपामुळे एखाद्या दंडाधिकाऱ्याची मुदत वाढविण्यासाठी नवीन महिने घालणे वा कमी करणे, असा प्रकार सुरू झाला आणि कॅलेंडरची सुसूत्रता गेली. पुढे ज्योतिषशास्त्राच्या आधारावर कॅलेंडरमध्ये बदल करून ते अद्यवावत करण्याचे तंत्र रोमनांनी प्रथम प्रचारात आणले. उद्‌धृत दिवसांचे सौरवर्ष ठरवून दर चार वर्षांनी एक दिवस वाढवून एक दिवस ते जुळविण्याचे काम इ.स. पू. ४५ पासून कार्यवाहीत आले.


 रोमन शासनकर्त्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता यांची जबाबदारी स्वीकारली होती. शहरांची आरोग्यदृष्ट्या नीट मांडणी व शहरातील अस्वच्छ पाणी वाहून जाण्याकरिता गटारे, नहर वगैरेंची उत्तम बांधणी केलेली होती. शिवाय ज्वालामुखींतील तलावात साठलेला रस वाहून जाण्याकरिता त्यांनी बोगदे तयार केले होते. ते त्यांच्या वास्तुकलेतील नैपुण्याची साक्ष देतात. सर्व शहरांमधून वैद्य असत व शासनातर्फे त्यांना पगार मिळत असे परंतु त्यावेळी एकूण या व्यवसायाचा दर्जा सामान्य होता. ⇨ गेलेन (इ.स. १३१-२०१) हा तत्कालीन मोठा वैद्य परंतु त्याच्या ज्ञानावर ग्रीकांचा प्रभाव होता. गेलेनने शरीराचा विशेषतः श्वासोच्छ्‌वास यंत्रणा, मणका, हृदय आणि स्नायू यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला होता. त्याची शरीरशास्त्रविषयक प्रणाली ही कदाचित या क्षेत्रातील पहिली ज्ञात गोष्ट असावी. वैद्यकाच्या इतिहासातील ते विलक्षण नैपुण्य आहे.

कला :अवशिष्ट अवशेषांवरून रोमनांनी तांत्रिक क्षेत्रात विशेषतः स्थापत्यशास्त्रात विलक्षण प्रगती केली होती, हे दिसून येते. त्यांच्या वास्तू, रस्ते, पूल, कालवे इ. याची साक्ष देतात. मार्कस व्हिट्रुव्हीअस व आपॉलोडोरस ऑफ दमास्कस या अनुक्रमे ऑगस्टस व ट्रेजन यांच्या अधिकृत वास्तुशिल्पज्ञांनी वास्तुकलेसंबंधी विस्तृत लेखन केले. व्हिट्रुव्हीअस याने द आर्किटेक्‌चुरा हा नगररचना, बांधकामाचे साहित्य, मंदिरे यांची चर्चा करणारा दशखंडी बृहद्‌ग्रंथ लिहिला तर आपॉलोडोरस याने ट्रेजनकालीन वास्तूंचे आराखडे तयार केले. तत्कालीन फोरमची वास्तू ही त्याचीच निर्मिती होय. रोमन साम्राज्यात रस्त्यांचे जाळे विस्तृत प्रमाणात पसरले होते. सैनिकी नियंत्रणासाठी लष्करीदृष्ट्या सुसज्ज अशा सु. ८०,००० किमी.चे महामार्ग त्यांनी बांधले. यांतील अप्पीयन मार्ग हा पहिला रस्ता इ. स. पू. ३१२ मध्ये तयार झाला. तो रोमच्या नैऋत्येकडून आधुनिक टोरँटोपर्यंत गेला होता. पुढे अन्य काही रस्ते खोदेण्यात आले. रोमन रस्ते नीटनेटके, भक्कम पाण्याचे, कमानदार आणि पाण्याचा निचरा होईल असे सुटसुटीत व पुरेसे रुंद होते. त्यांच्या बांधकामात ज्वालामुखीतील पाझोलन (राखेचा) वापर केलेला असे.

अश्मशवपेटिकेवरील प्रतिष्ठित रोमनांचे शिल्प, अचिला, रोम. प्राचीन रोमचे विस्तृत प्रमाणात उत्खनन अद्यापि झालेले नाही. हर्क्यूलॅनिअम, पॉम्पेई आणि इतर काही नगरांचे अजूनही काही भाग तसेच आहेत. रोमच्या प्रारंभीच्या कलावशेषांवर ग्रीक प्रभाव होता. रोममधील काही लक्षणीय इमारतींचे आराखडे ग्रीक वास्तुशिल्पज्ञांनी (नगररचनाकार) तयार केले होते. ग्रीक कल्पनांचे व रुढींचे सातत्य रोमनांनी कायम राखले. रोमनांची शिल्पकलाही ग्रीक शिल्पकलेशी साधर्म्य दर्शविते. तिच्या अभिव्यक्तीत ग्रीक छाप पदोपदी जाणवते तथापि ग्रीकांचे अनुकरण करूनही रोमनांचे म्हणून काही कलाविशेष निर्दिष्ट करता येतील. रोमनांचा कलात्मक दृष्टीकोण व्यवहार्य होता. त्यामुळे अलंकरण हा त्याचा अविभाज्य भाग नव्हता, तो वास्तूच्या बाह्य स्वरुपात डोकावतो. वास्तुशिल्पात आकार हाच महत्त्वाचा घटक असून प्रचंड आकार व भव्यता यांवर भर दिलेला दिसतो. कृत्रिम स्तंभ व कमानी-तोरणे यांचा सुशोभनात भव्यतेचा परिणाम दर्शविण्यासाठी उपयोग करीत. मंदिरांपेक्षा रस्ते, कालवे, पूल, सार्वजनिक स्नानगृहे, राजप्रासाद यांच्या बांधकामाला अधिक महत्त्व होते. वास्तुकलेत मात्र त्यांनी लक्षणीय प्रगती केलेली होती. दुतर्फा स्तंभाची रांग आणि अर्धवर्तुळाकार घुमट असलेले सभागृहांचे (बॅसिलिका) राजवाडे हे रोमन वास्तुशैलीचे वैशिष्ट्य असून त्यांचा आदर्श प्रारंभीच्या ख्रिस्ती चर्चमधून आढळतो. घुमटाकारी इमारत हे गॉथिक कॅथिड्रलचे अग्रलक्षण मानले जाते. रोमन वास्तुशैलीचे पॉम्पेईचे प्रेक्षागृह (इ. स. पू. ५५) हे एक अप्रतिम उदाहरण आहे. त्याचा पहिला मजला अर्धस्तंभांनी इट्रुस्कन शैलीत सजविलेला असून दुसरा मजला आयोनीयन शैलीत बांधला आहे व तिसरा कॉरिंथियन स्तंभांनी सुशोभित केला आहे. ज्यूलिअस सीझरने ग्रीक शैलीत व संगमरवरी पाषाणात शाही न्यायमंदिराची बांधणी केली आणि त्या मधोमध व्हीनस देवतेचे मंदिर बांधले. ऑगस्टसने पॅलटाइन टेकडीवर पहिला शाही महाल बांधला. व्हेस्पेझ्यनने खुले प्रेक्षागृह ⇨ कॉलॅसिअम बांधले. हे सर्वार्थाने रोमन वास्तुशैलीचे खास नुमने होत. त्यांत कमान आणि छज्जा यांचे मिश्रण असून कमान हाच बांधकामाचा मुख्य भाग होता, स्तंभ व त्यावरील कंगोरा हे सुशोभनासाठी होते. टॅसिटसची आकर्षक विजयकमान ही अनेक लक्षणीय स्मारकांपैकी एक असून तिची अलंकृत वास्तू म्हणून प्रसिद्धी आहे. तिच्यावरील ऐतिहासिक अपोत्थित शिल्पे अर्थपूर्ण असून तिच्या सौदर्यात भर घालतात. एखाद्या व्यक्तीचे चिरस्थानी स्मारक तयार करण्यावर रोमनांचा भर होता. हर्क्यूलॅनिअम येथील उत्खननात काही पुतळे, खुले नाट्यगृह आणि भित्तिचित्रांनी सुशोभित केलेले न्यायमंदिर आढळले. शिल्पीनी वा चित्रकारांनी राजकीय प्रचारासाठी ऐतिहासिक व्यक्ती हाच विषय प्रामुख्याने निवडलेला आढळतो. अज्ञात रोमन किंवा अश्वारूढ मार्कस ऑरिलियसचा पुतळा अशी एक दोन प्रसिद्ध व कलापूर्ण शिल्पे सोडली तर रोमनांनी शिल्पकलेत फारशी प्रगती केलेली दिसून येत नाही. (पहा : रोमन कला).


 रोमन विधी : ग्रीकांचे कायदे नैतिक आणि राजकीय नियमांच्या संकलनाच्या स्वरूपाचे होते. कायदा सर्वांना सारखा नव्हता, मात्र सत्ताविषयक तत्त्वज्ञान ग्रीक संस्कृतीने दिली तर कायदा अथवा वैधता आणि प्रशासन यांसंबंधी पश्चिमी जगाला रोमने वैशिष्ट्यपूर्ण मौलिक योगदान केले आहे. आधुनिक पाश्चात्त्य कायदा हा रोमन विधींवर आधारित असून रोमन विधीच्या तत्त्वांवरच आंतरराष्ट्रीय कायदा निर्माण झाला.

प्रारंभी रूढी, प्रघात आणि धार्मिक आज्ञा यांवर कायदा आधारित होता. प्राचीन रोमन विधीची बीजे राजेलोक, कुटुंब आणि जमाती यांच्या प्राचीन परंपरा व रूढींमध्ये आढळतात. न्यायदानाचे काम सुरुवातीस उच्च वर्ग करीत असे आणि धर्मोपदेशक त्याचे अर्थबोधन करीत. साहजिकच लिखित स्वरूपाच्या कयद्याची आवश्यकता भासू लागली. परिणामतः इ.स.पू. ४५० मध्ये बारा पत्रकांत सर्व कायदा एकत्रित करण्यात आला. त्या विधिसंहितेला ट्‌वेल्व्ह लॉज असे म्हणतात. त्यातून हळूहळू पुढील सुधारित विधी उत्क्रांत झाला. प्रशिक्षित न्यायाधीश कायद्याचा अर्थ स्पष्ट करीत. अशा विद्वान न्यायाधिशांची परंपरा मोठी होती. त्यातील पॉलस, अल्पिअन, पपेनिअन, ट्रबोनिअन इत्यादींनी रोमन विधी विकसित केला. त्यांना प्रीटर म्हणत. रोमन नागरिकांतील तंट्यांचा न्याय करणारा एक न्यायाधीश (प्रीटर अर्बेनस) व परकीयांतील न्याय देणारा एक न्यायाधीश (प्रीटर पेरेगिनस) अशी व्यवस्था होती. इ. स. पू. १७६ मध्ये नागरी कायदा व इतर कायदे यांतील भेद नष्ट करून एक विधिसंहिता तयार करण्यात आली. पुढे सगळ्या नियमांना सुसूत्र करण्याचा एक प्रयत्न इ. स. ४३८ मध्ये झाला त्याला थिओडोशियन कोड म्हणतात. या कायद्यावर ख्रिस्ती धर्माचा प्रभाव दिसतो. सर्वांसाठी एकच कायदा असावा आणि राज्याच्या शासनसंस्थेची कायद्यावर उभारणी व्हावी, या तत्त्वांचा अंगीकार करण्यात आला परंतु विद्यमान रोमन कायद्याचे स्वरूप म्हणून जे ओळखले जाते, ते पुष्कळ अंशी ⇨ जस्टिनियन (कार. ५२७-६५) या पूर्व रोमन सम्राटाने दिले. ट्रबोनिअन या कायदेपंडिताच्या अध्यक्षतेखाली जस्टिनियन याने एक दहा सदस्यांची समिती स्थापन करून पूर्वापार आलेल्या सर्व कायद्यांची छाननी केली आणि त्यांना नियमबद्ध स्वरूप देऊन कॉर्पस ज्युरिस सिव्हिलिस नावाची विधिसंहिता केली. त्याचे चार स्वतंत्र भाग करण्यात आले. पहिल्या भागात बादशाहने काढलेले हुकूम व केलेले कायदे होते, दुसऱ्या भागात कायद्यामध्ये बदल करण्याच्या योजना आणि अंमलबजावणी यांची चर्चा होती.

(पहा : रोमन विधि).

महाराणीचे देवरूपात रूपांतर, आर्च ऑफ पोर्तुगाल, रोम. रोमन साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे : पश्चिम रोमन साम्राज्याचा अंत ही घटना बहुतेक इतिहासकारांना नेहमीच भुरळ पाडणारी ठरली आहे. त्याची कारणमीमांसा करणे हा इतिहासकारांच्या दृष्टीने अत्यंत जटिल प्रश्न आहे. एडवर्ड गिबनच्या द हिस्टरी ऑफ द डिक्लायन अँड फॉल ऑफ द रोमन एम्पायर (१७७६-८८) या बृहद्‌ग्रंथानंतर रोमच्या ऱ्हासाविषयी इतिहासकारांत सांगोपांग व साक्षेपी चर्चा होऊ लागली. अनेक इतिहासकार अंतर्गत व बाहेरची अशी दोन्ही कारणे साम्राज्याच्या ऱ्हासाविषयी मांडतात. रोमच्या ऱ्हासाची प्रक्रिया इ. स. दुसऱ्या शतकात मार्कस ऑरिलियस या सम्राटाच्या वेळी (इ. स. १६१-८०) सुरू झाली, असे बहुतेक इतिहासकार मानतात.

रोमन राज्यातील राजकीय, सामजिक, आर्थिक व धार्मिक स्थिती यांचा साकल्याने विचार केला असता, रोमन साम्राज्याच्या अधःपतनाची स्पष्ट कल्पना येते. रोमन राज्याची सामाजिक स्थिती लक्षात घेता त्यावेळी समाजात अमीर-उमराव, तुरंगी, सधन जमीनदार, सामान्य शेतकरी व सर्वसाधारण नागरिक असे वर्ग होते. प्रजासत्ताकाच्या उत्तरार्धात म्हणजे इ. स. पू. २६४ च्या सुमारास गुलामगिरीची प्रथा सुरू झाली. या गुलामांना नागरिकत्वाचे हक्क नव्हते पण सर्व प्रकारची कामे त्यांच्याकडून करून घेतली जात. जास्त गुलाम बाळगणारा अधिक प्रतिष्ठित समजला जाई. त्यामुळे वरिष्ठ वर्गात लाचलुचपतीचे प्रमाण वाढले. गुलामगिरीच्या या अनिष्ठ प्रथेमुळे सामान्य रोमन नागरिकाची क्रयशक्तीच जवळजवळ नष्ट झाली होती. तो निरुत्साही, आळशी व ऐषारामी बनला होता. गुलामांच्या सेवेमुळे रिकामा वेळ घालविण्यासाठी उच्चभ्रू वर्ग विशेषतः अमीर-उमराव व वरिष्ठ अधिकारी विविध खेळ व नाट्य-संगीतादी मनोरंजन प्रकारांत वेळ घालवीत असत. याशिवाय सार्वजनिक व खाजगी स्नानगृहात उटणी व सुवासिक तेल अंगास लावून उष्णोदक स्नान व बाष्पस्नान करण्याचा छंद तत्कालीन रोमनांना होता. त्याचा सुखोपभोग स्त्रियासुद्धा घेत असत. रोमच्या या सुबत्तेमुळे ऐषाराम व चैन यांचे प्रमाण वाढून सुखासीन उच्चभ्रू समाजात नीति-अनीतीचा विचार नष्ट झाला आणि त्याचा परिणाम रोमच्या अधःपतनात झाला असे काहींचे मत आहे.


सततचा युद्धप्रसंग, नोकरशाहीचे प्राबल्य आणि रानटी टोळ्यांचे साम्राज्यावरील हल्ले यांमुळे तिजोरीवर ताण पडून लष्करातील शिपायांचा पगार थकू लागला. भाडोत्री सैनिक आपल्या मागण्यांसाठी किंवा आपल्या सेनापती- नेत्यासाठी वारंवार उठाव करू लागले. त्यामुळे पगाराच्या भरपाईसाठी डोईजड कर लादणे सम्राटांना भाग पडले. काही सम्राटांनी सोन्याऐवजी हिणकस धातूची नाणी पाडून ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यातून चलन फुगवटा होऊन अर्थव्यस्थेवर विपरित परिणाम झाला. यामुळे व्यापारातील स्थैर्य नष्ट झाले. आयात वस्तूंचे प्रमाण कमी झाले. जीवनावश्यक वस्तूंचे भाग वाढले. यातून एकूण साम्राज्याची आर्थिक घडी विस्कटली आणि अंतर्गत कलह माजला. तो मिटविण्यासाठी सुसज्ज सैन्याची उणीव भासू लागली आणि लष्करी सेनापती सम्राटापेक्षा शिरजोर झाले.

यादवी संघर्ष, युद्धे, प्लेग, पटकीसारखे रोग आणि जस्ताच्या दीर्घकाळ वापरामुळे (घरगुती भांडी व पाण्याचे नळ) रासायनिक प्रक्रिया होऊन उद्‌भवलेली विषबाधा यामुळे रोमनांची लोकसंख्या अर्ध्याहून अधिक घटली. तरुणांची पिढीच्या पिढी नष्ट झाली आणि रानटी टोळ्यांतील भाडोत्री सैनिक रोमच्या लष्करात प्रविष्ट झाले. रोमनांशी रानटी जमातीतील अनेकांनी रोटीबेटीव्यवहार केले. त्यातून संकर होऊन खुद्द रोममध्ये अरोमन प्रजा निर्माण झाली. त्यांच्यात राष्ट्रीय भावना, चैतन्य आणि आत्मीयता यांचा अभाव होता आणि उच्चनीच अशी वर्गविग्रहाची भावना प्रसृत झाली, असे मायकेल रस्टॉफट्‌सिफ हा प्रसिद्ध इतिहासकार म्हणतो.

सम्राटशाहीच्या सुरुवातीस राज्यविस्तार होऊन नवीन प्रदेशांची भर पडली. कर्तबगार सम्राट व कार्यक्षम प्रशासक यांमुळे शासनव्यवस्था त्यावेळी सुव्यवस्थित होती मात्र पुढे भावी वारस निवडीबाबत तंटेबखेडे माजून संरक्षकदल व लष्कर यांचे प्राबल्य वाढले आणि सीनेटचे महत्त्व कमी झाले. या धोरणानुसार तिसऱ्या शतकानंतर त्याच घराण्यातील दुबळे वारस गादीवर आले. यातील सर्वांत अस्थिर काळ बरॅक सम्राटांची (इ. स. २३५-२९४) कारकीर्द होय. या काळात सुमारे वीस सम्राट गादीवर आले आणि त्यांपैकी अपवादादाखल एखाद्यालाच नैसर्गिक मृत्यू आला असेल. एकोणसत्तर सम्राटांच्या बाबतीत आपसांत झगडे होऊन यादवी युद्धे झाली. त्यामुळे प्रांतांतील बंडखोर सैन्याने राज्यावर आक्रमणे केली. चौथ्या व पाचव्या शतकांतील सम्राट तर दुर्बल होते. साहजिकच या विस्तृत साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी आणि उद्‌भवलेले उठाव मोडण्यासाठी शासनकर्त्यांना कार्यक्षम पराक्रमी सैन्याची वारंवार गरज भासू लागली. परिणामी सैन्य आणि सुरक्षादल यांना अवाजवी महत्त्व प्राप्त झाले व सम्राट हे त्यांच्या हातातील बाहुले बनले. यामुळे साम्राज्यातून हळूहळू एक एक प्रांत फुटून स्वतंत्र होण्याच्या मार्गी लागला. यादवी युद्ध आणि विस्कटलेली आर्थिक घडी डायोक्लीशन आणि कॉन्स्टंटीन यांसारख्या कर्तबगार राजांनासुद्धा मूळ पदावर आणता आली नाही.

रोमन राज्यात ख्रिस्ती धर्माचा उदय आणि विकास होऊन ख्रिस्ती संप्रदायाच्या वाढत्या सत्तेबरोबर रोमच्या सत्तेचा अधःपात सुरू झाला, असे गिबन आदी काही इतिहासकारांचे मत आहे. रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्माकडे प्रथम बरेच दिवस रोमन शासनाचे लक्षच नव्हते पुढे त्यांचा धर्मच्छळ सुरू होऊन काही सम्राटांनी त्याविरुद्ध कठोर कार्यवाही केली. पुढे कॉन्स्टंटीन व नंतरच्या काही सम्राटांनी त्यास राजाश्रय दिला. तेव्हा त्याचे महत्त्व वाढले व राजधर्म म्हणून त्यास मान्यता मिळाली. हा धर्म मूळ लोकांना परकीय होता आणि त्याने रोमन समाजातील मूळची पारंपरिक धर्माची चौकट कमकुवत केली. त्यामुळे रोमन समाज विस्कळीत होऊन विघटनाची बीजे पेरली गेली आणि रोमन साम्राज्याच्या विनाशास ती कारणीभूत ठरली.

या अंतस्थ कारणाबरोबरच रानटी लोकांची आक्रमणे ही रोमन साम्राज्याच्या ऱ्हासास कारणीभूत ठरली असे, अनेकांचे मत आहे. इ. स. चौथ्या-पाचव्या शतकात रोमन साम्राज्यावर जर्मन, फ्रँक, व्हँडॉल, गॉथ, हूण आदी रानटी टोळ्यांनी अंतर्गत दुही व अनागोंदी यांचा फायदा घेऊन आक्रमणे केली आणि त्याचे लचके तोडले. रोमने प्रथम इटलीतील राज्ये व नंतर सिसिली, कार्थेज, स्पेन, ब्रिटन, आशिया मायनर व आफ्रिकेतील भूप्रदेश जिंकून त्या प्रदेशात आपल्या वसाहती स्थापन केल्या. तिथे रोमन संस्कृती व रोमन नागरिकत्वाचे हक्क यांचा फैलाव करून रोमन साम्राज्य काही अंशी एकजीव केले परंतु यूरोपच्या उत्तर व पश्चिमेकडील रानटी लोक मात्र साम्राज्याबाहेर राहिले. त्यामुळे त्यांच्यावर रोमन संस्कृतीचा काही परिणाम झाला नाही तथापि अनेक शतकांच्या सहवासाने या शेजारील रानटी लोकांनी काही बाबतीत सुधारणा घडवून रोमनांचे अनुकरण केले. सीझरच्या काळापासून त्यांचा रोमच्या युद्धकलेशी संबंध आला होता. त्यांच्यातील नैसर्गिक जोम, क्रूरपणा आणि दृढनिश्चय या रानटी गुणांना युद्धकलेची जोड मिळून हे शेजारी अखेर रोमला डोईजड झाले आणि रोमन सैन्याहून साम्राज्याच्या सरहद्दीवरचे रानटी लोक रणांगणावर अधिक बलिष्ठ ठरून त्यांनी रोमन सत्तेचा विध्वंस केला.


 रोमन साम्राज्यातील गुलामगिरीची पद्धत, अल्पसंख्याक धनिक वर्ग, बहुसंख्याक निर्धन-बेकार वर्ग, वरिष्ठ वर्गातील खालावत चाललेली लोकसंख्या, कमकुवत शासन आणि त्याबरोबरच ख्रिस्ती धर्मसत्तेचे वाढते वर्चस्व व रानटी टोळ्यांची आक्रमणे या अनेक कारणांनी रोमन साम्राज्यसत्ता लयास गेली. एकूण रोमचा इतिहास पाहता रोमन सत्तेच्या स्थापनेपासूनच तिच्या नाशाची बीजे पेरली गेली होती, हे म्हणणे सयुक्तिक ठरेल. म्हणून गिबन विविध कारणांची मीमांसा करून अखेर म्हणतो की, ‘रोमन साम्राज्य का नष्ट झाले, अशी पृच्छा करण्याऐवजी आपण असा प्रश्न केला पाहिजे किंवा आश्चर्य व्यक्त केले पाहिजे, की ते इतके दीर्घकाळ टिकून तरी कसे राहिले’. काही विद्वान रोमचा ऱ्हास न होता, त्याचे केवळ स्थानांतरण झाले, असे मत व्यक्त करतात.

पहा : ख्रिस्ती धर्म प्यूनिक युद्धे, बायझंटिन साम्राज्य रोम रोमन कला रोमन कॅथलिक पंथ रोमन ग्लॅडिएटर रोमन लिपि रोमन विधि रोमन स्नानगृहे रोमान्स भाषासमूह लॅटिन भाषा लॅटिन भाषा साहित्य.

देशपांडे, सु. र.

संदर्भ : 1. Barrow, R. H. The Romans, Chicago, 1964.

           2. Boren. Henry C. Roman Society : A Social Economic and Cultural History, Lexington (Mass.), 1977.

           3. Bowder, Diana, The Age of Constantine and Jullian, London, 1978.

           4. Brown, F. E. Roman Architecture, Chicago. 1961.

           5. Cambridge University Press. Cambridge Ancient History, Vols. 7, 8, 10 and 12, Cambridge. 1952-1956.

           6. Chambers, Mortimer, The Fall of Rome : Can it Be Explained ? New York, 1970.

           7. Cunlifle, Barry W. Rome and the Barbarians. New York, 1975.

           8. Dilke, O. A. W. The Ancient Romans : How They Lived and Worked, London, 1975.

           9. Durrant, Will, Caesar and Christ, New York, 1944.

          10. Dyer, T. H. The History of the Kings of Rome, Washington. 1971.

          11. Eadie, John W. Ed. The Conversion of Constitine, New York, 1971.

          12. Earl’ Donald. C. The Moral and Political Tradition of Rome, London, 1967.

          13. Gibbbon, Edward, The Decline and Fall of the Roman Empire, New York, 1974.

          14. Gibbon Edward. Ed., Burry, J. B. The History of The Decline duv Fall of the Roman Empire. 7 Vols., London. 1975.

          15. Goodenough, Simon, Citizens of Rome. Toronto, 1979.

          16. Grant, Michael, History of Rome, New York, 1978.

          17 Hagen, V. W. Von, The Roads that Led to Rome, New York, 1967.

         18. Halliday, W. R. Lectures on the History of the Roman Religion, London, 1959.

         19. Hamey, L. A. and J. A. The Roman Engineers, Lerner, 1982.

        20. Kagan, Donald. The End of the Roman Empire : Decline or Transformation? London, 1978.

        21. Low, D. M. Abridg. Gibbon Edward : The Decline and Fall of the Roman Empire, London, 1960.

        22. MacDonald, W. L. The Architecture of the Roman Empire, Chicago 1975.

        23. Margary, I. D. Roman Roads in Britain, 2 Vols., New York, 1967.

       24. Nock, A. D. Essay on Religion and the Ancient World, 2 Vols., 1972.

       25. Rivoira, G. T. Roman Architecture, New York, 1972.

       26. Rose, H. J. Religion in Greece and Rome, New York, 1959.

       27. Rostovtzeft, Michael I. Social and Economic History of the Roman Empire, 2 Vols., Oxford. 1957.

       28. Scullard, H. H. The Etruscan Cities and Rome, London, 1967.

       29. Scullard, H. H. From the Gracchi to Nero, Andover, 1976.

       30. Sinnigen, William G. Boak, A. E. R. A History of Rome to A. D. 565 London, 1977.

       31. Star, C. G. Civilization and the Caesars, New York, 1965.

       32. Toynbee, J. M. C. The Art of the Romans, New York, 1965.

       33. Wallbank, F. W. Awful Revolution : The Decline of the Roman Empire in the West. Toronto, 1969.

       34. Wheeler, Sir Mortimer, Roman Art and Architecture, London, 1964.

       35. Wiseman, T. P. New Men in the Roman Senate, Oxford, 1971.

       36. Witonski, Peter P. Ed. Gibbon for Moderns : The History of the Decline and Fall of the Roman Empire with Lessons for America Today, New York, 1974. 


 झ्यूस देवतेचे मंदिर, आयझानी.टेलस (भूदेवता) देवतेचा शांतिवेदिकेवरील शिल्पपट्ट, ऊफीत्सी कलावीथी, फ्लॉरेन्स.मार्कस ऑरिलियस विजय संपादन केल्यानंतर आपल्या रथातून राजधानीत प्रवेश करतानाचे दृश्य, उत्थित शिल्प, कॅपिटोलाइन संग्रहालय, रोम.हेड्रिअन मंदिराचे प्रवेशद्वार, एफेसस, आशिया मायनर (तुर्कस्तान).

रोमन फोरम

'क्लाइटी' : ग्रेको-रोमन देवता, ब्रिटिश संग्रहालय, लंडन.