हेन्री टॉमस बकलबकल, हेन्री टॉमस : (२४ नोव्हेंबर १८२१-२९ मे १८६२). प्रसिध्द इंग्रज इतिहासकार. इंग्लंडमधील ली (केन्ट) येथे सधन कुटुंबात जन्म. कडव्या कॅल्व्हिन पंथीय आईचे आणि संपन्न दशेतील काँझेर्व्हेटिव्ह पंथीय वडिलांचे त्याच्या व्यक्तिमत्वावर मोठे परिणाम झाले. अशक्त आकृतीमुळे नाममात्र शिक्षण घेऊन विपुल वाचनाने त्याने आपला व्यासंग वाढविला. १८४० ते १८४४ या दरम्यान त्याने यूरोपातील विविध देशांना भेटी देऊन अनेक भाषा आत्मसात केल्या उत्तम ग्रहणशक्ती, असामान्य स्मरणशक्ती आणि तल्लाख कल्पकता यांची देणगी त्याला लाभली होती. बुध्दीबळ हा त्याचा सर्वांत आवडता छंद होता. वयाच्या विसाव्या वर्षी सार्वजनिक बुध्दीबळ स्पर्धेत त्याला उत्तम बुध्दीबळपटू म्हणून मान्यता मिळाली. इतिहासावर एक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिण्याचा त्याने संकल्प सोडला आणि इंग्लडचा द्विखंडात्मक सांस्कृतिक इतिहास व हिस्टरी ऑफ सिव्हिलिझेशन इन इंग्लड (१८५७-६१) या शीर्षकाने प्रसिध्द केला.

या ग्रंथामुळे इंग्रजी भाषेतील इतिहासलेखनाला एक नवी कलाटणी देणारा इतिहासकार, म्हणून बकल ओळखला जातो. मानवी इतिहासाची कहाणी ही निसर्गाच्या विकसनशीलतेच्या कथेचाच एक भाग असून मानव आणि निसर्ग यांच्या एकमेंकावर घडणाऱ्या आघात प्रत्याघातांतून निर्माण होणाऱ्या प्रक्रिया म्हणजेच इतिहास होय. ही बकलच्या लेखनामागील मुख्य धारणा होती. निसर्गातील विविध घटना आणि प्रक्रिया यांच्याप्रमाणे मानवी इतिहास काही विश्वात्मक स्वरूपाच्या नियमांनी नियंत्रित झालेला असून त्या विश्वात्मक नियमांचा आविष्कार करणे, हे इतिहासकारचे खरे कार्य असल्याचे बकलने आग्रहाने प्रतिपादन केला. जांबात्तीस्ता व्हीको, मीशील आणि ऑग्यूस्तकाँत या यूरोपातील बुध्दीमंतांनी सुरू केलेल्या इतिहास मीमांसेचा धागा हाती धरून बकलने १९ व्या शतकाच्या मध्यास इंग्रजी इतिहास लेखनास एक नव्या दृष्टीकोनाची जोड दिली.

इंग्लडमधील इतिहासलेखनाच्या दालनात हेन्री हॅलम, टॉमस कार्लाइल आणि टॉमस मेकॉले यांसारख्या मातब्बरांचा दरारा गाजत असताना बकलने आपला घणाघाती ग्रंथ प्रसिध्द केला. ऑग्यूस्त काँतच्या समाजविकासाच्या सिध्दांताने भारवून गेलेल्या बकलने आपल्या ग्रंथाची उभारणी मुत्सद्दी आणि योध्दे-लढवय्ये यांच्या अवतीभोवती न करता जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अनुभव सूत्रातून केली. अन्न, हवापाणी आणि भौतिक वातावरण यांचा मानवी बुध्दीवर व कर्तुत्वावर कसा परिणाम घडून येतो. याचा मागोवा घेऊन बकलने इंग्लंडमधील नागरी संस्कृतीच्या विकासक्रमाची कहाणी आपल्या ग्रंथात सादर केली. भौतिकशास्त्रातील तौलनिक आणि विश्लेषणात्मक पध्दतींमधील काटेकोरपणा व वस्तुनिष्ठपणा इतिहासकारांनी स्वीकारणे आवश्यक आहे, या आग्रहापोटीच ही मांडणी बकलला करता आली.

मुक्त संकल्प शक्ती (फ्री विल पावर) आणि पूर्णनियतिवाद (प्रीडिटर्मिनिझम) या दोन्ही ठोकळेबाज अतिरेकी भूमिका त्याज्य ठरवून मानवी जीवनात पूर्वापार घडून गेलेल्या विविध घटनांच्या परस्परसंबंधांचा वस्तुनिष्ठ अर्थ लावून त्यातील संगती लावण्याचा बकलने आग्रह धरला. मानव आणि निसर्ग यांच्यामधील साहचर्य आणि संघर्ष यांतून घडून येणारी स्थित्यंतरे आणि रूपांतरे यांचा छडा लावून मानवी बुध्दीच्या कर्तृत्वाचा आलेख बकलने रेखाटला.

इतिहासलेखकांनी बकलच्या इतिहासदृष्टीतील श्रेयस्कर भाग मोठ्या प्रमाणात आत्मसात केला आहे. बकलने पदार्थशास्त्रीय नियम आणि मानसशास्त्रीय नियम यांची अतिरेकी गल्लत केली, असा ठपका काही टीकाकारांनी ठेवला आहे. पदार्थशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय नियम हेच जणूकाही समाजाला आणि इतिहासाला अनिवार्यपणे व स्वतंत्रपणे पुढे ढकलीत असतात. कार्यप्रवण करीत असतात. असा अतिरेकी समज टीकाकारांनी बकलच्या पदरात घातला आहे. पण एवढे असूनही इंग्लंडमधील इतिहासलेखनाला रंणागणावरील शस्त्राच्या खणखणाटातून आणि अलौकिक व्यक्तिमत्वाच्या वलयातून बकलने मुक्त केले ही गोष्ट सर्वसामान्य आहे.

बकलचा इंग्लंडच्या इतिहासावरील हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. सर्व महत्त्वाच्या यूरोपीय भाषांत तो अनुवादित झाला असून त्याचा जगात इतरत्रही प्रसार झाला (ग्रेॲम वॉलॅसला त्याचा अनुवाद रशियन शेतकऱ्यांच्या झोपड्यांतही सापडला आहे). मानवी प्रगती वरील त्याचा अदम्य विश्वास, निष्कर्ष, समर्पक तपशील, आल्हाददायक अलंकारिक शैली, प्रतिगाम्यांवरील विशेषतः नोकरशाही प्रतिगाम्यांवरील त्याचे हल्ले यांमुळे त्यास एकोणिसाव्या शतकातील प्रागतिक विचारसरणीच्या लोकांत उदा., इमॅन्युएल कांट,जॉन मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांहून अधिक आदराचे स्थान मिळवून दिले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या ग्रंथाच्या प्रचंड खपामुळे तत्कालीन समाजाच्या विचारांचे महत्त्वाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी तो एक मोठेच साधन बनला. प्रगती स्वातंत्र्य, संस्कृती, रक्षणकारी प्रवृत्ती, अशा अमूर्त आशयांच्या संज्ञांना व्हिक्टोरियन कालीन सामान्य लोकांनीही दिलेला अर्थ तपासण्यासाठी तो ग्रंथ महत्त्वाचा ठरला.

पॅलेस्टाइन आदी मध्यपूर्वेकडील प्रदेशांत प्रवास करीत असता, दमास्कस येथे तो विषमज्वराने मरण पावला.

संदर्भ : 1. Aubyn, St. Gites, A Victorian Eminence, The Life and Works of Henry Thomas Buckle, London, 1958.

          2. Hale, J.R.Ed. The Evolution of British Gistorlography From Bacon to Namier, London, 1964,

कर्णिक, श.द.,रानडे, पंढरीनाथ