रणजितसिंग : (१३ नोव्हेंबर १७८० – २७ जून १८३९). पंजाबातील शीख सत्तेचा संस्थापक. त्याचा जन्मरणजितसिंग" अजोळी म्हणजे जीदनजीकच्या बुद्रुखान या खेड्यात झाला तथापि गुजराणवाला हेही त्याचे जन्मगाव असल्याचे एक मत आहे. त्याचे वडील महासिंग (महासिंह) आणि आईचे नाव बिबी राजकौर. महासिंग सुकरचक्किया या शीख संघटनेचे-मिसलचे-प्रमुख होते. त्याचे प्रारंभीचे शिक्षण गुजराणवाला येथील धर्मशाळेत झाले. बालवयात देवीच्या रोगामुळे त्याचा डावा डोळा अधू झाला, चेहऱ्यावर देवीचे व्रणही राहिले. वडिलांच्या मृत्यूनंतर तो सुकरचक्किया संघटनेचा प्रमुख झाला (१७९२). शीख संघटनेच्या प्रमुख सदा कौर यांच्या मेहताब कौर या मुलीशी त्याचा विवाह झाला (१७९५). आई व सासू यांच्या सल्ल्याने प्रथम तो राज्यकारभार पाही. शीख संघटना समर्थ करणे व आपली लष्करी ताकद वाढविणे, या हेतूंनी त्याने नकाई या संघटना प्रमुखाच्या राजकौर नावाच्या बहिणीशी दुसरा विवाह केला (१७९८). त्याचवर्षी अफगाणिस्तानचा राजा व अहमदशहा अब्दालीचा नातू शाह झमान याने हिंदुस्थानवर स्वारी केली. काबूलमध्ये उद्भवलेले बंड शमविण्यासाठी शाह झमान लाहोर जिंकून परत निघाला. वाटेत झेलमला आलेल्या पुरात त्याच्या अडकलेल्या तोफा रणजितसिंगाने काढून दिल्या. तेव्हा शाह झमानने त्याला राजा हा किताब व लाहोर शहर दिले. पुढे त्याने महाराजा ही पदवी धारण केली (१२ एप्रिल १८०१). यानंतर जम्मू, भसीन, कांग्रा, चूनियत, कसूर येथील राजे, जहागीरदार यांचा पराभव करून तो थेट रावळपिंडीपर्यंत पोहोचला.

रणजितसिंगाने १८०३ ते १८०६ दरम्यान शीख मिसलदारांचा पराभव करून त्यांचा प्रदेश हस्तगत केला. १८०५ मध्ये भांगी शीख संघटनेकडील अमृतसर त्याच्या ताब्यात आले. त्यानंतर त्याने शीख मिसलदारांच्या तुकड्या व छोटी छोटी अफगाण राज्ये जिंकून सतलजच्या पश्चिम-उत्तरेकडील संपूर्ण पंजाब आपल्या आधिपत्याखाली आणला.

काश्मीरचा दक्षिण व पश्चिम भाग (१८११), गुरख्यांचा कांग्रा प्रदेश (१८१३), श्रीनगर, मुलतान (१८१८), अंबाला, नारायणगढ, रूपड, लुधियाना इ. ठाणी तसेच अटक, देरजात व सिंधूच्या पलीकडील मुलूख आपल्या आधिपत्याखाली आणला. पेशावरवर आपले वर्चस्व प्रस्थापिले. मुत्सद्देगिरीने ब्रिटिशांशी १८०६, १८०९ व १८११ असे अनुक्रमे तीन तह केले. शाह झमानचा भाऊ सूजा यास पकडून लाहोरला आणले व त्याच्याकडून प्रसिद्ध कोहिनूर हिरा घेतला.

पंजाबचे एकीकरण व अफगाण स्वाऱ्यांना पायबंद या दोन महत्त्वाच्या कामगिऱ्यांचे श्रेय त्याला जाते. तसेच त्याची सत्ता व लोकप्रियता जसजशी वाढत गेली तसतसे धर्माचे महत्त्व वाढत गेले. त्याचाच एक भाग म्हणून त्याने आपली राजधानी अमृतसरहून राजकीय महत्त्व असलेल्या लाहोरला नेली. त्याने इतर धर्मियांना-हिंदु-मुसलमान-आश्रय दिला. स्थानिक जमाती व अफगाण यांना पराभूत करण्यासाठी तसेच शासनयंत्रणा चालवण्यासाठी इतर धर्मीयांचा पाठिंबा मिळवला. उत्कृष्ट युद्धनेतृत्वासाठी तो प्रसिद्ध होता. त्याची स्मरणशक्त्ती प्रखर होती. त्याच्या राज्यातील दहा-बारा हजार खेड्यांची नावे, त्यांची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती, तेथील लष्करी अधिकारी व लष्करी कुमक इ. गोष्टी त्याला मुखोद्गत होत्या. लष्करी अधिकाऱ्यांना मोहिमांच्या आज्ञा सर्व तपशिलांसहीत मिळत. त्याने केलेल्या सत्तेच्या केंद्रीकरणाचा एक अनिष्ट परिणाम म्हणजे त्याच्यानंतर कार्यक्षम लष्करी व राजकीय नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही.

रणजितसिंगाने प्रशासनव्यवस्थेत मोगलांचे अनुकरण केले. प्रशासनाच्या सोयीसाठी लाहोर, मुलतान, काश्मीर आणि पेशावर हे चार विभाग पाडून प्रत्येक विभागाची पुन्हा परगण्यांत विभागणी केली. या सर्वांवर स्वतंत्र महसूल अधिकारी नेमले. शीख गुरूंची कोरीव नावे असलेली नाणी त्याने पाडली. भवानीदास हा त्याचा विश्वासू अर्थमंत्री होता. खेड्यातील पंचायतींकडे दिवाणी न्यायव्यवस्था ठेवून फौजदारी खटल्यासाठी त्याने स्वतंत्र अधिकारी नेमले होते. दप्तराचे संरक्षण करण्यासाठी खास व्यवस्था केली होती.

त्याच्या सैन्यात शिखांबरोबर ब्राह्मण, राजपूत, मुसलमान, डोग्रा इ. विविध जातिधर्मांच्या व्यक्त्ती होत्या. धार्मिक बाबतीत तो सहिष्णू होता. यूरोपियन अधिकारी नेमून अल्पावधीतच त्याने घोडदळ, पायदळ व तोफखाना यांची सुसज्ज उभारणी केली. मात्र यूरोपीय सेनाधिकाऱ्यांवर त्याचा वचक होता. त्याने शेतीला उत्तेजन दिले व उद्योगधंद्यांना आर्थिक मदत केली. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याने पाठशाळांना मोठ्या देणग्या दिल्या.

त्याचे खासगी जीवन विलासी आणि व्यसनाधीन होते. त्याच्या जनानखान्यात अनेक नर्तिकाही होत्या. राजकौर, मोहरन, गुलबदन बेगम, गुद्दान, जिंदान या त्याच्या काही आवडत्या राण्या. त्याच्या संततीपैकी सात मुलगे प्रसिद्धीस आले. रणजितसिंगाचा ‘शेर ए पंजाब’ असा गौरवपर उल्लेख पंजाबात केला जाई.

आत्यंतिक व्यसनाधीनतेमुळे आयुष्याच्या अखेरीस त्याला पक्षाघाताचा विकार जडला व क्षीण अवस्थेत तो लाहोरला मरण पावला. मृत्यूपूर्वी त्याने अतोनात दानधर्म केला आणि आपला भावी वारस म्हणून खरकसिंग या ज्येष्ठ मुलाची निवड केली. त्याच्या चार राण्या व सात दासी सती गेल्या.

पहा : शीख सत्ता, भारतातील.

संदर्भ : 1. Conningham, J. D. A History of the Sikhs : from the Origin of the Nation to the Battles of the Sutlej , New Delhi, 1981.

2. Gill, P. S. History of Sikh Nation, Jullundar, 1978.

3. Malik, I. A. The History of the Punjab : 1799-1947, Delhi, 1983.

4. Sharma , S. R. Maker of Modern Punjab, Lahore, 1941.

5. Sharma , S. R. Punjab in Ferment , Delhi, 1971 .

6. Singh, Khushwant, A History of the Sikhs, 2 Vols., New Jersey, 1963.

7. Singh, Khushwant, Ranjit Singh, London, 1962.

८. गाडगीळ, न. वि. शिखांचा इतिहास, पुणे, १९६३.

देवधर, य. ना. साखळकर, एकनाथ