बहावलपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील (विद्यमान प. पाकिस्तानातील) एक संस्थान. क्षेत्रफळ ४२,५५४ चौ. किमी. लोकसंख्या सु. दहा लाख (१९४१) वार्षिक उत्पन्न ३५.५ लाख. पंजाब प्रांतातील या संस्थानात १० शहरे व १,००८ खेडी होती. ईशान्येस फिरोझपूर जिल्हा, वायव्येस सतलज नदी, आग्नेयीस जैसलमीर व बिकानेर ही संस्थाने यांनी ते सीमित झाले असून त्याची ईशान्य-नैऋत्य लांबी सु. ४९० किमी. व सरासरी रूंदी ७० किमी. होती.

सिंधमधील अब्बासी दाऊदपोत्यांपैकी नबाब पहिला मुहंमद बहावलखान याने काबूलच्या अस्थिर राजकारणाचा फायदा घेऊन अठराव्या शतकात या प्रदेशात राज्य स्थापले (१७४८). दुसरा मुहमंद बहावलखान याने टाकसाळीचा परवाना मिळवला (१८०२). बहावलपूरचे नबाब स्वतःला ईजिप्तच्या अब्बासी खलीफांचे वंशज मानत. रणजितसिंगाच्या उदयानंतर त्यांनी ब्रिटिशांच्या मदतीसाठी प्रयत्न केले परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. सिंधू नदीवरील वाहतूक आणि पहिल्या अफगाण युद्धातील (१८३८-४२) साह्य यासाठी इंग्रजांनी संस्थानाशी मैत्रीचे तह केले (१८३३ व १८३८). शीख युद्धातील (१८४५-५०) साहाय्याबद्दल नबाबाला सबझलकोट व भुंग जिल्हे आणि एक लाखाचे वर्षासन मिळाले. गादीच्या तंट्यात इंग्रजांनी हस्तक्षेप केला नाही पण नबाब अल्पवयीन म्हणून १८६६-७९ दरम्यान त्यांनी संस्थानचा कारभार पाहिला. नबाब पाचवा अहमद बहावलखानच्या मृत्यूनंतर (१९०७) हाजी सादिक मुहंमदखान हा अल्पवयीन नबाब गादीवर आला. संस्थानची स्वतःची तांब्याची टाकसाळ व सैन्य होते. संस्थानने दुसरे अफगाण युद्ध (१८७५-७९) व पहिले महायुद्ध (१९१४-१९) यांत इंग्रजांना सक्रिय साहाय्य केले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रेल्वे, डाक, कालवे, पक्क्या सडका, तांदूळ सडण्याच्या व सुताच्या गिरण्या, नगरपालिका, आरोग्य, शिक्षण यांत संस्थानची थोडीफार प्रगती झाली. संस्थानात कैरोतील प्राचीन ⇨ अल्-अझार विद्यापीठाच्या धर्तीवर अब्बासिया नावाची संस्था असून ती सदिक इगरटन महाविद्याबरोबरच शिक्षण कार्यात अग्रेसर आहे.

नबाब हा शासनाचा मुख्य असून ११ जणांचे मंडळ प्रशासनात त्यास मदत करी. मंडळाचा अध्यक्ष मुशीर-इ-आल किंवा वझीर हा असून परराष्ट्र मंत्री, महसूल मंत्री, मुख्य न्यायाधीश, सैन्याचा प्रमुख हे इतर सभासद होते. प्रशासनाच्या सोयीसाठी संस्थानात तीन निझामती (विभाग) पाडलेले होते. प्रत्येक निझामत पुन्हा तीन तहसीलांत विभागलेली होती. निझामतचा प्रमुख नाझिम असे व तहसीलावर तहसीलदार व नायब तहसीलदार असत. मुशीर-इ-मालकडे अर्थखाते होते व त्याच्या हाताखाली हे सर्व अधिकारी असत. वार्षिक पर्जन्यमान फक्त सरासरी १३ सेंमी. असल्याने संस्थानातील निम्म्याहून अधिक प्रदेश वाळवंटी होता. ८३% प्रजा मुसलमान असलेले हे संस्थान १९४७ मध्ये पाकिस्तानात समाविष्ट झाले.

संदर्भ : Ali, Shahamat, History of Bahawalpur, Bahawalpur, 1848.

कुलकर्णी, ना. ह.