मौर्यकाल: इ. स. पू. चौथ्या शतकाच्या अखेरीस भारतातील प्राचीन मगध देशात मौर्य वंश उद्यास आला. या वंशातील राजांनी इ. स. पू. ३२१ ते १८५ दरम्यान भारतखंडाच्या बहुतेक भागावर राज्य केले आणि प्रथमच एकछत्री अंमल प्रस्थापित केला. या काळाला मौर्यकाल ही सर्वसाधारण संज्ञा देतात. या काळात जमात राज्ये किंवा महाजनपदे आणि लहान लहान राज्ये यांच्या जागी एक मोठे साम्राज्य उत्पन्न झाले. यापूर्वीचे नंद घराण्याचे राज्य फक्त उत्तर भारतापुरते, त्यातल्या त्यात गंगा-यमुनांच्या दुवेदीत व त्याच्या आसपासच्या प्रदेशापुरते मर्यादीत होते. त्याचा विस्तार करून ते बव्हंशी भारतभर पसरविण्याचे काम मौर्य वंशातील राजांनी विशेषतः चंद्रगुप्ताने केले. पुढे या साम्राज्याला आणि शासनयंत्रणेला काही उच्च जीवन मूल्ये व नैतिक अधिष्ठान त्याच्या नातवाने–सम्राट अशोक–याने दिले. यामुळे मौर्य साम्राज्याला एकूण भारतीय जीवनात एक विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे.

ऐतिहासिक साधने : मौर्यकालासंबंधीची माहीती मुख्यत्वे तत्कालीन वाङ्‌मय, परकीय प्रवाशांचे वृत्तांत, पुरातत्त्वीय अवशेष–विशेषतः शिला व प्रस्तर लेख यांवरून मिळते. पुराणांत अनेक राजे, राजवंश आणि त्यांचे पराक्रम यांचे उल्लेख व वर्णने जागोजाग पाहावयास मिळतात परंतु ही वर्णने बहुतेक ठिकाणी अतिशयोक्तीपूर्ण, संदिग्ध आणि बऱ्याच वेळा विसंगतच नव्हे, तर परस्परविरोधी आहेत. त्यामुळे त्यांचा अन्वयार्थ लावणे जिकीरीचे होते.

तथापि मौर्यांच्याविषयी माहीती देणारी शिलालेखांसारखी साधने विश्वसनीयतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. सम्राट अशोकाने कोरविलेल्या या कोरीव लेखांपैकी अनेक लेख उपलब्ध झाले असून त्यांचे वाचनही झाले आहे. आजपर्यंत दृष्टोत्पत्तीस आलेले बहुतेक लेख प्राकृतातील आहेत. काही ब्राह्मी लिपीत तर काही खरोष्ठी वॲरेमाइक लिपीतही आहेत. या शिलालेखांचे अभ्यासकांनी प्रस्तर लेख, प्रशस्ती लेख व लघुलेख असे तीन स्वतंत्र भाग पाडलेले आहेत. हे लेख काहीसे उपदेशपर असून अशोकप्रणीत सदाचरणाच्या मार्गांचे दर्शन त्यातून घडते. त्यांत राजाज्ञा, उपदेशपर धर्माज्ञा, चोल, चेर, पांड्य अशा काही राज्यांचे तसेच सुधारणांचा उल्लेख आहे. या अनुषंगाने काही शासनविषयक गोष्टींचा तसेच राजकीय स्थितीचा उल्लेख त्यातून मिळतो. अशोकाचा नातू दशरथ याने बिहारमधील नागार्जुन टेकड्यातील गुंफा-समूहांत कोरविलेला लेख म्हणजे एक दानपत्रच असून त्यात आजीवक पंथीयांच्या निवासासाठी या गुंफा खोदविल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. [→ अशोक स्तंभ].

अशोकस्तंभाचे सिंहशीर्ष, सारनाथ.

लिखित साधनांत मीगॅस्थिनीझचे इंडिका आणि ⇨ कौटिलीय अर्थशास्त्र यांना असाधारण महत्त्व आहे. चंद्रगुप्ताच्या दरबारी सील्यूकस निकेटर या ग्रीक राजाने ⇨ मीगॅस्थिनीझ नावाचा वकील पाठविला होता. त्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला होता. तो आता नष्ट झाला आहे पण नंतरच्या ग्रीक लेखकांनी या ग्रंथातील काही भाग आपल्या ग्रंथात उद्‌धृत केला आहे. विशेषतः स्ट्रेबो याने ख्रिस्ती शकाच्या आरंभाच्या सुमारास लिहिलेल्या भूगोलविषयक ग्रंथात त्याने मीगॅस्थिनीझच्या इंडिकामधील चंद्रगुप्त, पाटलिपुत्र, मौर्य साम्राज्य अशा विषयांवरील माहिती उद्‌धृत केलेली आहे. ही माहिती बहुतेक ठिकाणी तपशीलवार आणि सूक्ष्म आहे. स्वाभाविकच ती ग्राह्य मानण्याकडे अभ्यसकांचा कल असतो. त्या माहितीत सत्यांश किती आहे, हे तत्कालीन इतर पुराव्यांच्या आधारे पडताळून पाहणे इष्ट ठरते. याशिवाय प्लूटार्क आणि जस्टिन यांच्या लिखाणातूनही काही माहिती मिळते, ती बरीचशी अप्रत्यक्षरीत्या मिळते. 

चंद्रगुप्ताचा गुरू चाणक्य म्हणजेच अर्थशास्त्र या राजनीतिशास्त्रावरील ग्रंथाचा लेखक कौटिल्य असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. अर्थशास्त्रात राज्य या संस्थेची उत्पत्ती, तिचा विकास, सत्ता व अधिकार यांचे तात्त्विक स्वरूप, नागरिक या कल्पनेचे स्पष्टीकरण अशा विविध स्वरूपाचे तात्त्विक आणि सैद्धांतिक विवेचन आढळते. त्यामुळे स्वाभाविकपणेच अर्थशास्त्रामध्ये मौर्यांच्या शासनव्यवस्थेचे प्रतिबिंब उमटलेले आहे असे समजण्यात येते. मीगॅस्थिनीझची वर्णने आणि कौटिलीय अर्थशास्त्रातील वर्णने यांमध्ये पुष्कळ वेळा आश्चर्यकारक साम्य आढळते.

चंद्रगुप्त मौर्याने आपल्या आयुष्याच्या उत्तरकालामध्ये जैन मताचा स्वीकार केला व तो राजसंन्यास घेऊन कर्नाटकमध्ये निघून गेला, अशी आख्यायिका आहे. स्वभाविकच जैन वाङ्‌मयात त्याच्या चरित्राचे काही दिसतात. बौद्धांच्या दिव्यावदान, महावंस, महापरिनिर्वाण सूत्र या ग्रंथांतून मुख्यतः चंद्रगुप्त आणि अशोक यांच्याविषयी माहिती मिळते. विष्णुपुराण, वायुपुराण, युगपुराण, गार्गी संहिता, हर्षचरित अशा काही ग्रंथात प्रसंगोपात्त त्यांचे उल्लेख येतात. विशाखदत्ताच्या मुद्राराक्षस या नाटकाचा उल्लेख उत्तरकालीन साधनग्रंथांत प्रामुख्याने करण्यात येतो. चंद्रगुप्तानंतर सहा–सात शतकांनी हे नाटक लिहिलेले आहे.या नाटकामध्ये नंद राजाचे उच्चाटन करण्याचे व मौर्याचे राज्य स्थापन करण्याचे श्रेय चंद्रगुप्तापेक्षा चाणक्यालाच अधिक दिलेले दिसते. परंपरेचे पालन त्यातून स्पष्ट होते.

मौर्यकालीन कलाशिल्पांचे अनेक अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत. त्यांवरून तत्कालीन धार्मिक समजुती व कलापरंपरा यांचा बोध होतो पण त्याबरोबरच मौर्यकालीन संस्कृतीवर इराणी परंपरेचा किती प्रभाव पडला होता, हेही प्रतीत होते.


राजकीय इतिहास : मौर्य हे कुलनाम जैन, बौद्ध, हिंदू अशा सर्व धार्मिक वाङ्‌मयाला ज्ञात आहे. जस्टिनसाखे परकीय लेखकही या वंशाला याच नावाने ओळखत. मात्र हे कुल कोठले व मौर्य हे नाव त्याला कसे प्राप्त झाले, यांविषयी अनेक मतमतांतरे व प्रवाद प्रचलित आहेत. जस्टिनसारख्या काही लेखकांच्या पुस्तकात चंद्रगुप्त हा हीन कुलात जन्मला, असे एक मोघम विधान आढळते. जैन ग्रंथात चंद्रगुप्ताचा जन्म मोर पाळणाऱ्या जमातीत झाला, म्हणून त्याला मौर्य नाव पडले असे म्हटले आहे. मौर्यकाळानंतरच्या पाचसहा शतकांनी लिहिलेल्या संस्कृत ग्रंथात व नाटकात शेवटचा नंद सम्राट धनानंदाचा चंद्रगुप्त हा दासीपुत्र असून त्या दासीचे नाव मुरा होते.म्हणून या घराण्याचे नाव मौर्य पडले असे म्हटले आहे. मुरा ही धनानंदाची राणी होती व तिला एका नापित प्रियकरापासून चंद्रगुप्त हा मुलगा झाला, असाही प्रवाद आहे. बौद्ध वाङ्‌मयात चंद्रगुप्त व बिंदुसार हे क्षात्रकुलोत्पन्नच आहेत, असे उल्लेख येतात. उत्तर प्रदेशाच्या पिप्पलिवन या भागात मोरिय नावाची एक क्षत्रिय जमात राज्य करीत होती. या मोरिय जमातीत चंद्रगुप्ताचा जन्म झाला, म्हणून त्याच्या घराण्याला मौर्य म्हणू लागले असावेत. चंद्रगुप्ताच्या व्यक्तिमत्त्वाने चाणक्य प्रभावित झाला आणि त्याने चंद्रगुप्तास सर्व विद्यांत पारंगत करून नंदांच्या उच्छेदास सिद्ध केले, अशी सर्वसाधारण ऐतिहासिक धारणा आहे. अलेक्झांडरच्या भारतातील स्वारीनंतर दोनतीन वर्षांच्या कालावधीतच चंद्रगुप्ताचा उदय होऊन त्याने मगध राज्याचा ताबा मिळविला. अलेक्झांडरच्या स्वारीचा काळ इ. स. पू. ३२४–२१ असा मानला, तर चंद्रगुप्ताचा राज्यारोहण काल इ. स. पू. ३२४–२१ असा समजता येतो. त्यानंतर या वंशात सात राजे झाले. शेवटचा राजा बृहद्रथ याला मारून त्याचा सेनापती ⇨ पुष्यमित्र शुंग याने गादी बळकावली. हा प्रसंग इ. स. पू. १८५–८४ च्या सुमारास घडला. म्हणजे आठ मौर्य राजांची मिळून एक राजवट १३७ वर्षांची होती. त्यांची नावे पुढीलप्रमाणे:

चंद्रगुप्त: इ.स.पू. ३२४/२१–३०० 

राज्यकाल – चोवीस वर्षे 

बिंदुसार: इ.स.पू. ३००–२७३ 

राज्यकाल – पंचवीस वर्षे 

अशोक: इ.स.पू. २७३–२३६ 

राज्यकाल –सदतीस वर्षे 

कुणाल: अनिश्चित 

अनिश्चित 

दशरथ: ,, 

,, 

संप्रती: ,, 

,, 

शालिशूक: ,, 

,, 

बृहद्रथ: अनिश्चित–इ.स.पू. १८५ 

,, 

यांपैकी चंद्रगुप्ताचा राज्यकाल पुराणांनी दिला आहे. बिंदुसाराचा राज्यकाल पुरणांच्या मताने पंचवीस वर्षांचा, तर बौद्ध वाङ्ययानेअठ्ठावीस वर्षांचा सांगितला आहे. अशोकाच्या कारकीर्दीतबाबत सर्व मौर्य राजवंशाचा कालक्रम निश्चित करण्यासाठी उपयुक्त पडणारी सर्व साधने अप्रत्यक्ष आहेत तसेच ती परस्परविरोधी आहेत. बौद्ध परंपरेप्रमाणे अशोकाने राज्यारोहण केले, त्यावेळी गौतमाच्या निर्वाणास २१८ वर्षे झाली होती. निर्वाण केव्हा झाले, याविषयी एक सिंहली व दुसरी चिनी अशा दोन परंपरा आहेत. सिंहली परंपरेप्रमाणे हा काळ इ. स. पू. ५३७ असा येतो, तर चिनी परंपरेप्रमाणे इ. स. पू. ४८७ येतो. चिनी परंपरा अधिक विश्वसनीय मानण्याकडे विद्वानांचा कल आहे. याशिवाय समकालीन ग्रीक राज्यांचे उल्लेख, विशेषतः अलेक्झांडरची स्वारी व तदनुषंगिक माहिती किरीनचा राजा मगस, सिरियीचा थिऑस हे अशोकाचे समकालीन शेवटी बृहद्रथाच्या वेळी ग्रीकांनी केलेली स्वारी व तिचा पतंजलीच्या महाभाष्या येणारा वर्तमानकाळी उल्लेख यांचा कालनिश्चितीस उपयोग होतो.

दीदारगंज चौराधारी यक्षिणी, पाटणा वस्तुसंग्रहालय, पाटणा, बिहार.

चंद्रगुप्त (इ. स. पू. कार. ३२४–३००) हा मौर्य वंशाचा संस्थापक असून सुरुवातीस त्याने तक्षशिलेच्या बाजूला शस्त्रोपजिवी लोकांचे सैन्य उभारून धनानंदाचा पाडाव केला. पुढे गादीवर येताच त्याने सील्यूकस निकेटरच्या आक्रमणास पायबंद घालून त्याचा पराभव केला. व भारतातील ग्रीक सत्ता संपुष्टात आणली आणि पंजाब, सिंध हे भूप्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केले. त्याने जवळजवळ अखिल भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणला. सील्यूकसने मीगॅस्थिनीझ यास आपला वकील म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारात ठेवले. सील्यूकसच्या लढाईनंतर चंद्रगुप्ताने फारशी आक्रमणे केलेली दिसत नाहीत. आयुष्याच्या उत्तरकाळात जैनमताचा स्वीकार करून त्याने राजसंन्यास घेतला आणि उर्वरीत आयुष्य दक्षिणेत कर्नाटकात व्यतीत केले, अशी कथा प्रसृत आहे. चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार (इ. स. पू. कार. ३००–२७३) गादीवर आला. त्याला अमित्रघात व सिंहसेन अशीही नावे होती. त्याच्या कारकिर्दीविषयी विशेष माहीती ज्ञात नाही. त्याने पित्याचेच राज्य राखले आणि तक्षशिला प्रांताचे बंड मोडण्यासाठी राजपुत्र अशोक याची नियुक्ती केली. [→ चंद्रगुप्त मौर्य].

अशोक (इ. स. पू. कार. २७३–२३६) हा या वंशातील सर्वश्रेष्ठ राजा. राज्यारोहणानंतर त्याने कलिंग प्रदेश जिंकला आणि पुढे युद्धसंन्यास घेऊन बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार केला. अशोकाने धर्मप्रसारार्थ खास अधिकारी नेमले आणि कोरीव लेखांद्वारे धर्माज्ञा कोरविल्या. त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक कल्याणकारी सुधारणा करण्यात आल्या. त्याचा अंमल दक्षिणेतील काही राज्ये वगळता सर्व भारतावर होता.

[→ अशोक–२].

यानंतरच्या एकही राजाचे चरित्र ज्ञात नाही. बृहद्रथ हा अशोकाचा नातू/पणतू. त्याचा वध त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने केला. यावरून त्यावेळी राजकुल दुर्बल झाले होते हेच स्पष्ट होते.

अलंकृत द्वारशाखा, लोमशऋषी-गुहा, बराबर टेकडी, बिहार राज्य.

साम्राज्य विस्तार : नंदांच्या वेळी मगधचे राज्य मुख्यत्वे गंगा-यमुनांच्या खोऱ्यात बिहार व उत्तर प्रदेश असे मर्यादित होते. कालांतराने त्याचा पश्चिमेकडे विस्तार झाला. चंद्रगुप्ताने नंदांचा उच्छेद केल्यावर अफगाणिस्तान, सिंध वगैरे पश्चिमेकडील प्रदेश आपल्या अंमलाखाली आणले. बिंदुसाराने ते फक्त जोपासले. मौर्य साम्राज्याचा सर्वांत अधिक विस्तार अशोकाचा कारकीर्दीत झाला. त्याने कलिंगवर स्वारी करून ते जिंकले. या साम्राज्याच्या सीमा अशोकाच्या कोरीव लेखांद्वारे निश्चित होतात. ज्या ज्या ठिकाणी अशोकाने आपले लेख कोरविले, ती स्थळे त्याच्या साम्राज्यात व आधिपत्याखाली असणार हे उघडच आहे. उत्तर भारतात, गंगा-यमुनांच्या खोऱ्यात, वायव्येला अफगाणिस्तानात जलालाबाद, कंदाहार आणि पाकिस्तानच्या पेशावर व हजारा जिल्ह्यातील शहबाझगढी, तक्षशिला व मानसेहरा येथेही हे लेख मिळाले आहेत. पश्चिमेला सौराष्ट्रात गिरनारच्या पायथ्याशी व ठाणे जिल्ह्यात सोपारा येथे दक्षिणेला चितळदुर्ग आणि कोप्पळ जिल्ह्यात, आंध्र प्रदेशात कुर्नूल जिल्ह्यात आणि पूर्वेकडे ओरिसाच्या पुरी व गंजाम जिल्ह्यांत अशोकाचे लेख मिळालेले आहेत. थोडक्यात वायव्येकडील अफगाणिस्तानापासून पूर्व-पश्चिम आसिंधुसिंधू आणि दक्षिणेला कृष्णा-तुंगभद्रा नद्यांपर्यंत मौर्य साम्राज्य विस्तारलेले होते. या लेखांमध्ये अशोकाने आपले सीमावर्ती लोक व देश यांचा उल्लेख केला असून वायव्येला यवन राजा अंतियक (अँटायओकस) आणि दक्षिणेकडील चोल, पांड्य व केरलपुत्र (चेर) यांचा सीमावर्ती म्हणून निर्देश केलेला आहे.


 शासनव्यवस्था : मीगॅस्थिनीझचे लेखन, अशोकाचे लेख आणि काही प्रमाणात कौटिलीय अर्थशास्त्र यांतून मौर्य शासनाची माहिती मिळते. राजा किंवा सम्राट हा शासन यंत्रणेच्या अग्रभागी होता. तो वंशपरंपरेच्या अधिकाराने या पदावर येत असल्याने त्याची सत्ता तत्त्वतः तरी अनियंत्रित होती. नवीन कायदेकानू करणे, त्यांची अंमलबजावणी करणे आणि न्यायदान या सगळ्यांचे अधिकार राजाकडे होते. चंदगुप्तासंबंधी मीगॅस्थिनीझ सांगतो, की ‘सम्राट हा सतत राज्यव्यवहारात मग्न असतो, मालीश वा स्नान करीत असतानाही तो आपल्या दूतांनी आणलेली माहिती ऐकतो, विश्रांती घेताना क्वचितच सापडतो.’ या कामात त्याला सहाय्य करण्यासाठी मंत्रिपरिषद असे. परिषदेतील मंत्री राजानेच नेमलेले असत आणि त्याला नकोसे वाटल्यास त्यांना काढून टाकण्यात येई. हे मंत्री राज्यव्यवहाराचा उत्तम अनुभव गाठीशी असलेले, राजाच्या विश्वासातले असून त्यांच्याकडे एकेका स्वतंत्र खात्याचा कारभार सोपविलेला असे. मीगॅस्थिनीझ मंत्रिपरिषदेच्या सर्वसाधारण कार्यव्यापाचीही कल्पना देतो. प्रादेशिक, प्रांतांचे प्रमुख अधिकारी, उपशासनाधिकारी, राज्याचे कोषाध्यक्ष , सेनापती, दंडाधिकारी, न्यायाधीश, शेतकीसारख्या खात्यांचे प्रमुख असे (सगळे महत्त्वाचे) अधिकारी यांची नियुक्ती मंत्रिपरिषद करीत असे. राजा व मंत्रिपरिषद यांच्यामध्ये उपराज व अग्रामात्य अशी दोन पदे काही वेळा दिसतात. अशोकाने आपला भाऊ वा मुलगा तिस्स यालाच उपराज नेमले होते.

साम्राज्याचे जे प्रांत होते त्या प्रांतांच्या प्रमुखपदी राजप्रतिनिधी किंवा प्रांताधिप नेमलेले असत. अशोकाने तक्षशिला, उज्जैन, तोषाली व सुवर्णगिरी या प्रांतांवर राजपुत्रांची राजप्रतिनिधी म्हणून नेमणूक केली होती. त्यांपैकी तक्षशिलेचा ‘कुणाल’ याचे नाव ज्ञात आहे. प्रादेशिक, राष्ट्रिक राजूक, यूत, महामात्र अशी अनेक पदे साधारण प्रांताधिकाऱ्यांच्या दर्जाची असावीत. त्यांच्या दर्जात व कार्यक्षेत्रात नेमका काय फरक होता हे समजत नाही. ज्यांची कार्यव्याप्ती निश्चितपणे समजते असे दोनच अधिकारी ज्ञात आहेत, ते म्हणजे अशोकाने नेमलेले धर्म-महामात्र व स्त्री-अध्यक्ष-महामात्र. धर्म-महामात्रांचे काम बौद्ध धर्माचा प्रचार करणे असे नव्हते, तर प्रत्येक धर्मपंथांचे आचारविचार निर्वेधपणे चालावेत हे होते. यासाठी प्रत्येक पंथाला महामात्र नेमला होता. प्रांताच्या मुख्य शासकाला सल्ला देण्यासाठी, कारभारात साहाय्य करण्यासाठी मंत्रिपरिषदेसारखीच इतर मंडळे असत. दर तीन किंवा पाच वर्षांनी, महत्त्वाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात तपासणीसाठी दौरे काढावेत, अशी पद्धत अशोकाने सुरू केली. परराष्ट्रांशी, म्हणजे राजांशी, संपर्क ठेवण्यासाठी जे वकील नेमले जात, त्यांना दूत अशी संज्ञा होती.

राज्यातील घडामोडींची, प्रजेची, राजाला अद्ययावत माहिती असली पाहिजे, यावर मौर्य शासनाचा कटाक्ष होता. ही माहिती गोळा करून राजापर्यंत पोहोचविण्याचे काम करणारी स्वतंत्र यंत्रणा होती. ही गुप्तहेरांची संघटना नव्हती, तर नित्याची आकडेवारी जमा करून राजाला पुरविण्याचे काम तिच्याकडे होते. गुप्तहेरांचे स्वतंत्र खाते होते. मीगॅस्थिनीझ व कौटिल्य दोघांनीही या संघटनांचे महत्त्व प्रतिपादिले आहे.

मध्यवर्ती शासनाची रचना कितीही विचारपूर्वक केलेली असली आणि रस्ते व वाहतूकव्यवस्था कितीही उत्तम असली, तरी भौगोलिक अंतर नाहीसे करणे अशक्य होते. म्हणून स्थानिक प्रशासनाचे महत्त्व कधीही कमी झाले नाही. खेड्यात आणि ग्रामातून पूर्वापार चालत आलेली पंचायतीसारखी शासनपद्धत कायम होती. मीगॅस्थिमीझने नगरशासनाचे तपशीलवार वर्णन दिले आहे. त्यावरून शासनाच्या कार्याची आणि कार्यव्याप्तीची कल्पना येते. त्यात म्हटले आहे, नगराचा कारभार पाहण्यासाठी एक नगरपरिषद असे. या परिषदेच्या सहा उपसमित्या असत व प्रत्येकीत पाच सभासद होते. पहिल्या समितीकडे औद्योगिक-शिल्पविषयक कामे असत. दुसऱ्या समितीकडे परदेशी नागरिकांच्या देखभालीचे काम होते. त्यांना निवासस्थाने उपलब्ध करून देणे व त्यांच्या एकूण वर्तणुकीवर देखरेख ठेवणे ही या समितीची मुख्य कामे होती. परदेशी नागरिकांच्या दिमतीला जे नोकरचाकर दिलेले असत त्यांच्याकडून परकीयांवर लक्ष ठेवले जाई. याशिवाय त्यांना आपापाल्या देशी सुखरूप पोहोचविणे, आजारी पडले तर औषधपाणी व शुश्रूषा करणे, मृत्यू पावले तर त्यांची उत्तरक्रिया करणे आणि त्यांची मालमत्ता त्यांच्या वारसाकडे पोहोचविणे, ही या समितीचीच जबाबदारी होती. तिसऱ्या समितीकडे जनगणनेची नोंद, विशेषतः जन्म-मृत्यू यांची नोंद ठेवण्याचे काम होते. यामध्ये कर आकारणीचे काम सुलभ व्हावे असा हेतू होता. तद्‍वतच, समाजाच्या विविध स्तरांत जन्म-मृत्यूचे प्रमाण काय आहे, याची शासनाला सतत जाणीव ठेवणे हाही होता. चवथ्या समितीकडे व्यापार उदिमाची व्यवस्था होती. विशेषतः वजनमापे तपासणे आणि मालाच्या दर्जावर लक्ष ठेवणे, ही या समितीची प्रमुख कामे होती. एकापेक्षा अधिक वस्तूंचा व्यापार करावयाचा असला, तर त्यासाठी वेगळा कर भरावा लागे. पाचव्या समितीकडे उत्पादन हे खाते होते. नव्या मालाच्या विक्रीची व्यवस्था करणे, हे या समितीचे मुख्य काम. सहाव्या समितीकडे विक्रीकर वसूली हे काम होते. किंमतीच्या एक-दशांश इतका भाग विक्रीकर म्हणून द्यावा लागत असे व कर चुकविणाऱ्यास जबर शिक्षा असे.

याशिवाय सर्वांना मिळून सार्वजनिक हिताची अनेक कामे करावी लागत. सार्वजनिक बांधकामे, मंदिरे-मठ यांची देखभाल, बंदरे, रस्ते व बाजारपेठांची व्यवस्था, किंमतीवर नियंत्रण, भूमापन, जलपूर्ती, कालवे, जंगले, जंगलसंपत्ती, खाणी इ. गोष्टींची व्यवस्था नगरपरिषदेला पहावी लागत असे.

सैन्याची व्यवस्था अशाच सहा समित्यांकडे सोपविलेली होती. घोडदळ, पायदळ, गजदळ, रथांचे दळ, नौदल आणि पुरवठा या प्रत्येकासाठी एकएक समिती होती. युद्धाचे वेळी सेनादलांचे नेतृत्व राजाच करीत असे. या समित्या त्याच्याच मार्गदर्शनाखाली काम करीत असत. कौटिलीय अर्थशास्त्रात वर्णन केलेली सेनादलाची संघटना याच प्रकारची होती, हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे.


आर्थिक स्थिती : लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा होता. गंगा-यमुना खोरे अतिशय सुपीक आणि त्यामुळे धान्याची आणि धनाची सुबत्ता होती. शेतकीच्या जोडीला पूर्वीपासून चालत आलेला गोपालनाचा व्यवसाय सर्वत्र प्रचलित होताच. संपत्तीचे आणखी एक निसर्गदत्त साधन म्हणजे जंगले आणि खाणी. जंगलातून विविध प्रकारचे इमारती- लाकूड, डिंक, लाख असे पदार्थ मिळत. खाणीतून निरनिराळे धातू तसेच हिऱ्यामाणकांसारखे मौल्यवान खडे मिळत. या व्यवसायांच्या जोडीला, काही प्रमाणावर त्यांना आवश्यक व त्यांच्यावरच अवलबूंन असे अनेक व्यवसाय होते. या सगळ्यांना मिळून ‘शिल्प’ ही संज्ञा होती. ह्या शिल्पकारांमध्ये सुतार, लोहार, (धातुकार), चर्मकार, कुंभार, पाथरवट, चितारी-रंगारी, सोनार, हस्तिदंतावर कोरीवकाम करणारे अशांचा समावेश असे. याशिवाय मच्छीमारी, फासेपारधी यांचे व्यवसाय ‘हीन-शिल्प’ या वर्गात येत. प्राचीन जातक वाङ्मयावरून असे दिसते की बऱ्याच वेळी एकाएका व्यावसायिकांची स्वतंत्र खेडी व गावे असत. त्यांचेच प्रतिबिंब पुढच्या काळातल्या नगरांच्या आखणीतही उमटले आणि मग रंगारी गल्ली (वींधी), लोहार गल्ली अशा भागांचे उल्लेख येतात. या व्यावसायिकांच्या संघटना-श्रेणी होत्या. त्यांचा उपयोग कारागिरांना शिक्षण देण्याकरताच नव्हता, तर धंद्याला आवश्यक ते भांडवल, साहित्य हे उधार-उसनवारीने पुरविण्याचे काम या व्यावसायिक संघटना करीत. सामान्यपणे व्यवसायावर संघटना असत. स्वाभाविकच बाजारपेठा तयार झाल्या आणि उत्पादक व उपयोजक यांना जोडणारा दुवा म्हणजे व्यापारी तोही चांगला सरसावला. व्यापाऱ्यांच्याही श्रेणी तयार झाल्या. उधार-उसनवारी, कर्जे इ. व्यापारात अंगभूत असणाऱ्या गोष्टींची व्यवस्था या श्रेणी करीत असत. उत्पादन दूरवर जावयाचे झाले म्हणजे प्रत्यक्ष वाहतुकीची व्यवस्था आलीच. वाहतूक हाच व्यवसाय करणारे, बैलांचे मोठाले तांडे बाळगणारे लोक एकत्र आले, त्यांच्या संघटना तयार झाल्या. या श्रेणीमध्ये सार्थवाह आणि स्थलनियामक हे मार्गदर्शक महत्त्व पावले. वाहतूक म्हटल्यावर व्यापारी मार्ग आलेच. असे अनेक प्राचीन व्यापारी मार्ग आता ज्ञात झाले आहेत. राजगिरपासून पश्चिमेकडे श्रावस्ती, साकेत, बनारस असे करीत करीत एक मार्ग तक्षशिलेपर्यंत आणि तेथून पुढे थेट इराणपर्यंत जात असे. मथुरेपासून दक्षिणेला एक रस्ता असावा असे पुरातत्त्ववेत्त्यांचे मत आहे. तो अवंती-म्हणजे उज्जैनवरून-गुजरातच्या किनाऱ्यावरील भडोच, सोपारावरून कल्याण, जुन्नरमार्गे दक्षिणेला जाई. दुसरा फाटा उज्जैनवरून माळव्यातून खाली उतरून पितळखोरे, अजिंठा मार्गाने दक्षिणेकडे जाई. मौर्यकालीन साहित्यात कोणत्या मालाची ने-आण होत असे, याचे स्पष्ट उल्लेख मिळत नाहीत. भूमार्गांशिवाय जातककथांमध्ये सागरीवाहतुकीचे अनेक उल्लेख आणि वर्णने येतात. यांपैकी बहुतेक वाहतूक पूर्वेकडील देशांकडे-सुवर्णभूमी-सध्याचा इंडोचायना आणि दक्षिणेकडे सिंहलद्वीपाकडे होत असे. उच्चप्रतीचे तलम कापड, मलमल, रेशमी कापड, अत्तरे व सुगंधी द्रव्ये (धूपासारख्या वस्तू), मसाले, मोती, रत्ने, माणके यांची निर्यात होत असे. तर आयात मालात प्रत्यक्ष सुवर्णरूपाने, उत्पादन, वाहतूक, व्यापार यांचा व्याप व देवघेवीची गुंतागुंत ध्यानात घेतली म्हणजे या व्यवसायात गुंतलेला समाज सर्व देशभर पसरलेला असला तरी परस्परावलंबी होता हे सहज ध्यानात येते.

कला : मौर्यकाळात लाकूड, माती, हस्तिदंत, पाषाण इ. माध्यमांचा उपयोग वास्तुकला आणि शिल्पकला यांकरिता करीत असत तथापि या अवशेषांत प्रामुख्याने पाषाणशिल्पांचेच प्रमाण जास्त असून काही मृण्मूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. त्या काळची वास्तुकला ही प्रामुख्याने लाकडाची असल्यामुळे पाटलिपुत्र येथील राजवाड्यांचे अवशेष फारसे उपलब्ध झाले नाहीत. मात्र स्तूपांतून मौर्यकालीन शैली ज्ञात होते. तिथे लाकूडकामाच्या खुणा वा खोबण्या दिसतात. त्यात अशोकाचे स्तंभ व त्यांवरील कलाकुसर वैशिष्ट्यपूर्ण असून काही यक्ष-यक्षींच्या प्रतिमा आणि मातृदेवतांच्या मृण्मूर्तीही आढळतात. या कालातील कलाशिल्पांचे अवशेष हे उपलब्ध कला अवशेषांतील सर्वांत प्राचीन अवशेष समजण्यात येतात. याचे प्रमुख कारण म्हणजे हे अवशेष, विशेषतः मूर्तिकाम, दगडांचे आहे. म्हणून ते टिकून राहिले आहे. मौर्य शिल्पावर काचेसारखी चमक आणलेली आहे. नंतरच्या काळात ही विद्या कोठे कोठे टिकून राहिली पण मौर्यांच्या सर्वच मूर्तिकामावर अशी झिलाई आहे. पाटलिपुत्र या राजधानीतील (सध्याचे पाटणा, बिहार) उत्खननात काही अवशेष मिळाले. त्यात कलात्मकतेपेक्षा भव्यतेची अधिक साक्ष पटते. अशोकाच्या काळात बौद्ध धर्मीयांना पवित्र असलेल्या स्थळी स्तूप आणि ध्वजस्तंभ उभारण्यात आले. यांतील स्तूप बव्हंशी नाहीसे झाले आहेत आणि सांचीसारख्या काही ठिकाणी नंतरच्या जीर्णोद्धारामुळे त्यांचे मूळ स्वरूप लोप पावले आहे. ध्वजस्तंभ एका पाषाणात घडविलेले गोल स्तंभ असून त्यांची उंची पुष्कळदा बारा मीटर इतकी होती. या स्तंभांची शीर्षे अलंकारयुक्त असत. या स्तंभांच्या माथ्यावर हत्ती, बैल, घोडा आणि सिंह यांच्या मूर्ती बसविलेल्या होत्या. या मूर्ती यथातथ्य आहेतच पण त्यांपैकी अनेक प्राणी उदा. वृषभ (रामपूर्वा, बिहार) अत्यंत जिवंत वाटतात. सारनाथच्या स्तंभावर एकमेकाकडे पाठ करून खेटून उभे असलेले चार सिंह आहेत. त्यांच्या डोक्यावरील धर्मचक्र आता पुसट झाले आहे. परंतु या सिंहाच्या मूर्ती अतिशय वेधक ठरतात. सिंहाच्या नैसर्गिक रूपाला थोडासा कृत्रिमतेचा, ताठरपणाचा, रेखीवपणाचा स्पर्श करून या वनराजाच्या प्रतीकातून राजवैभव व सामर्थ्य यांचे उत्कृष्ट दर्शन शिल्पकाराने घडविले आहे. सिंहांच्या पायाशी असलेल्या तबकडीवरच हत्ती, घोडे इ.प्राणी उलट अगदी सहज हालचाल करताना दिसतात. अशोकाचा नातू दशरथ याने नागार्जुन टेकड्यांत खोदविलेल्या गुंफांमध्ये दोन विशेष आढळतात. काहीमध्ये गवताच्या झोपडीचा आभास उत्पन्न होईल असे कोरीव काम आहे, तर लोमशऋषी गुंफेचे मुखदर्शन हे तत्कालीन इमारतीच्या प्रवेशिकेची हुबेहूब प्रतिकृती आहे. मौर्य कालातील बहुतेक सर्व शिल्पकाम बौद्ध आणि आजीवक, म्हणजे अवैदिक धर्मपंथांचे आहे, हा आणखी एक विशेष होय.

या कलाकृतींवर परकीयांची, विशेषतः इराणी छटा आहे आणि त्यांच्या कलेचेच काही अंशी अनुकरणही या कलेत आढळते परंतु या कलेचा आशय आणि अभिव्यक्ती मात्र पूर्णतः भारतीय आहे. भारतावरील अलेक्झांडरचे आक्रमण ही एक महत्त्वाची घटना असून ग्रीकांनी तिचा इतिहास लिहून ठेवला आहे. यापूर्वी शंभर-सव्वाशे वर्षे आधी इराणच्या ॲकिमेनिडी सम्राटांनी भारतावर अतिक्रमण करून सिंधू नदीच्या पश्चिमेचा काही भाग आपल्या साम्राज्याला जोडला होता. त्यामुळे इराणी शासक, प्रशासक व इराणी संस्कृती यांचा भारतीय राजसत्तेला व समाजाला परिचय झालेला असावा. अलेक्झांडरच्या वेळी इराणी साम्राज्य संपुष्टात आल्यावर त्यांच्या दरबारातील कलाकार, मुत्सद्दी, तज्ञ हे उद्योगाच्या शोधात भारतात आले असावेत. मगधची नंद राजसत्ता प्रबळ होतीच, पुढे मौर्यांच्या नेतृत्वाने ती आणखी बलिष्ठ आणि वर्धिष्णू झाली. स्वाभाविकच मौर्य दरबारी अनेक परकीय, विशेषतः इराणी तंत्रज्ञ, कारागीर, मुत्सद्दी आले असले पाहिजेत. मौर्य शासन व कला यांची थोडी सूक्ष्म तपासणी केली, तर अनेक गोष्टी उजेडात येतात. या अनामिक परकीयांच्या अस्तित्वाची आणि प्रभावाची जाणीव होऊ लागते. मौर्यांची शासनव्यवस्था, विशेषतः प्रांतांचे शासन व त्यांचे शासक यांसारख्या गोष्टीचे इराणी व्यवस्थेशी फार साम्य आहे, असे तज्ञ सांगतात. मोठे मोठे राजमार्ग किंवा व्यापारी मार्ग बांधणे व प्रवास सोपा व सुलभ करणे या गोष्टी मौर्यांच्या आधी इराणमध्ये रूढ झाल्या होत्या. कलावशेषांच्या बाबतीत तर ही गोष्ट अधिकच प्रकर्षाने जाणवते. राज्यात सर्वत्र मोठाले शिलालेख अशोकाने कोरविले, या आधी शंभर वर्षे तरी असे लेख आपल्या साम्राज्यात ॲकिमेनिडी सम्राटांनी कोरविले होते. पाटलिपुत्रच्या राजसभेचे केवळ विधानच नव्हे तर तेथे सापडलेली स्तंभशीर्षे तसेच ध्वजस्तंभावरील सिंह आणि इतर तपशील यांचे इराणी शिल्पावशेषांशी इतके साम्य आहे, की तो केवळ एक योगायोग समणजे अशक्य आहे. मात्र या कलाकृतींचा आशय बौद्ध धर्मीय, विशुद्ध भारतीयच होता.


साम्राज्याचा अस्त : बृहद्रथाचा वध आणि पुष्यमित्र शुंगाचे राज्यारोहण ही मौर्य राजकुलाचा व मौर्य साम्राज्याचा अस्त झाल्याची दृश्य निशाणी आहे पण हा अस्त आकस्मिकपणे झालेला नव्हता. साम्राज्याच्या विघटनाला यापूर्वीच प्रारंभ झालेला होता. वायव्य सीमेवरील तक्षशिलेसारखे प्रदेश मौर्यांच्या साम्राज्यात नाखुषीनेच नांदत होते. त्या भागात वेळोवेळी झालेल्या बंडांवरून हे स्पष्ट झाले होते. पूर्वी हे प्रदेश अलेक्झांडरने पादाक्रांत केलेले असल्याने ते आपले आहेत, अशी पश्चिम आशियातील ग्रीकांची समजूत होती व ते पुन्हा ताब्यात आणण्यासाठी त्यांचे यत्नही चालू असत. सीमावर्ती लोकांच्या बंडाला त्यांचे उत्तेजन व सहाय्य मिळत असे. याशिवाय अगदी दक्षिण टोकाचे तसेच महान रक्तपातानंतर साम्राज्यात आलेले पूर्वेकडील कलिंगासारखे भाग स्वस्थ बसले असतील, हे संभवनीय वाटत नाही. मात्र अशा अशांततेची प्रत्यक्ष नोंद नाही हे खरे. अशोकानंतर केवळ पस्तीसच वर्षांत ग्रीक सैन्ये साकेत नगरीपर्यंत मुसंडी मारून साम्राज्याचा ठाव पाहू शकतात, यावरूनच मौर्यसत्ता किती क्षीण झाली होती, याचा अंदाज येतो. खुद्द अशोकाच्या काळातसुद्धा या साम्राज्याचा पाया कितपत बळकट होता, अशी शंका येते.

बहुतेक सर्व प्राचीन व मध्ययुगीन साम्राज्यांसारखे मौर्यांचे साम्राज्य हे व्यक्तीसापेक्षच होते. चंद्रगुप्त व अशोक यांनी उभारलेली शासनयंत्रणा जवळजवळ निर्दोष होती. मात्र ती सचेतन आणि कार्यक्षम ठेवण्यास, कर्तबगार आणि महत्त्वाकांक्षी अशा माणसांचे नेतृत्व अत्यावश्यक होते, हे तितकेच खरे आहे. तिला व्यक्तिनिरपेक्ष संघटनेचे शाश्वत रूप मिळालेले नव्हते. भारतीय उपखंडातील स्वाभाविक परिस्थिती व तद्‌जन्य आर्थिक जीवन हे प्रादेशिक राज्ये आणि एकसंघ साम्राज्ये या दोघांनाही सारखेच उपकारक आहे. तथापि काटा साधारणपणे स्वायत्त प्रादेशिक राज्यांच्या बाजूने अधिक झुकलेला दिसतो. त्याचा तोल साम्राज्याच्या बाजूने ढळावयाचा असेल, तर व्यापारात फार मोठी वृद्धी आणि एखादा समर्थ व महत्त्वाकांक्षी नेत्याचा उदय या दोन गोष्टींची गरज लागते. साम्राज्यांचे विघटन होणे आणि त्याजागी प्रादेशिक राज्ये येणे म्हणजे काहीसे कृत्रिमापासून स्वाभाविकांपर्यंत जाणेच होते. त्यासाठी विशेष कारणपरंपरा शोधण्याची जरूरी नाही. मौर्य साम्राज्याच्या अस्ताचा प्रश्न इतका साधा व सरळ राहिलेला नाही. याला कारण सम्राट अशोक, त्याचा धर्म आणि त्याचे धोरण.

अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण होता अशोकाने अहिंसेचा पुरस्कार केला आणि कलिंगाच्या युद्धानंतर त्याने साम्राज्यवृद्धीसाठी युद्ध केले नाही, या गोष्टींमुळे साम्राज्याच्या विघटनाला त्यालाच बऱ्याच इतिहासकारांनी जबाबदार धरले आहे. बौद्ध धर्माच्या पुरस्काराला जोरात प्रारंभ झाला आणि त्यामुळे वैदिक धर्माला गौण स्थान मिळाले, हे नक्कीच. हे वैदिक धर्मीय बौद्ध धर्माचा प्रसार थांबविण्यासाठी पुष्यमित्राच्या रूपाने पुढे झाले किंवा पुष्यमित्र ही वैदिकांची बौद्धांविरुद्धची प्रतिक्रिया होती, असे म्हणणे अनैतिहासिक आहे. अशोकाच्या धोरणाची प्रतिक्रिया पस्तीस वर्षांनी व्यक्त व्हावी हे थोडे आश्चर्याचेच वाटते. अशोकानंतर मौर्य राजे बौद्ध धर्माचेच अनुयायी होते, हेही निश्चित सांगता येत नाही. मुख्य म्हणजे पुष्यमित्राने बौद्ध धर्मीयांविरुद्ध काही उपाययोजना केल्याचेही दिसत नाही. तसेच कलिंगानंतर अशोकाने आक्रमक युद्धे केली नाहीत हे खरे पण त्याने आपले सैन्य बरखास्त केलेले नाही. दंडयोजना जरूर तेथे केली. कोठे अशांतता उद्‌भवली किंवा बंडे उभी राहिली तर त्यांचे दमन शस्त्रबळानेच केले. एवढे मोठे साम्राज्य शांततेच्या आणि अहिंसेच्या उपदेशामुळे टिकून राहिले, असे समजणे अशक्य आहे. युद्धसंन्यास व अहिंसा या दोन गोष्टी भिन्न आहेत. व्यक्तिगत जीवनातील अनावश्यक असेल ती हिंसा टाळावी असा अशोकाचा यत्न होता. त्याने स्वतः दिलेले उदाहरण पुरेसे बोलके आहे. ‘स्वयंपाकासाठी हरिणे व मोर मारून शिजवीत, त्यांचे प्रमाण प्रथम कमी केले आणि नंतर ते थांबविले पण कोठेही शस्त्रदल बरखास्त केल्याची घोषणा नाही. अहिंसेच्या शिकवणुकीमुळे क्षात्रतेज कमी झाले’ इ. निष्कर्ष अवास्तव आहेत. अशोक हा सम्राट होता, शासक होता, त्याने धर्मोपदेशकाची भूमिका स्वीकारली, तरी ती राज्यत्याग करून नव्हे. थोडक्यात सांगावयाचे, तर मौर्य साम्राज्याच्या विघटनाचे अपश्रेय अशोकाच्या पदरी बांधता येत नाही. हे विघटन सृष्टिक्रमाने, जवळपास अपरिहार्यपणे घडले.

पश्चिम आशियातील ग्रीक सम्राटांची आक्रमणे हा सुरुवातीला तरी फार मोठा धोका नव्हता. मौर्य सम्राट दुर्बल होऊ लागल्यावर हा धोका वाढत गेला व शेवटी वर सांगितल्याप्रमाणे ग्रीक स्वारी हेच निमित्त मौर्य सत्ता लयाला गेली.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1970.

             2. Mookerji, R. K. Chandragupta Maurya&amp His Times, Delhi, 1960.

             3. Rapson, E. J. Ed. The Cambridge History of India, Vol. I. Jullundar, 1968.

             4. Sasrti, K. A. N. Ed. Age of Nandas&ampMauryas, Patna, 1967.

             5. Smith, V. A. Asoka, Jullundar, 1957.

             6. Thapar, Romila, Ashok and the Decline of the Mauryas, Oxford, 1961.

माटे म. श्री.