फ्रीड्रिखफ्रीड्रिख द ग्रेट : (२४ जानेवारी १७१२-१७ ऑगस्ट १७८६). प्रशियाचा एक थोर राजा. पहिला विल्यम फ्रीड्रिख व सोफाया डॉरोथीया यांचा हा ज्येष्ठ मुलगा. त्याचा जन्म बर्लिनमध्ये झाला. त्याचे बालपण वडिलांच्या कडक शिस्तीत गेले. त्याला जर्मन भाषेबद्दल तिटकरा होता आणि फ्रेंच भाषासाहित्य व संगीत यांचे आकर्षण होते. त्यामुळे वडिलांच्या मर्जीतून तो उतरला होता. वडिलांच्या जाचाला कंटाळून तो आपला मित्र लेफ्टनंट फोन काटे व लेफ्टनंट जेम्स कीथ यांच्या समवेत देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडला गेला (१७३०). यावेळी राजा सहावा चार्ल्स याच्या मध्यस्थीने त्याची फाशीची शिक्षा रद्द होऊन त्याला क्यूस्ट्रीनच्या किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले (१७३०-३१) आणि दशहत बसावी म्हणून त्याचा मित्र काटे यास त्याच्या डोळ्यादेखत फाशी देण्यात आले. अखेर क्षमायाचना केल्यानंतर त्यास मुक्त करण्यात येऊन एका भागाची शासनव्यवस्था व एका भूसेना-पथकाने नेतृत्व त्याच्याकडे सुपूर्त करण्यात आले. ब्रंजविक-बेव्हर्नच्या एलिझाबेथ क्रिस्टीन या राजकन्येबरोबर त्याचा विवाह करण्यात काला (१७३३) पण त्यामुळे त्याच्या स्वच्छंदी जीवनात फारसा बदल झाला नाही. नंतर ती दोघे राइन्सबेर्क या ठिकाणी राहू लागली पण फ्रीड्रिखचा कामाव्यतिरिक्तचा इतर सर्व वेळ लेखन-वाचन-संगीत यांत व्यतीत होई. तत्कालीन प्रसिद्ध लेखक, कवी, तत्त्वज्ञ व्होल्फ, बेरनार फाँतनेल, प्येअर ल्वी मोपेर्त्युई, व्हॉल्तेअर इत्यादींशी त्याचा पत्रव्यवहार असे. विद्वान जमवून वादविवाद करण्याची त्याला हौस होती. त्याने राज्याची सूत्रे हाती घेण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या घटना घडल्या: तो फ्रीमेसनरी संप्रदायात दाखल झाला (१७३८) आणि त्याने अँटीमॅकिआव्हेल’ हा मॅकिआव्हेलीच्या विचारांचे खंडन करणारा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला. व्हॉल्तेअरने त्यास प्रस्तावना लिहून तो प्रसिद्ध केला (१७४०). या पुस्तकात त्याने ‘राजा हा प्रजेचा सेवक असून लोककल्याणाचे तो एक साधन आहे. राजसंस्था ही सामान्य नागरिकाच्या कल्याणासाठी अस्तित्वात असते,’ वगैरे क्रांतिकारक विचार मांडले. त्यामुळे फ्रीड्रिखच्या हातात राज्य देताना मृत्यूसमयी (३१ मे १७४०) विल्यमला फार दुःख झाले.

फ्रीड्रिख राजा झाला (१७४०) त्या वेळी प्रशियाजवळ सुसज्ज असे कवायती सैन्य व खजिन्यात भरपूर पैसाही होता. व्हॉल्तेअरसारख्या फ्रेंच विचारवंतांची फार मोठी छाप फ्रीड्रिखच्या विचारांवर होती. त्यामुळे त्याने प्रशियाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तथापि पूर्वापार चालत आलेली नोकरशाही व लष्कर यांत त्याने फारसे बदल केले नाहीत आणि सर्व सत्ता आपल्या हाती केंद्रीत केली. अंतर्गत सुधारणांबरोबरच त्याने राज्यविस्ताराकडे लक्ष देऊन आलेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा उठविला. त्या सुमारास ऑस्ट्रियाचा राजा सहावा चार्ल्स मरण पावला (१७४०). तेव्हा त्याची मुलगी माराया टेरीसा ही यूरोपीय राष्ट्रंच्या पूर्वसंमतीने ऑस्ट्रियाच्या गादीवर आली होती. ही गोष्ट फ्रान्स, सॅक्सनी, स्पेन येतील राज्यकर्त्यांप्रमाणेच फ्रीड्रिखलाही मान्य नव्हती. त्याने सायलीशिया प्रांताची मागणी केली. ती अमान्य होताच ऑस्ट्रियन वारसायुद्धास तोंड फुटले. फ्रीड्रिखने प्रथम मॉलव्हिट्स व नंतर चोट्‌सिट्झ हे प्रदेश घेऊन प्रत्यक्ष ऑस्ट्रियावर हल्ला केला (मे १७४१). ऑस्ट्रियाने पराभवानंतर दक्षिण सायलीशिया प्रशियाला देऊन फ्रीड्रिखला या युद्धातून बाजूला काढले आणि इतरांचा पराभव केला. तेव्हाच फ्रीड्रिखला असुरक्षित वाटू लागले, म्हणून त्याने पुन्हा युद्धात भाग घेतला आणि ड्रेझ्डेनच्या तहान्वये (डिसेंबर १७४५) पूर्ण सायलीशिया मिळविला. अखेरीस एक्स-ला-शपेलच्या तहाने (१७४८) वारसहक्काच्या युद्धाचा शेवट होऊन माराया टेरीसा ही ऑस्ट्रियाची अधिकृत वारस ठरली व ऑस्ट्रियाने नंतर रशिया, फ्रान्स, सॅक्सनी इ. देशांशी मैत्री करून प्रशियाविरुद्ध एक संयुक्त आघाडी उभी केली (१७५६). याची कुणकुण असल्यामुळे प्रशियाने तत्पूर्वीच इंग्लंडबरोबर वेस्टमिन्स्टर येथे मैत्रीचा तह केला (१७५५). इंग्लंड-फ्रान्स यांच्या संघर्षातून यूरोपात सप्तवार्षिक युद्धाला (१७५६-६३) सुरुवात झाली. फ्रीड्रिखने ऑस्ट्रियावर स्वारी केली. त्याचा कूनर्सडॉर्फच्या लढाईत ऑस्ट्रो-रशियन फौजांनी पराभव केला. (१७५९). पुढे रशियन फौजांनी थेट बर्लिनपर्यंत धडक मारली. तेव्हा फ्रीड्रिखची स्थिती दयनीय झाली परंतु या वेळी रशियाच्या गादीवर तिसरा पीटर आला (१७६२). त्याच्याशी फ्रीड्रिखने मैत्री संपादून त्याला या संयुक्त आघाडीतून फोडले आणि ऑस्ट्रियाच्या सैन्याविरुद्ध पुन्हा जोरदार हल्ला केला. अखेर हूबेरटुस्बुर्कच्या तहान्वये (१७६३) ऑस्ट्रियाने प्रशियाच्या मागण्या मान्य केल्या. या युद्धात फ्रीड्रिख झायडलिट्स, जेम्स कीथ, ब्रंझविक फेर्डिनांट वगैरे मातब्बर सेनापतींचे सहाय्य त्यास झाले. त्याच्या युद्धनीती व युद्धकौशल्य यांचे पुढे पहिल्या नेपोलियननेही कौतुक केले. प्रशियास यूरोपखंडात एक बलवान राष्ट्र म्हणून प्रतिष्ठा लाभली. रशियाशी त्याची मैत्री पुढे दिर्घकाळ टिकली. पोलंडच्या पहिल्या विभाजनात (१७७२) रशियाबरोबर प्रशियासही काही प्रदेश मिळाला. ऑस्ट्रियाच्या साम्राज्यविस्ताराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सैन्याच्या हालचालीही केल्या (१७७२-७३). ऑस्ट्रियाच्या वाढत्या सत्तेस पायबंद घालण्यासाठी यूरोपमधील संस्थानांचा त्याने एक संघ स्थापन केला (१७८५). तो लवकरच सॅन्ससौसी या राजवाड्यात पॉट्सडॅम येथे मरण पावला.

सततच्या युद्धाचा प्रशियाच्या तिजोरीवर तसेच सैन्यावर फार मोठा ताण पडला होता. युद्धामुळे प्रजा कंटाळली होती. तिला समाधान लाभावे, म्हणून १७६५ मध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापना केली व युद्धपीडित प्रांतांना करमाफी दिली. व्यापारवृद्धीसाठी त्याने नाविक कंपनी स्थापन केली (१७७२). ओडर, व्हेअर्ट, नाइस, आदी नद्यांकाठचा दलदलीचा प्रदेश त्याने भर घालून व त्यातील पाणी काढून वापरात आणला. जलसिंचनासाठी कालवे खोदले आणि शेतीला उत्तेजन दिले. दुष्काळाच्या काळात शासकीय अन्नधान्य कोठारे लोकांना खुली केली. शेतीबरोबरच लहान मोठ्या उद्योगधंद्यांना त्याने उत्तेजन दिले आणि प्रशियाची आर्थिक घडी युद्धोत्तर काळात पुन्हा नीट बसविली. व्यापार व शेतीबरोबरच शिक्षण, प्रशासनव्यवस्था, विधिव्यवस्था, धर्म इत्यादींत लक्षणीय बदल घडवून त्याने प्रशियाचे आधुनिकीकरण केले. गुन्हा कबुल करण्यासाठी आरोपीवर करण्यात येणारे अमानुष अत्याचार त्याने बंद केले आणि १७५७ मध्ये झामूएल फोन कोकट्सेयी या कायदे पंडिताच्या देखरेखीखाली प्रशियन कायद्याचे संहितीकरण करण्यासाठी एक आयोग नेमला आणि विधिसंहिता तयार केली. धर्माच्या बाबतीत त्याचे धोरण सहिष्णुतेचे होते. त्याने कोणत्याच विशिष्ट धर्माला वा पंथाला राजाश्रय दिला नाही. उलट एक फर्मान काढून सर्व धर्मांना सारखी वागणूक मिळावी व कोणत्याही एका विशिष्ट धर्माने दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करू नये प्रत्येक व्यक्तीला आपल्या मार्गाने स्वर्गात जाण्याची मुभा आहे, असा आदेश दिला. त्याने अधिकृत रीत्या मुद्रण स्वातंत्र्य जाहीर केले नसले, तरी त्यावरील निर्बंधांकडे अधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यास सांगितले.

फ्रीड्रिखच्या जीवनावर व्हॉल्तेअर, गोटफ्रीट लायप्निट्स यांसारख्या तत्त्ववेत्यांच्या विचारांची छाप होती त्यामुळे त्याची दृष्टी उदार व विशाल झाली होती. कवी, लेखक, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यांचा तो चाहता होता. त्याने बर्लिन येथील अकादमी ऑफ सायन्सेस या जुन्या संस्थेचे पुनरुज्जीवन केले आणि युरोपमधील ती एक नामांकित संस्था बनविली. प्येअर ल्वी मॉरो द मोपेर्त्युई या शास्त्रज्ञाला बोलावून त्याच्या संशोधनाखाली एक प्रयोगशाळा बांधली. व्हॉल्तेअर हा तर त्याचा घनिष्ठ मित्र होता. तसेच त्याच्याकडे अनेक वर्षे सेवेतही होता (१७४१-५३). त्याच्या सॅन्ससौसी (पॉट्सडॅम) या नवीन सुरेख राजवाड्यात अनेक विद्वानांना तो पाचारण करी आणि त्यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा करी. त्याने अँटीमॅकिआव्हेल शिवाय मिरर ऑफ प्रिन्सेस (इं. भा. १७७९) व पोलिटिकल टेस्टामेंट (इं. भा. १७६८) ही आणखी दोन पुस्तके लिहिली. त्याचे इतिहासविषयक लेखन विपुल असून त्यांपैकी त्याच्या मृत्युसमयी पंधरा खंड प्रसिद्ध झाले होते.

फ्रीड्रिख हा एक निष्णात सेनानी होता. त्याने आपले लष्कर अधिक सुसज्ज व कार्यक्षम केले आणि प्रशियाचे उत्पन्न वाढवून राज्यविस्तार केला. आपल्या एकूण अर्थसंकल्पातील अधिक रक्कम तो सैन्यावर खर्च करीत असे. उच्च विचारसरणी आणि साधी राहणी या उक्तीप्रमाणे त्याचे खाजगी जीवन अत्यंत साधे होते. त्याला राजेशाही डामडौलाचा तिटकारा होता. त्याच्या सेवेस एकच चाकर असे. तो स्वतः भरपूर श्रम करी व इतरांनी असेच श्रम करावेत, अशी त्याची मनोमन इच्छा होती. तो उत्तमपैकी बासरीवादक होता. त्याने बासरीवर अनेक संगीतरचना बसविल्या होत्या. प्रसिद्ध बासरीवादक योहान क्‌व्हांटसचा तो शिष्य होता. सप्तवार्षिक युद्धानंतर तो अधिक आत्मकेंद्रित व हुकूमशाही वृत्तीचा झाला. फ्रेंच साहित्य त्याला प्रिय होते, तसेच तपकीर व कुत्री यांचा शौक होता. स्त्रीबद्दल त्याला अनास्था होती. आपल्या धर्मपत्नीलासुद्धा त्याने अखेरपर्यंत वाळीत टाकले. अर्थात त्याला संततीचा लाभ झालाच नाही. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या गादीवर आला. फ्रीड्रिखच्या कर्तृत्वाबद्दल उलट सुलट विचार त्याच्या मृत्यूनंतर प्रसृत झाले. त्याच्या चाहत्यांनी फ्रीट्झ नावाचा एक पंथ काढून त्याला डोक्यावर घेतले तर टिकाकारांनी त्याने प्रशियाला लष्करवादाच्या खाईत लोटले, अशी टीका केली. गटे व गोटहोल्ट लेसिंग हे दोन तत्त्वज्ञ त्याचे चाहते होते पण त्यांची त्याने दखलही घेतली नाही तथापि त्याने लोककल्याणकारी अनेक धोरणे अवलंबून प्रशियाचे आधुनिकिकरण केले आणि आंतरराष्ट्रीय जगतात एक बलवान व सुसंस्कृत राष्ट्र म्हणून प्रशियाची प्रतिष्ठा वाढविली. त्यामुळे पुढे जर्मनी हे बलवत्तर राष्ट्र उदयास आले. म्हणून फ्रीड्रिखला ‘द ग्रेट’ म्हणजे थोर म्हणतात, ते यथार्थ वाटते.

पहा : जर्मनी

संदर्भ : 1. Durant, Will Durant, Ariel, The Age of Voltaire, New York, 1965.

2. Gaxotte, Pierre Trans. Bell, R. A. Frederick the Great of Prussia, Westport, 1975.

3. Gay, Peter, The Enlightenment: an Interpretation, New York, 1969.

4. Nelson, W. H. The Soldier Kings : The House of Hohenzollern, London, 1970.

देशपांडे, अरविंद