अळतेकर, अनंत सदाशिव : (२४ सप्टेंबर १८९८–२५ नोव्हेंबर १९६०). एक महाराष्ट्रीय प्राच्यविद्यापंडित. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ह्या गावी जन्मले. संस्कृत विषयातील एम. ए. ची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण. त्यांनी राष्ट्रकूट घराण्याच्या इतिहासावर प्रबंध सादर केला आणि १९२८ मध्ये डी. लिट्. ही बहुमानाची पदवी मिळविली. पुढे ते बनारस विद्यापीठात प्राध्यापक झाले. १९४९त ते पाटणा विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास-विभागाचे प्रमुख झाले. नंतर पाटण्यातच के. पी. जयस्वाल संशोधन संस्थेचे संचालक बनले. तेथे असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही प्राचीन स्थानांची उत्खनने झाली.

ते भारतीय नाणकशास्त्र-मंडळाचे अध्यक्ष झाले होते. भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. पण त्यांच्या निधनामुळे ते पद ते विभूषित करू शकले नाहीत. त्यांच्या बहुविध संशोधन- पर साहित्यापैकी पोझिशन ऑफ विमेन इन्‌ हिंदु सिव्हिलायझेशन (आवृ. २ : १९५७) द एज ऑफ द वाकाटकाज अँड द गुप्ताज (पुनर्मुद्रित : १९५५) स्टेट अँड गव्हर्नमेंट एन्शन्ट इंडिया  (आवृ. २  : १९५५) एज्युकेशन इन् एन्शन्ट इंडिया (आवृ. ५ : १९५७) कॅटलॉग ऑफ द गुप्त गोल्ड कॉइन्स इन द बयाना होर्ड (१९५६) व कॉर्पस ऑफ गुप्त कॉइन्स  ही इंग्रजीतील व गुप्तकालीन मुद्रायें  (१९५४) आणि शिलाहारांचा इतिहास (१९३५) ही अनुक्रमे हिंदी व मराठीतील पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.

देशपांडे, सु. र.