सूर घराणे : मुसलमानी अंमलातील मोगलकाळात उदयाला आलेला एक अफगाण वंश. या वंशातील सुलतानांनी अठरा वर्षे (इ. स. १५३८– ५६) दिल्लीच्या तख्तावर अधिसत्ता गाजविली. या घराण्यात शेरशाह (कार. १५३८– ४५), इस्लामशाह (कार. १५४५— ५४), फीरुझशाह (कार. १५५४) आणि मुहम्मद आदिलशाह (कार. १५५४– ५६) हे सुलतान झाले. त्यांपैकी ⇨ शेरशाह (शेरखान) व इस्लामशाह या दोन सुलतानांची कारकीर्द उल्लेखनीय होय. सूर या घराण्याचा संस्थापक शेरशाह याचे मूळ नाव फरीद असून त्याचे, आजोबा इब्राहीम सूर हे अफगाणिस्तानमधील सुलेमान पर्वतश्रेणीतील रोह गावी घोड्यांचा व्यापार करीत असत तथापि या धंद्यात त्यांना फारशी प्राप्ती होत नव्हती आणि तिथे विशेष जम बसेना, म्हणून ते बहलूल लोदीच्या काळात (१४५१—८९) आपले नशिब अजमाविण्यासाठी हसन या मुलासह हिंदुस्थानात आले. त्यांना नारनौल या ओसाड परगण्यात हिस्सारच्या जमालखान सारंगखानीच्या हाताखाली चाळीस घोडेस्वारांच्या तुकडीचे सेनानायकत्व व काही खेड्यांची जहागीर मिळाली. त्यांच्या मृत्यूनंतर ती हसनकडे आली. हसनचे कर्तृत्व पाहून जमालखानने त्याची जौनपूरला राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आणि त्याला पाचशे घोडेस्वारांच्या निर्वाहासाठी ससराम व खवास्सपूर तांडा या परगण्यांची जहागीर दिली. हसनला चार पत्न्यांपासून आठ मुलगे झाले. त्यांपैकी पहिल्या अफगाण पत्नीची फरीद व निझाम ही मुले असून सुलेमान व अहमद ही सर्वांत धाकट्या पत्नीची (जी मुळात गुलाम होती) अपत्ये होत. फरीदचे (शेरशाह) बालपण खडतर होते. त्याने जौनपुरात अरबी व फार्सी भाषांबरोबर अन्य विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर शेरशाहने बाबरची चाकरी पतकरुन बाबरला अनेक स्वाऱ्यांत मदत केली. तेव्हा बाबराने त्याची मूळ जहागीर त्यास मिळवून दिली (१५२८). बाबराने शेरशाहसह बिहारची बेगम दुदूबिबी हिला मुहम्मद लोदीविरुद्घच्या वेढ्यात मदत केली. तिने बाबराचे मांडलिकत्व पतकरले आणि शेरशाहची नायब म्हणून नियुक्ती केली. तिच्या मृत्यूनंतर (१५३०) बिहारची सर्व सत्ता शेरशाहच्या हाती आली आणि नंतर त्याने बंगालवर वर्चस्व मिळविण्यासाठी गौडला वेढा दिला (१५३७). त्याने रोहतास किल्ला आणि बंगाल-बिहारचा बहुतेक सर्व भाग जिंकला आणि गौड येथे राज्यभिषेक करुन (३० मे १५३८) मोगलांचा चडसा (१५३९) व कनौज (१५४०) या लढायांत पराभव केला. दिल्लीचे तख्त शेरशाहकडे आले. शेरशाह धडाडीचा योद्घा व कुशल राज्यकर्ता होता. [→ शेरशाह].

शेरशाहला आदिलखान, जलालखान व कुत्बखान हे तीन मुलगे होते त्यांपैकी धाकटा कुत्बखान लहानपणीच वारला. आदिलखान व जलालखान त्याच्या मृत्यूच्या वेळी (१५४५) अनुक्रमे रणथंभोर व रेवा येथे राज्यपाल होते. त्या दोघांत आदिलखान ज्येष्ठ असून शूर, पण आळशी व खुशालचेंडू होता. म्हणून सरदारांनी जलालखानला कालिंजर येथे २६ मे १५४५ रोजी राज्यारूढ केले. त्याने इस्लामशाह हा किताब धारण केला. त्यानंतर तो राजधानी आग्रा येथे गेला आणि तेथील सैन्याची सहानुभूती मिळविण्यासाठी त्याने सैनिकांना दोन महिन्यांचा पगार दिला. सरदारांनी आदिलखानास समझोत्यासाठी आग्ऱ्याला बोलाविले आणि कुत्बखान नाईब, खवासखान, ईसाखान नियाझी व जलालखान बिन जुलू या चार मातब्बर सरदारांनी त्याच्या सुरक्षिततेची हमी घेतली, तेव्हा तो भेटण्यास निघाला कारण त्यास इस्लामशाह दगाफटका करण्याची दाट शंका होती. इस्लामशाहने प्रथम त्यास आग्ऱ्याच्या नैर्ऋत्येकडील बयाण हे ठाणे देण्याचे कबूल केले व नंतर शब्द फिरविला. शिवाय त्यास कैद करण्याचे गुप्त कटकारस्थान रचले. तेव्हा या चार सरदारांनी इस्लामशाहास पदच्युत करण्याचे ठरवून युद्घाची तयारी केली परंतु आदिलखानाच्या सैन्याचा पराभव होऊन खवासखान व ईसाखान यांना मेवातकडे आश्रय घ्यावा लागला आणि आदिलखान बुंदेलखंडाकडे पळून गेला. त्याची नंतर काहीच माहिती उपलब्ध नाही. मात्र आदिलखानास गादीवर बसविण्याच्या कटकारस्थानातील सरदारांपैकी जलालखान बिन जुलू आणि त्याचा भाऊ यांना इस्लामशाहने मृत्युदंडाची सजा दिली. कुत्बखान याने लाहोरच्या हैबतखान या राज्यपालकडे आश्रय घेतला होता. त्यास इतर काही सरदारांबरोबर हैबतखानाने ग्वाल्हेरकडे पाठवून दिले परंतु बहुतेकांना सुलतानाने ठार मारले. त्यामुळे इतर सरदार अस्वस्थ झाले. हैबतखानाच्या नेतृत्वाखाली नियाझींनी सुलतानला विरोध करण्यासाठी सैन्याची जमवाजमव केली आणि अंबालाकडे कूच केले. त्यांना खवासखान येऊन मिळाला परंतु विजय प्राप्त झाल्यास हैबतखानाची सुलतान बनण्याची महत्त्वाकांक्षा लक्षात येताच खवासखान याने युद्घाच्या दिवशीच आपली फौज माघारी बोलविली. त्यामुळे साहजिकच हैबतखानाचा अंबालाजवळील युद्घात पराभव झाला. त्याचा सुलतानाने पाठलाग केला व काश्मीरमध्ये त्याने अखेर आश्रय घेतला परंतु त्याची आई व मुली शाही फौजांच्या हाती पडल्या. त्यांना हाल करुन मारण्यात आले. खवासखान कुमाऊँ टेकड्यांतील राजाकडे आश्रयास गेला आणि सुलतानास पुढे शरण आला तरीसुद्घा सुलतानाने त्याला निर्घृणपणे ठार केले. इस्लामशाह आपल्या विरोधकांच्या बाबतीत विलक्षण कठोर होता आणि बहुतेकांना त्याने मृत्युदंडाच्या शिक्षा फर्माविल्या. शिवाय मोगलांच्या हालचालींवर त्याचे बारीक लक्ष होते. जेव्हा हुमायून सिंधू नदी पार करुन आत आला आहे, अशी बातमी त्यास मिळाली, तेव्हा तो आजारी असूनसुद्घा त्यास तोंड देण्यास सज्ज झाला पण हुमायून काबूलकडे गेला. तेव्हा आपल्या आवडत्या स्थळी ग्वाल्हेरला तो परतला. साडेनऊ वर्षांच्या संघर्षमय कारकीर्दीनंतर २२ नोव्हेंबर १५५४ रोजी तो अल्पशा आजाराने मरण पावला.


वडीलांप्रमाणेच इस्लामशाह कार्यक्षम व शिस्तप्रिय प्रशासक होता. त्याने शेरशाहने प्रस्थापित केलेल्या शासकीय धोरणात काही फेरफार व सुधारणा केल्या. प्रत्येक खात्याला तपशीलवार सूचना दिल्या. धर्माच्या बाबतीत शरियतला प्राधान्य दिले. प्रत्येक जिल्ह्यात दर शुक्रवारी दरबार भरवून लष्करी अधिकारी, अमीन व इतर अधिकारी यांनी सुलतानाची पादत्राणे व शस्त्र यांना वंदन करण्याची प्रथा त्याने पाडली.सैन्याची वर्गवारी केली आणि त्यांच्या पन्नास ते वीस हजार अशा तुकड्या पाडून सर्वांत लहान तुकडी पाच हजारांची केली. त्याने सरहद्दीवर लक्ष ठेवण्यासाठी लाहोरच्या ईशान्येस सु. १६५ किमी.वर शिवालिक टेकड्यांत मानकोट नावाचा किल्ला बांधला. त्याने पूर्वी बांधलेल्या सरायांमध्ये वाढ केली, शिवाय रस्त्यांमधून मशीद, विश्रामगृह आणि पाणपोयांची व्यवस्था केली. मुसलमान व हिंदू यात्रेकरुंसाठी त्याने धान्य व शिजविलेले अन्न देण्याची सोय केली. त्याने सराई व शेरशाहने तयार केलेल्या उद्यानांच्या देखभालीची व्यवस्था केली. तसेच पडीक जमीन लागवडीखाली आणून शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ अनेक योजना राबविल्या. तो स्वतः कट्टर सुन्नी पंथीय होता परंतु त्याने धर्म राजकारणापासून अलिप्त ठेवला होता. त्याच्या कारकीर्दीत राज्यात शांतता होती आणि भरभराट झाली तथापि तो हलक्या कानाचा असल्यामुळे त्याने वडिलांच्या वेळी असलेल्या काही निष्ठावान सरदारांचा क्षुल्लक कारणांवरुन क्रूरपणे काटा काढला आणि मुबारिझखानासारख्या अकार्यक्षम व अनभिज्ञ व्यक्तीला वझीर नेमले व त्यास सर्वाधिकार दिले. त्याचा त्रास पुढे त्याच्या मुलांस व अन्य वारसांस झाला.

इस्लामशाहच्या मृत्यूनंतर (१५५४) फीरुझशाह हा त्याचा अज्ञान मुलगा सुलतान झाला परंतु शेरशाहच्या धाकट्या भावाचा मुलगा आणि त्याचा मामा निझाम याने त्याचा खून केला आणि मुहम्मद आदिलशाह हे नाव धारण करुन तख्त (गादी) बळकाविले. त्याने सरदार आणि लष्कर यांमध्ये पैसे वाटून, त्यांना काही बिरुदे देऊन,त्यांची मर्जी संपादण्याचा प्रयत्न केला तथापि त्याच्याविषयी लोकांत व सरदारांत फारशी सहानुभूती उरली नव्हती. शिवाय तो अकार्यक्षम व दुबळा होता. त्यामुळे विस्कळीत व नाराज लष्करावर तो ताबा ठेऊ शकत नव्हता. तेव्हा त्याने हीमू नावाच्या एका हुशार व कर्तृत्ववान हिंदू व्यक्तीला वझीरपदी नेमले. त्याने इस्लामशाहच्या कारकीर्दीत शाहना म्हणजे दारोगा-इ-दाक-चौकीचा (दिल्लीची व्यापारपेठ आणि गुप्तहेर खाते) अधीक्षक म्हणून काम केले होते व पुढे तो सेनाधिकारीही झाला होता. हीमूने सूर घराण्याच्या सत्तेचा ऱ्हास थांबविण्याचा प्रयत्न केला.

या वेळी आदिलशाहच्या सत्तेविषयी साशंक व नाराज असलेल्या सरदारांनी बंडाचा पवित्रा घेतला. त्यांत गाझीखानचा मुलगा व सुलतानाचा मेहुणा इब्राहिमशाह सूर हा आग्ऱ्याचा सर्वाधिकारी होता. त्याने आदिलशाहच्या फौजेचा पराभव करुन दिल्ली हस्तगत केली. अहमदखान सूर या लाहोरच्या राज्यपाल असलेल्या मेहुण्याने सिकंदरशाह हे बिरुद धारण करुन स्वातंत्र्य जाहीर केले. तसेच बंगालच्या मुहम्मदखान सूर या राज्यपालने बंड करुन शमसुद्दीन मुहम्मदशाह गाझी हे बिरुद धारण केले. अशा प्रकारे शेरशाहने स्थापिलेल्या आणि इस्लामशाहने संवर्धित केलेल्या या साम्राज्याची शकले पडली आणि त्याची दिल्ली व आग्रा ही दोन ठिकाणे इब्राहिमशाहच्या अखत्यारीत आली तर बंगालवर शमसुद्दीन मुहम्मदशाहची सत्ता प्रस्थापित झाली आणि उरलेला आग्ऱ्यापासून बिहारचा प्रदेश मुहम्मद आदिलशाहच्या अखत्यारीत राहिला. पंजाबच्या राज्यावर असमाधानी असलेल्या सिंकदरने दिल्ली व आग्रा काबीज करण्यासाठी इब्राहिमशाहवर स्वारी केली. त्याने फराह येथे इब्राहिमशाहचा पराभव करुन दिल्ली व आग्रा घेतले (१५५५). अफगाणांमधील अंतस्थः भांडणातून उत्तर हिंदुस्थानातील शांतता व सुरक्षितता धोक्यात आली. त्यामुळे हमायूनला आपले गमावलेले राज्य परत मिळविण्याची संधी प्राप्त झाली. त्याने काबूलमधून बाहेर पडून फेब्रुवारी १५५५ मध्ये लाहोर घेतले आणि हळूहळू इतर प्रदेश हस्तगत केला पण त्यानंतर काही महिन्यांतच हुमायून मरण पावला (जानेवारी १५५६). तेव्हा आदिलशाहच्या ⇨ हीमू या वझीराने मोठी फौज जमा करुन राजा विक्रमादित्य हे बिरुद धारण केले आणि अनेक अफगाण अधिकारी व सैनिकांना एकत्र करुन आग्रा-दिल्ली ही ठाणी काबीज केली. पानिपतच्या मैदानावर ५ नोव्हेंबर १५५६ रोजी मोगलांबरोबरच्या युद्घात हीमू फार त्वेषाने लढला. यावेळी अकबराचा पराभव व्हावयाचा पण हीमूच्या डोळ्यास एक बाण लागला व तो पकडला गेला. अकबराने त्याचा शिरच्छेद केला. त्यामुळे मोगलांच्या हातात दिल्ली व आग्रा पडले. या सुमारास पंजाबातील सिंकदरने खिझ्र ख्वाजाखान याचा चामैरी (लाहोरजवळ) येथे पराभव केला. तेव्हा मोगली फौजांनी त्याचा पाठलाग केला. त्याने मानकोटच्या किल्ल्यात आश्रय घेतला. त्याला मोगलांनी वेढा दिला. त्याला आदिलशाहची मदत मिळेल ही आशा होती परंतु ती फोल ठरली कारण आदिलशाहचा बंगालच्या खिझ्रखान सूर याने पराभव केला व त्या युद्घात तो मारला गेला (१५५७) आणि या घराण्याची इतिश्री झाली.

पहा : पानिपतच्या लढाया मोगल काळ शेरशाह हीमू हुमायून.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Mughal Empire, Bombay, 1998.

2. Qanungo, K. R. Sher Shah and His Times, Bombay, 1965.

3. Rahim, M. A. History of the Afghans in India, Karachi, 1961.

4. Roy, N. B. The Successors of Shershah, Dacca, 1934.

5. Srivastava, A. L. Shershah and His Successors, Agra, 1950.

6. Thomas, E. Chronicles of the Pathan Kings of Delhi, London, 1871.

महाजन, स. दि.