लेनिन, न्यिकलाय : (२२ एप्रिल १८७०-२१ जानेवारी १९२४). थोर मार्क्सवादी विचारवंत आणि रशियातील १९१७ च्या ऑक्टोबर (बोल्शेव्हिक) क्रांतीचा प्रमुख सूत्रधार. त्याचे मूळ नाव व्ह्लाद्यीमिर इल्यिच उल्यानफ्‌स्क. सायबीरियात हद्दपारीत असताना तो गुप्तपणे पक्षकार्य करीत असे, तेव्हा त्याने १९०१ मध्ये 

न्यिकलाय लेनिनलेनिन हे टोपण नाव धारण केले पण पुढे तेच नाव रूढ झाले आणि व्ह्लाद्यीमिर इल्यिच लेनिन या नावानेच तो ओळखला जाऊ लागला. इल्या निकोलायीव्हिच आणि मारिया या दांपत्याच्या सहा मुलांपैकी हे तिसरे अपत्य. त्याचा जन्म व्होल्गा नदीकाठी सिम्बिर्स्क (विद्यमान उल्यनफ्‌स्क) येथे उल्यानोव्ह कुटुंबात झाला. हे मध्यमवर्गीय कुटुंब सुसंस्कृत व सुशिक्षित होते आणि सर्व मुले कमी-अधिक प्रमाणात झारशाही विरूद्धच्या लढ्यात सहभागी झाली. इल्या निकोलायीव्हिच हे प्रथम शिक्षक होते. पुढे ते शिक्षण खात्यात अधिकारी झाले. त्यांचे १८८६ मध्ये अकाली निधन झाले तत्पूर्वी त्यांना निवृत्त करण्याची धमकी देण्यात आली होती. १८८७ मध्ये लेनिनचा मोठा भाऊ अलेक्झांडर याला तिसरा अलेक्झांडर झारला मारण्याचा कट केल्याच्या आरोपावरून अटक करून मृत्यूदंड देण्यात आला. या दोन घटनांचा त्याच्या कोवळ्या मनावर विलक्षण परिणाम झाला. यावेळी लेनिनने सर्वोच्च गुण मिळवून शालेय शिक्षण पूर्ण केल्याची पदवी मिळविली आणि कझान विद्यापीठात कायद्याच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला होता (१८८७). विद्यार्थ्यांच्या निदर्शनात सहभागी झाल्याच्या आरोपावरून त्याला पकडण्यात आले व त्याची विद्यापीठातून हकालपट्टी झाली आणि कझानमधून हद्दपार करण्यात आले. आईचे निवृत्तिवेतन आणि वारसाहक्काने आलेली थोडी मिळकत, यांवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले. पुढे त्यास कझानला परतण्याची परवानगी मिळाली पण विद्यापीठात प्रवेश नाकारण्यात आला (१८८८).

त्याने १८८८ पासून मार्क्सवादाच्या अभ्यासाला (दास कॅपिटल) आरंभ केला. याशिवाय त्याच्यावर न्यिचायफ, ब्यल्यिन्‌स्क, हेर्टसन, चर्निशेफस्क्यई, प्यिसरयिव प्रभृतींच्या लेखनाचाही परिणाम झाला. १८९० मध्ये त्याने कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचे रशियन भाषेत भाषांतर केले. ह्या काळापासून त्याच्या क्रांतिकारक राजकीय कार्याची सुरुवात झाली. गुप्त बैठकांमधून मार्क्सवादाचा प्रसार, प्रतिपक्षीयांचा प्रतिवाद, ठिकठिकाणच्या क्रांतिकारकांशी संपर्क असे प्रारंभीच्या काळात त्याच्या कार्याचे स्वरूप होते. त्या काळात रशियात नारोदनिकी (Populist) या नावाने क्रांतिकारकांचे अराज्यवादी विचारांचे गट अस्तित्वात होते. लेनिनने त्यांचे विचार खोडून काढून मार्क्सवादी विचारांचा प्रसार करण्यावर भर दिला. त्याच्या व्यासंगामुळे, कट्टर विचारांमुळे आणि वादकौशल्यामुळे लेनिन लवकरच विविध क्रांतिकारक गटांमध्ये लोकप्रिय झाला तत्पूर्वी १८८९ मध्ये उल्यानोव्ह कुटुंब समाराला स्थलांतरित झाले. तिथे त्याने बाहेरून कायद्याचा अभ्यास केला आणि १८९२ मध्ये सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठाची कायद्याची पदवी प्रथम क्रमांकाने मिळविली. समारामध्ये काही दिवस (१८९२-९३) त्याने वकिली केली आणि शेतमजूर, कामगार यांचे दावे चालविले. या निमित्ताने कृतिशील क्रांतिकारकांशी त्याचा संपर्क वाढला. त्याच्या मित्रांनी त्याला हद्दपारीतील रशियन क्रांतिकारकांना भेटण्यासाठी परदेशात पाठविले. लेनिनने फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी या पश्चिम यूरोपीय देशांचा १८९५ मध्ये दौरा केला. या दौऱ्यातच जिनीव्हा येथे त्याची ग्यिऑर्गी प्ल्येखानॉव्ह या प्रसिद्ध रशियन मार्क्सवादी विचारवंताशी भेट  झाली. एल्‌. मार्तोव्हसह हे सर्व प्रमुख मार्क्सवादी रशियाला परतले. त्यांनी सर्व क्रांतिकारक गटांना एकत्रित करून युनियन फॉर द स्ट्रगल फॉर द लिबरेशन ऑफ द वर्किंग क्लास या संघटनेची स्थापना केली. लेनिनचा यात महत्त्वाचा वाटा होता. तसेच त्याने राबोची डेलो (द वर्कर्स कॉज) हे वृत्तपत्र बेकायदेशीरपणे प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. या संघटनेने पर्णके व जाहीरनामे प्रसिद्ध करून कामगारांच्या संपास मदत केली आणि मार्क्सवादाची तत्त्वे कामगारांत रुजविण्याचे कार्य अवलंबिले. तेव्हा १८९५ च्या डिसेंबरमध्ये संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक झाली. लेनिनला पंधरा महिन्यांसाठी तुरुंगात डांबण्यात आले आणि नंतर सायबीरियात शूशिन्स्कय येथे तीन वर्षे हद्दपार करण्यात आले (१८९७). अटकेत असताना व हद्दपारीच्या काळातील लेनिनचे वाचन लेखन सतत चालू होते आणि विविध क्रांतिकारर गटांशी तो संपर्क साधून होता. सायबीरियात हद्दपारीत असताना ⇨नड्येअझड क्रूपस्कय (१८६९-१९३९) ही संघटनेतील हद्दपार केलेली सहकारी युवती त्यास भेटली. ती एका सरकारी अधिकाऱ्याची सुविद्य कन्या होती. पुढे त्यांच्या सहवासाची परिणती विवाहात झाली (२२ जुलै १८९८). लेनिनची ती अखेरपर्यंत खासगी सचिव व कॉम्रेड होती. त्यांना मूलबाळ झाले नाही. हद्दपारीत त्यांनी सिडनी व बीआट्रिस वेब यांच्या इंडस्ट्रिअल डेमॉक्रसी या ग्रंथाचे रशियन भाषेत भाषांतर केले. पक्षाचा सर्व गुप्त पत्रव्यवहार ती पाही. पुढे क्रांतीनंतर ती १९२० मध्ये शिक्षण खात्याची उपप्रमुख झाली. रशियातील बदललेल्या शिक्षण पद्धतीवर तिच्या विचारांची छाप होती. तिने तीन-चार पुस्तके लिहिली. त्यांपैकी मेमरीज ऑफ लेनिन (१९३०) व सोव्हिएट वुमन (१९३७) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. याशिवाय इनेसा नावाची त्याची आणखी एक प्रेयसी होती. १८९८ मध्ये लेनिनने त्याच्या डेव्हलपमेंट ऑफ कॅपिटॅलिझम इन रशिया या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लेखन लेनिन या टोपण नावाखाली पूर्ण केले (१८९९). या ग्रंथात त्याने रशियातील कृषिवर्ग (पिझंट कम्यून) भांडवलशाहीच्या दडपणाखाली कसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, याचे चित्र रेखाटले असून रशियातील आर्थिक जीवनाचे त्यात विश्लेषण केले आहे. बूर्झ्वा क्रांती ही श्रमिकवर्गाची हुकूमशाही व समाजवाद यांची पुढील पायरी असेल, असे मत अखेर प्रतिपादन केले. हद्दपारीची मुदत संपल्यानंतर (१९००) लेनिनने रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टीच्या (स्थापना १८९८) कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. मार्क्सवादी विचारांचाच ह्या पक्षाने पाठपुरावा करावा, यावर त्याचा भर होता. त्याच वर्षी रशिया आणि पश्चिम यूरोपमधील विखुरलेल्या मार्क्सवादी गटांना संघटित करण्यासाठी लेनिने झुरिक येथे प्ल्येखानॉव्ह, मार्तोव्ह आणि इतर नेत्यांची भेट घेऊन इस्क्रा (ठिणगी) हे नियतकालिक सुरू केले. इस्क्रामधून त्याने झारशाहीविरूद्ध जनमत प्रक्षुब्ध करण्यासाठी लेखन केले आणि शेतकऱ्यांचा प्रश्न प्रभावीपणे मांडला कारण बुद्धिजीवी वर्गाला मार्क्सवाद येथील शेतकऱ्यांना अयोग्य आहे, असे वाटत होते. १९०२ मध्ये लेनिनची व्हॉट इज टु बी डन? ही पुस्तिका प्रसिद्ध झाली. सोशल डेमॉक्रॅटिक पक्षापुढील प्रश्न, पक्ष संघटना आणि पक्षाचा कार्यक्रम यांची त्यामध्ये चर्चा आहे. व्यावसायिक (सराईत) क्रांतिकारकांच्या समूहांनी अल्पशा मोहात अडकून उच्च उद्दिष्टांपासून च्युत होऊ नये, हे मूलभूत तत्त्व त्याने यात सांगितले. पुढे वीस वर्षे लेनिनने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. दिनांक ३० जुलै १९०३ रोजी पक्षाची परिषद सुरू झाली. ती प्रथम ब्रूसेल्स व नंतर लंडन येथे भरली. तीमध्ये पक्षाची धोरणे, रचना इ. प्रश्नांबाबत लेनिनचे तीव्र मतभेद झाले. त्यातूनच पक्षात बोल्शेव्हिक व मेन्शेव्हिक असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. इस्क्रा हे मुखपत्र मेन्शेव्हिकांच्या ताब्यात गेले. लेनिनचा गट बोल्शेव्हिक म्हणजे बहुमताचा गट म्हणून यापुढील काळात ओळखला जाऊ लागला. पुढे सु. दहा वर्षे लेनिन्चा मेन्शेव्हिकांशी पक्षांतर्गत लढा चालू राहिला. त्यावेळची (१९०३) रशियातील परिस्थिती लक्षात घेता साम्यवादी क्रांतीपूर्वी रशियात भांडवलशाही लोकशाही क्रांती होणे अपरिहार्य असून त्या क्रांतीमध्ये भांडवलदारवर्गाचा पुढाकार असणार, कामगारवर्गाने त्या क्रांतीमध्ये भांडवलदारवर्गाला पाठिंबा द्यावा, अशी मांडणी मेन्शेव्हिक करीत होते. त्याउलट, रशियातील भांडवलदारवर्ग लोकशाही क्रांती घडविण्यास असमर्थ अस्ल्यामुळे कामगारवर्गानेच पुढाकार घेऊन ही क्रांती घडवून आणावी, राज्ययंत्रणेवर वर्चस्व प्रस्थापित करून साम्यवादी क्रांतीसाठी मोर्चेबांधणी करावी, असे लेनिनचे मत होते.


रशियात १९०५ मध्ये उठाव झाल्यानंतर काही काळ लेनिनने रशियात राहून प्रचार आणि पक्षकार्य केले पण नंतर तो पुन्हा देशाबाहेर गेला. बोल्शेव्हिकांनी आयोजित केलेल्या लंडनच्या पाचव्या काँग्रेसमध्ये (मे १९०७) आणि नंतरच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्टुगर्ट काँग्रेसमध्ये (ऑगस्ट १९०७) त्याचा उत्साह वाढला. १९०७ च्या अखेरीस फिनलंडमधून तो स्वित्झर्लंडला गेला. १९०८ ते १९१७ या काळात त्याने विविध यूरोपीय देशांमध्ये वास्तव्य केले. लेनिनच्या जीवनातील हा अत्यंत खडतर काळ होता. या काळात मार्क्सवादी पुस्तिका आणि नियतकालिके प्रकाशित करून ती गुप्तपणे रशियात पोहोचविणे, बोल्शेव्हिक गटाचे संघटन करणे, मेन्शेव्हिकांशी प्रतिवाद करणे इ. कार्यात लेनिन व्यग्र होता. या काळातच त्याने मटीरिॲलिझम अँड इम्पीरिओक्रिटिसिझम (१९०९) हे पुस्तक लिहिले आणि त्यात तात्त्विक भौतिकवादापासून अलेक्झांडर बॉगडॅनोव्ह आणि इतर बोल्शेव्हिक नेते कसे दूर जात आहेत हे दाखविले. अंतिमतः प्राग येथील परिषदेत (१९१२) बोल्शेव्हिक व मेन्शेव्हिक यांच्यातील दुफळीवर शिक्कामोर्तब झाले. लेनिनने आपल्या गटासाठी रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टी (बोल्शेव्हिक) असे नाव धारण केले. याचवेळी जोसेफ स्टालिनला पक्षाच्या मध्यवर्ती समितीत घेण्यात आले. पुढे तो अखेरपर्यंत त्याचा मुख्य साहाय्यक होता. १९१२ पासूनच रशियातील बोल्शेव्हिकांनी शासनाची अनुमती घेऊन प्रावदा हे दैनिक रशियात सुरू केले. त्यातही लेनिनने विपुल लेखन केले. पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर अनेक यूरोपीय देशांमधील समाजवाद्यांनी राष्ट्रीय भूमिकेतून आपापल्या देशाच्या युद्धप्रयत्नांना पाठिंबा देऊन भांडवलदारवर्गाशी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. या कृतीने मार्क्सवादाच्या कामगारवर्गाच्या आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या तत्त्वालाच बाधा येते, असे लेनिनचे म्हणणे होते. त्यामुळे त्याने युद्धविरोधी भूमिका घेतली. रशियाचा युद्धात पराभव व्हावा, म्हणजे राजेशाही कमकुवत होईल, अशी त्याची धारणा होती. याच सुमारास हेरगिरीच्या आरोपाखाली लेनिनला ऑस्ट्रियन पोलिसांनी अटक केली (१९१४). स्वित्झर्लंडला जाण्याच्या अटीवर त्यास मुक्त करण्यात आले. लेनिनने साम्राज्यशाही ही भांडवलशाहीचीच पुढची आवृत्ती आहे, हा आपला महत्त्वपूर्ण सिद्धांत विशद करणारा इम्पीअरिअलिझम, द हायेस्ट स्टेज ऑफ कॅपिटॅलिझम (१९१६) हा ग्रंथ लिहिला. त्यात त्याने साम्राज्यशाहीची उपपत्ती विशद करताना मुख्यत्वे तीन सिद्धांत मांडले. एक, युद्धाची वास्तव कारणे कोणती? दोन, समाजवाद्यांनी आंतरराष्ट्रीयत्ववाद झिडकारून स्वदेशभक्ती का अंगीकारली व युद्धाला पाठिंबा का दिला? आणि तीन, निर्भेळ लोकसत्ताक शांतता केवळ क्रांतीच आणू शकेल.

रशियाचा युद्धप्रयत्न क्रांतिकारक कमकुवत करतील, या विश्वासाने जर्मनीने लेनिनसह क्रांतिकारकांना सहाय्य दिले. झारशाहीचा पाडाव  झाल्यानंतर (फेब्रुवारी १९१७) लेनिन दिनांक १६ एप्रिल १९१७ रोजी जर्मनीने पुरविलेल्याच बंदिस्त रेल्वेतून रशियात आला. त्यामुळे रशियनांचा प्रतिकार संपुष्टात येईल, अशी जर्मनीची धारणा होती. बोल्शेव्हिकांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी उठाव करावा, अशी लेनिनने आग्रही भूमिका घेतली. जागतिक युद्ध, आर्थिक दुरवस्था, आंतरराष्ट्रीय पातळीवरील समाजवादी क्रांतीची शक्यता, रशियातील राजेशाहीचा पाडाव आणि अंतर्गत अशांतता या सर्वांमुळे त्यावेळी रशियात समाजवादी क्रांतीला लेनिनच्या मते परिस्थिती पूर्णतया अनुकूल होती. तेव्हापासून त्याने उठाव करून सत्ता हस्तगत करण्यासाठी बोल्शेव्हिकांचे संघटन करण्यावर भर दिला. त्याच सुमारास लीअन ट्रॉट्‌स्की अमेरिकेतून रशियात परतला. त्याने लेनिनच्या भूमिकेला पाठिंबा दिला. जुलैमध्ये लेनिनच्या अटकेचा हुकूम निघाला. पुढील काही काळ त्याने भूमिगत राहून कार्य केले. दरम्यान काही महत्त्वाच्या सोव्हिएट्‌स (मंडळे) मध्ये बोल्शेव्हिकांचे मत प्रस्थापित झाले होते. लेनिनच्या तपशीलवार सूचनांप्रमाणे बोल्शेव्हिकांनी दिनांक ७ नोव्हेंबर १९१७ रोजी सशस्त्र उठाव करून किऱ्येनस्कीचे संयुक्त सरकार पदभ्रष्ट केले आणि लेनिनने समाजवादी क्रांती झाल्याचे घोषित केले. १९१८ पर्यंत रशियाची कालगणना यूरोपाहून भिन्न असल्याने क्रांती झाली, तेव्हा रशियात ऑक्टोबर महिना चालू होता. म्हणून ही क्रांती ‘ग्रेट ऑक्टोबर रेव्हलूशन’ या नावाने ओळखली जाते. क्रांतीनंतरच्या काळात लेनिनला दुष्काळ, युद्ध, परकीय हस्तक्षेप, यादवी युद्ध, बिगररशियन राष्ट्रकांची समस्या इ. अनेक प्रश्नांमध्ये लक्ष घालावे लागले.

लेनिनने १९१८ च्या जानेवारीत संसद (ड्युमा) रद्द करून पक्षाची हुकूमशाही प्रस्थापित केली. यादवी युद्धात (१९१८-२०) रशियाची अपरिमित हानी झाली. असंख्य माणसे मृत्यूमुखी पडली. या यादवीचे श्वेत रशियन नेतृत्व करीत होते आणि मित्र राष्ट्रे (इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका) त्यांना पाठिंबा देत होती तथापि लेनिनच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाने व लेनिनने निर्माण केलेल्या रेड आर्मीने हे युद्ध जिंकले आणि ब्रेस्ट-ल्यिटॉव्हस्कच्या तहाने गेलेले प्रदेश परत मिळविले. या युद्धात लेनिनची हत्या करण्याचा प्रयत्न झाला आणि एक गोळी त्याच्या मानेत घुसली. पुढे ती काही दिवस तशीच राहिली. या काळातच मार्च १९१९ मध्ये निरनिराळ्या देशांतील कम्युनिस्ट पक्षांना एकत्र आणून त्यांमध्ये पक्षाची ध्येयधोरणे, मार्क्सवादाचे तत्त्वज्ञान आणि पक्षशिस्त यांचा प्रसार करण्यासाठी लेनिनने मॉस्कोत ‘थर्ड इंटरनॅशनल’ किंवा ‘कम्युनिस्ट इंटरनॅशनल’ (कॉमिंटर्न) या नावाची संस्था स्थापन केली. वसाहतींतून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. देशात शांतता निर्माण व्हावी म्हणून नुकसान सहन करून ब्रेस्ट-ल्यिटॉव्हस्कचा तह जर्मनीबरोबर केला. त्याच्याकडे चेअरमन ऑफ द कौन्सिल ऑफ पीपल्स कोमिसार्स (मंत्रिमंडळ प्रमुख) हे पद होते. क्रांतीनंतरच्या व्यावहारिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे त्याला भाग पडले. या धामधुमीच्या काळातही विविध प्रश्नांची सैद्धांतिक मांडणी करून चिकित्सक लेखन करण्याच्या त्याच्या व्यासंगात खंड पडला नाही. यादवी युद्ध संपुष्टात आल्यानंतर राष्ट्रीयीकरणाच्या धोरणाला असलेला वाढता विरोध लक्षात घेऊन लेनिनने नवे आर्थिक धोरण स्वीकारले व शेतकऱ्यांना काही सवलती दिल्या. पूर्णपणे समाजवादी अर्थव्यवस्था येण्यापूर्वी बराच काळ अशा सवलती द्याव्या लागतील मात्र त्याबरोबरच कडक शिस्त आणि पक्षाचे अर्थव्यवहारावर नियंत्रण यांना महत्त्व द्यावे लागेल, असा विचार त्याने मांडला.

लेनिनची प्रकृती १९२२ पासून खालावत गेली आणि दैनंदिन शासकीय व्यवहारांपासून त्याला बाजूला व्हावे लागले. एप्रिल १९२२ मध्ये त्याच्या मानेतील गोळी काढण्यात आली. या शस्त्रक्रियेतून तो सावरला. त्यानंतर पक्षाघाताने पुन्हा त्याला गाठले आणि प्रकृती खालावली. साम्यवादी पक्षाची अकार्यक्षमता, अंतर्गत भांडणे आणि विशेषतः स्टालिनच्या हाती झालेले सत्तेचे अमर्याद केंद्रीकरण, हे या काळात लेनिनच्या चिंतेचे विषय बनले होते. अखेरच्या काळात पक्षाच्या परिषदेपुढे ठेवण्यासाठी लिहिलेल्या एका पत्रात तर त्याने पक्षाच्या मुख्य सचिवपदावरून स्टालिनला दूर करावे, असा सल्ला दिला होता. दिनांक १० मार्च १९२३ रोजी पुन्हा तीव्र आघाताला तो बळी पडला व त्याची वाणी गेली आणि शरीर विकलांग झाले. त्याचे राजकीय जीवन जवळजवळ संपुष्टात आले. अखेर मेंदूतील रक्तस्रावाने मॉस्कोजवळील गॉर्की येथे त्याचे निधन झाले. लेनिनचा पार्थिव देह रासायनिक प्रक्रिया करून लाल चौकात बांधलेल्या खास छत्रीत राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यात आला.


लेनिनने आयुष्यभर समाजवादी क्रांतीच्या ध्येयाला स्वतःला वाहून घेतले आणि व्यक्तिगत सुखदुःखांची कधीच पर्वा केली नाही. सुदृढ कणखर शरीरयष्टी, अत्यंत साधी राहणी आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व सुखलोलुपता यांचा अभाव ही त्याची जीवनवैशिष्ट्ये होत. क्रांतीचा नेता म्हणून तो अत्यंत ठाम, निश्चयी आणि प्रत्येक व्यावहारिक तपशिलांचा विचार करणारा होता परंतु व्यवहारात त्याने नेहमीच सैद्धांतिक चिकित्सेवर भर दिला. मार्क्सवादी सिद्धांताला अनुसरून परिस्थितीचे आकलन आणि त्या आधारे कृतीची दिशा ठरविणे, हे त्याच्या क्रांतिकार्याचे वैशिष्ट्य होते. सैद्धांतिक, तत्त्वज्ञानात्मक आणि संघटनात्मक प्रश्नांवर लेनिनने सातत्याने लेखन केले. त्याचे समग्र लेखन इंग्रजीत पंचेचाळीस खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. लेनिनने मार्क्सवादाचा गाढा व्यासंग करून विसाव्या शतकाच्या आरंभकाळाचा आणि तत्कालीन रशियन परिस्थितीचा अन्वयार्थ लावून त्या आधारे आपले कार्य केले. त्यामुळे मार्क्सवादी विचारवंतांमध्ये त्याचे स्थान अग्रेसरच आहे.

लेनिनवाद : लेनिनने मार्क्सवादात जी भर घातली, तिला ‘लेनिनवाद’ (बोल्शेव्हिकवाद) म्हणतात. याची चर्चा, मीमांसा आणि स्पष्टीकरण लेनिनने लिहिलेल्या बहुविध लेखांतून आणि स्वतंत्र ग्रंथांतून पाहावयास मिळते. लेनिनवादी विचाराप्रमाणे मार्क्सवाद हा क्रांतिकारकवर्गीय व्यवहार असून कामगारवर्गाने सत्ता संपादन करणे, हा क्रांतिकारक कृतीचा मुख्य हेतू आहे. साम्यवादी पक्षाला लेनिनवादाने वर्गलढ्याचे हत्यार मानले आहे. कामगारवर्गाच्या वतीने पक्षाने क्रांतिकारक कृतीद्वारे सत्ता संपादन करून समाजवादी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हे लेनिनवादाचे सार होय. क्रांतिकारक वर्गीय कृतीमधील पक्षाचे स्थान, कामगारवर्गाची हुकूमशाही आणि साम्राज्यवादाचे विश्लेषण या संदर्भात लेनिनने मांडलेले विचार लेनिनवादात विशेष महत्त्वाचे आहेत.

(अ) पक्षाचे स्थान : भांडवलदारवर्गाच्या संघटित शक्तीविरूद्ध सामना देण्यासाठी कामगारवर्गाचा स्वतंत्र वर्गनिष्ठ पक्ष असावा, हा विचार मार्क्स-एंगेल्स यांच्या लिखाणात आढळतो. अशा पक्षाचे स्वरूप कसे असावे आणि क्रांतिकारक कृतीमध्ये पक्षाचे स्थान काय असावे, याविषयी लेनिनने व्हॉट इज टु बी डन? या पुस्तकात विचार मांडले आहेत. कामगारवर्गामध्ये वर्गजाणीव आपोआप निर्माण होत नसते. वर्गजाणीव निर्माण करण्याची जबाबदारी पक्षाची असते. त्यासाठी पक्ष कामगार संघटनांच्या आधारे निर्माण करू नये. कामगार संघटनांमुळे अर्थवादालाच वाव मिळतो. क्रांतिकार्याला पूर्णवेळ वाहून घेतलेल्या व्यक्तींचा मिळून पक्ष बनला पाहिजे. असा पक्ष कामगारवर्गाचे नेतृत्व करील आणि क्रांती घडवून आणेल. क्रांतिकारक सिद्धांत हा साम्यवादी पक्षाचा आधार असला पाहिजे कारण क्रांतिकारक सिद्धांत हाच क्रांतिकारक चळवळीचा पाया असतो. साम्यवादी पक्ष हा लोकशाही केंद्रीकरणाच्या तत्त्वावर उभा असला पाहिजे. पक्षांतर्गत चर्चा आणि नेतृत्वाचे उत्तरदायित्व लेनिनला मान्य आहे. पक्षाच्या सर्वोच्च यंत्रणा निवडून आलेल्या असल्या पाहिजेत मात्र त्याचबरोबर पक्षांतर्गत शिस्त, क्रांतिकारक सिद्धांतावर पूर्णनिष्ठा आणि पक्षाच्या सर्वोच्च यंत्रणेच्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी यांनाही लेनिनवादात महत्त्व आहे. पक्ष हा क्रांतीच्या अग्रभागी राहणार असल्याने सुसंघटित आणि शिस्तबद्ध पक्षयंत्रणेला लेनिनने महत्त्वाचे स्थान दिले. कामगारवर्गाच्या उत्स्फूर्त कृतीवर विसंबून न राहता लेनिनवाद कामगारवर्गामध्ये क्रांतिकारक जाणिवा निर्माण करणे आणि पक्षाच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारक कृती करणे, याला महत्त्व देतो.

(ब) कामगारवर्गाची हुकूमशाही : वर्गसंघर्षाचा शेवट कामगारवर्गाच्या हुकूमशाहीत होतो आणि कामगारवर्गाची हुकूमशाही ही पूर्णपणे वर्गविहीन समाजाच्या निर्मितीपूर्वीची अवस्था असते, असे मार्क्सने म्हटले आहे परंतु कामगारवर्गाच्या हुकूमशाहीची कल्पना मार्क्सच्या लेखनात पुरेशी स्पष्ट होत नाही. मार्क्स आणि एंगेल्स यांच्यानंतर लेनिननेच प्रथम आपल्या स्टेट अँड रेव्हलूशन (१९१७) मध्ये ही कल्पना विस्ताराने मांडली. कामगारवर्गाने क्रांती केल्यानंतर लगेच राज्यसंस्था नाहीशी होत नाही फक्त भांडवलशाही राज्यसंस्थेचाच पाडाव होतो. भांडवलशाही लोकशाही राज्ययंत्रणेत सुधारणा करणे शक्य नसते. कामगारवर्गाच्या हुकूमशाहीने ती नष्टच करावी लागते. तसेच राज्यसंस्था ही नेहमीच दडपणुकीचे साधन असते, यावर लेनिनने भर दिला. क्रांतीनंतर कामगारवर्ग सर्व सत्ता ताब्यात घेतो. कामगारवर्गाची हुकूमशाही म्हणजे केवळ कामगारवर्गाचे राजकीय वर्चस्व नव्हे. कामगारवर्ग स्वतःच राज्य करतो. ह्या टप्प्यात वर्ग अस्तित्वात असतात. त्यामुळे भांडवलदारवर्गाचा पूर्ण बीमोड करणे, हेच कामगारवर्गाच्या हुकूमशाहीचे उद्दिदष्ट असते. त्यासाठी हिंसेचादेखील वापर करावा लागतो. क्रांतीनंतर राज्याच्या नियंत्रणाखाली अर्थव्यवस्थेचे जे घटक येतात, त्यांचे व्यवस्थापन कामगारांनी स्वतःकडे घ्यावयाचे असते. भांडवलशाहीने घडवून आणलेल्या विकासामुळे प्रशासन म्हणजे अगदी सोपे-यांत्रिक-काम बनलेले असते. त्यामुळे कामगार प्रत्यक्ष प्रशासन करून नोकरशाहीला फाटा देऊ शकतात. लेनिनचे कामगारवर्गाच्या हुकूमशाहीचे हे विवरण बऱ्याच अंशी मार्क्सच्या १८७१ च्या ‘पॅरिस कम्यूनच्या’ मूल्यमापनावर (द सिव्हिल वार इन फ्रान्स) आधारित आहे.  

(क) साम्राज्यवादाचे विश्लेषण : इम्पीअरिअलिझम, द हायेस्ट स्टेज ऑफ कॅपिटॅलिझम (१९१६) हे लेनिनचे सर्वांत महत्त्वाचे सैद्धांतिक लेखनविषयक पुस्तक होय. साम्राज्यवादाच्या रूपाने भांडवलशाहीने एका नव्या आणि अंतिम टप्प्यात प्रवेश केला असून स्पर्धेची जागा मक्तेदारीने घेतली आहे. ह्या टप्प्यात वर्गावर्गांमधील विभाजन अगदी टोकाला पोहोचते. भांडवलशाहीचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असते. प्रगत भांडवलशाही देशांमधील भांडवलसंचयामुळे अतिरिक्त उत्पादनाचा पेचप्रसंग निर्माण होतो. नफ्याच्या शोधार्थ भांडवलाची निर्यात होते. ह्यातून साम्राज्यवादाची अवस्था निर्माण होते. त्यामुळे भांडवलशाहीला तात्पुरते स्थैर्य प्राप्त होते. अर्धविकसित आणि उपनिवेशी प्रदेश हा भांडवलशाहीचा सर्वांत कच्चा दुवा असतो. या कच्च्या दुव्यावर आघात करून भांडवलशाहीच्या उच्चाटनास गती देता येईल. त्यासाठी प्रगत भांडवलशाही देशांमधील वर्गलढ्यांची उपनिवेशी प्रदेशांमधील वर्गलढ्याबरोबर सांगड घातली पाहिजे. अर्धविकसित देशांमधील क्रांतिकारक चळवळीत तेथील शेतकरीवर्गाला सामावून घेतले पाहिजे. वसाहतींमधील शेतकरी-कामगारवर्गांच्या वर्गीय संघटनांवर आणि वर्गलढ्यांवर लेनिनने भर दिला. साम्राज्यवादातून असमान विकास होतो. यातूनच जागतिक युद्धे उद्‌भवतात. अशा युद्धांनी जागतिक भांडवलशाही अस्थिर होऊन क्रांतीला पोषक वातावरण निर्माण होते.

पक्षाचा क्रांतिकारक कृतींमधील पुढाकार, निव्वळ कामगारवर्गापेक्षा शेतकरी आणि कामगारांच्या-कष्टकऱ्यांच्या-क्रांतिकारक भूमिकेवर असलेला भर, प्रगत भांडवलशाही देशांबरोबरच अर्धविकसित देशांमधील वर्गलढ्यांना दिलेले महत्त्व् आणि भांडवलशाही राज्याच्या उच्चाटनासाठी कामगारवर्गाच्या हुकूमशाही सत्तेचा पाठपुरावा, ही लेनिनवादाची ठळक वैशिष्ट्ये होत.

जागतिक साम्यवादी चळवळीवर मार्क्स-एंगेल्स यांच्याखालोखाल लेनिनच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा सर्वाधिक प्रभाव पडलेला दिसतो. त्यामुळेच त्याने सांगितलेले मार्क्सवादाचे विश्लेषण ‘लेनिनवाद’ म्हणून ओळखले जाऊ लागले. दीर्घकाळापर्यंत अनेक देशांतील साम्यवादी चळवळींनी लेनिनवाद शिरोधार्य मानून त्या त्या देशातील वर्गलढ्याची आखणी केली. लेनिनवाद-विशेषतः पक्षाचे स्थान, कामगारवर्गाची हुकूमशाही इ. त्यातील कल्पना-मूळ मार्क्सवादाशी सुसंगत आहे की नाही, हा मार्क्सवादी विचारवंतांमध्ये आणि मार्क्सवादाच्या टीकाकारांमध्येही वादाचा विषय असला, तरी जागतिक मार्क्सवादी विचारांमध्ये आणि चळवळीत लेनिनचे स्थान वादातीत आहे.

पहा : रशियन राज्यक्रांति रशिया (इतिहास) स्टालिन, जोझेफ.

संदर्भ : 1. Cliff, Tony, Lenin, 4 Vols., London, 1975-79.

           2. Fischer, Louis, The Life of Lenin, London, 1964.

           3. Harding, Neil, Lenin’s Political Thought, 2 Vols., New York, १९७८.

           4. Hill, Christopher, Lenin and Russian Revolution, London, 1978.

           5. Lane, David, Leninism : A Sociological Interpretation, Cambridge, 1981.

           6. Lenin. V. I. Collected Works, 45 Vols., Moscow, 1960-70.

           7. Liebman, Marcel, Leninism Under Lenin, London, 1973.

           8. Lukacs, Georg, Lenin : A Study on the Unity of His Thought, London, 1970.

           9. Luxemburg Rosa, The Russian Revolution and Leninism or Marxism ? Ann Arbor, 1961.

         10. Meyer, Alfred, Leninism, Harvard, 1957.

         11. Payne, Robert, The Life and Death of Lenin, New York, 1964.

         12. Shub, David, Lenin, a Biography, London, 1966.

         13. Trotsky, Leon, Lenin : Notes for a Biographer, New York, 1971.

         14. Ulam, Adam B. The Bolsheviks : The Intellectual and Political History of the Triumph of Communism in Russia, London, 1965.

         15. Weber, Gerda Weber, Herman, Lenin : Life and Works, New York, 1981. 

         16. भिडे, रा. गो. रशियन लोकशाहीचा संस्थापक : निकोलाय लेनिन, मुंबई, 1922.

पळशीकर, सुहास