महाराणा प्रतापसिंह : (९ मे १५४० – १९ जानेवारी १५९७). राजस्थानातील गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. महाराणा प्रताप तसेच प्रतापसिंह उदयसिंह गुहिलोत ह्या नावानेही ते प्रसिद्ध आहेत. उदयसिंहानी जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास मेवाडच्या गादीचा वारस नेमले होते, परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रताप यांस १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.
प्रतापसिंह ‘महाराणा’ झाले त्या वेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी मोगल सम्राट अकबरांचे स्वामित्व पतकरले होते; पण राणाप्रताप यांनी त्यांच्यापुढे मान लवविली नाही. त्यांनी चितोड स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य मोगल सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात नेऊन तेथेच काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले.
मोगलांचे स्वामित्व न पतकरल्यामुळे महाराणा प्रताप यांना मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला. सम्राट अकबर यांनी मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्यांच्यावर पाठविले. २१ जून १५७६ रोजी हळदीघाट येथे घनघोर लढाई झाली. यावेळी तोफखाना व उंटदल असलेल्या बलाढ्य मोगली सैन्यांच्या पुढे प्रतापसिंह यांचा निभाव लागला नाही; तथापि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्यांनी मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालूच ठेवला. अकबर स्वतः त्यांच्यावर चालून गेला, पण अयशस्वी झाला. पुढे महाराणा प्रताप यांनी आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले आणि सु. १२ वर्षे शांततेने राज्य केले.
महाराणा प्रताप यांना परचक्राची फार चिंता होती. म्हणून त्यांनी आपल्या सरदारांकडून तुर्कांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह ह्या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला. सम्राट अकबर यांच्यासह राजपूत इतिहासकार कर्नल जेम्स टॉड यांनीही महाराणा प्रताप यांच्या युद्धनीतीची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.
पहा : गुहिलोत वंश.
संदर्भ :
- Majumdar, R. C. Ed. The Mughul Empire, Bombay, 1974.
- गहलोत, जगदीशसिंह, राजपूतानेका इतिहास, पहला भाग, जोधपूर, १९३७.
देशपांडे, सु. र.