गुंजीकर, रामचंद्र भिकाजी : (३० एप्रिल १८४३ — १८ जून १९०१). मराठी ग्रंथकार आणि संपादक. जन्म बेळगाव जिल्ह्यातील जांबोटी येथे. शिक्षण जांबोटी, बेळगाव आणि मुंबई येथे. शिक्षणक्षेत्रात अध्यापक म्हणून त्यांनी प्रवेश केला. पुढे ते सहायक शिक्षण उपनिरीक्षक झाले. संस्कृत आणि इंग्रजी ह्यांच्या जोडीला उर्दू, कन्नड, गुजराती आणि बंगाली ह्या भाषाही त्यांना येत होत्या. विद्याप्रसारास वाहिलेला मराठी ज्ञानप्रसारक  बंद पडल्यानंतर निर्माण झालेली पोकळी विविधज्ञानविस्तार (१८६७) हे दर्जेदार मासिक काढून त्यांनी भरून काढली. ते संपादक म्हणून स्वतःचे नाव मात्र त्यावर घालीत नसत. भाषिकसंशोधन, व्याकरण, ललितवाङ्‌मय इ. विषयांवरील उत्तमोत्तम लेख त्यांनी त्यातून प्रसिद्ध केले आणि महाराष्ट्रातील ज्ञानलालसा व वाङ्‌मयीन अभिरुची ह्यांच्या वर्धनविकासात महत्त्वाचा वाटा उचलला. मराठी भाषा आणि

रा. भि. गुंजीकर

व्याकरण ह्यांविषयी त्यांनी स्वतः लिहिलेले लेखही उल्लेखनीय आहेत. विशेषतः मराठी व्याकरणासंबंधी त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे महत्त्व सर्वमान्य आहे. सात वर्षांनी विविधज्ञानविस्तारातून ते बाहेर पडले. १८७१ मध्ये निघालेल्या दंभहारक  ह्या मासिकाचेही ते अप्रकट संपादक होते. त्यातही त्यांनी लेखन केले. मोचनगड (१८७१) व गोदावरी (अपूर्ण) ह्या कादंबऱ्या, अभिज्ञानशाकुंतलाचे मराठी भाषांतर (१८७०),रोमकेतु – विजया (विविधज्ञान विस्तारात प्रसिद्ध —१८७०— ७२, रोमिओ अँड ज्यूलिएट  ह्या शेक्सपिअरच्या नाटकाचे मराठी भाषांतर), कन्नडपरिज्ञान… (१९०९) हे व्याकरणशुद्ध कानडी भाषेचे ज्ञान मराठीतून देण्यासाठी लिहिलेले पुस्तक इ. लेखन त्यांनी केले आहे. शिवाय लाघवी लिपी किंवा अतित्वरेने लिहिण्याची युक्ति (१८७४) हे पुस्तक लिहून मराठीतून लघुलेखनाची ओळख करून दिली.

गुंजीकरांची मोचनगड  ही मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी. शिवकालाच्या पार्श्वभूमीवर काल्पनिक पात्रे व प्रसंग निर्माण करून लिहिलेली ही कादंबरी आहे. शिवाजी महाराज ह्या कादंबरीत अगदी अखेरीअखेरीस येतात. कादंबरीच्या उद्दिष्टांविषयी गुंजीकरांच्या निश्चित कल्पना होत्या, असे दिसते. त्यांच्याशी प्रामाणिक राहून त्यांनी शिवकालीन इतिहासाची काटेकोर जाण ठेवली व शिवकालाचे जिवंत वातावरण निर्माण केले. ऐतिहासिक कादंबरीचा एक उत्कृष्ट आदर्श म्हणून अ. का. प्रियोळकरांसारख्या चिकित्सक विद्वानांनी ह्या कादंबरीला मान्यता दिली आहे. 

कुलकर्णी, अ. र.