करंदीकर, विंदा : (२३ ऑगस्ट १९१८ — ). मराठी कवी, लघुनिबंधकार व समीक्षक. पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. जन्म घालवलीस (रत्‍नागिरी जिल्हा). उच्च शिक्षण कोल्हापूर येथे. इंग्रजीचे  प्राध्यापक.

त्यांच्या प्रारंभीच्या कवितेवर ⇨ माधव ज्यूलियनांचा प्रभाव होता. तथापि त्या प्रभावातून लवकरच बाहेर पडून १९४५ नंतरच्या मराठी नवकवितेत एक स्वतंत्र वळण प्रकट करणारी कविता त्यांनी लिहिली. मानवाच्या दु:स्थितीविषयी पोटतिडीक व्यक्त करणारी व तीत बदल घडवू पाहणाऱ्या साम्यवादी क्रांतीचे स्वागत करणारी समाजमनस्कता त्यांच्या अनेक कवितांतून आढळते तसेच रसरशीत शारीरिक अनुभूतींचा आविष्कार करणाऱ्या प्रणयकवितेतील उत्कटताही प्रत्ययास येते. वैशिष्ट्यपूर्ण अनवट प्रतिमा आणि विरोधाभासी वाक्‌प्रयोगांमुळे येणारी अर्थघनता व क्वचित दुर्बोधता हा त्यांच्या कवितेचा आणखी एक ठळक विशेष. मुक्त सुनीते ही त्यांची महत्त्वाची प्रयोगशील रचना. त्यानी लिहिलेल्या बालकवितांतूनही त्यांचे वेगळेपण दिसून येते. ते आपल्या कविता फार प्रभावीपणे वाचतात. ‘रविकिरण मंडळा’ नंतर जाहीर काव्यवाचनाची यशस्विता त्यांनी सिद्ध केली.

विंदा करंदीकर

वठलेल्या मराठी लघुनिबंधाला त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चिंतनाने आणि मनोज्ञ काव्यात्मतेने पुनश्च पालवी फुटली. लेखनासाठी त्यांना अनेक पारितोषिके मिळाली असून, त्यातूनच त्यांना अमेरिका आणि रशिया या देशांचा प्रवास घडला आहे. त्यांची ग्रंथरचना खालीलप्रमाणे :

कवितासंग्रह : स्वेदगंगा (१९४९), मृद्‌गंध (१९५४), धृपद (१९५९), जातक (१९६८). बालकविता :  राणीची बाग (१९६१), एकदा कायझाले (१९६१), सशाचे कान (१९६३), एटू लोकांचा देश (१९६३), परी ग परी (१९६५). लघुनिबंधसंग्रह : स्पर्शाची पालवी (१९५८), आकाशाचा अर्थ (१९६५). समीक्षा : परंपरा आणि नवता (१९६७). भाषांतर : रिस्टॉटलचे काव्यशास्त्र (१९५७ – विवेचक प्रस्तावनेसह), फाउस्ट भाग १.

मालशे, स. गं.