माधवानुज : (१८७२–१९१६), केशवसुत संप्रदायातील मराठी कवी. मूल नाव काशिनाथ हरी मोडक. जन्म पडघवली ह्या गावचा. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्याच्या बी. जे. मेडिकल स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. १८९४ मध्ये ‘हॉस्पिटल असिस्टंट’ची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. पुढे काही काळ सरकारी नोकरी नंतर कल्याण येथे स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय. बंगाली भाषा-साहित्याचा त्यांनी व्यासंग केला होता.

माधवानुजांची कविता (सु. १२५) सुबोध, साधी आणि बोधपर अशी आहे. सरकारी नोकरीत असताना महाराष्ट्राच्या दुष्काळी भागांत ते हिंडले. तेथील दैन्य व दुःख त्यांनी पाहिले. ह्या अनुभवाचा परिणाम त्यांच्या काही कवितांतून दिसून येतो. त्यांची कविता माधवानुज (१९२४) ह्या नावाने संगृहीत आहे.

विख्यात बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त आणि रवींद्रनाथ टागोल ह्यांच्या काही कवितांचे अनुवाद माधवानुजांनी केले. कल्याण येथे ते निधन पावले.

जोग, रा. श्री.