आत्मचरित्र : आपल्या जीवनविषयक अनुभवांचे व तदनुषंगाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचे स्वतः लेखकाने लेखनरूपाने घडविलेले दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय. आत्मचरित्राप्रमाणे इतरही अनेक लेखनप्रकारांनी असे दर्शन घडविता येते. त्यांत खाजगी पत्रव्यवहार, मुलाखती, दैनंदिनी, रोजनामे (जर्नल्स), ख्रिस्ती धर्मकल्पनेनुसार केलेली पापनिवेदने, स्मृतिचित्रे (रेमिनिसन्सेस) व संस्मरणिका (मेम्वार्स) यांसारखे आत्मचरित्रपर लेखनप्रकार अंतर्भूत होतात.

आत्माविष्काराची मानवी प्रवृत्ती नैसर्गिक व सार्वत्रिक असल्याने आत्मचरित्रपर लेखन सर्वच भाषांत आढळून येते. एक साहित्यप्रकार म्हणून ज्यास आत्मचरित्र म्हटले जाते, ते आणि उपर्युक्त आत्मचरित्रपर लेखनप्रकार यांत फरक आहे. आत्मचरित्रामागे आत्माविष्काराची प्रेरणा, आत्मजीवनाच्या अर्थपूर्णतेची अभिज्ञता, स्वानुभवांतील निवडीची दृष्टी आणि लेखनशैलीविषयक भान अशा गोष्टी प्रेरक असतात. तसेच ऐतिहासिक साहित्यकृतीप्रमाणे विशिष्टतेकडून सामान्यत्वाकडे जाण्याची क्षमता त्यात असते. म्हणूनच आत्मचरित्र एक ललित गद्यप्रकार मानला जातो. खाजगी पत्रादी आत्मचरित्रपर लेखनप्रकार पुष्कळदा विशिष्ट व्यक्तींसाठी व विशिष्ट व्यक्तिगत संदर्भात हाताळले जातात. या लेखनप्रकारांना तात्कालिक व प्रासंगिक पार्श्वभूमी असल्याने त्यांचा आशय आणि अर्थवत्ता ही मर्यादित असतात. संस्मरणिका आणि स्मृतिचित्रे यांत बरेचसे साम्य असले, तरी संस्मरणिकेत लेखक जे व्यापक अनुसंधान ठेवतो, तसे ते काहीशा त्रोटक आणि स्वायत्त स्मृतिचित्रांत नेहमीच आढळेल, असे नाही. तरीदेखील हे दोनही लेखनप्रकार पुष्कळदा परस्परपर्यायी ठरू शकतात. आत्मचरित्र आणि संस्मरणिका यांतही फरक आहे. अनेकदा त्यांचा निर्देश समानार्थी होतो हे खरे परंतु सूक्ष्मपणे पाहिल्यास, संस्मरणिकेत लेखकाचा भर बहुधा इतर व्यक्तींवर व त्यांच्या अनुभवांवर असतो, असे दिसून येईल. याउलट आत्मचरित्राचे केंद्र लेखक स्वतःच असतो. म्हणजे असे, की आत्मचरित्र एककेंद्री असते आणि संस्मरणिका एककेंद्री नसते. आत्मचरित्रास पत्रव्यवहारादी आत्मचरित्रपर लेखनप्रकारांचा एक प्रकारची कच्ची सामग्री म्हणून उपयोग होऊ शकतो आणि आत्मचरित्रकार तशा लेखनप्रकारांचा स्वेच्छेने उपयोग करू शकतो. सारांश, आत्मचरित्रपर लेखनाचे जे अनेक प्रकार संभवतात, ते एकमेकांस पूरक असले तरी एकमेकांचे पर्यायी ठरू शकत नाहीत.  

ज्यास आत्मचरित्रात्मक लेखन अशी व्यापक संज्ञा देता येईल, अशा पश्चिमी वाङ्‍मयातील लेखनाचा प्राचीनतम पुरावा मार्कस ऑरिलियस (१२१-१८०) याच्या ग्रीक भाषेतील आध्यात्मिक चिंतनात आढळतो. ख्रिस्तोत्तर काळातील अत्यंत महत्त्वाचे पहिले आत्मचरित्रपर लेखन म्हणजे सेंट ऑगस्टीनचे (३५४-४३०) Confessiones (इं. शी. कन्फेशन्स) हे होय. पापनिवेदनपर आत्मलेखनाची एक स्वतंत्र परंपराच ऑगस्टीनच्या प्रस्तुत लेखनामुळे सुरू झाली. इंग्रज लेखक डे क्विन्सी (कन्फेशन्स ऑफ  ॲ‍न इंग्‍लिश ओपियम इटर, १८२२) व फ्रेंच लेखक आल्फ्रेद द म्यूसे (१८३६, इं. शी. कन्फेशन्स ऑफ अ चाइल्ड ऑफ द सेंचरी) यांनी हा लेखनप्रकार हाताळला आहे. जॉन बन्यनचे ग्रेस अबाउंडिंग टू द चीफ ऑफ सिनर्स (१६६६), रिचर्ड बॅक्स्टरचे Reliquiae Baxteriane (१६९६) व क्वेकरपंथीय जॉर्ज फॉक्सचा रोजनामा (१६९४) यांसारख्या आध्यात्मिक आत्मकथनात प्रांजळपणा आढळतो. पश्चिमी आत्मचरित्रपर लेखनास प्रबोधनकाळापासून विशेष चालना मिळाली. आध्यात्मिक स्वरूपाच्या आत्मकथनातील ऋजुता व साधेपणा लोप पावून लौकिक दृष्टिकोनाचे गुणावगुण त्या लेखनात प्रकट होऊ लागले. लौकिक दृष्टिकोनाप्रमाणेच त्या काळी विकसित झालेल्या विविध प्रकारच्या वाङ्‍मयाचा परिणामही आत्मचरित्रपर लेखनावर उमटला. इटालियन शिल्पकार बेन्‌व्हेनूतो चेल्लीनी (१५००-१५७१) याचे आत्मचरित्र प्रबोधनकालीन आत्मचरित्राचे एक नमुनेदार उदाहरण आहे. भडक शैलीच्या आत्मचरित्रपर लेखनाचा प्रारंभ इंग्रज नट कॉली सिबर याच्या अपॉलॉजी फॉर द लाइफ ऑफ कॉली सिबर (१७४०) या ग्रंथाने झाला. बेंजामिन फ्रँक्‌लिनचे आत्मचरित्र (१८६८) हे अमेरिकन वाङ्‍मयातील पहिले महत्त्वाचे गद्यलेखन होय. सेंट ऑगस्टीनप्रमाणेच रूसोचे कन्फेशन्स हे (१७८१ व १७८८) आत्मचरित्र कठोर आत्मपरीक्षण व निर्भय आत्मशोधन या गुणांनी संपन्न आहे. त्यात प्रच्छन्न आत्मसमर्थन दिसले, तरी अनुभवांना विकृत केलेले नाही. डेव्हिड ह्यूम याचे तात्त्विक स्वरूपाचे आत्मचरित्र (माय ओन लाइफ, १७७७) उल्लेखनीय आहे.

अनेक प्रसिद्ध पश्चिमी लेखकांनी रोजनामे लिहिले आहेत. फ्रेंच लेखक स्तँदाल याच्या रोजनाम्यात (१९२३ – १९२४) निर्भय आत्मकथन आढळते तर आंद्रे झीद याच्या रोजनाम्यात (१९३९, १९४४, १९५०) एकांगीपणा व आत्मगौरव असला, तरी बेडरपणाही आहे. प्रसिद्ध इतिहासकार एडवर्ड गिबन याच्या संस्मरणिकेत (१७९६) एका स्वकार्यरत व्यक्तीचे नमुनेदार चित्र आढळते. ‘ऑटोबायग्राफ्री’ अशा सामान्य संज्ञेनेच काही उल्लेखनीय आत्मचरित्रे प्रसिद्ध झाली. त्यांचे लेखक व प्रकाशनवर्षे अशी: इंग्रज कवी ली हंट (१८५०), इंग्रज चित्रकार हेडन (१८५३), इंग्रज तत्त्वज्ञ जे. एस्. मिल (१८७३), इंग्रज कादंबरीकार अँथनी ट्रॉलप (१८८३), उत्क्रांतिवादाचा प्रसिद्ध जनक चार्ल्‌स डार्विन (१८८७) आणि तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर (१९०४). जर्मन महाकवी गटे याच्या चार खंडांतील आत्मचरित्रात (१८११, १८१२, १८१४, १८३३, इं. शी. पोएट्री अँड ट्रूथ फ्रॉम माय ओन लाइफ) एका  श्रेष्ठ प्रतिभावंताने काव्यात्म दृष्टीने केलेली आत्मजीवनाची अभिव्यक्ती आढळते. इटालियन नाटककार कार्लो गोत्सी याचे संस्मरणिकेवजा आत्मचरित्र (१७९७) रसभरित आहे. रशियन क्रांतिकारक क्रपॉट्‌क्यिन याच्याही संस्मरणिकेत (इं. भा. मेम्वार्स ऑफ ए रेव्होल्यूशनिस्ट, १८९९) त्याच्या क्रांतिकारक जीवनाचे नाट्यपूर्ण चित्रण आढळते. प्रसिद्ध रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की याचे आत्मचरित्र  ‘माझे बालपण’, ‘या जगात’ व ‘माझी विद्यापीठे’ अशा अर्थाच्या शीर्षकांखाली तीन खंडांतून प्रसिद्ध झाले आहे (१९१३, १९१५, १९२३). जागतिक आत्मचरित्रांत गॉर्कीच्या या ग्रंथांना फार मोठे स्थान आहे. पहिल्या महायुद्धानंतर युद्धविषयक अनुभवांची अनेक स्मृतिचित्रे पश्चिमी वाङ्‍मयात निर्माण झाली. या प्रकारातील रॉबर्ट ग्रेव्ह्‌ज या इंग्रज कवीचे व कादंबरीकाराचे गुड बाय टू ऑल दॅट (१९२९) हे आत्मकथन उल्लेखनीय आहे. याशिवाय विख्यात ब्रिटिश मुत्सद्दी चर्चिल यांचे आत्मवृत्त (माय अर्ली लाइफ, १९३०) चित्तवेधक आहे.ॲडॉल्फ हिटलर याचे दोन खंडांतील आत्मकथन (Mein kampf, १९२५, १९२७, इं. भा. माय बॅटल, १९३३) निश्चितच वाचनीय आहे. आर्थर केस्टलरच्या संस्मरणिकेवजा आत्मकथनाचे चार खंड प्रसिद्ध असून, त्यांपैकी ॲरो इन् द ब्‍लू (१९५२) यासारख्या ग्रंथातून कम्युनिस्ट सत्तेच्या उक्तिकृतिसंबंधीचा भ्रमनिरास आढळून येतो. सापेक्षतावादाचा जनक ॲल्बर्ट आइन्स्टाइन याचा द वर्ल्ड ज आय सी इट (१९३४) हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख करून देतो. विसाव्या शतकातील संवेदनक्षम मनाचे स्पंदन स्टीव्हन स्पेंडर या इंग्रज कवीच्या आत्मचरित्रात दिसते (वर्ल्ड विदिन वर्ल्ड, १९५१). बर्ट्रंड रसेलचे आत्मचरित्र (१९६७) म्हणजे या शतकातील एका श्रेष्ठ विवेकवाद्याचे रोमहर्षक व विचारप्रवर्तक आत्मकथन होय.


जागतिक आत्मचरित्रपर वाङ्‍मयात ज्यांना निर्विवादपणे उच्च स्थान आहे, असे भारतीय साहित्य म्हणजे महात्मा गांधींचे ‘सत्याचे प्रयोग’ (१९२७-१९२९) आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ‘आत्मकथन’ (१९३६) हे होय. 

प्राचीन मराठीतील त्रोटक, प्रासंगिक व नोंदीवजा आत्मकथन नामदेव-तुकारामादी संतांच्या काव्यात व अन्य काव्यग्रंथांच्या उपोद्‍घात-उपसंहारांत आढळते. तुकारामाचे अभंग म्हणजे एक प्रकारचे त्याचे आध्यात्मिक आत्मचरित्र होय. बहिणाबाई, कचेश्वर व निरंजन रघुनाथ यांसारख्यांच्या स्वतंत्र, प्रांजळ व भावोत्कट आत्मकथा काहीशा विस्तृत आहेत. वाङ्‍मयीन व ऐतिहासिक महत्त्व असलेली गद्य आत्मचरित्रे नाना फडणीस, गंगाधरशास्त्री पटवर्धन व बापू कान्हो खांडेकर यांनी उत्तर पेशवाईत लिहिली. अव्वल इंग्रजी कालखंडात नोंदीवजा आत्मकथन विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांच्या वेदोक्त धर्मप्रकाशात (१८५९ – २५ वे प्रकरण) आढळते. वासुदेव बळवंतांच्या कैफियतीत (१८७९) त्यांची संक्षिप्त जीवनकहाणी आहे. दादोबा पांडुरंगांचे आत्मचरित्र (१८८२) व बाबा पदमनजींचे अरुणोदय (१८८८) ही या कालखंडातील दोन उल्लेखनीय आत्मचरित्रे होत. यांपैकी दादोबांचे आत्मचरित्र सामाजिक दर्शनाच्या दृष्टीने व बाबा पदमनजींचे आत्मचरित्र धर्मांतरविषयक मानसचित्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संपूर्ण चरित्रदर्शनाच्या दृष्टीने उपर्युक्त सर्व आत्मचरित्रांत न्यूनता जाणवते. 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वि. दा. सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे भाषांतर केले (१९०७). राजकीय जागृती करण्याचा हेतू त्यामागे होता. माझी जन्मठेप (१९२७) वशत्रूच्या शिबिरात (१९६५) हे सावरकरांचे लेखन संस्मरणिकेवजा आहे. त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला खंड १९४९ त प्रसिद्ध झाला. प्रेरकता हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होय. राजकारणी

व्यक्तींच्या आत्मचरित्रांत न. वि. गाडगिळांच्या दोन खंडांतील पथिकाला (१९६४, १९६५) विशेष महत्त्व आहे. 

सामाजिक उद्‍बोधनाच्या हेतूने धोंडो केशव कर्वे यांनी आपले आत्मवृत्त लिहिले (१९१५). अशाच हेतूने लिहिलेल्या आत्मचरित्रांपैकी सी. ग. देवधरांचे जीवनवृत्तांत (१९२७) व श्री. म. माट्यांचे चित्रपट – मी व मला दिसलेले जग (१९५७) ही आत्मचरित्रे उद्‍बोधक आहेत. याच संदर्भात पार्वतीबाई आठवल्यांची माझी कहाणी (१९२८) उल्लेखनीय ठरते. स्मृतिचित्रे या लेखनप्रकारातच अंतर्भूत होणारी लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे (४ भाग, १९३४-१९३६) मराठी आत्मचरित्रपर साहित्याचे भूषण मानली जातात. न. चिं. केळकरांच्या गतगोष्टी (१९३९) संस्मरणिकेवजा आहेत. मराठी साहित्यिकांच्या आत्मचरित्रांपैकी ल. रा. पांगारकर (चरित्रचंद्र, १९३८), श्री. कृ. कोल्हटकर (आत्मवृत्त, १९३५), ना. गो. चापेकर (जीवनकथा, १९४३), वि. द. घाटे (दिवस असे होते, १९६१), प्र. के. अत्रे (कऱ्हेचे पाणी, ५ खंड, १९६३-१९६८) व ना. सी. फडके (माझं जीवन – एक कादंबरी, १९६९) यांची आत्मचरित्रे विशेष प्रसिद्ध आहेत. या साहित्यिकांच्या आत्मचरित्रांत बहुधा स्वतःच्या विशिष्ट प्रतिमा पूर्वनिश्चित करून आत्मकथन केल्यासारखे वाटते. निर्भयपणे जीवनविषयक सत्यांचे आणि स्वतःचे अवलोकन आणि प्रतिपादन करण्याचा निर्धार त्यांत आढळत नाही मात्र मराठी आत्मचरित्रलेखन शैलीसुंदर करण्याचे श्रेय साहित्यिकांच्या उपर्युक्त आत्मचरित्रांना द्यावे लागेल. ग. त्र्यं. माडखोलकरांची दोन तपे (१९४६)व एका निर्वासिताची कहाणी (१९४९) ही पुस्तके संस्मरणिकेवजा आहेत. 

रंगभूमी, ललितकला व क्रीडा या क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींनीही आत्मचरित्रपर लेखन केले आहे. हे लेखन आत्मचरित्र व संस्मरणिका अशा दोन्ही प्रकारांच्या सीमारेषेवरील आहे. गणपतराव बोडसांचे माझी भूमिका (१९४०), गायनाचार्य गोविंदराव देसायांचे गोविंदाची गुजगोष्ट (१९४४), सुविख्यात क्रिकेटपटू पी. विठ्ठल यांचे माझे क्रीडाजीवन (१९४८), गो. स. टेंबे यांचे माझा जीवनविहार (१९४८), चिंतामणराव कोल्हटकरांचे बहुरूपी (१९५७), बाबुराव पेंढारकरांचे चित्र आणि चरित्र (१९६१), नानासाहेब फाटकांचे मुखवट्यांचे जग (१९६४) आणि नानासाहेब चापेकरांचे स्मृतिधन (१९६६) इ. ग्रंथ उल्लेखनीय आहेत. त्या त्या क्षेत्रांचा इतिहास व त्यांतील अन्य महत्त्वाच्या व्यक्तींविषयी उद्‍बोधक माहितीही यांत अंतर्भूत होते. उपर्युक्त ग्रंथांपैकी बहुरूपी व माझा जीवनविहार ही विशेष गुणसंपन्न आहेत.

कृ. पां. कुलकर्ण्यांचे कृष्णाकाठची माती (१९६१), मा. दा. अळतेकरांचे उलटलेली पाने (१९६१), वा. गो. मायदेवांचे वेचलेले क्षण (१९६२) व के. ना. वाटव्यांचे माझी वाटचाल (१९६४) ही प्राध्यापकांची आत्मचरित्रे होत. शिक्षकी जीवनातील अनुभव व शैक्षणिक क्षेत्रातील माहिती सांगणारी आत्मचरित्रे ना. म. पटवर्धन (विरंगुळा, १९६०), कृ. भा. बाबर (एका शिक्षकाची आत्मकथा, १९६२) व ना. वि. पाटणकर (समाधान, १९६३) यांनी लिहिलेली आहेत. यांखेरीज धर्मानंद कोसंबींचे निवेदन (१९२४), नानासाहेब शिंद्यांचे एका शिपायाचे आत्मवृत्त (१९३५), ल. बा. चितळ्यांचे मी दारुड्या कसा झालो ? (१९३५), कॅप्‍टन चाफेकरांचे चाळिशीच्या चष्म्यातून (१९४९) व गं. नी. गोखल्यांचे माझे आयुष्याचा चित्रपट (१९५०), रा. रं. पैंगीणकर यांचे मी कोण(१९६९), सेतुमाधवराव पगडी यांचे जीवनसेतु (१९६९) अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या आत्मकथा आहेत. हंसा वाडकरांचे संस्मरणिकेवजा असलेले सांगत्ये ऐका  व आनंद साधलेलिखितमातीची चूल  यांसारखे उल्लेखनीय आत्मचरित्रपर लेखन १९७० साली प्रकाशित झाले आहे. विषय व लेखनतंत्र या बाबतींत मराठी आत्मचरित्रपर साहित्य प्रगत झाले असले, तरी ते प्राधान्याने वर्णनपर वाटते. ‘सत्यअसत्यासी मन केले ग्वाही’ हा दृष्टिकोन त्यात कमी आढळतो आणि आपल्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा वेधही त्यात अल्पांशानेच घेतलेला दिसतो.

पहा: दैनंदिनी संस्मरणिका.

जाधव, रा. ग.