रीशल्य, आर्मांझां द्यू प्लेसी : (९ सप्टेंबर १५८५−४ डिसेंबर १६४२). फ्रान्सचा सतराव्या शतकातील एक थोर मुत्सद्दी व पंतप्रधान (कार. १६२४−४२). त्याने आपल्या कारकीरर्दीत फ्रान्सच्या राजाची अधिसत्ता दृढतर करून राष्ट्रराज्याची निर्मिती केली तसेच फ्रान्समधील सरंजामदार वर्ग, राजेशाही आणि कॅथलिक धर्मपंथ यांमध्ये राजकीय समन्वय साधला.

त्याचा जन्म धार्मिक परंपरा असेलेल्या मध्यमवर्गीय कुंटुंबात झाला. बालवयातच त्याला अनेक आजारांना तोंड द्यावे लागले व अनेक व्याधींनी आयुष्यभर त्याची साथ केली. सुरुवातीचे शिक्षण त्याने घरीच घेतले. नंतर तो पॅरिसच्या कॉलेज द नॅव्हेरेमध्ये पुढील अध्ययनासाठी गेला परंतु त्याच्या भावाने बिशप होण्यास नकार दिल्यामुळे तो धार्मिक पाठशाळेत रुजू झाला आणि १६०६ मध्ये त्याला ल्यूसोंचा बिशप म्हणून दीक्षा मिळाली. चर्चचा सुधारणावादी पाद्री म्हणून त्याचा नावलौकिक वाढला. त्यातून स्टेट्‌स जनरलसाठी त्याची निवड झाली (१६१४). तेराव्या लूईच्या आईने त्याला दानाध्यक्ष नेमले (१६१६). यामुळे राजघराण्याशी विशेषतः राजमातेशी त्याचे संबंध दृढ झाले आणि त्याला राज्याच्या तत्कालीन मंत्रिमंडळात स्थान मिळाले परंतु राजवाड्यातील काही घटनांमुळे नाराज होऊन राजाने त्याला हद्दपार केले (१६१८). त्याला ॲव्हिन्यों येथे हद्दपारीत काही दिवस कंठावे लागले.

ॲव्हिन्यों येथे कॅथलिक पंथातील मुख्य सूत्रांवर त्याने एक शोधनिबंध लिहिला. त्यामुळे पुन्हा राजाची त्यावर मर्जी बसली आणि त्याने त्याला परत बोलाविले आणि पंधराव्या पोपकरवी त्यास कार्डिनल बनविले (१६२२). दोन वर्षांनी राजमाता मारी द मेदीचीच्या शिफारसीनुसार लूईने त्यास फ्रान्सचा पंतप्रधान नेमले (१६२४). यूरोपात यावेळी प्रॉटेस्टंट आणि कॅथलिक या दोन पंथांत संघर्ष होता. तसेच फ्रान्समध्ये ह्यूगनॉत्सनी राजाच्या अधिकारालाच आव्हान दिले होते. त्यांनी प्रमुख शहरे काबीज करून देशांतर्गत स्वतंत्र सत्ता स्थापन केली होती. त्यांचे लष्करी सामर्थ्यही लक्षणीय होते. रीशल्यने त्यांच्या लार्शेल या बालेकिल्ल्यावर हल्ला करून त्यांचा पाडाव केला (१६२८) व त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. अंतर्गत राजकारणात त्याला सरदार वर्गापासूनही बराच उपद्रव झाला. त्याचा विरोधी सरदार माँमॉरांसीचा त्याने पराभव करून त्याल फारशीची शिक्षा दिली. सरंजामदार व सरदार यांचे अनेक दिवाणी व मुलकी अधिकार त्याने कमी केले व ते अधिकार सरकारी अधिकाऱ्यांस दिले. सरंजामदारांना त्यांच्या जाहागिरीतील किल्ले व तटबंदी पाडण्यास त्याने भाग पाडले व नवीन बांधकामास मज्जाव केला. नव्याने सुरू झालेल्या नियतकालिकांवर त्याने शासकीय धोरणास पाठिंबा देण्याची सक्ती केली परतु प्रॉस्टेस्टंटांचा कधी त्याने नाहक छळ केला नाही. परराष्ट्रीय धोरणात त्याचे मुख्य सूत्र यूरोपातील हॅप्सबर्ग घराण्याचे वर्चस्व नष्ट करून बूँर्बा घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित करणे हे होते. त्याकरिता त्याने स्पेनशी युद्ध करून बराच मुलूख मिळविला आणि ऑस्ट्रियावरही मात केली. सागरी युद्धाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याने फ्रान्सचे आरमार बळकट केले. त्याच्या या योजनाबद्ध व आक्रमक परराष्ट्र धोरणामुळे यूरोरच्या राजकारणावर फ्रान्सचे वर्चस्व प्रस्थापित झाले. वेस्टफेल्याच्या तहाचा (१६४८) मसुदासुद्धा त्याने मरणापूर्वीच तयार केला होता.

तेरावा लूई प्रत्यक्षात रीशल्यचा तिरस्कार करीत असे परंतु मारी द मेदीचीच्या वर्चस्वामुळे तो अनिर्बंध सत्ता उपभोगित होता आणि यासत्तेचा वापर त्याने राजाचे अनियंत्रित वर्चस्व स्थापत्यात केला. हे करताना त्याने अमाप संपत्ती मिळवली आणि तिचा उपभोगही घेतला. त्याचा स्वभाव तापट व लहरी होता. राजमातेशी त्याचे अनैतिक संबंध होते, अशी त्यावेळी वदंता होती. त्याने विपुल ग्रंथलेखन केले. राजकीय जीवनाबद्दलच्या त्याच्या आठवणी प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्याचा मॅक्झीम्स ऑफ स्टेट अँड पोलिटीकल फ्रॅगमेन्टस (इं. शी.) हा ग्रंथही मान्यता पावला.

पॅरिस येथे तो मरण पावला. फ्रान्समध्ये व यूरोपात संरजामशाहीच्या विरोधात जी वैभवसाली राजेशाही पुढे उदयास आली, तिचे बीजारोपण रीजारोपण रीशल्यने केले. राजकीय मुत्सद्दी म्हणून तो क्लेमेन्स मेटरनिख, ऑटोफोन विस्मार्क व कामील्लो काव्हूर वगैरेंचा पूर्वसूरी ठरला.

संदर्भ : 1. Burckhardt, Carl J. Richelieu and His Age, 3 Vols., Harcourt, 1972.

2. Church W. F. Richelieu and Reason of State, Princestone, 1973.

3. Hill, H. B. Trans. The political Testament of Cardinal Richelieu, New York, 1961.

4. Wedgwood. Cicely V. Richelieu &amp the French Monarchy, London, 1950.

चौसाळकर, अशोक