इक्ष्वाकु : एका प्राचीन भारतीय राजाचे व राजवंशाचे नाव. भारताच्या ऐतिहासिक परंपरेनुसार इक्ष्वाकु हा वैवस्वत मनूचा पुत्र होय. भारतातील सर्वच राजघराण्यांचे मूळ मनूपर्यंत नेऊन भिडविणारा पारंपरिक इतिहास सर्वस्वी मान्य करता येण्यासारखा नाही. तथापि उत्तर भारतातील अयोध्येच्या राज्याचा कुणी एक इक्ष्वाकु नामक संस्थापक होऊन गेल्याची शक्यताही नाकारता येणार नाही. इक्ष्वाकूचा काळ ठरवायला आज कोणताही पूर्णतया विश्वासार्ह असा पुरावा उपलब्ध नाही. वैवस्वत मनूचा काळ इ. स. पू. ३११० असा मानण्याची एक परंपरा आहे. परंतु त्याबाबत विद्वानांत मतैक्य नाही. इक्ष्वाकुपासून सुमित्रापर्यंत (इ. स. पू. पाचवे शतक) अयोध्येवर राज्य करणाऱ्या सु. १२५ राजांची कालक्रमानुसारी यादी पुराणग्रंथांतून आलेली आहे. एका पुराणातील यादी दुसऱ्या पुराणाशी जुळत नाही व रामायणातील यादी कोणत्याही पुराणाशी जमणारी नाही. तथापि पारंपारिक इतिहास आणि त्याच्या अनुषंगाने इतर धार्मिक साहित्यांतून आलेले उल्लेख यांवरून इक्ष्वाकुवंशीयांनी अयोध्येवर दीर्घकाळ राज्य केले, ह्याविषयी फारशी शंका राहू नये. ह्या वंशात इक्ष्वाकुखेरीज हरिश्चंद्र, सगर, भगीरथ, रघू, राम असे कितीतरी विख्यात राजे होऊन गेले. भारतीय युद्धाच्या वेळचा इक्ष्वाकुवंशीय राजा बृहद्‌बल हा कौरवांच्या बाजूने लढला, हे लक्षात घेण्यासारखे आहे. तो अर्जुनपुत्र अभिमन्यूकडून मारला गेला. ह्याच राजवंशातील बहुधा १२००–१००० इ. स. पू. ह्या दरम्यान होऊन गेलेला राम, हा तर देवत्व पावून हिंदुमनात कायमचे घर करून राहिला आहे. 

पुढील काळात इक्ष्वाकुनामक एका राजवंशाने आंध्रमध्ये कृष्णागुंतूर प्रदेशात राज्य केले. ह्या इक्ष्वाकुवंशाचा पारंपरिक इतिहासातील इक्ष्वाकूंशी निश्चित संबंध काय होता, हे समजण्यास आज कोणतेही साधन उपलब्ध नाही. तथापि वाङ्‌मयीन व विशेष महत्त्वाचे म्हणजे शिलालेखीय पुरावे मिळत असल्यामुळे ह्या आंध्रदेशीय इक्ष्वाकूंचे ऐतिहासिकत्व निर्विवाद आहे. ह्या घराण्याचा संस्थापक शांतमूल हा मुळात सातवाहनांचा मांडलिक होता. तिसऱ्या शतकात सातवाहनांची अधिसत्ता झुगारून ह्याने स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि अश्वमेध यज्ञाच्या द्वारे त्याचा पुकाराही केला. शांतमूलानंतर चारपाच स्वतंत्र इक्ष्वाकु राजे होऊन गेले. शांतमूल हिंदुधर्माभिमानी दिसतो. पण त्याच्यानंतरचे राजे बौद्धपंथानुयायी झाले असावेत, असे मानायला जागा आहे. ह्यांच्या काळचे अमरावती, नागार्जुनकोंडा वगैरे ठिकाणचे शिल्पकलेचे काही आविष्कार नजरेत भरण्यासारखे आहेत. नागार्जुनकोंडा खोऱ्यात विजयपुरी येथे ह्या इक्ष्वाकूंची राजधानी होती. चौथ्या शतकाच्या प्रारंभी किंवा थोडेसे त्या आधीच कांचीच्या पल्लवांनी इक्ष्वाकूंची सत्ता नामशेष केली असावी, असे दिसते. तथापि तरीही एक दुर्बल मांडलिकी राज्य ह्या स्वरूपात इक्ष्वाकु पुढे दोनतीन शतके तरी जीव धरून होते.

प्राचीन साहित्यात इक्ष्वाकु हे क्वचित स्थलनाम म्हणूनही येते. पतंजली आपल्या व्याकरण महाभाष्यात उत्तर कोसलचे नामांतर म्हणून इक्ष्वाकु हा शब्द वापरतो. जैन साहित्यात अयोध्येलाच इक्ष्वाकुभूमी म्हटलेले आहे. 

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The age of Imperial Unity. Bombay, 1960.

    2. Pargiter, F. E. Ancient Indian Historical Tradition, Varanasi, 1962.  

आठवले, सदाशिव