चार्टिस्ट चळवळ : एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील राजकीय व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इंग्लंडमधील श्रमिकांचा वर्गकलहावर आधारलेला पहिला लढा. आपल्या मागण्यांची सनद-चार्टर-सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी ही चळवळ झाल्याने हिला ‘चार्टिस्ट चळवळ’हे नाव पडले. १८३२ च्या संसदीय सुधारणांच्या कायद्याने मजुरांना मताधिकार न मिळाल्याने त्यांच्यात असंतोष वाढला. त्याच सुमारास इंग्लंडमध्ये आलेली मंदीची लाट व तदंगभूत बेकारी व रोजगाराची अशाश्वतता, जीवनावश्यक वस्तूंची चणचण, १८३४पासूनची दैन्य निवारण कायद्याच्या कडक अंमलबजावणीची गांजणूक इ. कारणांनी चार्टिस्ट चळवळीला खतपाणी मिळाले व ती फोफावली. फर्गस ओकॉनर, फ्रॅन्सिस प्लेस, विल्यम लव्हेट, स्टीफन्स्‌ आदींनी राजकीय हक्क मिळविल्याशिवाय श्रमिकांची परिस्थिती सुधारणार नाही, हा विचार फैलावला व ह्या चळवळीस खूपच जोम आला.

विल्यम लव्हेटने १८३६ मध्ये लंडन वर्किंग मेन्स असोसिएशनची स्थापना केली. १८३८ मध्ये त्याने व फ्रॅन्सिस प्लेसने जनतेची सनद प्रसिद्ध करून तीत प्रौढ मताधिकार, समान मतदार संघ, संपत्तीवर आधारित मताधिकाराची समाप्ती, संसद सभासदांना मानधन, गुप्त मतदानपद्धती व संसदेच्या वार्षिक निवडणुका ही उद्दिष्टे माडली. यावरून चार्टिस्टांची चळवळ राजकीय होती, असा भास होतो परंतु हे आंदोलन मुख्यतः आर्थिक होते. श्रमिकवर्गाने मध्यमवर्गाविरुद्ध उभारलेले आघाडी असेही या चळवळीचे स्वरूप होते. ‘बर्मिंगहॅम पोलिटिकल युनियन’चा पुढारी टॉमस ॲटवुडने सनदवाल्यांच्या मागण्या राष्ट्रीय अर्जाच्या स्वरूपात संसदेला सादर करण्याची कल्पना मांडली. यामुळे सभा, मोर्चे आदी मतप्रसाराच्या साधनांची आवश्यकता निर्माण झाली. ओकॉनर हा आयरिश पत्रकार सनदवाल्यांना मिळाला आणि त्याचे नॉर्दर्न स्टार  हे पत्र चार्टिस्टांचे मुखपत्र झाले. १८३८ हे साल प्रचंड सभा व मशाली-मिरवणुकांनी गाजले.

वेस्टमिन्स्टर पॅलेस यार्डमध्ये १८३९ च्या फेब्रुवारीत सनदवाल्यांचा राष्ट्रीय मेळावा भरून मागण्यांचा अर्ज संसदेस सादर करण्यात आला. परंतु अर्ज फेटाळला गेल्यास काय करावे, यावरून सनदवाल्यांत फूट पडून त्यांच्यात नीतिवादी चार्टिस्ट व हिंसावादी चार्टिस्ट, असे प्रमुख तट पडले. अशाच स्थितीत साडेबारा लक्ष सह्यांचा अर्ज संसदेने फेटाळून लावताच दंगेधोपे व संप ह्यांना ऊत आला. १८४२ साली केलेल्या अर्जाचीही वरीलप्रमाणेच वासलात लागल्याने नीतिवादी गटाचे वजन कमी होऊन चळवळीचीसूत्रे ओकॉनरच्या जहाल गटाकडे गेली. परंतु त्यांनी पुरस्कारलेला सार्वत्रिक संप बारगळला. त्यांनी केलेले गुप्त लष्करी संघटनेचे प्रयत्नही मोडून काढण्यात आले. त्यामुळे साहजिकच या चळवळीला उतरती कळा लागली.

अनेक यूरोपीय देशांत १८४८ मध्ये क्रांत्या झाल्या. तेव्हा यूरोपातील प्रक्षोभक वातावरणाने इंग्लंडमध्येही क्रांती सुलभ होईल, या विचाराने चार्टिस्ट आंदोलनाला जोर चढला. पुन्हा एकदा संसदेला मागण्यांचा अर्ज सादर करण्याचे चार्टिस्टांनी ठरविले. पाच लक्ष निदर्शकांनी केनिंग्टन मैदानापासून संसदगृहापर्यंत मोर्चा काढून पन्नास लक्ष सह्यांचा अर्ज संसदेला सादर करावा, असा बूट निघाला व त्यामुळे वातावरण तापले. प्रत्यक्षात मोर्चात पन्नास हजार निदर्शक होते. अर्जाची छाननी करता त्यात केवळ वीस लाखांच्या आसपास सह्या असून अनेक काल्पनिक व्यक्तींच्या व बनावट सह्या इतरांनी केल्याचे दिसून आले. त्यामुळे चार्टिस्टांची सर्वत्र नाचक्की झाली. याच सुमारास धान्याच्या खुल्या व्यापारास मान्यता मिळाल्याने अन्नाची स्वस्ताई, श्रमिक हितवादाच्या कल्पनांचा प्रसार, व्यापारवृद्धी, आर्थिक सुबत्ता व तदंगभूत बेकारी-निर्मूलन आदी कारणांनीही ही चळवळ थंडावली.

तरीही चार्टिस्ट चळवळीबद्दल देशात बरीचशी सहानुभूती होती व चार्टिस्टांच्या राजकीय मागण्या अयोग्य नव्हत्या. साहजिकच वार्षिक निवडणुकांची अव्यवहार्य मागणी सोडता बाकीच्या मागण्या पुढील पन्नास-पाऊणशे वर्षांत मान्य झाल्या परंतु राजकीय हक्कामुळे सामाजिक व आर्थिक सुधारणा काहीशा सुलभ होऊनही श्रमिकांची स्थिती आपोआप सुधारेल, ह्या चार्टिस्टांच्या भ्रमाचाही हळूहळू निरास झाला.

संदर्भ : 1. Briggs, Asa Ed. Chartist Studies, London, 1962.

           2. Cole, G. D. H. Chartist Portraits, London, 1941.

           3. Hammond, J. L. L. Hammond, B. B. The Age of the Chartists, Hamden, 1962

ओक, द. ह. केळकर, म. वि.