शार्लमेन : (२ एप्रिल ७४२–२८ जानेवारी ८१४). मध्ययुगीन युरोपच्या इतिहासातील एक पराक्रमी सम्राट. तो पहिला चार्ल्स, कॅरोलस मॅग्नस (लॅटिन), चर्ल्स ल ग्रांद (फ्रेंच), कार्ल डेर ग्रास (जर्मन) या नावांनीही ओळखला जातो. त्याचा जन्म एक्स ला शपेल (जर्मनी) येथे फ्रॅंक टोळीच्या कॅरोलिंजिअन वंशात तिसरा पेपिन (पेपिन द शॉर्ट) व बेर्था या दांपत्यापोटी झाला. कॅरोलस मॅग्नस या लॅटिन संज्ञेच्या शार्लमेन या अपभ्रंश रूपाने तो प्रसिद्ध आहे.

शार्लमेनपेपिनच्या मृत्यूनंतर (७६८) त्याचे राज्य शार्लमेन व कार्लोमन या दोन मुलांत विभागले गेले. कार्लोमनच्या मृत्यूनंतर (७७१) त्याची पत्नी मुलांना घेऊन लाँबार्डच्या डेसिडेरिअस राजाच्या आश्रयास गेली. तेव्हा शार्लमेनन भावाची सर्व जहागीर बळकावली. या सुमारास पोप आणि लॉंबार्डचा राजा डेसिडेरिअस यांत संघर्ष उद्‌भवला. पोपने शार्लमेनची मदत मागितली. त्याने डेसिडेरिअससह कार्लोमनची विधवा पत्नी व मुले या सर्वांना पकडून ठार मारले आणि लाँबार्डचा (इटली) राजा हे पद धारण केले. इटलीवरील त्याच्या पाच स्वाऱ्यांपैकी ही पहिली होय (७७३). यानंतर त्याने आव्हार्झ (हंगेरी), सॅक्सन (जर्मनी-ब्रिटन), मूर (स्पेन), स्लाव्ह (चेकोस्लोव्हाकिया) इ. टोळ्यांचा पराभव करून राज्यविस्तार केला. सॅक्सन या पाखंडी लोकांबरोबर सु. तीस वर्षे त्याचा लढा चालला आणि अखेरीस त्याने सॅक्सनांना ख्रिस्ती धर्म स्वीकारायाला लावला. मूर या मुस्लिम जमातीस त्याने ७७८ मध्ये नमविले. त्याचे फ्रॅंकिश साम्राज्य मध्य इटलीपासून उत्तर डेन्मार्क आणि पूर्व जर्मनीपासून अटलांटिक महासागरापर्यंत पसरले होते (८००). सुरुवातीपासून चर्चशी त्याचे मित्रत्वाचे व सहकार्याचे संबंध होते. तिसरा पोप लिओ याने शार्लमेनच्या मस्तकी सम्राटाचा मुकुट ठेवून ‘पवित्र रोमन सम्राट’ म्हणून त्यास मान्यता दिली (२५ डिसेंबर ८००). या घटनेने युरोपच्या एकतेकडे वाटचाल सुरू झाली.

शार्लमेनने भिन्न भाषिक व वांशिक समूहांनी भरलेल्या आपल्या साम्राज्याची विभागणी जिल्हानिहाय करून त्यावर सक्षम स्थानिक सरंजामदाराची अधिकारी म्हणून नियुक्ती केली. स्वतः सम्राट व त्याचे प्रतिनिधी (मिसी डोमिनिसी) अधूनमधून जिल्ह्यांना भेटी देत. साम्राज्यातील बहुसंख्या लोकांचा शेतीवरच चरितार्थ चाले. नगरे अल्प होती. जुने कायदे कालबाह्य झाल्याने शार्लमेनने सरंजामशाही व्यवस्था निर्माण करून सरदारांना जमिनी दिल्या त्याबदल्यात त्यांनी लष्करी व राजकीय सेवा द्यावी, असे ठरले. शिवाय सरंजामदारांनी आपापल्या भागांत रस्ते, पूल, तटबंदी बांधून त्यांची देखभाल करावी व शेतीला उत्तेजन द्यावे, असाही आदेश होताच. चांदीची नाणी चलनात आणून त्याने व्यापारासही प्रोत्साहन दिले. न्यायदानासाठी न्यायालये व प्रचलित कायदेकानून यांत सुधारणा केल्या. आखेन (एक्स ला शपेल) या राजधानीत त्याने प्रासाद व चर्चवास्तू उभारल्या. रोमन कमानींच्या मुक्त उपयोगामुळे रोमनेस्क वास्तुशैली विकसित झाली [⟶ रोमनेस्क वास्तुकला]. विद्वानांना त्याने आश्रय दिला. त्यांपैकी इंग्रज पंडित अँल्क्विन व इतिहासकार आइनहार्ट हे ख्यातनाम आहेत. आइनहार्ट याने लिहिलेले शार्लमेनचे चरित्र एक विश्वसनीय दस्तऐवज आहे. शार्लमेनने राजप्रासाद व चर्चमधून पाठशाला सुरू केल्या. युरोपातील उत्तम शिक्षक त्यांत होते. त्याने प्राचीन रोमन हस्तलिखितांच्या नकला करून घेतल्या. तत्कालीन प्रमाण ग्रंथभाषा लॅटिन होती. शार्लमेनला ही भाषा बोलण्या-वाचण्याएवढी अवगत होती. ख्रिस्ती धर्माचा तो कट्टर अनुयायी होता आणि चर्चच्या प्रशासनावर आपले नियंत्रण असावे, याबाबत आग्रही होता. त्यातूनच पुढे युरोपात राज्यसंस्था विरुद्ध पोपशासन हा वाद उद्‌भवला.

शार्लमेनने पहिली पत्नी डेसिडेराटा हिचा त्याग केला (७७१). त्यानंतर त्याने अनेक लग्ने केली. इ.स. ८०६ मध्ये त्याने आपले साम्राज्य तीन मुलांत वाटले मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा लूई द फेथफुल गादीवर आला. शार्लमेनच्या काळात बहुविध कला, साहित्य, शिक्षण व विशेषत: चर्च-संस्था यांना उत्तेजन मिळाले. म्हणून या काळास ‘कॅरोलिंजिअन प्रबोधनकाळ’ असेही म्हटले जाते.

पहा : फ्रान्स ( इतिहास) मध्ययुग, यूरोपीय सरंजामशाही.

संदर्भ : 1. Bullough, Donald A. The Age of Charlemagne, London, 1980. 

           2. Easton, S. C. Wieruszowski, Helene, The Era of Charlemagne : Frankish State and Society, New York, 1979. 

           3. Firchow, E. S Zeydel, E. H.  Trans. Einhard, Vira Karoli Magni : The Life of Charlemagne, Miami (Fla.). 1985. 

           4. Folz, Robert, Coronation of Charlemagne, London, 1974. 

           5. Heer, Friedrich, Charlemagne and His World, New York, 1975. 

           6. Mckitterick, Rosamond, The Frankish Kingdoms Under The Carolingians, 751-987, New York, 1983.

देशपांडे, सु. र.