फलटण संस्थान : महाराष्ट्रातील एक जुने संस्थान. क्षेत्रफळ ९३६·३२ चौ.किमी. लोकसंख्या सु. ७१,४७३ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. १५ लाख, उत्तरेस पुणे, पश्चिम-दक्षिणेस सातारा पूर्वेस सोलापूर या जिल्ह्यांनी सीमित. नीरा नदीकाठच्या या प्रदेशातील संस्थानचा मूळ पुरुष निंबराज पवार याने १२४० च्या सुमारास निंबळकजवळ वसाहत केली. त्यावरून या वंशाला निंबाळकर हे आडनाव पडले. मुहम्मद तुघलकाकडून जहागीर मिळविणारा त्याचा नातू दुसरा निंबराज नाईक (१३२६ – १३४९) याने आपले ठाणे फलटण येथे हलविले. भोसले-निंबाळकरांचे नातेसंबंध दुसऱ्या वणंगपालपासून (१५७० – १६३०) सुरू झाले होते ते तिसऱ्या मुधोजीपर्यंत (१७४८ – १७६५) टिकले. सोळाव्या शतकात संस्थान आदिलशाहीच्या आधिपत्याखाली आहे. शहाजीची आई उमा (दीपा) व शिवाजीची पहिली बायको सईबाई निश्चयाने याच घराण्यातील तथापि शहाजी-शिवाजी पितापुत्रांना निंबाळकरांविरुद्ध लढावे लागले. बजाजी निंबाळकरची धर्मांतराची कथा अविश्वसनीय वाटते. बजाजी यास अफझलखानाने हत्तीच्या पायी देण्याचे ठरविले असता शिवाजीने त्यास सोडविले. तरीही बजाजी आणि त्याचा मुलगा शिवाजीचा जावई महादजी शिवाजीच्या विरुद्धपक्षात होते. पेशव्यांच्या प्रभुत्वाखाली १७६७ मध्ये आलेले संस्थान १८१८ मध्ये पुन्हा साताऱ्याच्या १८४८ पासून इंग्रजांच्या मांडलिकीत आले. चौथे मुधोजीराव (कार.१८५३ – १९१६) व चौथे मालोजीराव नाईक (कार १९१६ – १९४८) यांच्या कारकीर्दीत शिक्षण, स्थानिक स्वराज्य, लोकोपयोगी इमारती, पाणीपुरवठा, शेती सुधारणा, बैंका, ऊस संशोधनकेंद्र (पाडेगाव), मर्यादित अधिकारांचे विधिमंडळ इ. अनेक क्षेत्रांत प्रगती झाली. संस्थानचा कारभार लोकमतानुवर्ती लोकप्रतिनिधीस जबाबदार करण्यासाठी मुधोजीरावांनी दि. ७ सप्टेंबर १९२९ रोजी कायदा करून कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ यांची स्थापना केली. मुधोजीरावांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सार्वजनिक सभा मुंबई विधिमंडळ यात, तर मालोजीरावांनी नरेंद्र मंडळात भाग घेतला. ८ मार्च १९४८ रोजी संस्थान मुंबई राज्यात विलीन झाल्यावर मालोजीराव काही काळ मुंबई राज्यात विकास मजूर मंत्री होते.

संदर्भ : १. पटवर्धन, वि. अ. संपा. संस्थानातील लोकशाहीचा लढा, पुणे, १९४०

२. पतके, कृ. के. महाराष्ट्राच्या इतिहासांत फलटण संस्थानची कामगिरी, पुणे, १९३४

३. येवले, म. अ. संपा. विकासमालोजीराजे स्मृतिविशेषांक, फलटण , १९७९.

कुलकर्णी, ना. ह.