मीनांदर : (सु. इ. स. पू. १११–९०). प्राचीन काळचा एक सुप्रसिद्ध यवन (ग्रीक) राजा. याच्याविषयी बरीच माहिती पाली ग्रंथ ⇨ मिलिंदपञ्ह (मिलिंदप्रश्न) यावरून मिळते. शाकल (पंजाबातील सियालकोट) येथील बलाढ्य यवन नृपती मिलिंद याने बौद्ध भिक्षू नागसेन याला बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान यांविषयी विचारलेले अनेक प्रश्न आणि नागसेनाने दिलेली त्यांची उत्तरे हा या ग्रंथाचा विषय आहे. हा मिलिंद म्हणजेच सुविख्यात ग्रीक राजा मीनांदर होय.

या ग्रंथात म्हटले आहे, की ‘हा मिलिंद शाकलपासून २०० योजने दूर असलेल्या अलसंद द्वीपातील कलसी या गावी जन्मला’. हे अलसंद म्हणजे हिंदी कॉकेशस पर्वताजवळ अलेक्झांडरने स्थापिलेले अलेक्झांड्रिया होय. त्याला आता चरिकर म्हणतात. ते गाव पंजशीर आणि काबूल या दोन नद्यांच्या दुआबामध्ये आहे. म्हणून त्याला द्वीप म्हटले असावे.

मीनांदर हा बॅक्ट्रियाचा राजा दिमीत्रिअस याचा समकालीन होता. दिमीत्रिअसची मुलगी अगॅथोक्लिया ही याची राणी होती, असा तर्क रॅप्सनने तत्कालीन नाण्यांच्या अभ्यासावरून प्रथम केला, तो संभवनीय वाटतो.

मीनांदर पंजाब प्रांत, वायव्य सरहद्द प्रांत (गांधार देश), त्या पलीकडील टोळीवाल्यांचा प्रदेश, सिंधचा काही भाग, उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग व काठेवाड एवढ्या प्रदेशावर राज्य करीत होता. टोळीवाल्यांच्या बाजौर प्रदेशातील शिनकोट येथे त्याचा मांडलिक वियकमित्र (वीर्यकमित्र) याचा उल्लेख असलेला करंडक मिळाला आहे. याची सु. तीस प्रकारांची चांदीची व तांब्याची नाणी काबूलपासून मथुरेपर्यंत सापडली आहेत. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता असे मिलिंदपञ्हात म्हटले आहे. त्याच्या काही नाण्यांवर त्याला घ्रमिक (धार्मिक) असे विशेषण लावले आहे. प्लूटार्क सांगतो की, मीनांदरच्या निधनानंतर त्याच्या राज्यातील अनेक शहरांनी त्याच्या अवशेषांवर हक्क सांगून त्यांची आपसांत वाटणी केली. मिलिंदपञ्हात त्याचे वर्णन शरीराने उमदा, बुद्धीने तल्लख, वादविवाद-चतुर, शूर आणि धनाढ्य असे केले आहे. प्राचीन काळच्या संस्मरणीय नृपतींमध्ये त्याची गणना होते.

संदर्भ : Majumdar, R. C. Ed. History and Culture of the Indian People, Vol. II, Bombay, 1972.

मिराशी, वा. वि.