हायली सेलॅसीहायली सेलॅसी : (२३ जुलै १८९२–२६ ऑगस्ट १९७५). इथिओपियाचा बादशहा. त्याचा जन्म परंपरागत लष्करी घराण्यात हरारजवळ झाला. त्याचे मूळ नाव रास (राजपुत्र) तफारी मॅकोनेन. बादशहा दुसरा मेनेलिकचा (१८६५–१९१३) प्रमुख सल्लागार व सेनापती रास मॅकोनेन याचा तो मुलगा. त्याचे सुरुवातीचे शिक्षण घरीच फ्रेंच मिशनऱ्यांच्या हाताखाली झाले. त्याच्या हुशारीमुळे मेनेलिकने लहान वयातच त्याला प्रथम सिडॅमी व नंतर हरार प्रांताचा राज्यपाल नेमले. त्या वेळीइथिओपियात ख्रिस्ती व इस्लामी पक्षांत वैमनस्य होते व यूरोपीय देशांचा साहजिकच ख्रिस्ती पक्षाला पाठिंबा होता. मे ने लि क च्या मृत्यूनंतर (१९१३) त्याचा नातू लिज ईयासू गादीवर आला. त्याने इस्लाम धर्माला दाखविलेली सहानुभूती व जवळीक ख्रिश्चन धर्मातील लोकांना अप्रिय होती. तेव्हा कॉप्टिकपंथी तफारीने त्यास पदच्युत केले व दुसऱ्या मे ने लि क ची राजकन्या झउदितु हिला गादीवर बसवून स्वतः रास तफारी तिचा कारभारी वपालक झाला आणि गादीचा भावीवा र स दा र ही ठरला (१९१६). इथिओपियाला राष्ट्रसंघात प्रवेश मिळवून देण्यास त्याला मोठे यश मिळाले (१९२३). नंतर त्याला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी पुष्कळ कट-कारस्थाने झाली. खुद्द सम्राज्ञी झउदितुने त्याचे वर्चस्व झुगारून देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. झउदितुच्या मृत्यूनंतर (२ नोव्हेंबर १९३०) तफारीने इथिओपियाची सर्व सत्ता हातात घेऊन हायली सेलॅसी (Might of the Trinity) हे नाव धारण केले. त्याचे शासन एकंदरीत पाश्चात्त्यांना अनुकूल व सुधारणावादी होते. गुलामगिरी नष्ट करून त्याने राज्यकारभारात अनेक सुधारणा केल्या. नदीवर पूल, रस्ते, शाळा, इस्पितळे वगैरे बांधावयास त्याने सुरुवात केली. गादीवर आल्याबरोबरच त्याने इथिओपियाला पहिले संविधान देऊन संविधानात्मक राज्यपद्धतीचा पाया रचला (१९३१). १९३५ मध्ये इथिओपियावरील इटालियन आक्रमणाच्या वेळी त्याने जातीने आपल्या सैन्याचे नेतृत्व केले व इटलीच्या पाशवी हल्ल्याचा निर्धाराने प्रतिकार केला परंतु इटलीच्या आधुनिक शस्त्रास्त्रांपुढे त्याचे काही चालले नाही. तेव्हा तो १९३६ मध्ये इंग्लंडमध्ये आश्रयास गेला. त्याने ३० जून १९३६ रोजी जिनीव्हा येथे जोरदार भाषण करून राष्ट्रसंघापुढे आपली बाजू मांडली. इटलीविरुद्ध राष्ट्रसंघाच्या सभासदांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. दुसरे महायुद्ध सुरू होताच (१९३९) हायली सेलॅसीने ब्रिटिशांच्या मदतीने हद्दपारीत असलेल्या इथिओपियन लोकांचे सैन्य सूदानमध्ये संघटित केले. नंतर जानेवारी १९४१ मध्ये ब्रिटिश व इथिओपियन सैन्यांसह इथिओपियात असलेल्या इटालियन सैन्यावर आक्रमण करून अदिस अबाबा हस्तगत केले आणि इटालियन सैन्याला इथिओपियातून हुसकावून लावले व देशाचे सम्राटपद परत मिळविले. युद्धोत्तर काळात लोकमतानुवर्ती प्रशासन स्थापन करून त्याने अनेक राजकीय व सामाजिक सुधारणाघडवून आणल्या. अदिस अबाबा येथे हायली सेलॅसी विद्यापीठ स्थापन केले. एकंदरीत इथिओपियाचे आधुनिकीकरण करण्यात त्याने पुष्कळच यश मिळविले. राजपुत्र अस्का वसानच्या नेतृत्वाखाली काही सैनिकी अधिकाऱ्यांनी बंड केले (१९६०). हायली सेलॅसीने कठोरपणे त्याचा बीमोड करून दोषी अधिकाऱ्यांना फासावर लटकाविले. त्याने आफ्रिकन राष्ट्रसंघाच्या निर्मितीत (१९६३) महत्त्वाची भूमिका बजावली तथापि दुष्काळ, बेकारी, चलनवाढ आणि लष्करातील एका विभागातील असंतोष यांमुळे भडका उडून लष्कराने सत्ता काबीज केली आणि साम्यवादी राष्ट्रांशी जवळीक साधली. हायली सेलॅसीला पदच्युत करून नजरकैदेत ठेवले (१२ सप्टेंबर १९७४).

 

अदिस अबाबा येथे त्याचे निधन झाले.

 

ओक, द. ह.