ग्रीक संस्कृती : पाश्चात्त्य संस्कृतींमधील एक प्रगत पहिली संस्कृती. या संस्कृतीची इतर अनेक संस्कृतींवर पुढे छाप पडली, असे मानतात. या संस्कृतीचा उगम ग्रीसमध्ये झाला, म्हणून या संस्कृतीला ग्रीक संस्कृती या नावाने संबोधितात. यूरोपीय आचारविचार, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, शासन-संघटना इत्यादींच्या मुळाशी ग्रीक कल्पना किंवा मूल्ये आहेत, असे साधारणपणे पाश्चात्त्य इतिहासकार मानतात. स्वाभाविकपणेच, आधुनिक युगाच्या आरंभी पाश्चात्त्य देशांत जी ज्ञानसाधना सुरू झाली, तीमध्ये ग्रीसला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यूरोपीय सुशिक्षित मनाची मजल ॲरिस्टॉटल, प्लेटो, पेरिक्लीझ, अलेक्झांडर वगैरेंपर्यंतच पोहोचत होती. तोपर्यंत ते ग्रीसच्या स्तवनातच गुंग होते. परंतु गेल्या शंभर वर्षांत झालेल्या पुरातत्त्वविषयक व इतिहासविषयक संशोधनामुळे हे चित्र काहीसे बदलले आहे. ज्या वेळी यूरोपीय संस्कृतीचे हे आद्यस्थानच बाल्यावस्थेत होते, अज्ञान आणि अनुभव यांच्या अंधःकारात चाचपडत होते, त्याच्या कितीतरी आधी निरनिराळ्या पौर्वात्य, समाजांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत आश्चर्यकारक प्रगती केली होती, हे आता स्पष्ट झाले आहे. ईजिप्त, भारत (सिंधू संस्कृती), ॲसिरिया, बॅबिलोनिया इ. प्रदेशांतील समाज कालदृष्ट्या अनुभवाने व विचाराने ग्रीसहून प्राचीन तर होताच. शासनव्यवस्था, शस्त्रास्त्रे, कला यांसारख्या बौद्धिक तसेच धर्म व तत्त्वज्ञान यांसारख्या बौद्धिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांतही या प्रत्येक संस्कृतीत निरनिराळे प्रयोग करून पाहण्यात आलेले होते. एवढेच नव्हे, तर तद्विषयक अनेक समस्यांचा उलगडाही करण्यात आलेला होता. या सर्व अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा ग्रीक समाजाला मिळाला, हे उघड आहे. इतकेच नव्हे, तर तो त्यांच्यापर्यंत कसा येऊन पोहोचला तेही दाखविता येते. क्रीट आणि इजीअन येथील समाजांनी हा वारसा ग्रीकांपर्यत आणून पोहोचविला. पुढे तेच ज्ञान ग्रीकांनी पुन्हा यूरोपात प्रसृत केले. प्राचीन पौर्वात्य संस्कृतींच्या अनुभवातून जे जे घेतले, ते ते ग्रीसद्वारे यूरोपात पोहोचले. खुद्द ग्रीक समाजाची कर्तबकारी अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक असली, तरी ग्रीक इतिहासाच्या मूल्यमापनात, प्राचीन पौर्वात्य व आधुनिक यूरोपीय अशा दोन संस्कृतींना जोडणारा दुवा म्हणून असलेले ग्रीसचे महत्त्व विसरता येत नाही. प्राचीनांची विद्या, त्यांची कला, त्यांची शास्त्रे आत्मसात करून ग्रीकांनी त्यात अनेक दिशांनी प्रगती केली. जीवनाच्या सर्व शाखांत शुद्ध तर्कवादाला महत्त्वाचे स्थान देण्याची धडपड त्यांनी केली व प्राचीनांच्या कल्पनेतही न येणाऱ्या दिशांची कवाडे खुली केली.

ग्रीक इतिहासाचा हा जरी अस्तिपक्षी भाग झाला, तरी दुसरा तितकाच महत्त्वाच भाग नास्तिपक्षी होता. ग्रीक भूमीचा इतिहास ही यादवीची रक्तलांछित काहील आहे. प्रत्येक नगराने, विशेषतः अथेन्सने, निरनिराळे कलाकार व तत्त्वज्ञ उदयास आणले हे खरे असले, तरी यांपैकी कोणापाशीच राष्ट्रीयत्वाची भावना वा ग्रीक ऐक्याची फारशी जाणीव नव्हती. आपले हितसंबंध रक्षण करण्यासाठी एकत्र येण्याऐवजी हीच नगरराज्ये वर्षानुवर्षे झगडत राहिली, एकमेकांविरुद्ध दुसऱ्या नगराची मदत घेणे, नगर-संघ स्थापन करून लढाया करणे, एवढेच नव्हे तर प्रसंगी इराणसारख्या परकीय देशांची मदत घेणे, ही कृत्ये त्यांनी केली. पुढे तर नालायक, लाचखाऊ किंवा उघड देशद्रोही म्हणून हाकलण्यात आलेले लोक आपल्याच नगराविरुद्ध परक्यांची मदत मागतात, त्याला साहाय्य करतात, असे दिसून येते. आधुनिक पाश्चात्त्य इतिहासकारांची यासंबंधीची मल्लिनाथी बाजूला ठेवली, तर उघडे सत्य दिसते ते हे की, वांशिक व भाषिक ऐक्याचा (निदानपक्षी समतेचा) पाया असूनही राष्ट्रीय ऐक्याची कोणाला किंमत वाटली नाही. हा कमालीचा स्वार्थी फुटीरपणा व आत्मलक्षी विचारपद्धती, ही ग्रीक समाजाच्या इतिहासाची काही अंगे होत.

भौगोलिक स्थिती : ग्रीक भूमीचे प्राचीन नाव हेलस. या राष्ट्रात किंवा देशात, म्हणजे प्राचीन हेलसच्या कक्षेत, खुद्द ग्रीसचे द्वीपकल्प, इजीअन समुद्रातील लहानमोठी बेटे आणि आशिया मायनरचा काही भाग (आजचा तुर्कस्तान), भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यालगतचा प्रदेश यांचा पूर्वी समावेश होत असे. यांपैकी यूरोपच्या भूमीवरील / भाग ग्रीसचा. ग्रीसचे ठोकळमानाने तीन स्वाभाविक विभाग पडतात. द्वीपकल्पाच्या साधारण मध्याला पूर्व-पश्चिम अशी रेषा ओढली, तर त्या रेषेच्या लगतचा सखल प्रदेश आणि त्याच्या उत्तरेचा काहीसा डोंगराळ प्रदेश, हा उत्तर ग्रीसमध्ये समाविष्ट होतो. यात थेसाली, ईपायरस आणि मॅसिडोनिया हे प्रदेश येतात. पैकी मॅसिडोनिया हा ग्रीसचा भाग मानत. अथेन्स किंवा स्पार्टा यांसारख्या सुधारलेल्या नगरांच्या दृष्टीने रानवटच होते. ईपायरसचा भाग डोंगराळ, अगदी रानवट नसला, तरी साधारण तसाच. फक्त थेसाली निराळा, या एकाच प्रदेशात सलग व सखल अशी शेतीला उपयुक्त जमीन पुष्कळ होती. सगळ्यात अधिक धान्योत्पादन येथे होई. वर जी काल्पनिक पूर्व-पश्चिम रेषा उल्लेखिली तेथपासून तो कॉरिंथच्या आखातापर्यंतचा प्रदेश म्हणजेच मध्य ग्रीस. यात थोड्याफार प्रमाणात शेतीस उपयुक्त अशा जमिनी उपलब्ध होत्या. त्या भागातच पुढे थीब्झ वा डेल्फाय यांसारखी नगरे अथवा पार्‌नॅर्सस पर्वत व थर्‌मॉपिलीची खिंड ही ठिकाणे प्रसिद्धीस आली. यापैकी सगळ्यांत प्रसिद्ध म्हणजे अथेन्स आणि त्याभोवतालचा ॲटिका प्रदेश होय. कॉरिंथच्या आखाताच्या दखिणेला पेलोपनीसस द्वीपकल्प आहे. या द्वीपकल्पात आर्गोलिस, कॉरिंथ, स्पार्टा, ऑलिंपिया वगैरे काही नगरे भरभराटीस आली.

याशिवाय इजीअन सागरातील यूबीआ, सिक्लाडीझ, क्रीट, रोड्झ, सॅमोथ्रेज, लेझ्बॉस वगैरे बेटांनाही ग्रीक इतिहासात महत्त्व प्राप्त झाले.

आशिया मायनरच्या म्हणजे सध्याच्या तुर्कस्तानच्या पश्चिम किनाऱ्यावर ज्या अनेक ग्रीक वसाहती स्थापन झालेल्या होत्या त्यांत सर्वांत उत्तरेकडील थ्रेस, त्याखाली आयलिसस, साधारण मध्याला आयोनिया आणि दक्षिणेस करिआ ह्या महत्त्वाच्या ठरल्या. याशिवाय, भूमध्य समुद्राच्या इतर किनाऱ्यावर, तसेच सिसिलीत किंवा आफ्रिकेच्या आणि यूरोपच्या किनाऱ्यांवर ग्रीक वसाहती स्थापन होत गेल्या.

राजकीय स्थिती : आयोनियामधील शहरे प्रामुख्याने व्यापारी केंद्रे होती तशीच इजीअन समुद्रातील बेटेही व्यापारी आणि आरमारी ठाणी होती. खरे महत्त्व होते ते यूरोपीय ग्रीसलाच. थेसालीचा प्रांत सोडला, तर इतरत्र सलग असा प्रदेश कोठेच नव्हता. ग्रीसच्या सबंध भूमीचे डोंगरांच्या अनेक रांगांनी छोटे तुकडे पाडलेले होते. आडव्या उभ्या पसरणाऱ्या या रांगांमुळे जे खोलगट भाग किंवा दऱ्या उत्पन्न झाल्या, त्या सोळा ते वीस किमी. एवढ्या लांब आणि तितक्याच रुंद होत्या. यापेक्षा विस्तृत असे प्रदेश क्वचित होते. या तुकड्यात शेती होई. ईजिप्त, बॉबिलोनिया यांसारख्या देशांच्या मानाने ग्रीस अन्नोत्पादनात दरिद्रीच होता. त्यामुळे अत्यंत परिश्रमाची व तुटपुंज्या उत्पन्नाची शेती आणि त्यापेक्षा थोडी अधिक फलदायी मेंढपाळी हा ग्रीक जीवनाचा कायमचा भाग बनला.

काही प्रमाणात निसर्गाने ही कृपणता भरून काढली होती. किनारा चांगला दंतुर असल्याने व भोवती लहानमोठी अनेक बेटे असल्याने नौकानयन शक्य होते. याच व्यवसायाकडे ग्रीक लोकांपैकी बरेच वळले.


या सर्वंकष दारिद्र्याचा परिणाम दोन दिशेनी झालेला दिसतो. पहिला, उपजीविकेसाठी स्थलांतर अथवा अन्य व्यवसाय व दुसरा, जे काही मिळत असेल, त्यात वाटा मिळविण्यासाठी धडपड. किनाऱ्यावरील आणि भोवतालच्या बेटांवरील बंदरांचा फायदा घेऊन ग्रीक लोक इतर भूमीवर वसाहतीसाठी गेले. आरंभी जाणारे वसाहतवाले तेथे शेती व मेंढपाळी हे सनातन व्यवसाय मिळविण्यासाठीच जात परंतु लवकरच आपल्या नौकानयनविषयक अनुभवांचा फायदा घेऊन त्यांनी व्यापाराला आरंभ केला. आशिया-आफ्रिका-यूरोप यांना व्यापारी दृष्टीने जोडण्याचा क्रीट व मायसीनी यांचा वारसा त्यांनी उचलला. कॉरिंथ आणि अथेन्स येथील लोक उत्तम दर्यावर्दी बनले. व्यापाराला आवश्यक म्हणून ते वसाहती निर्माण करू लागले. शिवाय केवळ भारवाहकाची भूमिका घेऊन स्वस्थ न बसता निरनिराळ्या वस्तूंच्या उत्पादनालाही काही शहरांत आरंभ झाला व पोट भरण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध झाला. हा पर्याय ज्यांनी पतकरला नाही, त्यांच्यासमोर तुटपुंजे उत्पादन, कर्जबाजारीपणा आणि शेतजमिनीच्या मालकीऐवजी मजुरीचे खडतर जिणे, हे घातचक्र खडे होते. ग्रीक नगरराज्यांत एकतंत्री अंमल व लोकशाही अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शासनव्यवस्था उत्पन्न झाल्या, त्यांचे मूळ या संघर्षातच दिसते. विशेष म्हणजे ठिकठिकाणी वेगवेगळे सुधारक उदयास आले. त्यांचे मुख्य कार्य म्हणजे कर्जे रद्द करणे आणि जमिनींची फेरवाटणी होय. आर्थिक व सामाजिक निकडींचा एकमेकींशी मेळ घालण्याचे हे प्रयत्न. असे प्रयत्न वारंवार आवश्यक बनत कारण आर्थिक स्थिती ही बव्हंशी नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून होती. राजकीय क्षेत्रात वर उल्लेखिलेल्या क्रांत्या किंवा युती सोडल्या, तरी नैसर्गिक रचनेमुळे राजकीय फुटीरपणास चालना मिळाली. एकेका दरीत वा खोलगट भागात जे लोक एकदा येऊन राहिले, त्यांचा इतरांशी जवळजवळ क्वचितच संबंध आला. कारण संबंध ठेवणे अश्यक्य नसले, तरी सुलभ नव्हते. प्रत्येकाची स्वायत्तता आणि स्वातंत्र्य यांना अमाप महत्त्व चढले. ग्रीस हे एकसंध राष्ट्र होणे अवघड होऊन बसले. वस्तुतः हे सगळे लोक वांशिक दृष्ट्या इजीअन किंवा त्यांच्याशी संबंधित अशा डोरियन जमातीचेच होते. त्यांच्या भाषा निरनिराळ्या नावांनी ओळखल्या जात असल्या आणि स्थकालपरत्वे त्यांत भिन्नताही आलेली असली, तरी त्या मुळात एकाच भाषेतून उत्पन्न झालेल्या आणि जवळच्या नात्याच्या होत्या. एओलिस, थेसाली, इथाका, ॲटिका वगैरेंत आयोनियन तर पेलोपनीससमध्ये अकेडियन या इंडो-यूरोपीय भाषा प्रचलित होत्या. रक्त व भाषा यांहून या सगळ्या लोकांचे जवळचे नाते होते. एकात्मतेला आवश्यक अशी ही अंगे आधीच अस्तित्वात येत होती. तथापि निसर्गाने दळणवळण व परस्पर संबंध कष्टप्रद करून सोडल्याने या वांशिक व भाषिक एकतेचे राजकीय एकत्मतेत रूपांतर होऊ शकले नाही. लोकशाही मार्गाने किंवा राजेशाहीच्या दंडेलीनेही हे शेवटपर्यंत शक्य झाले नाही.

अशा भूमीवर शतकानुशतके उपजीविका करून एक चिरस्मरणीय संस्कृती निर्माण करणारे हे लोक होते तरी कोण? इ.स.पू. २४oo किंवा त्याच्याही थोड्या आधी निरनिराळ्या वंशांचे पण ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे समाज उत्तरेकडून आणि पूर्वेकडून (यूरोपातून व आशियातून) येऊन स्थायिक झाले. दुसरी महत्त्वाची लाट यानंतर हजार–आठशे वर्षांनी आली. बाल्कनच्या प्रदेशातून आणि डॅन्यूब नदीच्या खोऱ्यातून हे आर्य वंशीय आणि आर्य भाषिक लोक इ.स.पू. २ooo–१८oo च्या आसपास आले. त्यांचे नाव ॲकियन. क्रीट व मायसीनी या संस्कृतींशी या लोकांचा घनिष्ठ संबंध असावा, असे मानण्यात येते. इ.स.पू. १२oo–११oo च्या सुमाराला तिसरे स्थलांतर झाले. ॲकियन लोकांना वांशिक दृष्ट्या फारसे दूरचे नसणारे डोरियन लोक ग्रीसमध्ये आले. यांच्या अनेक टोळ्या वेळोवेळी येत गेल्या. आरंभी थेसाली, नंतर मध्य ग्रीस व कॉरिंथच्या आखाताचा भाग आणि शेवटी पेलोपनीससचे द्वीपकल्प या भागांत ते क्रमाक्रमाने स्थायिक होत गेले. आरंभीचे समाज ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे होते, तर डोरियन टोळ्या लोहयुगीन संस्कृतीच्या असाव्यात, असे मानण्यास जागा आहे. या सुमाराला मायसीनीयन संस्कृतीत ऱ्हासाची, विघटनेची लक्षणे स्पष्टपणे दिसत असली, तरी तिचा प्रत्यक्ष नाश करण्याचे श्रेय – किंवा अपश्रेय – डोरियन लोकांच्या पदरात साधारणपणे बांधतात. हा सबंध कालखंड बराचसा अस्थिरतेचा असला पाहिजे. या संबंधी फारशी माहितीही उपलब्ध नाही. त्यामुळे डोरियन लोकांच्या आगमनाच्या आणि स्थिरस्थावराच्या काळाला अंधःकार युग म्हणतात. ॲकियन-डोरियन या मिश्र समाजाचा मिळून बनलेला आणि इतिहासाला ग्रीक या नावाने माहीत असणारा समाज इ.स.पू. सातव्या-आठव्या शतकांच्या सुमारास निर्माण झाला. हाच समाज पुढील इतिहासाच्या हजार वर्षांत कायम राहिला. त्यात वांशिक किंवा भाषिक बदल झाले नाहीत किंवा फारशी भरही पडली नाही. बाह्य आक्रमणांमुळे किंवा स्थलांतरामुळे या समाजाच्या रचनेत बदल झाला नाही. परंतु एकदा तयार झालेल्या या समाजात अंतर्गत कारणांमुळे बदल होत जाणे अपरिहार्य होते. त्यात वेगवेगळे स्तर व वर्ग उत्पन्न झाले. निरनिराळी नगरे व राज्ये उत्पन्न झाली. याच समाजाची वाढ होऊन पुढे वसाहती निर्माण झाल्या.

ग्रीक समाजाची प्राथमिक विभागणी तीन वर्गांत झाली होती. पहिले जमिनीचे मालक, दुसरे जमीन कसणारे शेतकरी आणि तिसरे या शेतीला व शेतकीप्रधान समाजाला आवश्यक त्या वस्तू निर्माण करणारे कारागीर. बहुतेक शेतकरी हे आरंभी तरी त्या त्या शेतांचे मालक असत. कालांतराने छोट्या स्वतंत्र शेतमालकांचा वर्ग लुप्त होत गेला. जमिनींची मालकी काही बड्या जहागीरदारांमुळे आली आणि बव्हंशी लोक त्यांच्या शेतावर खंडाने किंवा मोलमजुरीने काम करू लागले. जसजशी लोकसंख्या वाढू लागली, तसतशी ही अर्थव्यवस्था अपुरी पडू लागली. दारिद्र्याने गांजलेले शेतकरी आणि त्यांच्या बरोबर महत्त्वाकांक्षी जमीनदार, या जाचातून बाहेर पडण्यासाठी किंवा अधिक संपन्न होण्यासाठी ग्रीक भूमीच्या बाहेर पडू लागले. भूमध्य समुद्राच्या भोवताली असलेल्या सर्व प्रदेशात ग्रीकांच्या वसाहती स्थापन होऊ लागल्या. आपल्या सारखेच हवामान असलेल्या प्रदेशात त्यांनी प्रथम स्थायिक व्हावे हे स्वाभाविकच होते. प्रत्येक वसाहत प्रामुख्याने शेतकऱ्यांचीच होती.

नौकानयनात पारंगत झालेल्या अथेन्सच्या व कॉरिंथच्या तांडेलांना भूमध्य सागरातील व्यापार ताब्यात आणता आला. व्यापाराला जरूर तेथे त्यांनी ठाणी किंवा वखारी वसविल्या. वसाहतवाल्यांचा मुख्य भूमीशी संबंध राहत असे, तो नाविक व्यापारामुळे. ग्रीसमध्ये असताना ज्या ज्या वस्तूंचा, सुखसोयींचा त्यांना परिचय झालेला होता, त्या मिळविण्यासाठी बहुतेक वेळा त्यांना परत मायदेशाकडे वळावे लागे. या सगळ्या वस्तू ग्रीसमधून आयात करण्यात येऊ लागल्या. ग्रीसमधील तयार मालाचा निर्यात व्यापार वाढू लागला. केवळ शेतकी उत्पादन, त्यासाठी जरूर ती कारागिरी यांवर अवलंबून असणाऱ्या ग्रीकांना एक पर्यायी आणि जास्त फलदायी व्यवसाय मिळाला. वसाहतींच्या पाठोपाठ त्यांच्या आसपासच्या प्रदेशातूनही ग्रीक मालास मागणी येऊ लागली. हरतऱ्हेची भांडीकुंडी व उंची कापडचोपड हे आरंभी तरी जास्त मागणी असलेले पदार्थ होते. या वाढत्या मागणीला पुरे पडता यावे यासाठी उत्पादन वाढविण्याची आणि उत्पादनाची नवी व्यवस्था अंगीकारण्याची जरूर भासावयास लागली. माल पुरवावयाचा असल्यामुळे उत्पादनाच्या काही प्रमाणित पद्धती अंमलात आणणे जरुरीचे ठरले. कारागिरांत परस्पर सहकार्य वाढत चालले. गिऱ्हाईक आणि उत्पादन यांतील प्रत्यक्ष देवघेव नाहीशी होऊन आता अडत्या किंवा मध्यस्थ आला. या सगळ्यांना कर्जे देणारे सावकार आवश्यक ठरले. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे मोठमोठ्या शहरांत व बंदरांत आता शेतकरी आणि जमीनदार यांच्याशिवाय कारागीर-व्यापारी हे नवे वर्ग उत्पन्न झाले. क्वचित व्यापारी जमीनदारांपेक्षाही जास्त संपन्न बनले. वसाहतींच्या गरजेतून व्यापार, व्यापारातून उत्पादन अशी साखळी सुरू झाल्यावर ते वाढते. उत्पादन खपविण्यासाठी नव्या बाजारपेठा शोधाव्या लागल्या. त्यासाठी वसाहती आणि वखारी निर्माण झाल्या. म्हणजे आरंभीच्या वसाहती मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या होत्या, तर आता व्यापाऱ्यांच्या व कारागिरांच्या वसाहती स्थापन होत गेल्या.


या वसाहती मुख्यत्वे समुद्राच्या पश्चिम विभागात म्हणजे स्पेनचा पूर्व किनारा, दक्षिण फ्रान्स, इटली व सिसिली आणि आफ्रिकेचा उत्तर किनारा येथे उदयास आल्या. यांतील ईपायरस, मॅसीनिया, अँटिपोलिस, टॅरँटो वगैरे अनेक स्थळे प्रसिद्ध असली, तरी ऐतिहासिक दृष्ट्या सर्वांत प्रभावी म्हणजे सिसिलीतील सिरॅक्यूझ वसाहत होय. ही पश्चिमेकडील ग्रीक वसाहतींत सर्वांत संपन्न होती. एवढेच नव्हेत, तर इटलीतील इट्रुस्कन आणि आफ्रिकेतील कार्थेज यांच्या मध्यावर ती वसल्याने व्यापारी व आरमारी दृष्ट्या तिला खास महत्त्व आले. या तीन सत्तांचा संघर्ष सुरू होण्यापूर्वी दक्षिण इटली आणि सिसिली येथली ग्रीक वसाहतवाल्यांची संख्या व त्यांचा प्रभाव इतका जबरदस्त होता, की या भागाला बृहद्ग्रीस संबोधितात. कार्थेजचे शत्रुत्व पतकरल्याने ग्रीकांना जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडून पलीकडे जाणे शक्य झाले नाही. पूर्वेकडे ग्रीक वसाहतवाले हेलेस्पाँटची सामुद्रधुनी पार करून काळ्या समुद्रात जाऊन पोहोचली. या समुद्राच्या काठावर सगळीकडे त्यांच्या वसाहती व ठाणी होती. यांत ॲपलोनिया, इलिरिया, क्रिमीया बेटावरील केर्च व थीओडोशिया अशा वसाहती असल्या, तरी सगळ्यात महत्त्वाची ठरली ती बॉस्पोरसवरील मेगारा वसाहत. ही डोरियन लोकांनी स्थापन केली आणि जवळजवळ हजार वर्षानंतर येथेच पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल झाली. ईजिप्तमध्ये नाईल नदीच्या उपमुखावर स्थापन झालेली काही नगरे ग्रीक व्यापाराची प्रमुख केंद्रे बनली.

सुरुवातीच्या वसाहतींच्या प्रसारात काही योजना दिसत नाहीत पण पुढे व्यापार हेच मुख्य उद्दिष्ट झाले. तेव्हा वसाहतींच्या जागा हेतुपूर्वक निवडल्या आणि ग्रीक नागरिकांची वस्ती करण्याचे पद्धतशीर प्रयत्न झाले. याची पुढची पायरी अथेन्सने विशेषतः पेरिक्लीझच्या अंमलात गाठली. आतापर्यंत प्रत्येक वसाहत ही स्वतंत्र होती. ज्या शहरातून बहुसंख्य वसाहतवाले आले असतील, त्या शहराच्या देवतेला ते वार्षिक नैवेद्य पाठवीत पण हा संबंध केवळ नात्याच्या स्मृतीचे चिन्ह एवढ्यापुरताच असे. मायदेशाने वा नगराने वसाहतींच्या कारभाराचे प्रत्यक्ष नियंत्रण केलेले दिसत नाही. पेरिक्लीझने मात्र अथेन्सशी एकनिष्ठ राहणाऱ्या व त्याच्या नियंत्रणाखाली येतील अशा वसाहती निर्माण करण्याचे, तसेच निरनिराळ्या बेटांवर अथेन्सचे नागरिक राहिवासी म्हणून पाठवून साम्राज्यवृद्धीचे पद्धतशीर प्रयत्न केले. डेलियन राज्यसंघ ताब्यात आणण्यासाठी त्याचा हा उपाय होता परंतु ह्यांना खऱ्या अर्थाने वसाहती म्हणता येत नाही.

अथेन्स, आर्‌गॉस, मेगारा, कॉरिंथ या शहरांनी व्यापार व वसाहती स्थापण्यात विशेष भाग घेतला. अडचणींच्या प्रसंगी मायलेकरे एकमेकांच्या साहाय्याला धावून गेलेली दिसतात. पेलोपनीशियन युद्धे यामुळेच पसरली. इ.स.पू. ५५o च्या सुमारास आधीच मंदावलेली ही वसाहतस्थापनेची प्रक्रिया जवळजवळ थांबली, असे म्हणता येते.

नगरराज्ये आणि शासनसंघटना : ग्रीक नगरराज्यांमध्ये लोकशाहीस काही अंशी पूरक असे प्रयोग झाले. ग्रीससमोर जे प्रश्न व समस्या उभ्या होत्या, तशाच समस्या इतरही प्राचीन संस्कृतींसमोर उभ्या राहिल्या असतील व कमीअधिक प्रमाणात यशस्वीपणे त्यांची उकलही केलेली असेल. पण ग्रीसमध्ये ज्या घडामोडी झाल्या त्या विस्ताराने नोंदविणारे इतिहासकार तेथे झाले, त्यांचे ग्रंथ आधुनिक काळापर्यंत येऊन पोहोचले आणि आधुनिक यूरोपच्या राजकीय व शासकीय पुनर्घटनेत ग्रीकांच्या वेगवेगळ्या कल्पना व तत्त्वे वापरण्यात आली, निदान तशी सोयीस्कर समजूत करून घेतली व दिली. म्हणून या नगरराज्यांना अधिक महत्त्व देतात. नगरराज्यांचे सामान्य स्वरूप असे होते : एखाद्या नदीच्या काठावर (स्पार्टा), खाडीच्या तोंडावर (कॉरिंथ) किंवा सुरक्षित डोंगरकपारीच्या आश्रयाला (अथेन्स) लहानमोठी खेडी ॲकियन आणि डोरियन लोकांनी वसविली होती. अर्थोत्पादनाला आणि रक्षणाला सोयीचे व्हावे, म्हणून मोठाले जमीनदार, जहागीरदार, व्यापारी एकत्र राहू लागले. खेड्यांचे रूपांतर शहरात झाले. काही खेडी आकाराने वाढत गेली, तर पुष्कळदा अगदी जवळची खेडी एकत्र येऊन वैशिष्ट्यपूर्ण अशी ग्रीक नगरराज्ये उत्पन्न झाली.

यांची रचना साधारणपणे सारखीच असे. एका भागात नेहमीची लोकवस्ती आणि दुसऱ्यात संकटाच्या वेळी नागरिकांना संरक्षण देणारा किल्ला, यातच ग्रामदेवतेचे मंदिर असे, याला अक्रॉपलिस असे नाव असे. पुढे पुढे लोकशाहीचे प्रस्थ वाढू लागल्यावर प्रत्येक ग्रीक नगरात काही गोष्टी हमखास दिसू लागल्या. गावाच्या मधल्या चौकाला ॲगोरा म्हणत. हे नागरी प्रशासनाचे केंद्रस्थान असे. प्रशासकाचे निवासस्थान, विधिमंडळाचे सभागृह आणि शासनातील इतर नोकरवर्गांची घरे या चौकाच्या आसपासच असत. समोरच्याच बाजूला व्यापारी पेढ्या व गुदामे असत. काही कारखाने असल्यास ते गावाच्या बाह्य परिसरात असत. स्पार्टाकडे ७,७७o चौ.किमी. तर अथेन्सकडे २,५९o चौ.किमी. थीब्झकडे १,o४o चौ.किमी. तर कॉरिंथकडे ९१o चौ.किमी., असा भूप्रदेश होता. याच प्रदेशातून धान्यपुरवठा होई व इथलेच जहागीरदार नगरात एकत्र आलेले असत.

प्रत्येक नगरराज्याच्या घटनात्मक प्रगतीचे मूलप्रवाह आणि प्रातिनिधिक स्वरूप पाहिले असता असे दिसते की, या शहारांचे नागरिकत्व काही थोड्या लोकांपुरतेच मर्यादित होते. नागरिकत्व याचा अर्थ नगराच्या प्रशासनात भाग घेण्याचा अधिकार. स्थलकालपरत्वे हा अधिकार कोणास असावा, म्हणजेच नागरिक कोणास म्हणावे, याच्या व्याख्या बदलत गेल्या, तरी एखाद्या विशिष्ट जमातीच्या किंवा काही ठराविक आर्थिक पातळी गाठलेल्या लोकांनाच हा हक्क मिळत राहिला. आजसारखे सर्व सज्ञान लोकांचे राज्य तेथे कधीही नव्हते. ऐतिहासिक काळाला आरंभ झाला, तेव्हा सगळ्याच नगरांत राजसत्ता प्रतिष्ठित होती. जुन्या जमीनदारांपैकी ज्येष्ठ अशा एखाद्या कुळात राजसत्ता वंशपरंपरेने चालत असे. इतर जमीनदारांना सल्ला देण्याची मुभा असली, तरी हक्क नव्हता. नगरांमध्ये केवळ शेतकी, अर्थव्यवस्थाच अंमलात होती, तोवर ही व्यवस्था टिकली. पण वसाहती, व्यापार व उत्पादन यांतून अर्थोत्पादन व्हावयास लागल्यावर एक नवीनच असा संपन्न वर्ग निर्माण झाला. आपल्या हितसंबंधांच्या जपणुकीसाठी आपापल्या प्रशासनात काही सत्ता असणे त्यांना आवश्यक वाटू लागले. इ.स.पू. सहाव्या शतकामध्ये संबंध ग्रीसभर जिकडेतिकडे एकतंत्री शासनाची स्थापना झाली. जुन्या शेतकी अर्थव्यवस्थेचे राखणदार राजे व राजसत्ता या त्यात प्रथम बळी पडल्या. त्याऐवजी ठिकठिकाणी हुकूमशहा सत्ताधारी झाले. आपापल्या वर्गाचे हितसंबंध त्यांनी तरतुदीने सांभाळले. परंतु इतर सर्व क्रांत्यांत नेहमी जी गोष्ट घडते, तीच याही वेळी अनुभवाला आली. हुकूमशाहीत अभिप्रेत अशी दंडेली, मोठाल्या बदलास आवश्यक अशी काहीशी हट्टी एकाग्रता या प्रस्थापित संस्था नष्ट करण्यास उपयुक्त ठरतात. परंतु त्यातला अस्तिपक्षी, पुनर्घटनेचा जो भाग असतो, तो मोडतोडीचा जोर संपल्यावरच शक्य होतो. बहुतेक हुकूमशहांनी आपापल्या नगराला त्यांच्या मताने जास्त लोकाभिमुख राज्यघटना व विधिनियमावली दिली पण साधारण दोन ते तीन पिढ्यांनंतर एकतेचा अंमल नष्ट होऊन लोकशाही स्थापन केली. ग्रीसच्या अत्युच्च वैभवाचा काळ एकतंत्री शासनाच्या परंतु मुख्यत्वे लोकशाहीच्या अंमलातच आला.


जवळजवळ प्रत्येक नगरराज्यात, जमीनदारी सत्ता व व्यापारीउत्पादक यांचा नवा मार्ग यांत स्पर्धा उत्पन्न झाली. कधी शांततापूर्ण मार्गाने तर कधी रक्तपात होऊन राज्यघटना बदलण्यात आल्या. संपन्नांचे हिताहित बदलत जाईल तसतशा घटना बदलण्यात आल्या. अथेन्समध्ये तर असे फेरबदल कित्येक वेळा घडले. फक्त स्पार्टात असे फेरबदल कमी झाले. कारण फेरबदलास आवश्यक ते सामाजिक व आर्थिक बदल होऊच नयेत अशी खबरदारी घेण्यात आली होती. समाजशासनाचा हा एक मूलगामी प्रयोग होता. स्पार्टाच्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीने तो यशस्वी करणे सुलभ झाले. सत्ता कायम राहिली, तरी स्पार्टन समाजाचा बौद्धिक व सांस्कृतिक परिपोष कधीही होऊ शकला नाही. ही व्यवस्था जरी होण्याच्या आधीच्या काळातील कवी-कलाकार-पंडित आता लुप्त झाले. ही स्थैर्याची किंमत होती व स्पार्टाने ती दिली.

आपल्यापुरती जमीनदारी सत्ता टिकवून धरण्यात स्पार्टाने यश मिळविलेच, परंतु सबंध पेलापनीससमध्ये कोठल्याही महत्त्वाच्या नगरात शेतकरी-जमीनदारी सत्ता नष्ट होऊन व्यापारी-सत्ता येण्याचा संभव दिसताच लष्करी हस्तक्षेप करून जमीनदारी स्थिरपद करणे, हे स्पार्टाने आपले कर्तव्य मानले. खुद्द कॉरिंथमध्येही लष्करी हस्तक्षेप करण्यास स्पार्टाच्या शासकांनी मागेपुढे पाहिले नाही. स्पार्टाप्रमाणेच कॉरिंथमध्येही डोरियन जमीनदारांनी आरंभीच्या काळात राजसत्ता स्वीकारलेली होती. परंतु वंशपरंपरेने आलेली राजसत्ता लवकरच नाहीशी होऊन तेथे जहागीरदारांची सत्ता अस्तित्वात आली. या जहागीरदारांचे नेतृत्व एका विशिष्ट घराण्याकडे होते आणि कालांतराने हे नेतृत्व म्हणजे या घराण्याची मिरासदारीच बनली. म्हणून पुन्हा एकदा क्रांति-प्रतिक्रांती होऊन नवी घटना निर्माण झाली. इ.स.पू. पाचव्या शतकाच्या मध्याला या राज्यघटनेचे जे स्वरूप दिसते ते थोडक्यात असे : इतर ठिकाणांप्रमाणेच नागरिकत्व फक्त स्वतंत्र व साधारण संपन्न पुरुषांपुरतेच मर्यादित होते. यापूर्वी सर्व निवड व्हावयाची ती जमातींवर आधारलेल्या मतदारसंघातून. कुटुंबाने किंवा जमातीने आपापले प्रतिनिधी निवडून द्यावयाचे. याचाच अर्थ सत्ता वंशपरंपरेने चालत असे. जमीनदारी सत्तेला पोषक अशीच ही व्यवस्था होती. वंशपरंपरेने चालत येणाऱ्या जहागिऱ्या किंवा कुटुंब यांचे वर्चस्व नष्ट करणे जरूर होते. यासाठी भौगोलिक म्हणजे पेठावारी मतदारसंघ तयार करण्यात आले. या मतदारसंघात सर्व व्यवसायांतील नागरिक असत. अशा आठ पेठा किंवा मतदारसंघ होते. यांचे प्रत्येकी दहा मिळून ऐंशी सभासदांचे सल्लागार-मंडळ बनविण्यात येई आणि प्रत्येकी एक प्रतिनिधी निवडून आठ जणांचे कारभारी-मंडळ तयार होई. सल्लागारांचे निर्णय कार्यवाहीत आणण्याचे तसेच राज्याचा शासकीय कारभार पाहण्याचे काम कारभारी-मंडळाकडे असे.

स्पार्टा किंवा कॉरिंथ यांच्यापेक्षा अथेन्समध्ये झालेले घटनाविषयक प्रयोग जसे जास्त वैविध्यपूर्ण तसेच तेथील ज्ञात इतिहासाची कालमर्यादाही अधिक प्राचीन. इ.स.पू. १o६ मध्ये डोरियन आक्रमकांशी लढताना कॉड्रस राजा रणांगणावर पडला. त्याच्याबरोबर राज्यसत्तेचेही पतन झाले. बखरकार असे सांगतात की, या राजाच्या प्रचंड गुणवत्तेची त्याच्या सरदार-दरकदारांना इतकी खात्री पटलेली होती की, त्याच्या मृत्यूनंतर त्यांनी असे ठरवून टाकले की, त्याचा वारस होण्याच्या लायकीचा एकही पुरुष अथेन्समध्ये नाही. कॉड्रसच्या मोठेपणाचा अथेन्सला झालेला फायदा म्हणजे, तो स्वतःबरोबर वंशपरंपरागत राजपदही घेऊन गेला. प्रशासक हा कालगणक असे, कायदे-कानूंची तो नोंद ठेवी. सहा जणांच्याकडे नवे विधिनियम करण्याचे या वेळी काम होते. यांना मार्गदर्शन आमसभेचे असे. निवृत्त प्रशासकांना आमसभेत आपोआपच सभासदत्व प्राप्त होई. या सर्व अधिकारपदांवर अर्थातच उच्चकुलीन पुरुषांनाच निवडण्यात येई. इतर देशांप्रमाणे येथेही कोणतेच राजकीय अधिकार नसलेले लोक नागरिकांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त होते. राजकीय दृष्ट्या अथेनियन जनतेची तीन वर्गांत विभागणी केली होती. पहिला वर्ग जहागीरदारांचा (शेतीची अवजारे, स्वतःचे घोडे, चिलखत, हत्यारे बाळगण्याची ऐपत असणाऱ्यांचा शिलेदार). दुसरा मध्यम जमीनदारांचा (यांना स्वतःच्या बैलजोड्या, नांगर इ. सांभाळणे आणि स्वतःची हत्यारे घेऊन सैन्यात दाखल होणे शक्य असे).  तिसरा सामान्य जनांचा (यांना स्वतःचा स्वतः सांभाळ करणे पुष्कळदा कठीण पडत असे). यांपैकी पहिल्या दोन वर्गांचीच, म्हणजे फक्त जमिनींच्या मालकांचीच, नागरिकांत गणना होई. राजकीय संघटनेचे आणि प्रशासनाचे दायित्व नागरिकांचेच होते. ह्या त्रैवर्गिक राजकीय विभागणीला पाया होता तो अर्थव्यवस्थेचा. जमिनीची मालकी असलेला वर्ग सर्वांत संपन्न आणि बलिष्ठ, सत्ता व संपत्ती वंशपरंपरेने उपभोगणारा असा होता. यांच्या जमिनींवर प्रत्यक्ष खपून उत्पन्न काढणारा वर्ग संख्येने सगळ्यांत मोठा पण सत्ता आणि संपत्ती यांबाबतीत सर्वात कनिष्ठ. यात काही थोड्या लोकांचे स्वतःच्या मालकीचे जमिनीचे तुकडे होते, पण बहुतेक जण जहागीरदारांच्या जमिनींवर खंडाने काम करीत. तुटपुंजे उत्पन्न, कर्ज आणि दुष्काळ या त्रिविध संकटांना जे मजूर तोंड देऊ शकत नसत, त्यांना प्रसंगी गुलामगिरीसुद्धा पतकरावी लागे. या दोन वर्गांमध्ये कारागिरांचा, उत्पादकांचा व व्यापाऱ्यांचा वर्ग प्राचीन काळपासून अस्तित्वात होता. परंतु शेतकी-समाजाच्या गरजा भागविणे हेच त्यांचे मुख्य काम आतापर्यंत होते. ते गुलाम नसले, तरी शासकही नव्हते दरिद्री नसले तरी संपन्नही नव्हते. वसाहतींची वाढ झाली आणि व्यापारात वृद्धी झाली. संपत्ती मिळविण्याचा नवा मार्ग इतर ठिकाणांप्रमाणे अथेन्समध्येही उपलब्ध झाला. कॉरिंथसारखेच येथेही, या बदलत्या आर्थिक परिस्थितीचे पडसाद राजकीय क्षेत्रातही जाणवू लागले.

राज्यसंघ : प्राचीन ग्रीकांच्या राजकीय जीवनात दोन तऱ्हेच्या संघटना दिसून येतात : एक नगरराज्ये व त्यांची शासनव्यवस्था आणि दुसरी राज्यसंघ. पहिल्यात नागरिकांचे परस्परसंबंध नियमित करण्याची व्यवस्था होती. दुसऱ्यात नगरराज्यांचे परस्परसंबंध नियमित करण्याची व्यवस्था असे. दोन्ही ठिकाणी स्पर्धा व संघर्ष हे भाग अटळ होते, तरी नगरराज्यांच्या परस्परसंबंधात त्या त्या नगरांचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यामुळे जास्त अडचणी उभ्या रहात. भौगोलिक सान्निध्य आणि आर्थिक -सामाजिक-लष्करी समस्यांमधील समान हितसंबंध यांमुळे ही नगरे ह्या अडचणी बाजूस सारून एकत्र आलेली दिसतात. ही एकी केवळ एखाद्या युद्धकाळापुरती किंवा दुष्काळासारख्या आपत्तीपुरती मर्यादित न राहता, शाश्वत स्वरूपाच्या संघाद्वारे प्रगत झाली होती. या संघांना घटना होती. परस्पर विचारविनिमयासाठी कायम स्वरूपाची सल्लागार मंडळे होती. तत्त्वतः सगळे सभासद एकाच श्रेणीचे असले, तरी व्यवहारात त्यातल्या त्यांत श्रेष्ठ सभासदांच्या विचारांना अधिक महत्त्व असे. या ज्येष्ठतेचा भागीदाराला विसर पडत नसे आणि इतर भागीदारांना विसर पडणार नाही याची खबरदारी घेत. इतिहासाला ज्ञात असे काही महत्त्वाचे राज्यसंघ पुढीलप्रमाणे :

पेलोपनीशियन संघ : हा संघ इ.स.पू. ५o५–५o४ च्या सुमारास कॉरिंथ आणि स्पार्टा यांच्या पुढाकाराने स्थापन झाला. सर्व सभासदनगरांच्या प्रतिनिधींचे सल्लागार-मंडळ यास मार्गदर्शन करी. ही नगरे एकत्र येण्याची कारणे दोन होती. पेलोपनीसस द्वीपकल्पातच ही सगळी असल्याने सगळ्यांपुढे एकाच प्रकारच्या आर्थिक व शासकीय समस्या या वेळी उभ्या होत्या. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वतनदारी शासन टिकविण्याचा होता. कॉरिंथखेरीज इतर सर्व नगरांची हीच आकांक्षा होती. कॉरिंथ हे मुख्यतः व्यापारी नगर असले, तरी दुसऱ्या तशाच प्रकारच्या नगरांशी स्पर्धा प्रत्यक्ष संघर्ष उद्‌भवले असता आपल्या शेजाऱ्यांचे सहकार्य आणि साहाय्य त्या त्या नगराच्या राजकर्त्यांना उपकारक वाटत असे. पेलोपनीसस द्वीपकल्पावरील सर्वांत बलिष्ठ वतनदारी नगर म्हणून या संघाचे नेतृत्व शेवटपर्यंत स्पार्टा या नगराकडेच होते. अथेन्सच्या लोकशाही विचारांचा प्रचार थोपविणे हे त्याचे दुसरे उद्दिष्ट होते.


हेलेनिक संघ : हा इ.स.पू. ४८१ मध्ये स्थापन झाला. इराणी सम्राटांच्या आक्रमणाला मॅसिडोनियापासून थेट पेलोपनीससपर्यंत सगळ्यांना तोंड द्यावे लागणार हे दिसू लागताच थेसालीपासून दक्षिणेच्या सगळ्या ग्रीक नगरराज्यांनी ही संघटना उभी केली. वस्तुतः पेलोपनीशियन संघाच्या रूपाने ग्रीसचा एक बराच मोठा भाग एकत्र आलेला होता. आता अथेन्सला आणि कॉरिंथ आखाताच्या उत्तरेच्या सर्वच नगरांस धोका उत्पन्न झाल्याने ती सर्व आता एकत्र आली व हेलेनिक राज्यसंघ उत्पन्न झाला. ग्रीक लोक आणि संस्कृती यांच्या ऐक्याची जाणीव दर्शविणारा आणि या ऐक्याचे रूपांतर काही दृश्य फलात झाले, म्हणून हा सर्वांत महत्त्वाचा व यशस्वी प्रयत्न होय. या संघाचे आर्थिक आणि राजकीय नेतृत्व अथेन्सकडे होते, मात्र लष्करी पुढारीपण स्पार्टाचेच मान्य झाले.

डेलियन संघ : उपर्युक्त युद्धांतून उद्‌भवणाऱ्या विविध प्रश्नांचा, मतभेदांचा व हितसंबंधातील वैविध्याचा निदर्शक असा हा संघ होता. इराणी सत्तेचे लष्करी वजन मोडण्यात आल्यानंतर मुख्य भूमीवरील नगरराज्यांना हेलेनिक राज्यसंघाच्या जोखडाखाली राहणे मानवेना. परंतु इजीअन समुद्रात इराण वर्चस्वाखालील आरमार, गोंधळ उडविण्यापुरते निश्चित बलवान होते. म्हणून या भागातील सर्व बेटे व याच विभागातील नाविक व्यापारावर अवलंबून असणारे अथेन्स यांचा मिळून हा संघ तयार झाला.

कॉरिंथची परिषद : स्वार्थामागे लागलेल्या परंतु या स्वार्थाला स्वातंत्र्याचे, स्वायत्ततेचे प्रेम अशा उपधींनी गौरविणाऱ्या ग्रीक नगरांना बलप्रयोगांनी एकत्र आणून सबंध ग्रीससाठी काही करावयास लावण्याचा-किंबहुना सबंध ग्रीस एक आहे, हे दाखविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्न, कोणत्याही प्रमुख नगरराज्याने केला नाही. पण रानवट अशा मॅसिडोनियाकडून इ.स.पू. ३३८ मध्ये हा प्रयोग झाला. मॅसिडॉनचा राजा फिलिप याने कॉरिंथमध्ये सर्व ग्रीक राज्यांची परिषद भरविली. त्यांना इराणी संकटाला तोंड द्यावयास लष्करी दृष्ट्या सिद्ध होणे भाग होते. म्हणून सबंध ग्रीसचे जे सैन्य निर्माण झाले, त्याचे नेतृत्व त्याने आपल्याकडे घेतले. त्याच्या मृत्यूनंतर अलेक्झांडरने थीब्झचा मोड करून आपल्या सामर्थ्याची साक्ष ग्रीकांना पटवून दिली व अखिल ग्रीसचे सेनापतिपद मिळविले. त्याच्या मृत्यूबरोबर या परिषदेने घेतलेले निर्णय विस्मृतीत लुप्त झाले.

इटोलियन संघ व ॲकियन संघ : इ.स.पू. २५o किंवा त्याच्या आसपास हे संघ स्थापन झाले. कॉरिंथच्या आखातास लागून उत्तरेस असलेल्या राष्ट्रांनी इटोलियन संघ स्थापला. आपल्या दक्षिणेस असलेल्या राज्यांचा तसेच उत्तरेस असलेल्या मॅसिडॉनचा विरोध असल्याने या संघाने स्पार्टाशी सख्य जोडले. पेलोपनीसस द्वीपकल्पाच्या वायव्य टोकावरील ईलिस तर इटोलियन संघात सामीलही झाले. या द्वीपकल्पाच्या उत्तर भागातील, म्हणजे इटोलियन संघाच्या दक्षिणेकडील, राष्ट्रांनी ॲकियन हा संघ स्थापला. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने ॲकियन संघाने मॅसिडॉनशी सख्य जोडले. इ.स.पू. २२o मध्ये या संघाचे उघड युद्ध सुरू झाले. याला सामाजिक युद्ध असे नाव आहे. या दोन संघांच्या आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या हालचालींमुळे ग्रीसमध्ये रोमन हस्तक्षेप वाढत्या प्रमाणात होऊ लागला.

याशिवाय बोएशियन संघासारख्या तात्कालिक संघटना वेळोवेळी अस्तित्वात आल्या परंतु त्यांचा दूरगामी परिणाम झालेला दिसत नाही. शासकीय ऐक्य आणि विधिनियमविषयक समानता या दृष्टींनी शेवटी वर्णिलेले इटोलियन व ॲकियन संघ विशेष उल्लेखनीय ठरतात. दोन्हीही संघांनी आपापल्या घटक राज्यांचे स्वातंत्र्य केवळ नागरी-प्रशासनापुरतेच मर्यादित करण्यात आणि महत्त्वाच्या खात्यात समान धोरण व अनुशासन पतकरण्यात अनुस्यूत केले.

लष्करी संघटना : ग्रीक बखरकारांच्या लिखाणांत निरनिराळ्या युद्धप्रसंगांची आणि युद्धतंत्रांविषयीची जी वर्णने सापडतात, त्यात सामान्यपणे शत्रूचे पराभूत सैन्य ग्रीकांच्या विजयी सैन्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक असल्याचे दाखविलेले आढळते. पुष्कळदा हे आकडे हास्यास्पद दिसतात. मात्र लढाईत ग्रीकांचा विजय झाला, हे सत्य असते असे विजय केवळ रानवटांवरच नव्हे तर पिढ्यान्‌पिढ्या साम्राज्य करणाऱ्या इराणसारख्या बलिष्ठ सत्तेवरही मिळालेले होते. या विजयांची संपूर्ण कारणमीमांसा करणे शक्य नसले, तरी लष्करी व आरमारी संघटना व युद्धतंत्र यांची कल्पना करणे सोपे आहे. डोरियन आक्रमकांनंतर एकदोन शतके लढाई सनातन पद्धतीनेच होई. दोन योद्ध्यांचे पायी अथवा रथांतून द्वंद्व हा तिचा मुख्य भाग. द्वंद्वातील जय अथवा पराजय हाच युद्धाचा निकाल ठरवी. थोड्याच काळात निराळ्या प्रकारची संघटना व तंत्र अस्तित्वात आले. तलवार आणि भाले यांनी सज्ज अशा सैनिकांच्या फळ्या शत्रूवर चालून जाऊ लागल्या. हे सैनिक क्वचित चिलखतेही धारण करीत. अशा फळ्या एका मागोमाग एक उभ्या रहात व त्यांचा भेद करणे सहसा सोपे नसे. इ.स.पू. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात अशा सैनिकांना हापलाइट म्हणत हे विशिष्ट युद्धतंत्र सबंध ग्रीसभर प्रचलित झाले. या तंत्रात आवश्यक ती शिस्त स्वभावतःच अंगी असलेल्या स्पार्टाच्या सैन्याला जवळपास अजिंक्यच बनता आले. तथापि लवकरच ही सैन्ये अवजड होऊ लागली आणि ती आपल्याच शिस्तीच्या जोखडात इतक्या विलक्षण तऱ्हेने अडकली की, त्यांना रणांगणात झटपट हालचाल करणे कठीण होऊ लागले. इ.स.पू. पाचव्या शतकाच्या शेवटी शेवटी हा दोष ध्यानात घेऊन काही नगरराज्यांनी आपल्या लष्करांची पुनर्घटना केली. अवजड फळीऐवजी आता हलकी हत्यारे वापरणाऱ्या पायदळाच्या छोट्या छोट्या तुकड्यांचा उपयोग करून लागले. थीब्झने या तंत्रात कौशल्य मिळवून इ.स.पू. ३७१ मधील युद्धात स्पार्टाच्या हापलाइट सैन्याचा संपूर्ण मोड केला. या पुढची पायरी फिलिप व अलेक्झांडर यांनी गाठली. मॅसिडोनियन सैन्याचे त्याने दोन भाग केले. पूर्वीच्या हापलाइटसारख्या सुसज्ज सैनिकांच्या एकामागोमाग एक फळ्या (क्वचित अशा सोळा फळ्या असत) आणि त्यांच्या जोडीला तितकेच सुसज्ज पण अत्यंत चपळ असे घोडदळ तयार केले. हापलाइट पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे एकसंध फळीची धडक. यामुळे तोही मिळत राहिला व त्यातला मुख्य दोष अवजडपणा तो घोडदळामुळे भरून निघाला. याच मिश्र तंत्रामुळे अलेक्झांडरला आपल्या इराणी शत्रूवर विजय मिळविता आले.


एकीकडे लष्करी तंत्राची प्रगती चालू असता दुसऱ्या बाजूला, परंतु निराळ्या नगरराज्यात, आरमार आणि आरमारी युद्धे यांत प्रगती चाललेली होती. मेगारा, कॉरिंथ, अथेन्स ही नगरराज्ये आणि यूबीआ, सॅमोथ्रेस यांसारखी इजीअन सागरातील बेटे, यांची उपजीविका आणि भरभराट ही सागरी व्यापार आणि वसाहती यांवरच अवलंबून होती. या दोहोंच्याही रक्षणार्थ बलिष्ठ नौदल हाताशी असणे जरूर होते. दर्यावर्दी जीवनाचा आणि नाविक तंत्राचा अनुभव ग्रीकांना फिनिशियन किंवा क्रीट लोकांच्या मानाने तोकडाच होता आणि मुख्य प्रतिस्पर्धी सत्ता म्हणजे आरंभी कार्थेज आणि नंतर इराण. यांना फिनिशियन नौकानयनाचे उत्कृष्ट सहाय्य असे. त्या वेळी वापरात असलेल्या जहाजांचा वेग वाढवून आणि त्यांचा मोहरा चटकन वळविता येईल, अशी व्यवस्था करून ग्रीकांनी आपल्या आरमाराची शक्ती कित्येक पटींनी वाढविली. या नव्या पद्धतीच्या नौकांना ट्रिरेम असे नाव होते. यांत एका शेजारी एक असे तीन वल्हविणारे बसत. मात्र त्यांची आसने अशा तऱ्हेने मांडलेली असत, की एकाचे वल्हे दुसऱ्या आड येऊ नये. म्हणजेच या जहाजांची चलनशक्ती तिपटीने वाढली. प्रत्यक्षात या जहाजांचा वेग दुपटीने जास्त वाढला. अशाच प्रकारची जहाजे फिनिशियन आरमारात या आधी असावीत आणि ग्रीकांनी त्यात सुधारणा करून ती वापरावयास आरंभ केला असावा, असे समजतात. उगम कोठेही असला, तरी ग्रीक नाविकांनी या नव्या जहाजांचा उपयोग अत्यंत उत्तम तऱ्हेने केला. रणांगणांत भालाइतांच्या फळ्या आणि वेगवान घोडदळ आणि सागरात ट्रिरेम जहाजे यांमुळे ग्रीक शस्त्रसामर्थ्य काही काळ तरी तत्कालीन जगतात श्रेष्ठ ठरले.

इराणशी युद्ध : सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वैशिष्ट्यांनी युक्त असा ग्रीक समाज अस्तित्वात आल्यानंतर घडलेली सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे इराणशी झालेले युद्ध. या वेळी सबंध मध्यपूर्वेचा भाग तुर्कस्तान ते अफगाणिस्तान इराणच्या राजकीय वर्चस्वाखाली होता. इराण ही तत्कालीन जगातील सर्वांत बलाढ्य राजकीय व लष्करी शक्ती होती. हे युद्ध (इ.स.पू. ४९o ते ४८o) केवळ इराणच्या साम्राज्यविस्ताराच्या वृत्तीतूनच निर्माण झाले, असे म्हणणे ऐतिहासिक दृष्ट्या अयोग्य ठरेल. अनेक लहानमोठ्या कारणांतून हा संघर्ष उत्पन्न झाला.

अथेन्स, कॉरिंथ, स्पार्टा ही या काळातील प्रमुख नगरे. त्यांचे एकमेकांशी असणारे संबंध फारसे सरळ होते, असे नाही. या तीन नगरराज्यांचे हितसंबंध जसे अनेक वेळा परस्परविरोधी असत, तसेच त्यांच्या निरनिराळ्या कल्पना व योजना यांतून आपल्याला धोका उत्पन्न होईल, अशी भीती थीब्झ, फोसीआ, आर्‌गॉस यांसारख्या छोट्या राज्यांना स्वाभाविकच वाटे. परस्पर संशयाच्या या वातावरणामुळे ग्रीकची एकात्मतेची भावना नष्ट झाली होती, एवढेच नव्हे, तर याही पुढे जाऊन, स्पार्टा किंवा अथेन्स यांसारख्या आपल्या प्रबळ शेजाऱ्यांविरुद्ध इराणसारख्या परकीय सत्तेची मदत मागावयास, कमीत कमी संधी आल्यास, या परक्यांकडून त्यांचे दमन करविण्यास ही नगरे तयार असत. ग्रीक राज्यांतील अंतर्गत राजकारणही काही अंशी या गोष्टीस अनुकूल होते. ग्रीक नगरांत लोकशाही अस्तित्वात होती, असे म्हणण्याचा प्रघात आहे. प्रत्यक्षात मात्र तेथे एखाद्या संपन्न वर्गाचीच सत्ता असे. आपल्यापैकीच कोणताही पुढारी जास्तच बलदंड होऊ नये, यासाठी हा वर्ग हरतऱ्हेचे उपाय योजी. या उपाययोजनेत, कोणीही एक मनुष्य, मग तो कितीही कर्तबगार असो, फार काळ सत्तेवर राहू नये याची खबरदारी घेत. आपल्या कर्तबगारीची राष्ट्राला जरूर आहे, अशी खात्री असलेले नेतेही पुष्कळच निघत आणि जर घटनात्मक पद्धतीने सत्ता टिकविता येत नसेल, तर घटनेत बदल करू देण्यास त्यांची तयारी असे. यात जे अयशस्वी ठरतील ते जर विशेष महत्त्वाकांक्षी असले, तर इतर नगरराज्यांचे व वेळ पडल्यास इराणसारख्या परकीय देशांचे साहाय्य त्यांनी घेतलेले आढळते. अशा राज्यकर्त्यांत अथेन्सचा हिपिअस आणि स्पार्टाचा डेमरेटस यांचा उल्लेख करता येईल. यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला आणि राजकीय धोरणाला त्या त्या राज्यातील काही वंशांचा अथवा कुटुंबांच्या गटाचा पाठिंबा असेच. हे वाद जेव्हा फारच ताणले जात, तेव्हा एखादा पक्ष इराणसारख्या परकीय सत्तेची मदत घेण्याचा अवश्य प्रयत्न करी. नगरराज्यांची एकमेकांशी चढाओढ किंवा वैर आणि निरनिराळ्या राज्यांतील अंतस्थ यादवी यांची उत्तम कल्पना इराण सम्राटांना आलेली होती. दुहीने पोखरलेल्या या देशाला जरा जोराचा धक्का दिला, तर सगळेच कोसळून आपल्या पदरात पडेल, असा त्यांचा समज झालेला असल्यास नवल नाही. एवढेच पुरेसे नव्हते म्हणून की काय, आयोनियन ग्रीकांच्या बंडाला साहाय्य करण्याची बुद्धी काही नगरराज्यांना झाली. स्पार्टामध्ये क्लिऑमिनीझ हा साहाय्य देण्याच्या बाजूला असला, तरी इतर राज्यकर्त्यांनी त्याला थोपवून धरले. अथेन्सने मात्र एक छोटेसे आरमारी दल त्यांच्या साहाय्यार्थ धाडून दिले. आयोनियातील वसाहतींनी इराणी सम्राटांचे सार्वभौमत्व मान्य केले होते आणि त्याबद्दल त्यांना जवळजवळ संपूर्ण अंतर्गत स्वायत्तता मिळाली होती. हुकूमशाही राज्यपद्धतीला इराणी सम्राटांचा आशीर्वाद होता. इ.स.पू. ४९९ मध्ये मायलीटसचा नेता ॲरिसटॅगोरस याने इराणी सत्तेविरुद्ध बंड उभारले. पूर्वीसारखे स्वतंत्र आयोनियन संघराज्य अस्तित्वात आणण्याची त्याची कल्पना होती. या कामाला आपल्या मातृभूमीकडून साहाय्य मिळेल, अशी त्याची व इतर आयोनियन वसाहतींची स्वाभाविक अपेक्षा होती. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन वर सांगितल्याप्रमाणे अथेन्सचे आरमार आले. परंतु या आरमाराची शक्ती, बंडाचा निकाल अनुकूल लावून घेण्याइतपत मोठी नव्हती. शिवाय ग्रीक राज्यांचा पाठिंबा त्यांना सतत मिळत गेला नाही. आयोनियन बंड मोडण्यास इराणला चार-पाच वर्षे लागली, पण या काळात इराणने सर्व आयोनियन शहरांवर पूर्ण अंमल बसवून, यूरोपच्या भूमीवरील थ्रेस आणि मॅसिडोनिया येथील आपल्या पूर्वीच्या प्रदेशावरही पुन्हा अंमल बसविला (इ.स.पू. ४९२). इराणी सेनापती मार्डोनिस याच्या हालचाली आपल्याविरुद्ध आहेत, असा सर्वच ग्रीक नगरराज्यांचा समज झाला आणि इराणशी संघर्ष हा जास्त जास्त नजीक येत असल्याची सगळ्यांची खात्री झाली. या दृष्टीने राजकीय पक्षोपक्षांची पुनर्रचना आणि पुनर्घटनाही सुरू झाली.

डरायसने ग्रीक भूमीवरच प्रत्यक्ष आक्रमण कशासाठी केले, याविषयी इतिहासकारांत एकमत नाही. ग्रीक नगरराज्ये आणि इराण यांत वैमनस्य उत्पन्न झाले होते, हे स्पष्टच होते. पण केवळ तेवढ्यावरून स्वारीला आरंभ व्हावा, हे फारसे शक्य दिसत नाही. अथेन्सने आयोनियन बंडाला मदत केली, म्हणून त्या नगरराज्याला शिक्षा घडविण्याच्या हेतूने इराणी सम्राटांनी एवढी प्रचंड जमवाजमव करून स्वारी केली असेल, असे मानणे सयुक्तिक ठरत नाही परंतु आयोनियन वसाहती पुन्हा बंडे करण्याचा संभव नक्कीच होता आणि पुन्हा ग्रीक भूमीवरून त्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळणार नाही, अशी खात्री नव्हती. उलट, हिपिअससारख्या परागंदा पुढाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून डरायसला हेच स्पष्ट दिसू लागले होते की, बहुतेक ग्रीक राज्ये आयोनियनला भरघोस पाठिंबा देतील. हा धोका नाहीसा करावयाचा असेल, तर ग्रीक नगरराज्यांवर ताबा मिळविणे, किमान तेथे इराणशी मित्रत्वाने वागणारी सरकारे उभी करणे जरूर होते. तीस ते चाळीस हजारांचे सैन्य, एक मोठे घोडदळ आणि त्यांच्या जोडीला मोठी आरमारी तुकडी घेऊन इ. स. पू. ४९o मध्ये डरायसने स्वारीला आरंभ केला. वाटेवर नॅक्सॉस, यूबीआ बेटावरील कार्दीत्सा व एरीट्रिया ही ठाणी काबीज करून इराणी सैन्य मुख्य ग्रीक भूमीवर उतरले. अथेन्सच्या उत्तरेला बेचाळीस किमी.वर असणाऱ्या मॅराथॉननजीकच्या मैदानावर इराणी सैन्य खडे झाले. अथेन्सच्या सैन्याने मॅराथॉननजीकच्या टेकड्यांवरील खिंडी रोखून अथेन्सकडे जाण्याचा मार्ग बंद केला. कित्येक दिवस टळले, तरी प्रत्यक्ष लढाईला तोंड लागले नाही, तेव्हा इराणी सैन्याने आपली काही शिबंदी त्या मैदानातच ठेवून मोठा भाग जहाजातून अथेन्सपाशी उतरविण्याचा घाट घातला. या बेताची कल्पना आल्याबरोबर अथेनियन सैन्याने इराणी सैन्यावर हल्ला चढवून त्याचा पराभव केला, काही घाईने पळून गेले.


चकमकीनंतर इराणी सम्राट स्वस्थ बसेल हे शक्यच नव्हते. तेव्हा दुसऱ्या फेरीची तयारी करण्याच्या उद्योगाला अथेन्स व ग्रीक नगरराज्ये लागली. यातही सर्व ग्रीक राज्ये एकजुटीने वागल्याचे दिसून येत नाही. पूर्वीचे हेवेदावे जास्त महत्त्वाचे ठरल्याचे दिसते. तथापि इराणी संकट सगळ्यांच्याच डोळ्यासमोर उभे असल्याचे ध्यानात आल्याने अथेन्सने एक मोठे नौदल उभे केले. एकमेकांत समझोता, विशेषतः अथेन्स व स्पार्टा यांच्यात, घडविण्याचेही यत्न झाले. इ.स.पू. ४८१ मध्ये इराणी सम्राट झर्क्सीझ याने ग्रीक राज्यांकडून शरणागतीची मागणी केली. त्याबरोबर कॉरिंथ येथे स्पार्टाच्या नेतृत्वाने ग्रीक ऐक्याची परिषद झाली. यातून हेलेनिक राज्यसंघ उत्पन्न झाला. स्पार्टा व अथेन्स हे या संघाचे प्रमुख आधारस्तंभ होते. या खेपेस इराणी सैन्य अडीच लाखांच्या आसपास होते. एवढे मोठे सैन्य जहाजाने ग्रीक भूमीवर उतरविणे कठीण असल्याने हेलेस्पॉटची सामुद्रधुनी ओलांडून हे सगळे सैन्य थ्रेसमध्ये उतरले. या सैन्याला पुरवठा व लष्करी मदत देण्यासाठी जवळजवळ हजार एक जहाजे ग्रीक किनाऱ्याच्या भोवती सज्ज ठेवण्यात आली होती. ॲटिकात घुसण्याचा मुख्य मार्ग थर्‌मॉपिलीच्या डोंगरातून जात असे. स्पार्टाचा सेनानी लीऑनिडसच्या नेतृत्वाने येथे ग्रीक सैन्याने संरक्षक फळी उभारली. थर्‌मॉपिलीतील युद्ध आणि नाविक युद्ध यांचा निकाल जवळजवळ एकाच समयी (ऑगस्ट ४८o) लागून दोन्हींत इराणी सैन्याचा विजय झाला. थर्‌मॉपिलीच्या खिंडीतील स्पार्टाच्या सैनिकांचे शौर्य हे ग्रीक इतिहासातील स्फूर्तिस्थळ मानले जाते. त्याविषयी आख्यायिका पुष्कळच आहेत, तथापि एकंदरीत युद्धाच्या दृष्टीने विचार करता येथे ग्रीकांचा पूर्ण पराभव झाला, असे म्हटले पाहिजे. अथेन्सकडून जाण्याचा मार्ग मोकळा होता. झर्क्सीझने त्वरेने हल्ला चढवून अथेन्स काबीज केले व तेथे मोठीच जाळपोळ केली. वस्तुतः हा युद्धाचा शेवट असेच त्याला व इतरांनाही वाटावयाचे पण तसे झाले नाही, कारण अथेन्सचा सेनानी थीमिस्टोक्लीझ याने मोठ्या कौशल्याने इराणी आरमाराची विभागणी करून एकेका भागाचा निःपात केला. या पराजयाचा इराणी सम्राटाने एवढा धसका घेतला की, सैन्याचा बराच मोठा भाग घेऊन तो इराणकडे परत निघून गेला.

पुढच्याच वर्षी मार्डोनिअसने पुन्हा अथेन्सवर ताबा मिळविला. या वेळी ग्रीकांची सैन्ये जास्त चांगल्या प्रकारे संघटित होती. तशीच त्यांची संख्याही त्या वेळी वाढली होती. स्पार्टाच्या नेतृत्वाखाली या सैन्याने मार्डोनिअसवर हल्ला केला आणि इ.स.पू. ४७९ च्या ऑगस्ट महिन्यात प्लाटीयाच्या लढाईत इराणी सेनेचा पूर्णपणे मोड केला. मार्डोनिअसही या लढाईत मारला गेला. याच वेळी झँटिपसच्या आधिपत्याखालील आरमाराने आयोनियन किनाऱ्यावर ग्रीक सैनिक उतरविले आणि पुढे इराणी सैन्याचाही पराभव केला. त्यामुळे सागरावर आणि भूमीवर ग्रीसचा पूर्ण विजय झाला. यानंतर इराणी सम्राटांनी पुन्हा ग्रीसवर आक्रमण करण्याचा यत्न केला नाही व जवळजवळ दहा वर्षे धुमसणारे हे युद्ध संपले.

या संघर्षातील दुसरी आघाडी भूमध्य समुद्राच्या पश्चिम भागात म्हणजे इटलीचा दक्षिण भाग व सिसिली येथे उघडली होती. या भागातील ग्रीक वसाहती आणि कार्थेजच्या वसाहती यांतील सत्तास्पर्धा बरीच वर्षे चालू होती. ग्रीक वसाहतींनी मायभूमीला नाविक आणि आर्थिक साहाय्य पाठविणे शक्य होते. अशा वेळी त्यांनाच जर गुंतवून ठेवले, तर मदतीचा हा संभव नष्ट होईल, अशा हिशेबाने इराणने कार्थेजला उत्तेजन देऊन तिकडे युद्ध पेटवून दिले. कार्थेजियन सैन्याने सिसिलीवर केलेल्या आक्रमणात हिमराच्या लढाईत ग्रीकांनी त्यांचा पराभव केला आणि याही आघाडीवर ग्रीकांचे वर्चस्व कायम राहिले. लढाईत विजय झाला तरी इराणचा मूळ उद्देश सिद्धीस गेला, असेच म्हणावे लागते. कारण या वसाहती स्वतःच युद्धात गुंतल्याने ग्रीसकडे मदत पाठवू शकल्या नाहीत. त्यांच्या मदतीशिवायही ग्रीकांनी इराणवर मिळविलेल्या विजयाला ग्रीक व पाश्चात्त्य इतिहासात महत्त्व प्राप्त व्हावे, हे उघडच होते.

अथेन्सचे साम्राज्य व पेलोपनीशियन युद्धे : अथेन्सवर काही काळ इराणी अंमल बसला तसेच त्या प्राचीन नगरीची नासधूस झाली हे खरे असले, तरी कित्येक वर्षे चाललेल्या या संघर्षात ग्रीसचा विजय झाला आणि या विजयाला अथेन्सचे नेतृत्व उपयोगी पडले, हेही खरेच होते. या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात स्पार्टाचे सैनिकी सामर्थ्य विशेष निर्णायक ठरले होते. स्वाभाविकच दोघांनाही विजयाचे श्रेय स्वतःच्या पदरात पाडून घ्यावयाचे होते, एवढेच नव्हे, तर दुसऱ्याला वरचढ होऊ द्यावयाचे नव्हते. स्पार्टाने उभारलेला पेलोपनीशियन संघ अस्तित्वात होता व इ.स.पू. ४७७ मध्ये अथेन्सने इजीअन समुद्र इराणी आरमारापासून सुरक्षित रहावा, यासाठी ⇨डेलियन संघ  स्थापला. डिलॉस येथे मुख्य ठाणे आणि खजिना असल्याने या संघाला डेलियन हे नाव मिळाले. स्थापनेनंतर जवळजवळ पंधरा वर्षे डेलियन संघाचे नेतृत्व सायमन या अथेनियन नेत्याकडे होते. त्याच्या धोरणाची मुख्य अंगे तीन होती : एक, अथेन्सभोवती बळकट तटबंदी करून ग्रीक परचक्रापासून रक्षण करणे, दुसरे या बंदिस्त अथेन्सला सागरमार्गाने सतत पुरवठा होत रहावा, यासाठी इजीअन समुद्रावर पूर्ण वर्चस्व स्थापणे. तिसरे, या वर्चस्वासाठी डेलियन संघातील राज्ये काबूत ठेवणे आणि त्यासाठी अथेनियन नागरिकांच्या वसाहती किंवा ठाणी ठिकठिकाणी उत्पन्न करणे. पण इ.स.पू. ४६१ मध्ये त्याला अधिकारपदावर रहाण्यास अपात्र ठरविण्यात आले व ⇨परिक्लीझ  या अत्यंत प्रसिद्ध नेत्याचा उदय झाला. अंतर्गत कारभारात पेरिक्लीझच्या सुधारणा फलदायी ठरल्या, कलासाहित्याचा उदय झाला आणि म्हणूनच त्याच्या कारकीर्दीला सुवर्णयुग म्हणतात. परंतु यांपैकीच काही शासकीय सुधारणा व त्याचे परराष्ट्रीय धोरण यांतून केवळ अथेन्सची नव्हे, तर सबंध ग्रीक भूमीचीच धुळधाण उडाली. इराणी युद्धांमुळे ग्रीसचे इतके नुकसान झाले नव्हते, पण इ.स.पू. ४३१ पासून इ.स.पू. ४o४ पर्यंत झालेल्या यादवीने कॉरिंथ, अथेन्स, स्पार्टा या सगळ्या मोठाल्या नगरराज्यांना हतबल करून टाकले व मॅसिडोनियाच्या आक्रमक वर्चस्वाला अनुकूल भूमी तयार केली. पेरिक्लीझने सायमनच्याच धोरणाचा विस्तार केला आणि जास्त नेटाने ते अवलंबिले. अथेन्सभोवती तटबंदी झाली इतकेच नव्हे, तर पायरीअस बंदराभोवतीही तटबंदी झाली. शिवाय बंदर आणि शहर यांना जोडणाऱ्या भागास धोका राहिला नाही आणि संकटाच्या वेळी रसद पुरविण्याचीही तयारी पूर्ण झाली. आर्थिक स्वातंत्र्य टिकवून धरण्यासाठी पेरिक्लीझने डिलॉसमधील खजिना अथेन्समध्ये आणला आणि अथेन्सच्या सामर्थ्याचा पाया असे जे नाविक दल, त्याची अपरंपार वाढ केली. अथेन्सची शक्ती अशा तऱ्हेने बलिष्ठ होत गेली.

दुसरा भाग म्हणजे डेलियन संघ ताब्यात आणण्याचा प्रयत्न होय. केवळ दोन-चार वर्षांतच पेरिक्लीझने डेलियन संघाचे रूप बदलले. त्याचे ऐच्छिक स्वरूप नाहीसे झाले आणि त्यातील प्रदेश अथेन्सचे साम्राज्य बनले. सायमनच्याच पद्धतीने त्यानेही ठिकठिकाणी वसाहती स्थापल्या. यात काळ्या समुद्रातील क्रिमियाभोवतालच्या काही महत्त्वाच्या वसाहती होत्या. कारण त्यामुळे अखंड धान्यपुरवठा शक्य झाला. यांनतर त्याने थ्रेस नजीक अँफिपलस वसाहत व सिसिलीत आणखी काही वसाहती स्थापण्याचा यत्न केला व कॉरिंथ आणि स्पार्टा यांच्यावर वचक रहावा, म्हणून मेगारा अथवा आर्‌गॉस यांच्याशी मैत्री केली. तसेच इजीअन बेटांना डेलियन संघात सामील व्हावयास भाग पाडले आणि याही पुढे जाऊन पेलोपनीशियन युद्धे जोराने चालू असताना सिसिलीतील कॉरिंथच्या सिरॅक्यूझ या वसाहतीवर आक्रमण केले.


या प्रमाणे काही वेळा संरक्षणासाठी, काही वेळा संरक्षणाला उपयोगी आक्रमण म्हणून, वेगवेगळ्या हालचाली अथेन्सने केल्या असता इतर राज्ये स्वस्थ राहणे अशक्यच होते. त्यातल्या त्यात कॉरिंथ व स्पार्टा यांच्याकडे विरोधकांचे पुढारीपण आले. विरोधकांच्या हालचालींत, अथेन्सच्या वर्चस्वाखालील राज्यांत व वसाहतींत बंडे उत्पन्न करणे, ही सगळ्यात उपयोगी ठरणारी गोष्ट होती. इ.स.पू. ४४७-४४६ मध्ये बिओशियाने अथेन्सच्या सैन्याचा मोड केला. त्याच वर्षी मेगाराने सर्व अथेनियन शिबंदी कापून काढली. यूबीआत बंडे सुरू झाली. ही अशांतता शमविण्यासाठी अथेन्सने स्पार्टाशी तीस वर्षांचा अनाक्रमण करार केला. तथापि हा संघर्ष काही संपुष्टात आला नाही. इ.स.पू. ४५o पासून भिन्नभिन्न ठिकाणी किरकोळ चकमकी चालू असल्या, तरी त्यांना सार्वत्रिक युद्धाचे स्वरूप नव्हते. परंतु त्यामुळे राज्यांच्या परराष्ट्रीय धोरणाचा रोख स्पष्ट झाला होता. अथेन्सच्या आक्रमक धोरणाचा प्रत्यक्ष स्फोट इ.स.पू. ४३१ मध्ये झाला. इ.स.पू. ४३१-४३o मध्ये झालेल्या लढायांतून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. स्पार्टाला जमिनीवर प्रभूत्व होते, तर अथेन्सला सागरावर होते व त्यामुळे या युद्धाचा निर्णय सहजासहजी लागणार नव्हता. इ.स.पू. ४३o मध्ये अथेनियन नागरिकांनी स्वतःला आपल्या किल्ल्यात कोंडून घेतले होते. परंतु तेथेच प्लेग सुरू होऊन जवळ जवळ एकतृतीयांश लोक मृत्यूमुखी पडले. पण या आपत्तीतून अथेन्स बाहेर पडले आणि विशेषतः थ्रेसमध्ये स्पार्टाने पराभव केला असला, तरी एकमेकांचे प्रदेश परत करणे या साध्या अटीवर इ.स.पू. ४२३ मध्ये स्पार्टा-अथेन्समध्ये तह झाला.

इ.स.पू. ४१७–४१३ मध्ये सिसिलीत अथेन्सने पाठविलेल्या प्रचंड आरमाराचा नाश झाला आणि मग लगेचच स्पार्टा व त्याचे सहकारी यांनी अथेन्सविरुद्ध युद्ध पुकारले. परंतु भूयुद्धाचा अथेन्सविरुद्ध काही उपयोग नाही, हे स्पष्ट होते म्हणून स्पार्टाने इराणशी सहकार्य केले. स्पार्टाचा नेता लायसँडर याने इराणी राजपुत्र सायरस याच्याशी सख्य करून इराणकडून आर्थिक साहाय्य मिळविले. त्या पैशातून प्रचंड आरमार बांधून हेलेस्पॉटच्या सामुद्रधुनीपाशी लायसँडर याने इ.स.पू. ४o७ मध्ये अथेन्सच्या आरमाराचा नाश केला. ग्रीक भूमीवर स्पार्टाचे प्रभुत्व होते. आता अथेन्सच्या आरमाराची नाकेबंदी झाली आणि इ.स.पू. ४o४ च्या एप्रिल महिन्यात अथेन्सने शरणागती पतकरली. या वेळेपर्यंत इजीअन समुद्रातील बेटे स्वतंत्र झाली होती. मदतीची किंमत म्हणून आयोनियावरील इराणी प्रभुत्व स्पार्टाने मान्य केले होते. सतत पंचवीस वर्षे चाललेल्या या युद्धाने शेतकी, व्यापारउदीम जवळजवळ नष्ट झाले होते आणि इ.स.पू. ४o४ च्या तहाने अथेन्स आक्रमणाची तटबंदी उद्ध्वस्त करण्यात आली. इराणशी झालेल्या या युद्धातील नेतृत्वामुळे अथेन्सला मिळालेले अग्रेसरत्व तर गेलेच पण वैभव व संपत्ती यांचीही अपरिमित हानी झाली.

अथेन्सचा पाडाव झाला. पेलोपनीशियन युद्ध संपले. तथापि अथेन्सच्या पाडावामुळे या युद्धाला कारणीभूत झालेले सर्व प्रश्न सुटले नाहीत. पहिल्याने पेरिक्लीझच्या नेतृत्वाखालील साम्राज्यवादामुळे इतर नगरराज्यांना भय उत्पन्न झाले होते. त्याऐवजी आता स्पार्टाची भीती निर्माण झाली. महत्त्वाच्या अशा सगळ्या ग्रीक नगरराज्यांनी एकत्र येऊन अथेन्सचा पराभव केला, पण या सर्वांचे नेतृत्व स्पार्टाकडेच होते. कित्येक वर्षे स्पार्टाचे लष्कर बलाढ्य म्हणून प्रसिद्ध होते, नंतर ते अजिंक्यच ठरले. त्याच्या जोडीला आता स्पार्टाचे आरमार सागरावर समर्थ ठरले. हे आरमार इराणच्या पैशातून बांधलेले होते. या सामर्थ्यामुळे जे पुढारीपण स्पार्टाला प्राप्त झाले होते आणि जे इतरांनी मान्य केले होते, ते प्रयोजन संपल्यावरही इतरांवर लादण्याचा स्पार्टाचा अट्टाहास हा नव्या अडचणींचे कारण होते. स्पार्टाविरुद्ध लवकरच चकमकींना आरंभ झाला. प्रत्येक नगराचे काहीतरी गाऱ्हाणे होतेच – केवळ स्पार्टाविरुद्धच नव्हे, तर एकमेकांविरुद्धही – त्यामुळे एकदा चकमकींना आरंभ झाल्यावर त्या सर्व पसरण्यास वेळ लागला नाही. यांतून पसरलेली आग, मॅसिडोनियाच्या फिलिपने सर्वांना दावणीला बांधल्यावरच विझली. आपापसांत पुन्हा युद्ध सुरू झाले, तरी आधीच्या युद्धात अथेन्सचा पाडाव व स्पार्टाचा विजय यांना इराणी पैसा बव्हंशी कारणीभूत झाला होता, ही गोष्ट कोणतेही नगरराज्य आणि विशेषतः मॅसिडोनिया विसरला नाही.

पेलोपनीशियन युद्ध संपल्यावर जवळजवळ तीन वर्षांनंतर अथेन्स व स्पार्टा या दोघांनीही अंतर्गत पुनर्रचनेचे व पुनर्घटनेचे काम सुरू केले. यांत किरकोळ संघर्ष होत. विशेषतः अथेन्स आपला डळमळता पाया सावरू लागले. इराणच्या वारसा प्रश्नात स्पार्टाने हस्तक्षेप केल्याने इराणने अथेन्सची मदत मागितली. या संयुक्त आरमाराने नेअझ्ड येथे स्पार्टाच्या आरमाराचा विध्वंस केला. अथेन्सने बंदराभोवतालची व नगराभोवतालची तटबंदी पुन्हा बांधली व सैन्याची पुनर्रचना केली. इ.स.पू. ३९१ मध्ये सैनिकी लढाईत अथेन्सने स्पार्टाचा पराभव केला आणि आपले स्वातंत्र्य परत मिळविले. गमावलेले स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर अथेनियन पुढाऱ्यांना पेरिक्लीझने उभे केलेले साम्राज्यही पुन्हा उभारण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. इजीअन बेटांपैकी काहींवर त्यांनी ताबा मिळविला. सिसिलीतील वसाहतींशी वाटाघाटी सुरू केल्या. इ.स.पू. ३८७ च्या सुमारास अथेन्सच्या या हालचालींनी चिंतातुर झालेल्या स्पार्टा आणि इराण यांनी एकमत करून अथेन्सचे आरमार कोंडीत पकडले आणि सर्व ग्रीक राज्यांचे शिष्टमंडळ इराणला गेले. या वेळी झालेल्या तहात अथेन्सकडे इजीअन समुद्रातील तीनच बेटे राहिली, सर्व नगरराज्यांना संपूर्ण स्वातंत्र्याची हमी देण्यात आली व पेलोपनीशियन सोडून इतर सर्व राज्यसंघ बरखास्त केले.

ही शांतता पाच वर्षे सुद्धा टिकली नाही. स्पार्टा व थीब्झ यांत कुरबूर सुरू झाली. इ.स.पू. ३७१ मध्ये थीब्झच्या सैन्याने स्पार्टाच्या लष्कराचा पराभव केला. अथेन्सचे लक्ष इजीअन समुद्रावरच केंद्रित झालेले असल्याने आणि स्पार्टा हतबल झाल्याने ग्रीसचे पुढारीपण थीब्झकडे आले. हे पुढारीपण प्रत्यक्षात या नगराकडे आले नाही, तर केवळ एकाच माणसाकडे आले. इपॅमिनॉण्डस थीब्झचा पुढारी होता तोपर्यंत हे पुढारीपण कायम राहिले. इ.स.पू. ३६२ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर तेही लयास गेले. ही जबाबदारी पेलण्याचे आर्थिक, लष्करी वा संघटनात्मक सामर्थ्य थीब्झपाशी नव्हते. यामुळे येथून पुढे फुटकळ लढाया होत राहिल्या. इ.स.पू. ३५६–३४६ या दहा वर्षांत स्पार्टा व थीब्झ यांत, देवस्थानांच्या मालकीच्या निमित्ताने युद्धे झाली. या युद्धांना पवित्र युद्धे, असे नाव मिळाले. इ.स.पू. ३५३ मध्ये मॅसिडॉनचा फिलिप याने या राजकारणात भाग घ्यावयास प्रारंभ केला. त्या वेळी आणि पुन्हा एकदा इ.स.पू. ३४६ मध्ये त्याला माघार घ्यावी लागली. परंतु इ.स.पू. ३३८ मध्ये झालेल्या युद्धात त्याचा विजय झाला. कॉरिंथ येथे त्याने सगळ्या नगरांचे प्रतिनिधी बोलविले आणि एक शांतता-प्रस्ताव मान्य करून घेतला. या तहाच्या अटी इ.स.पू. ३८७ च्या तहासारख्याच होत्या. फिलिपने असाही ठराव करून घेतला की, या तहाच्या अटी अंमलात आणण्यासाठी एक खडी फौज असावी व या फौजेचे नेतृत्व त्याच्याकडेच रहावे.

अशा रीतीने ग्रीक लोकशाही, नगरराज्यांचे स्वातंत्र्य आणि जवळजवळ दीडशे वर्षे चाललेला रक्तपात यांना फिलिपने पूर्णविराम दिला.


फिलिप आणि अलेक्झांडर यांचा काळ : कॉरिंथ परिषदेचा निकाल मॅसिडोनियाला सर्वस्वी अनुकूल लागला. सबंध ग्रीसचे मिळून एक सैन्य असावे, त्यात विजयी मॅसिडोनियन सेनेला महत्त्वाचे स्थान असावे आणि या सेनेच्या अधिपतीला ग्रीसचे सेनाधिपत्य लाभावे हे ओघानेच आले. फिलिपच्या मनात इराणविषयी वसत असलेला कमालीचा वैरभाव ग्रीक संस्कृतीच्या प्रेमातूनच उत्पन्न झाला होता. परंतु त्याला ज्या गोष्टी उघड उघड दिसत होत्या, त्या स्वतंत्र नगरराज्यांच्या ध्यानात येत होत्या, असे दिसत नाही. इ.स.पू. ३३८ पर्यंत सतत धुमसत राहिलेल्या यादवीत कलह निर्माण करण्याचे काम इराणने मनापासून केले होते. हा छुपा हात ग्रीकांच्या डोळ्यासमोर उघड करणे आणि त्याहीपेक्षा ग्रीक ऐक्याचा पुनरुच्चार करून यादवीची निष्फळता त्यांना पटवून देणे जरूरीचे होते. ग्रीक नगरराज्यांच्या व्यग्रतेचा फायदा घेऊन इराणने आयोनियन प्रदेशावर आपली सत्ता पुन्हा स्थापन केली होती. इजीअन बेटे सुरक्षित नव्हती आणि तेथून मुख्य भूमी फारशी लांब नव्हती. पूर्वी एकदा गारद केलेले शत्रू पुन्हा आपले स्वातंत्र्य धोक्यात आणू लागणार, हे दिसताच त्यातल्या त्यात विचारी व दूरदर्शी ग्रीकांना इराणशी टक्कर द्यावयाची असल्यास ग्रीक ऐक्याची गरज निकडीने भासू लागली. सुदैवाने या विचाराचा पुरस्कार आणि प्रचार करण्यास आयसॉक्राटीझसारखा जबरदस्त पुढारीही त्या वेळी निर्माण झाला. गरीब आणि श्रीमंत शेतकरी व व्यापारी, लोकशाहीचे पुरस्कर्ते तसेच हुकूमशाहीचे उपासक, अशा सगळ्यांना आपल्या प्रभावी वक्तव्याने आणि मुत्सद्दीपणाने ग्रीक एकतेची गरज पटवून देण्याची त्याने शिकस्त केली. एकीकडे वांझोट्या स्वातंत्र्याची व पृथगात्मतेची धार यादवीने बोथट असल्याने आणि दुसरीकडे परचक्राची भीती उभी राहिल्याने एकाच बलिष्ठ सत्तेचे जूं पतरकण्यात सामान्य ग्रीक माणसाची मानसिक व बौद्धिक तयार घडवून आणली.

मात्र या वैचारिक वातावरणाचा योग्य उपयोग करून घेण्याचे कौशल्य स्पार्टा, थीब्झ किंवा अथेन्स या राज्यांना दाखविता आले नाही. प्रत्यक्ष युद्धे संपली तरी, मत्सर व वैरभाव यत्किंचितही कमी झाले नव्हते. नव्या या परिस्थितीची कल्पना या ठिकाणच्या पुढाऱ्यांना वा विचारवंतांना आलेली नव्हती, असे नाही. परंतु प्रत्येक राज्याची शासनसंस्थाच अशी होती की, काही दूरगामी धोरण आखणे आणि अंमलात आणणे, विशेषतः पूर्वीचे हेवेदावे विसरून एखाद्या नव्या कल्पनेला साकार करणे, त्यांना शक्य नव्हते. परंपरागत शत्रुमित्रत्वाच्या कल्पनांपासून मुक्त, स्वतःचे धोरण स्वतःच ठरविणारा आणि थोडीशी दंडेली करून ते अंमलात आणण्याची तयारी व धमक असणारा राजकीय नेता व शासनसंघटना यांची जरूरी होती. प्राप्त परिस्थितीत लोकशाहीच्या फापट पसाऱ्याऐवजी हुकूमशाहीची शिस्त, जोम आणि मुख्य म्हणजे ध्येयाच्या सिद्धीसाठी मनोबुद्धीची सामर्थ्य वेचण्याची इच्छा यांची आवश्यकता होती. हे काम मॅसिडोनियाचा राजा दुसरा फिलिप याने पतकरले. फिलिपची महत्त्वाकांक्षा जबर आणि ती सफल करण्यासाठी त्याने केलेले प्रयत्नही त्याच तोडीचे होते. मोठ्या खबरदारीने त्याने द्रव्यशक्ती जमा केली, तिच्या जोरावर अत्यंत शिस्तबद्ध व सुसज्ज सैन्य उभे केले. साहसी स्वभावाच्या या राजाएवढा योग्य दुसरा नेता मागूनही मिळणे फारसे सोपे नव्हते. मॅसिडोनिया हा खरा ग्रीसचाच भाग व ग्रीक भाषिकांचाही परंतु भौगौलिक विभागणीमुळे मुख्य प्रवाहापासून अलग पडलेला. अथेन्ससारख्या शहरातील लोक तर मुळी मॅसिडोनियन माणसाची रानवटातच गणना करीत. या रानवटांचा रानवट आणि तामसी नेता जो फिलिप त्याला त्यांनी क्षुद्र लेखावे हे उघडच होते. फिलिपला मात्र अभिजात ग्रीक संस्कृतीचा केवळ परिचय झालेला होता असे नाही, तर तो या संस्कृतीचा पराकाष्ठेचा अभिमानीही होता. या श्रेष्ठ संस्कृतीचे रक्षण करण्यास थीब्झ, अथेन्स यांसारख्या प्राचीन सत्ता आता असमर्थ आहेत आणि त्यांना आपल्या नेतृत्वाची गरज आहे, असेही त्याचे ठाम मत होते. इ.स.पू. ३३८ मध्ये झालेल्या युद्धात त्याने हे मत इतर ग्रीकांच्या गळी उतरविले. कॉरिंथ येथे स्पार्टाखेरीज इतर नगरराज्यांचे प्रतिनिधी जमा झाले व त्यांनी फिलिपला आपले पुढारीपण बहाल केले. फिलिपने ताबडतोब इराणशी युद्ध करण्यासाठी जमवाजमव सुरू केली आणि इ.स.पू. ३३६ मध्ये जवळजवळ दहा हजार सैन्य तुर्कस्तानच्या वायव्य कोपऱ्यात उतरविले. एवढ्यात त्याच्याच एका सेनापतीने त्याचा खून केला.

वयाच्या केवळ विसाव्या वर्षीच राजपदाची जबाबदारी त्याचा मुलगा अलेक्झांडर याच्या शिरावर पडली. राजकारणात मग्न असतानासुद्धा फिलिपने आपल्या पुत्राच्या शिक्षणाची हायगय केली नव्हती. बापाच्या देखरेखीखाली उत्कृष्ट शरीरसंपदा, युद्धनैपुण्य आणि शासनकौशल्य त्यास प्राप्त झाले, तर ॲरिस्टॉटलसारख्या गुरूच्या संगतीने मनाची प्रगल्भता आणि ग्रीक संस्कृतीविषयी नितांत आदर व प्रेम त्याला मिळाले. डॅन्यूबच्या खोऱ्यातील बंडखोर टोळ्यांचा त्वरेने मोड करून अलेक्झांडर ग्रीसकडे वळला. पित्याचे राज्य वंशपरंपराहक्काने आले, तरी ग्रीसचे नेतृत्व तसे मिळण्यासारखे नव्हते. इ.स.पू. ३३५ मध्ये थीब्झचा पराभव आणि नाश करून त्याने या पदाची प्राप्ती करून घेतली. स्पार्टाच्या फटकून वागण्याची अथवा अथेन्समधल्या लोकसत्ताप्रेमींची त्याने केवळ उपेक्षेने वासलात लावली आणि फिलिपच्या अर्धवट राहिलेल्या मोहिमेकडे तो वळला.

ग्रीस आणि इराण यांत जवळजवळ दोन शतके चाललेल्या संघर्षाचा सोक्षमोक्ष लावण्याचा त्याचा निश्चयच असावा असे दिसते. इ.स.पू. ३३१ च्या ऑक्टोबरमध्ये टायग्रिसच्या काठावरील गॉगामीला या ठिकाणी डरायसशी त्याचे दुसरे युद्ध झाले. यातही डरायसचा पराभव होऊन त्याच्याच सरदारांनी त्याला मारून टाकले. नंतर एकबॅटना, पर्सेपलिस ही शहरे काबीज करून अलेक्झांडरने इराणच्या पूर्व भागावर ताबा मिळविला व त्याच्या जीविताच्या शेवटच्या पर्वाला प्रारंभ झाला. इ.स.पू. ३२८ मध्ये तो भारतात आला. काही लढायांनंतर त्याचा पाठपुरावा करणाऱ्या मॅसिडोनियन सैन्याने पुढे जाण्याचे नाकारले. त्याच्या सैन्याचा एक मोठा भाग अरबी समुद्रातून आणि दुसरा बलुचिस्तानातून इराणला जाऊन पोहोचला. वाटेत इ.स.पू. ३२३ मध्ये तो मृत्यू पावला.

अलेक्झांडरच्या मृत्यूबरोबर ग्रीक भूमी एका राजसत्तेच्या नियंत्रणाखाली आणण्याची स्वप्ने विरून गेली. नगरराज्यांतील सत्तास्पर्धा आणि सामाजिक संघर्ष यांनी दुर्बल झालेले ग्रीक राष्ट्र एकत्र येण्याची काहीशी शक्यता फिलिप आणि अलेक्झांडर यांच्या शक्तिशाली नेतृत्वामुळे उत्पन्न झाली होती. परंतु या दोघांच्याही समोर ग्रीसमधील अंतर्गत यादवीपेक्षा त्या राष्ट्राचा पिढीजाद शत्रू जो इराण त्याचे पारिपत्य हेच महत्त्वाचे काम होते. शत्रूच्या विनाशासाठीच या बापलेकांनी आपल्या मनोबुद्धीची सामर्थ्ये वेचिली. उलटपक्षी ग्रीक नगरराज्यांनी या दोघांचे पुढारीपण पतकरले तेही नाखुशीनेच. थीब्झच्या नाशानंतर अलेक्झांडरला ग्रीसच्या नेतृत्वाची वस्त्रे आपद्धर्म म्हणूनच ग्रीकांनी अर्पण केली. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याची विभागणी झाली आणि मॅसिडोनियाचे राज्य त्याच्या ज्या वंशजांच्या हातात आले त्यांना काहीशा सक्तीनेच आपले लक्ष ग्रीस व यूरोपची भूमी यावर केंद्रित करावे लागले. म्हणजे ग्रीक राजकारणातील वादात आणखी एक घटक येऊन मिळाला आणि हा घटक केवळ स्वतःच ग्रीसमध्ये आला असे नाही, तर अलेक्झांडरच्या साम्राज्यविभाजनातून उद्‌भवलेल्या सर्व गोष्टी-हितसंबंध घेऊन ग्रीसमध्ये आला. यापुढचा (इ.स.पू. ३२३ नंतरचा) ग्रीसचा राजकीय इतिहास म्हणजे ग्रीक ऐक्य, संस्कृती व वैभव यांच्या क्रमाक्रमाने होत गेलेल्या ऱ्हासाची नोंद होय. राजकीय जीवनात सुसूत्रता राहिली नसल्याने या काळातील घडामोडींचे सुसूत्र कथनही सलगपणे करता येत नाही.


मॅसिडोनियन राज्यकर्त्यांचे ग्रीसवर सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सतत चालू राहिले आणि या कामी त्यांनी वरचढ सैन्यबलाचाही वापर केला, तरी त्यांना यश आले नाही. इ.स.पू. २५o च्या सुमाराला अलेक्झांडरच्या नावाचा व सैन्याचा दाब पूर्णपणे नष्ट झाला, त्या वेळचे राजकीय चित्र बरेच स्पष्ट दिसते. मोठाली नगरराज्ये पुन्हा आपल्या पायावर उभी राहिली होती आणि छोट्या छोट्या नगरांचे मिळून दोन मुख्य राज्यसंघही निर्माण झाले होते. या नव्या रचनेत सर्वांत महत्त्वाचे स्थान इटोलियन राज्यसंघास होते. कॉरिंथ आखाताच्या उत्तरेचा सर्व मध्य ग्रीस यात समाविष्ट झाला होता. थोड्याच अवधीत पेलोपनीससच्या वायव्य कोपऱ्यावरील ईलिसही यात सामील झाले. कोणतेच मोठे शहर या संघात नसल्यामुळे नेतृत्व अथवा संपत्ती केंद्रित होण्याचा धोका नव्हता, ॲपोलोचे क्षेत्र जे थर्मस् तेथे सर्वांच्या प्रतिनिधींची बैठक भरे. संरक्षण, परराष्ट्रसंबंध अशा गोष्टी एकमेकांच्या विचाराने ठरवीत. एरवी आपापले घर जो तो चालवी. द्वीपकल्पातील बहुतेक लहानमोठी राज्ये या संघात सामील झाली होती. या संघातील परस्परसंबंध, स्पर्धा व संघर्ष याच स्वरूपाचे असल्याने इटोलियन संघ व स्पार्टाविरुद्ध ॲकियन संघ व मॅसिडॉन यांची युती यांना परिस्थितीनुसार पाठिंबा देण्याचे धोरणच अथेन्सने अंगीकारले होते.

शासनसंघटनेच्या स्थित्यंतराचे जे मूलकारण आर्थिक विषमता, ते सर्व नगरांतून इतक्या अनेकविध प्रयोगांनंतरही शिल्लकच होते व ते त्यांना अस्वस्थ करीत होते. थोडक्यात, ग्रीसच्या राजकीय व सामाजिक विभाजनाचे व या अलग पडलेल्या घटकांची एकमेकांवर मात करण्याच्या प्रयत्नांचे प्राचीन चित्रच अजूनही कायम दिसत होते. मॅसिडॉनने त्यात मोठीच अस्थिरता उत्पन्न केली. पण त्यानंतर येणारी जी दुसरी बाह्य शक्ती रोम, तिने ग्रीक स्वातंत्र्यच लयाला नेले. आक्रमक आणि प्रसरणशील अशा या सत्तेचा ग्रीसशी केव्हाना केव्हा संबंध येणार हे उघड होते पण गमतीची गोष्ट अशी की, जी गोष्ट पुढे केव्हा तरी घडावयाची ती ग्रीकांनी आपल्या हातांनी लवकर ओढवून घेतली. या नगरराज्यांनी पूर्वी इराणच्या बाबतीत जी चूक केली तीच आता रोमच्या बाबतीतही केली. एकमेकांविरुद्ध रोमची मदत मागावयास आरंभ केला. एकदा हस्तक्षेपाला प्रारंभ केल्यावर कोठे थांबावे याचे परकीय सत्तेला भान राहत नाही, तिला कोठे थांबवावे हे भांडखोरांना उमजत नाही. जेव्हा उमजते तेव्हा उशीर झालेला असतो, हस्तक्षेप थोपविण्याची शक्ती त्या वेळी त्यांच्या अंगी उरलेली नसते.

या विविध प्रवाहांतून ग्रीसच्या या पुढच्या राजकीय जीवनाची घडण झाली. पहिले मॅसिडोनियन युद्ध इ.स.पू. २१४ ते २o६ मध्ये झाले. फिलिपविरुद्ध इटोलियन संघ व रोम यांची युती झाली. रोममध्ये युद्धविरोधी गट सत्तेवर आल्याने युद्ध संपुष्टात आले. दुसरे मॅसिडोनियन युद्ध इ.स.पू. १९६ मध्ये झाले. या युद्धातील पक्ष पहिल्याप्रमाणेच होते. फिलिपचा पराभव झाला. इ.स.पू. १९४ मध्ये रोमद्वारा ग्रीक नागरिक आणि नगरराज्ये यांच्या स्वातंत्र्याची व स्वायत्ततेची ग्वाही मिळाली आणि हळूहळू सर्व राज्यसंघ संपुष्टात आले. त्यानंतर तिसरे मॅसिडोनियन युद्ध होऊन मॅसिडोनियाची चार तुकड्यांत विभागणी झाली. रोमन सत्ता झुगारण्याचा शेवटचा महत्त्वाचा प्रयत्न ग्रीकांनी मॅसिडोनियाच्या नेतृत्वाने इ.स.पू. १४८ मध्ये केला. तो दडपण्यात येऊन रोमन प्रशासकाची ग्रीसवर नेमणूक करण्यात आली. मॅसिडोनियासारखे ग्रीसच्या इतर भागांचेही विभाजन होऊन सर्व नगरराज्यांचे स्वातंत्र्य हळूहळू नष्ट होत गेले. प्रत्येकावर तहाद्वारे अथवा प्रत्यक्ष प्रशासक नेमून रोमचे नियंत्रण अस्तित्वात आले. इ.स.पू. १२९ मध्ये आयोनियातील प्रमुख राज्ये रोमने खालसा केली. साहजिकच या सुमारास ग्रीक संस्कृतीचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व संपुष्टात आले, असे म्हणता येईल.

सांस्कृतिक स्थिती : जीवन व जग एवढे अस्थिर व राजकीय धामधुमीचे असतानाही ग्रीकांची सांस्कृतिक प्रगती खुंटली नव्हती. राजकीय इतिहासाप्रमाणे ग्रीक सांस्कृतिक जीवनाचेही निरनिराळे कालखंड कल्पिले आहेत. डोरियन आक्रमणानंतरची दोन शतके हा पहिला खंड. सामाजिक दृष्ट्या हा खंड अस्थिरतेचा, अनिश्चिततेचा आणि ज्याच्या जीवनाविषयी आज फारशी माहिती उपलब्ध नाही, असा आहे. या कालखंडास अंधःकारयुग म्हणतात. इ.स.पू. आठवे -सातवे शतक, म्हणजे अंधःकारयुगानंतर लगतचा काळ, हा पुनरुज्जीवनाचा काळ म्हणून ओळखतात. अंधःकारयुगातून पुनरुज्जीवनाकडे ग्रीसला नेणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात झालेली व्यापार आणि वसाहती यांची अमाप वाढ. ग्रीक जीवनाची क्षितिजे केवळ शाब्दिक नव्हे, तर लाक्षणिक अर्थानेही आता रुंदावली होती. यास पुनरुज्जीवन शब्द वापरतात. त्या वेळी मायसीनियन अथवा क्रीट संस्कृतीचे पुररुज्जीवन असा अर्थ अभिप्रेत असेल, तर तो अतिशय दुरान्वयानेच समजावा लागेल. ग्रीक समाजाने पुन्हा एकदा सांस्कृतिक क्षेत्रात हालचालींना आरंभ केला एवढाच अर्थ स्वीकारावा लागेल. परंतु या हालचालींमागे प्रेरणा होती ती प्राचीनांच्या कल्पनांची असे म्हटले, तर त्या कल्पना केवळ मायसीनियन वा क्रीटच्या नसून मुख्यत्वे पौर्वात्य होत्या. या काळाच्या आरंभीच काय पण ऐन अभिजात कालातही (इ.स.पू. सहावे ते पाचवे शतक) विविध क्षेत्रांत अग्रगण्य समजता येण्यासारखी कितीतरी माणसे खुद्द ग्रीक भूमीवरील नसून आयोनियातील होती. तेथे मायलीटस हे सांस्कृतिक प्रगतीचे केंद्र होते. इराणी युद्धानंतर आयोनियाची पडझड झाल्याने हे केंद्र पश्चिमेकडे सरकून ॲटिकात – मुख्यत्वे अथेन्समध्ये – स्थिर झाले. येथेच पेरिक्लीझच्या प्रदीर्घ आणि प्रगतिशील प्रशासनाखाली संस्कृतीचा हा वृक्ष बहरला, अभिजात संस्कृती कळसाला पोहोचली. पेलोपनीशियन युद्धांच्या काळात नासधूस फार झाली, विपन्नावस्था प्राप्त झाली हे तर खरेच पण यापेक्षा वाईट म्हणजे काहीसा नैराश्यवाद पसरून स्वतंत्र प्रतिभा, जिज्ञासू वृत्ती आणि आरंभीच्या काळात दिसणारी विजिगीषू प्रवृत्ती आता लुप्त झाली होती. पूर्वीप्रमाणे गणित, वैद्यक आदी क्षेत्रांत अध्यापन-अध्ययन व क्वचित संशोधनही होत राहिले. तसेच साहित्य, कला, तत्त्वज्ञान या क्षेत्रांतील विचारप्रवाह केवळ रोडावले एवढेच नव्हे, तर काही वेळा गोठूनही गेलेले दिसतात. प्लेटोच्या सबंध विचारसरणीवर, अथेन्सचा विनाश, त्याची कारणमीमांसा व परिणाम यांची दाट छाया दिसते. पेलोपनीशियन विनाशसत्राचा दुसरा परिणाम असा की, ग्रीक सांस्कृतिक आणि राजकीय एकात्मतेला स्पष्ट आकार देण्याची जाणीव जास्त तीव्रतेने भासू लागली. यासाठी बौद्धिक पीठिका आयसॉक्राटीझसारख्या विचारवंतांनी उत्पन्न केली, तर ती प्रत्यक्षात उतरविण्याचा यत्न फिलिप व अलेक्झांडर या पितापुत्रांनी केला. त्यांच्या बरोबरच स्वतंत्र ग्रीक स्फुरणाचा अस्त झाला, असे मानण्यास प्रत्यवाय नाही. यानंतर ग्रीकांश कल्पना अधिक प्रचलित झाल्या.


प्राचीन समाजात धर्म अत्यंत महत्त्वाची बाब समजत. रूढी आणि परंपरा यांभोवती गुरफटलेली, त्यांना चिकटून राहणारी बाब म्हणून या क्षेत्रातील पुनरुज्जीवनाचा आढावा या दृष्टीने घेणे उद्‌बोधक आहे. ऑलिंपस पर्वताच्या शिखरावरून चराचर सृष्टीचे नियंत्रण करणारे जे देवमंडळ होमर याने रंगविले होते, त्याला नगरराज्यांच्या स्वायत्ततेला थोडेस बाळसे चढल्याबरोबर तडे गेले. ग्रामदेवता, नगरदेवता यांचा प्रभाव वाढू लागला. धार्मिक व राजकीय श्रद्धास्थानांचे एकत्रीकरण झाले. अथेन्समध्ये अथीना, स्पार्टात आर्टेमिस, तर कॉरिंथमध्ये अपोलो ही राजकीय स्वायत्ततेची प्रतीके ठरली. या फुटीरपणाविरुद्ध राजकीय विचारसरणी याच वेळी बळकट व्हावयास लागली, देवदेवतांचे स्वातंत्र्य प्रथम नष्ट केले. झ्यूसच्या कुटुंबाचे – भाऊ, बहिणी, मुले-मुली यांचे – अधिराज्य जगतावर निर्माण झाले, या प्रत्येकाकडे वेगवेगळ्या शाखा सोपविल्या होत्या. हिफेस्टस हा शिल्पविद्येचा, हर्मीझ हा नारद, पोसायडन हा वरुण, या सर्वांच्या प्रार्थना, पूजाअर्चा, बळी, उपासना जारी होत्या. या विशिष्ट देवदेवतांखेरीज काही प्राचीन देवतांची पूजाअर्चा करणारे पंथ अस्तित्वात होते. यांना गुह्य संप्रदाय (मिस्टरी रिलिजन्स) असे नाव आहे. यांत इल्यूसिस व डायोनायसस हे प्रसिद्ध आहेत. केवळ परंपरागत श्रद्धा आणि कर्मकांड यांच्याशी निगडित असणाऱ्या या क्षेत्राबरोबर पुनरुज्जीवनाच्या कालखंडात विशुद्ध ब्रह्यजिज्ञासेचा पाठपुरावा झालेला दिसतो. विश्वाची उत्पत्ती आणि त्यातील कार्यकारणभाव अशांसारख्या विषयांवर नव्या नव्या कल्पना प्रतिपादण्यात येऊ लागल्या. आत्मा, त्याचे अमरत्व, पुनर्जन्म, कर्मफल या कल्पनांना विचारी तत्त्वज्ञांच्या विवेचनात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. यात ऑर्फिक संप्रदाय महत्त्वाचा होता त्यामुळे अध्यात्मचर्चा आणि विवेचन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. या विषयांत झेनोफन, पिओनोअस, पायथॅगोरस, सॉक्रेटीस, प्लेटो, ॲरिस्टॉटल अशा कितीतरी विचारवंतांची नावे सांगता येतील. यांपैकी प्रत्येकजण फक्त आध्यात्मिक चर्चेतच गुंग होता असे नव्हे. त्यांनी सृष्टीचे निरीक्षण, खगोलाचे यमनियम, पदार्थविज्ञान इ. क्षेत्रांत विस्तृत भ्रमण केले व तात्त्विक विचारांना निरीक्षणांची जोड दिली.

असा प्रयोग चालू राहावयाचा असेल, तर एका विशिष्ट बौद्धिक पातळीचा समाज तेथे हवाच. त्यासाठी शिक्षणाची आवश्यकता होती. आपापल्या व्यावसायाचे शिक्षण ज्याला त्याला आपापल्या वाडवडिलांकडून मिळे. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण असे भाग फक्त इतर बौद्धिक शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असत. प्राथमिक अवस्थेत शारीरिक शिक्षण, काही गणित व लेखन-वाचन असे, तर माध्यमिक पायरीवर नीतिशास्त्र, भूमिती, राज्यशास्त्र अशा विषयांचा परिचय करून देत. अथेन्स इतके साक्षरतेचे प्रमाण अन्य कोणत्याच प्राचीन समाजात नव्हते, असा निर्वाळा तज्ञ देतात. मुख्य मुद्दा स्पष्ट करावयास हवा तो असा, की शिक्षणावर धर्म व पुरोहित वर्ग यांची पकड निर्माण न होता स्वतंत्र पाठशाळा व हवे ते विषय अशी व्यवस्था किंवा गैरव्यवस्था येथे अंमलात आली.

काव्य, नाट्य, संगीत या सर्व क्षेत्रांत ही बंधनमुक्ततेची भावना दिसते. नव्या प्रयोगाला माणसे सिद्ध झाली होती. पन्नास माणसांच्या समूहगायनाऐवजी पंधराचे, पंधरांऐवजी बारांचेच व शेवटी तीनच पात्रांचे रूढ झाले. संगीतकथा जाऊन त्याऐवजी संवादाद्वारे कथानक उलगडण्याची प्रथा रूढ झाली. यापुढे कथानके केवळ धार्मिक राहिली नाहीत. बाह्य पेहराव रंगविलेले प्रसंग व पात्रे पौराणिक असली, तरी त्यांचा आशय आणि भाषणे सद्यस्थितीलाच अनुलक्षून असत. शोकात्मिका व सुखात्मिका हे नाट्यप्रकार रूढ झाले. नाट्यसंगीत हे केवळ अर्चनाचे भाग न राहिल्याने डायोनायससच्या स्थंडिलाऐवजी गोल रंगमंच वापरात आले. वास्तुशिल्पादी क्षेत्रांत टेकड्यांच्या उतारावर बांधलेली प्रेक्षागृहे, तसेच पार्थनॉनसारखी मंदिरे निर्माण झाली. फिडीयसच्या शिल्पांनी या सर्वांना जिवंतपणा आणला.

या सांस्कृतिक उलाढालीत शेवटी उल्लेख करावयाचा तो ग्रीक बखरकारांचा. हीरॉडोटस, थ्यूसिडिडीझ, झेनोफन, पोलिबिअस, थीओपॉम्पस अशा सारख्यांनी ज्ञात इतिहास आणि समकालीन घटना नोंदविल्या. त्यांपैकी प्रत्येकजण ज्ञात अशा संस्कृत जगतात डोळसपणे फिरून आलेला होता आणि आपल्या समृद्ध अनुभवाच्या आणि निरीक्षणाच्या द्वारे बाहेरच्या जगताचा परिचय त्यांनी सामान्य ग्रीक माणसांना घडविला. प्रचंड व वैभवशाली वास्तू, संपन्नता, शासनसंघटना या सगळ्या गोष्टी इतरही प्राचीन समाजांनी प्राप्त करून घेतल्या. ग्रीकांचे वैशिष्ट्य हे की, परंपरा भ्रष्ट वा नष्ट झालेल्या एका समाजाने निराळे आदर्श उत्पन्न केले आणि त्या ऋणात स्वतःला गुरफटून न घेता काही शतके तरी मानवी प्रज्ञेला वाव दिला. ही मानवी समाजाला ग्रीकांकडून मिळालेली देणगी होय. 

पहा : ग्रीक कला ग्रीक तत्त्वज्ञान ग्रीक धर्म.

संदर्भ : 1. Bury, J. B. A History of Greece, New York, 1939.

   2. Bury, J. B. Cook, S. A. Adcock, F. E. Charlesworth, M. P. Ed., The Cambridge Ancient History, Cambridge, 1953.

   3. Durant, Will, The Life of Greece, New York, 1939.

   4. Livingstone R. W., Ed., The Legacy of Greece : Essays by Gilbert Murray and Others,

       London, 1952.

माटे, म. श्री.


तथाकथित लुडोव्हिसी सिंहासन, संगमरवर पश्चिम ग्रीस इ.स.पू. ४६९-४५९पंखधारी स्त्री-प्रतिमा, थीब्झ, इ.स.पू. ६ वे शतक.विशीर्ष देवतामूर्ती : इ.स.पू. ५ व्या शतकातील मूळ ॲटिक शिल्पाची प्रतिकृती.भौमितिक चित्रांकन केलेला मद्यकुंभ, इ.स.पू. सु. ८ वे शतक.हीफेस्टसचे मंदिर, अथेन्स इ.स.पू.सु. ४४९-४४४.