सूर्यवंश : मनू प्रजापतीचा जेष्ट पुत्र इक्ष्वाकू याच्या पासून सुरु झालेल्या वंशाला सूर्यवंश असे नाव पडले. याच्या शाखांचे राज्य कोसल, विदेह, वैशाली आणि सुराष्ट्र या प्रदेशांवर होते. मनूने इक्ष्वाकूला मध्यदेशाचे राज्य दिले होते. त्याला विकुक्षी, निमी आणि दंड असे पुत्र झाले. विकुक्षी अयोध्येस राज्य करु लागला. निमीने विदेहावर आपला अंमल बसविला. दंडाने दक्षिणेत आपली सत्ता स्थापिली. त्याने एका ब्राह्मण कन्येवर अत्याचार केल्यामुळे तिच्या पित्याच्या शापाने त्याचा देश उद्ध्वस्त होऊन तेथे त्याच्या नावाने दंडकारण्य निर्माण झाले.

अयोध्येच्या शाखेतील द्वितीय युवनाश्वाला मांघातानामक पुत्र झाला. त्याने शंभर अश्वमेध आणि राजसूय यज्ञ केले. भारताच्या आद्य चक्रवर्ती सम्राटांत त्याची गणना होते. त्याने दिलेल्या दानांचे स्तुतिपर श्लोक पुराणांत आले आहेत. त्याचा पुत्र पुरुकुत्स याने नागांचा उच्छेद करुन नर्मदेपर्यंत आपली सत्ता पसरविली.

पुढे या वंशात सत्यव्रत ऊर्फ त्रिशंकू आणि हरिश्चंद्र हे विख्यात राजे होऊन गेले. त्रिशंकूच्या दुवर्तनामुळे त्याच्या पित्याने त्याला हद्दपार केले होते पण विश्वामित्राने त्याला पैतृक राज्य मिळवून दिले. त्याचा पुत्र हरिश्चंद्र आपल्या सत्यवादित्वाबद्दल भारतीय कथावाङ्‌मयात सुप्रसिद्घ आहे.

हरिश्चंद्रानंतर सहाव्या पिढीतील बाहूला त्याच्या मृत्यूनंतर सगर हा पुत्र झाला. त्याने हैहयांवर स्वारी करुन त्याच्या शक, काम्बोज, पहूलव आदी परकी साहाय्यकांचा पराजय केला. सगराने उत्तर भारतातील विशाल प्रदेश जिंकून चक्रवर्ती पदवी धारण केली होती.

सगराचा नातू भगीरथ याची गणना प्राचीन काळाच्या सोळा विख्यात नृपतींत केली जाते. त्याने कालवे खणून गंगेच्या प्रवाहाची दिशा बदलवून तिला भारतात आणले म्हणून त्या नदीला भागीरथी असे नाव पडले.

भगीरथानंतर तिसऱ्या पिढीतील ऋतुपर्ण याचे नाव नलदमयंतीकथेत येते. त्याचा पुत्र सुदास हा वैदिक काळाच्या सुदासाहून भिन्न होय. सुदासाचा पुत्र मित्रसह याने चुकीने वसिष्ठाला नरमांस भोजनास दिल्यावरुन त्याच्या शापाने मित्रसहाला राक्षसरुप प्राप्त झाल्याची कथा आहे. त्यानेही क्रोधाने वसिष्ठाला शाप देण्याकरिता घेतलेले जल शेवटी आपल्या पायांवर टाकल्यामुळे ते पाय काळे झाले आणि त्याला कल्माषपाद नाव पडले. या शापाचा संबंध वैदिक सुदासाशी जोडण्यात येऊन तो स्वतःच्या अविनयाने नाश पावला अशी समजूत प्रचलित झाली, तिचा उल्लेख मनुस्मृती त (७, ४१) आला आहे.

सुदास कल्माषपादाला अश्मक आणि त्याला मूलक असे पुत्र झाले. त्यांनी आपल्या नावे दक्षिणेत गोदावरीच्या परिसरात राज्ये स्थापिली.

पुढे अयोध्येच्या शाखेत चक्रवर्ती दिलीप, रघू, अज, दशरथ असे विख्यात राजे होऊन गेले. रघूच्या आदर्श जीवनक्रमामुळे या शाखेला रघुवंश असे नाव प्राप्त झाले. दशरथपुत्र रामाने दक्षिणेत लंकेपर्यंत आर्य संस्कृतीचा प्रसार केला. त्याच्या आदर्श राज्यव्यवस्थेमुळे रामराज्य ही उत्क्रृष्ट राज्याची संज्ञा प्रचलित झाली आहे.

रामाने आपले राज्य आपल्या बंधूंत आणि पुत्रांत वाटून दिले. भरतपुत्र तक्ष आणि पुष्कर यांनी गंधर्वांकडून गांधार देश जिंकून तक्षशिला आणि पुष्करावती येथे आपल्या राजधान्या केल्या. लक्ष्मणपुत्र अंगद आणि चंद्रकेतू यांनी हिमालयाच्या पायथ्याशी आपली राज्ये स्थापिली. शत्रुघ्नाने यादवांचा पाडाव करुन मधुपुरी किंवा मथुरा येथे आपला पुत्र सुबाहू याला राजा केले. रामाचा ज्येष्ठ पुत्र कुश याला दक्षिण कोसल प्रदेश दिला होता. पण नंतर तो अयोध्येस जाऊन राज्य करु लागला. लवाला उत्तर कोसल मिळाला. त्याची राजधानी श्रावस्ती होती.

रामानंतर अयोध्येच्या शाखेला उतरती कळा लागली. त्या शाखेतील शेवटचा राजा बृहद्वल हा भारतीय युद्घाच्या काळी राज्य करीत होता. कर्णाने त्याचा पराजय केल्यावर तो दुर्योधनाच्या पक्षास मिळाला होता. त्या युद्घात अभिमन्यूने त्याचा वध केला.

सूर्यवंशाच्या इतर शाखा विशेष प्रसिद्घ नाहीत. इक्ष्वाकुपुत्र निमी याने विदेहात राज्य स्थापिले होते. त्याच्या मिथीनामक पुत्रावरुन राजधानीला मिथिला हे नाव पडले. त्याला जनक असेही दुसरे नाव होते, म्हणून त्याच्या वंशजांना जनक नाव प्राप्त झाले. मनुपुत्र नाभाग याच्या विशालनामक वंशजाने विशाला (सध्याचे मुझफरपूर) येथे गादी स्थापिली होती. दुसऱ्या शर्यातीनामक पुत्राने उत्तर गुजरात जिंकून तेथे आपला अंमल बसविला होता. त्याच्या आनर्तनामक पुत्रावरुन त्या प्रदेशाला आनर्त नाव मिळाले.

वैशाली शाखेतील अविक्षिताचा वंशज आणि कामप्रीचा पुत्र मरुत्त हा प्राचीन काळचा विख्यात चकवर्ती राजा होता. त्याचा उल्लेख ऐतरेय आणि शतपथ ब्राह्मणात येतो. याला संवर्त ऋषीने राज्यभिषेक केला होता. याने अनेक नागांचा उच्छेद करुन आपले राज्य वाढविले होते. त्याच्या यज्ञांतील सर्व पात्रे सुवर्णाची होती आणि त्या यज्ञांत सर्व देव साक्षात उपस्थित असत असे म्हटले आहे. महाराष्ट्रात देवपूजेच्या अखेरीस म्हटले जाणाऱ्या मंत्रपुष्पात याचे वर्णन येते.

रामायणकाळी विदेहात सीरध्वज जनक हा विख्यात राजा होऊन गेला. त्याने सांकाश्यच्या सुधन्वा राजाला जिंकून तेथे आपल्या कुशध्वजनामक भावाची स्थापना केली. सीरध्वजाच्या सीता आणि उर्मिला यांचा विवाह अनुक्रमे राम आणि लक्ष्मण यांच्याशी आणि कुशध्वजाच्या मांडवी आणि श्रुतकीर्ती यांचा विवाह भरत व शत्रुघ्न यांच्याशी झाला होता. आंध्र देशात ख्रिस्तोत्तर तिसऱ्या शतकात उदयास आलेले राजे आपण इक्ष्वाकुकुलातील आहोत असा अभिमान बाळगत असत.

पहा : इक्ष्वाकु.

संदर्भ : Majumdar, R. C. Pusalkar, A. D. Eds. The History and Cultureof the Indian People, The Vedic Age, Vol. I., London, १९९०.

मिराशी, वा. वि.