लॉरेन्स, सर जॉन लेअर्ड मेअर : (४ मार्च १८११-२७ जून १८७९) ब्रिटिशांकित हिदुंस्थानातील गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय (कार, १८६४-६९) त्याचा जन्म रिचमंड (यॉर्कशर) येथे मध्यवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील कर्नल अलेक्झांडर टिपूबरोबरच्या श्रीरंगपटणम्‍ येथील शेवटच्या लढाईत सहभागी होते. त्याचे भाऊ हेन्‍री व जार्ज हिंदुस्तानात सनदी सेवेत होते. त्याने हेलिबेरीमध्ये शिक्षण घेऊन हिंदुस्तानातील कलकत्ता येथील ईस्ट इंडिया कंपनीत सनदी नोकरीत प्रवेश (१८२९). पुढे दिल्ली येथे तो साहय्यक जिल्हाधिकारी झाला आणि तेथेच तो जिल्हाधिकारी बनला. त्याने १८२९-४९ दरम्यान या भागाचे सूक्ष्म निरीक्षण केले . मध्यंतरी प्रकृती अस्वास्थानिमित्त तो आयर्लंडला गेला. तेथून परतल्यानंतर दिल्लीच्या दिवाणी कोर्टात काही दिवस न्यायाधीश म्हणूनही त्याने काम केले. पंजाबमधील पहिल्या इंग्रज-शीख युद्धात त्याने दिल्लीहून इंग्रंजांना मदत पाठविली. म्हणून जालंदर दुआब येथे त्याची आयुक्त व नंतर पंजाबचा मुख्य आयुक्त म्हणून नेमणूक झाली (१८५३). राज्यकारभाराच्या सुलभतेसाठी त्याने पंजाबची बत्तीस जिल्ह्यांत व छत्तीस मांडलिकी राज्यांत विभागणी करून अनेक सुधारणा केल्या. शिखांना त्याने इंग्रजी लष्करात दाखल करून घेतले. डलहौसीच्या विस्तारवादी धोरणाचा त्याने पाठपुरावा केला. त्यामुळे १८५७ च्या उठावात पंजाब शांत राहिला आणि परिणामतः दिल्लीचा पुन्हा कबजा घेता आला. उठावातील कामगिरीबद्दल त्याला उमरावपद मिळाले व प्रिव्ही कौन्सिलर करण्यात आले. त्यानंतर त्याची व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली (१८६४). 

अफगाणिस्तानात दोस्त महंमद मरण पावल्यामुळे गादीबद्दल निर्माण झालेल्या तंट्यात त्याने सामोपचाराचे धोरण अंगीकारले तथापि भूतानने ब्रिटीश प्रदेशावर हल्ले केल्यामुळे लॉरेन्सला तिथे सैन्य पाठविणे भाग पडले. त्याने पुढे दुआर प्रदेश जिंकला. १८६५ मध्ये झालेल्या तहानुसार भूतातने दुआर प्रांत इंग्रंजांना दिला. १८६६ मध्ये ओरिसात व १८६८-६९ मध्ये बुंदेलखंडांत दुष्काळ पडले. लॉरेन्सने दुष्काळ निवारणार्थ दुष्काळ आयोगाची स्थापना करून त्याच्या शिफारशी अंमलात आणल्या. पाच वर्षांच्या कारकीर्दीत त्याने तटस्थतेच्या धोरणाचा पुरस्कार केला. दळणवळण सुलभ व्हावे म्हणून त्याने रेल्वेने क्षेत्र वाढविले आणि पाटबंधारे खाते सुरू करून शेतीस उत्तेजन दिले. पंजाब व अयोध्या प्रांतांत त्याने कुळकायदा जारी करून शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी मिळवून दिली. कायदेशीर रीतीने जमिनीची कंड वाढविण्याची सोय केली. उत्पादक योजनांसाठी त्याने कर्ज देण्याचीही व्यवस्था केली. १८६९ मध्ये लॉरेन्स इंग्‍लंडला गेला. त्याच्या सौम्य धोरणावर टीका झाली, तरी पंजाबमधील त्याच्या कार्याबद्दल ‘ब्रिटीश राज्याचा संरक्षणकर्ता’ हा किताब त्याला मिळाला.

तो इंग्‍लंडला परतरल्यानंतर त्याला पंजाब व ग्रेटली (हॅम्पशर) यांचा लॉर्ड (बॅरन) करण्यात आले (१८६९). यावेळी दुसरे अफगाण युद्ध सुरू झाले. उर्वरित जीवन त्याने पार्लमेंटचा सदस्य म्हणून व्यतीत केले. त्यावेळी पार्लमेंटमध्ये (लॉर्ड्‍स सभेत) लॉरेन्सने आपल्या धोरणाचे समर्थन केले. पुढे त्याने शैक्षणिक संस्था व चर्च यांतील सुधारणांना अखेरपर्यंत वाहून घेतले. तो लंडन येते मरण पावला.

संदर्भ : 1. Balfour, Lady Betty, History of Lord Lyttons Administration, London, 1899.

            2. Kulkarni, V. B. British Statesmen in India, Bombay, 1961.

            3. Smith, Bosworth, Life of Lord Lawrence, 2 Vols., London, 1883.

देशपांडे, सु. र.