संबळपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील एक जुने संस्थान. ओरिसा राज्यातील या भूतपूर्व संस्थानाला ब्रिटिशपूर्व काला-पासूनचा इतिहास आहे. कोसलानंद काव्य,जयचंद्रिका (प्रल्हाद दुबे) आणि चिकित्सा मंजरी या गंथांतून संबळपूरविषयी विश्वसनीय माहिती मिळते. सोळाव्या शतकात महानदीकाठच्या भागात बलरामदेवाने स्वतंत्र गादी स्थापन केली. समलाई देवतेवरून या स्थळास संबळपूर हे नाव पडले. बलरामदेव पराक्रमी व कार्यक्षम प्रशासक होता. बलरामदेवच्या मृत्यूनंतर हृदयनारायण (कार. १६००-०५), त्याचा मुलगा बलभद्रदेव (कार. १६०५-३०), त्याच्यानंतर मधुकरदेव (कार. १६३०-६०) आणि बलियरसिंग (कार. १६६०-९०) हे राज्यर्ते} झाले. बलियरसिंग हा संबळपूरच्या इतिहासातील सर्वांत कर्तृत्ववान, कलाभिज्ञ, उदार आणि कार्यक्षम राजा होय. त्याच्या दरबारात पंडित गंगाधर मिश्र हा कवी होता. त्याने कोसलानंद काव्य लिहिले. त्याच्यानंतर छत्रसाई (कार. १६९०-१७२५) हा ज्येष्ठ पुत्र गादीवर आला. छत्रसाईचा राजवैदय गोपीनाथ सारंगी याने चिकित्सा मंजरी नावाचा आयुर्वेदावरील गंथ संस्कृत व ओडिया अशा दोन्ही भाषांत लिहिला. त्यातील काही उल्लेखांवरून या राज्यात १८ किल्ले आणि १३ दंडपट्ट असून, राज्याची लोकसंख्या २०,००० होती.

अजितसिंग याच्या कारकीर्दीत (१७२५-६६) संस्थानात बेबंदशाही माजली. रॉबर्ट क्लाइव्हने संबळपूरला भेट देऊन हिृयाच्या व्यापारासाठी अयशस्वी प्रयत्न केले. त्याच्यानंतर अभयसिंग राजाच्या कारकीर्दीत (१७६६- ७८) अकबर राय ह्या शिरजोर दिवाणाने अभयसिंगाला तुरूंगात टाकले. तिथेच तो मरण पावला. त्यानंतर अकबर रायने पद्मपूरच्या चौहान घराण्यातील बलभद्रसाई नावाच्या मुलास संबळपूरच्या गादीवर बसविले तेव्हा अभय-सिंगाचा धाकटा भाऊ जयंतसिंग याने गढमंडाले, छत्तीसगढ वगैरेंकडून मदत घेऊन संबळपूरवर स्वारी केली. त्याने अकबर राय, बलभद्र यांना पकडून ठार केले आणि स्वतःस राजा म्हणून जाहीर केले (१७८१) परंतु नागपूरकर भोसल्यांच्या हल्ल्यांमुळे जयंतसिंगास ३२,००० रू. वार्षिक खंडणी मान्य करावी लागली. तेवढयावर भोसल्यांचे भागले नाही, म्हणून त्यांनी संबळपूर काबीज करून राजास चांदयाच्या (चंद्रपूर) तुरूंगात ठेवले (१८००) आणि भूपसिंग या आपल्या सेनापतीस राज्यपाल नेमले. सु. नऊ वर्षे भोसल्यांची सत्ता संबळपूरवर होती. भूपसिंग शिरजोर झाल्यावर त्याच्याविरूद्घ रघुजींनी सैन्य धाडले. तो पळाला व इंग्रजांना मिळाला. भूपसिंगच्या जागी तात्या फडणीस यास राज्यपाल केले. पुढे ब्रिटिशांनी भूपसिंगच्या सहकार्याने संबळपूर घेतले (१८०४). संबळपूरची राणी आणि मांडलिकांनी ब्रिटिशांची सत्ता मानली, तेव्हा जयंतसिंग पुन्हा गादीवर आला. जयंतसिंगच्या मृत्यूनंतर (१८१८) त्याचा मुलगा महाराजसाई गादीवर आला (१८२०) परंतु ब्रिटिशांनी त्याचे अधिकार मर्यादित केले. त्याच्यानंतर (१८२७) ब्रिटिशांनी मोहन कुमारी या विधवा राणीस (कार. १८२७-३३) वारसाहक्काचे पारंपरिक नियम व स्थानिक रूढी डावलून संबळपूरच्या गादीवर बसविले. साहजिकच गोंड व बंजाहल जमीनदारांनी बंड केले. तेव्हा अखेरीस ब्रिटिशांनी तिला दूर करून चौहान घराण्यातील नारायणसिंग यास गादीवर बसविले. नारायणसिंगाच्या मृत्यूनंतर अधिकृत वारस नाही, या सबबीवर १८४९ मध्ये हे संस्थान खालसा करण्यात आले.

संदर्भ : 1. Das, Shiv Prasad, History of Sambalpur, Cuttack, 1963.

2. Senapati, Nilamani, Ed. Orissa District Gazetteers : Sambalpur, Cuttack, 1971.

देशपांडे, सु. र.