रेवा संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मध्य भारतातील एक भूतपूर्व मोठे संस्थान. कैमूर टेकड्यांमुळे नैसर्गिक दृष्ट्या संस्थानचे दोन भाग झाले होते. क्षेत्रफळ ३३,२८० चौ.किमी. लोकसंख्या सु. १८,२०,४४५ (१९४१). जहागीरदारांच्या उत्पन्नासह वार्षिक उत्पन्न सुमारे सव्वा कोटी रूपये. उत्तरेस बांदा-अलाहाबाद-मिर्झापूर, पूर्वेस मिर्झापूर-छोटा नागपूर जिल्हे, दक्षिणेस मध्य प्रांत, पश्चिमेस मैहर-नागोद-सोहावल-कोठी ही बाघेलखंडातील संस्थाने या सीमा. सत्तर टक्के जमिनी जहागीरदारांच्या व एकतृतीयांश संस्थानचा भूभाग जंगलव्याप्त होता. संस्थानात रेवा, सटणा, उमरिया (कोळशाच्या खाणी), गोविंदगढ ही प्रमुख शहरे असून ५,५६५ खेडी होती. रेवा, रघुराजनगर (सटणा), तेओंथर, माऊगंज, बर्दी, रामनगर, सोहागपूर हे तहसील होते. गुजरातच्या मूळ सोळंकी वंशातील बाघेल राजपूत घराण्यातील करणदेव याने चौदाव्या शतकात मंडलाच्या कलचुरी राजकन्येबरोबर विवाह केला आणि हुंड्याच्या रूपात मिळालेल्या बांधोगढ येथे राजधानी केली. त्याने सासुरवाडीच्या जहागिरीचा विस्तार केला. पंधराव्या शतकात दिल्लीच्या लोदी सुलतानांशी या घराण्याच्या लढाया झाल्या. या घराण्यातील राजा भीर, शालिवाहन, बीरसिंगदेव, बीर्भान वगैरेंनी सत्ता उपभोगली. त्यानंतरचा ज्ञात राजा रामचंद्र (कार. १५५५-९२) हा होय. त्याच्या कारकीर्दीत अकबराच्या मजनूनखान काक्शाल याने कालिंजर किल्ला घेऊन बांधोगढच्या आधिपत्याखालील काही प्रदेश काबीज केला. रामचंद्राने अकबराचे मांडलिकत्व मान्य करून आपल्या पदरी असलेल्या तानसेन या प्रसिद्ध गायकाला मोगल दरबारी धाडले. रामचंद्रनंतर त्याचा मुलगा वीरभद्र गादीवर आला. तो अपघातात मरण पावला (१५९३). त्यानंतर अल्पवयीन मुलगा विक्रमादित्य (कार. १५९३ – १६४०) गादीवर आला परंतु राज्यातील अनागोंदीचा फायदा घेऊन अकबराने बांधोगढ जमीनदोस्त केला (१५९७). तेव्हा राजधानी रेव्याला हलविली व ती विक्रमादित्याने बांधून काढली (१६१८). विक्रमादित्यानंतर अनूपसिंग (कार. १६४०-६०) याला ओर्छाच्या पहाडसिंग बुंदेल्याने रेव्यातून बाहेर काढले. तेव्हा त्याने ओर्छाविरुद्ध मोगलांची मदत घेऊन पुन्हा राज्य मिळविले. त्यानंतर अनिरुद्धसिंग (कार. १६९० – १७००) गादीवर आला. त्याचा ठाकूरांनी खून केला. तेव्हा त्याचा मुलगा अवधूतसिंग (कार. १७००-१७५५) हा अल्पवयीन मुलगा गादीवर आला. १७३१ मध्ये पन्नाच्या हिर्डेशाहने हल्ला केल्यामुळे अवधूतसिंगला काही काळ परागंदा व्हावे लागले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांद्याने संस्थानावर १२ लाख चौथाई लादली. राणा जयसिंग (कार. १८०९ – ३५) याने वसईच्या तहानंतर ब्रिटिशांची मांडलिकी पतकरली (१८१२). तो विद्याभिलाषी होता आणि त्याच्या दरबारी काही  विद्वान होते. जयसिंगानंतर रघुराजसिंग (कार. १८५४ -८०) गादीवर आला. १८५७ च्या उठावातील मदतीबद्दल संस्थानाला सोहागपूर-अमरकंटक हे परगणे मिळाले. मराठ्यांनी ते घेतले परंतु पुन्हा ब्रिटिशांनी ते मिळवून दिले. रघुराजानंतर वेंकट रमनसिंग गादीवर आला (१८८०). त्याला  ब्रिटिशांनी महाराज, जी. सी. एस्‌. आय्‌. वगैरे पदव्या आणि १७ तोफांच्या सलामीचा मान दिला. त्याच्यानंतर गुलाबसिंग गादीवर आला परंतु ब्रिटिशांनी त्यास पदच्युत केले. त्यानंतर १९४६ मध्ये धीरज मार्तंडसिंग गादीवर आला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संस्थानात रेल्वे-डाक इ. सुविधा आल्या पण शिक्षण, आरोग्य यांत संस्थान काहीसे मागासलेलेच राहिले. रेवा शहराभोवती तटबंदी होती. संस्थानात अनेक पुरातत्त्वीय अवशेष असून माधोगढ, रामपूर, कुंडलपूर, अमरपाटण, मजहोली, काकोन्‌सिह वगैरे स्थळे प्राचीन वास्तूंसाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय संस्थानात काही जुनी वैष्णव व जैन मंदिरे आहेत. त्यांवर शिल्पकाम असून त्यांची वितानेही कलाकुसरयुक्त आहेत.

प्रशासनाच्या सोयीसाठी संस्थानाचे सात तहसीलांत विभाजन केले होते. त्यांवर तहसीलदार व ठाणेदार हे प्रमुख अधिकारी असत. राजाला फाशीच्या शिक्षेचा व अंतिम न्यायदानाचा अधिकार असे. त्याशिवाय दिवाण, कारिंदा, खासकलम इ. अधिकारी राज्यकारभार पाहात. संस्थान १९४८ मध्ये विलीन करण्यात येऊन विंध्य प्रदेशात व १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश राज्यात समाविष्ट झाले.

संदर्भ : Menon, V. P. The Story of the Integration of the Indian states, New Delhi, 1961. 

कुलकर्णी, ना. ह.