दॅयान, मोशे : (२० मे १९१५ – ). इझ्राएलचा एक सेनानी व मुत्सद्दी. त्याचा जन्म सधन ज्यू कुटुंबात दगानीया (पॅलेस्टाइन) येथे झाला. वडील श्मुएल शेतकरी होते. त्यांनी सहकारी कृषी वसाहत चळवळ (मोशाव्ह) सुरू केली. आई द्वोराह ही ज्यू राष्ट्रीय आंदोलनात पुढाकार घेणाऱ्या एका बुद्धिवंताची मुलगी. बालपणात तो वरचेवर आजारी पडे. त्यामुळे काही दिवस त्यास शालेय शिक्षण मिळाले. वयाच्या बाराव्या वर्षी तो हगनाह या ज्यूंच्या भूमिगत राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाला. परत तो काही दिवस शाळेत गेला. त्याची रूथ नावाच्या तरूणीशी गाठ पडली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर विवाहात झाले (१९३५). त्याला एल नावाची मुलगी व दोन मुलगे झाले. एल लेखिका म्हणून पुढे प्रसिद्धीस आली. त्याचा असफ हा मुलगा सिनेनट म्हणून प्रसिद्ध आहे. १९७१ मध्ये सु. ३६ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर त्याने रूथला घटस्फोट दिला.

ब्रिटिशांनी पॅलेस्टाइनमधील अरबांच्या बंडखोरीला आळा घालण्याकरिता कॅप्टन ऑर्ड विंगेट याच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र गनिमी लढाऊ दल संघटित केले (१९३६). त्यात मोशे दॅयान सहभागी झाला. ज्यूंना स्वातंत्र्यासाठी लढण्यास या दलाचा फार उपयोग झाला. हे शिक्षण घेऊन त्याने हगनाह चळवळ अधिक बलवान केली. ब्रिटिशांनी ती बेकायदेशीर ठरविली व १९४० मध्ये दॅयानला अटक करण्यात आली परंतु दुसऱ्या महायुद्धकाळात त्याची सुटका झाली (१९४१). तो ब्रिटिश सैन्यदलात नाझींविरुद्ध लढण्यासाठी भरती झाला. सिरियातील एका लढाईत तो जखमी झाला व त्याला आपला डावा डोळा गमवावा लागला. पुढे ब्रिटिशांचे महादिष्टित सरकार व ज्यू यांमध्ये झगडा चालू झाला, तेव्हा तो पुन्हा हगनाहमध्ये सामील झाला. या स्वातंत्र्यलढ्यात तो आघाडीवर असे (१९४८). जेरूसलेमच्या युद्धात त्याने नेतृत्व केले. युद्धानंतर तो रोड्झच्या युद्धबंदी परिषदेस इझ्राएलचा प्रतिनिधी म्हणून हजर राहिला (१९४९). पुढे स्वतंत्र इझ्राएलचा तो प्रमुख सेनानी बनला. १९५६ च्या सिनाईच्या लढाईत त्याने ईजिप्तचा पराभव केला आणि पुढे १९५८ मध्ये तो लष्करातून निवृत्त झाला. आपल्या जुन्या मित्राच्या–बेन-गूरिऑनच्या सल्ल्यानुसार त्याने राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वी हिब्रू विद्यापीठात दोन वर्षे त्याने राज्यशास्त्राचा अभ्यास केला होता व नेसेट या संसदेत मापाई या बेन-गूरिऑनच्या पक्षातर्फे निवडून आला. बेन-गूरिऑनने त्याला कृषिमंत्री केले (१९५९–६४). तथापि १९६३ मध्ये बेन-गूरिऑनचे पक्षाशी मतभेद झाले व त्याचे पंतप्रधानपद गेले. तेव्हा यानेही राजीनामा दिला व तो बेन-गूरिऑनच्या रफी नावाच्या नवीन पक्षात सामील झाला व निवडूनही आला (१९६५) पण बहुमत विरोधी पक्षास असल्यामुळे त्यास कोणतेही मंत्रिपद मिळाले नाही. मात्र १९६७ मध्ये जनमानसाच्या दबावामुळे त्यास मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून स्थान मिळाले. त्याच साली अरबांबरोबरच्या युद्धात त्याने ईजिप्त, जॉर्डन आणि सिरिया यांचा पराभव केला. या सहा दिवसांच्या युद्धातील विजयामुळे त्याची लोकप्रियता वाढली. काहींनी त्यास ‘गार्बो ऑफ इझ्राएल’ अशी उपाधीही दिली. यानंतर त्याने संरक्षणमंत्री म्हणून काही वर्षे काम केले. पुढे १९७४ मध्ये संरक्षणमंत्री असताना १९७३ च्या युद्धात इझ्राएलची युद्धतयारी नव्हती, असा आरोपही त्याच्यावर लादण्यात आला. १९७५ पासून तो संसदेचा सभासद असून त्याच्याकडे कोणतेही खाते नाही.

दॅयानने काही पुस्तके लिहिली त्यांपैकी इझ्राएल्स बॉर्डर अँड सिक्युरिटी प्रॉब्लेम्स (१९५५) आणि युद्धविषयक अनुभव व आठवणींवर आधारित ए डायरी ऑफ सिनाई कँपेन (१९६६) ही प्रसिद्ध आहेत. यांशिवाय ए न्यू मॅप, न्यू रिलेशनशिप्स (१९६९) हे आत्मचरित्र फार लोकप्रिय झाले. त्याला पुरातत्त्वविद्या विषयाचा छंद असून तो उत्खननांत अनेक वेळा सहभागी झाला आहे. इझ्राएल लष्करी दृष्ट्या एक बलशाही राष्ट्र करण्याचे सर्व श्रेय त्याला दिले जाते.

संदर्भ : 1. Lau–Lavie, Naphtali, Moshe Dayan,  New York, 1968.  

           2. Teveth, Shabtai, Moshe Dayan, Chicago, 1971.

देशपांडे, सु. र.