जनपद : जन म्हणजे समान संस्कृतीचे किंवा एका जमातीचे लोक. त्यांनी स्थापन केलेल्या वसाहतींना जनपद म्हणत किंवा जनवस्ती करून राहिलेल्या ठिकाणांना जनपद ही संज्ञा लावण्यात येत असे. वैदिक साहित्यात ग्राम, विश व जन या संज्ञा वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांच्या समूहांसाठी वापरलेल्या आहेत. अनेक कुटुंबाचे ग्राम होई, अनेक ग्रामांचे मिळून विश होई व या सर्वांचे मिळून जन होई. प्रथम आर्यांचे जीवन भटके होते व त्यांचे जमातींनुसार संघ असत. त्यांतील पाच संज्ञास पंचजन म्हटले आहे. सुदासाने २१ जनांचा पराभव केल्याचा उल्लेख सापडतो. यासच पुढे जनपद म्हणू लागले. त्यांची सुरुवात केव्हा झाली, यासंबंधी लिखित पुरावा उपलब्ध नाही. तथापि छांदोग्य, बृहदारण्यक  उपनिषदांत, ब्राह्मणग्रंथ, अष्टाध्यायी, महाभारत, कौटिल्याचे अर्थशास्त्र, बौद्धग्रंथ, मत्स्य, मार्कंडेय, वामन, ब्रह्म  इ. पुराणे यातील उल्लेखांवरून असे दिसते की, जनपदे इ. स. पू. १००० पासून अस्तित्वात होती आणि इ. स. पू. चौथ्या शतकापर्यंत त्यांची भरभराट झाली व पुढे गुप्तकाळापर्यंत ती काही प्रमाणात अस्तित्वात असावीत. काही ठिकाणी जनपदाचे लोक व देश असे दोन्ही अर्थ दिले आहेत.

एखादा प्रदेश जिंकून तेथील मूळच्या रहिवाशांना अंकित करून किंवा मुळीच वस्ती नसलेल्या प्रदेशात नव्याने वसाहत करून जनपदांची स्थापना होई. प्रस्थापित करावयाच्या जनपदाचे कौटिल्याने जे वर्णन दिले आहे त्यावरून असे दिसते की, सामान्यतः एका जनपदास सु. आठशे खेडी व इतर अनेक लहानमोठी गावे असत. जनपदाची राजधानी बहुधा एका किल्ल्यात असे. जनपदाचे दोन प्रकार होते : एकावर राजाचा सत्ता चाले, तर दुसरी गणराज्ये होती. गणराज्यांत शासनाचे विविध प्रकार चालू असत. जनपद राजाधीन वा गणाधीन कसेही असले, तरी त्याचा कारभार सभा व परिषद यांच्या मार्गदर्शनानुसारच चाले. जनपदांचे मध्य, प्राच्य, उदीच्य, दक्षिणापथ, अपरांत, विंध्यपृष्ठ व पर्वत असे सात भौगोलीक विभाग केलेले असत.

प्राचीन राज्यशास्त्रात राज्याच्या सात अंगापैकी (राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोष, दंड आणि मित्र) जनपद हे एक अंग आहे. येथे राज्याचे ग्रामीण भाग व तेथे असलेले लोक असा जनपदाचे अर्थ आहे. बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आहे. ती अशी : अंग, मगध, काशी, कोशल, विदेह, मल्ल, चेदी, वत्स, कुरू, पांचाल, मत्स्य, शूरसेन, अश्मक, अवंती, गंधार व कंबोज. त्यांपैकी काशी, कोशल, विदेह व मगध ही जनपदे विशेष प्रसिद्धीस आली. यांशिवाय इतर अनेक जनपदांचे उल्लेख पुराणांतून आढळतात. अमरकोशात देश, राष्ट्र, विषय, जनपद हे शब्द समान अर्थी योजले आहेत.

ही जनपदे म्हणजे केवळ भौगोलिक विभाग नव्हते तर प्रत्येक जनपदातील लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवन स्वतंत्र असे आणि स्वतंत्रपणेच विकसित होत होते. प्रत्येक जनपदाची भूमी तिथल्या रहिवाशांची खरीखुरी धात्री अर्थात माता होती. त्यांची भाषाही एकच असे. ते समान देवतांची पूजा-अर्चा व उपासना करीत. त्यामुळे त्यांच्यात भ्रातृभाव वसत असे.

देशपांडे, सु. र.