मराठा अंमल: छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. सतराव्या शतकात महाराष्ट्रात हिदवी स्वराज्य स्थापन करून मराठी सत्तेचापाया घातला. आठराव्या शतकात हिंदूस्थानभर मराठी सत्तेचा विस्तार झाला. हिंदूस्थानच्या इतिहासात हा कालखंड मराठी सत्तेच्या परमप्रभुत्वाचा (मराठा सुप्रीमसी) कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता  इ. स. १८१८ पर्यंत टिकली. या नोंदीत मराठेशाहीचा म्हणजे मराठा अंमलाचा पुढील अंगांनी थोडक्यात परामर्श घेतला आहे: (१) ऐतिहासिक आढावा, (२) राज्य व्यवस्था (३) सैनिकी व्यवस्था (४) न्यायव्यवस्था,(५) मुलकीव्यवस्था, (६) आर्थिक स्थति, (७) सामाजिक स्थिती, (८) कला आणि खेळ आणि (९) मूल्यमापन व र्‍हासाची मीमांसा. यांशिवाय मराठा अंमल या विषयाशा निगडीत असलेल्या तसेच त्यासंबंधी विविध अंगांनी माहिती देणार्‍या काही स्वतंत्र नोंदी विश्वकोशात  अकारविल्हे यथास्थळी दिलेल्या आहेत. अशा नोंदी साधारणपणे पुढील प्रकारच्या आहेत:

(१) इतिहासग्रंथ, इतर ऐतिहासिक वाङमय व इतिहासकार: उदा., इतिहासलेखनपद्धति बखर वाङमय मराठी साहित्य (इतिहास लेखन) वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई, ग. ह. खरे, द. वा. पोतदार, ग्रँट डफ, जदुनाथ सरकार इत्यादी. (२) मराठा अंमलाची विशेष माहिती देणार्‍या नोंदी : उदा., आज्ञापत्र इंग्रज मराठे युद्ध पेशवे मराठ्यांची युद्धपद्धती मराठा राजमंडळ इत्यादी. (३) मराठिशाहीतील महत्वाच्या व्यक्ती: उदा., छ. शिवाजी व त्यानंतरचे बहुतेक सर्व छत्रपती बाळाजी विश्वनाथ व त्यानंतरचे इतर सर्व पेशवे. महादजी शिंदे, नाना फडणीस, हरिपंत फडके इ. मराठे सरदार आणि मुत्सदी. (४) मराठेशाहीतील महत्वाची घराणी व संस्थाने: उदा., गायकवाड, पटवर्धन, पवार, भोसले, शिंदे, होळकर इ. घराणी व इंदूर, औंध, कोल्हापूर, झांशी, ग्वाल्हेर, बडोदे इ. संस्थाने. (५) मराठेशाहीतील महत्वाच्या लढ्या: उदा., खर्ड्याची लढाई पानिपतची लढाई, राक्षसभुवनची लढाई इत्यादी. (६) मराठा अंमलाच्या पूर्वोत्तर काळातील महत्वाच्या राजसत्ता : उदा., आदिलशाही, निजामशाही, बहमनी सत्ता, मोगलसत्ता, यादव वंश, विजयनगरचे साम्राज्य. (७) याशिवाय महाराष्ट्र राज्यावरील व्यातिलेखात इतिहास या उपविषयाखाली मराठा अंमलविषयी धावता आढावा देण्यात आलेला आहे.

जिज्ञासू वाचकांना वरील सर्व नोंदीतून मराठा अंमलाविषयी विविध प्रकारची माहिती मिळू शकेल.


ऐतिहासिक आढावा : शिवपुर्वकालीन उत्तर हिंदुस्थानात मोगल सत्ता होती आणि दक्षिणेत कुत्बशाही, आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही, इमादशाही या मुसलमानी शाह्यांनी महाराष्ट्राला व्यापले होते. त्यांत अनेक मराठी सरदार नोकरीस होते. अशा वेळी सतराव्या शतकाच्या मधल्या शिवाजीराजांनी महाराष्ट्रात  स्वराज्यस्थापनेचा प्रांरभ केला आणि आदिलशाह, कुत्बशाह व मोगल इत्यादींना आपल्या पराक्रमाने जेरीस आणले. महाराष्ट्रातील कोकणपट्टी व इतर प्रदेश पादाक्रांत करून त्यांनी अनेक किल्ले घेतले, काही नवीन बांधले आणि जुन्यांची डागडुजी केली. पुढे त्यांनी स्वतंत्र राज्याची स्थापना केली आणि स्वत:स ६ जून १६७४ रोजी स्वतंत्र राजा म्हणून राज्यभिषेक करून घेतला. प्रशासनाच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमून राज्यव्यवहाराचे नियम तयार केले. गड, कोट, आरमार, पायदळ, घोडदळ वगैरेंसंबंधी शिस्तीचे  घारे बांधून दिले. शिवाजी महाराजांनी जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण करून तसेच कार्यक्षम प्रशासन आणि शक्तिशाली शासन निर्माण करून महाराष्ट्रात मराठी सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या नेतृत्वाखाली तसेच मार्गदर्शनाखाली मराठी राज्याचा विस्तार झाला आणि शासनाला स्थिरता आली. शिवाजी महाराजांच्या मृत्युसमयी (४ एप्रिल १६८०) मराठीमराठीराज्यात पुढील प्रदेश अंतर्भूत होते: जुन्नरच्या दक्षिणेकडील मावळ व खोरी, वाई, सातारा, पन्हाळा, दक्षिण कोकण, बागलाण, त्र्यंबक, उत्तर कर्नाटकाचा काही भाग, कोला, कोप्पळ, वेल्लोर, जिंजी इत्यादी. त्यांच्या  ताब्यांतील किल्ल्यांची संख्या सु. ३०० होती.

शिवाजी महाराजांनंतर त्यांचे जेष्ठ पुत्र ⇨संभाजी छत्रपती गादीवर आले. त्यांच्या कारकीर्दीत अनेक संकटे मराठी राज्यावर कोसळली. मराठी राज्य शिवाजींच्या मृत्यूनंतर सहज जिंकता येईल असे वाटून १६८१ च्या शेवटी औरंगजेब मोठी फौज घेऊन दक्षिणेत आला. त्याने संभाजीराजेविरूद्ध सिद्दी आणि पोर्तुगीज यांना उठविले. संभाजीराजे यांनी या संकटांना मोठ्या हुशारीने व हिमतीने तोंड दिले. त्यांनी सिद्दीवर चाल करून त्याचा पराभव केला आणि पोर्तुगीजांचा पराभव करण्यासाठी खुद्द गोव्यावर स्वारी केली. याच वेळी मोगलांची फौज संभाजीराजावर चालून आली. तेव्हा पोर्तुगीजांवरील स्वारी अर्धवट टाकून ते मोगलांवर चालून गेले. दोन वर्षे झुंजून मराठे शरण येत नाहीत, असे पाहून औरंगाजेबाने मराट्यांवरचे लक्ष काढून विजापूर व गोवळकोंडे ही  मुसलमानी राज्ये बुडविली आणि मग मराठ्यांचा नि:पात करण्यासाठी १६८७ मध्ये मराठी मुलखावर चहूबाजूंनी हल्ले चढविले. संभाजीराजांनी पराक्रमाची शर्थ केली. बेसावध स्थितीत मोगलांनी संभाजीराजांना पकडले आणि तुळापूरजवळील वढू येथे त्यांना १६८९ मध्ये टार केले.

संभाजीराजांच्या मागून त्यांचे सावत्र बंधू ⇨राजाराम छत्रपती महाराष्ट्राचे राजे झाले. त्यांना पकडण्याचा औरंगजबाने घाट घातला. मोगल सेनापती झुल्फिकारखान ह्याने राजधानी रायगडला वेढा घालून तो किल्ला आपल्या ताब्यात आणला व संभाजीराजांची राणी येसूबाई, राजपुत्र शाहू इत्यादींना कैद केले. तत्पूर्वी राजाराम महाराज तेथून निसटून जिंजीस गेले आणि तेथून मराठी राज्याचा कारभार पाहू लागले. हे पाहून मोगलांनी राजाराम महाराजांस पकडण्यासाठी जिंजीच्या किल्ल्यास वेढा घातला. तो वेढा सात वर्षे चालला. त्या मुदतीत संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव इ. मराठी राज्याच्या  धुरिणांनी महाराष्ट्रात आणि दक्षिणेत वायुवेगाने सैनिकी मोहिमा काढून मोगल फौजेस जेरीस आणले. जिंजीच्या पाडावापूर्वीच (१६९८) राजाराम महाराज महाराष्ट्रात  आले होते. त्यामुळे मराठ्यास जोम चढून त्यांनी मोगलांकडून बराच मुलूख पुन्हा जिंकून घेतला. अतिश्रमाने राजाराम महाराज २ मार्च १७०० रोजी सिंहगडावर मृत्यू पावले. त्यांच्या पश्चात महाराणी ताराबाईने आपला मुलगा शिवाजी यास गादीवर बसवून त्याच्या  नावे राज्यकारभार सुरू केला आणि मोगलांशी चाललेला लढा जुन्या मातव्बर सरदारांच्या मदतीने नेटाने चालविला. औंरगाजेब अहमदनगरजवळ भिंगार येथे दारूण निराशेत मरण पावला (३ मार्च १७०७). त्या बरोबर मराठ्यांचे मोगलांबरोबरचे स्वातंत्र्य युद्ध संपले. मोगल फौजा उत्तरेस परतल्या. दक्षिणेत औरंगजेब पुत्र आझमशाह याने आपल्या कैदेत असलेला संभाजी महाराजांचा पुत्र शाहूराजा याच्याशी  आवश्यकतेप्रमाणे मोगलांना मदत करण्याचा करार करून त्याची सुटका केली (१७०७). याच करारावर ताराबाई मोगलांशी सख्य करण्यास तयार झाली होती पण तिचे म्हणणे मान्य न झाल्याने महाराष्ट्रात पुढे २४ वर्षे यादवी युद्ध चालू राहिले.

मोगलांपासून सुटका झाल्यावर शाहूराजे सैन्य गोळा करीत खानदेश मार्गे सातार्‍यास पोहचले. राजाराम महाराजांची पत्नी ⇨महाराणी ताराबाईने शाहूराजांचा गादीवरील हक्क अमान्य केला तथापि शाहू महाराजांनी स्वत:स सातार्‍यास राज्येभिषेक करविला (१२ जानेवारी १७०८). तेव्हा राणी ताराबाईने पन्हाळ्यास आपला मुलगा शिवाजी याच्या नावे नवीन गादीची स्थापना केली. ताराबाईस

मिळालेले सरदार बंडावा करू लागले. त्यांचा बंदोबस्त बाळाजी विश्वनाथ या शाहूच्या पहिल्या पेशव्याने पेशवेपद मिळण्यापुर्वी अत्यंत धैर्याने व चाणाक्षपणे वागून केला. 


ताराबाईचा सावत्र मुलगा संभाजी हा १७१४ मध्ये ताराबाई व शिवाजी यांना कैद करून पन्हाळा येथे गादीवर बसला. शाहूमहाराजांस ⇨बाळाजी विश्वनाथसारखा हुशार पेशवा मिळाला. त्याने राजाची घडी नीट बसविली व मातब्वर  मराठे सरदार शाहू महाराजांच्या बाजूस आणले. त्याने दिल्लीच्या मोगल बादशाहकडून दक्षिणेतील स्वराज्य आणि सहा सुभ्यांच्या चौथाई-सरदेशमुखीच्या सनदा मिळविल्या व मोगली कैदेतील शाहूच्या परिवारास सोडवून आणले. ह्या सनदांचा अंमल जारी करण्यासाठी शाहू महाराजांनी काही वर्षानंतर सर्व सरदारांस कार्यक्षेत्रे वाटून दिली. त्यातूनच पुढे मराठा राजमंडळ निर्माण झाले. एकाने दुसर्‍याच्या क्षेत्रात वा प्रांतात जाऊ नये अशी ताकीद देण्यात आली. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर (२ एप्रिल १७२०) शाहू महाराजांनी त्याचा तरूण मुलगा ⇨पहिला बाजीराव यांस पेशवेपद दिले. जुने सरदार आपणाशी निष्टेने वागत नाहीत असे पाहून बाजीरावाने शिंदे, होळकर, पवार, जाधव आदी नवे सरदार तयार केले. त्यांना नर्मदेच्या पलीकडील प्रदेश जिंकून मराठ्यांचा अंमल बसविण्यात प्रोत्साहन दिले.

शाहू आणि कोल्हापूर संभाजी यांच्यामध्ये अनेकदा चकमकी झडल्यावर वाटाघाटी होऊन १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला आणि मराठी राज्याचे सदोन स्वतंत्र भाग झाले. राजारामपुत्र कोल्हापूरचा संभाजी आणि शाहू यांतील संघर्ष सामान्यत: मिटला.बाजीराव व त्याचा धाकटा भाऊ चिमाजीअप्पा यांनी आंग्र्यांच्या मदतीने १७३३- ३६ मध्ये जंजिर्‍याच्या सिद्दीवर चढाई केली. मराठ्यांनी सिद्दी सातास ठार करून सिद्दीनां जेरीस आणल्यामुळे त्यांनी युद्ध थांबवून तह केला. पोर्तुगीजांनी साष्टी व वसई प्रांतात हिंदूचा धार्मिक छळ चालविला होता. त्यावर चिमाजीआप्पाने जोराचे हल्ले करून ठाणे, वसई आणि साष्टी ही स्थळे स्वराज्यात  आणली. निजाम मराठ्यांस दक्षिणेत चौथाई- सरदेशमुखीचा वसूल घेऊ देईना, म्हणू त्याजवर बाजीरावाने चार स्वार्‍या करून त्यास जेरीस आणले. एकदा तर दिल्लीवर चालून जाऊन बाजीरावाने बादशाहास मराठ्यांच्या सामर्थ्याची प्रचिती आणून दिली. महाराष्ट्रात आंग्रे बंधूंत समझोता घडवून आणला. पहिल्या बाजीरावाच्या निधनसमयी (२७ एप्रिल १७४०) उत्तरेकडील माळवा, गुजरात, बुंदेलखंड व वर्‍हाड हे प्रांत मराठ्यांच्या अंमलाखाली आले होते.

बाजीरावाने मराठी राज्याचा उत्तरेस विस्तार केला. बाजीरावानंतर त्याचा  पुत्र ⇨बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यास शाहूने पेशवेपद दिले. बाळाजीने उत्तरेकडील बुंदेलखंडावर स्वार्‍या करून मराठ्यांची सत्ता अधिक द्दढतर केली. बाळाजी व ⇨रघूजी भोसले या दोघांचे भांडण मिटवून शाहूने त्यांची कार्यक्षेत्रे वाटून दिली.

बाळाजीच्या वेळी जयपूर, उदेपूर, जोधपूर, बुंदी, कोटा इ. राजस्थानातील राज्यांत विलक्षण अंतर्गत कलहामुळे शिंदे –होळकरांविषयी तेथील राजांची मते विपरीत बनली. १७४८ पासून दक्षिणेतील घडामोडींत पेशवा गुंतला होता. आसफजाह निजाम –अल्-मुल्क २१ मे १७४८ रोजी मरण पावला. तदनंतर पेशवा-निजाम संघर्ष पुन्हा सुरू झाला. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर (१५ डिसेंबर १७४९) रामराजा नानासाहेबाच्या मदतीने छत्रपतींच्या गादीवर आला. त्याने छत्रपती शाहूच्या याद्यांप्रमाणे बाळाजीच्या हाती सर्व कारभार सोपविला. १७४७ – ५८ दरम्यान पेशव्याने कर्नाटकात दोन-तीन स्वार्‍या केल्या व मराठ्यांच्या सत्तेचा दक्षिणेत विस्तार केला.

पाश्चिमात्यांशी  टक्कर देण्याजोगे प्रवळ आरमार आंग्र्यांजवळ होते. तुळाजी आंग्रे नानासाहेब पेशव्याचे वर्चस्व मानीना तेव्हा पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने तुळाजीविरूद्ध कारवाई करून त्याचा पराभव केला. इंग्रजांनी तुळाजीचे आरमार उद् ध्वस्त करून त्याला कैद केले आणि त्याचे आरमार जाळून नष्ट केले. या कृतीमुळे पुढे मराठयांचे स्वतंत्र प्रभावी आरमार निर्माण झाले नाही.


बाळाजी बाजीराव कर्नाटकात गुंतला असता अहमदाबाद अब्दालीने दिल्लीवर स्वार्‍या केल्या. त्या थांबविण्यासाठी बादशाहाचा वजीर सफदरजंग याने मराठी सरदार जयाप्पा शिंदे, पवार व मल्हारराव होळकर यांची मदत घेण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे त्यांनी दिल्लीच्या बादशाहशी एक प्रख्यात करार केला (१७५२ प्रारंभ). त्यास अहमदनामा हे खास नाव आहे. हे न आवडून निजामाने मराठ्यांच्या कुरापती काढल्या, तेव्हा त्याचा शिंदखेड ( १७५७) व उदगीर (१७६०) येथील लढायांत मराठ्यांनी पराभव केला. या करारानुसार मराठ्यांनी बादशाहीचे अंतर्बाह्या शत्रूंपासून संरक्षण करावे असे ठरले आणि पंजाबातून अब्दालीला हाकून देण्याच्या हेतूने मराठ्यांची स्वारी १७५६ च्या अखेरीस चालू झाली. त्यांनी अटकेपार आपला अंमल प्रस्थापित  केला. हे अब्दालीस समजताच त्याने मराठ्यांना प्रतिटोलादेण्याचे ठरविले व तो हिंदुस्थानवर चालून आला. मराठ्यांची मोठी फौज अब्दालीच्या समाचारासाठी उत्तरेत गेली. पुढे दोन्ही सैन्यांची गाठ पानिपतवर १४ जानेवारी १७६१ रोजी पडून तुंबळ युद्ध झाले आणि मराठ्यांचा दारूण पराभव झाला. या पराभवानंतर बाळाजी बाजीराव मरण पावला (२३जून १७६१). पेशवाईची वस्त्रे वयाच्या सोळाव्या वर्षी ⇨माधवराव (थोरले) याला २९ जुलै १७६१ रोजी प्राप्त झाली. त्या वेळी हिंदुस्थानात अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. पानिपतच्या पराभवामुळे मराठ्यांविरूद्ध जाट, रोहिले, बुंदेले, राजपूत आदिंनी आपापल्या भागांत उठाव करण्यास सुरूवात केली होती. आणि नजीबखानाने आपले वर्चस्व दिल्लीवर बसविले होते.

खरे, ग. ह.

शाह आलम बादशाह अलाहाबादेस इंग्रजांकडे आश्रयास गेला होता. बंगालमध्ये स्थिर झालेले इंग्रज पुढे सरसावू लागले होते. दक्षिणेतही निजाम व हैदर अली यांनी मराठ्यांविरूद्ध हालचाली सुरू केल्या. किनार्‍यावर इंग्रज, हब्शी यांनाही पेच पडला. अशा बहुविध अडचणींत मराठी सत्ता होती व याच सुमारास पेशवाईची अभिलाषा बाळगणारा नानासाहेबाचा सख्खा भाऊ रघुनाथरावदादा व सातारची गादी मिळावी म्हणून कट-कारस्थान रचणारा नागपूरचा जानोजी भोसले यांच्या उठावांनी अधिकच अस्थिरता निर्माण झाली. त्यात तोतयांचे पेव फुटले आणि घरगुती वातावरणात तंग परिस्थिती निर्माण झाली.

या परिस्थितीस माधवराव पेशवे याने मोठ्या धैर्याने तोंड दिले. माधवराव पेशवेपदावर येताच निजामाने नागपूरच्या भोसल्यासह पुण्यावर स्वारी करून ते जाळले. त्या वेळी मराठी सैन्याने हैदराबादच्या व्यापारी पेठा लुटून शत्रूला चकित केले. आपल्या मुलखावर हल्ले होत आहेत, असे कळताच निजाम औरंगाबादच्या रोखाने माधवरावावर स्वारी करण्यासाठी जलद गतीने निघाला. या वेळी रघुनाथरावाने पेशवाई मिळविण्याचा थोडासा प्रयत्न केला., पण तो अयश्स्वी झाला. दोन्ही सैन्यांची लढाई राक्षसभुवनजवळ होऊन निजामाचा पराभव झाला (१ ऑगस्ट १७६३). या पराभवाचा निजामाने एवढा धसका घेतला की पुढे जवळजवळ बावीस वर्षे त्याने मराठ्यांना त्रास दिला नाही. 


निजामाचा बंदोबस्त केल्यानंतर माधवराव पेशव्याने हैदर अलीला वठणीवर आणण्यासाठी  त्याच्या विरूद्ध स्वत: चार मोहिमा काढिल्या (१७६४-६५ १७६६-६७, १७६८ १७६९-७०). पहिल्या स्वारीत हैदरचा पराभव झाला आणि तह होऊन तुंगभद्रेच्या उत्तरेकडील प्रदेश व युद्धखर्च हणून मराठ्यांना ३० लाख रूपये देण्याचे हैदरने मान्य केले. दुसर्‍या स्वारीतही हैदरने पेशव्यांशी तह करून ३३ लाख रूपये खंडणी देण्याचे कबूल केले तथापि हैदर अलीच्या  मराठ्यांविरूद्धच्या कारवाया थांबल्या नाहीत. तेव्हा मराठ्यांनी हैदरचा ५ मार्च १७७१ रोजी मोती तलावाच्या लढाईत पुर्ण पराभव करून त्याच्याशी तह केला.

रघुनाथरावाने जून १७६७ मध्ये नासिकला जाऊन माधवरावाविरूद्ध पुन्हा कारवाया सुरू केल्या. त्यामुळे पेशव्याने राघोबास पुण्यासकैद करून ठेवले. सर्वप्रथम नागपूरकर जानोजी भोसले पेशव्याविरूद्ध रघुनाथरावास मिळाला. तद्नंतर जानोजिने निजामाशी संगनमत केले परंतु निजामाने पेशव्याशी तह केल्यानंतर जानोजी एकाकी पडला. माधवराव निजाम अली यांनी एकत्र येऊन जानेवारी १७६६ मध्येअमरावतीजवळ जानोजीचा पराभव केला व तद्नंतर पेशव्ये वर्‍हाडवर स्वारी केली व एप्रिल १७६९ मध्ये जानोजीला शरण आणले. पानिपतच्या पराभवानंतर जाट, रोहिले व राजपूत यांनी मराठ्यांच्या विरूद्ध उठाव केले होते. त्या उठावांचा बीमोड करण्यासाठी माधवरावाने तुकोजी होळकर, महादजी शिंदे, रामचंद्र गणेश कानडे व विसाजी कृष्ण बिनीवाले यांस उत्तरेत पाठविले. त्यांनी रोहिले व जाट यांजकडून खंडण्या वसूल केल्या. विशेषत:  शाह आलम बादशाहास दिल्लीच्या तख्तावर आणून बसविण्यासाठी दिल्लीवर स्वारी करून नजीबखानाचा पुत्र झाबितखानास हाकलून लावून मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेतली व अलाहाबाद येथील इंग्रजांच्या रक्षणाखाली असलेल्या बादशाहास दिल्लीस आणून ६ जानेवारी १७७२ रोजी तख्तार बसविले. झाबितखानाचा दुआबात पाठलाग करून त्याचा पुर्ण पराभव केला. रोहिलखंड ताब्यात घेतले आणि पानिपत युद्धात सापडलेली व दडवून ठेवलेली संपत्ती परत मिळवून पानिपतच्या पराभवाचा सूड घेतला.

वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी क्षयाच्या विकाराने माधवरावाचे देहावसान झाले (१८ नोव्हेंबर १७७२). माधवरावाच्या मृत्यूनंतर त्याचा धाकटा भाऊ नारायणराव यास पेशवेपदाची वस्त्रे मिळाली (१३डिसेंबर १७७२). त्याचा चुलता रघुनाथराव यास पेशवेपदाचा पुन्हा लोभ सुटून त्याने नारायणरावाविरूद्ध गारद्यांच्या सहाय्याने कट केला व त्याजकडून नारायणरावाचा खून करविला (३० ऑगस्ट १७७३) आणि स्वत:स ३१ ऑक्टोबर १७७३ रोजी पेशवा म्हणून जाहीर केले. इतक्यात हैदरने मराठ्यांविरूद्ध उचल खाल्ली, हे कळताच त्याचा बंदोबस्त  करण्यासाठी राघोबादादा पुण्याहून कर्नाटकाच्या स्वारीवर निघाल्यावर इकडो दरबारातील मुत्सद्यांनी एकत्र येऊन रघुनाथरावास पेशवेपदावरून काढून टाकण्याचा कार्यक्रम आखला. बारभाईचा कारभार जाहीर करून दादाच्या पाठलागावर फौज रवाना केली.

दरम्यान पुरंदर किल्ल्यावर १८ एप्रिल  १७७४ रोजी नारायणरावाची पत्नी गंगाबाई प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्याचे नाव ⇨सवाई माधवराव ठेवून त्याच्या  जन्माच्या  चाळीसाव्या दिवशी सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे बारभाईंनी आणविली व त्यास पेशवा म्हणून जाहीर केले. बारभाईची फौज पाठीवर येताच रघुनाथराव सुरत येथे इंग्रजांच्या आश्रयास गेला. इंग्रजांनी दादास आश्रय दिल्यामुळे पहिले ⇨ इंग्रज- मराठे युद्ध उद् भवले. कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलला हे युद्ध पसंत नव्हते म्हणून इंग्रजांनी मराठयांशी शांततेचा तह घडवून आणला. तोच पुरंदरचा तह होय (मार्च १७७६). हा तह मुंबईकर इंग्रजांना पसंत पडला नाही. त्यांनी कंपनीच्या अनुमतीने रघुनाथरावास हाताशी धरून त्यास पेशवेपदावर बसविण्याच्या उद्देशाने इंग्रज फौज तळेगावजवळ आली असता, मराठी फौजेने इंग्रजांचा पुन्हा पराभव केला. इंग्रजांनी मराठ्यांशी तह करून रघुनाथरावास मराठयांच्या स्वाधीन केले. हे गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जला न आवडून त्याच्या हुकमानुसार जनरल गोडार्डने गुजरातमधील मराठी प्रदेशावर हल्ले सुरू केले. कोकणात तसेच उत्तरेत मराठ्यांच्या प्रदेशांवर इंग्रजांनी हल्ले करण्याची मोहीम उघडली पण या वेगवेगळ्या आघाड्यांवर सातत्याने तोंड देण्यात इंग्रज असमर्थ ठरू लागले. मराठ्यांना पराभूत करणे अशक्य आहे, हे वॉरन हेस्टिंग्जच्या लक्षात आले. अखेर युद्ध थांबवून महादजी शिंद्याच्या मार्फत इंग्रजांनी मराठ्यांशी सालबाईचा तह केला( १७मे १७८२). तदनुसार दादास मराठ्यांच्या स्वाधीन केले व त्यास कोपरगाव येथे रहावे लागले. तेथे तो मरण पावला(११ डिसेंबर १७८६). हे सर्व यशस्वी रीतीने घडवून आणण्यात ⇨नाना फडणीसाची मुत्सद्देगिरी –विशेषत: बारभाईतही अंत:कलह काही प्रमाणात चालू असता-प्रभावी ठरली हे मान्य केले पाहिजे. त्याला सर्वाधिक सहकार्य हरिपंत फडके याचे मिळाले. 


हैदर अलीचा मुलगा टिपू याने मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले केले.त्याचे पारिपत्ये करण्यासाठी मराठी फौज कर्नाटकात चालून गेली. अनेक ठिकाणी लढाया होऊन दोन्ही पक्षांची जबरदस्त हानी होऊ लागली.त्यामुळे टिपूने मार्च १७८७ मध्ये मराठ्यांशी शांतता तह केला. टिपू सुलतान इंग्रजांसही नको होता. त्याचा नाश करण्यासाठी लॉर्ड कॉर्नवालिसने निजाम व मराठे यांच्याशी मैत्री जोडण्याचा प्रयत्न करून टिपूविरोधी त्रिपक्ष संघ उभारला. कॉर्नवालिसचा त्रिपक्ष संघ यशस्वी होऊन मार्च १७९२ मध्ये टिपूचा पुर्ण पराभव झाला आणि कर्नाटकात इंग्रजांचे बरेच वर्चस्व प्रस्थापित झाले.

सालबाईच्या तहानंतर ⇨महादजी शिद्यानी उत्तरेत अनेक महत्त्वाची ठाणी घेऊन आपला अंमल बसविला होता म्हणून बादशाहने त्याला भेटीस बोलावले. १५ नोव्हेंबर १७८४ रोजी फतेपुर सीक्री या ठिकाणी त्याने महादजीचे समारंभपूर्वक स्वागत करून त्यास वकील इ- मुतालिक (मुख्य कारभारी) हे पद दिले व त्याचा गौरव केला. यामुळे दिल्लीच्या बादशाहीचे संरक्षण करण्याची आणि मोगल सामाज्यांतर्गत सुव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी मराठ्यांतर्फे महादजीवर पडली. त्याने बंडखोर मोगल सुभेदार व असंतुष्ट राजपूत राजे यांना वठणीवर आणून त्यांच्यापासून खंडण्या घेतल्या.शाह आलमचा सेनापती अमीर-उल् – उमरा गुलाम कादर याच्या बंडाचा बीमोड केला (१७८८). पानिपतनंतर पुन्हा एकदा पंजाबपर्यंत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याची बहुमोल कामगिरी महादजीने पार पाडली. महादजी जून १७९२ मध्ये दक्षिणेत आला. तो दक्षिणेत असताना पुण्याजवळ वानवडी येथे निधन पावला (१२ फेब्रवारी १७९४).

महादजी नंतर उत्तरेतील राजकारणात मोठी पोकळी निर्माण होऊन इंग्रजांनी धूर्तपणे सत्ता विस्ताराल सुरूवात केली. निजाम मराठ्यांस चौथाई खंडणी देईना, म्हणून त्याच्यावर स्वारी करून मराठ्यांनी खर्डे येथे १७९५ मध्ये निजामाचा पराभव केला. यानंतर लवकरच सवाई माधवरावाचे पुण्यात निधन झाले (२७ऑक्टोबर १७९५). सवाई माधवरावाचा अंत झाल्यावर रघुनाथरावाचा मुलगा ⇨दुसरा बाजीराव यास ५ डिसेंबर १७९६ रोजी पेशवाईंची वस्त्रे दौलतराव शिंद्यांच्या मदतीने मिळाली. याच सुमारास मराठेशाहीत अराजक व असंतोष यांचे थैमान सुरू झाले. कोल्हापूरकरांकडून परशुरामभाऊ पटवर्धन यांचा युद्धात झालेला शेवट, माळव्यात यशवंतराव होळकर वउत्तरेत लखाबादादा इंगळे इत्यादींचा धुमाकूळ यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. तशातच शिंदे व होळकर परस्परांचे वैरी बनले. विठोजी होळकराची बाजीरावाकडून निर्घृण हत्या झाल्यानंतर त्याचा सूड उगविण्याच्या ईर्षेने यशवंतराव होळकर पुण्यावर चालून आला व त्याने बाजीरावास पराभूत केले. बाजीरावाने वसईला पळून जाऊन इंग्रजांशी डिसेंबर १८०२ मध्ये तैनाती फौजेचा तह केला. या तहाने पेशवा इंग्रजांचा मांडलिक बनला. गायकवाड, शिंदे. होळकर, भोसले इ. सरदारांनी ह्या वसईच्या तहास नकार देताच इंग्रजांनी सर्व सरदारांविरूद्ध स्वतंत्रपणे युद्धे पुकारली आणि प्रत्येकास एकाकी गाठून त्यांचा पराभव केला. आणि प्रत्येकाशी स्वतंत्र तह केला. अशा रीतीने मराठा सरदारांशी तह करून इंग्रजांनी बाजीरावास एकटे पाडले. दक्षिणेतील जहागिरदारांस संरक्षण देण्याचे ठरवून ⇨मौट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनने १८११ मध्ये त्यांनाही बाजीरावापासून पोडले. १८१२ च्या ऑक्टोबरमध्ये कोल्हापूरकरांनी तैनाती फौजेचा तह केला. तेव्हा बाजीराव पेशवा अधिकच एकाकी पडला. याच वेळी गायकवाडांनी इंग्रजांच्या संरक्षणाखाली गंगाधरशास्त्री पटवर्धन या वकीलास पुण्यास पाठविले (१८१४). बाजीरावाच्या वतीने त्रिंबकजी डेंगळे बोलणी करीत होता. ही बोलणी असफल होऊन गंगाधरशास्त्री पटवर्धनांचा पंढरपूर येथे खून झाला(१८१५). इंग्रजजांनी य खुनाची जबाबदारी बाजीरावावर टाकून बाजीरावविरूद्ध युद्ध पुकारले व पुण्याचा बंदोबस्त करून १३ जून १८१७ रोजी बाजीरावाकडून सक्तीने राज्यत्यागाचा तह करून घेतला. तरीही बाजीरावने पुढील वर्षी इंग्रजांशी दोन हात केले. इंग्रजांनी बाजीरावचे राज्य खालसा करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे शनिवारवाड्यावर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी इंग्रजांनी आपले निशाण चढविले. पंढरपूरजवळ अष्टीची लढाई हरल्यावर पेशव्याने युद्धातून पळ काढला आणि मराठ्यांचे सर्व राज्य इंग्रजांच्या ताब्यात गेले. [⟶  पेशवे].


मराठा राजमंडळ : शिवाजी महाराजांनी मुख्यत: मोगल, कुत्बशाही व आदिलशाही यांची सत्ता झुगारून स्वराज्य स्थापिले. तेव्हापासून शाहूकालाच्या सुरूवातीपर्यंत मराठ्यांचे सार्वभौम राज्य एका छत्रपतीच्या आधिपत्याखाली राहिले. शाहू महाराजांच्या कारकीर्दीत बाळाजी विश्वनाथ याने मोठ्या हिंमतीने शाहू महाराजांची बाजू पक्की करून व विशेष कराराने मोगलांना मदत करण्याचे मान्य करून, त्या मोबदल्यात बादशाहाकडून अधिकृत रीत्या स्वराज्य व दक्षिणी सहा सुम्यांवर चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा १७१९ मध्ये मिळविल्या.

शिवपुर्व काळात घाटगे, निंबाळकर, घोरपडे, सांवतवाडीकर भोसले इ. मराठी देशमुख घराणी महाराष्ट्रात होती. सरकारने ठरविलेला दस्त वसूल करण्याचा व आपली मेहणत म्हणून त्या महसूलाचा काही ठरलेला हिस्सा स्वत:स राखून बाकी सरकारी तिजोरीत जमा करावयाचा, हे त्यांचे एक काम व आपल्या प्रदेशात शांतता व सुव्यवस्था राखणे हे दुसरे काम.

शिवाजी महाराजांची अष्टप्रधान परंपरा सामान्यत: शाहू महाराजांच्या मृत्यूपर्यंत टिकून होती. कालमानाप्रमाणे राणी येसूबाईकडे अंतर्गत राज्यव्यवस्थेसाठी जे प्रतिनिधित्व निर्माण केले होते, ते राजारामाच्या कारकीर्दीत प्रल्हाद निराजीस दिले. यामुळे पूर्वीच्या अष्टप्रधानांत प्रतिनिधिपदाची भर पडली. राजाराम जिंजीकडे गेल्यावर राजमंडळातर्फे कारभार करण्याची प्रथा पडली. राजारामाच्या कारकीर्दीत दोन राजमंडळे काम करीत होती. एक जिंजीस व दुसरे पन्हाळगडी. जे प्रधान जिंजीच्या  राजमंडळावर हजर नसत, त्या ठिकाणी त्यांचे जागी त्यांचे कारभारी प्रतिनिधितिव करीत.महाराष्ट्रातील राजमंडळावर तेथील प्रधानांच्या सुभ्यावरील अंमलदार सभासद म्हणून हजर राहून काम विल्हेस लावीत. राजाराम परत आल्यावरही राजमंडळाचा कारभार चालूच राहिला. तो पुढे शाहूच्या कारकीर्दीतही चालू होता.

राजाराम जिंजीस गेल्यावर त्याने आपले सल्लागार व हितचिंतक यांच्याशी विचारविनियम केला व मोगलांच्या ताब्यातील मुलखातून राज्यासाठी चौथ-सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा (अधिकारपत्रे) निरनिराळ्या मराठे सरदारांना दिल्या. परसोजी भोसले यास गोंडवन व वर्‍हाड, निंबाळकरांना गंगथडी, यांना गुजरात व खानदेश आणि काही सरदारांना कर्नाटकाच्या चौथ-सरदेशमुखी वसुलीच्या सनदा दिल्या. तसेच महाराष्ट्रात आल्यावर १६९९ साली राजारामाने उत्त्तरेच्या चार प्रांतांतील चौथ- सरदेशमुखी वसुलीसाठी आपल्या चार सरदारांना सनदा दिल्या. तसेच पराक्रमी सरदारांना जहागिरी मुलूख इनाम देण्याची प्रथा सुरू केली. ही पद्धत शाहू दक्षिणेत येऊन सातार्‍यास गादी स्थापन केल्यावरही चालू राहिली. इतकेच नव्हे, तर त्यात खालीलप्रमाणे आणखी भर पडली.

पेशवे सनदा घेऊन सातार्‍यास आल्यावर वसुलीच्या बंदोबस्तासाठी काही नवीन कायदे शाहूंना करावे लागले. दक्षिणेतील सहा सुभ्यांची सरदेशमुखी सनदेने ठरल्याप्रमाणे महाराजांस मिळाली. सरदेशमुखी ही छत्रपतींची मिळकत झाली. जो ऐन वसूल होईल, त्यापैकी शेकडा १०% प्रमाणे सरदेशमुखीचा वसूल राजाकडे आणि बाकीचा सरकारी खजिण्यात जमा होई. ज्या मुलखातून चौथाई वसूल होत असे, त्या मुलखावर मराठे सरदार चौथाई गोळा करण्यासाठीही जात. जितका ऐवज मिळवता येईल तेवढा घेऊन बाकी ऐवज सरकारकडे येणे राही. त्याच्या वसुलीसाठी दुसऱ्या वर्षी मुलूखगिरी करण्याचा प्रघात पडला. स्वाऱ्या करून मुलूख स्वराज्यात आला, त्याबाबत एका पत्रातील पुढील मजकूर वस्तुस्थितिनिदर्शन आहे. ते असे त्याच्या वसुलाचा जो चौथ तिला राजाची बाबती (राजबाबती) असे नाव देऊन तो राजाचा हक्क ठरविला. ही रक्कम राजाच्या खर्चास द्यावयाची असे ठरले. बाकी तीन हिस्से राहिले, ते राज्यव्यवस्थेसाठी खर्च करीत. ह्या मोकाशातून साहोत्रा (शेकडा ६ रूपये) व नाडगौडा (शेकडा ३ रूपये) या नावे दोन हक्क राजाने आपल्या मर्जीनुसार कोणाही सरदारास लावून द्यावे असा नियम केला. त्यामुळे राजबाबती (२५ %), नाडगौडा (३%) एवढ्या हक्कांचा वसूल ३४ % काढल्यावर बाकी राहिलेला ६६% वसूल हा मराठी तिजोरीत जमा करावयाचा असे ठरले. हा ६६% वसुलाचा मुलूख निरनिराळ्या सरदारांस जाहागिरीदाखल वाटून द्यावा असे ठरले. अशा मुलखगिरीसाठी निरनिराळे प्रदेश निरनिराळ्या सरदारांस वाटून देण्यात आले. अशा रीतीने मोगल प्रदेशातून चौथाई वसूल करण्याच्या निमित्ताने मुलखगिरी, स्वाऱ्या सुरू झाल्या. ज्या ज्या सरदारांनी जो जो प्रदेश जिंकला, त्यांना तो प्रदेश सरंजामास लावून दिला. असे सरंजामदार शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, नागपूरकर भोसले हे आपापल्या प्रदेशाचे कालांतराने सत्ताधीश बनले. त्यांनी आपापल्या राज्यात स्वत:चे नाणे सुरू केले. इनामे दिली. अशा रीतीने पंजाब, राजस्थान वगळता जवळजवळ सबंध हिदुस्थान मराठी सत्तेखाली आला. मुख्य प्रधानसह ह्या सर्व सरदारांचे मराठा राजमंडळ बनले. हे मंडळ शाहू महाराज जिंवत असे पर्यत त्यांना जबाबदार राहिले. ज्या राजेरजवाड्यांनी आपल्या मुलखात मराठ्यांस चौथाई वसूल करण्याचे हक्क दिले, त्यांचे परचक्रापासून संरक्षण करण्याची हमी मराठ्यांनी स्वीकारली. याचा अर्थ जी श्रेष्ठ सत्ता कमकुवत सत्तेच्या जोखडाखालील प्रजाजनांकडून चौथाई वसूल करते, ती सत्ता सर्वश्रेष्ठ होय. आपल्या पराक्रमाने मोठ्मोठ्या विस्ताराचे जिंकलेले प्रदेश त्या त्या सरदारांस जहागीर म्हणून देऊन टाकण्याचा प्रघात पेशव्यांनी पाडला. 


जो मुलूख जहागीर म्हणून सरदारांच्या स्वाधीन करण्यात आला, त्यावर पेशवे अंशत: हुकमत चालवीत. त्यांचे हिशेब पेशवे तपासीत. त्यांच्या मुलखातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक पेशवे करीत. सरदारांचा वारसाहक्कपेशवे ठरवीत व सरदारांच्या भाऊबंदकीचा तंटा लागला अथवा इतर काही बखोडा माजला, तर त्यांच्या सरंजामाची जप्तीही पेशवे करीत.

शाहू छत्रपतीनंतरचे साताऱ्याचे छत्रपती नाममात्र सत्ताधीश बनले, तरी बाह्यात: त्यांचा इतमाम धन्यासारखा होता. सातारच्या छोटया राज्याच्या  हद्दीत सर्वाधिकार आणि अखत्यारी महाराजांची होती. नवा नेमणे झाल्यास त्यास अधिकाराची वस्त्रे सातारच्या महाराजांकडून मिळत. अशी वस्त्रे घेतल्याशिवाय पेशव्याच्या अधिकारास तात्विक द्दष्टया कायदेशिरपणा येत नसे. वसईच्या तहानंतर १८०३ मध्ये दुसऱ्या बाजीरावास इंग्रजांनी जरी गादीवर बसविले तरी छत्रपतीकडून त्यास पेशवाईची वस्त्रे घ्यावी लागली. पेशवे पुण्यास राजाप्रमाणे रहात असले तरी सातारच्या हद्दीत ते गेले म्हणजे नोकरच ठरत व आपले हे नाते समजून ते त्या मर्यादेनेच वागत. फौजेसह पेशवे साताऱ्यास आले, तर सातारच्या हद्दीत त्यांची नौबत वाजण्याची बंद होऊन ते हत्तीवरून किंवा पालखीतून खाली उतरून पायी चालत व रूमालाने बांधून महाराजांच्या दर्शनास जात व त्यांच्या पुढे ते साध्या बैठकीवर बसत. मेटीचे वेळी ते महाराजांस रीतीप्रमाणे नजर करीत. आपल्या हातात मोर्चेल घेऊन ते वारीत. कधी कधी महाराजांमागे हत्तीवरील खवासखान्यातही बसत.

युद्ध किंवा तह करणे, दौलतीचे अष्टप्रधानांसुद्धा सर्व अधिकारी नेमणे, त्यांना वस्त्रे व शिक्कामोर्तब देणे, सरदार लोकांस स्वारीवर व मुलखगिरीवर पाठविणे किंवा परत बोलाविणे, इनाम, इतमाम, सरंजाम, नेमणुकी, धर्मादाय देणगी, वंशपरंपरागत कामगिरी, बहाली, बडतर्फी इ. बाबतीत सनदा किंवा महत्वाची कागदपत्रे देणे, हे सर्व छत्रपतींच्या अखत्यारीतील पेशवे असून पेशवे जरी ह्या सर्व बाबतींत शिफारसी व सल्ला मसलत देत तरी महाराजांनी कोणतीही गोष्ट मान्य केल्याशिवाय ती अंमलात येत नसे. शिक्कामोर्तब होणे हे छत्रपतींच्या आज्ञेने व दखलगिरीने होत असे. खुद्द पेशव्यांकडून अगर पेशव्यांमार्फत कामकाज लिहून जाई. ते त्याजकडून महाराजांस समजाविले जाई व त्यांच्या आज्ञेनुरूप हुकूम सुटत. वरील हरेक बाबतींत पेशवे जो सल्ला देतील किंवा सांगतील त्याचप्रमाणेचमहाराज प्राय: हुकूम देत. राजाचे ते राजपत्र व पेशव्याचे ते आज्ञापत्र.

शिवाजी- संभाजी यांच्या वेळी राजा व अष्टप्रधान एवढीच राज्याची मुख्य अंगे होती. राज्य एकसत्तात्मक असून अष्टप्रधान हे सल्ला देणारे व जबाबदारीने काम करणारे सेवक होते. राजाराम- शाहूंच्या कारकीर्दित सरंजामी सरदारांकडे आपापल्या प्रांतांतील दिवाणी, मुलकी आणि लष्करी व्यवस्था असे. ही व्यवस्था करून उरलेली, पण आगाऊ कराराने ठरलेली रक्कम त्यांनी छत्रपतींना द्यावयाची असे. शिंदे, होळकर, गायकवाड इ. सरदार मराठ्यांच्या दौलतीचे नोकर होते. त्यांनी जहागिरीचे आणि सरंजामीचे हिशोब दरवर्षी पेशव्यांच्या फडात दाखल करण्याचा शिरस्ता होता. नव्या  सरदारास सरदारकी देण्याचा प्रश्न उद् भवल्यास त्याजकडून नजराणा घेऊन वा न घेता सरदारकीची वस्त्रे महाराजांकडून पेशवे देववीत.

सरदारांच्या सैन्याची गणती करणे व सैन्याच्या खर्चाचा हिशोब ठेवणे, हे काम पेशव्यांनी नेमलेला फडणीस करीत असे. त्याला आपले हिशोब मध्यवर्ती फडणीसाकडे द्यावे लागत. सैन्यखर्चासाठी  रक्कम उभी करणे, स्वाऱ्यांचे हिशोब मिळाल्यावर जी प्राप्ती होई, त्यांपैकी कारकुनास किती द्यावयाचे, फडणीसांनी किती घ्यावयाचे व सरकारात किती जमा करावयाचे इ. ठरलेले असे. तहाच्या अटी बनवाव्या, पेशव्यांनी यावर मखलाशी करावी व सातारच्या छत्रपतींचे त्यावर शिक्कामोर्ताब व्हावे, असा कारभार असे. प्रत्येकालाच ही तंत्रे सांभाळावी लागत व ती आदरपूर्वक सांभाळली जात

मुख्यत: शाहूपासून मराठी राज्यात पदे व सरदारक्या आनुवंशिक पद्धतीने चालत असल्या, तरी एखादा नाकर्ता निघाल्यास त्याला नामधारी बनवून, कर्त्या माणसांच्या हाती सत्ता जाई. या पद्धतीने भोसले घराण्यातून सत्ता पेशव्यांकडे गेली आणि पुढे पेशवा दुर्बल निघाल्यावर तीच सत्ता नाना फडणीस व महादजी शिंदे यांच्याकडे गेली. अशा रीतीने सत्तेचे संक्रमण रक्तपात न होता होऊ शकले.त्याचप्रमाणे अष्टप्रधान पदे जाऊन बाळाजी विश्वनाथाच्या वेळेपासून संघपद्धती वाढत गेल्यामुळे स्वराज्याचे साम्राज्य झाले व चार पेशवे कर्तृत्ववान निघाल्यामुळे सत्ता केंद्रीभूत होऊ लागली. दिल्ली बादशाहीची सूत्रे शिंदे यांच्या हाती ङळूहळू गेली व आहिल्याबाई होळकरने माळव्यात सत्ता कायम केली. तेव्हा मराठी साम्राज्याच्या सत्तेची केंद्रे तीन ठिकाणी झाली. शिंदे, होळकर हे पुणे दरबाराशी सनदेने अंकित, पण व्यवहारत: बरोबरीचे नाते सांगत होते. याचा अर्थ तेव्हा ही घटना ब्रिटीश साम्राज्यात बरोबरीच्या नात्याने वागणाऱ्या वसाहतींच्या धर्तींची झाली होती. या वेळच्या मराठा राजमंडळात बरोबरीच्या नात्यात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड इ. होते. त्यांच्यात ऐक्याची भावना कायम होती.


दुसऱ्या बाजीरावाच्या वेळीदेखील तो नाकर्ता निघाल्यामुळे त्याला नामधारी बनवून एखादा  कर्त्या माणसाने सत्ता हाती घेतली असती पण लॉर्ड वेलस्लीने मधे पडून तैनाती फौजेच्या तत्वाच्या जोरावर पुणे दरबारच्या इतर सरदारांशी असलेला संबंध तोडला व बाजीरावाच्या हाती सत्ता रहावी, असे घडवून आणले.

शाहू महाराजांच्या पश्चात छत्रपतींची सत्ता त्यांनीच दिलेल्या दोन याद्यांमध्ये पेशवे गाजवू लागले. शिंदे, होळकर, पवार, इ. पेशव्यांच्या सरदारांना छत्रपती त्यांच्या जहागिरी सांभाळण्याकरिता १८०३ नंतरही सनदा देताना आढळतात. शिंदे, होळकर, पवार, पटवर्धन, गायकवाड इत्यादींच्या सरंजामी मुलखात लहानमोठे जमीनदार, जहागीरदार, भाट, चारण, मुखिये इ. होते. त्यांजकडून मराठे सत्ताधिशांस खंडणी मिळत असे परंतु तिचा वसूल मुलखगिरीची फौज परतल्यावरच होत असे. त्यांजकडून खंडणी घेतांना खालील हक्क वापरलेले दिसतात: (१) गादीचा वारस ठरविणे व नजराणा घेणे.(२) एखाद्या संस्थानाची खंडणी बाकी थकल्यास, आर्थिक हालाखी दिसून आल्यास वा संस्थानात निर्नायकी माजल्या, संस्थानिक राज्यकारभार हाकण्यास असमर्थ असल्यास त्या संस्थानाचा कारभार स्वत:च्या देखरेखीखाली घेणे व सुरळीत चालविणे. (३) जमीनदारांमधील व त्यांचे अवलंबित असतील त्यांजकडील आपापसांतील तंटे मिटविणे, गावच्या मक्तेदारांना आश्रय देणे आणि त्यांच्याकरिता समेट घडवून आणला असेल व अभय दिले असेल, तर त्याच्याकडून नजराणा घेणे. (४) संस्थानिकाच्या मुलखात बंड उत्पन्न झाल्यास त्याचा बिमोड करणे व त्या कामगिरीकरिता खंडणी घेणे. (५) मराठा सरदारांचे सैन्य एखाद्या प्रांतात असता, त्याचा अपमान झाल्यास आगळीक करणाऱ्याला शिक्षा करणे.(६) एकाद्या संस्थानिकाने प्रजाजनाची  संपत्ती लुटल्यास त्याची चौकशी करून प्रजाजनास नुकसानभरपाई देणे. (७) गुन्हेगार पकडले असता संस्थानिकाच्या दुबळेपणामुळे एखादा संस्थानिक त्या गुन्हेगारास शिक्षा करण्यास असमर्थ असेल, तर त्याला  शिक्षा करणे. (८) परकीय चाचेगिरीचा बंदोबस्त करणे, दुधपिती पद्धत बंद करणे आणि दुष्काळात मदत करणे. वरील हक्कांचा वापर मराठे सरदार आपले मांडलिक जमीनदार व सरंजामदार यांच्या बाबतीत   करीत. अशीच वागणूक पेशवे आपल्या सरदारांच्या बाबतीत देत.

राज्यव्यवस्था : मराठी सत्तेखालील प्रदेशाची शासनव्यवस्था राज्यकर्त्याप्रमाणे बदलत गेली तथापि शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या प्रशासनव्यवस्थेचामूळ  पाया हे बदलत्या शासनव्यवस्थेचे मूलभूत तत्व अखेरपर्यत राहिले. शिवकालीन राज्यव्यवस्थेत मुलकी व सैनिकी असे दोन प्रमुख विभाग होते.

शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकाच्या पूर्वी, राज्यभिषेकासमयी  हिंदवी स्वराज्याच्या व्यवस्थेसाठी कानुजाबता ( राज्यकारभारविषयी सुसूत्रमाहिती देणारे नियम ) तयार केला. तो राज्यभिषेक शक एक आनंदनाम संवत्सेरे ज्येष्ठ वद्य त्रयोदशीस (६जून १६७४) दाहीर केला. कानुजाबता म्हणजेच शिवकालीन मराठी राज्याची घटना होय. या कानुजाबत्यामुळे कारभाराची नवीन पद्धत पूर्वीच्या इस्लामी अमदानीपासून भिन्न झाल्यामुळे राजाचे नियत्रंण मात्र अधिक प्रभावी झाले. कानुजाबत्याबरोबर या सर्व राज्यकारभाराच्या लेखन व्यवसायाच्या सोयीकरिता आणि विशेषत: जुन्या व नवीन कारभाराची हातमिळवणी व्हावी, म्हणून राज्यव्यवहारकोश तयार करून घेतला. ह्या कानुजाबत्यात सांगितल्याप्रमाणे राज्यभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी राज्याच्या कारभाराकरिता अष्टप्रधान नेमले. अष्टप्रदानांची वेगवेगळी कर्तव्ये कानुजाबत्यात दिलेली असून त्यावरून, सर्व प्रधान आपण थेट राजाला जबाबदार आहोत असे मानीत. यावरून लष्करी व दिवाणी अधिकारांत लष्करी अधिकाऱ्याने दिवाणी अधिकाऱ्याच्या आज्ञेत असावे, हेच तत्व शिकवली होते.

राजसत्ता, वतनदार व गोत ही शिवकालीन राज्यकारभाराची टीन मुख्य अंगे होत. राजसत्तेला जरूर लागणारी वतनदारांची मदत, वतनदारांना स्वत:ची सेवा सांभाळण्यासाठी लागणारी गोताची मदत, राजाचे रयतेवरील स्वामित्व व वतनदारांवरील नियत्रंण व राजसत्ता लोकप्रिय करण्यासाठी राजाला रयतेची घ्यावी लागणारी काळजी, यांमुळे या तीन संस्थांचा अन्योन्य संबंध महत्वाचा ठरला आहे.

शिवकालीन राजसत्तेचे (१) राजसत्ता, (२)देशकसत्ता, (३) ज्ञातिसत्ता किंवा धर्मसत्ता व (४) व्यापार हे चार घटक होत. कानुजाबत्यात मुख्यप्रधानापासून ते गावच्या तराळापर्यत सर्व लहानमोठ्या अधिकाऱ्यांची  कामे आणि त्यासाठी मिळणारे द्रव्य यांचे नियम आहेत. अष्टप्रधानांची कामे पुढीलप्रमाणे होत:

मुख्य प्रधान याणीं सर्व राजकार्य करावे. राजपत्रावरी सिक्का करावा. सेना घेऊन युद्धप्रसंग स्वारी करावी. तालुका स्वाधिनात होईल त्याचा बंदोबस्त करून, आज्ञेनें वर्तावें, व सर्व सरदार सेना त्यांजबरोबर जावें. त्यांनें स्र्वांसमेंत चालावे. (२) अमात्य याणीं सर्व राज्यातील जमाखर्च चौकसी करून दफतरदार, फडणीस त्यांचे स्वाधीन असावें. लिहिणें आकारावें. फडनिशी, चिटनिशी, पत्रांवर निशाण करावें, युद्ध प्रसंग करावे, तालुका जतन करून आज्ञेंत चालावें. (३) सचिव याणीं राजपत्रें शोध करून अधिक उणें अक्षर मजकूर शुद्ध करावी. युद्धप्रसंग करून तालुका स्वाधीन होईल तो रक्षून आज्ञेंत वातावें. राजपत्रांवर चिन्ह संमत करावें. (४) मंत्री (सरनोबत) याणीं सर्व मंत्र विचार राजकारण यांतील सावधतेनें विचार करावें. आमत्रण, निमत्रण, वाकनिशी त्याचे स्वाधीन. तालुका जतन करून युद्धादि प्रसंग करावें. राजपत्रांवर संमत चिन्ह करावें. (५) सेनापती याणीं सर्व सैन्य रक्षण करून युद्धप्रसंग स्वारी करावी. तालुका स्वाधीन होईल तो रक्षूण हिशेब रूजू करून आज्ञेनें वर्तावें व फौजेचें लोकांचें बोलणे बोलावें. सर्व फौजेचे सरदार याणीं त्याजबरोबर चालावें. (६) पंडितराव याणीं सर्व धर्माधिकार, धर्म, अधर्म पाहून विचिक्षा करावी. शिष्टांचे सत्कार करावें. आचार, व्यवहार, प्रायश्चित, पत्रें होतील त्यांजवर संमत चिन्ह करावें. दानप्रसंग, शांती अनुष्ठान तत्काळी करवावें. (७) न्यायाधीश याणीं सर्व राज्यांतील न्याय, अन्याय मनास आणून बहुत धर्मे करून न्याय करावे. न्यायाची निवाडपत्रें यांवर संमत चिन्ह करावें. (८) सुमंत याणीं परराज्यांतील विचार करावा. त्यांचे वकील येतील त्यांचे सत्कार करावें. युद्धदि प्रसंग करावे. राजपत्रांवर संमत चिन्ह करावें.


छत्रपती राजारामाच्या वेळी अष्टप्रधानांच्याही वरचे प्रतिनिधी या नावाचे एक पद तयार झाले. त्याच्या कामातही राजप्रतिनिधीत्व करून शिवाय युद्धप्रसंग करण्याचे काम होतेच. केवळ न्यायाधीश व पडिंतराव यांस मात्र युद्धप्रसंग करण्याचे काम नव्हते. मुख्य प्रधानाचे वेतन सालिना सात हजार होन व इतरांचे पाच हजार होन होते. एक होन म्हणजे साधारण साडेतीन रूपये समजन्यास हरकत नाही. पेशवाईत अष्टप्रधानांचे सामान्यत: सरंजामात रूपांतर होत गेले. चिटणीस अष्टप्रधानांत नव्हते.

शिवाजीने राज्यकारभाराच्या सोयीसाठी प्रधानमंडळाद्वारे विकेंद्रीकरण केले होते, तरी कारभारविषयक कामकाजाच्या अंमलबजावणीची पत्रे तयार करण्याचे बरेच काम फडणीस व चिटणीस या दोन अधिकाऱ्यांच्या हाती होते. सनदा, दानपत्रे वगैरे महाली हुकमी याचा जाबता, फडनिशी, चिटनिशी अलाहिदा त्याप्रमाणे ल्याहावे, असे त्यासंबंधी नमूद केले होते.

कार्यक्षम प्रशासकीय व्यवस्थेसाठी महाराजांनी स्वराज्याचे तीन स्वतंत्र भाग पाडले होते. व ते तीन मंत्र्यांच्या देखरेखीखाली दिले होते. मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांच्यकडे उत्तर कोकण, कल्याण –भिवंडी ते कोळवण-साल्हेर, बारा मावळे, लोहगड आणि जुन्नर हा प्रदेश होता. सचिव अण्णाजी दत्तो याजकडे चेऊल ते कोप्पळपर्यंतचा दक्षिणेकडील प्रदेश व दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री याजकडे देशावरील प्रदेश सोपविला होता. या तीन विभांगावर ह्या तीन मंत्र्यांचे सर्वसाधारण नियंत्रण असले, तरीसुद्धा तिन्ही विभागांची राज्ययंत्रणा सरसुभेदाराच्या हुकमतीखाली चाले.

ह्या सरसुभेदारांना मदतीस म्हणून मुजुमदार (हिशेब), चिटणीस (पत्र-लेखक), दफतरदार, फडणीस, सबनीस इ. कारकून मंडळी केंद्रातून नेमून दिलेली असत. सुभेदारांनी आपापल्या प्रांतातील रयतेची सर्व प्रकारची काळजी घेतली पाहिजे, असा दंडक होता. रयतेला काडीचा जरी उपद्रव झाला, तरी महाराज तो सहन करणार नाहीत असे सुभेदारांना सांगितलेले असे. अशा रीतीने रयतेच्या कल्याणाची दक्षता हा कल्याणकारी राजा घेई. राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्याचा मुलूख १४ प्रांतांत विभागलेला होता. (१) मावळ प्रांत: मावळसह सासवड, जुन्नर खेड तालुके आणि यांतील अठरा डोंगरी किल्ले. (२) वाई प्रांत: वाईसह सातारा, कऱ्हाड हे प्रांत (हल्लीच्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग ) त्यांत पंधरा संरक्षक किल्ले अंतर्भूत होते. (३) पन्हाळा प्रांत: पन्हाळ्यासह कोल्हापूरचा पश्चिम भाग आणि पश्चिमेकडील तेरा किल्ले. (४) दक्षिण कोकण प्रांत: रत्नागिरीसह अठ्ठावन पहाडी व समुद्रकिनाऱ्याच्या किल्ल्यांसह. (५) ठाणे प्रांत: उत्तर कोकण जिल्हा –बारा किल्ल्यांसह. (६-७) त्रिंबक आणि बागलाण प्रांत: नासिक जिल्ह्याचा पश्चिम भाग बासष्ट डोंगरी किल्ल्यांसह हा प्रदेश लष्करी ठाण्यांनी व्यापलेला होता. (८) वनगड प्रांत: धारवाड जिल्ह्याचा दक्षिण भाग बावीस किल्ल्यांसह असून संरक्षणासाठी स्वतंत्र फौज ठेवावी लागत असे. (९,१०,११) वेदनूर, कोल्लार, श्रीरंगपटण, अर्वाचीनम्हैसूर संस्थान अठरा किल्ल्यांसह. (१२) कर्नाटक प्रातं : कृष्णेच्या  दक्षिणेस असलेल्या मद्रास इलाख्याचे जे जिल्हे  इंग्रजांना  देण्यात  आले ते अठरा किल्ल्यांसह (१३) वेल्लोर प्रांत: सांप्रत अर्काट जिल्हा, पंचवीस किल्ल्यांसह आणि (१४) तंजावर प्रांत : सहा किल्ल्यांसह 


पायथ्याचा मैदानी प्रदेश परगणे, महाल आणि तर्फा, फुटकर यांत विभागलेला असे. दोन किंवा तीन महालांचा एक सुभा बने. खेड्याचे पाटील- कुळकर्णी किंवा सुभ्याचे देशमुख –देशपांडे यांच्या हातात जमाबंदीचा कारभार मोगलांनी ठेवला होता. शिवाजीने सुभ्याचे सुभेदार किंवा महालाचे महालकरी यांच्यामार्फत जमाबंदीचे काम घेण्याची नवी व्यवस्था अंमलात आणली.

कमाविसदार, महालकरी, हवालदार, सुभेदार यांना चाकरीबद्दल वेतन मिळे. सुभेदाराचे वेतन वर्षास सु. चारशे होन दरमहा शंभर रूपये  असे. हवालदारास दरमहा सु. पन्नास रूपये व हिशोबनिसास सु. तीस रू. दरमहा वेतन मिळे. सुभेदाराचे काम मुलूखात शांतता राखणे व वसूल गोळा करणे हे होते.

जिल्ह्याच्या मुलकी करभाराची व्यवस्था पंत अमात्य, पंत सचिव व लेखापाल या केंद्रिय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होती. जिल्ह्याचे हिशोब या दोन अधिकाऱ्यांकडे पाठवावे लागत.  तेथे ते एकत्र करून त्यांत नियमबाह्या दोष आढळ्यास अपराध्याला शिक्षा दिली जाई. ह्या अधिकाऱ्यांना जिल्हा कामगारांचे काम कसे चालते, हे पाहण्यासाठी आपल्या हाताखालची माणसे पाठविण्याची मुखत्यारी होती. मुख्य प्रधानाच्या खालोखाल पंत अमात्य व पंत सचिव हेच दोन मोठे  मुलकी अधिकारी होते. जमाबंदीच्या कर्तव्याबरोबर त्यांच्याकडे लष्करी अधिकारही होते.

राज्यातील जमाखर्च दफतरदार –फडणीस यांचे स्वाधीन होता. सर्व तऱ्हेच्या खर्चाला देणारा म्हणजे मुजुमदार. त्याने राजाच्या हुकूमाप्रमाणे फडणिसाकडे देण्याघेण्याचे व्यवहार येतील, त्यांची चौकशी करून अंमलबजावणीस मार्गदर्शन करणे, अंमलबजावणी करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना अगदी सांप्रतच्या पद्धतीप्रमाणे अर्थखात्याची अनुमती आवश्यक असे. तशीच शिवशाहीत फडणिसाच्या लेखी मान्यतेची आवश्यकता असे. तत्कालीन परिस्थितीप्रमाणे सरकारी सत्तेची अंमलबजावणी करणाऱ्या चिटणिशी व फडणिशी अशा दोन मख्य शाखा होत्या.

राजसत्तेच्या खालोखाल देशक सत्ता म्हणजे देशमुख, देशकुळकर्णी, पाटील, कुळकर्णी इ. वतनदारादी लहानमोठी अधिकारी असलेली मंडळी प्रांतांतून यातच प्रमुख गावकरी व रयतेचा अंतर्बाव होई. देशक संस्थेला वतन म्हणत. गोत म्हणजे ग्रामसंस्था. या ग्रामसंस्थेला फार महत्व होते. शिवकालीन ग्रामसंस्था कुटूंब तत्वावर आधारीत होती. गावातील वतनाचे भांडण तंटे ग्रामसंस्थेमार्फत निकालात काढण्याचा प्रघात होता. तत्कालीन ग्रामसंस्थेकडे मोठे अधिकार असत.

त्या वेळी महाराष्ट्रात जी कडेकपारी खेडी नांदत होती, त्यांपैकी प्रत्येक गाव चिमुकले असले, तरी बव्हंशी स्वयंपूर्ण होते. गावात शेतीखेरीज कारागिरी करणाऱ्यास बलुते अलुतेदार अशी संज्ञा असे. यांना मुसलमानपुर्व काळात अष्टादश प्रकृती किंवा कारू नारू म्हणत. यांची संख्या मुसलमानी काळात चोवीसपर्यंत वाढली. त्यात पोटाकरिता जमिणीच्या उत्पन्नानुसार धान्यादी भाग मिळे व जमीन इनाम मिळे.

गोत गावकऱ्यांचे  व एक द्वितीयांश सरकारी अधिकारी यांचे असे व खेडेगावाच्या तंट्यांचे व पाटील-कुळकर्णी, देशमुख देशपांडे आदी करून वतनदारांच्या वतनासंबंधीचे न्यायनिवाडे या गोतासमोर चालत. प्रत्यक्ष राजा जरी स्वत: अखेरचा न्यायाधिश असला, तरी गोताच्या बहुमतावर निकाल होई. अशा निकालपत्रावर म्हणजे महजरनाम्यावर शासकीय अधिकारी व बलुतेदार यांच्या सह्या वा निशाण्या असत. बारा बलुत्यांप्रमाणे बारा अलुते होते. तेही गावातील कारागीर असत. बलुतेदार गावात हक्कदार तर अलुतेदार गावात लोककृपाकांक्षी असत. 


गावातील मुख्य वतनदार पाटील-कुळकर्णी. यांना धामधुमीच्या काळी गावाचे संरक्षण करावे लागे. वसविणाऱ्यांना  राजसत्ता काही वतनहक्क बहाल करी. गावाची वसाहत झाली की, सरकार जो कागी सारा गावावर बसवी, तो देण्याला पाटील जामीन राही. गाव भयाने पळाला अगर इतर कारणाने सारा थकला तर पाटलास जबाबदार धरत. अशा तऱ्हेने पाटलावर गावाची जबाबदारी म्हणून त्याच्याकडे महाराने फुकट राबावे व कुंभाराने मडकी फुकट द्यावी इ. हक्क असत. काही मानपान व वतना हक्क इत्यादीही असत. गावात वंशपरंपरेने जमीन कसणारे ती मिराशी कुळे. नव्याने गावात येऊन राहणाऱ्यास उपरी म्हणत. मिराशीला वृत्ती व मिरासदाराला वृत्तीवंत म्हणत. गावाचा मुख्य वतनदार पाटील. हा बहुतेक मराठाअसे. पण काही ठिकाणी ब्राह्यण व इतर जाती वा धर्माचे पाटील होते. शिवकाली महारांनासुद्धा अगदि क्वचित पाटिलकीचे वतन होते.

नवी शेती संपादण्यासाठी कुळांना सरकारांत काही नजराना द्यावा लागे. पाटलाच्या खालोखाल कुळकर्णी हा गावचा महत्वाचा वतनदार असे. नवे वतन संपादन करण्यासाठी नजराणा द्यावा लागे. नजराण्याशिवाय वतन मिळत नसल्यामुळे शिवकालापूर्वी सधन व्यक्ती वतनदार होत. त्यामुळे तत्कालीन महाराष्ट्रात वतनदारांच्या रूपाने एक लहानसा भांडवलदार वर्ग निर्माण झाला होता. पैकी गावातील पाटील, कुळकर्णी व परगण्याचे देशमुख, देशपांडे हे राजसत्तेचे तसेच प्रजेचेही प्रतिनिधीच होते. गावाची  वसाहत करणे हे ज्याप्रमाणे पाटलाचे काम, त्याप्रमाणे अनेक गावे मिळून होणाऱ्या परगण्याच्या वसाहतीबद्दल देशमुख जबाबदार असे. उचित कारण नसता परग्ण्याचा वसूल पोचला नाही, तर वतन जप्त होऊन देशमुख – देशपांडे आणि पाटील- कुळकर्णी यांसही कैद भोगावी लागे.

देशमुखाला लष्करी आणि फौजदारी अधिकार असून शत्रूपासून ग्रामाचे व देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्यावर असे. त्याचप्रमाणे लढाईच्या प्रसंगी राजाला सैन्यबळाची मदत करण्याचे कामही देशमुखाचे असे. शिवकालीन समाजात सैनिक व बिनसैनिक असा भेद नव्हता . प्रत्येक गावकरी लष्करी शिपाई बनण्यास व जरूर लागेल तेव्हा हातचा नांगर सोडून भालाबर्ची व तलवार घेऊन रणांगणावर  धाव घेण्यास तयार असे.

वतनदार व गोत यांचे संबंध : वतनदार कुळकर्णी हा गावचा मिरासदार असे. कुळकर्ण्याचा  निर्वेश झाल्यास त्याच्या जागी दुसरा कुळकर्णी वंशपरंपरेने नेमण्याचा हक्क ग्रामस्थांना असे. ग्रामस्थांनी अशी वतने बहाल केली, तरी त्यावर परगण्याच्या देशमुखांचे शिक्के व देशपांड्याचे दस्तक असावे  लागत. एकदा वतन दिल्यानंतर त्याला कोणी हरकत केली, तर सारा गाव वतनदाराची पाठ राखावी असे. कुळकर्ण्याप्रमाणे पाटीलसुद्धा मिरासदार होता. पाटील मेला अगर त्याचा खून झाला, तर त्याच्या बायकोच्या आणि अज्ञान मुलाच्या  हातून ग्रामस्थ  कारभार चालविण्यास मदत करीत.

शिवकालीन समाजात वतनासक्ती जबरदस्त होती आणि वतनासंबंधीची भांडणे पिढीजात चालू राहात, परंतु वतनाच्या भांडणातराजसत्ता अखेरचा निकाल ग्रामसभांवर सोपवी. राजाकडून फिर्यादीस मुळातच हुकूम असे की, हे मिराशीचे काम आहे, तरी अभयतावादींनी गोतामद्ये जाऊन कागद, इ. साक्षी इ. रूजू करून निवाडा करून घेणे. गोतदेशकसभेत त्या मंडळींनी खऱ्या साक्षी द्याव्यात, अशी त्यांना शपथ घालण्यात येई. शिवाजी महाराजांनी एका खोटी साक्ष देणाऱ्यांची  जीभ कापण्याचा हुकूम दिला होता. 


कानुजाबत्यात प्रधानांना वेगवेगळ्या प्रदेशांचा बंदोबस्त करावा, अशा आज्ञा आहेत. याच धोरणाची वाढ राजारामाच्या कारकीर्दीत होऊन ताब्यातील मुलखाचे संरक्षण करण्याची  जबाबदारी राजारामाने

प्रधानात वाटून दिल्यामुळे, राजारामाच्या कारकीर्दीपासून प्रधान हे स्वतंत्र सरदार बनू लागले. ही पद्धत शाहूच्या कारकीर्दीत परिणतावस्थेस पोचून प्रत्येक प्रधान सरंमाजी सरदार बनून वेगवेगळ्या टापूत पृथकत्वाने नांदू लागला. त्यामुळे प्रधानादी सत्ताधारी बनले. बाळाजी विश्वनाथ पेशवे याच्या हे ध्यानी आल्यावर त्याने शाहू महाराजांतर्फे प्रत्येक  सरदारापुढे पर्याय ठेवला. प्रत्येक सरदाराने आपल्या क्षेत्रात पूर्ण स्वतंत्र राहून त्याने मराटी राज्याचे घटक होण्यास मान्यता द्यावी. म्हणजे राज्यास सांधिक राज्याचे प्राप्त होईल आणि ही योजना मान्य केल्यास प्रबळ असे मराठी साम्राज्य निर्माण होईल. नाहीतर एकीच्या अभावी एकएकटा सरदार निर्बल ठरेल. या योजनेप्रमाणे दाभाड्यांना गुजरात आंग्रयाना कोकण, फत्तेसिंग भोसल्यास कर्नाटक, नागपूरकर भोसल्यास वऱ्हाड अशी क्षेत्रे वाटून दिली. प्रतिनिधीसही प्रधानमंडळात स्थान दिले.

शाहूमहाराजांचे हुकूम सर्व अधिकाऱ्यास मानावे लागत. तसेच शाहूमहाराजांनी पेशव्यांसह सर्व सरदारांस आपल्या हुकमतीत ठेवले होते. वृद्धापकाळ जवळ आल्यावर शाहूछत्रपतींनी आपणास मूलबाळ नाही, हे लक्षात घेऊन आपल्या पश्चात स्वाराज्याची धुरा वाहणारा पेशव्याशिवाय कोणी समर्थ नाही, असे पाहून दोन याद्या बाळाजी बाजाराव पेशव्यास स्वहस्ते दिल्या. त्यांत पेशव्यास केलेल्या आज्ञा स्पष्ट आहेत. त्यांतील काही महत्वाच्या अटी अशा: फौज ठेऊन बंदोबस्त करावा, कोल्हापूरकर संभाजीस साताऱ्याच्या गादीवर आणू नये. त्याचे एक कारण त्यासही  मुलगा नव्हता. पेशव्यांचे वंशात प्रधानपद चालेल, आमचे वंशाचे आज्ञेत प्रदानाने राहून सेवा करणे. या महत्वाच्या होत.

या दोन याद्यांमुळे मराठेशाहीच्या मूळ चालकत्वाची शाहूने पेशव्यास सनदच करून दिली. शाहू निवर्तल्यावर पेशव्याने रामराजास साताऱ्यास आणून दत्तकविधान करून गादीवर बसविले (इ. स. १७५०). रामराजा आपल्या वयाच्या पंचवीस वर्षेपर्यंत  अज्ञातवासात वाढला. त्यास राजकारणाचा गंध नव्हता. त्या प्रकारचे शिक्षणही त्यास कोणी दिले नव्हते. आपल्याला राज्यकारभार करणे शक्य  नाही, हे लक्षात घेऊन सांगोले तहानुसार सर्व राज्यकारभार  पेशव्यांनी छत्रपतींच्या वतीने चालवावा, अशी यादी रामराजाने पेशव्यास लिहून दिली. पूर्वीच्या दोन आणि ही अशा तीन याद्या मिळाल्यावर पेशवे प्रत्यक्षात मराठी राज्याचे सत्ताधीश बनले. अशा प्रकारे छत्रपतीकडून पेशव्यांकडे मराठी  राज्याची सर्व सत्ता, याद्या व सांगोल्याचा हा करार यांपासून आली. हे सर्व सरदारांस पटवून देण्याचा उपक्रम पुढे दोन-चार महिण्यांत पार पडला. सर्व सरदारांस पेशव्याने आपल्या हुकमतीत आणले.

शाहूनंतर सातारकर छत्रपतींचे महत्व कमी होऊन पेशवे साहजिकच सर्वसत्ताधीश झाले आणि शाहूनंतरचे छत्रपतीं तर्तबगार निघाले नाहीत. माधवराव पेशव्यांच्या अकेरीपर्यंत पेशव्याच्या कर्तबगारीमुळे मराठी सत्ता पेशव्याकडे राहिली. पुढे सवाई माधवरावाच्या वेळी ही सत्ता पेशव्यांचे नोकर नाना फडणीस यांच्या हाती गेली आणि महादजी शिंदे, यशवंतराव होळकर इ. सरदारही स्वतंत्रपणे वागू लागले. त्याचप्रमाणे अष्टप्रदान मंडळ जाऊन साधारणपणे बाळाजी विश्वनाथाच्या वेळेपासून संघराज्यपद्धती अस्तित्वात आली.


सैनिकी व्यवस्था : सेनासमुदाय हा राज्याचा तिसरा मुख्य घटक होता. शिवकालीन राज्यव्यवस्थेतील लष्करी विभागात पायदळ, घोडदळ खाशा स्वारीबरोबर असणारे लोक, स्वराज्यातील किल्ल्यांचा बंदोबस्त, किल्ल्यातील मेटे, पहारे व त्यांच्या घेऱ्यांचा बंदोबस्त, तोफखाना आणि आरमार यांचा प्रामुख्याने समावेश होई. शिपायास व नायकास दरमहा एक, दोन किंवा तीन होन वेतन असे. जुमलेदारास

शंभर होन, हजारी सरदार पाचशे होन तैनात असे. पांचहजारीस सालिना अडीच हजार होन तैनात असून शिवाय त्याला सरकारकडून पालखी, अबदागीर वगैरेंची नेमणूक असे.

घोडदळात वारगीर व शिलेदार असे दोन प्रकार असत. बारगिराचा घोडा आणि हत्यारादी सामान सरकारी असत आणि सरकारमार्फत  त्यांची देखभाल होई. शिलेदार स्वत: च घोडे व हत्यारे आणीत. त्यांची निगा ते स्वत:च राखीत. हत्यारे व सामान त्यांचे स्वत:चेच असे. त्यांची घोडी, हत्यारे, शरीर इत्यादींची तपासणी होई. त्यास सरकारकडून वेतन मिळे.

पायदळात दहा माणसांचा एक दहिजा केलेला  असे, त्यावर एक नाईक मुख्य असे. अशा पाच नाईकांवर किंवा पंचवीस बारगीर किंवा शिलेदार यांजवर एक हवालदार असे. पाच हवालदारांवर एक जुमलेदार, पाच जुमलेदारांवर एक सुभेदार किंवा एक हजारी असे  व दहा सुभेदारांवर एक पाचहजारी असे. हे सगळे सुभेदार व पाचहजारी सरनोबतांच्या हुकूमात असत. घोडदळाचा सरनोबत अर्थात निराळा असे. पंचवीस घोड्यांस एक पालखी व एक नालबंद असे. या सर्वांना दरमहा रोख वेतन मिळे.

या लष्काराशिवाय महाराजांनी स्वत:च्या रक्षणासाठी खास विश्वासातील असे पाच हजार जिलिबीचे लोकांपैकी लागतील तेवढे लोक सतत स्वारीबरोबर राहण्यासाठी ठेविले होते. त्यांचे तीस, चाळीस, साठ, शंभर असे जय्थे करून त्यांजवर चांगले शूर, मर्द व इमानी सरदारनेमत. ह्यांशिवाय आणखी दोनशे उमदी घोडा  खाशांसाठी म्हणून निराळी  होती. प्रत्येक सुभेदाराच्या व हजारी सरदाराच्या हाताखाली एक ब्राह्यण सबनीस व प्रभू कारखानीस असे नोकर होते. त्यांच्या हाताखाली  कमीजास्त कारकून असत.

किल्ल्यांची व्यवस्था: महाराजांच्या ताब्यात काही जुने व काही नव्याने बांधलेले सु. ३०० किल्ले होते. प्रत्येक किल्ल्यांवर किमान हवालदार (गडकरी), सबनीस आणि कारखानीस असे तीन प्रमुख अधिकारी काम करीत. हवालदाराच्या मदतीस कधीकधी तटसरनौबत किवां क्वचित सरनौबत असे. हवालदाराकडे किल्ल्याचा एकंदर कारभार असे. गडाच्या किल्ल्या हवालदाराच्या ताब्यात असत. किल्ल्यांवरील हवालदारांच्या नेमणुका प्रत्यक्ष शिवाजी महाराज करीत. प्रत्येक किल्ल्यावरील शिबंदी हवालदाराच्या ताब्यात असे.

महाराजांपाशी तोफखाना होता. प्रत्येक किल्ल्यावर तोफा ठेवलेल्या असत. शिवाय लष्कराबरोबर चालविण्यासाठी सु. दोनशे तोफा गाड्यांवर घातलेल्या असत.


आरमार: राज्यसुरक्षिततेसाठी जसे लष्कर आवश्यक तसेच कोकणपट्टी, समुद्रकिणारी  व सागरी व्यापार यांच्या संरक्षणासाठी  शिवाजी महाराजांना आरमार आवश्यक वाटले. या गरजेतूनच मराठ्यांचे आरमार उदयास आले. शिवाजी महाराजांकडे इंग्रज लोकांच्या म्हणण्यप्रमाणे १६६५ मध्ये ३० पासून १५० टन वजनाची लहानमोठी ८५ गलबते व ३ मोठ्या डोलकाठ्यांच्या गुराबा अशी जहाजे होती. पुढे गुराबांची संख्या ६६ पर्यत वाढली होती. या सर्व आरमारावर ५,००० पर्यत आरमारी सैनिक होते. त्यांजवर मुख्याधिपती म्हणून एक सुभेदार असे. आरमारासंबंधीची कामे कारभारी, कारखानीस व सबनीस यांच्यामार्फत होत. आरमाराचा  सर्व खर्च महालोमहालीचे शासकीय कोषागार व कोठारे यांतून होई. आरमाराच्या साहित्याकडे शिवाजी महाराजांचे विशेष लक्ष असे. जहाजावरील खलाशांना मासिक तीन होन, सुभेदारास ३,०००होन वार्षिक वेतन असे. इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या श्रेणीप्रमाणेच दोन हजार, एक हजार व पांचशे होन असे वार्षिक वेतन मिळे.

पेशवेकालीन सैन्यव्यवस्था : पेशवेकाळातील मराठी लष्करात हुजुरात व पथके असे दोन विभाग होते. हुजूरात म्हणजे सरकारी फौज. पेशव्यांच्या मध्यवर्ती सत्तेकरिता ती मोठी असणे स्वाभाविक होते. ह्या फौजेत दहा हजारांपर्यंत घोडेस्वार असत. त्यांची पथके बावन्न असून प्रत्येक पथकावर वेगवेगळे सरदार असत. ह्या सर्व फौजेस पागा म्हणत. पागेकडे फडणीस, पोतणीस इ. व पथकास बक्षी असत. बक्षीचे वेतन व त्याच्या पालखी या वाहनाचा खर्च वेगळा असे. सरकारी तिजोरीतून वेतन देण्याच्या पद्धतीने पेशव्यांच्या फौज उभारली जाई.

दुसरा प्रकार सरजांमी फौजेचा. राजाराम महाराजानंतर अनेक सरदारांनी सैन्य मोगलांशी मुकाबला केला. त्याला स्वत:ची घोडी घेऊन चाकरी करणाऱ्यांची संख्या मोठी होती. असांना शिलेदार व त्यांच्या समुदायास पथक म्हणत. असा शिलेदारांच्या समुदायाचे सरदार ते पथक किंवा पथकी. सरकारी घोडे व हत्यार घेऊन लढणारे ते बारगीर.

ही पथके दोन प्रकारची होती. सरंजामी व इतलाखी किंवा नग् दी. मराठी लष्करात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, पटवर्धन इत्यादींना फौजा उभारण्यास सरंजाम व जहागिरी लावून दिल्या होत्या. अशा सरदारांजवळील फौज ती सरंजामी फौज. ह्या सरदारांच्या फौजांत त्यांच्या छोट्या जहागीरदारांची पथके, सरंजामी पागा व इतलाखी फौज हे सर्व प्रकार आढळून येत. उदा., पटवर्धनास ४,५०० घोडेस्वारांची सरंजामी दिली होती, पण ही संख्या नेहमीच पथकात आढळे,असा मात्र नेम नव्हता. पथकाच्या खर्चास सरकारातून नगद पैसै मिळत असे. नगदी फौजेच्या सरदाराची आपल्या पथकावर पूर्ण सत्ता असे. त्याच्या मार्फतच पथकातील लोकांस वेतन मिळत असे. दर माणशी ठराविक मासिक वेतन व सरदारांना सालिना वेतन अशी योजना असे. देखरेख रहावी म्हणून सरकारातून प्रत्येक पथकासाठी दिवाण, फडणीस, इ. अधिकारी नेमलेले असत पण सरकारातून पैसा नियमितपणे मिळण्याची मारामार असल्यामुळे इतलाखी फौजेचे सरदारसुद्धा सरकारी तपासणी चुकविण्याकरिता अनेक युकत्या  लढवीत. लाचलुचपत, इ. गोष्टी  उण्याअदिक प्रमाणात चालू असल्याने १०० पथकांत जेमतेम निम्मे लोक असावयाचे. मोगली राज्यात हे प्रमाण तिसऱ्या हिश्श्यावर आले होते. शिपायाच्या हातात पगाराची रक्कम पुरती कधीच पडावयाची नाही.पेशवेकाली मराठी फौजेत पायदळापेक्षा घोडदळाचा भरणा अधिक असे. पहिल्यापासून मराठ्यांची लढण्याची पद्धत अशी असे की, त्यांना पायदळापेक्षा घोडेस्वारांचा उपयोग अधिक होई. मुसलमानांशी लढताना ही पद्धत त्यांना उपयोगी पडली पण इंग्रजांशी युद्धप्रसंग येऊ लागल्यावर पायदळाची अवश्यकता त्यांना भासू लागली. तसेच तोफखाण्याकडे लक्ष द्यावे लागले. खास पागा व शिलेदारी पद्धत शिवकाली होती तीच चालू राहिली. एका पथकात पन्नास स्वार असत, तर दुसऱ्यात पाचशे असू शकत. प्रत्येक पथक्या आपल्या मगदुराप्रमाणे आपले पथक तयार करी.

बारगीर- शिलेदारांशिवाय मराठी सैन्यात एकांड्यांचा आणखी एक वर्ग होता. एकांडा म्हणजे एकटा स्वार. हे एकांडे मोठ्या खानदानी घराण्यातील असून,त्यांना मातबर सरदार मोठाली वतने व बसावयास आपल्या पागेतील निवडक घोडी देऊन जीवास जीव देणारे स्नेही म्हणून आपल्या चाकरीत ठेवीत.

स्वारीच्या वेळी अगोदर चिठ्ठ्या पाठवून सरदारांना कूच करण्याचा हुकूम कळवीत आणि रात्री फौजेत दवंडी पिटवीत. दुसऱ्या दिवशी पहाटे मोठी नौबत वाजे व सर्वाना सूचना मिळे. 


दुसऱ्या बाजीरावाच्या वेळी हुजूरातीच्या पागेचा खर्च मामलेदाराच्या उत्पन्नातून एक ठराविक रक्कम नेमून देऊन चालत असे, ती रक्कम सरकारी नुकसान न होता व रयतेवर जुलूम न करता वसूल करीत.दर घोड्यास दरमहा साधारण ३० ते ४० रू. नेमणूक असे. तिच्यात दाणा, वैरण, रतीब, औषधे, लाग-लागवड, मोतद्दार वगैरे सर्वांचा खर्च येई. म्हणजे वर्षांला ३६० ते ४८० रू. लागत. शिवाय प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या सुमारास दर घोड्यामागे नवीन सामान करीत. त्याला एकूण १५० रू. पडत. मिळून प्रत्येक  घोड्यामागे एकंदर ६३० रू. खर्च येई. ही रक्कम मामलेदारांनी खाजगी खात्याकडे भरावी अशी रीत होती. याचप्रमाणे हुजुरातीचा खर्च खास सरकारी तिजोरीतून न देता परभारे महालाच्या वसुलातून भागविला जाई. लढाईमध्ये  सैनिकास जखम झाल्यास जख्माना व मृत्यू आल्यास मयताना नावाचा साहाय्य निधी देण्यात येई निकामी वा मयत झालेल्या सैनिकाच्या बायकोला ‘परवेशी’ आणि मुले असल्यास बालपरवेशी नावाचे वेतन देण्यात येई. याशिवाय उत्तम कामगिरी केल्यबद्दल इनाम वा बक्षिसी मिळत असे.

सैन्यातील अधिकारी व्यवस्था शिवरायांनी बांधून दिलेल्या पद्धतीवरच शेवटपर्यंत चालली. पायदळातील सर्वात लहान अधिकारी नाईक  आणि त्यावरचे जुमलेदार, हजारी, सरनौबत असे अधिकारी असत. पायदळातील सरनौबतच्या  हाताखाली दहा हजार सैन्य असे तर घोडदळातील सरनौबतच्या हाताखाली पाच हजारपर्यंत घोडेस्वार असत. शिवाजींच्या वेळी थोड्या तोफाही असत. पेशवाईत त्यांचा मोठा एक विभागच झाला.

न्यायव्यवस्था: मराठ्यांची  न्यायव्यवस्था हिंदू परंपरेवर आधारित असून कानुजाबत्यात न्यायाचे काम न्यायाधीश ह्या प्रधानाकडे सोपविले होते. कधीकधी महाराज स्वत: न्याय देत. त्याबद्दलचे पुरावे आणि महजर प्रसिद्ध आहेत. पेशवे हे काम क्वचित करीत.

शाहू छत्रपतींच्या वेळी धर्मखात्याचे प्रमुखत्व पंडितराव यांजकडे होते. पेशवाईतील रामशास्त्री प्रभुणे हे न्यायाधीश प्रसिद्धच आहेत.त्यांच्या मरणानंतर अय्याशास्त्री यांजकडे न्यायाधिशाचे काम सोपविण्यात आले. हे न्यायाधिश धर्मशास्त्राच्या आधारे न्याय करीत आणि मिताक्षरा, व्यवहारमयूख यांसारख्या ग्रंथांस अनुसरून खटले चालवीत. तसेच काही वेळा पंचांच्या साहाय्यानेही न्याय देत.

रामशास्त्री यांच्या वेळी त्यांच्या हाताखाली  अमीन आणि दफतरदार हे अधिकारी होते. फिर्यादीची अर्जी आल्यावर प्रतिवादीची जबानी त्याने लिहून घ्यावी, ती अमीन यांनी पाहून दफतरदार यांचे हवाली करावी. दफतरदारांनी ती अर्जी पाहून प्रतिवादीस विचारावयाचे सवाल निवडून काढावे, त्याचे जाब लिहून घ्यावे व साधनांचे (पुराव्याचे) कागदपत्र वादीप्रतिवादी यांचे असतील ते अमीन यांनी पाहून त्यांच्या नकला दफतरी ठेवाव्यात. त्या  पुराव्याची चौकशी  दफतरदार व अमीन यांनी करावी.

वतन व देणेघेणे यांच्या दाव्यात वादी व प्रतिवादी यांचे म्हणणे लेखी घेत. साक्षीदारांच्या लेखी साक्षी घेत. प्रतिवादी आणण्याकरिता शिपायाबरोबर चिठ्ठी गेली पण प्रतिवादी आला नाही, असे सहसा घडत नसे. प्रतिवादी हजर न राहिल्यास वादीच्या बाजूने लागलीच एकतर्फी निकाल देण्याची पद्धत नसे. प्रतिवादी  हजर होऊन वादास झाल्यानंतर तो ऐकण्यास न्यायाधिशाने आरंभापासून येऊन बसण्याची गरज नव्हती. न्यायाधिशाच्या हाताखाली ज्या नोकराकडे जे काम असे, ते तो सुरू करी. त्याने लेखी जाबजबाब द्यावे, प्रश्र विचारावे, त्यांची उत्तरे वादीप्रतिवादींकडून लिहून घ्यावी इ. कामे सुरू असता न्यायाधिशांनी येऊन त्यांजवर नजर ठेवावी. शेवटी न्यायाधीश सर्व पुराव्याचा विचारकरून निकाल लिहीत. या कामी पंच नेमले असल्यास त्यांचा सल्ला अवश्य घेत.

मराठेशाहीत न्यायदानाचे सुलभ व सोयीचे साधन म्हणजे पंचायत होय. गावात देवघेवीसंबंधी कोणी पाटलाकडे फिर्याद नेल्यास, तो प्रथम वादीप्रतिवादींची समजूत स्नेही या नात्याने करून पाही. त्यात तो यशस्वी न झाल्यास मग तो पंचायत भरवून तिच्यामार्फत तंट्याचा निकाल लावी. पंच नेमण्याचे काम जरी पाटलाकडे असले. तरी अमूक पंच आम्हाला नको. असे वादि किंवा प्रतिवादी यांनी म्हटल्यास त्याचा विचार होई. पाटलाकडे किंवा गावच्या पंचांकडे फिर्याद नेऊ नये, असा वादीचा हेतू असल्यास तो मामलतदाराकडे जाई. मामलतदारही प्रथम आपसांत तंटा मिटविण्याचा प्रयत्न करीत. प्रयत्न सफल न झाल्यास तोही पंचायत भरवून निकाल करी. तरीही वादीचे किंवा प्रतिवादीचे समाधान झाले नाही, तर सुभेदाराकडे व त्यापुढे रामशास्त्री किंवा खुद्द पेशवे किंवा त्यांचे अधिकारी यांजकडे फिर्याद जाई. न्यायाधिशाच्या निकालानंतर वाद सहसा वर जात नसे. पाटील किंवा मामलतदार यांनी नेमलेल्या पंचांनी अन्याय केला आहे किंवा काही लाचलुचपतीचा प्रकार झाला आहे, अशी पक्की खात्री झाल्याशिवाय वरिष्ठ अधिकारी असल्या फिर्यादी मनास  आणीत नसत.

पंच जसा निकाल करतील, त्याचप्रमाणे वादीप्रतिवादीस वागावयास लावण्याचे काम सरकारी अधिकाऱ्यांकडे असे. धर्मशास्त्रीसंबंधी काही भानगड उपस्थित झाल्यास शास्त्री-पंडित यांची मदत घेण्यात येई.जातीसंबंधी तंटे त्या त्या जातीच्या प्रमुखाकडे म्हणजे मेहतर (संस्कृत महत्तर) याजकडे निकालासाठी जात व त्या त्या जातीच्या सभेमार्फतनिकाल होत. त्या त्या ठिकाणचा रिवाज हाच काय तो सरकारी अधिकाऱ्यांचा आधार. देहान्त शिक्षा द्यावयाची झाल्यास मात्र कारभारी व नंतर पेशव्यांची परवानगी लागे. मांग, रामोशी वगैरे जातींच्या गुन्हेगारांसंबंधी परवानगीची जरूर नसे. मामलतदार त्या लोकांस नुसत्या संशयावरून धरून योग्य ती शिक्षा देत. गुन्ह्याच्या चौकशीसाठी केव्हा केव्हा पंच नेमले जात परंतु हा प्रकार सार्वत्रिक नव्हता. सरकारच्या विरूद्ध ज्याने फंदफितुरी केली असेल, त्यास मात्र देहान्त शिक्षा देत. ज्यांनी खून केला आहे, अशांपैकी पुष्कळ आसामी सरकारला दड देऊन व ज्याचा खून केलेला असेल, त्याच्या कुटूंबातील माणसांना नुकसानीदाखल द्रव्य मोकळे होत.

दोन जातींमधील किंवा एका जातीतील दोन पक्षकारांतील तंटा देशमुख, देशपांडे, खोत इत्यादींनी निकालात काढल्यावर तो निकाल पेशवे आज्ञापत्राने कायम करीत. पंचायतीच्या निकालास मंजुरी देताना सरकार दोन्ही पक्षांकडून नजर म्हणून काही रक्कम घेत असे. खटला जिंकणारा व हरणारा यांजकडून घ्यावयाच्या पैशात अनुक्रमे शेरणी आणि हरकी गुन्हेगारी म्हणत. कित्येक कज्जे खुद्द पेशव्यांपर्यत जात, तरीदेखील पेशवे त्याबाबतीत न्यायाधिशांचीच मदत घेत.पंचांनी फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही प्रकारचे खटले चालविण्याचा अधिकार असे. फौजदारी खटल्यात उभय पक्षकारांपैकी कोणाच्याही वतीने एखाद्या साक्षीदीरीने खोटी साक्ष दिल्यास दंड करीत गुन्हेगार सापडत नसल्यास किंवा फरारी असल्यास त्याची मुले-माणसे धरून ठेवीत, म्हणजे गुन्हेगार इसम आपण होऊन आपल्या माणसांच्या हालअपेष्टा चुकविण्याकरिता सरकारच्या स्वाधीन होई.

शिक्षेच्या प्रकारांत स्थावर आणि जंगम मालाची जाती हा एक महत्वाचा भाग होता. जो शत्रूस फितूर होईल, त्यांची घरे जप्त करीत व मुले-माणसे कैदेत ठेवीत. पेशवाईत दिव्य करण्याची प्रथा होती, पण अगदी क्वचित्.


शांतता व संरक्षणासाठी खेड्यांतून पोलीस ही संस्था त्या  वेळी अस्तित्वात नव्हती. लोकांच्या संरक्षणाची जिम्मेदारी मुख्यत: गावच्या पाटलावर असे. संरक्षणाच्या कामी त्याचा मुख्य साहाय्यक गावचा महार असून खेड्यात रात्री गस्त गालणे, गावात आल्या गेलेल्या परक्या लोकांची पाटलाला वर्दी देणे, संशियत लोकांवर नजर ठेवणे, चौगुले-कुलकर्णी इ. इतर गावकामगारांना साह्या करणे, गुन्हे हुडकण्यास मदत इ. कामे मुख्यत: त्याची असत. गावच्या कुळकर्णी किंवा पाटलाला व महाराला गावातील प्रत्येक व्यक्तीची माहिती असे. साहजिकच गावात चोरी किंवा तत्सम गुन्हा घडल्यास, पाटलाला तो महाराच्या मदतीने हुडकून काढणे सोपे जात असे. पेशवाईत लहान मोठ्या शहरांतील बंदोबस्तासाठी कोतवाल नेमीत इतर ठिकाणच्या बंदोबस्तासाठी मामलतदार, कमाविसदार यांच्या हाताखाली शिबंदी असे. बंदोबस्ताच्या द्दष्टीने किल्ल्यांचा मोठा उपयोग होत असे. किल्ल्यांवरील शिबंदी भोवतालच्या टापूचे संरक्षण करी.

गुन्ह्याबद्दल कैदेची शिक्षा होई. गुन्हेगाराची परिस्थिती आणि गुन्हा लक्षात घेऊन लोहगड, माहुली, पुरंदर, सिंहगड, अहमदनगर इ. अधिकाधिक अवघड किल्ल्यांत त्यास अडकविण्यात येई. कोतवालाची नेमणूक पेशव्याकडून होई. मात्र त्यास आपले काम कारभाऱ्याच्या हाताखाली करावे लागे. कोतवाली अंमल शहराच्या रयतेपुरता असे. कोतवालाचे वेतन दिवट्या, छत्रीधारी इ. वैयक्तिक कामगारांसह सालिना रू. ६०० होते. त्याच्या हाताखाली मुजुमदार, फडणीस व दफतरदार असे तीन अधिकारी असत. शहर बंदोबस्तासाठी कोतवालाच्या हाताखाली १०० ते १२५ स्वतंत्र शिपाई असत. रावबाजीच्या कारकीर्दीत कोतवाली मक्त्याने सुरूवात झाली.

तुरंग: पेशावाईत तुरंगासाठी स्वतंत्र खाते नव्हतं. बहुतेक प्रत्येक किल्ल्यावर शिबंदी असे. त्य़ा शिबंदीसच कैद्याची देखभाल करण्याचे काम सांगण्यात येई. बंदिगृहात (१) राजबंदी व त्याचे साथी (२) दरवडेखोर व गंभीर स्वरूपाचे गुन्हे अगर मनुध्यवध करणारे गुन्हेगार, (३) फितूर, (४) अनैतिक गुन्हा करणारे असे अनेक प्रकारचे कैदी असत.

तुरंगांची व्यवस्था नमुनेदार होती. प्रकृतिमान व समाजातील दर्जा पाहून त्यांना अन्नोदक मिळे. प्रतिष्ठित राजकीय कैद्यांस बंदिस्त करून ठेवल्यास अहोरात्र बेडी व कोठडीस कूलुप असे. सेवेस एक दोन माणसे व एक आचारी आणि बाहेरच्या कामासाठी एक मराठा माणूस नेमण्यात येई. आजारी कैद्यांस मध्यम प्रतीचा शिधा देत कैद्यास नेसण्यासाठी आवश्यक कपडे देत. कटात सापडलेल्या कैद्यांस एकत्र न ठेवता त्यांच्या पायांत बेडी घालून निरनिराळ्या किल्ल्यांवर अटकेत ठेवीत. त्यांच्या पोटासाठी रोज एकशेर ज्वारीचे पीठ, पावशेर डाळ आणि पसाभर मीठ नेमून दिले जाई. भोजनसमयी दररोज पायातील बेडी काढून जवळ चौकास लोक खबरदार ठेवून भोजन झाल्यावर पुन्हा बेडी घालून चौकी पहाऱ्याची बहुत खबरदारी करीत जाणे, असे सरकारातून आदेश असत. राजद्रोह्यांच्या बायकांनाही अटकेत ठेवीत. अटकेत असताना त्यांच्या कन्या उपवर होऊन लग्न ठरल्यास सरकारात जामीन देऊन त्यांची सुटका होई. अटकेत असलेल्या कैद्याचा अगदी जवळचा नातलग वारल्यास, त्याची क्रिया करण्यासाठी ब्राह्याण अस्थी घेऊन कैद्याकडे आल्यावर कैद्याच्या पायातील बेडी काढून चांगली चौकी बंदोबस्ताने ठेऊन क्रियेस ब्राह्यण मिळवून २० रू.पर्यत क्रिया करण्यासाठी देउन क्रिया करविणे, क्रिया जाहलियावर पूर्वीप्रमाणे बेडी घालून ठेवणे, असे शासकीय आदेश होते. कैद्यास एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना तर घोडीही सरकारातून पुरवीत. कैद्यांना गुन्ह्याच्या स्वरूपाप्रमाणे साधी कैद अगर सश्रम अनुभवावा लागे. कैद्याच्या शिक्षेस मुदतनसे. विशेष प्रसंगी कैद्याची शिक्षा रद्द होई. गुरेढोरे कैद होत असत. कैद्यास माणुसकीने वागविण्याची प्रवृत्ती पेशवे सरकारात होती. फितुरी बंदिवानास चौकशी होईपर्यंत गडावर ठेऊन गुन्हेगार ठरला तर तोफेच्या तोंडी देत. पेशवे काळात फाशीची शिक्षा फारशी प्रचारात नव्हती तुरंगात गुन्हेगारांची बेअब्रू न व्हावी, अशी व्यवस्था करीत कैदी मोकळा ठेवल्यास त्याने कड्यावरून उडी मारून जाऊ नये व ब्राह्याण असल्यास त्याने आततायीपणाही करू नये अशी व्यवस्था करीत. कधी कैद्यांना त्यांच्या घरी ठेऊन त्यांजवर चौकीपहाऱ्याद्वारे नजर ठेवीत. राजकीय गुन्ह्यांखेरीज इतर गुन्ह्यांकरिता शिक्षा दिल्या जात. त्या फार कडक असत. राजकीय गुन्हेगारास काही प्रसंगी हत्तीच्या पायाखालीकिंवा मेखसू डोक्यात घालून ठार करीत. गुन्हेगार पळून गेल्यास सक्तीचा उपाय म्हणून त्याच्या जवळच्या नातलगांस त्याचा पत्ता लागेपर्यत कैदेत ठेवीत.

मुलकी व्यवस्था : शिवकालात ठाणे (खेडे) हा सर्वात लहान राजकीय विभाग होता. देशमुखांकडील अनेक ठाण्यांच्या समुदायास कार्यात, संमत वा तर्फ म्हणत. अनेक तर्फ मिळून एक परगणा बने हवालदार हा परगण्याचा अधिकारी. परगण्यातील वसुलाच्या बाबी, दिवाणी – फौजदारी स्वरूपाचे दावे आणि राजकीय उलाढाली यांवर हवालदाराची देखरेख असे. परगण्याच्या व्यवस्थेकरिता हवालदाराच्या हाताखाली शिपायांची तुकडी असे. या तुकडीचे अंमलदार नाईकवाडी या नावाने ओळखले जात. गाव वतनदार व परगणे वतनदार आपली कामे कशी करतात, ते हवालदार पाही.

अनेक हवालदारांवर सुभेदार हा वरिष्ठ अंमलदार असे. याचा प्रदेश तो सुभा. सुभेदार म्हणजे देशाअधिकारी. सुभेदाराला मदतनीस म्हणून देशपांडे म्हणजे देशलेखक असून त्याच्याजवळ शिबंदीही असे. त्याला निरनिराळ्या हिशेबी विभागांच्या कामाकरिता चिटणीस, दफतरदार, पोतनीस, सभासद वगैरे कारकून असत. हे बहुतांशी वतनदार असत. सुभेदाराच्या वरचा अधिकारी तो सरसुभेदार. त्यास मुख्य देशाधिकारीही म्हणत. शिवकालात एकूण पाच सरसुभेदार होते.

पेशवाईत मुलकी कारभाराच्या सोईसाठी जे विभाग केले होते, त्यातील गाव (मौजे) हा सगळ्यांत लहान विभाग होता. त्याचे मुख्य मुलकी अधिकारी पाटील व कुळकर्णी हा वतनदार असत. मौज्याचा वरचा विभाग तर्फ असून त्यावरील अधिकाऱ्यास तरफदार म्हणत. परगण्यावरील अधिकारी मामलतदार असून त्याच्या ताब्यात तरफदार असे. कमाविसदार हा स्वतंत्र अधिकारी महसूल गोळा करणारा म्हणून वावरताना दिसतो. नवीन प्रदेश जिंकून तो राज्यास जोडल्यावर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यास नेमीत, त्यास मामलतदार म्हणत. कमाविसदार मामलतदाराच्या अंकित असत. काही परगणे किंवा तालुके मिळून होणाऱ्या विभागास प्रांत म्हणत. प्रातावरील मुलकी अधिकाऱ्यास सुभेदार किंवा सरसुभेदार म्हणत. पाटील, कुळकर्णी हे वतनी अधिकारी गावाचा वसूल गोळा करीत. त्यांच्या मदतीस चौगुला, पोतदार व महार असे इतर वतनी नोकर असत.

पाटील, कुळकर्णी गावात जमविलेला पैसा देशमुख आणि देशपांडे यांच्याकडे पाठवीत .शेतसारा वसुलाबाबतीत अधिकार चालवायचा देशमुखाने व देशमुखाच्या अधिकाराने वसूल झाल्यावर त्याचा हिशेब ठेवावयाचा देशपांड्यांनी, असा शिरस्ता होता. त्याचे नोकर म्हणून हिशेबनीस व लिहीणारा फडणीस अशी देशमुखाच्या कचेरीतील कामाची व्यवस्था होती. पाटील, कुळकर्ण्यांच्या वरचा मुलकी अधिकारी मामलतदार असे. ते सवेतनी असे. त्यास सालिना पाच हजार रूपायांपर्यत तनखा मिळे. त्याच्या हाताखाली शिबंदी असे. मामलतदार कचेरीत दिवाण नावाचा एक दुय्यम अधिकारी असे. तो आपला शेरा मामलतदाराच्या शेजारी लिही. हिशोब तपासनिसाचे काम करणारा मुजुमदार, फडणीस सदनपत्रे लिहीणारा, नोंदणी करणारा या सर्वाना तनखा मिळे. तो सामान्यत: सालिना असे. तो असा: दिवाणाला रू. ५९०, मुजूमदाराला रू. ४९०, फडणीस रू. ६१०, दफतरदार रू. २००, चिटणीस रू. १००. वसुलाच्या बाबतीत मामलतदारास मदत करण्यासाठी ह्या अधिकाऱ्यांची नेमणूक तालुक्याच्या लहान लहान विभागांत केलेली असे. हे अधिकारी आपल्या विभागातील गावी जाऊन पाटील –कुळकर्ण्याच्या मदतीने वसुलाची अंदाजपत्रके आगाऊ तयार करीत. वर्षअकेर वसुली झाल्यावर मामलतदार वसुली हिशोबाचे कागद पेशवे सरकारकडे सुभेदारामार्फत पाठवी. त्याच्या कागदावर देशमुखाचा शेरा असे.

कमाविसादर, मामलतदार व सरसुभेदार यांच्या नेमणुका, बदल्या व बडतर्फ्या पुणे दरबाराकडून होत. कमाविसदार व मामलतदार यांचा सरकारातून चांगला मानमरातब ठेवण्यात येई. त्यांच्या तैनातीस चोप दार, दिवट्या व अबदागिऱ्या दरमहा रू. ५ असे. कमाविसदारास रहावयास घरे जरूर त्या ठिकाणी सरकारातून मिळत. असा प्रकारे पेशवाईत मराठ्यांच्या मलकी व्यवस्थेत एका टोकाला पाटील-कुळकर्णी, तर दुसऱ्या टोकास दरबार असे.


जमीन महसूल व्यवस्था : शिवकालात जमीन महसूल व्यवस्थेचे मुख्य उत्पन्न शेतीपासून असे. म्हणून स्वराज्यात शेतकऱ्यास प्राधान्य होते. शेतकऱ्याला सर्व प्रकारची मदत करावी अशा आज्ञा सुभेदारांना असत. रयतेला काडीचा उपद्रव झाला तरी महाराज सहन करणार नाहीत, असा इशारा सुभेदारांना होता. त्यावेळी स्वराज्यातील जमिनीची मोजणी करून सारा आकारला जात असे. सारा-आकारणी करण्याचे तीन प्रयत्न झाले. प्रथम प्रयत्न दादोजी कोंडदेव यांनी पुणे, मुठा इ. खोरी व मावळ या भागांत केला. दुसरा प्रयत्न मोरो त्रिंबक पिंगळे पंतप्रधान यांनी केला व तिसरा महत्वाचा पद्धतशीर प्रयत्न अण्णाजी दत्तो सुरनीस या मंत्र्याने केला. त्याने कोकण विभागाची सारा-आकारणी केली आणि सरकारी दस्त ठरविला.

जमिणीचा सारा निश्चित करण्यापुर्वी जमिनीची मोजणी होत असे. त्यास बिघावणी व चावराणा, चकबंदी (हद्दी ठरविणे) असे म्हणत. बिघावणी झाल्यावर लागवडीखाली असलेल्या गावच्या जमिनीची प्रतवारी ठरे. त्यांत कोणते पीक येते, एकच पीक येते की दोन पिके येतात आणि प्रत्येक विध्यात साधारणपणे काय व किती पीक येते याची माहिती गोळा केली जाई. ह्या प्रकारास पीक पहाणी असे म्हणत. प्रत्येक गावच्या अशा नोंदी करून परगण्याचे संपूर्ण अंदाजपत्रक अर्थमंत्र्याकडे छाननीसाठी पाठवावे लागे. अर्थमंत्री चाचणी परीक्षा करून जे अंदाज करतील, त्यांची गावकऱ्यांनी पाठविलेल्या पत्रकाशी तुलना केली जाई व अर्थमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे वसूल निर्णय केला जाई, याला सारा-आकारणी असे म्हणत. बिघावणी, पीक पहाणी व सारा आकारणी हे महसूल पद्धतीतील तीन महत्वाचे टप्पे होते. सारा-आकारणी हे महसूलपद्धतीतील तीन महत्वाचे टप्पे होते. सारा-आकारणीचे काम अण्णाजी दत्तोने देशमुख – देशपांडे हे परगण्याचे अधिकारी आणि गावकरी यांजकडे सुपूर्द केले होते. डॉ. बाळकृष्णांनी अण्णाजी दत्तोच्या सारा-आकारणी पद्धतीला लोकांची धारापद्धती असे म्हटले आहे. त्यात रयतेशी विचारविनियम असे. सारा-आकारणीसाठी गावची लागवडीखाली असलेली जमीन तेवढीच विचारात घेतली जाई. प्रत्येक बिघ्यामागे पिकाप्रमाणे सरकारी साऱ्याचे प्रमाण ठरविले जाई. बिघ्यातील पिकाचा अजमास करून व त्याचे पाच भाग करून तीन भाग रयतेस द्यावा, दोन भाग शासनास द्यावा, याप्रमाणे रयतेपासून घेत जावे. मलिक अंबरच्या काळातही साठ-चाळीशी पद्धत रूढ होती. त्याने नंतरच्या काळात नगद रूपाने वसूल घेण्यास प्रारंभ केलाआणि उत्पन्नाच्या किंमतीचा तिसरा भाग हा सरकारी सारा ठरविला. नव्याने लागवडीखाली येणाऱ्या जमिणीवर इस्ताबा म्हणजे वार्षिक चढत्या वाढत्या (५, १०, १५ इ. ) पद्धतीने सुरूवातीच्या काही वर्षात सारा-आकारणी केली जाई. कधी कधी सातव्या वर्षी पुर्ण सारा भरण्याची सवलत मिळे.

तसेच या काळात नगदी आणि जिनसी अशा दोन्ही स्वरूपांत वसूल घेतला जाई आणि हे दोन्ही मिळून साऱ्याचे प्रमाण बहुधा उत्पन्नाच्या दोन-पंचमांश इतके असावे. नगदी सारा सामान्यत : बागाईत जमिणीतील पिकांवर आकारला जात असे. पैसे घेऊन हे जिन्नस शेतकरी बाजारात विकत असल्याने अंशत : नग्द रूपाने सारा देणे त्यांना कटीण जात नसावे. ऊस, सुंठ, हळद, भाजीपाला यांवर नगद दर आकारल्याचे दिसून येते. १६६७ सालापासून शिवाजीनी आपल्या मुलखात अर्धेली बटाईचा म्हणजे उत्पन्नाचा  निम्मा भाग घ्यावयाचा अशी पद्धत चालू केली. हा  बटाईचा तह ज्या भागात असेल, तेथे शेतकऱ्यांवर इतर सरकारी कर लादले जात नसत.

अर्थिक स्थिती:  शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणप्रसंगी दक्षिणेतील सहा सुभ्यांत खालील मुलूख होता: अकलूज, बेळगाव, दाभोळ, गाजीपूर, तोरगल, बंकापूर, मिरज, रायबाग, पन्हाळा, कल्याण, रागिरी, येलगिरी, अक्कलकोट व टाकलीखोड. ह्या मुलखाच्या उत्पन्नाची एकूण जमा रू. ३२.६६,६३५ होती.

संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत मराठा राज्याची व्यवस्था तशीच राहिली. राजारामच्या वेळी तीत अनेक स्थित्यंतरे घडली. औरंगजेबाच्या  मृत्यूनंतर मोगल बादशाहने शाहू महाराजांची सुटका करून त्यास स्वाराज्याचा मुलूख व दक्षिणेच्या सहा सुभ्यांची चौथाई आणि सरदेशमुखी दिली. यासंबंधीच्या कराराप्रमाणे औरंगाबाद, वऱ्हाड, बीदर, विजापूर, हैदराबाद, खानदेश या सहा सुभ्यांचा महसूल रू. १८.०५.१७,२९४ एवढा जमा होई.

मराठी अंमलाच्या उत्पन्नाच्या बाबी अनेक होत्या. या अंमलामध्ये सामान्यपणे चौथाई, सरदेशमुखी, बाबती, साहोत्रा इत्यादींचा समावेश होता. याशिवाय सायर कमावीस ही उत्पन्ने येतात. या सर्व बाबींचे उत्पन्न काही मुलखांतून मिळे,तर काही मुलखातून खंडणीच्या रूपाने निराळेच उत्पन्न मराठ्यांना मिळे.

शाहूच्या नुधनानंतर पेशव्यांकडे हुजुरात आली. सरंजामी मुलूख सरंजामदारांकडे राहिला. तेव्हापासून हिशोबात सरंजामाचा मुलूख व कमाविशीचा मुलूख असे भाग पडलेले आढळतात. मराठ्यांचा राज्यविस्तार खालील प्रांतात होता : (१) हिंदुस्थान (गुजरातपासून उत्तरेकडील भाग). (२)गुजरात, (३) खानदेश, (४) गोदावरीकाठ म्हणजे गंगथडी, (५) कोकण, (६) वरघाट, (७० हुजुरात, (८) कर्नाटक व (९) बंगाल. वरील प्रांतांत सरंजामी व कमाविशीचे महाल असे दोन बाग होते. त्यांतील सरंजामी महालांचे वार्षिक उत्पन्न २ कोटी ३लक्ष रूपये आणि कमाविशीच्या प्रांताचे वार्षिक उत्पन्न रू. १ कोटी ८३ लाख होते. (१७७२-७३). म्हणजे एकूण उत्पन्न ३ कोटी ८६ लक्ष रुपये.

मराठी साम्राज्यात गुजरातेत गायकवाड, पूर्व भारतात नागपूरकर भोसले, मध्य हिदुस्थानात शिंदे होळकर व पवार आणि दक्षिणेत पटवर्धन, रास्ते आदी सरदार सरंजाम उपभोगीत होते. १७७६-७७ मध्ये होळकर – शिंदे ह्यांजकडे आणखी काही महाल दिले. त्या आकार अनुक्रमे २० लाख व ४८ लक्ष होता. गुजरात, काठेवाडात पेशव्यांचा निम्मा भाग होता. त्याचा वसूल एकूण रूपये २४,६८,००० पेशव्यास मिळत असे. महादजी शिंदे १७९४ मध्ये निवर्तले. त्यावेळी शिंद्यांच्या ताब्यात दोन कोटी शहाण्णव लक्ष आकाराचा मुलूख होता. दक्षिणेतीलपटवर्धन, रास्ते, निपामीकर देसाई, कित्तूरकर देसाई या सरंजामदारांकडे काही लाखांचा सरंजाम होता.

दुसरा बाजीरीव इंग्रजांच्या आश्रयास जाऊन त्याने वसई मुक्कामी  ३१ डिसेंबर १८०२ रोजी तह केला. त्या तहाने त्याने २६ लक्षांचा मुलूख इंग्रजांस दिला. तसेच सर्व मराठे सरदारांस इंग्रजांनी पेशव्यांपासून फोडले. त्यामुळे इ. स. १८१३ नंतर पेशव्यांकडे २ कोटी १५ लाखांचा मुलूख राहिला. इंग्रजांची शरणागती पतकरण्यापुर्वी बाजीराव पेशव्याच्या ताब्यात १ कोटी ५६ लक्ष ५० हजार रूपये उत्पन्नाचा जहागिरी व कमाविशी मुलूख होता.

मराठी अंमलात आयव्ययाचे स्वरूप पहाताना जमेच्या व खर्चाच्या बाबींचा तपशील लक्षात घेतला, तर तिजोरीत कोणत्या बाबींपासून पैसा जमा होत असे. याची कल्पना येते. सरकारी उत्पन्नाच्या बाबी (१) जमीन महसूल (२) खंडणी,(३) जकात, (४) घासदाणा कर,-बाबतपरी-मदतपरी, (५) दंड-कोतवाली, गुन्हेगारी, रखवाली, (६) हरकी, पिठी मसाले, (७) सरंजामी स्वरूपाची भेट वा नजर, इजाफह.

(१)  व (२) जमीन महसूल व खंडणी: माधवराव पेशव्याच्या कारकीर्दीत जमीन महसूलाचे वार्षिक उत्पन्न रू. एक कोटी नव्वद लक्ष होते. कर्नाटकातील पाळेगारांकडील कंडणीचे उत्पन्न सरासरी वार्षिक रू. २० लक्ष मिळत असे.

(३) जकात: मालाची ने-आण होते तिच्यावर बसविलेल्या  करास जकात म्हणतात. अशा जकातीचे मक्ते देत. कल्याण- भिवंडी येथील जकातीचे वार्षिक उत्पन्न सु. ३ लक्ष रूपये असे. यावरून जकातीच्या उत्पन्नाची कल्पना येईल.

(४) कर: शेतकऱ्याकडून शेतसारा वसूल होई. त्यावर सारा शेतजमिणीतील उत्पन्नावर बसवीत व सवाई पट्ट ऐन शेतकऱ्यावर घेत. कोकमात मिठागर, नारळी, पोफळी, मच्छमारी इत्यादींवरील कर ह्या सरकारी उत्पन्नाच्या विशेष बाबी होत्या. याशिवाय कायम उत्पन्नाची बाब म्हणजे अबकारी कर, तसेच कोणत्याही मालाची खरेदी –विक्री झाली की त्यावर कर होताच. अधिकारी करांचा वसूल करून पाठवीत. कमाविसदार, मामलेदार, सुभेदार हे मुलकी अंमलदार गावचा,तालुक्याचा व सुभ्याचा वसूल करीत.

नेहमीच्या करांखेरीज प्रासंगिक कर बसवीत, त्यासही सामान्यत: पट्टया म्हणत. पेशवे काळात सु. २५ पट्टया चालू होत्या. त्यांपैकी काही अशा: दासपट्टी, नजरपट्टी, कर्जपट्टी, बैलपट्टी, दिवाणीपट्टी, नहरपट्टी, कोलारपट्टी, भिकारपट्टी इत्यादी.

(५) दंड : काही गुन्ह्यांबद्दल दंडाची शिक्षा असे. दंडाची रक्कम सरकारात जमा होई. अदक्षिण न पश्येत राजानं देवतां गुरू हा नियम हिंदु-मुसलमान इ. सर्व वर्गात चालू होता.

(६) हरकी: वादात जय झाल्यानंतर सरकारात जमा करावयाची रक्कम वा नजर तसेच आरोपीपासून मिळणारे द्रव्य.

(७) सरंजामी भेट: सरकार –दरबारी जे परदरबारचे वकील येत, ते पेशव्यांस भेट देत. तह आणि करारनामे होतानाही भेटीची रक्कम आकारात, त्यास अंतस्थ असे म्हणत. ही अंतस्थ रक्कम हिशेबात नमूद असे.

जमेच्या मुख्य बाबी जशा सात तेवढ्याच खर्चाच्या बाबी होत्या. त्या अशा- (१) सरकारी खात्यावरील खर्च, (२) दरबार खर्च, (३) नोकरवर्ग किंवा सेवेकरी, (४) संरक्षण,(५) खाजगी, (६) सार्वजनिक, धार्मिक-ब्राह्याणांकरिता व (७) पैशाचे व्यवहाराबाबतचा खर्च.

(१)सरकारी खात्यावरील खर्च: सरकारकडे जे अटरा कारखाने होते ते असे- तोफखाना, पीलखाना (गजखाना), नाटकशाळा, शिक्षिका, उष्ट्रखाना (उंटशाळा), नगारखाना, फरासखाना, इमारती, रथखाना,

वैद्यखाना, जवाहिरखाना, जिराइतखाना (शस्त्रागार), जामदारखान, पागा, पोथीशाळा,गोशाळा इत्यादी.

(२) दरबारखर्च: कारकून, मत्री आणि वकील.

(३) संरक्षण: शिलेदार, पागा, सुभे, लष्कर प्यादे, जहाजे.

(४) नोकरवर्गावरील खर्च.

(५) खाजगी खर्च: (१) वर्षप्रतिपदा, (२) गणपती उत्सव, (३) दसरा, (४) दिवाळी, (५) संक्रांत,(६) शिमगा,(७) नवस.

(६) सार्वजनिक, धार्मिक व ब्राह्याणांकरिता: श्रावणमास, अनुष्ठान, वर्षासने, धर्मादाय, देवस्थाने, भोजनदक्षिणा इत्यादी.

(७) पैशाचे व्यवहाराबाबतचा खर्च: व्याज, हुंडणाव, वट्टा.

वरील खर्चाच्या बाबीपैंकी संरक्षणावर माधवराव पेशव्याच्या काळात सु. एक कोटी रूपये खर्च होत होते. दरबार खर्च ६ लाख, नोकरावर खर्च ६ लाख, सरकारी खर्च १३ लाख, पैशाचे व्यवहार ७ लाख, सार्वजनिक व ब्राह्याणांवर वगैरे १४ लाख व खाजगी ५ हजार. यावरून एकूण खर्चापैकी सु. ७० टक्के खर्च संरक्षमावर होई व बाकी  सर्व बाबीवर  ३० टक्के होत असे. काही खर्च प्रतिवार्षिक, तर काही एकसाली म्हणजे नैमित्तिक असे. ते खर्च कारणपरत्वे होत. मराठी राज्यात त्या काळी शेत व लष्करी पेशा असे दोन मुख्य उद्योग होते. शेतसारा आणि कर हे सरकारचे मुख्य उत्पन्न होते. गावाचा सारा ठरविण्याचे काम जरी सरकार करी, तरी जमिनीची मालकी रयतेकडे असे.


शेतीखेरिज इतर उद्योगधंदे म्हणजे कापड विणणे, कागद तयार करणे, शेतीसाठी व लष्करात लागणारी सामान, हत्यारे बनविणे तसेच पोथ्या –पुस्तके लिहिणे इ. होते. कलाकुसरीच्या अनेक वस्तू व कापड तयार करम्याचे लहानलहान प्रमाणात त्यावेली होते. पेशव्यांना दरवर्षी फौजेस देण्यासाठी, नजर करण्यासाठी व स्वत: च्या उपयोगासाठी बरेच कापड लागे परंतु ते सर्व उत्पादकांकडून खरेदी करीत. १७७२-७३ साली पेशव्यांच्या जामदारखान्यात रू. ३,००,४७२ किंमतीचे कापड विकत घेतले गेले. तसेच कापडही निरनिराळ्या तऱ्हेचे निघत होते. कापडाला किंमतही चांगली येई. हा धंदा हातमागावर चाले. एरंडोल, जुन्नर, औरंगाबाद वगेरे ठिकाणी कागद तयार होई. कागदाला किमतही बरी येई.

त्या काळी समाजात श्रीमंत, मध्यम आणि कनिष्ठ असे तीन वर्ग असून श्रीमंत वर्गात इनामदार, सरदार, जहागीरदार मोडत. जहागीरदार व वतनदार हे सरकारची चाकरी करीत असल्यास त्यांना सरंजाम व शिवाय इनाम जमिनी असत. त्यामुळे त्यांची आर्तिक स्थिती उत्तम होती. मध्यम वर्गात व्यापारी, कारकून वगैरे मोडत. व्यापारी वर्गास नवीन बाजारपेठ बसवण्यासाठी सरकार सवलती देई. वाणी-गुजरयांना वजनाची मापे सरकारातून तपासून घ्यावी लागत. सरकारी शिक्क्याचीच मापे वापरावी दंडक असे. जुन्या व्यापाऱ्यांची कोंडी फोडण्यासाठी नवीन धंदा सुरू करणाऱ्यास विशेष सवलती मिळत. गावोगावी जत्रेच्या निमित्ताने बाजार भरत. त्या वेळी दुकानांचा क्रमही ठरलेला असे. प्रसंगी सरकारी अधिकारी पदार्थाचे बाग व वाटपही योग्य रीतीने होते. किंवा नाही, याकडे लक्ष पुरवीत.

कारकुनी पेशाखेरीज मध्यम वर्गातील लोक सैन्यात भरती  होत. सैन्यातील नोकरीला त्या वेळी असे व वेतन मिळे. स्वाराला दरमहा रू. २५ वेतन मिळे. शिवाय लूट वगैरे काही मिळे तो निराळीच. धान्याची स्वस्ताई लक्षात घेता, वरील वेतनामध्ये मद्यम वर्गातील लोकांना सुखात जगता येई.

पेशवे सरकारला जमाखर्चाची तोंडमिळवणी करणे कठीण जाई. सोने. चांदी  व तांबे या धातूंची नाणी सरसकट प्रचारात होती. टाकसाळी बऱ्याच होत्या. परवान्याशिवाय चालविता येत नसत.व्याज, हुंडणावळ व बट्टा: वरात व हुंडी पाठवण्याची चाल सरसकट दिसते. वरात म्हणजे एका सरकारी अधिकाऱ्याने दुसऱ्या सरकारी अधिकाऱ्यास पैसे देण्याविषयी केलेली आज्ञा. वराती व हुंडया ह्यांनीही व्यवहार चालत असे. कोणत्या चलनात रक्कम द्यावयाची ते चलन हुंडीत निर्दिष्ट करीत आणि व्यापाऱ्याकडे भरलेले चलन व त्याने द्यावयाचे चलन ही भिन्न असल्यास बाजारभावाप्रमाणे वट्टा आकारीत.समाजातील निरनिराळ्या वर्गाची आर्थिक स्थिती: पेशवे दानधर्म, अनुष्ठाने, ब्राह्याणभोजने पैसा इत्यादीत पैसा खर्च करीत. हुजुरांस ब्राह्यण भोजनांसाठी रू. ५,००० वार्षिक खर्च येई. जमिनीचे मालक असलेले ब्राह्यण त्या मानाने फार थोडे होते. गोप्रदान, व्रतवैकल्ये इत्यादींवरही खर्च होई.शेतकरी –कामगार वर्गाची स्थितीदेखील चांगली होती. ह्याशिवाय गुलामांचाही एक वर्ग होता. अनैतिक गुन्हे केलेल्या किंवा बेवारशी स्त्रिया, मुले, पुरूष इत्यादींना गुलाम समजत. पैकी स्त्रीला कुणबीन म्हणत. ती चांगल्या आचरणाने गुलामीतून मुक्त होई. शिवशाहीत व पेशवाईत २ ते २५ रूपयापर्यत कुणबीण विकत मिळे. त्या वेळी हिंदुस्थानात गुलामांची चाल होती.


सामाजिकस्थिती : मध्ययुगीन समाज (विशेषत: हिंदू आणि मुसलमान) जातिव्यवस्थेचे नियम किंवा परंपरेने रूढ असलेले विधिनिषेध वा आचारधर्म कसोशीने पोळत होता. मराठी राज्य स्थापन झाल्यावर सर्व समाज धार्मिक रूढींच्या शिस्तीत आणण्याचा प्रयत्न राज्यकर्त्याकडून झाला. हिंदू राजकर्त्याचा उद्देश राज्यसंपादन करण्याचा व परचक्रापासून ते सांभाळण्याचा. हा क्षात्रधर्म सर्व जातींत होता. शास्त्री-पुराणिक-पुरोहितांच्या जाति-पोटजाती होत्या पण त्यांतील काही निराळेही  व्यवसाय करीत असत परंतु पुरोहितांच्या जातींमध्ये पौरोहित्य न करमारे आणि इतर व्यवसाय करणारे लोक होते. उदा., कुळकर्णी, देशपांडे इत्यादी. धर्मप्रभावाच्या काळात मुसलमानांच्या पीरालाही अनेक वर्षाच्या संस्कारांमुळे हिंदू देवतांइतकेच पूज्य मानले जाई. भुताखेतांवर लोकांचा विश्वास होता. आजारी माणसावर उपचार करण्यास जेवढी वैद्याची मदत  घेत, तेवढेच मंत्रतंत्राचे इलाज पंचाक्षरी बोलावूनही करीत चेटूक करणाऱ्यास सरकारातून शिक्षा होई. देवदेवस्की करणे, आजाराने माणसे पछाडली असता शांतीचा इलाज करणे, गृहशांतीसाठी आणि संकटे टाळण्यासाठी व्रते, दाने, अनुष्ठाने व प्रसंगोपात श्रीमान घराण्यात तुला करण्याची चाल होती. मुहूर्ताची गरज पावलोपावली लागे. ग्रहणात लोक ऐपतीप्रमाणे स्नान, दान व जप करीत. त्या दिवशी इतर व्यवहार बंद असत. जात सुद्ध राखम्याची नैतिक बंधने सर्व जाती पाळीत. उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील काही स्त्रिया पती-निधनानंतर विधवा धर्माणे जगत आणि काही सतीही जात. जात पंचायती वा ग्रामपंचायती सामाजिक अथवा जाती बहिष्काराचे हत्यार शिक्षा देण्यासाठी वारंवार उपसत. ज्ञातिधर्माचे परिपालन करण्यास लावणे, हे आपले परम कर्तव्य आहे. असे राज्यकर्ते समजत. त्या त्या जातींचे ठराविक असे मान्य व्यवसाय असत परंपरेने मान्य असलेल्या व्यवसायांहून अन्यही अनेक प्रकारच्या व्यवसायांना –त्या त्या जातींच्या धार्मिक रूढीशी किंवा पवित्र-अपवित्र कल्पनेशी असल्यास –सर्व जातींना परवानगी होती. उदा., ब्राह्याण शेती, व्यापार, शिपाईगिरी इ. करीत. दलित किंवा अस्पृश्य जातींना मात्र उच्च जातींचे व्यवसाय स्वत:च्या जातीच्या वस्तीबाहेर करम्यास प्रतिबंध होता.

सार्वजनिक वस्तू खाजगी कामाकरिता सरकारी परवानगीशिवाय वापरावयाची नाही, असा दंडक असे व पकडहुकूम पाठवला असता ज्याला तो पाठविला, त्याला त्याचा खर्च तो हुकूम काढविणाऱ्यास द्यावा

लागे. चोरांचा माग बारकाईने शोधण्याची पद्धत होती. चोरी झाल्यास तिचा माग काढणे हे काम बहुधा बेरड, रामोशी, मांग, महार यांवर येई व ते हे काम धिटाईने ठिकठिकाणी जाऊन पार पाडीत. गावातील व पंचक्रोशीतील लोक लोकजीवनात जागतेपणे भाग घेत.

त्या काळी समाईक कुटूंब पद्धती होती. म्हणजे वयात आलेले व लग्न झालेले सख्खे बंधू वाटणी न करता एकत्र राहात. त्यात लग्न झालेल्यांना झालेली मुलेही लग्ने झाल्यानंतर ती त्याच कुटूंबात बहुधा रहात परंतु वयात आलेल्या किंवा लग्न झालेल्या बंधूंना वारसा हक्क मिळून वेगळे राहण्याचीही परवाणगी होती. मुले बापाच्या धाकात, धाकटे भाऊ वडील भावाच्या धाकात व स्त्रिया  पुरूषांच्या धाकात अशी पद्धती होती. रेटीवेटी व्यवहारांची बंधने पाळून उरलेल्या व्यवहारांत सर्व हिंदू जाती एक. त्य़ांचे देव जसे समाईक तसे खाजगीही असत. क्षेत्रे समाईक, सण समाईक व कित्येक धार्मिक संस्कार समाईक त्यामुळे हिंदूतील जातिजातीत काही बाबतीत तुटकपणा असला, तरी त्याहुनही अधिक बाबतीत ऐक्य असल्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची सामाजिक समरसता होती.

खेडेगावात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे कामी ग्रामपंचायती आणि गोत वा जात पंचायतीचा मोठा बाग असे. महाराष्ट्रातील अनेक लहानलहान जातींत गोतपंचायती होत्या. भटक्या जातींनीही आपल्या जातीतील भांडणे, तंटेबखेडे सोडविण्यासाठी जातपंचायती चालू ठेविल्या होत्या. ह्या जातपंचायतीत त्या त्या जातीतील लग्ने, भांडणे, मालमत्तेचे न्यायनिवाडे होत. हे तंटेबखेडे सोडविण्यासाठी त्यांना परंपरागत अधिकार असत.

तत्कालीन स्त्रियांना घरकामेच शिकविली जात. सामान्य कुटूंबातल्या स्त्रियांना पुराण श्रवणासाठी जाण्यास परवानगी असे. त्यांचा सारा वेळ घरकामातच जाई, पण उच्च घराण्यातील स्त्रिया  पुस्तकसंग्रह करीत. मुसलमान सरदारांच्या स्त्रियांनाही कुराणाची ओळख असे. राजपूत व मराठे सरदार घराण्यांतील स्त्रिया प्रसंगी भालेभेकीत व तलवार चालविण्यात निपूण असत. या स्त्रियांना घोड्यावर बसणे, हत्यारे चालविणे या गोष्टी जरूरीसाठी शिकाव्या लागत त्यामुळे त्याचे शिक्षण त्यांना ओघानेच मिळे परंपरागत कथा, कहाण्या, ओब्या, लोकगीते यांचेच संस्कार ग्रामीण स्त्रीच्या मनावर होत. कथा-कीर्तन, निरूपण, प्रवचन इत्यादीही त्या ऐकत.

मराठी अंमलात महाराष्ट्रातील सर्व जाती विवाह हा एक धार्मिक संस्कार आहे. असे मानीत. त्या वेळी बालविवाह रूढ होता. पुरूषाला अनेक लग्न करण्याची परवानगी होती आणि काही अनेक लग्ने करीत. सामान्यत: घरात एकाच पुरूषाच्या दोन बायका असत. मात्र श्रीमंत वरिष्ठ घराण्यात दोहोपेक्षा अधिक बायका नांदविल्या जात. स्त्रिया वयात आल्यानंतर केव्हाही माता होत. त्यामुळेच  पुष्कळदा त्या अल्पवयात मरत. रखेली ठेवणे दूषणास्पद जात नसे.

शेतकऱ्यांच्या बायका पुरूषांच्या बरोबरीने कामे करीत. मध्यम वर्गातील काही जातीच्या किंवा घराण्यातील स्त्रियांना अर्थार्जनासाठी बाहेर पडता येत नसे. देवांगना, गणिक  वगैरे वर्ग समाजात होते. तमाशातही भाग घेत. वाघ्या-मुरळी सर्व महाराष्ट्रात आढळत. कुणाबिणी बाळगण्याची चाल महाराष्ट्रात होती. दत्तक घेण्याची पद्धतही होती.  वृद्ध स्त्रियांना घरात मानाने वागवीत. स्त्रीस राजकीय सामाजिक आणि आर्थिक अधिकार फारसे नव्हते. त्यावेळी महार, मांग, चांभार, भंगी, ढोर इत्यादींना मानले जाई. पाटील, पटवारी यांना सरकारी कामकाजात मुख्यत: महार कामगारांची मदत होत असे. महाराष्ट्रात प्रत्येक गावात असे महार कामगार असत.

शेतमजुरीची कामे करणे. लग्नादी समारंभांत वाजंत्री वाजविणे, यात्रेच्या हंगामात तमाशे करणे इ. कामे महार आणि इतर जातीय कुटूंबे करीत. त्याशिवाय महाराची मुख्य कामे म्हणजे सरकारी वसूल, कागदपत्र इ. गावकामगार सांगतील त्या त्या ठिकाणी पोहोचविणे, सरकारी पीक पहाणी, सारा वसुली. गावकऱ्यांना  सरकारी कामासाठी सरकारी अधिकाऱ्याकडे  आणणे, गावात दंवडी देणे. चौकी पहारा करणे इ. कामासाठी अनुवंशिक जमिनीशिवाय सरकारातून क्वचित वेतनही मिळे. काही गावांत महारांना दोन वेळची भाकरी मागण्याचा हक्क होता. महारांची कामे पाहिली तर असे दिसून येते की महारावरच गावाला अवलंबून रहावे लागे. गावसभेत महारादी अस्पृश्यांना स्थान अवश्य होते. गाव सीमातंटा तोडण्यासाठी महाराला कधीकधी विशिष्ट अग्निदिव्य करावे लागे.


त्या काळात महार, मांग इ. अतिशुद्रांना दूर ठेवले गेले. त्यांचा शरीरस्पर्श, जलस्पर्श व देवालयप्रवेश निषिद्ध मानीत. या सामाजिक तिरस्काराचे दु:ख अस्पृश्यांना जाणवे. सामाजिक जीवनातील अस्पृश्यता ही अस्पृश्यांना शतकानुशतके जाच करीत होती. पेशवाईत आपली लग्ने ब्राह्यणांनी लावावी असा महारांचा फार आग्रह होता. पण त्या वेळच्या शासनानेही त्याविरूद्ध निकाल दिला. महारात ढगोजी मेघोजी नावाचा एक तांत्रिक उपाध्याय होता.

कुणबिणींप्रमाणेच नायकिणींचा व्यवस्य करणाऱ्या अनेक स्त्रिया पेशवाईत होत्या नायकिणीचा पिढीजाद धंदा नाचमे व गाणे हा होय. पेशव्यांच्या व इतर सरदारांच्या दरबारात नायकिणीचे नृत्यगायन होत असे . केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील अनेक भागांतून त्या काळी नायकिणी पुण्यास येत.

या कालात आयुर्वेद व युनानी या दोन्ही पद्धती रोगचिकित्सा व उपचार यांसाठी उपयोगात आणीत. निखळलेले हाड बसविण्यासाठी व लढाईत गोळी लागून निकामी झालेली हात किंवा पाय कापण्यासाठी हाडवैद्य-शस्त्रवैद्याची मदत घेई. शस्त्रवैद्य बहुधा मुसलमान असत. वैद्यांना राजाश्रय होता. वैद्यशास्त्र न शिकलेल्या माणसाला वैद्यकी करण्यास व औषधोपचार करण्यास बंदी होती. प्राण्यांवर उपचार करणारे पशुवैद्य होते. न्हावी लोक जोडधंदा म्हणून लहानलहान शस्त्रक्रिया, तुमड्या व जळवा लावणे इ. कामे करीत.

मराठे सरदार उत्तर हिंदुस्थान कर्नाटक वा अन्य ठिकाणी स्थायिक झाले, तेथे तेथे त्यांनी आपल्या बरोबर काही महाराष्ट्रीय ब्राह्यण, कामदार, उपाध्ये, शास्त्री, पुरणिक, जोशी, वैद्य, वैदिक व याज्ञिक ब्राह्यण, कथेकरी. हरीदास वगैरे मंडळी नेली. त्यांनी आपल्या विद्येचा,कलेचा व संस्कृतीचा प्रसार केला. नवीन जिंकलेल्या प्रांतात महाराष्ट्रीय संस्कृतीचा प्रसार होत गेला. पूर्वकालीन मुसलमानी अमदानीत नष्टभ्रष्ट झालेल्या हिंदूच्या संस्कृतीचे पुनरूज्जीवन मराठी राज्याच्या उदयकालापासून होत गेले. मराठेशाहीतील जमाखर्च लिहिण्याची शिस्त हिंदुस्थानातील पुष्कळ संस्थानिकांनी उचलली. त्याकरिता महाराष्ट्रीय कारकून आपल्या पदरी ठेवले.

मराठ्यांचा अंमल जेथे जेथे कायम होई, तेथील मुसलमानी अमदानीपासून अपूजित राहिलेल्या देवस्थानांचा जीर्णोद्वार होऊन पूजाअर्चा, धूपदीप-नैवेद्य, नित्यनैमित्तिक उत्सव यांचा बंदोबस्त होऊ लागला. देवळातून पाठ, अनुष्ठाने, सप्ताह, पारायणे, जपजाप्य इ. गोष्टी सुरू झाल्या. मुसलमानी अमदानीत नष्ट झालेल्या आचारांचा पुन्हा प्रसार सुरू झाला. धर्माचे पुनरूज्जीवन सबंध हिंदुस्थानात मराठेशाहीमुळे होत गेले. क्षेत्राच्या ठिकाणी मोगलांनी विच्छिन्न केलेली देवळे, घाट, कुंडे, तीर्थ, इ. मराठ्यांनी पुन्हा उभारली आणिधर्मशाळा बांधून अन्नछत्रेही घातली.

गया, काशी, प्रयाग, मथुरा, उज्जयिनी इ. क्षेत्री विद्वान, तपस्वी ब्राह्यण बसवून त्यांस स्वास्थ्ये करून दिली. पठन पाठणास उत्तेजन दिले ग्रंथलेखन चालविले त्यामुळे दुर्मिळ ग्रंथ मिळू लागले. ते शिकून विद्वान पंडित तयार झाले. त्यांनी क्षेत्राचे ठिकाणी संस्कृत विद्येची पीठे पुन्हा स्थापिली. दक्षिणी (यात कानडी, तेलगू, तमिळी, महाराष्ट्रीय ) ब्राह्यण गुजरात, राजस्थान तसेच मथुरा, काशी, प्रयाग, उज्जयिनी इ. क्षेत्रस्थानी गेले व स्थायिक झाले. त्यामुळे मुसलमानी अमदानीत सनातन धर्मास आणि आचारास आलेली ग्लानी दून होऊ लागली. काशमीर –नेपाळपासून नर्मदा तीरापर्यत सर्वत्र दक्षिणी पंडितांस विशेष मान मिळत गेला. कथापुराणे, नाटके त्याचप्रमाणे कोल्हाटी खेळ, कुस्त्या इ. महाराष्ट्रीय रंजनप्रकार उत्तर हिंदुस्थानी रयतेने उचलले. स्वराज्यात देवालयांना मिळू लागले. विविध देवस्थाने जागोजागी होती, त्यांत स्थानमहात्म्यानुसार दिवाबत्ती, पूजा इत्यादींची सोय करण्यात आली.

व्यावहारिक शिक्षणावर अधिक भर असे. सदर शिक्षण ब्राह्यण, प्रभू  वाणी –उद् मी  आमि मराठे या सर्व जातींतील मुले. कमीअधिक प्रमाणात घेत. शिक्षणात अक्षर घटविणे व हिशेब करणे यांवर भर असे. त्याकरिता व इतर ज्ञानाकरिता कित्ते, संसारचौपडी, अंकगणित, मराठ्यांच्या व मुसलमानांच्या बखरी, रामरक्षादी स्तोत्रे, जमाखर्च, पत्रलेखन, मराठी कविता इत्यादिकांचा उपयोग केला जाई. श्रीमंत घराण्यातील स्६याही लिहिण्या-वाचण्यास शिकत, मात्र हे शिक्षण बहुजनसमाजाला मिळत नसे.

शिवाजी महाराजांनी विद्या आणि कला यांच्यकडे लक्ष देण्यास उसंत लाभली नाही, तरीही महाराजांनी अज्ञानदास, भूषण इ. शाहिरांना  उत्तेजन दिले आणि तुकाराम महाराज, समर्थ रामदास, रंगनाथ, मौनी बाबा इ. संत-महंतांच्या कार्याची आदरपूर्वक दखल घेतली. जयराम, परमानंद रघुनाथपंत हणमंते इ. संस्कृत तज्ञांना त्यांना आश्रय दिला. शिवकालात शूर मर्दाचे पोवाडे गाणारे शाहीर उदयास आले राजस्तुती करणारे संस्कृत पंडित पुढे सरसावले. महाराष्ट्राबाहेरील हिंदी प्रदेशात मराठ्यांच्या विरूदावली गाणारे कवी निपजले आणि प्रंपच आणि परमार्थ यांची सांगड घालणारे संत निर्माण झाले. त्यामुळे बखरी इतिवृत्ते, कैफियती, करीने यांसारख्या ऐतिहासिक गद्याचा नव्याने उदय झाला.

पेशवाईत मराठी सत्तेचा विस्तार झाला. सामान्य माणसाचे जीवन सुविस्थर व काहीसे सुखवस्तू झाले. गृहस्थ नागरी जीवन उपभोगीत होते. आणि शिपाई वर्षातून आठ महिने मुलूखगिरी करीत होते. मनोरंजनाच्या गरजेतून तमाशा ही संस्था उदयास आली. मध्वमुनी, अमृतराय इत्यादींनी कथाकीर्तनासाठी निरनिराळ्या रागदारीत पदे पेशवाईच्या अखेरीला रामजोशी अनंतफंदी,प्रमाफर दातार, होणाजी बाळा, सगनभाऊ, परशुराम इ. भिन्न जातीतील शाहीर उदयाला आले. शाहीरांच्या लावणीला तसेच पोवाडयाला बहर आला. महिपती, श्रीधरस्वामी, मोरोपंत इ. कवी या काळात होऊन गेले.

समाजाच्या परमार्थ साधनेसाठी शिवकालात तुकाराम, रामदास व त्यांची शिष्यपरंपरा झटली. पेशवेकालात चाकणचे कद्देस्वर, पांडेवाडीचे रामाजीपंत कोल्हटकर, कायगांव टोक्याचे नारायण दीक्षित पाटणकर, धावडशीचे ब्रह्येंद्रस्वामी चिंचणेरचे ज्योतिपंत महाभागवत, बोरवनचे तुकाविप्र इ. सत्पुरूषांनी समाजात आपल्या कवनांद्वारे जागृती केली.


सण व उत्सव : मराटेशाहीत विजयादशमीच्या मुहूर्तावर मोहिमेसाठी मराठी सैन्य बाहेर पडे. यामुळे विजयादशमी (दसरा) हा सार्वजनिक व राष्ट्रीय सण समजून तो साजरा तो घरोघरी साजरा होत असे.

अशा दरबारी समारंभात राजकर्त्यानां वा वरिष्ठांना कनिष्ठांकडून जी भेट मिळे, त्यास नजराणा म्हणत. वरिष्ठांकडून कनिष्ठांना जो पोशाख मिळे, त्यास खिल्लत म्हणत. नवरात्रीचा समारंभ शाहू महाराजांनी सातारला बांधलेल्या राजवाड्याच्या देवघरात होत असे. अशाच प्रकारचा उत्सव शिंदे, होळकर, गायकवाड इ. सरदार आपापल्या राजधानीत साजरा करीत.

होळी हा सण त्या काळात सर्व जातीची माणसे एकत्र येऊन साजरा करीत. होळी पेटविणे, एकमेकांच्या अंगावर गुलाल, रंग, धूळ उडविणे, चिखल फेकणे हे खेळीमेळीने चाले. यात पेशवे स्वत:भाग घेत. मराठ्यांच्या संपर्कात आल्यामुळे मुसलमान राज्यकर्तेसुद्धा होळीसारखा सण मोठ्या उत्साहाणे साजरा करीत आणि आपल्या प्रजेच्या आनंदात सहभागी होत. आतिशबाजी म्हणजे अग्निक्रीडा. दिवाळाच्या प्रसंगी, लग्नसमारंभात आणि इतर अनेक मंगल समारंभाच्या वेळी शोभेचे दारूकाम होई. स्वराज्यात ठिकठिकाणी गणपती स्थापन केल्याचे उल्लेख आहेत  पेशव्यांचे कुलदैवतच गणपती म्हणून पेशवेकाळात गणेशोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले. शंभू महादेव व तुळजा भवानी ही छत्रपतींची कुलदैवते असली, तरीही गणपतीच्या देवालयास राज्याच्या व स्वामीच्या कल्याणप्रीत्यर्थ इनाम जमिनी दिल्याचे दाखले आहेत. गणेशोत्सवात पेशवे काही सरदारांच्या घरी दर्शनास जात. सरदारांकडे गणेशोत्सव होत असे. कृष्णजन्माष्टमीचा उत्सवही पेशवे आणि त्यांचे सरदार प्रजाजनासह मोठ्या थाटाने साजरा करीत.

पेशवाईत भिक्षुक, शास्त्री, पंडित, हरिदास. पुराणिक यांची चलती होती. अन्नसंतर्पण, यज्ञयाग, दाने, व्रतवैकल्ये, नवग्रहांची शांती, प्रायश्चित इ. प्रकार चालत. त्रिलोकानंद स्वामी सावकारी करीत,तर धावडशीचे ब्रहोंद्रस्वामी सावकारी करून शिवाय शिध्यांकडून द्रव्य घेत. गोसावी, संन्याशी यांच्याप्रमाणे अग्निहोत्र्यांचाही परामर्श पेशवे घेत.

तुलादान करणे हे श्रीमंत गृहस्थ आपले कर्तव्य मानीत. सरकारी तुलदाने होत. तुलदानातून देवालयेही बांधली जात. तुलदानाने स्वर्गप्राप्ती  होऊन पुनर्जन्म घेतल्यावर राजपद प्राप्त होते, अशा समजूत होती. मराठेशाहीत शेकडो  तुलादाने निर्देश आहेत. ब्राह्यणांसश्रावणमासात दक्षिणा शिवछत्रपतींपासूनच होता. प्रतिवर्षी श्रावणमासाच्या निमित्ताने सरकारातून विद्वान ब्राह्यणांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे दक्षिणा देत. ही प्रथा पेशवाईच्या अखेरपर्यंत चालू होती. पेशवाईत त्यावर प्रतिवर्षि पाच ते सात लक्ष रू. खर्च होई. हिंदुस्थानच्या कोनाकोपऱ्यांतून दरवर्षी पुण्यात ७० ते ८० हजार ब्राह्यण दक्षिणा घेण्यासाठी जमत. विद्वान ब्राह्यण व श्त्रीपुरूषकलावंत यांना शनिवार वाड्यात बोलावून सन्मानासह द्रव्य देत.

खोबरेकर, वि. गो.

कला व खेळ :   मराठी समाज हा तर तत्कालीन समाजांइतकाच रसिक व कलाप्रिय होता. या रसिकतेची आणि गुणवत्तेची साक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर आढळणाऱ्या वाडे, मंदिरे भित्तिचित्रे, सचित्र ग्रंथ, लघुचित्रे इत्यादींच्या रूपाने डोळ्यासमोर उभी राहते.  स्वराज्यात पुढे आलेली वरीचशी घराणी पूर्वी निजामशाही आणि  आदिलशाही  दरबारात वावरलेली, त्यांच्या कलाकौशल्याशी परिचित होती पेशवाईत उत्तरेकडील राजस्थानी दरबारांशी, खुद्द मोगल दरबाराशी संबंध आला व त्याचे पडसाद स्वाभाविकच मराठी कलेत उमटले. महाराष्ट्रात प्राचीन काळापासून एक उच्च कलापरंपरा नांदत होती. या मूळ रूपाला नव्या संबंधांमुळे अनेक अलंकरणे चढली, तिचे रूप अधिक प्रेक्षणीय बनले.

वास्तुशिल्प : या क्षेत्रात मराठेशाहीत प्रगती झालेली होती. शिवाजी महाराजांनी दुर्ग – स्थापत्याला प्राधान्य दिले. यावर्षी तीन शतके दख्खनमध्ये किल्ल्यांची रचना झाली होती. त्याचा उपयोग महाराजांना झाला. त्यांच्या पदरी या विषयातील जाणकार होतेच, रायगड किल्ल्याची बांधणी अण्णाजी दत्तोंनी केली तर सिधुदुर्गाची मोरोपंत पिंगळे यांनी. या किल्ल्यांवर राजप्रासाद बांधलेले होते. रायगडावर अंबरखान्याचे अवशेष आहेत. राजगडावर दरबार –मंडपाचे अवशेष, तर रायगडावर रस्त्याच्या दुतर्फी असणाऱ्या बाजाराचे अवशेष आढळतात हे महाल विजापुरी परंपरेचे, दगडी वकमानदार असावेत असे पन्हाळगड व शिवनेरी येथील अवशिष्ट वास्तूंवरूंन दिसते. इतरत्र लाकूड व विटा यांच्या इमारती होत्या. पुण्यातील कसबा गणपती व विठ्ठलवाडीचा विठोबा यांची मंदिरे पडीक स्थितीत होती. त्यांचा जिजाबाईनी जीर्णोद्वार केला. खुद्द छत्रपतींनी अनेक देवालयांचा जीर्णोद्वार केला. गोव्याजवळचे सप्तकोटीश्वराचे मंदिर त्यांच्याच आज्ञेने बांधण्यात आले. त्याच्या मंडपात तसा शिलालेख आहे. या सर्व वास्तू पूर्वापार चालत आलेल्या हेमाडपंती घाटाच्या होत्या. पेशवाईत संपन्नता आली आणि सर्व प्रकारच्या कलाशिल्पाला नवचैतन्य प्राप्त झाले. पुणे. सातारा, नाशिक या शहरांची वाढ झाली. पैठण, वाई, पंढरपूर यांसारक्या गावांत काही शी पद्धतशीर आणखीहोऊन वस्ती झाली. तर टोक्यासारख्या ठिकाणीसबंध गावच नव्या आराखड्यावर उभे राहिले. सगळीकडे काहीसे अरूंद पण फरसबंद रस्ते दुतर्फा चिरेबंद वाडे. मधूनच कमानदार वेशी असे चित्र दिसू लागले. वाड्यांचा तळमजला दगडी तर वरचे विटाचे व लाकडी खांब –तुळया यांवर आधारलेले, सामान्यपणे तीन पण कधी पाच मजले आणि प्रशस्त अशा मोकळ्या चौकांभोवती मांडलेले वाडे सर्वत्र दिसू लागले. बहुधा दोन चौक असत. पण विस्ताराप्रमाणे तीन ते सात चौक असत. पुण्याचा शनिवार व मोरोबादादांचा वाडा. मेणवलीचा नाना फडणीस वाडा हे असे अनेक चौकांभोवती बांधलेले होते. बांधकामासाठी चौकोनी खांब व तशाच तुळया होत्या. पुढे दर्शनी भागासाठी व दिवाणखाण्यासाठी सुरूचे खांब व मेहरपीच्या कमानी प्रचलित झाल्या. कमानी, खांबाच्या माथ्यावर असणारे हस्त (स्तंभशीर्ष). दिवाणखान्याची छते, पाणपट्टया, त्यांच्या कोपऱ्यावरील लोलक दरवाजांच्या चौकटी क्वचित संपूर्ण दर्शनी भागावर असलेले लाकडीकाम हे बारीक नक्षीकामाने मढविलेले असे. त्यात भौमितिक नक्षीच्या जोडीला वेलपत्ती असे व मधेमधे पोपट, मोर, माकडे यांच्या आकृती असत.उत्तर पेशवाईत मंदिर-रचनेला मोठ्या प्रमाणावर आरंभ झाला. ही मंदिरे तीन प्रकारची :  यादवकालीनघाटाची मंदिरे सासवड (वटेश्वर, संगमेश्वर), माहुली (विश्वेश्वर), जेजूरी अशा ठिकाणी दिसतात. ती आकाराने मोठी, नक्षत्राकृती विधानीची भिंतीवर थर आणि रथ असणारी दगडी बांधणीची असत. शिखरे मात्र चुनेगच्ची विटांची. नासिकची काळाराम, गोराराम, सुंदरनारायण त्र्यंबकेश्वर येथील महादेवाचे तसेच नेवाशाचे मोहिनीराज ही मंदिरे माळवा – राजस्थानमधील मंदिरांसारखी असून उत्तरेतच वावरलेल्या हिंगणे, चंद्रचूड, ओढेकर इ. मंडळींनी बांधलेली आहेत. यांची बांधणी संपूर्ण दगडी. या मंदिरामध्ये इतर प्रकारच्या मंदिरांपेक्षा कोरीवकाम अधिक आहे. तिसरी पद्धत स्थानिक. पुणे, सातारा, वाई सगळीकडे या घाटाची मंदिरे आहेत. ही खास मराठी म्हणता येतील. चौकोनी गाभारा, समोर कमानींची (क्वचित सुरूंच्या खांबांची ओवरी) व त्यासमोर लाकडी सभामंडप गाभारा व ओवरी दगडी, पण शिखर विटाकामाचे. शिखर टप्प्याटप्प्याने निमुळते होत जाते. शिखरांवर लहान कोनाड्यांतून चुनेगच्चीत मूर्तिकाम केलेले असून काही मंदिरांवरील मूर्ति सुबक व उठावदार आहेत. यांत दशावतार, देव- देवता मूर्ती, तसेच राजपुरूष,स्त्रिया यांच्या मूर्ती आहेत. यांचा पोशाख पेशवाई पद्धतीचा आहे. नाके खूपच धारदार आणि डोळे लांब आहेत. मात्र शारीरिक प्रमाण बद्धतेकडे कलाकाराने फारसे लक्ष पुरविले नाही. प्रत्येक मजल्यावर कमानदार देवळ्यांच्या व मनोऱ्यांच्या छोट्या प्रतिकृती एकाआड एक बसवीत. त्यात मूर्ती वा चित्रे असत. या वास्तू आकाराने फारशा मोठ्या नसत, पण त्यांच्या प्रमाणयुक्त योजनेमुळे सौष्ठपूर्ण दिसतात. पक्ष्यांच्या आकाराचे हस्त असणाऱ्या दगडी दीपमाळा हे मराठी मंदिरांचे खास वैशिष्टय आहे. अनेक ठिकाणी याच घाटाच्या छत्र्या व समाध्या बांधलेल्या आहेत. बहुतेक गावे व मंदिरे नद्यांच्या काठी असल्याने मंदिरांच्या समोरच्या नदीतीरावर दगडी घाट मराठेशाहीत बांधण्यात आले. नासिक, वाई, मेणवली, माहुली इ. ठिकाणी असे विस्तीर्ण घाटअद्यापि दिसतात. टोक्याचे घाट अत्यंत प्रेक्षणीय होते,  पण आज ते पाण्याखाली गेले आहेत. माराठी वास्तुशिल्पाचा बराच भाग आता आधुनिकीकरणामुळे नष्ट होत चालला आहे.

माटे, म. श्री.


चित्रकला :  मराठी चित्रकलेचे फारच थोडे नमुने अवशिष्ट आहेत. तथापि त्यांवरूनही या कलेच्या गुणवत्तेची कल्पना येते. सचित्र हस्तलिखीत पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवम्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, पटचित्रे व चित्रित पत्रिका, सुटी लघुचित्रे आणि काचचित्रे या विविध स्वरूपांत मराठी चित्रकलेचा  आविष्कार झालेला आढळतो. भगवतगीता, सप्तशती, भागवतपराण अशा काही संस्कृत आणि ज्ञानेश्वरी, शिवलीलामृत, पांडवप्रताप अशा काही मराठी ग्रंथांच्या सचित्र प्रती पलब्ध झाल्या असून त्यांतून दशावताराची चित्रे आढळतात. जोडीला विश्वरूपदर्शन, महिशासुरवध, शंभुनिशुंभांचे देवीशी युद्ध अशीही विषयानुरूप काही चित्रे काढलेली आहेत.पोथ्यांच्या फळ्यांवर गणपती, ऋद्धिसिद्धी, रामपंचातन, गोपालकृष्ण, विष्णूलक्ष्मी यांची चित्रे गडद अशा लाल, हिरव्या आणि पिवळ्या लाखेच्या रंगांनी चित्रीत केली आहेत. पटचित्रांमध्ये संक्रातिपट हे संख्यने आधिक आहेत. साधारण ६० सेंमी. लांबी-रुंदीच्या कागदावर वरच्या एक-तृतीयांश भागात तीन चोकटी आखून घेतात. मधल्या चौकटीत गणपती व ऋद्धिसिद्धी, तर दोन्ही बाजूंच्या चौकटीत प्रमुख वाहनांवर बसलेल्या संक्राती देवीची, चंद्रसूर्याची चित्रे रंगविलेली असतात. यांशिवाय योगपाट, पिठोरीपट  असेही काही पट मिळाले आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रही असलेला एक पिठोरीपट अस्सल मराठी कलेचा नमुनेदार आविष्कार आहे. ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रियांनी श्रावण अमावस्थेला चौसष्ट योगिनींची पूजा करण्याचे एक व्रत आहे. या व्रताच्या कहाणीतीलस्त्रीची सात मुले दगावली व व्रताचा उपयोग होऊन आठवे जगले. कृष्णजन्माच्या कथेशी असणारे साम्य ध्यानात घेऊन चित्रकाराने या पटात कृष्णलीलेचे प्रसंगच रंगविले आहेत. यातील माणसांची चेहरेपट्टी व शरीरयष्टी, वस्त्रे, अलंकार आणि ती रेखाटण्याची शैली ही अस्सल मराठी आहे.

संक्रातिपट, पोथ्या यांवर पुष्कळदा कालोल्लेख असतो, तसा जन्म पत्रिकेच्या पटावरही असतोच. जनार्दन बल्लाळ पेशवे याच्या जन्मपत्रिकेवर शके १७०६ असा जन्मकाल दिला आहे. पत्रिकेत राशी आणि ग्रह यांची चित्रे रंगविलेली आहेत. लघुचित्रांमध्ये व्यक्तिचित्रे, रागमाला, तालमाला, मिरवणुकी इ. प्रसंगांची चित्रे आहेत. थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे, पिलाजी जाधवराव यांची उत्कृष्ट व्यक्तिचित्रे चित्रकारांच्या नावांसह उपलब्ध आहेत. रागमालेत मुख्यराग, रागवधू व रागपूत्र यांची चि६ रागमालेच्या काव्यातील वर्णनावरहुकूम काढलेली असली तरी त्यांतील वेशभूषा, चेहरेपट्टी इ. मराठी वळणाची आहेत. देवघराच्या चौकटीवर समासुदीच्या प्रसंगी कागदी तोरमे बसवीत. त्यांवर नवग्रह, दशावतार अशी चित्रे रेखाटलेली असत. कोल्हापूरच्या संग्रहालयात तसेच सोलापूरच्या शुभराय मटात अशी तोरमे टिकूण आहेत. अशा तोरणात बसवता यावीत असा पद्धतीने काढलेली देवदेवतांची काचेवरील व कागदावरील चित्रे काही संग्रहात पहावयास मिळतात. माळवा, राजस्थान यांतून आलेल्या कलाप्रवाहांतील स्त्री-प्रतिमानांचे अनुकरण नऊवारी लुगडे नेसवून व नथ-बुगड्या घालून मराठी चित्रकारांनी आपलेसे केले. सतराव्या शतकाच्या सुरूवातीला प्रचलित असणाऱ्या मराठी चित्रकलेचे दर्शन रुक्मिणीस्वयंवर, हरिविजय अशांसारख्या काही पोत्यांतून घडते. या कलेचे स्वरूप काहीसे रांगडे आणि लोककला म्हणता येईल असे होते. व्यक्तिचित्रणातील स्त्रिया जराशा दणकट, ठेंगण्या ठुसक्या, कपाळपट्टी थोडी उतरती, डोळे मोठे, हनुवटी थोडी आत गेलेली असून त्यांच्या बाह्यारेषा जोरकस, पण प्रवाही वाटतात. लाल, हिरवे, पिवळे असे भडक रंग वापरलेले आहेत. अठराव्या शतकाच्या उत्तरार्दातील चित्रांमध्ये खूपच नाजूकपणा आणि सफाई आली. रेषा लालित्यपुर्ण झाल्या. रंगयोजना अधिक साम्य झाली. चेहरेपट्टी, नाकडोळे तसेच राहिले, तरी त्यांत खूपच मार्दव आलेले आहे. प्रारंभीची चित्रे भित्तिचित्रांच्या परंपरेला अधिक जवळची तर उत्तरकालीन चित्र लघुचित्रपरंपरेला शोबेशी आहेत. मराठी चित्रकलेचे नमुने मुख्यत्वे मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात, तसेच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या संग्रहालयात आणि विशेषत: पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहालयात आढळतात. 

रानडे, उषा


भित्तिचित्रे: मराठेशाहीत सर्व उपलब्ध भित्तिचित्रे अठराव्या शतकापासूनची म्हणजे पेशवाईतील आहेत. शिवकालातील बांधकाम एकतर जमीनदोस्त झाले आहे किंवा त्याचे अंतर्गत सजावटीचे अवशेष फारसे शिल्लक उरलेले नाहीत. चित्रकाम बहुधा वाड्याच्या दर्शनी भागांवर तसेच दिवाणखान्याच्या  व शयनगृहांच्या भिंतिवर आढळून येते. देवालयात मंडपाच्या भिंती, ओवऱ्या, शिखर, काही प्रसंगी गाभाऱ्याच्या भिंती आणि छत हीसुद्धा चित्रकामाने सुशोभित केलेली दिसतात. सातारचा नवा राजवाडा, वाठारचा नाईक निंबाळकरांचा वाडा, वाईचा पटवर्धनांचा वाडा, रास्त्यांची मोतीबाग, मेणवलीचा नाना फडणीसांचा वाडा, चांदवडचा रंगमहाल, निपाणीचा देसायांचा वाडा, पुण्याचा नानावाडा, बेलबाग व पाषाण हे मंदिर, मोरगावचे मयूरेश्वर मंदिर, पांडेश्वरचे शिवमंदिर, बेनवडीचा मठ अशा काही ठिकाणी अद्यापही अठराव्या शतकातील भित्तीचित्रे टिकून आहेत.या शिवाय तुरळक चित्रकाम इतरत्रही कित्येक जागी आढळते.

या भित्तिचित्रांचे विषय मुख्यत: पौराणिक आहेत. त्यांत रामायण, महाभारत यांतील प्रसंग विपुल आहेत. दशावतार सर्वत्र आहेत आणि कृष्णलीलाही चित्रकाराने सगळीकडे रंगविलेल्या आहेत. तत्कालीन सामाजिक जीवनातील प्रसंगही लोकप्रिय होते. राजसभा, राजपुरूषांची भेट, मिरवणुकी, दरबारातील नाचरंग यांचा यात समावेश होतो. वाठारच्या नाईक –निंबाळकरांच्या वाड्यात रागमालेची चित्रेही होती. केवळ सजावटीसाठी केलेले अप्रतिम रंगीत नक्षीकाम लोणी भापकर येथील विष्णू मंदिराच्या नगारखान्यासारख्या ठिकाणी अजूनही चांगल्या अवस्थेत टिकून आहे.

कुडाच्या किंवा पक्क्या विटकामाच्या, चुन्याने मढवलेल्या भिंतीवर चुन्याचा अगदी पातळ गिलावा देऊन त्यावर चित्रकाम केले आहे. काही ठिकाणी भित्तीलेपचित्रण (फ्रेस्को) पद्धतीचे कामही आहे. सबंध भिंत प्रथम लाल-गुलाबी किंवा आबाशाई रंगाने रंगवून घेत. त्यावर वनस्पतिजन्य अथवा खनिज रंगाने चित्रकाम केलेले असे.या चित्रकामाला लाल, हिरवा, प्वळा, पांढरा हे रंग प्रत्यक्ष किंवा एकमेकांत मिसळून वापरीत आणि आकृतीभोवती  काळ्या रंगाची ठसठशीत बाह्यारेषा काढलेली असे. ही रेषा सलग नसली, तरी जोरकस दिसते. संबध भिंत ही एकच पृष्ठभूमी कल्पून त्यावर प्रसंग रंगवीत  किंवा भिंतीवर वेलपत्तीच्या पट्टया रंगवून लहानमोठ्या चौकटी आखून त्यात चित्रे काढीत. अशा चित्रांच्या संयोजनावर लघुचित्रशैलीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. एकूण चित्रकामात अगदी कमी आकृत्या व वस्तू वापरून प्रसंग उभा करम्याची प्रकृती आहे, मात्र चौकटीतील चित्रांत पृष्ठभागावर अनेक इमारती, झाहे इ. रेखाटली आहेत. सर्वच आकृत्या ठेंगण्या, पण अंगापिंडाने भरलेल्या दिसतात. टोकदार लांब नाक, बरीच उतरती कपाळपट्टी आणि त्यामानाने आत गेलेली हनुवटी ही चेहऱ्याची वैशिष्टये सर्वत्र दिसतात. बहुतेक ठिकाणची माणसे सुस्वरूप आहेत. स्त्रिया  नऊवारी साडी व चोळी परिधान केलेल्या आहेत. त्यांच्या नाकात नथ व गल्यात पुतळ्यांची माळ सर्वत्र दिसते. पुरूषांच्या वेशभूषेत पेशवाई पगडी विशेष लक्ष वेधून घेते. जुन्या कागदपत्रांतून काही प्रसंगी राजस्थानातून चित्रकार बोलाविल्याचे उल्लेख आढळतात. काही ठिकाणी चित्रकामावर राजस्थानी शैलीचा प्रभावही  जाणवतो. छायाप्रकाशातून त्रिमितिचित्रण करण्याचा प्रयत्न हा यूरोपीय  संपर्काचा परिणाम होय. मराठी शैलीत वर सांगितलेली वैशिष्ट्ये बहुतेक सर्वत्र आढळतात. ती असण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातअखंड चालत असलेली भित्तिचित्र-परंपरा. अजिंठा –वेरूळ येथील काम फार जुने म्हणून क्षणभर बाजूला ठेवले, तरी मध्ययुगीन मराठी साहित्याचा विचार करावाच लागतो. हे साहित्य आध्यात्मिक स्वरूपाचे, पौराणिक विषयांवर आधारलेले व भक्तिप्रधान आहे, परंतु या वाङमयात मदूनच द्दष्टांतरूपाने येणारे उल्लेख व वर्णने अत्यंत बोधप्रद आहेत. महानुभावांच्या वाङमयातूनही चित्रविषय समजतात. ज्ञानेश्वरीत भित्तिचित्रांच्या रूपकाचा वापर आलेला आहे. चोंभा कवीच्या उखाहरण या काव्यात भित्तिचित्रांचे तत्कालीन तंत्रच विस्ताराने आले आहे. यात भूमी तयार करून घेण्याची पद्धती, रंग व त्यांची योजना, वर्ण्याविषय या सगळ्यांची नेमकी माहिती आहे. पुढेही असे उल्लेख सातत्याने येतात. अठराव्या शतकातील तेर माहात्म्य काव्यात, शिवालयात चित्रे रंगवून घेणे हे धार्मिक कृत्य मानले जाई, याचा संकेत आहे. मराठेशाहीतील कागदपत्रांत तर अशा चित्रकामाचे अनेक उल्लेख आहेत. भित्तिचित्रांच्या अखंड परंररेचा हा वारसा  मराठी समाजाला  लाभला होता. मराठेशाहीच्या उत्तर काळात निर्माण झालेल्या समृद्धीमुळे या परंपरेला बहर आला. राजस्थानी व यूरोपीय कलाप्रवाहांच्या संपर्कामुळे  ही परंपरा वैविध्यपूर्ण व अधिक संपन्न झाली.

  

चव्हाण, कमल


इतर कला व खेळ : मराठेशाहीत लावणीनृत्यास जोर आलेला दिसतो. ते लोकप्रिय होते. कोळीनृत्य, धनगराचे गजनृत्य, गुगुलनृत्य, वाघ्या-मुरळीचे नृत्य, वासुदेवाचे नृत्य व लेझीम यांसारखे मर्दानी नृत्य यांची जोपसाना महाराष्ट्रातील केली. संगीताची उपासनाही महाराष्ट्राने त्या काळापासून सुरू केली. कुस्ती, लेझीम, विटीदांडू, हूतुतू, चेंडूफळी, झिम्मा इ. कितीतरी खेळ पंधराव्या –सोळाव्या शतकांत महाराष्ट्रात रूढ होते. अव्वल मराठेशाहीतसुद्धा या खेळांना प्रोत्साहन मिळाले. नित्यनैमित्तिक स्वरूपात गरापुढे तसेच तुलसीवृदांवनापुढे घातली जाणारी रांगोळीची कला उल्लेखनीय आहे. मराठी अंमलात मुख्यत:  पौराणिक नाटकेही होत. तमाशा किंवा लोकनाट्य हा प्रकार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. पेशव्यांनी त्यास उत्तेजन दिले.

मूल्यमापन : महाराष्ट्रात मुसलमानी अंमल १३१८ पासून चालू झाला. मुसलमान राज्यकर्त्यांची दरबारी भाषा फार्सी होती. हे राज्य सु. ३५० वर्षे चालले. या काळात ब्राह्यण, क्षत्रिय, वैश्यभरडले गेले. शूद्रांपैकी तांबोळी, रंगारी, महार, मांग. इत्यादीतील काही मुसलमान झाले. काजी न्यायाधीश बनला व मुलाणी बलुतेदार झाले. देवळांच्या मशिदी बनल्या, तर समाध्यांचे दर्गे झाले आणि राऊळांचे महाल बनले. मुसलमानांनी नगरांना व खेडेगावांना अरबी व फार्सी नावे देऊन हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा उपक्रम सुरू केला. हे चालू असतानाच पश्चिम किनाऱ्यावर डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच इत्यादींनी व्यापाराच्या निमित्ताने किनाऱ्यालगतचा मुलूख ताब्यात घेऊन, मुख्यत: पोर्तुगीजांनी बहुसंख्या असलेल्या हिंदू प्रजेचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करविले. धर्मातराबरोबरच हिंदू संस्कृतीचा व त्यांच्या ग्रंथांचा सर्व उपलब्ध मार्गांनी विध्वंस केला. खेडवळांना जबरदस्तीने वाटवू लागले न बाटणाऱ्यास भयानक रीतीने छळू लागले. ह्या धार्मिक छळामुळे महाराष्ट्र क्षोभला होता. तो क्षोभ निवारण्याचे काम समाजाच्या सर्व थरांतून आलेल्या संतांनी केले. त्यांच्या आध्यात्मविद्येने आपला धर्म व आपली संस्कृती जिंवत ठेवली. याच काळात दक्षिणेतील मुसलमानशाह्या बुडविण्यासाठी उत्तरेतील मोगल सत्ताधीश आक्रमण करू लागले. ते थोपविण्यासाठी ह्या मुसलमानी शाह्यांनी मराठे सरदारांस हाताशी धरले. त्यांनी गनिमी युद्धपद्धतीने लढून मोगल आक्रमणास काही प्रमाणात पायबंद घातला. ह्या मराठे सरदारांपैकी शहाजीराजे हे एक होत. त्यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी आपल्या पराक्रमाने थंड गोळ्याप्रमामे अचेतन बनलेल्या महाराष्ट्रात चैतन्य निर्माण केले व स्वराज्य स्थापिले. पेशवेकालात स्वराज्याचा विस्तार झाला. राजपूत, बुंदले, पठाण, रोहिले आदी मराठी सत्ता मानू लागले. त्यांना चौथाई व इतर वसूल देऊ लागले. मराठ्यांचा दबदबा सर्वत्र वाढला.मोगल बादशाहने आपली बादशाही टिकविण्यासाठी मराठ्यांशी १७७२ मध्ये एक करारनामा (अहदनामा) केला. मोगली साम्राज्य पूर्णत: मराठ्यांकडे सोपविल्याचे फर्मानही दिले. (१९५९). त्यामुळेच पानिपतचे युद्ध ओढवले. मराठ्यांनी आपल्या कर्तबगारीमुळे हिंदुस्थानातील इतर प्रातीयांचे व राज्यकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. मराठ्यांच्या शौर्यधैर्यादी गुणांची पारख तत्कालीन हिदुस्थानातील राजेरजवाड्यांस झाली होती.


पेशवाईतील उणिवा : पेशवाईत नानासाहेब पेशव्याने व तदनंतर पहिल्या माधवराव पेशव्याने सुरळीत कारभार करण्याचाप्रयत्न केला, पण पैशासाठी व्यापार करम्याची कल्पना नानासाहेब पेशव्यास शिवली नाही. किंबहुना इंग्रज व्यापाऱयांकडून चलाख बुद्धीच्या नानासाहेब पेशव्याने हे शिकावयास हवे होते. पण त्याकडे त्याचे लक्ष गेले नाही. समुद्रकिणारा ताब्यात असल्याशिवाय परदेशी व्यापार व यूरोपीय परशत्रूंचा बंदोबस्त होत नाही. हे शिवाजीचे सूत्र पेशव्यांपर्यंत पोहोचले असते, तर नानासाहेब पेशव्यांने इंग्रजांची मदत घेऊन बलाढ्या आर माराधिपती आंग्रे यास बुडविले नसते. हे आरमार बुडाल्यापासून महाराष्ट्राचा  पश्चिम किनारा इंग्रजांच्या ताब्यात गेला. समुद्रावर त्यांनी आपले वर्स्व प्रस्थापित केले. लष्कर व व्यापार ह्यांच्या हालचालीसाठी राज्यात आणि राज्याबाहेर पक्के रस्ते हवेत, गावोगावी पाण्याची व्यवस्था पाहिजे, तथापि पेशव्यांनी स्वतंत्र काते उघडून याची खास तरतूद केल्याचे दिसत नाही.

मुंबईत इंग्रजांचे कोणते उद्योग चालले होते. याची दाद मुंबईजवळ पुण्यास असलेल्या पेशव्यांना नव्हती. व्यापारी मुंबइस राहून धनसपन्न होतात. याकडे त्यांचे लक्ष गेले नाही. यूरोपात विज्ञानाचा प्रभाव पडून शास्त्रज्ञ निरनिराळे शोध लावीत. त्या शोधांचा उपयोग माणसाचे जीवन गतिमान, सुखी व समृद्ध करण्याकडे होत होता, या बदलाची कल्पना पेशवे दरबारातील मुत्सद्दी व शहाणे म्हणविणाऱ्यांसही आली नाही. यूरोपच्या सामान्य ज्ञानाच्या तुलनेत पेशवाईतीलराज्यकर्त्यासइतिहास व भूगोलाचे ज्ञान फार थोडे होते. लोकशिक्षण, विद्यापीठे, पदार्थसंग्रहालये, विद्धत्सभा, संशओधन सभा, पृथ्वीपर्यटने यांचा भारताला पत्ता नव्हता. त्या वेळी समुद्रपर्यटन निषिद्ध मानले. जात होते. अव्वल इंग्रजी काळातही समुद्रपर्यटन घडल्यास प्रायश्चित्त घ्यावे लागे.

मराठ्यांचा पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज यांच्याशी अठराव्या शतकात घनिष्ठ संबंध आला, पण त्यांनी त्यांच्यापासून मुद्रणकलेची माहिती करून घेतली नाही. ती इंग्रजी अंमल सुरू झाल्यावर आली. आंग्रे कदम, धुळप यांचा नौकानयनाशी संबंध होता. आंग्रे. व धुळप मराठ्यांचे आरमारी सरदार होते. त्यांनी कधी लोहचुंबकविरोधी तराफे बांधण्याच्या गोद्यांची माहिती मिळवली नाही.

त्यावेळी सामान्य जनता राजकारणापासून अलिप्त होती. राजकारण हा राजे लोकांचा खेळ आहे, आपण मुके, बिचारे आहोत असेच ते मानीत. पेशवाईच्या उत्तरकाळात दंगेधोपे. जाळपोळ, लुटालूट इत्यादींनी सर्वसामान्यांचे जीवित असुरक्षित झाले. उलट इंग्रज आले. दरारा बसला. जीवनाला सुरक्षितता आली. म्हणून त्या वेळची प्रजा मनातल्या मनात आनंदली असावी. मराठ्यांचे व ग्रजांचे युद्ध चालू असता. कलकत्त्यास एक जाहीर सभा झाली. त्या सभेत मराठ्यांचा पराभव व्हावा व इंग्रजांचा जय व्हावा, म्हणून सार्जनिक प्रार्थना करण्यात आली. त्याचे कारण लूटारू मराठ्यांची दहशत बंगालने इतकी घेतली होती की, आम्हास मुसलमान तर नकोच, पण मराठेही विजयी व्हावयास नकोत, इंग्रज परवडले, असे कलकत्याकडील स्वदेशीयांना वाटले.

मराठ्यांनी स्वाराज्याचा विस्तार करताना सर्व हिंदूना आपणाकडे आकर्षून घेता येईल, असे धोरण ठेवलेले दिसत नाही. आपल्याविषयी इतर प्रांतीयांत प्रेम उत्पन्न करण्यासारखे वर्तन ठेवले होते की नव्हते हा प्रश्रच आहे. धनाढया व्यापारी मराठ्यांस अनुकूल असल्याचे दिसत नाही. मराठी राज्यात संपत्तीची पैदास दिसत नाही. याचे मुख्य कारण येथे व्यापाराची भरभराट झाली नाही. प्रत्येक स्वारीचा व्यवहार आतवट्टयाचा असण्याचा संभव फार असे. याचे कारण त्यांना जुलूम करण्याची इच्छा नसे. मराठ्यांच्या राज्याचे अवशेष म्हणून मुसलमानी राज्यकर्त्याप्रमाणे टोलेजंग इमारती दिसत नाहीत. शिवछत्रपतींच्या काळात भरलेला खजिना संभाजीच्या काळात रिकामा झाला. राजाराम छत्रपतींना निर्वासित होऊन जिंजीस जावे लागले आणि तेथून कर्ज काढून व काही मराठी प्रदेशाची विक्री करून निर्वाह करावा लागला. मराठे तळहाती शिर घेऊन औरंगजेबाबरोबर सतत सव्वीस वर्षे लढले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पेशवे व मराठे सरदार उत्तरेत व दक्षिणेत अनिरूद्ध संचार करू लागले, खंड्ण्या घेऊ लागले, तरी मराठेशाहीचा सरकारी खजिना कर्जबाजारीच राहिला. थोरल्या बाजीरावाचे सरदार कोट कोट खजिना बाळगून होते. पण तो स्वत: कर्जापायी बेजार झाला होता. बाळाजी बाजीरावाची तक्रार अशी, की उत्तरेकडून व दक्षिणेकडून सुवर्णनद्या लागल्या, त्या पुण्यास न येता वाटतच आटत. १७५८ च्या सुमारास दौलतीला सव्वा ते दीड कोट रूपये कर्ज असून ते फेडण्यासाठी सरदारांना वाटून दिले होते व त्यांनी तो भार उचलण्याचे मान्य केले हेते. त्यानंतर पानिपत युद्ध प्रसंग उदभवला, तो मोगल पातशाहीचे करण्याच्या करारामुळे. या करारामुळे मराठ्यांना भारतात शत्रूप्रदेश उरला नाही, म्हणून त्यांना तत्त्वत: कोठेही लूटालूट करता येईना. त्यांच्या सौम्य कारभारामुळे करारानुसार ठरलेल्या रकमाही वेळच्या वेळी जमा न झाल्याने वर्षानुवर्षे रकमांच्या थकबाक्या पुढे ओढलेल्या तत्कालीन जमाखर्चात दिसतात. थोरल्या माधवरावाला तोफा ओतविण्यासाठी घरातील देवांच्या रोजक्या उपयोगाची सोन्या-रूप्याची भांडी मोडावी लागली. आपल्या मृत्युपत्रात ‘दौलतीचे कर्ज वारावे’ असे नमूद करावे लागले. एवंच थोरल्या बाजीरावापासून थोरल्या माधवराव पेशव्यापर्यंत सर्व पेशवे कर्जात असलेले दिसतात. माधवराव पेशव्यानंतर नारायणरावाचा खून झाला आणि राघोबादादाच्या पेशवा होण्याच्या महत्वकांक्षामुळे पहिले ग्रज –मराठा युद्ध सुरू झाले. त्यामुळे हुजुरीत सैनिकांना वेळच्या वेळी नालबंदी व शिबंदी कर्जे काढून द्यावी लागली. तीन मिळाल्याने ते न विचारता नोकरीवरून निघून गेले. अशा रीतीने मध्यवर्ती सत्तेकडे पैशाचा खडखडाट होता. नाना फडणीसाच्या काळात इतर सरदारांनी खंडणी घेऊन व लूट करून पैसा मिळविला, पण त्याचा वापर स्व: च्या संपत्तीत-मालमत्तेत भर घालण्यात केला, त्यामुळे त्यांच्याकडून चिरस्मरणीय अशा कलाकृती किंवा वासितू निर्माण झाल्या नाहीत परंतु मुसलमानी सत्तेचे जाचातून नमराट्यांनी रयतेस सोडविले हे मात्र निश्चित.


पराभवाची कारणे: हिंदुस्थानात १७०० नंतर मोगल सत्ता दुबळी बनली. त्यानंतर तिची जागा मराठी सत्तेने घेतली. मराठे मर्दुकीत व पराक्रमात जगातील कोणत्याही योद्यपेक्षा कमी नव्हते, पण इंग्रजांपुढे त्यांना हार कावी लागली व मराठे मंडळातील घटकांस इंग्रजांचे मांडलिकत्व पतकारावे लागले. याला अनेक कारणे आहेत.

(१)मराठ्यांची सत्ता सर्व हिंदुस्थानात नांदत होती, पण तिची राकीय यंत्रणा नीट नव्हती. एकत्र कारभार नव्हता.पेशवे हे मराठी राज्याचे प्रमुख होते. त्यांनी थोरल्या माधवरावाच्या अंतापर्यंत सर्व घटकांना (शिंदे, होळकर, गायकवाड इ.) आपल्या आज्ञेत ठेवले. नारायणरावाच्या खुनानंतर बालवयामुळे, पेशव्यांचा कारबार नान फडणीस याजकडे आला. नान फडणीसाने पेशवाईचा कारभार स्व: ची  सत्ता  काहीसी वाढविण्यासाठी केला. क्रेंद्रसत्ता दुबळी झाल्यामुळे शिंद्यांविरूद्ध होळकर, भोसल्यांविरूद्ध शिंदे व कोल्हापूरकरांविरूद्ध पटवर्धन व पेशवे लढताना दिसतात. याचा परिणाम असा झाला, की स्वराष्ट्र व स्वातंत्र्य  या गोष्टी सर्व सरदार बव्हंशी विसरून गेले. त्यांच्यामध्ये शिस्त राहीली नाही  व एकोपा तर बिलकूल नव्हता. १८०० नंतर राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी आपापसांतील वैरभाव विसरून त्यांना त्या वेळी कोणीही एकत्र आणू शकले नाही. त्याचा परिनाम असा झाला की, इंग्रजांनी प्रत्येक मराठा सरदाराला एकएकटे गाठून त्यांचा पराभव केला व आपले मांडलिकत्व त्यांना स्वीकारण्यास भाग पाडले.

(२)मराठ्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेकडे व व्यापाराकडे द्यावे तितके लक्ष दिले नाही. त्यामुळे पेशवे, शिंदे, होळकर आदी मराठे सरदार नेहमी सावकरांच्या कर्जात होते. कर्ज फेडण्यासाठी इतर मुलखाची ते थोडीबहुत लुटालूट करू लागले. त्यामुळे तेथील प्रजा मराठ्यांना शत्रू मानू लागली, पण प्रजेने शरणागती पतकरल्यानंतर मराठ्यांना लूट करण्यासाठी जागा राहिली नाही. त्यामुळे ते आणखी कर्जबाजारी होऊ लागले. पैशाच्या अभावी कारभारात ढिलेपणा आला. त्यामुळे चोर, लूटारू यांजपासून प्रजेचे संरक्षण करणे कठीण होऊन बसले. मराट्यांनी अखेरीअखेरीस वसुलासाठी मक्ते देण्याची पद्धती चालू केल्यामुळे शेतकर्यांवर  जुलूम होऊन ते मक्तेदारांना कंटाळले.

(३)मराट्यांनी स्वत:ची नवीन कवाइती फौज व तोफखाना यांविषयी फारसे काही केले नाही.

(४)मराठ्यांना ज्या भूभागावर लढे द्यावयाचे, त्याचे नकासे त्यांनीतयार केले नाहीत. १७७५ ते १८११ पर्यत इंग्रज दक्षिणची पाहणी करून नकाशे तयार करीत होते.  याचा हिंदवासियांना पत्ता नव्हता भूगोलाच्या अभ्यासाकडे त्यांनी आवश्यक तेवढे लक्ष दिले नाही.

(५)पराभवाची मुख्य कारणे अशी की, मराठ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाकडे तसेच कडक शिस्तीचे व लष्करी व्यवस्थेचे शिक्षण यांजकडेही दुर्लक्ष केले. जे मुत्सदी मराठयांच्या राज्याची धुरा वहात होते, त्यांनी यूरोपियन लोक येऊन कोणत्या रीतीने येथे राज्य स्थापण्याचा प्रयत्न करीत, याची दखल घेतली नाही. वसई जिंकल्यावर चिमाजी आप्पा आणि बाजीराव यांना आरमारी  तळ व आरमारी जहाजे बांधण्यात महत्वाचे स्थान मिळाले, याचा बोध झाला नाही किंवा तशा प्रकारची तजवीज करण्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत. पोर्तुगीजांकडे गोद्या होत्या, तसेच बंदुका व तोफा ओतण्याचे कारखाने होते. बंदुका तयार करणारे तोफा ओतविणारे तज्ञ व निष्णात कारागीरही त्यांजकडे होते.मराट्यांना ह्याच तज्ञांच्या साहाय्याने बंदुका, तोफा तयार करण्याचा व गोदीमध्ये जहाजे बांधण्याचा कारखाना काढता आला असता. परंतु अशी बुद्धी त्यांना झाली नाही. तंत्रज्ञानाच्या विकासाबाबत मराठे उदासीने राहिले.

(६) मराठ्यांच्या कोणत्याही कृत्यात सुसूत्र व सुरंगत धोरण नव्हते. बहुनायकी होती. उत्तरेत मराठ्यांतर्फे बादशाही ताब्यात घेऊन महादजी शिंदे कारभार करू लागले. ह्या सेनापतीच्या हाताखाली तुकोजी होळकर आणि अली बहाद् दूर यांनी काम करावे असे ठरले, पण तसे न होता, हे  दोन्ही सेनापती  नाना फडणीसाच्या सांगण्यावरून शिंद्यांना त्रासदायक होतील अशा हालचाली करू लागले. महादजीचे न ऐकता त्याने सांगितलेल्या  आज्ञा नाना फडणीसाकडे पाठवून त्याच्या अंतिम आज्ञेची वाट पाहू लागले.

(७)राज्यरक्षणाच्या एका ध्येयासाठी आपण एकत्र आले पाहिजे, हे त्यांना उमगले नाही. त्यामुळे आपणा सर्वाचा शत्रू जो इंग्रज, त्याविरूद्ध सर्व सरदार इंग्रजी भेदनीतीचा प्रभाव पडून एक जाले नाहीत आणि इंग्रजांनी प्रत्येक मराठे सरदाराशी स्वतंत्र लढाई करून त्यांना शरण आणिले.

(८) दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत पुण्यातीलच नव्हे, तर पेशव्यांच्या सबंध राज्यात दंगेधोपे, लूट व स्त्री-अपहरण यांचे प्रमाण खूपच वाढले. लोकांना जीवन असह्य हू लागल्यामुळे लोक इंग्रजांच्या आश्रयांस जाऊ लागले. बाजीरावाने आपल्या भोवती सर्जेराव घाडगेसारखी  अगदी कोत्या मनाची व शून्य कर्तबगारीची माणसे जमा केली, तर इंग्रजांकडे लॉर्ड वेलस्ली व त्याचा भाऊ आर्थर, एल्फिन्सटन, सर जॉन मँल्कम, डंकन, टॉमस मन्रो यांसारखी बुद्धीने आणि कर्तृत्वाने निष्णात माणसे असल्यामुळे त्यांना विजय मिळवणे सहज सुलभ झाले.

(९) शिंद्यांचे कवायती पायदळ व युद्धतंत्र हे परकीय लोकांवर भिस्त ठेऊन उभारले होते. नवीन युद्धतंत्र लोकांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे निर्णयात्मक लढायांत शिंद्यंच्या कवाईती फौजेवरील इंग्रज व फ्रेंच अंमलदार आयत्या वेळी शिंद्यांस सोडून तोफखान्यासह इंग्रजांना मिळाले किंवा तटस्थ राहिले. त्यामुळे मराट्यांना दारूण पराभव पतकरावे लागले.

(१०) नान फडणीसाने सवाई माधवराव पेशव्यांना व्यवहाराचे चांगले शिक्षण दिले नाही. मराठेशाहीच्या शेवटच्या काळात राजकारणात कर्त्या पण भिन्न माणसास सांभाळून घेऊन त्यांचा उपयोग राज्यकार्यासाठी करणारा कोणी निपजला नाही.


वर निर्देशिलेली मराठ्यांच्या पराभवाची कारणे लक्षात घेतल्यावर हेही जाणावयास हवे, की सबंध हिंदुस्थानातील इतर प्रांतांतील जनसमूहास मुसलमानी सत्तेचे जोखड झुगारून देण्याचे काम करता आले नाही, ते मराट्यांनी केले. त्यांनी मुसलमानांची सत्ता झुगारून देऊन स्वत:ची सत्ता सबंध हिंदुस्थानभर अठराव्या शतकात राबविली. दिल्लीचे तख्त ताब्यात घेऊन मोगल बादशाहच्या नावे १८०२ पर्यंत राज्यकारभार केला. इंग्रजांनी मराठ्यांसही दिल्लीतून घालवून मोगल तख्त ताब्यात घेतले आणि सबंध हिंदुस्थानात पसरलेल्या शिंदे, होळकर, गायकवाड यांच्या ताब्यातील काही मुलूख खालसा करून व त्यांना मांडलिक बनवून सर्व हिंदुस्थानभर अधिसत्ता स्थापन केली. सुप्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी मराठ्यांच्या कर्तुत्वाचे मूल्यमापन खालीलप्रमाणे केले आहे.

‘‘मराठ्यांना हिंदुस्थानमध्ये अद्वितीय ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. त्यांच्या अगदी अलीकडच्या पूर्वजांनीसुद्धा शेकडो लढाया मारून आपले देह धारातीर्थी ठेवले आहेत. व्यवसिथित रीतीने मोठमोठ्या फौजांच्या हालचाली केल्या आहेत. विलक्षण राजकारणे लढविली आहेत साम्राज्यातील राजकीय प्रश्र उलगडून दाखविले आहेत. सारांश त्यांनी आपल्या कृतीने अगदी अलीकडचा इतिहास बनविला आहे. बुद्वीची तीक्ष्णता, दीर्घोद्योग, साधी रहाणी, उच्च विचारसरणी, कोणत्याही विचार आचरणात आणण्याची धमक, चारित्र्य इ. सर्व गुणांचा मिलाफ मराठ्यांच्या ठिकाणी झालेला असल्यामुळे आज तरी हिंदुस्थानात त्यांच्यापेक्षा वरचढ कोणी असेल, अशी कल्पनासुद्धा करण्याचे कारण नाही.वरील सद् गुणसमुच्चयातजर मराठ्यांमध्ये संघटनाचातुर्य, सहकारिता, आधुनिक यांत्रिक कलेचे ज्ञान आणि आहे त्याहून अधिक दूरद्दष्टी इतक्या गुणांची भर पडेल तर पृथ्वीच्या पाठीवर त्यांची बरोबर कोणीही करू शकणार नाही.”

खोबरेकर, वि. गो.

संदर्भ : 1. Apte. B. K. A history of Maratha Navy and Merchantships. Bombay, 1973.

            2. Bhattacharji Arun, History of Modern India New Delhi, 1976.

            3. Brij Kishore, Tarabai Her Times, Bombay. 1963.

            4. Chitnis, K. N. Socio-Ecomomic Aspect of Medieval India Poona, 1979.

            5. Chakravorty, U. N. Anglo –Maratha Relations and Malcolm:  1798-1830, New Delhi, 1979.

            6. Choksey, R. D. After Math : 1818-1826 (Peshwa Dafter Act), Bombay, 1950.

            7. Choksey, R. D. History of British Dipomancy at the Court of the Peshwas: 1786-1818, Poona, 1951.

            8. Dcopujari, M. B. Shivaji and the Maratha Art of War, MNagpur, 1973.

            9 Duff, James Grant, A. History of Maharattas Two Volumes, New Delhi,1978

           10, Jaffar, S, N, Mughal Emplre Babar to Aurengzeb, Delhi, 1974.

           11. Keene, H. G. Fall of the Mughal Empire Delhi 1971.

           12. Khan, Yusuf Husain, Glimpses of Medieval Indian Culure Bombay, 1962.

           13. Kincaid, C. A., parasnis D. B. A. History of the Maratha People Three Volumes, Delhi, 1968

           14. Majumdar R C. Ed., Maratha Supremacy, Bombay 1977,

           15. Majumdar R. C. ed Mughal Empire Bombay, 1973.

           16. Pagadi Setumadhava Rao, Shivaji Poona, 1976

           17. Ranado M.G. The Rise of the  Maratha Power 1961.

           18. Sardesai G S. Ed Selectlons From the Peshwa Defter Volumes 1.45. Bombay, 1930-34

           19. Sardesai G. S. Main Currents in the Maratha History Patna 1926.

           20. Sardesai G. S. New History of the Marathas Three Voulmes, Bombay 1957

           21. Sarkar J N History of Aurengzeb Five Volumes, Calcutta 1956.

           22. Sarkar J. N. Shivaji and Times Calutta 1961

           23. Sen S, N. Administrative system of the Marathas, Calcutta, 1976

           24 sen S. N. Miiitary System of the Marathas Bombay 1958

           25 Varma S P A. Study in Maratha Diplomacy. Agra, 1956

         २६ काटे, रा. गो. संपा., राज्यव्यवहारकोश, औरंगाबाद, १९५६.

         २७. काळे, दि. वि. छत्रपति शिवाजी महाराज, पुणे, १९५९.

         २८. केळकर, न. चिं. मराठे व इंग्रज, पुणे, १९२२.

         २९. जोशी, शं. ना. संपा. कृष्णाजी अनंत सभासद विरचित छत्रपती शिवाजीराजे यांची वखर, पुणे, १९६०.

         ३०. ढेरे, रा. चि. संपा. अज्ञापत्र, पुणे १९६०.

         ३१. दिवेकर, स.म. संपा. कवींद्र परमानंदकृत श्री शिवभारत, मुंबई, १९२७.

         ३२. पगडी. सेतुमाधवराव, हिंदवी, स्वराज्य आणि मोगल, पुणे, १९६६.

         ३३. परळकर, ल. वि. मराठी संत आणि मराठी राज्याची स्थापना, मुंबई, १९३१.

         ३४. पिसुर्लेकर, पां. स. पोर्तुगेज-मराठे संबंध, पुणे, १९६७.

         ३५. पोतदार, द. वा. मराठी  इतिहास आणि इतिहाससंशोधन, पुणे, १९३५.

         ३६. वनहट्टी, श्री. ना. संपा. अज्ञापत्र अर्थात शिवाजी महाराजांची राजनीति, पुणे, १९६१.

         ३७. बेंद्रे, वा, सी. महाराष्ट्रेतिहासाची साधने, ३ खंड, मुंबई, १९६६-६७.

         ३८. बेद्रे, वा. सी. श्री. छत्रपति शिवाजीमहाराज, २ खंड, मुंबरई, १९७२.

         ३९. भावे, वा. कृ. पेशवेकालीन महाराष्ट्र, पुणे, १९३५.

         ४०. राजवाडे, वि. का. संपा. मराठ्यांच्या इतिहासाची साधने,खंड १-२६, वाईपुणे, १८९८-१९२१.

         ४१. वाकसकर, वि. स. संपा. श्री शिवछत्रतींची ९१ कलमी बखर आणि भोसले घराण्याची चरितावली, पुणे, १९६२.

         ४२. शेजवलकर, त्र्यं. शं. श्री शिवछत्रपति, मुंबई, १९६४. ४३. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, भाग १-३, मुंबई, १९२९.