दुसरा व्हिक्टर इमॅन्युएल

व्हिक्टर इमॅन्युएल, दुसरा : (१४ मार्च १८२०-९ जानेवारी १८७८). संयुक्त इटलीचा पहिला राजा. जन्म सार्डिनिया राज्यातील तूरिन (पीड्रमाँट) येथे. वडील चार्ल्स ॲल्बर्ट यांनी त्यास राजपुत्रास योग्य असे धार्मिक व लष्करी शिक्षण दिले.  ऑस्ट्रियाची राजकन्या मारिया आडेलाईडशी त्याचा विवाह दुसरा व्हिक्टर इमॅन्युएल चे चित्र मूळ पान ४९९झाला. १८४८ च्या उठावानंतर ऑस्ट्रियाबरोबर सार्डिनियाचे युद्ध सुरू झाले. या युद्धाचा हेतू ऑस्ट्रियाचे वर्चस्व नष्ट करणे, हा होता. या युद्धात ऑस्ट्रियाने नोव्हारा येथे इटलीचा पराभव केला (१८४९). परिणामत: ॲल्बर्टने राजत्याग करून राज्याची सर्व सूत्रे दुसरा व्हिक्टर इमॅन्युएल याच्याकडे सोपविली. व्हिक्टरने डाव्या प्रजासत्ताकवाद्यांची चळवळ दडपून ऑस्ट्रियास नुकसानभरपाई दिली आणि आपले स्थान बळकट केले. या त्याच्या धोरणावर टीकाही झाली. त्याने रिसॉर्जिमेंटो या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या कामील्लो काव्हूर या संपादकास पंतप्रधान नेमले (१८५२). काव्हूर आपल्या वृत्तपत्रातून सार्डिनियाला संविधानात्मक सुधारणा देण्याचे आणि इटलीच्या राष्ट्रीय चळवळीत पुढाकार घेण्याचे आवाहन लोकांना करीत असे. इटलीचा प्रश्न हा एकूण युरोपचा प्रश्न असून तो युरोपीय सत्तांच्या साहाय्याने राजनैतिक स्तरावर सोडविला पाहिजे, असे त्याचे मत होते. पुढे फ्रान्सच्या मदतीने ऑस्ट्रियाशी युद्ध करून लाँबर्डी प्रांत त्याने जिंकून घेतला (१८५९). फ्रान्सने युद्धविराम घोषित केल्याने व्हिनिशिया प्रांत मात्र त्यास घेता आला नाही. या युद्धात ⇨ जुझेप्पे गॅरिबॉल्डी या सेनानीची मदत घेण्यात आली होती तथापि या युद्धामुळे इमॅन्युएलच्या पीडमाँट-सार्डिनिया राज्याला इटलीत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. गॅरिबॉल्डीने १८६० मध्ये सिसिली व नेपल्स मुक्त करण्यासाठी यशस्वी युद्ध केले. त्यामुळे इमॅन्युएल उत्तर-मध्य इटलीचा राजा बनला. सेंट पीटर्सबर्ग सोडून मध्य इटलीतील राज्येही सार्वमतानुसार सार्डिनियात विलीन झाली. १७ मार्च १८६१ साली इटलीचा अधिकृत राजा म्हणून इमॅन्युएलच्या नावाची घोषणा झाली. व्हिनीशिया मिळविण्यासाठी व्हिक्टरने ⇨ ऑटो फोन बिस्मार्कशी हातमिळवणी करून १८६६ साली तो घेतला. पुढे फ्रेंचांनी रोम येथील लष्कराचा तळ उठविताच (१८७०), त्याने रोमचा ताबा घेतला आणि तेथे राजधानी नेली. ऑस्ट्रियापासून मुक्त होऊन एकसंध झालेल्या इटलीवर व्हिक्टरने १८७८ पर्यंत राज्य केले. रोम येथे अल्पशा आजाराने तो मरण पावला.

कुलकर्णी, अ. रा.