मोमझेन, टेओडोर :(३० नोव्हेंबर १८१७–१ नोव्हेंबर १९०३). अभिजात जर्मन इतिहासकार, कायदे पंडित व साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी (१९०२).त्याचा जन्म प्रॉटेस्टंट पंथीय पाद्र्याच्या कुटुंबात गार्डिंग (श्लेस्विग-होलस्टाइन प्रांत) येथे झाला. सुरुवातीचे त्याचे शिक्षण घरीच झाले. पुढे हँबर्गरजवळच्या अल्तोना येथील विद्यालयातून शिक्षण घेऊन भाषाशास्त्र व न्यायशास्त्र या विषयांत कील विद्यापीठात (१८३८–४३) त्याने उच्च शिक्षण घेतले आणि कायद्याचा अभ्यास केला. विद्यार्थिदशेत ओटो यॉन आणि फ्रीड्रिख कार्ल फोन सॅव्हिन्यी या तत्कालीन विचारवंतांच्या व्याख्यानांचा व लेखनाचा त्याच्यावर प्रभाव पडला. परिणामतः त्याने रोमन संस्थांवर एक प्रबंध लिहिला. त्याला बर्लिन अकॅडमीने इटली-फ्रान्समधील लॅटिन कोरीव लेखांचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. त्याने सु. ३६,००० कोरीव लेख जमविले. इटलीत बार्तोलोमेओ बोर्गेसे या पुराभिलेखज्ञाचा सहवास त्याला लाभला. मोमझेनच्या भावी लेखनावर त्याची मोठी छाप पडली. पुढे दोघांनी मिळून कोरपुस इन्सक्रिपत्सिओनुम लाटिनारूप हा लॅटिन कोरीव लेखांचा संग्रह अनुवादासह प्रसिद्ध केला (१८६१). प्राचीन यूरोपच्या विशेषतः रोमच्या इतिहासलेखनाची ही प्रचंड साधनसामुग्री ठरली. त्याने सॅमनाइट व निआपॉलिटन प्रदेशांतील कोरीव लेख अभ्यासले. त्यांचा संग्रह १८५२ मध्ये त्याने प्रसिद्ध केला. तो संग्रह बोर्गेसेलाच अर्पण केला आहे.

इटलीतून मोमेझेन १८४७ मध्ये जर्मनीला (श्लेस्विग) परतला. त्याने एल्बामधील डेन्मार्कविरुद्धच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला पण ती अयशस्वी झाली. त्यानंतर लाइपसिक विद्यापीठात रोमन कायद्यावर त्याने दिलेल्या व्याख्यानांचा गौरव होऊन रोमन लॉचा तिथेच प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती झाली (१८४८) तथापि १८५१ मध्ये स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल तेथून त्याची हकालपट्टी झाली. नंतर झुरिक विद्यापीठात त्याला प्राध्यापक नेमण्यात आले (१८५२). लाइपसिक येथे असतानाच त्याने कार्ल राइमर आणि हेर्झेल या प्रकाशकांच्या विनंतीवरTन ‘रोमन इतिहास’ या बृहदग्रंथाचे नियोजन केले. पुढे ब्रेसलाऊ विद्यापीठात असताना त्याने हा त्रिखंडात्मक ग्रंथ पूर्ण केला. (१८५४–५८). याच सुमारास कोरपुस इन्सक्रिपत्सिओनुमचे संपादकपद व संचालकत्व त्याच्याकडे आले. त्याने पंधरा खंडांत हे कोरीव लेख (१,३०,०००) प्रसिद्ध केले. रोमवरील या इतिहास ग्रंथामुळे मोमझेनला यूरोपभर प्रसिद्धी लाभली, तथापि या ग्रंथाचा सीझर आणि त्याचे साम्राज्य यांवरील चौथा खंड पूर्ण झाला नाही. मात्र त्याने रोमन प्रॉव्हिन्सिस अंडर द एम्पायर हा पाचवा खंड रोमन कोरीव लेखांच्या, साधनसाम्रागीचा साक्षेपी उपयोग करTन पुढे १८८५ मध्ये प्रसिद्ध केला. ऐतिहासिक कल्पनाशक्ती, चिकित्सक विवेचन, व्यांसंगनिदर्शक तपशील आणि सुबोधता इ. बाबतीत हा ग्रंथ अनन्यसाधारण मानला जातो. या बृहद्‌ग्रंथाची अभिजात जर्मन वाङ्‌मयात गणना केली जाते.

त्याच्या या ग्रंथामुळे त्याला बर्लिन विद्यापीठात प्राचीन इतिहास विषयाचे प्राध्यापकपद प्राप्त झाले (१८५८). या पदावर तो त्याच्या मृत्यूपर्यंत होता. या प्रदीर्घ काळात त्याने इतिहासातील कोरीव लेखांव्यतिरिक्त नाणकशास्त्र, पुरातत्त्वविद्या इ. विविध विषयांत संशोधन-अभ्यास करून विशेष प्रावीण्य मिळविले आणि विपुल संशोधनात्मक लेखन केले. त्याचे बहुतेक लेखन जर्मन भाषेत असून त्यांपैकी रोमिश्केस स्टाटश्रेक्ट (तीन खंड-१८७१–८८), रयोमिशेस स्टाटरेष्ट (१८९९), रेडेन उंट आंओफझेत्झऽ (१९०५), गेझामेल्टऽश्रीफ्टन (७ खंड, १९०५–१०) इ. प्रसिद्ध आहेत. त्याच्या बहुतेक ग्रंथांचे इंग्रजीमध्ये भाषांतर झाले आहे. त्याच्या या वाङ्‌मयीन कर्तृत्त्वाचे यथोचित चीज त्यास साहित्यातील नोबेल पारितोषिक देऊन करण्यात आले (१९०२). हा मान मिळविणारा तो पहिला जर्मन इतिहासकार होय.

अध्ययन-अध्यापक-संशोधन यांत मोमझेन जरी व्यग्र असला, तरी जर्मनीच्या सार्वजनिक जीवनापासून तो अलिप्त नव्हता. त्याने त्यात सक्रिय भाग घेतला. त्याला अनिर्बंध राजेशाही अमान्य होती. तद्वतच लोकशाहीबद्दलही तिरस्कार होता. मात्र लोकमानाची कदर करणाऱ्या अभिजन सत्तेचा तो पुरस्कर्ता होता. प्रशियन संसदेत तो उदारमतवादी पक्षाचा १८६३–६६ व १८७३–७९ असा सु. नऊ वर्षे निर्वाचित प्रतिनिधी होता. पुढे जर्मनीच्या एकीकरणानंतर जर्मन राईशस्ताग (शाही संसद) वरही तो १८८१–८४ दरम्यान प्रतिनिधी म्हणून निवडला गेला. प्रॉयशिसऽयार ब्यूषर या तत्कालीन प्रभावी राजकीय वृत्तपत्राचा तो सहसंस्थापक व स्तंभलेखक होता. त्याने बर्लिन ॲकॅडमी ऑफ सायन्सिस या संस्थेचे सचिवपद काही वर्षे (१८७३–९५) समर्थपणे सांभाळले. त्याची राजकीय मते परखड होती. त्याने १८४८ च्या क्रांतीला सक्रिय पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे अनेक वेळा त्याला राज्यकर्त्यांचा रोष सहन करावा लागला.

बर्लिनजवळच्या उपनगरात तो वृद्धापकाळाने मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे समग्र साहित्य खंडशः प्रसिद्ध होऊ लागले. त्यांपैकी आठ खंड प्रसिद्ध झाले आहेत. यूरोपातील समकालीन व उत्तरकालीन रोमन इतिहासकारांवर मोमेझेनच्या इतिहासलेखनाचा फार मोठा प्रभाव उमटला.

संदर्भ : 1. Fowler, W. W. Theodor Mommsen: His Life and Work, Oxford, 1920.

           2. Hartmann, L. M, Theodor Mommsen : Eine biographische Skizze, Gotha, 1908.

           3. Thompson , J. W. History of Historical Writing, Vol, ll, New York, 1962.

           4. Wickert, l. Drei Vortrage Uber Theodor Mommsen, 1970.

देशपांडे, सु. र.