भारत इतिहास संशोधक मंडळ : भारताच्या व विशेषतः मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था. तिची स्थापना ७ जुलै १९१० रोजी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि खं. चिं. मेहंदळे यांनी केली.

भारताच्या सर्वागीण इतिहास संशोधनासाठी आवश्यक ती ऐतिहासिक साधने संगृहीत करून त्यांचे शास्त्रशुद्ध जतन व प्रदर्शन करणे आणि त्यांसाठी आवश्यक अशा इमारती बांधणे, ही संस्थेची सुरूवातीची उदिष्टे होती. पुढे ही साधने आणि भारतीय इतिहास व संस्कृती यांविषयीचे संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कामही संस्थेने अंगीकारले. संस्थेच्या घटनेनुसार मंडळाचा प्रमुख अध्यक्ष असून प्रशासकीय व्यवहार चिटणीसांमार्फत केला जातो. मंडळाचे वार्षिक व आजीव असे एकूण ५५० सभासद होते (१९८२). तेरा सभासदांचे कारभारी मंडळ दर तीन वर्षानी निवडतात. त्यातून चिटणीसांची निवड होते. विद्यमान तीन चिटणीस असून कार्याध्यक्ष व खजिनदार हे सर्व सभासदांनी प्रत्यक्ष निवडून द्यावयाचे असतात. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड दर तीन वर्षानी सर्वसाधारण सभेत होते. सभासदांना ग्रंथालय, पोथीशाळा, दप्तरखाना इ. विभागांत संशोधन करण्याची सुविधा आहे. मंडळ दर तीन महिन्यांनी ऐतिहासिक निबंध,वृत्ते वगैरे सामग्रीसाठी एक मासिक प्रसिद्ध करते. तेही सभासदांना विनामूल्य मिळते.

मंडळातील अस्सल साधनांची चार भागांत व दालनांत विभागणी केली आहे : (अ) लेख्यशाळा : यात मोडी पत्रव्यवहार, कागदपत्रे, हिशोब वह्या, फार्सी कागदपत्रे, महजर, करीने, सनदा असे भिन्न भाषांतील मिळून सोळा लाख कागद मंडळात आहेत. यात आदिलशाही, शिवकाल, पेशवाई इत्यादीतील जवळपास पन्नास घराण्यांचे कागद आहेत. (आ) पोथीशाळा : यातील तेहतीस हजार हस्तलिखित ग्रंथांपैकी सतरा हजारांची सूची प्रसिद्ध झाली आहे. हे ग्रंथ संस्कृत, मराठी, फार्सी, कन्नड इ. भाषांतील असून त्यांपैकी दोनशे पोथ्या सचित्र आहेत त्या धार्मिक, ज्योतिषविषयक व काव्यांच्या आहेत. त्यांची स्वतंत्र सूची तयार करण्याचे काम चालू आहे. सचित्र पोथ्यांपैकी गीतापञ्चरत्‍नी, शकुनवंती, सिंहासनबत्तीशी (संस्कृत) व तारीख-इ-हुसेनशाही (फार्सी) ह्या उल्लेखनीय असून फार्सी सचित्र प्रत ही जगातील दुर्मिळ ग्रंथांपैकी एक आहे. (इ) चित्रशाळा : यात एकूण बाराशे दुर्मिळ लघुचित्रे आहेत. भिन्न भिन्न काळातील ही चित्रे विभिन्न शैलीतील आहेत. त्यांत रागरागिणी, बारामास, व्यक्तिचित्रणे, परंपरागत सजावटी यांची चित्रणे असून त्यांतील तालचित्रे उल्लेखनीय आहेत. या विषयावर अन्यत्र असा संग्रह नाही. याशिवाय अकबर, जहांगीर यांची व्यक्तिचित्रणे तसेच मराठेशाहीतील पहिला बाजीराव, नानासाहेब, रघुनाथराव, थोरला माधवराव, सवाई माधवराव, नाना फडणीस, महादजी शिंदे, हरिपंत फडके यांची अस्सल चित्रेही आहेत. शिवाय पाउणशेच्यावर काचचित्रे आहेत. (ई) नाणी : सोने, चांदी, तांबे इ. धातूंची सुमारे सात हजार नाणी मंडळाच्या संग्रही असून ती कालदृष्ट्या सातवाहन काळापासून अठराव्या शतकापर्यंतच्या कालखंडातील निरनिराळ्या राजघराण्यांची आहेत. (उ) ताम्रपट : चालुक्य, राष्ट्रकूट व यादव या वंशांचे एकूण ३० ताम्रपट, तसेच अनेक मूर्ती, वीरगळ, शस्त्रे, वस्त्रे, नकाशे अशा विविध वस्तू या विभागात आहेत. (ऊ) प्रयोगशाळा : आधुनिक उपकरणांनी सुसज्‍ज असून त्यात कागदपत्रांच्या रक्षणासाठी त्यांवर पारदर्शक कागदाचा थर देऊन ती टिकावू करण्यासाठी लॅमिनेशन करणे, नाणी व इतर वस्तू स्वच्छ करणे इ. कामे चालतात. (ए) संशोधन विभाग : कागदपत्रांचे संपादन, नाण्यांचे व ताम्रपटांचे वाचन इ. वृत्तांत प्रसंगोपात्त प्रसिद्ध झालेले आहेत. पुरातत्व संशोधनाच्या दृष्टीने १९४९ मध्ये कराड येथे मंडळाने उत्खनन केले. त्यानंतर १९८० पासून दौलताबादच्या मध्ययुगीन संस्कृतीचे संशोधन करण्याच्या व उत्खननाच्या प्रकल्पात डेक्कन कॉलेज (पुणे) व मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद) यांच्याबरोबर मंडळाने भाग घेतला आहे. (ऐ) ग्रंथालय : मंडळात संशोधकांना उपयुक्त असे अठरा हजार दुर्मिळ ग्रंथ असून प्रतिवर्षी त्यांत नवीन पुस्तकांची भर पडते. शिवाय पंचेचाळीस नियतकालिके मंडळात नियमित येतात. ग्रंथालयाला जोडूनच संशोधकांसाठी अभ्यासिकाही आहेत.

मंडळाने इतिहासतज्ञांचे अनेक संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यांत प्रामुख्याने मंडळाने जमविलेल्या अस्सल साधनांचे प्रकाशन आहे. स्वीय मालेतील एकशे पंधरा प्रकाशने असून त्यांपैकी (१) मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड १ ते १२ (राजवाडे, वि. का.), (२) ऐतिहासिक फार्सी साहित्य, खंड १ ते ६ (खरे, ग. ह. कुलकर्णी, गो. त्र्यं.), (३) दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने, खंड १ ते ४ (खरे, ग. ह.), (४) फार्सी – मराठी कोश (पटवर्धन, मा. त्रिं.), (५) पुणे नगर संशोधन वृत्त, खंड १ ते ४, (६) महाराष्ट्रातील काही प्राचीन ताम्रपट व शिलालेख (दीक्षित, मो. गं.), (७) ताल पेंटिंग्ज (रानडे, उषा चव्हाण, कमल), (८) भागवत पुराण पेंटिंग्ज (माटे, म. श्री. रानडे, उषा) इ. प्रमुख ग्रंथ होत. याशिवाय मंडळाने पुरस्कृत केलेले अनेक ग्रंथ आहेत.

प्रतिवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मंडळाचे वार्षिक संम्मेलन भरते. तसेच मंडळाचा वाढदिवस, पाक्षिक सभा इ. प्रसंगी मंडळाचे सभासद, अभ्यासू व्यक्ती एकत्र येऊन शोधनिबंधाचे वाचन व चर्चा होते. इचलकरंजीकर स्मृतिदिन व्याख्यानमाला, शिवचरित्रावरील व्याख्यानमाला, करवीर व्याख्यानमाला इ. व्याख्यान-सत्रे ही ज्ञानप्रसाराची मंडळाची मुख्य साधने होत. रामदास निर्वाण त्रिशताब्दी चर्चासत्र, नाणकशास्त्र परिषद, महाराष्ट्र इतिहास परिषद अशी विशेष चर्चासत्रे विशेष प्रसंगी मंडळात होतात. मंडळाने म. मो. दत्तो वामन पोतदार यांच्या स्मरणार्थ ‘पोतदार प्रतिष्ठान’ स्थापले असून त्याद्वारे मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाचे वर्ग चालवले जातात. त्याचप्रमाणे मोडी – फार्सीचेही वर्ग चालतात.

मंडळाचे विद्यामान अध्यक्ष ह. धी. सांकलिया असून कार्याध्यक्ष ग. ह. खरे आहेत. यापूर्वी मंडळाला ग. व्यं. जोशी, वासुदेवशास्त्री खरे, का. ना. साने, चिंतामणराव वैद्य, न. चिं. केळकर व मालोजीराव नाईक -निंबाळकर असे अध्यक्ष लाभले.

सभासद वर्गणी, शासकीय व निमशासकीय अनुदाने, व्यक्तिगत आणि सार्वजनिक देणग्या यांवर मंडळाची आर्थिक भिस्त असून मंडळाच्या इमारतीसाठी व ग्रंथालयासाठी देणग्या मिळाल्या. त्यांतील १९२९ मधील डॉ. जस्टिन ॲबट यांची ३० हजार डॉलर्सची देणगी विशेष उल्लेखनीय होती. त्यानंतर जुन्या इमारतीशेजारी नवी इमारत बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांनी सु. तीन लाखांचे अनुदान दिले. तसेच मराठ्यांचा इतिहासाच्या स्वतंत्र दालनासाठी पुणे महानगरपालिकेने २५,००० रूपयांचे अनुदान दिले. याशिवाय मंडळाचे एक माजी कार्यकर्ते रा. वि. ओतूरकर यांनी वडिलांच्या स्मरणार्थ २५,००० रूपये दिले. त्यातून त्रैमासिक आणि ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाचा खर्च केला जातो. याशिवाय छोट्या -मोठ्या अनेक देणग्या मंडळाला मिळाल्या व मिळतात. अनेक ऐतिहासिक नाणी, वस्तू व कागदपत्रे मंडळाला संशोधकांनी दिली. मंडळाच्या प्रकाशानासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन प्रतिवर्षी काही अनुदान देते.

रानडे, उषा