यूए-ची टोळ्या : चीनच्या उत्तरेस मंगोलिया प्रजासत्ताकाच्या जवळचा चिनी तुर्कस्तान किंवा कॅश्गार हा प्रदेश युए-ची टोळ्यांचे मूळ स्थान होय. त्यांचा पहिला उल्लेख चिनी साधनांतून मिळतो. त्यात त्यांना वायव्य चीनच्या कान्सू प्रांतातील भटके लोक म्हटले आहे. या प्रदेशांत वूसुन आणि युए-ची ह्या दोन टोळ्या जवळजवळ राहत असत. त्यांच्यात वारंवार युद्धे होत. इ. स. पू. दुसऱ्या शतकाच्या मध्याच्या सुमारास वूसुन टोळ्यांनी मंगोलियातील हूणांचे साहाय्य घेऊन युए-ची टोळ्यांना या प्रदेशातून हाकून लावले. तेव्हा त्यांनी दक्षिणेस सरकून बॅक्ट्रिया (बल्ख) देश ग्रीकांचा पराभव करून व्यापला. येथे त्यांनी इ. स. पू. सु. १२८ ते इ. स. ४५० दरम्यान राज्य केले. पुढे त्यांची पाच लहान लहान राज्ये झाली. त्यांपैकी कुइशुआंग (कुशाण) नामक टोळीने सु. एक शतकानंतर इतर चार टोळ्यांचा पराभव करून पश्चिमेस पार्थिया आणि दक्षिणेस काबूल या प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या. या टोळीचा नायक कुझूल कडफीसस हा होता. पुढे त्याने सिंधू खोऱ्यातील प्रदेश जिंकून तेथे आपल्या अधिकाऱ्याची स्थापना केली. हा कुशाण वंशाचा मूळ पुरुष होय.

युए-ची टोळ्यांच्या या शाखेला ता-युए-ची किंवा थोरली युए-ची असे नाव आहे. याशिवाय त्यांची धाकटी युए-ची अशी दुसरीही एक शाखा होती, तिने तिबेटच्या सीमेचा प्रदेश व्यापला होता.

पहा : कुशाण वंश.

संदर्भ : Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1970.

मिराशी, वा. वि.